फायनान्सची तोंडओळख (भाग १): Perpetuity, व्याजाचे दर आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
16 Feb 2011 - 9:25 am
गाभा: 

या भागाची काठिण्यपातळी: मध्यम

यापूर्वीचे लेखन

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

मागच्या भागात रामच्या छड्या किती किंमतीला विकल्या जाऊ शकतील हा प्रश्न विचारला होता.त्याचे उत्तर बघायच्या आधी रामची छडी म्हणजे नक्की काय आहे हे बघू या.एकदा एकरकमी पैसे भरून अनंतकाळ त्यावर व्याज मिळणार अशी व्यवस्था रामच्या छडीत आहे.तसेच दरवर्षी शंभर रूपये ती छडी देणार असे आश्वासन दिले आहे.असे आश्वासन शेअरच्या बाबतीत देता येणार नाही.कारण शेअरमधून आपल्याला हातात किती पैसे मिळतील (लाभांश) हे संबंधित बिझनेसला किती फायदा झाला याबरोबरच त्या बिझनेसला किती पैसे लाभांश म्हणून गुंतवणूकदारांना द्यायचे आणि किती पैसे आपल्याच बिझनेसमध्ये परत गुंतवायचे यावर कंपनीचे धोरण काय यावरही अवलंबून राहिल.याविषयी नंतरच्या कुठल्यातरी भागात. तेव्हा रामची छडी हा एक “बॉंड” आहे.आणि त्यावर अनंतकाळ व्याज दिले जाणार आहे.अशा प्रकारच्या बॉंडला “Perpetual bond” म्हणतात.इंग्रजीतील “Perpetual” या शब्दाचा अर्थ आहे कायमचा किंवा अंत नसलेला. तेव्हा रामची छडी हा एक “Perpetual bond” आहे. तसेच प्रत्येक ठराविक कालावधीनंतर अनंतकाळपर्यंत मिळत असलेल्या सारख्या रकमेच्या कॅश फ्लो ला Perpetuity म्हणतात. तेव्हा या भागात आपण Perpetuity किती किंमतीला विकली जाऊ शकेल हे बघणार आहोत.

रामची छडी ही काल्पनिक असली तरी “Perpetual bond” हे काल्पनिक नक्कीच नाहीत.गेल्या काही वर्षात बॅंक ऑफ इंडिया , स्टेट बॅंक ऑफ इंडिया,टाटा स्टील यासारख्या कंपन्यांनी Perpetual bonds जारी केले आहेत.

राम कुमारला पडलेला प्रश्न विचारताना वाचकांना गृहितके धरून प्रश्न सोडवा अशी हिंट दिली होती.कोणत्याही शास्त्राप्रमाणे फायनान्समध्ये प्रश्न सोडवताना सुरवातीला सर्वात ideal अशी गृहितके धरली जातात. या प्रश्नाच्या संदर्भातील गृहितके पुढीलप्रमाणे:

१. आपली जादूची छडी न चुकता दर वर्षाच्या १ जानेवारीला आपल्या बॅंक खात्यात १०० रुपये जमा करेल आणि ’राम कुमार’ या जादूगाराने दिलेले आश्वासन पूर्ण करेल. फायनान्सच्या परिभाषेत ’एखाद्या दिवशी अमुक इतके पैसे देऊ’ हे आश्वासन पूर्ण न करणे याला ’डिफॉल्ट’ (default) म्हणतात. म्हणजे जादूची छडी कधीच ’डिफॉल्ट’ करणार नाही.

२. भविष्यकाळात समजा एखाद्या छडीधारकाला पैशाची गरज पडली आणि त्यासाठी त्याला आपल्याकडील छड्या विकाव्या लागल्या तर त्याला विकायच्या असलेल्या सगळ्या छड्या विकत घ्यायला एक किंवा अनेक ग्राहक तयार असतील. तसेच कोणाला छड्या विकत घ्यायच्या असतील तर त्याला पाहिजे तितक्या छड्या विकायला कोणीना कोणी विक्रेता तयार असेल.तसेच कोणाला घाऊक प्रमाणात कितीही छड्या खरेदी करायच्या असतील/विकायच्या असतील तरी तेवढ्या छड्या उपलब्ध असतील आणि या खरेदी/विक्रीच्या साईझमुळे खरेदी/विक्रीच्या किंमतीत फरक पडणार नाही. फायनान्सच्या परिभाषेत आपली जादूची छडी पूर्णपणे लिक्विड (तरल) असेल.

३. १ जानेवारी २०११ पासून जगाच्या अंतापर्यंत महागाई अजिबात वाढणार नाही म्हणजे सर्व वस्तूंचे दर स्थिर असतील. आता या गृहितकाचा हा प्रश्न सोडवायला काय उपयोग? ते लवकरच स्पष्ट होईल.

४. १ जानेवारी २०११ पासून जगाच्या अंतापर्यंत व्याजाचे दर कायम राहतील. या गृहितकाचा प्रश्न सोडवायला उपयोग पुढे स्पष्ट होईलच.

५. गुंतवणूकदारांना Financial Markets मधील सर्व माहिती असेल. म्हणजे कोणत्याच प्रकारच्या Information Asymmetry ला वाव नसेल.तसेच गुंतवणूकदार गुंतवणूक करताना पूर्णपणे वस्तुनिष्ठ असतील म्हणजे ते छडीची योग्य किंमत आहे त्याच किंमतीला छडी विकत घेतील आणि छडीसाठी त्यापेक्षा एक रूपयाही जास्त मोजणार नाहीत.

या गृहितकांबरोबरच फायनान्सची दोन मूलभूत तत्वे (Axioms) हा प्रश्न सोडवायला उपयोगी पडतील. Axiom म्हणजे Self-explanatory तत्व. अशा Axioms वेगळी सिध्द करायला लागत नाहीत. फायनान्समधील Axioms पुढीलप्रमाणे:

१. आज हातात असलेल्या रुपयाची किंमत उद्या मिळणाऱ्या रुपयापेक्षा जास्त असते. म्हणजेच पुढील वर्षी मिळणाऱ्या १०० रुपयांपेक्षा या वर्षी मिळणाऱ्या १०० रूपयांची किंमत जास्त असेल. याचे कारण या वर्षी मिळालेले १०० रूपये बॅंकेत ठेऊन त्यावर व्याज मिळेल आणि पुढील वर्षी आपल्या हातात १०० पेक्षा जास्त रुपये असतील. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी मिळणाऱ्या १०० रूपयांची किंमत या वर्षीच्या १०० रूपयांपेक्षा कमी असेल.

२. फायनान्सच्या ideal जगतात फुकटचा फायदा (म्हणजे कोणतीही जोखीम न पत्करता मिळालेला फायदा) जास्त काळ टिकत नाही. याचा आपल्या प्रश्नाशी संबंध काय हे पुढे स्पष्ट होईलच.अशा फुकटच्या फायद्याला फायनान्सच्या परिभाषेत arbitrage म्हणतात.

