सामराजगड आणि रेवदंडा.

हेम's picture
हेम in जनातलं, मनातलं
20 Jul 2011 - 11:32 pm

भाग १- कांसा बेटावरील पद्मदुर्ग..= http://www.misalpav.com/node/18354

पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्‍याचा सुंदर देखावा दिसतो.

इथुनच चढाईला सुरुवात करायची. वर चढतांना वाटेत काही शिल्पावशेष दिसतात.

गडावर रचीव तटबंदी दिसते.

बाकी जास्त अवशेष नसले तरी सामराजगडाची इतिहासाने मात्र छोटीशी नोंद घेतलेली आहे. हा किल्ला १६७१ च्या होळीच्या रात्री सिद्दीने गडावर हल्ला केला. दुर्दैवाने दारुकोठाराचा स्फोट झाला. महाराज त्यावेळी जंजिर्‍यापासून २० कोस अंतरावरील एक गांवी झोपलेले होते. ज्यावेळी राजपुरीला दारूचा स्फोट झाला त्याच वेळी निद्रिस्त असलेले महाराज दचकून जागे झाले व ' दंडा राजपुरीवर काहीतरी संकट कोसळले आहे' असे उद्गार त्यांनी निकटच्या लोकांजवळ काढले. त्वरित जासूद रवाना केले गेले, तोवर दंडा राजपुरी म्हणजे सामराजगड हातातून गेला होता.
गडावरून जंजिरा व पद्मदुर्गाचा मस्त देखावा दिसतो.

सामराजगड उतरून खाली आलो तोवर जेवणाची वेळ झाली होती. मुरूडच्या 'पाटील खानावळी' त पोटपूजा झाली. मुरुड बीचवर हे लांब मान काढून डोकावणारे नारळाचे झाड, दैनिक लोकसत्ताचे छायाचित्रकार सुधीर नाझरेंमुळे अनेकांना माहिती असेल. मागे दिसतोय तो सामराजगड...!!

परतीच्या प्रवासांत रेवदंडा दुर्गाची तटबंदी फोडून केलेल्या रस्त्यावर आलो तेव्हा ३ वाजले होते. रेवदंडा किल्ला पूर्ण पहायचा झाला तर खूप वेळ मोडणार होता त्यामुळे मला पुढे उशीर होण्याची शक्यता वाढायला लागली होती. पण सुदैवाने आपटेकाकांनी काही मुख्य अवशेष पाहून लगेच निघायचा निर्णय घेतला.
इतिहासाकडे पाहू जाता, इ.स. १५५८ मध्ये पोर्तुगीज कॅप्टन सोज याने हा किल्ला बांधला. इ.स. १६३६ मध्ये निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे कुटुंबकबिला किल्ल्यांत ठेवण्याबाबत केलेली विनंती त्याने मान्य केली नव्हती. संभाजीराजांच्या काळांत मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंड्यास वेढा घालून २२-२३ जुलै १६८३ च्या रात्री हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. पोर्तुगिज शैलीत असलेलं किल्ल्याचं बांधकाम सध्या खूपसं पडीकावस्थेत आहे. पोर्तुगिज धाटणीच्या प्रचंड भिंती, काही तोफा आढळतात.

पण बघायलाच हवं ते ५ मजली उंच घंटाघर किंवा सातखणीच्या मनोर्‍याची इमारत. याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असणार.

इथेच खाली २ फोर्ज वेल्डेड तोफा व ६ ओतीव तोफा दिसतात्.या मनोर्‍याच्या मागील बाजूच्या तटातून एका दरवाजाने समुद्राकडे बाहेर जाणारी वाट आहे. इथून रेवदंड्याच्या तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते.

..आणि समोरच दिसणारा कोरलई दुर्ग..

रेवदंड्याच्या तटबंदीचा परीघ ५ किमी. चा होता. या तटबंदीमध्ये ६ भुयारे आहेत. जुलै १९८२ मध्ये 'केव्ह एक्स्प्लोरर्स' संस्थेच्या सभासदांनी या भुयारांचा शोध घेतला आहे. भुयारांआतील बांधकाम दगडविटांनी केलं आहे. आज वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्यात आता बरीच खाजगी वस्ती झाली आहे. बर्‍याच ठिकाणी तटावरून फिरता येते, पण झाडोरा खूप माजला आहे. एका दरवाजावर मोठा दगडी मुकूट व राजचिन्ह कोरलेले दिसते

... पण भिंतीवरील झाडांची मुळ्यांनी या ऐतिहासिक ठेव्याला इजा होत आहे.

आतल्या वस्तीत सिद्धेश्वर मंदिराची चौकशी करत तिथे गेलो. या मंदिरामध्ये पोर्तुगीज काष्ठशिल्पाचा उत्तमपैकी नमुना असलेला एक वासा दिसला. त्यांवर शिकारीचा प्रसंग कोरलेला दिसतो.

उन्हांत भटकल्याने लागलेली तहान मंदिरात गार पाण्याने भागवली. माहितगार घेतला तरी किल्ला पहायला दोनेक तास तरी हवेत. पण डिट्टेल भटकंती पुन्हा केव्हातरी करुया.

प्रवासछायाचित्रणलेखमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

20 Jul 2011 - 11:41 pm | अर्धवटराव

डिट्टेल भटकंतीला फार वेळ लाऊ नका :)

अर्धवटराव

मस्त फोटू व भटकंती सुद्धा

प्रचेतस's picture

21 Jul 2011 - 9:11 am | प्रचेतस

फोटो आणि वर्णन पण झकास रे हेमंत.
चौल, रेवदंड्याचा परिसर एकदम सुरेख आहे. दुतर्फा नारळी, पोफळीची झाडे, आणि मध्ये रस्ता. एकदम अप्रतिम निसर्गसौंदर्य भरलेले आहे त्या रस्त्यावर.

विलासराव's picture

21 Jul 2011 - 9:35 am | विलासराव

+१

छान ..
फोटो मात्र आनखिन हवे होते