फायनान्सची तोंडओळख (भाग ६): इनकम स्टेटमेन्ट: भाग १

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
18 Apr 2011 - 12:13 pm
गाभा: 

फायनान्सची तोंडओळख (भाग ६): इनकम स्टेटमेन्ट: भाग १

या भागाची काठिण्यपातळी: कठिण

यापूर्वीचे लेखन
फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या>
फायनान्सची तोंडओळख (भाग १): Perpetuity, व्याजाचे दर आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी
फायनान्सची तोंडओळख (भाग २): Annuity
फायनान्सची तोंडओळख (भाग ३): एफिशिएंट मार्केट आणि फायदा-तोटा
फायनान्सची तोंडओळख (भाग ४): घसारा, कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन पॉईंट
फायनान्सची तोंडओळख (भाग ५): बॅलन्स शीट

मागील भागात आपण बॅलन्स शीट म्हणजे काय ते बघितले.आता या भागात इनकम स्टेटमेन्ट हे दुसरे महत्वाचे फायनान्शियल स्टेटमेन्ट बघू.यालाच Profit and Loss statement असेही म्हणतात.हा भाग खूप महत्वाचा आहे.अकाऊंटिंग हा विषय नवा असेल तर हा भाग समजायला थोडा कठिण जाऊ शकतो.

बॅलन्स शीट आणि इनकम स्टेटमेन्टमध्ये एक मूलभूत फरक आहे.तो म्हणजे बॅलन्स शीट ही कंपनीची एका ठराविक क्षणी आर्थिक स्थिती कशी होती याचा लेखाजोखा देते.तर इनकम स्टेटमेन्ट हे ठराविक कालावधीत (एक महिना/एक वर्ष किंवा आपल्याला पाहिजे तो कालावधी) कंपनीचे उत्पन्न किती आणि खर्च किती याचा लेखाजोखा देते.म्हणजे कंपनीची बॅलन्स शीट वेगळ्या तारखांना असेल (समजा १ जानेवारी २०११, १ जानेवारी २०१२ इत्यादी) तर इनकम स्टेटमेन्ट १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०११ या एका वर्षासाठीचे असेल.

वर म्हटल्याप्रमाणे इनकम स्टेटमेन्ट कंपनीची ठराविक कालावधीत उत्पन्न आणि खर्च याचा लेखाजोखा देते.आता उत्पन्न आणि खर्च म्हणजे नक्की काय?हा प्रश्न क्षुल्लक वाटेल पण पुढील वेगवेगळ्या शक्यतांचा विचार केल्यास हा प्रश्न वरकरणी वाटतो तितका क्षुल्लक नाही.

१. समजा मी कुमार एन्टरप्रायझेसकडून ३१ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्या विकत घेतल्या आणि त्याचे पैसे चेकने दिले. चेक वठायला समजा ३ दिवसांचा वेळ लागत असेल तर पैसे बिझनेसच्या खात्यात ३ जानेवारी २०१२ रोजी जमा होतील.मग बिझनेसचे हे उत्पन्न २०११ मध्ये धरावे की २०१२ मध्ये?
२. समजा मी कुमार एन्टरप्रायझेसला ३१ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्यांचे पैसे आगाऊ दिले पण बिझनेसने मला छड्या २ जानेवारी २०१२ रोजी दिल्या तर हे उत्पन्न २०११ मध्ये धरावे की २०१२ मध्ये?
३. समजा मी कुमार एन्टरप्रायझेसला २९ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्यांसाठी आगाऊ पैसे दिले.त्यापैकी २५ छड्या मला ३१ डिसेंबर २०११ रोजी मिळाल्या आणि उरलेल्या ७५ छड्या २ जानेवारी २०१२ रोजी मिळाल्या तर हे उत्पन्न २०११ मध्ये धरावे की २०१२ मध्ये?
४. कुमार एन्टरप्रायझेसला छड्या बनवायला कच्चा माल लागतो आणि अर्थातच त्यासाठी खर्च करावा लागतो.समजा बिझनेसने १५ डिसेंबर २०११ रोजी ५०० छड्या बनवायला पुरेल इतका कच्चा माल विकत घेतला. ३१ डिसेंबर २०११ पर्यंत फक्त शंभरच छड्या विकल्या गेल्या आणि उरलेल्या ४०० छड्या २०१२ मध्ये विकल्या गेल्या तर कच्च्या मालासाठीचा खर्च २०११ मध्ये दाखवावा की २०१२ मध्ये?
५. समजा कुमार एन्टरप्रायझेसने ३१ डिसेंबर २०११ रोजी ५०० छड्या बनवता येतील इतक्या कच्च्या मालासाठी आधी पैसे भरले पण कच्चा माल २ जानेवारी २०१२ मध्ये मिळाला तर तो खर्च २०११ मध्ये दाखवावा की २०१२ मध्ये?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील दोन महत्वाच्या मुद्द्यांमध्ये आहेत.
१. उत्पन्न आणि खर्च यांचा किती रोख रक्कम बिझनेसला मिळाली किंवा किती रक्कम द्यावी लागली याच्याशी काहीही संबंध नाही.
२. उत्पन्न आणि खर्च ज्या कालावधीत वस्तू ग्राहकाच्या ताब्यात दिली (किंवा सर्व्हिस उद्योगांसाठी सेवा पुरवली) त्या कालावधीमध्ये धरावा.