तेव्हा मुळातील पाच गृहितके आणि दोन Axioms चा वापर करून आपण आपला प्रश्न सोडवू शकतो.

छडी १ जानेवारी २०१२ पासून दरवर्षी मालकाच्या बॅंक खात्यात आपोआप १०० रूपये जमा करू लागणार हे आपल्याला माहित आहेच.तेव्हा आपल्या खात्यात दरवर्षी जमा होणाऱ्या शंभर रूपयांमुळे छडीमालकाला एक प्रकारचे समाधान मिळेल.त्याचप्रमाणे छडीसाठी पैसे भरावे लागतील त्याबद्दल त्याच्या खिशाला एक प्रकारचा फटका बसेल. तेव्हा छडी विकत घेताना मालक आज (१ जानेवारी २०११ रोजी) आपल्याला किती समाधान मिळेल याचा अंदाज घेऊनच तेवढ्या किंमतीला छडी घेईल.

पहिल्या Axiom प्रमाणे १ जानेवारी २०१२ रोजी मिळणाऱ्या १०० रुपयांची किंमत १ जानेवारी २०११ रोजी १०० रूपयांपेक्षा कमी आहे. पण ती नक्की किती कमी?

हाच प्रश्न दुसऱ्या स्वरूपात विचारता येईल.समजा मी तुमच्याकडून १ जानेवारी २०११ रोजी ’क्ष’ रुपये एका वर्षासाठी उधारीवर घेतले आणि त्या बदल्यात एक प्रॉमिसरी नोट तुम्हाला दिली. एका वर्षाने मी तुम्हाला व्याजासकट १०० रूपये परत देणार याविषयी कोणतीही शंका नाही. पुढील एका वर्षात महागाई आणि व्याजाचे दर अजिबात वाढणार नाहीत. तसेच मधल्या एका वर्षाच्या काळात तुम्हाला पैशाची गरज लागली तर तुम्ही तुमच्याकडील प्रॉमिसरी नोट दुसऱ्या व्यक्तीला विकून त्याबदल्यात योग्य ती किंमत मिळवू शकता. (तसे झाल्यास मी पुढच्या वर्षी १०० रूपये त्या व्यक्तीला देईन) तर ’क्ष’ ची किंमत किती?

या उदाहरणात ’क्ष’ ची किंमत काढायला व्याजाचा दर किती हे माहिती करून घेणे आवश्यक आहे.या घडीला घेतलेल्या कर्जावर अजिबात डिफॉल्ट करणार नाही अशी १००% खात्री काही फारच थोड्या संस्थांबद्दल देता येईल.त्या संस्थांनी दिलेल्या व्याजाच्या दराला ’Risk-free rate’ म्हणतात. त्या संस्था म्हणजे अमेरिकेचे आणि जर्मनीसारख्या इतर पुढारलेल्या देशांचे सरकार (भविष्यकाळात काय होईल ते सांगता येत नाही). त्यातही अमेरिका सरकारने ९१ दिवसांसाठी जारी केलेल्या T-bill या बॉंडवरील व्याज हा ’Risk-free rate’ म्हणून घेतात. याचे कारण म्हणजे निदान पुढील ९१ दिवसांत अमेरिकेचे सरकार दिवाळखोरीत जाणार नाही. तेव्हा जागतिक अर्थकारणात अमेरिका सरकारच्या ९१ दिवसांसाठी जारी केलेल्या T-bill वरील व्याजाचा दर हा ’Risk-free rate’ म्हणून घेतात. भारताच्या संदर्भात विचार करायचा असेल तर भारत सरकारने अल्पमुदतीसाठी (३ महिने) जारी केलेल्या बॉंडचा दर हा भारतासाठीचा ’Risk-free rate’ म्हणून घेता येईल. आता या ’Risk-free rate’ चा नक्की उपयोग काय हे पुढे स्पष्ट होईलच.

समजा सर्व चारही गृहितके सत्य परिस्थितीत उतरली आणि सरकार तुमच्याकडून समजा ४% ने कर्ज घ्यायला तयार असेल असे समजू. हा ४% आकडा कुठून आला? तर त्या प्रश्नाचे उत्तर अर्थशास्त्राच्या डोमेनमध्ये जाते. देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सरकार फिस्कल आणि मोनेटरी पॉलिसीज राबवते. हा ४% आकडा कुठून आला हे समजण्यासाठी आपल्याला त्या दोन पॉलिसीजचा अभ्यास करायला लागेल. तो या लेखमालेचा विषय नसल्यामुळे त्यावर काही लिहित नाही. आतापुरता ४% आकडा गहित धरू.

आपल्या जादूच्या छडीवर मिळणारे व्याज आणि सरकारचा “रिस्क-फ्री व्याजदर” सारखेच असतील. याचे कारण जर छडीवर समजा ६% व्याज मिळणार असेल तर सरकारला कर्ज कोण देणार? (गृहितक क्रमांक २: कितीही गुंतवणुकदारांनी छड्या विकत घ्यायच्या ठरवल्या तरी त्या विकता येतील) कारण छडी सरकारपेक्षा जास्त व्याज देणार आहे.तसे झाल्यास जगातील सगळे गुंतवणूकदार राम कुमारच्या जादूच्या छड्या विकत घ्यायला लागतील आणि सरकारला कोणीच कर्ज देणार नाही. (गृहितक क्रमांक ५: सर्वांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. म्हणजे रामची छडी सरकारपेक्षा जास्त व्याज देणार हे सगळ्यांना माहित असेल.तेव्हा गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही धोका न पत्करू इच्छिणारे सगळे गुंतवणुकदार सरकारी बॉंड सोडून रामच्या छड्या विकत घेतील) याचा परिणाम म्हणजे गुंतवणुकदारांना आकर्षित करायला सरकारला व्याजाचे दर वाढवायला लागतील. ते ६% झाले तरच परत गुंतवणूकदार सरकारला कर्ज द्यायला तयार होतील. जर का छडीवर आपल्याला ४% पेक्षा कमी व्याज मिळत असेल तर उलटा परिणाम होईल म्हणजे राम कुमारच्या छड्यांनी ४% व्याज दिले नाही तर जगातील सगळे गुंतवणुकदार त्याच्या छड्या न घेता सरकारचे बॉन्ड विकत घेतील म्हणून राम कुमारला छड्यांवरील व्याजदर वाढवावा लागेल.

तात्पर्य: राम कुमारची जादूची छडी आणि सरकार यांनी दिलेला व्याजाचा दर सारखाच राहिल.

