आणि मी सिगरेट सोडली...

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
12 Aug 2010 - 12:07 pm

आणि मी सिगरेट सोडली...

सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा! मात्र 'आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे' या नावाने पंडित नेहरूंनी गौरवलेले भिलाई, दुर्गापूर, टाटानगर, राउरकेला वगैरे पोलाद कारखाने, भाक्रा नांगलचे धरण जागा तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची.

भिलाई, दुर्गापूर या कारखान्यांचं नांव अजून "हिंदुस्तान स्टील" असंच होतं, तिचं ’स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ असं पुनर्नामकरण झालं नव्हतं. "भिलाई स्टील प्लांट" पाहायला आम्ही गेलो आणि 'द्रुग' नावाच्या (त्यावेळच्या तरी) 'कुस्थानका'वर उतरलो. आम्ही एकूण ४० विद्यार्थी होतो. बाहेर धो-धो पाऊस पडत होता व आम्हाला आमच्या उतरायच्या जागी नेण्यासाठी नियोजित केलेली बस अजून यायची होती. मग तोवर काय करायचं? पाऊस तर होताच पण वर जाम थंडीही होती. एकाने टूम काढली की "चला, मस्त थंडी आहे. एकेक सिगारेट शिलगावूया"! मी अजून विद्यार्थी होतो व कमवतही नव्हतो त्यामुळे क्षणभर "करू की नको" असं झालं, पण क्षणभरच. "एकदा ओढण्यानं काय होतंय" या भावनेनं शेवटी मी त्या मोहाला बळी पडलोच व माझी पहिली सिगारेट शिलगावली.

त्याकाळी खूप लोकप्रिय असलेली (आणि बिनफिल्टरची असल्याने अगदी unadulterated poison असलेली व अगदी "Good to the last puff" या कीर्तीची ’पनामा’!) आम्ही निवडली! तिचा पहिला झुरका घेतला आणि तोंड वाकडं केलं. दुसर्‍याने ओढलेल्या सिगारेटचा वास किती छान यायचा पण स्वत: दम भरल्यावर मात्र अगदीच अपेक्षाभंग झाला. "हात्तिच्या, चवीला इतकी बेकार लागते असं माहीत असतं तर ओढलीच नसती!" असा विचार मनात आला. आता शिलगावलीच होती म्हणून "वसूल" करायला म्हणून संपवली. दुसरी सिगरेट शिलगावायचं खरं तर कारण नव्हतं कारण पहिल्या सिगरेटचा अनुभाव कांहीं चांगला नव्हता.

त्या काळात सिगरेट ओढणे म्हणजे एक 'ष्टाईल' समजली जायची. त्यावेळचे जवळ-जवळ सगळेच हिरो ऐटीत सिगरेट ओढायचे. त्यामुळे मग दुसरी, त्यानंतर तिसरी असं करत-करत हळू-हळू सिगरेट ओढायची आवड निर्माण होऊ लागली. पण खिसा खाली असल्यामुळे त्यावेळी सिगरेट क्वचित ओढायचो. क्वचित म्हणजे रविवारी हॉस्टेलची दुपारची ’फीस्ट’ झाल्यावर वगैरे. मेटॅलर्जीला असताना पहिल्यांदाच सिगरेटची ’किक’ काय असते ते अनुभवले. मग मात्र "स्वर्ग मेल्याविना दावी तयाला व्यसन म्हणतात" या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सिगरेटच्या त्या ’किक’साठी ती ओढावीशी वाटू लागली.

हे माझे पनामा-प्रेम-प्रकरण नंतर दहा एक वर्षें चाललं. सध्याची कल्पना नाही, आता कदाचित तो ब्रँड नामशेषही झाला असेल. पण महिना ३००-४०० रुपये पगार असताना साठ पैशाला वीस सिगरेटचं पॅक या भावात मिळणारी फक्त ’पनामा’च परवडायची. "चार मिनार" आणखी स्वस्त असली तरी तिचा वास आवडायचा नाही म्हणून शेवटी 'पनामा'च एकदम प्यारी झाली होती! बी. ई. मेकॅनिकल व बी. ई. मेटॅलर्जी आटोपून मग ’मुकुंद’ कंपनीत ३२५रु. महिना पगारावर मी पाट्या टाकायला सुरुवात केली. खिशात ३०० का होईनात, पण पैसे खुळखुळायला लागले व मग ’पनामा’चं पाकीट बाळगायला सुरुवात झाली!

