काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.
रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)
बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्याची सेटिंग वैग्रे अॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...
पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.
तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही.
प्रतिक्रिया
30 Jun 2011 - 1:42 pm | गणेशा
रागिनी एम्.एम्.एस. हा चित्रपट पाहिला नाहि, पण अशी घटना सत्य घडली आहे.. आणि ती बेड्यातील खरी मुलगी (रागिनी) एकटीच जखमी अव्सस्थेत जंगलात सापडली आहे. आणि तीच्या सांगण्यावरुनच हा चित्रपट बनवला आहे असे मित्र म्हणत होते. आणि सगळ्या कॅमेराचे रेकॉर्डिंग पण सापडले आहे. काय घडले ते त्यात दिसते आहे..
हे खरे आहे का ? माझा विश्वास मात्र अजुन तरी नाही हा खरा आहे असे.
30 Jun 2011 - 1:50 pm | शिल्पा ब
ते सगळं ठीक हो, पण तुम्ही सारखं ताकालाच का जाता हा एक प्रश्न मला उगाचच पडला.
30 Jun 2011 - 1:59 pm | शाहिर
आंबट शौकीन आहेत
30 Jun 2011 - 4:25 pm | धमाल मुलगा
शिल्पाताईचा यॉर्कर भारी, तर शाहिरांचा त्यावरचा सिक्सर जगात भारी!! :)
जियो! :)
30 Jun 2011 - 2:19 pm | सोत्रि
शिल्पाताइ
तुम्हाला फारच प्रश्न पडतात ब्वॉ, तेही उगीचच ;)
30 Jun 2011 - 7:27 pm | तिमा
ज्यांना लोणी मिळत नाही त्यांना ताकालाच जावं लागणार.
30 Jun 2011 - 7:55 pm | सूर्यपुत्र
जोपर्यंत ताक फूंकून प्यायची वेळ येत नाही, तोपर्यंत....... ;)
परा ने परी-क्षण छान लिहिले आहे. :)
-सूर्यपुत्र.
30 Jun 2011 - 1:53 pm | शाहिर
एकंदरीत सुमार चित्रपट आहे ..मुळ इंग्रजी चित्रपट छान आहे
30 Jun 2011 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आधिच सांगितले ते बरे केलेत.
आता बघायलाच हवा. ;)
30 Jun 2011 - 4:03 pm | कवितानागेश
ते छुपे क्यामेरे पटावर मांडेपर्यन्त भूत त्या 'मित्रा'ला काहीच करत नाही, आणि ही प्यादी आल्यानंतरच मारकाट सुरु करते, हे अगम्य आहे.
30 Jun 2011 - 4:16 pm | किसन शिंदे
चित्रपट पाहताना नेमका याच गोष्टींचा मी विचार करत होतो, पण केकता बाईंनी त्या चेटकीणीला तशी ऑर्डरच दिली असल्यावर आपण तरी काय बोलणार.:)
30 Jun 2011 - 4:26 pm | धमाल मुलगा
बर्याच वर्षात चेटकिणीनंही MMS पाहिला नसणार. म्हणली असेल, "बघुया तर खरं, तेव्हढीच जरा गंमत." :D
-धमाल SMS
30 Jun 2011 - 4:49 pm | यकु
ठीक आहे.. तुम्ही म्हणता म्हणून पाहून घेऊ एकदा.. ;-)
30 Jun 2011 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
आयला...मॉर्निंग शो टाकायला हरकत नाही
30 Jun 2011 - 4:54 pm | ऋषिकेश
चित्रपट डाऊनलोडवून बघणे अशी नोंद केली आहे :प
धन्यवाद
30 Jun 2011 - 5:26 pm | इरसाल
पाहू कि नको ते सांगा.
दात तर आम्बणार नाहीत न ?
उगाच: च्यायला अगोदर वाटले कि सिरीयल मधल्या रागिणीचा यममेस हाय का काय ?
30 Jun 2011 - 5:31 pm | स्वाती दिनेश
रागिणी mms अशा नावाचा शिनूमा आहे हेच इथे मुदलात माहित नव्हते... असो.
परा, तुझे परिक्षण नेहमीसारखेच!
स्वाती
30 Jun 2011 - 7:52 pm | माझीही शॅम्पेन
+ १ :)
30 Jun 2011 - 7:58 pm | प्रियाली
वेळ काढून बघेन म्हणते. ;)
30 Jun 2011 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजकुमार यादव हा अभय देओलचा भ्रष्ट डुप्लिकेट दिसतो आहे. चित्रपट पाहिलेला नाही आणि परिक्षण वाचून न पहाण्याचीच इच्छा झाली.
30 Jun 2011 - 10:38 pm | इंटरनेटस्नेही
हेच आणि असेच म्हणतो. बाकी चित्रपट परीक्षण लिहावे तर परासरांनीच!
30 Jun 2011 - 11:32 pm | रेवती
काहीही ल्हितोस कारे तू?
30 Jun 2011 - 11:51 pm | अप्पा जोगळेकर
फोटो पाहून चित्रपट पाहण्याची जबर इच्छा झाली. टैम्पास चित्रपट असेल असे वाटते.
1 Jul 2011 - 12:29 am | अनामिक
टुकार वाटला चित्रपट.
भयपट तेव्हा जास्तं भयपट वाटतो जेव्हा भिती आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकवल्या जाते. चित्रपट थोडा कुठे बरा आहे का काय असा वाटायला लागला आणि मधेच माशी शिंकली. फोटोची निगेटिव असते ना तसे नऊवारी नेसलेल्या बाईचे पाय पायर्या चढताना दाखवले, आणि पुढचा चित्रपट बघवेना झाला. त्यातच ते "मी चेटकीण न्हाई, मी माझ्या मुलांना मारलं न्हाई" चं पालुपद... किती बालीश आहे हा प्रकार.
भूत ही कल्पना चित्रपटात सुचक असली की जास्तं भिती वाटते (हे व्यक्तीसापेक्ष आहे म्हणा), आणि मग जर्रा का भुत दिसलं की मग त्या भुताला बघून हसायला येतं, अगदी कोई मिल गया मधे जादूला पाहिल्यावर हसायला येतं ना तस्सं!
1 Jul 2011 - 9:59 am | गुंड्या बावळा
कोणी फुकटात दाखवेल तर बाघिन म्हणतोय........
परिक्षण चांगले हो.....