हा मुद्दा लक्षात आला की पुढचा भाग सोपा आहे. समजा ४% व्याजाचे दर मानले तर २०१२ मध्ये १०० रुपये मिळविण्यासाठी आपल्याला २०११ मध्ये १०० भागिले १.०४ = ९६ रूपये १५ पैसे बॅंकेत ठेवावे लागतील. तेव्हा ’क्ष’ ची किंमत असेल ९६.१५ रूपये.म्हणजेच समजा ९६.१५ रूपये बॅंकेत ४% व्याजाने ठेवले तर एका वर्षात त्याचे १०० रूपये होतील.म्हणजेच २०१२ मध्ये मिळणाऱ्या १०० रूपयांची किंमत २०११ मध्ये ९६.१५ असेल.दुसऱ्या शब्दात १ जानेवारी २०१२ रोजी मिळणाऱ्या १०० रूपयांची १ जानेवारी २०११ रोजी Present Value ९६ रूपये १५ पैसे असेल.आणि १ जानेवारी २०११ रोजीच्या ९६ रूपये १५ पैशांची १ जानेवारी २०१२ रोजीची Future Value १०० रूपये असेल.

त्याचप्रमाणे २०१३ मध्ये मिळणाऱ्या १०० रूपयांची Present Value २०११ मध्ये १०० भागिले (१.०४ चा वर्ग) = ९२ रूपये ४६ पैसे असेल. तेव्हा आपल्याला Present Value आणि Future Value ची महत्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे मांडता येतील

इथे FV म्हणजे Future Value, PV म्हणजे Present Value, R म्हणजे व्याजाचा दर आणि N म्हणजे वर्षे. यातील Future Value चे सूत्र आपण शाळेत असताना चक्रवाढ व्याजाचे सूत्र शिकलो तेच आहे.

हे सूत्र वापरून प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या १०० रूपयांची Present Value आपल्याला काढता येईल. वर्ष २१११ मध्ये मिळणाऱ्या १०० रूपयांची किंमत असेल अवघी १ रूपया ९८ पैसे तर २२११ मध्ये मिळणाऱ्या १०० रूपयांची किंमत असेल ४ पैसे!! या प्रकारातून सिध्द होते की पैशाला वेळेच्या स्वरूपात किंमत असते आणि त्याला Time value of money म्हणतात.

पुढील आकृतीमध्ये विविध वर्षांनंतर मिळणाऱ्या १०० रूपयांची १ जानेवारी २०११ रोजीची Present Value दाखवली आहे.

फायनान्सच्या तत्वाप्रमाणे कोणत्याही फायनान्शियल इन्स्ट्रुमेन्टची किंमत म्हणजे त्या इन्स्ट्रुमेन्टपासून भविष्यकाळात अपेक्षित असलेल्या सर्व कॅश फ्लो ची Present value एवढी असते. म्हणजेच या सगळ्या Present Value ची बेरीज म्हणजे राम कुमारच्या जादूच्या छडीची किंमत असेल. आता आपली छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षी १०० रूपये आपल्याला देणार आहे.मग कोणत्या वर्षापर्यंत Present Value च्याबेरजा करत राहायच्या? याचे उत्तर बेरजा करायची गरज नाही. गणिती सुत्रांचा उपयोग करून दाखवता येईल की या Infinite series ची बेरीज पुढील सूत्राने देता येईल

इथे P म्हणजे दरवर्षी मिळणारी रक्कम (इथे १०० रूपये) आणि R म्हणजे अर्थातच व्याजाचे दर.

म्हणजेच या Perpetuity ची किंमत १०० भागिले ०.०४= २५०० रूपये असेल. म्हणजेच राम कुमार प्रत्येक छडी २५०० रूपयांना विकू शकेल.

दुसऱ्या शब्दात: १ जानेवारी २०१२ पासून दरवर्षी १०० रूपये अनंतकाळ मिळत राहणे आणि १ जानेवारी २०११ रोजी २५०० रूपये एकरकमी मिळणे यात गुंतवणूकदारांना वर दिलेल्या गृहितकांच्या पार्श्वभूमीवर सारखेच समाधान मिळेल आणि म्हणूनच छडीची किंमत २५०० रूपयेच असेल.

आता ही किंमत २५०० पेक्षा वेगळी असेल तर काय होईल?

समजा छडीची किंमत २५०० ऐवजी २६०० रूपये असेल तर ज्यांच्याकडे छड्या आहेत ती मंडळी आपल्याकडील छड्या भराभर विकायला सुरवात करतील कारण आज २६०० दिसत असली तरी छडीची योग्य किंमत २५०० रूपयेच आहे. तेव्हा आज छडी विकून २६०० रूपये करायचे आणि सरकारला २५०० रूपये कर्जाने द्यायचे आणि १०० रूपये खिशात टाकायचे. सरकार त्यावर ४% म्हणजे १०० रूपये व्याज दरवर्षी देणार आहेच की! तेवढेच व्याज छडीपण देणार आहे.म्हणजे व्याजाचे नुकसान करून न घेता १०० रूपये खिशात टाकायला मिळतील! यालाच ’फुकटचा फायदा’ (Arbitrage) म्हणतात. असा फुकटचा फायदा लाटायला मोठ्या प्रमाणावर लोक छड्या विकू लागले तर त्यातून मागणी आणि पुरवठ्याच्या गणिताप्रमाणे छडीची किंमत कमी होईल आणि ती २५०० रूपयांवर येऊन स्थिरावेल.

जर छडीची किंमत २४०० रुपये असेल तर याच्या उलटा परिणाम होऊन लोक आपल्याकडचे सरकारी बॉंड विकून स्वस्तातील छड्या विकत घेऊ लागतील आणि छडीची किंमत मागणी वाढल्यामुळे वाढतील आणि किंमत परत २५०० रुपयांवर स्थिरावेल.

तात्पर्य: छडीची किंमत २५०० रूपये असेल.

आता एकेक गृहितके relax करून काय होते ते बघू या.

१. समजा छडी ’डिफॉल्ट’ करायची शक्यता असेल तर गुंतवणुकदार छडीपासून ४% पेक्षा अधिक व्याजाची मागणी करतील.कारण छडीच्या ’डिफॉल्ट’ मुळे होणारे नुकसान भरून काढायला जास्त व्याज नको का? आता हे व्याज नक्की किती जास्त? ४.५% की ५% की १०% हे छडी ’डिफॉल्ट’ करायच्या शक्यतेवर अवलंबून असेल.जर छडी डिफॉल्ट करायची शक्यता जास्त असेल तर छडीवर जास्त व्याजाची अपेक्षा गुंतवणुकदार करतील. गुंतवणुकदारांनी मागितलेल्या या अधिक व्याजाला Default Premium म्हणतात.