रहायचो हिंदू कॉलनीत माझ्या आत्याकडे. त्यामुळे घरी सिगरेट ओढायची टाप नव्हती. अगदी 'तौबा-तौबा'! पण घराबाहेर पडलो आणि पहिलं वळण घेतलं कीं धुराडं सुरू व्हायचं. आत्याला नक्कीच वास आला असेल, पण ती सूज्ञपणे कधी काही बोलली नाही. स्वत:च्या पैशाने सिगरेट ओढायला सुरुवात केल्यावर रोज २-३ सिगरेटपासून रोज १० सिगरेटचा टप्पा कधी गाठला ते कळलेच नाही. त्यानंतर ६५चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. आम्हाला आंही ब्रह्मचारी असल्यामुळे मुकुंदच्या व्यवस्थापनाने आम्हाला कळव्याच्या कॉलनीत राहायला जायची (प्रेमळ) आज्ञा केली व मी व इतर तीन माझ्यासारखे ब्रह्मचारी असे आम्ही एकूण चार ब्रह्मचारी कळव्याच्या "मुकुंद कॉलनी"त 'डेरेदाखल' झालो. कॉलनीत इतर कुणी चिटपाखरूही नव्हतं. फक्त ड्यूटीवरील रखवालदार व आम्ही. त्यात आम्हाला गस्त घालण्यासाठी धूमकेतूसारखे वेळी-अवेळी जायला सांगण्यात आले होते. कधी रात्री १२ वा. तर कधी ३ वाजता, कधी ४ वाजता! म्हणजे कुठलाही एक ढाचा नसलेले वेळापत्रक ठेवायला लागायचे. नेहमी कुठला तरी रखवालदार झोपलेला मिळायचाच, त्यातला एक गोप-बहादूर या रखवालदाराला खूपदा झोपलेला पकडल्यावर त्याचे 'झोप-बहादूर' असे नामकरणही आम्ही केले.

कंपनीनं प्रत्येकाला वैयक्तिक खोली व चौघात मिळून एक आचारी व एक वरकाम्या नोकर ठेवला होता. त्यामुळे कधी स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही, ना कपडे धुण्याची. दिवसभर प्रोजेक्टची इरेक्शन-कमिशनिंगची ड्यूटी, आरामात मिळणारं जेवण व रात्री-अपरात्री मारलेल्या फेर्‍या असं जिप्सी टाइप जीवन आणि चार ब्रह्मचारी! मग काय विचारता? पनामाचं रोज एक पाकीट कधी संपायला लागलं ते कळलंच नाही! मग मात्र पुढची वीसेक वर्षं रोज वीस सिगरेटचा ’रतीब’ सुरू झाला. पगार वाढला तसा सिगरेट्चा ब्रँड बदलत गेला. पनामा जाऊन कॅप्स्टन, मग गोल्डफ्लेक, मग विल्स फिल्टर अशी प्रगती होत गेली, पण रोजचा वीस सिगरेटचा रतीब मात्र बदलला नाही.

मग लग्न झालं. सौ.ला माझ्या सिगरेट ओढण्याबद्दल मुळीच तक्रार नव्हती. त्यामुळे प्रेमळ आग्रहाखातर सुटायची तशीही सिगरेट सुटली नाही व रतीब चालूच राहिला. १९६४ साली "surgeon-general has determined that smoking is injurious to health" असं अमेरिकन सिगरेट्च्या पाकिटावर लिहिलं जाऊ लागलं व पाठोपाठ त्याच सुमाराला "सिगरेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे" असा प्रचार भारतातही सुरू झाला. तो प्रचार पटायचा पण "आज ओढू दे, उद्यापासून सोडू" असं करत आम्ही तो दिवस पुढं ढकलायचो. मी किंवा माझ्या मित्रांनी सिगरेट सोडायचा निर्णय कधीच मनावर घेतला नाही. पुढे मुलं झाली. पण तब्येत ठणठणीत होती म्हणून असेल पण सिगरेट सोडावी असं कधी मनानं घेतलंच नाही. दोनदा 'झटका आल्या'मुळं (म्हणजे हृदयविकाराचा वगैरे नव्हे पण असाच एक झटका) तीन-तीन वर्षांसाठी अशी दोनदा मी सिगरेट सोडलीही. त्या सहा वर्षांत मी सिगरेट फक्त परदेशवारीतच ओढायचो. सुरुवातीला परदेशी ओढायला सुरुवात केलेलं धूम्रपान मी परत आल्यावर इमिग्रेशनचं डेस्क ओलांडल्याबरोबर थांबत असे. कारण मी उरलेले पाकीट तिथंच फेकून देत असे व आणलेली ड्यूटी-फ्री पाकिटं मित्रांत वाटत असे. पण हळू-हळू 'एवढं पाकीट संपवून मग सोडूया' वरून 'एवढं कार्टन संपवून मग सोडूया' असे करता-करता धूम्रपान चालूच राहू लागलं.

