धक धक करने लगा...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
26 Sep 2010 - 8:59 am

कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी. कधी कधी तर चांगल्या हसत्या खेळत्या छातीतले हृदय अचानक बडबड करु लागते, इतके की तो प्रलाप सहन न झाल्याने अंग घामाने डबडबून कायमचे थंड पडण्याचा धोका उद्भवतो.
म्हणूनच ऊरातली ती धडधड नियमित ठेवण्या संबंधी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उदात्त हेतू घेऊन वर्ल्ड हार्ट ऑर्गनायझेशन आणि हू यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरचा शेवटचा रविवार जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो.
ते चिमुकले मूठभर हृदय पन्नास साठ किलोच्या देहाला २४ तास ३६५ दिवस चैतन्य पुरविते... अथकपणे, अविश्रांतपणे. अशा छोट्या बटूचे मोठे काम दुर्लक्षिण्याजोगे नसतेच. हे हृदय कायम आपल्या कामात गुंतलेले असते. परंतु व्यक्तिच्या चुकीच्या आहार विहारांमुळेच गुंतागुंत निर्माण होऊन हृदयाला संप पुकारावा लागतो. त्याच्या अचानक येणाऱ्‍या संपामुळे कारखाना कायमचा दिवाळखोरीत निघणार हे उघड सत्य आहे. म्हणूनच शरीरातील या मुख्य पंपाला आपल्या कार्यात कसलाच अडथळा उत्पन्न होऊ नये याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते बिचारं धडधडणारच काळजी कशाला? असा दुर्लक्षित मनोवृत्तीचा विचार करुन चालणार नाही. पंपाची निगा म्हणजे जीवनज्योतीचं जपणं होय. हा मुख्य पंप चालला तरच मळा फुलणार. अन्यथा वाफे कायमचे सुकणार हे एक त्रिवार सत्य.
अशा या अविरत धकधक करणाऱ्‍या चेतनामयी हृदयाची धकाधकीच्या जीवनात काळजी घ्यावी तरी कशी? हा खरा प्रश्न आहे.
हृदयातील बिघाडाला अनुवांशिकता, धमनी काठीण्य, अतिरिक्त चरबीच्या गुठळ्या, धमनीचा आतील व्यास कमी होणे हे कारणीभूत असते. जसे वय वाढते तसे धमन्यांची लवचिकता, आकुंचन-प्रसरणातील सहजता लोप पावत जाते. परिणामी शरीराच्या अंतिम ऊतिपर्यंत पोषकांश पोहचविण्यासाठी हृदयाला अधिक दाबाने काम करावे लागते. मग उच्च रक्तदाबाचा विकार जडतो. अतिरक्तदाबामुळे मस्तिष्कातील नाजूक रक्तवाहिन्या फुटण्याचा प्रसंग येऊ शकतो. हे टाळण्यासाठी अँटीहायपरटेन्सिव मेडिसीन घ्यावे लागते. या रक्तदाब उतरवणाऱ्‍या औषधांचा अदृश्य विपरित असर वृक्क, मस्तिष्क, फुप्फुसे व हातापायांना अपुरे रक्त पोचविण्यात होतो. पंपिंग तर योग्य दाबाने व्हावे शिवाय वरील मुख्य इंद्रियांना पुरेसे पोषकांशही पोचावेत अशा कात्रीतून वाट काढीत उच्च रक्तदाबावरील औषधोपचार करण्याचे अग्निदिव्य हृदयविकार तज्ञांना पार पाडावे लागते.
धमनीकाठीण्य, रोहिण्यांचा कमी झालेला व्यास यांमुळे रक्तदाब वाढतोच. तो कमी करण्यासाठी औषधे खावीत तर सर्व ठिकाणी पोषकांश पोचतीलच याची खात्री नाही. त्यामुळे पूर्वीसारखे पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. अशी दोन्ही बाजूंनी व्यक्तिची कोंडी होत जाते. त्यामुळेच धमन्या लवचिक रहाव्यात, अतिरिक्त चरबी साठू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे हृदय विकारापासून दूर राहणे होय.