२. समजा लांब पल्ल्यातील महागाईचा दर २% गुंतवणूकदार १०० रूपयांमध्ये या वर्षी खरेदी करू शकतील त्यापेक्षा कमी वस्तू भविष्यकाळात खरेदी करू शकतील. म्हणजेच रुपयाची क्रयशक्ती महागाईमुळे कमी होईल.तेव्हा एका अर्थी गुंतवणुकदारांचे नुकसान होईल. ते नुकसान भरून काढायला ढोबळमानाने गुंतवणुकदार २% व्याज अधिक मागतील. (यात थोडी इतर complications आहेत पण ढोबळमानाने गुंतवणुकदार २% अधिक व्याज मागतील). या २% अधिक व्याजाला Inflation Premium म्हणतात. वाढत्या महागाईच्या काळात व्याजाचे दर वाढणे या तत्वाला अर्थशास्त्रातील ’फिशरचे तत्व’ म्हणतात.

३. समजा गुंतवणुकदाराला आपली छडी विकून पैसे उभे करायचे असतील पण ती छडी बाजारातील किंमतीत विकत घ्यायला कोणी तयार नसेल तर? म्हणजेच छडीची ’लिक्विडिटी’ कमी असेल तर? मग गुंतवणुकदाराला छडी विकताना त्या छडीची किंमत बाजारातील किंमतीपेक्षा थोडी कमी करावी लागेल.समजा २५०० रूपयांना ती छडी कोणी विकत घ्यायला तयार नसेल तर गुंतवणुकदार भाव कमी करून २४५० रूपयांत ती छडी विकता येते का हे बघेल. म्हणजेच गुंतवणुकदाराचे नुकसान होणार.त्याची भरपाई म्हणून गुंतवणुकदार दर वर्षी अधिक व्याज मागतील. या मागितलेल्या अधिक व्याजाला Liquidity Premium म्हणतात.

४. व्याजाचे दर स्थिर न राहता बदलले तर छडीच्या किंमतीत फरक पडेल. समजा भविष्यकाळात व्याजाचे दर ४% ऐवजी ५% झाले तर वर दिलेल्या सुत्राप्रमाणे गुंतवणुकदार छडीसाठी १००/०.०५=२००० रुपयेच द्यायला तयार होतील. याचे कारण इतर ठिकाणी ५% व्याज मिळत असेल तर गुंतवणुकदार छडी विकत घेताना २००० रुपयेच देऊन दरवर्षी व्याज ५% (२००० गुणिले ०.०५=१००) मिळेल याची खात्री करतील. म्हणजे २०१२ मध्ये व्याजाचे दर ५% झाले आणि छडीच्या मालकाला आपल्याकडील छडी विकून पैसे उभे करायचे असतील तर त्याला २००० रुपयेच उभे करता येतील. समजा मूळ मालक २५०० रूपये मिळविण्यावर अडून बसला तर त्याच्याकडून छडी विकत घ्यायला कोणी तयार होणार नाही आणि त्याला छडीची किंमत २००० पर्यंत खाली आणावी लागेल अन्यथा त्याला ती छडी विकता येणार नाही. म्हणजेच व्याजाचे दर वाढण्यात मूळ गुंतवणुकदाराचा तोटा आहे. याउलट व्याजाचे दर जर कमी झाले तर मूळ गुंतवणुकदाराचा फायदा आहे.

याचाच अर्थ: बॉंडवर गुंतवणुकदारांनी मागितलेला व्याजाचा दर= सरकारचा व्याजाचा दर (यालाच ’रिस्क-फ्री’ व्याजदर असेही म्हणतात) + Default Premium + Inflation Premium + Liquidity Premium.

या सगळ्याची बेरीज समजा १०% येत असेल तर गुंतवणुकदार वर दिलेल्या सुत्राप्रमाणे छडीसाठी १००/०.१ = १००० रूपयेच द्यायला तयार होतील.तेव्हा राम कुमारची छडी किती किंमतीला विकली जाईल हे रिस्क-फ्री व्याजदर, Default Premium, Inflation Premium आणि Liquidity Premium वर अवलंबून असेल.

तेव्हा या भागात बघितलेल्या संकल्पना
१. Perpetual bonds आणि Perpetuity
२. Present Value आणि Future Value
३. रिस्क-फ्री व्याजदर
४. Default Premium, Inflation Premium आणि Liquidity Premium

या भागातील प्रश्न: या भागात छडीच्या किंमतीविषयीची आणखी एक महत्वाची गोष्ट ध्यानात घेतलेली नाही. ती कोणती हे सांगता येईल का? (हिंट: आपण वर एकेक करून गृहितके relax करून बघितली त्यातील एक गृहितकाचा गुंतवणूकदारांनी मागितलेल्या व्याजदरात समावेश झालेला नाही) या प्रश्नाचे उत्तर कोणालाच देता न आल्यास पुढील भाग लिहिण्यापूर्वी या प्रश्नाचे उत्तर प्रतिसादात जाहिर करेन.

प्रतिक्रिया

गवि's picture

16 Feb 2011 - 10:25 am | गवि

अफलातून आहे हे..

आता जराजरा समजू लागले आणि उत्तरे मिळू लागली. पण मुळात विषय नवीन असल्याने अजून तीन चारदा तरी वाचायला लागेल.

धन्यवाद. लवकर पुढचे भाग येऊ देत.

कुंदन's picture

16 Feb 2011 - 10:46 am | कुंदन

असेच म्हणतो.

पैशांच्या गुंतवणुकीचे ठिक आहे , सुत्रे वापरुन ठरवु शकता.
माणसांमध्ये गुंतवणुक करताना , माणुस ओळखताना चुकलात तर फार मोठा फटका बसु शकतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Feb 2011 - 10:56 am | llपुण्याचे पेशवेll

कुंद्या अनुभवाचे बोल का रे? ;)

प्रमोद्_पुणे's picture

16 Feb 2011 - 10:46 am | प्रमोद्_पुणे

मस्त रे क्लिंटन.. CS Final ला Financial Management मधे हे कॅश फ्लो मॅनेजमेंट, PV, FV वैगेरे प्रकरण होते. १०० मार्कांचा पेपर असायचा आणि लय टॉपिक्स असायचे. मला अजूनही Financial Management चा पेपर आहे आणि मी सर्व फॉर्म्युले विसरलो आहे अशी स्वप्ने पडतात.... बाकी तू मस्त explain केले आहेस.

मोहन's picture

16 Feb 2011 - 11:06 am | मोहन

क्लिंटन

मागे एकदा आमच्या कंपनीत "फायनान्स फॉर नॉन फायनान्स पर्सन्स" नावाचा ३ दिवसाचा कोर्स माझ्या सारख्या दगड विंजिनीयरां करता आयोजित केला होता. त्यापेक्षा छान पध्दतीने तुम्ही समजावता आहात. धन्यवाद. लगे रहो!