या दरम्यान मी इंडोनेशियातील दुसर्‍या क्रमांकाचं शहर असलेल्या 'सुरबाया'ला नोकरीसाठी आलो. त्यानंतर एकच फरक झाला की Wills जाऊन '555' हा ब्रॅन्ड हाती आला. पुढे 'क्रेटेक' नांवाची लवंगेचा वास असलेली "बेंटुल बीरू-निळी बेंटुल" छापाची इंडोनेशियन सिगरेटही मला आवडू लागली, पण "वीस-एक्के-वीस"चा पाढा काही बदलला नाही.

पण त्यासुमारास एक नवी समस्या माझ्यापुढे उभी राहिली. ती म्हणजे आमची वाढत असलेली मुलं व त्यांच्या शालेय शिक्षणातील 'सामान्य ज्ञाना'चा अभ्यासक्रम. या सुमाराला माझा मोठा मुलगा १२ वर्षाचा व मुलगी ७ वर्षाची होती. त्यांना शाळेत सिगरेट ओढण्याचे गैरफायदे शिकवले जाऊ लागले. 'बाबा, सिगरेट ओढू नका, आजारी पडाल'ने सुरू झालेली गाडी 'आम्हाला अनाथ कराल बरं का'पर्यंत आली. मग मात्र 'आता सिगरेट सोडायचीच' असा निर्धार झाला. पण आता ती सुटता सुटे ना!

असं म्हणतात की सिगरेट सोडायची असेल तर एकच यशस्वी मार्ग आहे. तो म्हणजे ती ओढायला सुरुवातच न करणे. तो मार्ग तर आम्ही केव्हाच ओलांडला होता व त्यामुळे आम्हाला उपलब्ध नव्हता. मग काय करायचे?

असे करता-करता आम्ही ८७-८८च्या सुमारास त्रिनिदादला कंपनीच्या कामासाठी पोचलो. तिथे माझ्या मुलीने बंड केले. 'बाबा, तुमच्या अंगाला सिगरेटचा वास येतो म्हणून मी तुम्हाला पापी देणार नाही' हा निर्वाणीचा इशारा देऊन ती मोकळी झाली. मला खूप वाईट वाटले. "सुरबायाला गेलो की सोडीन" असं सांगून मी तात्पुरती वेळ मारून नेली. शेवटी १९८९च्या १४ नोव्हेंबरला इंडोनेशियाला 'राम-राम' ठोकून मी परत येत असताना वाटेत सिंगापूरला transit मध्ये असताना मला काय वाटले कुणास ठाऊक. मी सिंगापूरच्या transit lounge मध्ये जी सिगरेट सोडली ती आजतागायत! खरं त्यावेळी धमकी किंवा प्रेमळ बंड वगैरे कसलाही प्रयोग माझ्या मुलांकडून झाला नव्हता. पण माझ्याच मनानं घेतलं की बस झालं आता. सोडा सिगरेट.

एकदा सोडल्यावर पहिले ७-८ महिने खूप त्रास झाला. अशा वेळी मी काहीतरी चघळायला ठेवत असे. यासाठी आवळकाठी या प्रकारची आवळ्याची सुपारी म्ला बरीच उपयोगी पडली. आधीच धूम्रपानाच्या रूपाने तंबाखूची धास्ती घेतलेली असल्यामुळे धूम्रपान सोडण्यासाठी म्हणून मी तंबाखू खायला मात्र कधीही सुरुवात केली नाही. माझे असे काही मित्र आहेत की ज्यांनी हा मार्ग चो़खाळला व परिणामतः आता ते दोन्हींच्या व्यसनात गुंतले आहेत. १४ नोव्हेंबरला सोडलेल्या सिगरेटने त्यानंतर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नूतन वर्षाच्या स्वागतपार्टीत परत मला मोहाची मिठी जवळ-जवळ मारलीच होती. पण निग्रहाने मी तो मोहाचा विळखा तिला माझ्याभोवती आवळू दिला नाही.