समजायला गडबड होत आहे?तसे होत असेल तर तुम्ही एकटे नाही.मी पण पहिल्यांदा हे वाचले तेव्हा माझीही अशीच गडबड झाली होती.वरील शक्यता एकेक करून घेऊ म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल.इथे आपण २०११ चे वर्ष आणि २०१२ चे वर्ष या दोन कालावधींचा विचार करत आहोत.

शक्यता १: समजा मी कुमार एन्टरप्रायझेसकडून ३१ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्या विकत घेतल्या आणि त्याचे पैसे चेकने दिले. चेक वठायला समजा ३ दिवसांचा वेळ लागत असेल तर पैसे बिझनेसच्या खात्यात ३ जानेवारी २०१२ रोजी जमा होतील.मग बिझनेसचे हे उत्पन्न २०११ मध्ये धरावे की २०१२ मध्ये?
वर दिलेला दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा परत एकदा बघू.उत्पन्न आणि खर्च ज्या कालावधीत वस्तू ग्राहकाच्या ताब्यात दिली त्या कालावधीमध्ये धरावा.इथे छड्या (वस्तू) कोणत्या कालावधीत ग्राहकाच्या ताब्यात दिल्या? २०११ या वर्षात.म्हणजेच अकाऊंटिंगच्या तत्वाप्रमाणे १०० छड्यांपासूनचे उत्पन्न आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च हे २०११ या वर्षातच धरायचे.समजा एक छडी १५०० रूपयांना विकली आणि त्यासाठीचा कच्चा माल ९०० रूपये असेल तर एकूण उत्पन्न १५०० गुणिले १०० बरोबर १,५०,००० रूपये आणि त्यासाठीचा खर्च ९०० गुणिले १०० बरोबर ९०,००० रूपये हा वर्ष २०११ मध्ये.

पण या छड्या विकून पैसे मिळाले २०१२ मध्ये.मग त्याचे काय करायचे?त्यासाठी परत पहिले तत्व बघू.उत्पन्न आणि खर्च यांचा किती रोख रक्कम बिझनेसला मिळाली किंवा किती रक्कम द्यावी लागली याच्याशी काहीही संबंध नाही.म्हणजे कोणी रोख रक्कम देऊन छड्या २०११ मध्येच घेतल्या काय की रोख रक्कम २०१२/२०१३/२०५० मध्ये दिली काय त्याचा इनकम स्टेटमेन्टमधील उत्पन्न आणि खर्च याच्याशी काही संबंध नाही.

मग २०१२ मध्ये मिळालेल्या पैशाचे काय करायचे?तर अकाऊंटिंगच्या तत्वांप्रमाणे २०११ मध्ये विकलेल्या वस्तूचे पैसे २०१२ मध्ये मिळणार असतील तर त्या गोष्टीला ३१ डिसेंबर २०११ रोजी बॅलन्स शीटमध्ये "Accounts Receivable" म्हणतात आणि बॅलन्स शीटमध्ये ते Assets च्या बाजूला दाखवतात. म्हणजेच २०११ मध्ये छ्ड्या विकल्या आहेत तेव्हा त्यापासूनचे उत्पन्न २०११ मध्येच धरायचे.पण त्यासाठीचे पैसे २०११ या वर्षात मिळालेले नाहीत.त्यामुळे ते कंपनीचे “पैसे येणे” झाले. यालाच "Accounts Receivable" म्हणतात आणि अर्थातच ती एक Asset आहे.