अवांतर - या लेखमालेचा ( पूर्ण झाल्यावर) पि डी फ करून मिपावर ठेवता यइल का ?

नरेशकुमार's picture

16 Feb 2011 - 11:23 am | नरेशकुमार

क्लिंटन साहेब, आपण लिहितायंत ते ठिक आहे.
पन मला 'पैसा कसा कमवायचा' फक्त हेच ठावुक आहे.
पैसा कसा खर्च करायचा ते माझ्या पेक्षा माझ्या बायकोला जास्त चांगले समजते. तिच माझ्या घराची फायनान्स मिनिस्टर आहे.
तीला मि हे लेख नक्कि वाचायला देईन.

चांगली लेख मालिका.
समजावून घ्यायला परत एकदा नीट वाचावा लागणार.

अभिज्ञ.

व्याज दरां मध्ये होणारा अपेक्षित चढ उतार (Monetary Policy) याचा काय परीणाम होइल या बाँड च्या किंमती वर?

इन जनरल, व्याजाचे दर वाढले की बॉंडची किंमत कमी होते आणि व्याजाचे दर कमी झाले की बॉंडची किंमत वाढते.अर्थात मुळातल्या risk-free rate बरोबरच इतर premium चा एकत्रित परिणाम बघायला हवा. बॉंडवरील व्याजदराला बॉंडचे "यिल्ड" म्हणतात.तेव्हा यिल्ड वाढले की बॉंडची किंमत कमी होते आणि यिल्ड कमी झाले की बॉंडची किंमत वाढते. याविषयी अधिक माहिती बॉंडवरील भागात.

अभ्यास न करताच परीक्षा कशी द्यायची? म्हणुन पेपरला बसलो नव्हतो.
आता आमचा अभ्यास चालु झाला आहे. :)

नितिन थत्ते's picture

16 Feb 2011 - 2:09 pm | नितिन थत्ते

सोप्या भाषेत उत्तम विवेचन.

(उगाच छिद्रान्वेषण: आजची रुपयाची किंमत उद्यापेक्षा नेहमी जास्त असते हे गृहीतक अनुभवांती बरोबर असले तरी ते स्वयंसिद्ध नाही. )

मोहन's picture

16 Feb 2011 - 4:03 pm | मोहन

डिफॉल्ट, लिक्वीडीटी आणि इन्फ्लेशन प्रिमीयम विचारात घेतले आहेत पण व्याजदर जगाच्या अंतापर्यंत स्थिर राहाणार नाहीत. व्याजदराच्या संभाव्य वृध्दीच्या जोखीमेचा समावेश झाला नाही.

क्लिंटन's picture

16 Feb 2011 - 5:48 pm | क्लिंटन

याचा अधिक विस्तार करता येईल का?उत्तर आल्यानंतर व्य.नि वर कळवावे ही विनंती.

मस्त माहिती ..
बाकी या बाबतीत जास्त ज्ञान नसल्याने बराच विचार करावा लागत आहे काही ठिकाणी.
सर्व संज्ञा नविन आहेत माझ्या साठी.

ते ४ % कसे आले ते मात्र मला कळालेच नाही.. आणि तीच जास्त उत्सुकता होती माझी ..

बाकी मस्त

क्लिंटन's picture

16 Feb 2011 - 5:54 pm | क्लिंटन

ते ४ % कसे आले ते मात्र मला कळालेच नाही.. आणि तीच जास्त उत्सुकता होती माझी ..

४% कुठून आले हे समजावून घ्यायला पहिल्यांदा फिस्कल पॉलिसी आणि मग त्यातूनच पुढे IS-LM Curve हे अर्थशास्त्रातील concepts बघावे लागतील.सध्या मी याच मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असणार आहे.त्यामुळे याविषयावर लेख लिहायला सध्या तरी वेळ देता येणार नाही.व्य.नि करून तुमचा ई-मेल पत्ता कळविल्यास मला अर्थशास्त्रावरील पुस्तके ई-मेलवर पाठवता येतील.

सोप्या भाषेतील लेख खूप आवडला.

शाहरुख's picture

16 Feb 2011 - 11:27 pm | शाहरुख

लेख रिलिजिअसली वाचला :)

५ नंबरचे गृहितक रिलॅक्स करुन बघितलेले दिसत नाहीय..'गुंतवणूकदारांना छडीची योग्य किंमत माहित नसताना गुंतवणूक केली तर काय' हे कदाचित असावे.

क्लिंटन's picture

17 Feb 2011 - 1:42 am | क्लिंटन

धन्यवाद शाहरूख.

५ नंबरचे गृहितक रिलॅक्स करुन बघितलेले दिसत नाहीय

नाही ते नाही. उत्तर इतके सोपे नाही.पण ते मूळ लेखातच कुठेतरी लपलेले आहे त्यामुळे ते शोधायला इतके कठिणही नाही. पाचवे गृहितक relax केले तर मार्केट efficient (परफेक्ट) राहणार नाही. त्याचा नक्की काय परिणाम होईल हे पुढील भागात.बाकीची चार गृहितके relax केली तरी त्याचा मार्केटच्या efficiency वर परिणाम होत नाही.पण पाचवे गृहितक relax केले तर मात्र त्यावर परिणाम होतो.हा फरक आहे.

धनंजय's picture

17 Feb 2011 - 4:15 am | धनंजय

चांगल्या रीतीने समजावून सांगितलेले आहे.

छान लेखमाला !

पण प्रत्यक्षात कोणी ही छडी कोणी त्या किमतीला विकत घेइल का?
मी तरी नक्की नाही.

क्लिंटन's picture

18 Feb 2011 - 2:55 am | क्लिंटन

छान लेखमाला !

धन्यवाद

पण प्रत्यक्षात कोणी ही छडी कोणी त्या किमतीला विकत घेइल का?
मी तरी नक्की नाही.

का हो का विकत घेणार नाही?

आनंद's picture

18 Feb 2011 - 11:03 pm | आनंद

इंट्रेस्ट रेट एवढे कमी असताना perpetual bonds हा आकर्षक पर्याय वाटत नाही.
रेफ.:http://answers.yahoo.com/question/index?qid=20080409115133AAc8kzb

क्लिंटन's picture

18 Feb 2011 - 11:23 pm | क्लिंटन

व्याजाचे दर कमी (विशेषत: अमेरिकेत) आणि म्हणून असे bonds महाग मिळतील हे कारण असेल तर ते बरोबरच आहे. पण या भागात Perpetual bonds म्हणजे काय हे समजावून द्यायचा उद्देश आहे कारण एकदा हा भाग आणि Time Value of Money समजले की इतर गोष्टी समजायला सोप्या जातात.तेव्हा असे perpetual bonds चांगले की वाईट हा मुद्दा विचारात घेतला नव्हता. तो point out केल्याबद्दल धन्यवाद.