त्या संक्रमणकाळात आजूबाजूला कुणी सिगरेट ओढत असेल तर मात्र मला खूप जळफळायला व्हायचं, पण स्वनिश्चयाच्या बळावर मी सिगरेटपासून दूर राहिलो. शेवटी सहा-एक महिन्यानंतर मात्र माझ्या जवळपास कुणी सिगरेट ओढत असल्यास त्याचा त्रास व्हायला लागला. मग मला जरासे हुश्श झाले.

आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन. तेव्हा ती पहिली सिगरेट कुठल्याही परिस्थितीत ओढायची नाही ही खूणगाठ मनाशी पक्की घातली आहे!

१३ नोव्हेंबर २००९ रोजी सिगरेट सोडून मला वीस वर्षें झाली व १४ नोव्हेंबर २००९ रोजी मी धूम्रपानमुक्त अशा २१व्या वर्षांत पदार्पण केले. मी जे केले (तब्येतीला कांहींही 'धाड' झालेली नसताना) याचा अभिमान तर आहेच पण काही लोक सिगरेट ओढताना पाहून वाईट वाटते व त्यांना मदत करावी असेही वाटते. तशी मदत मी त्यांना देऊही करतो, पण यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो. मी आत्मनिश्चयाने यशस्वी झालो तसं त्याच्याही बाबतीत व्हायला हवं हे मनात येतं व मी त्यांना सांगतो मी यात यशस्वी झालोय. तुम्ही जेव्हा निश्चय कराल त्यावेळी जर माझ्या अनुभवाचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, मी जरूर माझा अनुभव तुमच्या उपयोगी पडेल अशा शब्दात तुम्हाला सांगेन. तोही अगदी फुक्कट!

इतिहासअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

12 Aug 2010 - 12:09 pm | सुधीर काळे

".....भाक्रा नांगलचे धरण जागा तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची." हे वाक्य "....भाक्रा नांगलचे धरण अशी स्थळे तिथं इतर काही ’प्रेक्षणीय’ नसलं तरी अभिमानानं पहावीशी वाटायची." असे वाचावे

स्व-संपादनाची सोय पुन्हा उपलब्ध कारावी अशी व्यवस्थापनास विनंती!

मदनबाण's picture

12 Aug 2010 - 12:18 pm | मदनबाण

स्व-संपादनाची सोय पुन्हा उपलब्ध कारावी अशी व्यवस्थापनास विनंती!
हेच म्हनतो म्या...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2010 - 12:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तेवढं इंटरनेटचं व्यसन कसं सोडवायचं त्याबद्दलही लिहा की एकदा!!

मृत्युन्जय's picture

12 Aug 2010 - 12:56 pm | मृत्युन्जय

तेवढं इंटरनेटचं व्यसन कसं सोडवायचं त्याबद्दलही लिहा की एकदा!!

यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो. - काळे काका.

:P

सुधीर काळे's picture

12 Aug 2010 - 1:43 pm | सुधीर काळे

अदिती, मलाच हे व्यसन जबरदस्त लागलंय् हल्ली. माझं जर कधी सुटलं तर नक्की सांगेन!
काका

कवितानागेश's picture

12 Aug 2010 - 6:34 pm | कवितानागेश

हे इंटरनेटचं व्यसन २० वर्षांपासून लागलय का?

यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो.
.. हे खरंय

विकाल's picture

12 Aug 2010 - 1:14 pm | विकाल

निश्चयी सम्पूर्ण, अडिग, अविचल
अभिनन्दन ....

परिकथेतील राजकुमार's picture

12 Aug 2010 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो काका.
आता आमच्या धम्याला उपरती कधी येणार ते पाहायचे.

सहज's picture

12 Aug 2010 - 1:39 pm | सहज

हेच म्हणतो की
आता आमच्या धम्याला उपरती कधी येणार ते पाहायचे.

आता आमच्या धम्याला उपरती कधी येणार ते पाहायचे. >>>

एक नंबर !! ..

पण काहीही म्हण ,त्याचा पिण्याबाबतीतचा कंट्रोल जबरदस्त आहे ...