म्हणजे पहिल्या शक्यतेप्रमाणे ३१ डिसेंबर २०११ च्या बॅलन्स शीटमध्ये Assets च्या बाजूला एकूण १५०० गुणिले १०० बरोबर १,५०,००० रूपये Accounts Receivable म्हणून दाखवले जातील.

शक्यता २: समजा मी कुमार एन्टरप्रायझेसला ३१ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्यांचे पैसे आगाऊ दिले पण बिझनेसने मला छड्या २ जानेवारी २०१२ रोजी दिल्या तर हे उत्पन्न २०११ मध्ये धरावी की २०१२ मध्ये?
वर दिलेला दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा परत एकदा बघू.उत्पन्न आणि खर्च ज्या कालावधीत वस्तू ग्राहकाच्या ताब्यात दिली त्या कालावधीमध्ये धरावा.ग्राहकाला वस्तू कोणत्या कालावधीत ताब्यात दिली? २०१२ मध्ये.म्हणजे छड्यांपासून मिळालेले उत्पन्न आणि त्यासाठी कच्च्या मालासाठी करावा लागलेला खर्च २०१२ याच वर्षात धरावा.म्हणजे २०१२ मध्ये एकूण मिळकतीत १ लाख ५० हजार रूपये तर एकूण खर्चात ९० हजार रूपये मिळवायचे.परत एकदा: उत्पन्न आणि खर्च यांचा किती रोख रक्कम बिझनेसला मिळाली किंवा किती रक्कम द्यावी लागली याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे मी छड्यांसाठी आगाऊ पैसे २०११ मध्ये दिले काय किंवा १८५७ मध्ये दिले काय जोपर्यंत मला छड्या २०१२ मध्ये दिल्या तोपर्यंत छड्यांवरील उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही २०१२ मध्येच धरायचे.

पण ३१ डिसेंबर २०११ रोजी कुमार एन्टरप्रायझेसला मी १ लाख ५० हजार रूपये आगाऊ दिले आहेत त्याचे काय करावे?अकाऊंटिंगच्या तत्वाप्रमाणे याला "Prepaid revenue" असे म्हणतात आणि ती liability असते. म्हणजे ३१ डिसेंबर २०११ च्या बॅलन्स शीटमध्ये १ लाख ५० हजार रूपये Prepaid revenue या नावाखाली liability म्हणून दाखवावे.

शक्यता ३: समजा मी कुमार एन्टरप्रायझेसला २९ डिसेंबर २०११ रोजी १०० छड्यांसाठी आगाऊ पैसे दिले.त्यापैकी २५ छड्या मला ३१ डिसेंबर २०११ रोजी मिळाल्या आणि उरलेल्या ७५ छड्या २ जानेवारी २०१२ रोजी मिळाल्या तर हे उत्पन्न २०११ मध्ये धरावे की २०१२ मध्ये?
पहिल्या दोन शक्यता व्यवस्थित लक्षात आल्यास हे फारसे अवघड नाही.ग्राहकाला २५ छड्या २०११ मध्ये ताब्यात दिल्या तर उरलेल्या ७५ छड्या २०१२ मध्ये ताब्यात दिल्या.म्हणजे २५ छड्यांपासूनचे उत्पन्न/खर्च २०११ मध्ये तर ७५ छड्यांपासूनचे उत्पन्न/खर्च २०१२ मध्ये धरावा.३१ डिसेंबर २०११ रोजीच्या बॅलन्स शीटमध्ये ७५ छड्यांसाठीची आगाऊ मिळालेली रक्कम "Prepaid revenue" या नावाखाली liability म्हणून दाखवावी.