पंगा's picture

17 Feb 2011 - 7:21 am | पंगा

२#च्या गृहीतकात, बाजारात हव्या तेवढ्या छड्या विक्रीस किंवा खरेदीस उपलब्ध असतील असे मानलेले आहे. समजा हे गृहीतक रिलॅक्स केले तर?

म्हणजे, प्रत्यक्षात कोणत्याही क्षणी बाजारात फायनाइट छड्याच बाजारात असू शकणार आहेत. समजा एका घटकेला बाजारात क्ष छड्या फ्लोट होताहेत. एक शक्यता अशी की समजा काही इन्वेस्टर्सनी गादीखाली पैसे दडवून ठेवण्याच्या मेंटॅलिटीने छड्या होर्ड करून त्यांवर बसून राहिले, तर? त्याने छड्यांच्या किमतीवर कसा फरक पडेल? आणि दुसर्‍या एखाद्या क्षणी अशाच काही इन्वेस्टरांनी आपापल्या होर्ड केलेल्या छड्या अचानक बाजारात डंप केल्या तर? किंवा खुद्द रामकुमारने भरपूर नवीन छड्या बाजारात आणल्या तर? त्याने काय फरक पडेल?

दुसरी गोष्ट म्हणजे, रुपयाची क्रयशक्ती ठरवताना इन्फ्लेशन / देशांतर्गत रुपये आणि विक्रेय वस्तूंचे परस्परप्रमाण हा एक भाग झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आयातनिर्यातीच्या बदलत्या प्रमाणाचाही रुपयाच्या क्रयशक्तीवर काही फरक पडत असावा का? (हा माझा बहुधा खुळचट प्रश्न.) असल्यास, त्याने छडीच्या किमतीवर नेमका कसा फरक पडावा?

विंजिनेर's picture

17 Feb 2011 - 8:49 am | विंजिनेर

दुसरी गोष्ट म्हणजे, रुपयाची क्रयशक्ती ठरवताना इन्फ्लेशन / देशांतर्गत रुपये आणि विक्रेय वस्तूंचे परस्परप्रमाण हा एक भाग झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आयातनिर्यातीच्या बदलत्या प्रमाणाचाही रुपयाच्या क्रयशक्तीवर काही फरक पडत असावा का? (हा माझा बहुधा खुळचट प्रश्न.) असल्यास, त्याने छडीच्या किमतीवर नेमका कसा फरक पडावा?

हल्लीचे आंतर्राष्ट्रीय चलन बाजार बघता, सट्टेबाजी(speculation), संवेदनशील (व्यापारीदृष्ट्या) भागातील राजकीय घडामोडी(जसे इजिप्तधली क्रांती, उ. कोरियाचा मुजोरीपणा, ग्रीसची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था इ.), राजकीय धोरणांचा दबाव/ अर्थमंत्र्यांची वक्तव्ये इ. अनेक घटक रुपयाच्या डॉलर/युरो च्यादरावर (पर्यायाने क्रयशक्तीवर ) परिणाम करताना दिसतात.

क्लिंटन's picture

18 Feb 2011 - 2:52 am | क्लिंटन

धन्यवाद पंडित गागाभट्ट. तुमच्या प्रश्नांना उत्तर लिहायच्या निमित्ताने इतर बऱ्याच गोष्टी इथे लिहिता येणार आहेत.

समजा काही इन्वेस्टर्सनी गादीखाली पैसे दडवून ठेवण्याच्या मेंटॅलिटीने छड्या होर्ड करून त्यांवर बसून राहिले, तर? त्याने छड्यांच्या किमतीवर कसा फरक पडेल?

हा भाग perpetuity शी संबंधित आहे.तरीही finite कालावधीसाठी जारी केलेल्या बॉंडविषयी लिहितो.कारण तुम्ही म्हणत आहात तो मुद्दा अशा बॉंडविषयी लागू पडतो. असे बॉंड आपण नंतरच्या भागात बघणार आहोत.तरीही अशा बॉंडविषयी थोडक्यात लिहितो.समजा १०० रूपये दर्शनी किंमतीचा ८% व्याज असलेला ३० वर्षे मुदतीचा बॉंड जारी केला असेल तर तो बॉंड पहिली २९ वर्षे दरवर्षी ८ रूपये परतावा गुंतवणूकदाराला देईल आणि मुदत संपताना त्या वर्षाच्या ८ रूपयाबरोबरच मुळातले मुद्दलही परत करेल.म्हणजे तिसाव्या वर्षी अशा बॉंडपासून १०८ रूपये मिळतील.

बॉंड भारतात सुध्दा जारी केले जातात पण बॉंडची खरी बाजारपेठ आहे अमेरिका.असे बॉंड अमेरिका सरकार आणि कंपन्या दोन्ही जारी करतात.भारतात कंपन्यांचे बॉंड साधारण २००२-०३ पर्यंत त्यामानाने लोकप्रिय होते पण नंतरच्या काळात त्यांचा जोर बराच ओसरला.पण अमेरिकेत आजच्या घडीला फायनान्शियल मार्केटमधील एकूण उलाढालींपैकी साधारणपणे अर्ध्या उलाढाली या बॉंड आणि तत्सम फायनान्शियल इन्स्ट्रुमेन्टच्या चालतात (अशा फायनान्शियल एन्स्ट्रुमेन्टना Fixed Income Securities म्हणतात.)

अमेरिकेत पेन्शन फंड आहेत.लोकांचे पैसे घेऊन त्यात योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ते निवृत्त झाल्यावर त्यांना जास्तीतजास्त पण कमी जोखमीचा परतावा देणे हे अशा फंडांचे काम असते.असे पेन्शन फंड अमेरिका सरकारने जारी केलेल्या बॉंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात.याचे कारण म्हणजे अमेरिका सरकारचे बॉंडमध्ये गुंतवणुकीला निदान डिफॉल्टचा तरी धोका नाही.त्याचप्रमाणे विमा कंपन्याही अशा बॉंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करतात.विमा उद्योगात गेल्या अनेक वर्षात Actuarial models बऱ्यापैकी विश्वासार्ह झाली आहेत.त्यामुळे आपल्या ग्राहकांपैकी किती ग्राहकांना किती वर्षांनी क्लेमसाठी किती पैसे द्यावे लागतील हे विमा कंपन्यांना बऱ्यापैकी अचूकपणे सांगता येते.तेव्हा त्या वर्षी तितके पैसे मिळतील अशा पध्दतीने विमा कंपन्या सरकारी बॉंडमध्ये गुंतवणूक करतात.