१) धमन्या कठीण होऊ नयेत यासाठी सर्वांगिण व्यायाम, योगासने यांचा निश्चित फायदा अनुभवास येतो.
जॉगिंग, रनिंग, स्किपिंग, सायकलिंग, स्विमिंग इ. चल पद्धतीचे व्यायाम हप्त्यातून किमान चार दिवस अर्धा तास केलेच पाहिजेत. रक्ताभिसरण संस्था यांमुळे अधिक कार्यक्षम राहते. धमनी काठीण्य सहसा उद्भवत नाही.
अचल पद्धतीच्या व्यायामप्रकारात योगासनांना फार महत्त्व आहे. जे कोणी घराबाहेर पडून व्यायाम करु शकत नाहीत, उदा. वयस्कर व्यक्ति, महिला इ. अशांसाठी घरच्या घरी कमी जागेत करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे योगासने.
प्रत्येक आसनाचे स्वतःचे असे विशेष फायदे आहेत. पद्मासन, अर्धमत्सेंद्रासन, पश्चिमोत्तानासन, ध्यानासन, बिडालासन, श्वानासन, शलभासन, मयुरासन, शिर्षासन, पवनमुक्तासन, कोनासन, सर्वांगासन इ. आसनांचा नियमित अभ्यास करावा.
सूर्यनमस्कार व एरोबिक्स, वार्मअप्स सुद्धा सर्वांगिण व्यायाम प्रकार आहेत.
२) अतिरिक्त चरबी साठू नये यासाठी अतिउष्मांक असलेले पदार्थ वर्ज्य करावेत.
नियमित व्यायामामुळे चरबी साठत नाहीच, तरीही तेलकट, तूपकट पदार्थ जरा बेतानेच हादडलेले बरे.
सॅच्युरेटेड फॅटस् मुळे अधिक कोलेस्टेरॉल शरीरात शोषले जाते. हेच पुढे धमन्यांच्या अरुंदीकरणास कारणीभूत ठरते किंवा कोलेस्टेरॉलची छोटीशी गुठळी देखील अगडबंब व्यक्तिला क्षणात आडवा करण्याची क्षमता बाळगून असते.
अंडी व अंड्यातील द्रव, मांसामध्ये- प्राण्यांची वसा, मज्जा, हृदय, लिव्हर, शैलीय प्राणी- ऑएस्टर, खेकडे, प्रॉन्स, श्रिंप्स, लॉबस्टर, दुग्धजन्य पदार्थ- क्रिम, बटर, जादा फॅटस् चे दूध, प्राणीज तेले इ. मध्ये कोलेस्टेरॉल अधिक असते.
अतिरिक्त फॅट टाळण्यासाठी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटस् चा वापर करावा. यामध्ये वनस्पतीजन्य तेल तूप यांचा समावेश होतो. उदा.- सूर्यफूल तेल, कॉर्न ऑईल, शिसम तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, सफोला ऑईल. हे रिफाईन्ड तेलांचे प्रकार होत. परंतु हायड्रोजेनेटेड ऑईल्स, नारिकेल तेल, पाल्म तेल हे जास्त फॅटस् देऊन जातात.

योग्य आहार नियोजन, नियमित व्यायाम व तणावरहित जीवनशैली ही निरोगी हृदयासाठीची त्रिसूत्री आहे.
या त्रिसूत्रीचा सर्वांनी अंगिकार करुन आपले दिल कायम धकधक करीत राहील याकडे लक्ष द्यावे.

औषधोपचारसमाजजीवनमानराहणीसद्भावनासल्लामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

26 Sep 2010 - 9:04 am | रन्गराव

good read! informative and useful too!

मस्त कलंदर's picture

26 Sep 2010 - 11:37 am | मस्त कलंदर

.

गांधीवादी's picture

26 Sep 2010 - 11:53 am | गांधीवादी

आप्का लिखा हुआ पडके दिल मे 'कुचकुच' होने लगा.

तमाम हिंदी चित्रपट सृष्टीचे पोट ह्या 'दिल' नामक पंप मुळेच चालते, ते थांबून कसे चालेल.
ते धडकलेच पाहिजे.

लेख आवडला हे.सां.न.ल.

धक धक करने लगा आणि श्रीराम हे नाव वाचून लेख नेन्यानी लिहीला असावा असे वाटले. ;)
बाकी लेख छान आहे