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा

झालं?
घसरली का गाडी आमच्यावर? च्यायला, असले दोस्त असल्यावर दुश्मनांची गरजच काय? ;)

>>पण काहीही म्हण ,त्याचा पिण्याबाबतीतचा कंट्रोल जबरदस्त आहे ...
:) ठ्यांकू ठ्यांकू सुहाश्या..तुच एकटा खरा मित्र. ;)

मी ऋचा's picture

12 Aug 2010 - 1:28 pm | मी ऋचा

ब्राव्हो सुधीर काका!!!

वैदर्भिय's picture

12 Aug 2010 - 3:51 pm | वैदर्भिय

प्रेरणादाई लेख.

राघो भरारी's picture

12 Aug 2010 - 6:15 pm | राघो भरारी

जर तुम्हाला सिगारेट सोडायची असेल तर एकच उपाय आहे की ती एकदम बंद करणे. रोज थोडी थोडी कांडी ओढण्याची संख्या कमी करु आणि मग हळू हळू सुटेल ह्या विचाराने जर सोडण्याचा प्रयत्न केलात तर ती कधीच सुटणार नाही. मी सिगारेट एकदम बंद केली आणि आज मी सांगू शकतो की मी सिगारेट सोडली.

..राघो

जेव्हा मला सिगरेटमुळे कॅन्सर झालाय असा कोणी दीसेल तेव्हा मी सिगरेट सोडेन.

शानबा, असे बोलू नका. देव करो आणि आपल्याला तो शतायू करो!
पण सिगरेट नक्की सोडा! लई वंगाळ व्यसन!!

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2010 - 7:16 pm | कानडाऊ योगेशु

आजही मला खात्री आहे की मी एक सिगरेट एकदा जरी ओढली की मी पुन्हा 'वीस सिगरेट रोज'च्या रतीबाला पोचेन.

ह्याला म्हणतात आत्मविश्वास.! :P

जोक्स अपार्ट.. अश्या गोष्टींमुळे खरेच स्वतःच स्वतःची पाठ थोपटुन घ्यावीशी वाटते.
मलाही सिगारेटचे व्यसन होते. इतके की डोंबिवलीला राहत असताना संध्याकाळी घरी परतताना भर गर्दीच्या वेळी दिव्याला उतरुन सिगारेट पीत असे.
पण नंतर निग्रह करुन सोडले.त्यानंतर जेव्हा कधी सिगारेटची तलफ येई तेव्हा सिगारेट पिण्याची कृती मी सिम्युलेट (मराठी शब्द?)करत असे. अ‍ॅण्ड इट रियली वर्क्ड..
आज जेव्हा कधी एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा मी स्वतःलाच बजावतो की सिगारेट सोडण्यासारखी कठीण गोष्ट मी करु शकलो तर ही का नाही जमणार!

टारुभाऊनी सही अशी केली असती.
- (टारोबा स्मोकर) योगेशु.

रश्मि दाते's picture

13 Aug 2010 - 12:30 am | रश्मि दाते

यासाठी जो आत्मनिश्चय लागतो तो दुसरा कुणी देऊ शकत नाहीं, तो आतूनच यावा लागतो.
.. हे खरंय
मला ही जडली होती ही वाईट सवय पण तीच्या जास्त आहारी जायच्या आघी सुट्ली आता दुसरे ओड्त असले तरी त्रास होतो.

सुधीर काळे's picture

13 Aug 2010 - 12:09 pm | सुधीर काळे

रश्मीताई,
तुमच्या सिगरेट सोडण्याच्या प्रयत्नांना आणि मिळालले यश इथे सर्वांना सांगायच्या धैर्याला माझा खास सलाम.
सुधीर

गोगोल's picture

13 Aug 2010 - 5:48 pm | गोगोल

मस्त लिहिलाय. ओघवाती भाषा आणि तुमच्या नेहमीच्या लेखांपेक्षा एकदम वेगळा लेख. सहीच.

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 5:56 pm | धमाल मुलगा

च्यायला...सिगरेट सोडणं हे काही सोप्पं काम नाही.
इतका मनोनिग्रह असता तर च्यायला आम्ही जगाचे नकाशेही बदलायला कमी नसतं केलं. :D

काळेकाका, आपले प्रयत्न पाहुन मलाही धुराच्या विळख्यातुन बाहेर पडायची इच्छा होऊ लागली आहे. :)

काका,
अभिनंदन !

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||