अमेरिकेचे सरकार दर महिन्याला विविध मुदतीसाठीचे (१ ते ३० वर्षे) बॉंड जारी करते.हे बॉंड जारी करताना दर्शनी मुल्याच्या किती टक्के व्याज दरवर्षी देणार (यालाच कुपन म्हणतात) आणि बॉंड कधी mature होणार ही माहिती दिलेली असते.आणि दर महिन्याला अशा बॉंडचा लिलाव होतो.अशा बॉंडच्या लिलावात विविध फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स भाग घेतात. अर्थातच त्यात पेन्शन फंड आणि विमा कंपन्याही आल्याच.लिलावात अमेरिका सरकारला जास्तीतजास्त पैसे मिळतील अशा पध्दतीने बॉंड विविध संस्थांना विकले जातात.पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांबरोबरच इतर संस्था (बॅंका, इन्व्हेस्टमेन्ट बॅंका, म्युच्यअल फंड, हेज फंड इत्यादी) देखील लिलावात भाग घेतात.पण अनेकदा इतर संस्था बॉंड दिर्घकाळ ठेवायच्या उद्देशाने त्या बॉंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत.तर विमा कंपन्या आणि पेन्शन फंड बॉंड दिर्घकाळ आपल्याकडे ठेवायच्या उद्देशाने बॉंड खरेदी करतात.समजा बॉंडच्या लिलावानंतर काही विमा कंपन्या आणि पेन्शन फंड यांना पाहिजे तितके बॉंड मिळाले नाहीत तर ते नंतर अशा इतर संस्थांकडून खरेदी करतात.सर्वसाधारणपणे तीन महिन्यांनंतर मोठ्या प्रमाणावर बॉंड पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांकडे लॉक-इन होतात.ही परिस्थिती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गाद्यांखाली बॉंड दडविण्यासारखी झाली.

आता समजा कोणा गुंतवणूकदाराने असा ३० वर्षे मुदतीचा बॉंड घेऊन ठेवला असेल आणि त्याला तो विकून पैसे उभे करायचे झाले तर तो बॉंड विकत घ्यायला त्याला ग्राहक कमी प्रमाणात सापडतील.याचे कारण बॉंड मोठ्या प्रमाणावर पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांकडे लॉक-इन झालेले असतील आणि त्या कारणाने बॉंडची लिक्विडिटी कमी झाली असेल.असे बॉंड पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांना बहुतेक वेळी नको असतात कारण त्यांच्याकडे गरजेइतके बॉंड मधल्या काळात जमा झाले असतात.तेव्हा तो बॉंड इतर गुंतवणुकदारांना विकावा लागेल. असा लिक्विडिटी कमी झालेला बॉंड अशा गुंतवणुकदाराकडून विकत घेण्यापूर्वी इतर ग्राहक त्याच्याकडून जास्त "Liquidity Premium" ची अपेक्षा करतील.म्हणजेच अस बॉंड विकताना त्याच्यावरील व्याज दर (यिल्ड) वाढेल म्हणजेच त्या बॉंडची किंमत कमी होईल.याउलट तोच बॉंड विमा कंपन्यांकडून किंवा पेन्शन फंडाकडून कोणाला विकत घ्यायचा असेल तर त्या संस्था (त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बॉंड असल्यामुळे) बॉंड वाढीव किंमतीला विकू शकतील.पण शक्यतो विमा कंपन्या आणि पेन्शन फंड बॉंड इतक्या कमी कालावधीत विकत नाहीत.

अवांतर: अमेरिका सरकार दर तीन महिन्यांनी ३० वर्षे मुदतीचे बॉंड जारी करते.वर दिलेल्या कारणामुळे साधारण तीन महिन्यांनी त्या बॉंडची किंमत कमी होते.म्हणजे जानेवारीत जारी केलेल्या बॉंडची किंमत एप्रिलपर्यंत थोडी कमी होते.त्याचवेळी जास्त किंमत घेऊन एप्रिलमध्ये जारी केलेले बॉंड बाजारात येतात.अशा बॉंडची किंमत साधारण जुलैपर्यंत कमी होते.एप्रिलमध्ये नव्या (३० वर्षे मुदत शिल्लक असलेल्या) आणि जुन्या (२९ वर्ष ९ महिने मुदत शिल्लक असलेल्या) बॉंडमध्ये तसा खूप फरक असायचे कारण नाही.केवळ लिक्विडिटीच्या कारणामुळे त्यांच्या किंमतीत थोडा फरक पडतो.आणि अजून तीन महिन्यांनी त्यांच्या किंमती सर्वसाधारणपणे सारख्याच होतात.अमेरिकेतील Long Term Capital Management (LTCM) या हेज फंडने या "नव्या" आणि "जुन्या" बॉंडमधील किंमतीचा फायदा घेऊन १९९४ ते १९९७ पर्यंत भरपूर पैसे कमावले.पण नंतर काही कारणाने त्यांची Trading Strategy फसली आणि फंड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला.याविषयी नंतरच्या कधीच्या तरी भागात.

दुसर्‍या एखाद्या क्षणी अशाच काही इन्वेस्टरांनी आपापल्या होर्ड केलेल्या छड्या अचानक बाजारात डंप केल्या तर

म्हणजेच वरील उदाहरणात काही कारणाने पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांनी आपल्याकडील बॉंड विकायला काढले तर काय होईल?इथे मागणी आणि पुरवठ्याचे गणित लागू पडेल.भरमसाठ पुरवठा वाढला तर अर्थातच अशा बॉंडची किंमत कमी होईल.

अवांतर: फायनान्शियल मार्केटमध्ये रेपो मार्केट म्हणून एक मार्केट असते.यात एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तिच्याकडील फायनान्शियल इन्स्ट्रुमेन्ट तात्पुरते दुसऱ्या संस्थेकडे गहाण ठेऊन पैसे उधार घेऊ शकते.अर्थातच गहाण ठेवताना थोडया जास्त किंमतीचे इन्स्ट्रुमेन्ट गहाण ठेवावे लागते.म्हणजे १०० डॉलर उभे करायला त्याहून जास्त म्हणजे १०२ किंवा १०३ डॉलर किंमतीचे सरकारी बॉंड गहाण ठेवावे लागतात. (शेअर असतील तर ही रक्कम अजूनही जास्त असते) लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहिर केली त्याच्या थोडे पूर्वी त्या संस्थेनेही असे रेपो मार्केटमध्ये बॉंड ठेऊन इतर संस्थांकडून पैसे उधार घेतले होते.पण लेहमन कोसळली म्हटल्यावर अशा इतर संस्थांना पैसे परत मिळायचा मार्ग म्हणजे लेहमनने त्यांच्याकडे गहाण ठेवलेले बॉंड विकणे.असे मोठ्या प्रमाणावर बॉंड अशा संस्थांनी विकायला आणल्यामुळे केवळ त्या बॉंडची किंमत कमी झाली.आर्थिक संकटाच्या काळात जगभरातील फायनान्शियल संस्था सर्वात निर्धोक असलेल्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेन्टमध्ये गुंतवणूक करतात.आणि असे इन्स्ट्रुमेन्ट म्हणजे अर्थातच अमेरिका सरकारचे बॉंड.तेव्हा इतर बॉंडच्या किंमती वाढल्या पण केवळ लेहमनने रेपो मार्केटमध्ये गहाण ठेवलेल्या बॉंडच्या किंमती कमी झाल्या.