शक्यता ४: कुमार एन्टरप्रायझेसला छड्या बनवायला कच्चा माल लागतो आणि अर्थातच त्यासाठी खर्च करावा लागतो.समजा बिझनेसने १५ डिसेंबर २०११ रोजी ५०० छड्या बनवायला पुरेल इतका कच्चा माल विकत घेतला. ३१ डिसेंबर २०११ पर्यंत फक्त शंभरच छड्या विकल्या गेल्या आणि उरलेल्या ४०० छड्या २०१२ मध्ये विकल्या गेल्या तर तो खर्च २०११ मध्ये दाखवावा की २०१२ मध्ये?
२०११ वर्षात एकूण १०० छड्या ग्राहकाच्या ताब्यात दिल्या.म्हणजे १०० छड्यांपासूनचे उत्पन्न आणि त्यासाठीचा खर्च २०११ मध्ये दाखवावा. उरलेल्या ४०० छड्या २०१२ मध्ये विकल्या गेल्या,म्हणजे ४०० छड्यांपासूनचे उत्पन्न आणि त्यासाठीचा खर्च २०१२ मध्ये दाखवावा.एक छडीसाठी लागणारा कच्चा माल ९०० रूपये.म्हणजे एकूण ९०० गुणिले ४०० बरोबर ३ लाख ६० हजार रूपये इतका कच्चा माल कुमार एन्टरप्रायझेसकडे ३१ डिसेंबर २०११ रोजी असेल.अकाऊंटिंगच्या तत्वाप्रमाणे ३ लाख ६० हजार रूपये Inventories या सदराखाली Assets च्या बाजूला दाखवावे.

शक्यता ५: समजा कुमार एन्टरप्रायझेसने ३१ डिसेंबर २०११ रोजी ५०० छड्या बनवता येतील इतक्या कच्च्या मालासाठी आधी पैसे भरले पण कच्चा माल २ जानेवारी २०१२ मध्ये मिळाला तर तो खर्च २०११ मध्ये दाखवावा की २०१२ मध्ये?
कच्चा माल २०१२ मध्ये मिळाला तेव्हा त्यासाठीचा खर्च २०११ मध्ये दाखवायचे काहीच कारण नाही. या ५०० छड्यांपैकी समजा २०० छड्या २०१२ मध्ये विकल्या आणि ३०० छड्या २०१३ मध्ये विकल्या तर २०० छड्यांपासूनचे उत्पन्न आणि त्यासाठीचा खर्च २०१२ मध्ये दाखवावा तर ३०० छड्यांपासूनचे उत्पन्न आणि त्यासाठीचा खर्च २०१३ मध्ये दाखवावा.३१ डिसेंबर २०११ रोजी ५०० छड्यांच्या कच्च्या मालासाठी ५०० गुणिले ९०० बरोबर ४ लाख ५० हजार रूपये भरले आहेत.तेव्हा अकाऊंटिंगच्या तत्वांप्रमाणे ३१ डिसेंबर २०११ च्या बॅलन्स शीटमध्ये ४ लाख ५० हजार रूपये हे Assets च्या बाजूला "Advance payment" या सदराखाली दाखवावे.

आता एक प्रश्न उभा राहिल की कधीही उत्पन्न किंवा खर्च दाखवला तरी काय फरक पडतो? आपल्याला कदाचित फरक पडणार नाही पण करखात्याला त्यामुळे फरक पडतो.कर किती भरावा हे ठरविण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या काळातील उत्पन्न आणि खर्च याचा विचार करून होणाऱ्या नफ्यावर कर भरावा लागतो.तेव्हा बिझनेसचे वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असले तरी करखात्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी फायनान्शियल स्टेटमेन्ट सादर करावी लागतात.

डिसेंबर २०११ या महिन्यातील कर्मचाऱ्यांचे पगार कुमार एन्टरप्रायझेस जानेवारी २०१२ मध्ये देणार.म्हणजेच पगारावरील खर्च २०११ मध्ये दाखवावा (कारण कर्मचाऱ्यांच्या कामाचा वापर करून छड्या विकल्या आहेत) आणि ३१ डिसेंबर २०११ रोजीच्या बॅलन्स शीटमध्ये Salary Payable या सदराखाली डिसेंबर २०११ चा पगार ही Liability म्हणून दाखवावी.

थोडक्यात उत्पन्न आणि खर्च ज्या कालावधीत वस्तू विकली त्या कालावधीतच धरावा.प्रत्यक्ष पैसे कधी मिळाले/दिले याचा त्याच्याशी काही संबंध नाही.या तत्वाला Accrual चे तत्व म्हणतात.