रुपयाची क्रयशक्ती ठरवताना इन्फ्लेशन / देशांतर्गत रुपये आणि विक्रेय वस्तूंचे परस्परप्रमाण हा एक भाग झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आयातनिर्यातीच्या बदलत्या प्रमाणाचाही रुपयाच्या क्रयशक्तीवर काही फरक पडत असावा का?

हो फरक पडतो ना.एक उदाहरण म्हणजे २००८ मध्ये तेलाचे भाव १५० डॉलर प्रतिबॅरल झाले होते.नंतरच्या काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे तेलाची मागणी कमी होऊन भाव कमी झाले ही गोष्ट वेगळी.पण समजा तेलाचे भाव असेच वाढत राहिले असते तर भारताचे आयातीचे बिल वाढले असते आणि भारतातील महागाई वाढली असती.म्हणजे रूपयाची क्रयशक्ती कमी झाली असती.

इतर उपल्ब्ध गुंतवणूक पर्याय आणि त्यावर मिळणारे व्याजदर किंवा परतावा वि. परपेच्यूईटी बाँड व्याजदर याचा मेळ कसा बसवावा?

क्लिंटन's picture

18 Feb 2011 - 2:50 am | क्लिंटन

या भागात विचारलेल्या प्रश्नासंदर्भात तुम्ही हे म्हणत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात एवढेच सांगतो.अजून थोडा कल्पनाशक्तीला ताण दिलात की तुम्हाला उत्तर येईल.उत्तर आल्यावर व्य.नि वर पाठवावे ही विनंती.

क्लिंटन's picture

18 Feb 2011 - 11:15 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

आता वळूया या भागात विचारलेल्या प्रश्नाकडे.बॉंडवर गुंतवणूकदारांनी मागितलेले व्याज हे Risk Free Rate + Default premium+ Inflation premium + Liquidity premium इतके असते. आता प्रश्न होता की यात आणखी कोणती गोष्ट आहे का?

सोयीसाठी आपण दोन गोष्टींचा विचार करू.समजा मी तुमच्याकडून "क्ष" रूपये उधार घेतले आहेत आणि पहिल्या केसमध्ये मी एका वर्षाने १०० रूपये परत करणार आहे आणि दुसऱ्या केसमध्ये मी दहा वर्षांनी १०० रूपये परत करणार आहे.आणि तशी प्रॉमिसरी नोट मी दिली आहे.तुम्हाला मधल्या काळात पैशाची गरज पडल्यास ती नोट तुम्ही दुसऱ्या कोणाला विकून पैसे उभे करू शकता.उदाहरणाच्या सोयीसाठी इतर Premium शून्य धरू.

समजा व्याजाचे दर ४% आहेत.तर पहिल्या केसमध्ये "क्ष" ची किंमत असेल ४% प्रमाणे एक वर्षाची १०० रूपयाची PV. ती किंमत असेल १०० भागिले १.०४ बरोबर ९६ रूपये १५ पैसे. तर दुसऱ्या केसमध्ये "क्ष" ची किंमत असेल ४% प्रमाणे १० वर्षांची १०० रूपयाची PV. ती किंमत असेल १०० भागिले (१.०४ चा दहावा घात) = ६७ रूपये ५६ पैसे.

समजा मी प्रॉमिसरी नोट दिल्याच्या दुसऱ्या मिनिटाला व्याजाचे दर ५% झाले.तर पहिल्या केसमध्ये "क्ष" ची किंमत झाली १०० भागिले १.०५ बरोबर ९५ रूपये २४ पैसे तर दुसऱ्या केसमध्ये "क्ष" ची किंमत झाली १०० भागिले (१.०५ चा दहावा घात) = ६१ रूपये ३९ पैसे.

म्हणजेच आता तुम्हाला पैशाची गरज पडली तर तुम्हाला ती नोट विकून पहिल्या केसमध्ये ९५ रूपये २४ पैसे तर दुसऱ्या केसमध्ये ६१ रूपये ३९ पैसे मिळतील. पूर्वी ही रक्कम अनुक्रमे ९६ रूपये १५ पैसे आणि ६७ रूपये ५६ पैसे होती.म्हणजे व्याजाचे दर वाढल्यामुळे पहिल्या केसमध्ये तुमचे ९१ पैसे (म्हणजेच ०.९५%) तर दुसऱ्या केसमध्ये तुमचे ६ रूपये १७ पैसे (म्हणजेच ९.१३%) नुकसान झाले.

आता दुसऱ्या केसमध्ये झालेले नुकसान जास्त आहे हा योगायोग आहे का?तर तसे नाही.जेव्हा जेव्हा बॉंडची maturity जास्त असते तेव्हा तेव्हा तो बॉंड व्याजाच्या दरातील बदलांना अधिक संवेदनाक्षम असतो (sensitive). In general, जेवढी maturity जास्त तेवढी व्याजदरातील बदलांना संवेदनाक्षमता जास्त. (यात इतरही काही मुद्दे आहेत.ते आपण बॉंडवरील भागात बघू)

म्हणूनच व्याज दरात वाढ झाली तर दीर्घ मुदतीच्या बॉंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान जास्त होईल. म्हणूनच दीर्घ मुदतीच्या बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार अधिक Premium ची मागणी करतात.याला आपण Longevity premium म्हणू. या Longevity premium मध्ये अजून काही मुद्द्यांचेही योगदान असते.जसा कालावधी वाढतो त्याप्रमाणे कंपनी default करायची शक्यता आणि बॉंडची दीर्घकालीन तरलता या गोष्टी कमी विश्वासाने predict करता येतात. म्हणजे एखादी कंपनी पुढच्या एक वर्षात दिवाळखोरीत जाणार नाही हे आपण मोठ्या विश्वासाने सांगू.पण तीच कंपनी पुढील ३० वर्षे दिवाळखोरीत जाणार नाही हे आपण तितक्याच विश्वासाने सांगू शकणार नाही.तेव्हा या अनिश्चिततेपासून संरक्षण म्हणून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या बॉंडसाठी अधिक Longevity Premium ची मागणी करतात.

पुढील आकृतीत १७ फेब्रुवारी २०११ अमेरिका सरकारच्या विविध मुदतीच्या बॉंडवरील व्याजदर (यिल्ड) दाखविला आहे. ही आकृती इथून घेतली आहे.

हे उत्तर श्री. मोहन यांचे बऱ्यापैकी बरोबर होते.