या भागात बघितलेले महत्वाचे मुद्दे
१. Accrual चे तत्व
२. विविध Assets आणि Liabilities बॅलन्स शीटमध्ये कशा दाखवाव्यात

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Apr 2011 - 1:00 pm | नितिन थत्ते

अ‍ॅक्रूअलच्या तत्त्वाचे सुरेख विवेचन.

पैसा's picture

19 Apr 2011 - 9:21 pm | पैसा

काही महिती नसलेल्याना पण सहज समजेल अशा भाषेत लिहिलंय, आणि ज्याना माहिती आहे, त्यांची उजळणी होतेय! छान!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Apr 2011 - 2:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच दिवसांच्या गॅप नंतर पुढचा भाग आला आहे.
अर्थात नेहमी प्रमाणे चांगला जमला आहे.
पुलेशु

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 2:41 pm | मराठमोळा

क्लिंटनचे कौतुकच आहे एवढी मेहनत घेतल्याबद्दल आणि सोप्या भाषेत समजावल्याबद्दल..
पण माझ्यासारख्या लोकांना हे कळणे थोडे अवघडच जाणार हे नक्की.. त्यामुळे प्रतिसाद कदाचित कमीच मिळतील पण ही लेखमाला चालू ठेवावी ही विनंती.

पुढील लिखाणास शुभेच्छा!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Apr 2011 - 5:36 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह क्लिंटन साहेब सोदाहरण स्पष्ट केलेले असल्याने नवख्या माणसाला जर नवीन व्यवसाय उद्योग सुरु करायचा असेल तर अकाऊंटींग ची तत्वे समजून घेण्यास अत्यंत उपयुक्त लेखमाला आहे.

गवि's picture

18 Apr 2011 - 5:58 pm | गवि

अप्रतिम संग्राह्य लेखमाला.

सुनील's picture

18 Apr 2011 - 7:43 pm | सुनील

देर से आये, दुरुस्त आये.

फार सोप्या भाषेत तोंडओळख करून दिली आहे.

एक शंका - वस्तू (किंवा सेवा) ज्या आर्थिक वर्षात ग्राहकाला दिली जाते ते वर्ष उत्पन्न्/खर्च्याचा नोंदीसाठी वापरावे, हे ठीक. परंतु, काही खर्च असे असतात की त्यांचा उपयोग पुढील काही वर्षे होणार असतो. त्याची नोंद कशी करावी?

समजा, एक लाख रुपये खर्च करून एखादे यंत्र २०११ साली आणले पण त्याचा उपयोग काही फक्त २०११ ह्याच वर्षात होणार नसतो. तो पुढील काही काळ होणार असतो. तर तो एक लाख रुपये खर्च २०११ सालीच दाखवावा काय? (मी घसार्‍यासंबंधी विचारीत नाही आहे तर, कॅपिटलायझेबल खर्चा संबंधी विचारीत आहे)

शैलेन्द्र's picture

18 Apr 2011 - 9:40 pm | शैलेन्द्र

माझ्या माहितीप्रमाणे..

"१. उत्पन्न आणि खर्च यांचा किती रोख रक्कम बिझनेसला मिळाली किंवा किती रक्कम द्यावी लागली याच्याशी काहीही संबंध नाही."

म्हणुन, तो खर्च (यंत्राची किंमत) assets मधे दाखवला जाइल, व गंगाजळीतुन खर्च म्हणुन वजा केला जाइल.

जर मशीनसारखी मालमत्ता घेतली असेल तर तिची किंमत अ‍ॅसेट म्हणून दाखवून ती घसारा म्हणूनच खर्चात घेतली जाईल.

परंतु कधीकधी अमूर्त मालमत्ता मिळवली जाते. उदा. एखाद्या औषधाच्या संशोधनावर समजा १०० कोटी रु खर्च झाला तर त्याचा खर्च सुद्धा अ‍ॅसेट म्हणून घेता येतो. आणि क्रमाक्रमाने त्या औषधाच्या आयुष्यात खर्चाला दाखवला जातो. (त्याला बहुधा डेफर्ड रेव्हेन्यू एक्स्पेन्स म्हणतात). या केस मध्ये औषधाचे आयुष्य (किंवा त्याच्या पेटंटच आयुष्य) १४ वर्षे असेल तर १००/१४=७ कोटी दरवर्षी असा खर्च दाखवला जाईल. हा खर्च किती आणि कसा घ्यायचा याचे फिक्स नियम नसतात.

याचेच अजून एक उदाहरण म्हणजे लेखकाकडून एका नाटकाचे हक्क निर्मात्याने विकत घेणे. अशा वेळी लेखकाला कदाचित लम्पसम रक्कम दिली जाईल. ती निर्माता आपली अ‍ॅसेट म्हणून दाखवील आणि नाटकाच्या जमा खर्चात ती हळूहळू वळती करत जाईल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Apr 2011 - 8:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Amortization बद्दल बोलत आहात असे दिसते.
< पुस्तकी ज्ञान >
एखादा मोठा खर्च जेव्हा केला जातो तेव्हा ज्या गोष्टीवर खर्च केला ती (उदा यंत्र) पुढील जितके वर्ष वापरले जाणार आहे तितक्या वर्षात त्याचा खर्च विभागाला जातो. या प्रक्रियेला Amortization असे म्हणतात. Balance sheet आणि Income statment मध्ये त्या साठी वेगळी एन्ट्री असते पण ते नक्की कसे हाताळले जाते हे विसरलो असे खेदपूर्वक नमूद करू इच्छितो :-(
< / पुस्तकी ज्ञान >

नितिन थत्ते's picture

19 Apr 2011 - 9:16 pm | नितिन थत्ते

विकीपीडीया अ‍ॅमोर्टायझेशन आणि डिप्रिसिएशन(घसारा) समांतर असल्याचे म्हणतो.

परंतु माझ्या व्यावसायिक जीवनात मी अ‍ॅमोर्टायझेशन हा शब्द पुढील अर्थाने ऐकला/वापरला आहे.

समजा मला एक प्लॅस्टिकची वस्तू बनवायची आहे. (उदा. मिनरल वॉटरसाठीची बाटली). त्यासाठी मला मोल्ड/साचा बनवायला हवा. मी एका प्लॅस्टिक वस्तू बनवणार्‍याकडे जातो आणि त्याला माझी गरज सांगतो. मी म्हणतो की "तुझ्याकडून अशा २० लाख बाटल्या मी दर महिन्याला घेईन". तेव्हा तो पुरवठादार म्हणतो, "बाटलीचे मटेरिअल + लेबर मिळून ४७ पैसे होतील. आता मोल्ड बनवावा लागेल त्याची किंमत तुम्ही देणार का? मोल्डची किंमत १ लाख रुपये होईल". मी त्याला म्हणतो," नाही, मोल्डची किंमत अ‍ॅमोर्टाईज कर". त्यानुसार तो मोल्डचे एक लाख रु साधारण त्या मोल्डमधून जेवढ्या बाटल्या निघू शकतील तेवढ्यावर अ‍ॅमोर्टाईज करतो. समजा एक कोटी बाटल्यांपर्यंत मोल्ड चालेल असे असेल तर मोल्डच्या किंमतीचे अ‍ॅमोर्टायझेशन म्हणून तो बाटलीची किंमत तेवढ्याने (१ पैशाने) वाढवतो. म्हणजे मोल्डसाठी १ लाख रु मला उचलून द्यावे लागत नाहीत.

या उदाहरणात मोल्डची किंमत पाचच महिन्यात (बाटल्यांच्या पुरवठादाराला) चुकती होणार आहे. सहसा अ‍ॅमोर्टायझेशनचा कालावधी दोन वर्षाहून अधिक नसतो. उलट यंत्रे वगैरेंवरचा घसारा १० वर्षे वगैरे चालू राहतो.
.
.
.
.

(अनुभवी)

जोशी's picture

18 Apr 2011 - 10:04 pm | जोशी

ऊत्तम लेख.

हीच उदाहरणे घेउन फेअर व्हेल्यु अकाउंटींग समजाऊ शकाल का?

आज काल फेअर व्हेल्यु अकाउंटींग च्या नावाखाली खुप चर्चा ऐकुन आहे.

जोशी

मन१'s picture

19 Apr 2011 - 9:24 pm | मन१

फायनान्स चा ह्यापूर्वी काहिही संबंध नसतानाही बराचसा भाग समजतोय.
काही शंका होत्या. वरच्या प्रतिसादांमधुन त्याही दूर होताहेत.

--मनोबा.

नरेशकुमार's picture

21 Apr 2011 - 5:22 am | नरेशकुमार

वाचत आहे.
छान आहे लेख मालिका !