विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर :- महाराजांच्या पदरचे एक प्रभु सरदार.यांनी वारंवार अफजलखानाच्या तळावर फकिराच्या वेशात जाउन तेथील सर्व खबर महारांजाना पोचवली.
उमाजी बिन संभाजीराजे भोसले :- महारांजाचे थोरले भाऊ संभाजीराजे यांचे पुत्र. अफजलखानाच्या पोवाड्यात खालील प्रमाणे उल्लेख आढळ्तो.
पुतण्या उमाजी राजाला !
पाचशे लोक दिले त्याला !!
आणि सराईत उमाजी !
राज्य होईल तुम्हाला !
अफजलखानाच्या वधाप्रसंगी उमाजीचे वय ५ होते. या साहसात महारांजाना काही अपाय झाला तर राज्य उमाजीने सांभाळावे असा बेत होता. या उमाजीचे पुढे काय झाले समजत नाही.
मुल्ला काझी हैदर :- हा एक अत्यन्त विद्वान फारसी चिटणीस होता. हा वकीलाचेही काम करायचा. महाराजांनंतर संभाजीराजांशी न पटल्यामुळे तो औरंगजेबाकडे गेला. बादशहाने त्याला २ हजारी मनसब देउन आपला नातु अजीमुशान याला शिकवण्याचे काम दिले.नंतर त्याची नेमणूक दिल्लीला काझी म्हणून झाली. जुन १७०६ मध्ये तो मुख्य काझी म्हणजे सरन्यायाधिश झाला.
नेताजी पालकर :- महारांजानी यांना परत हिन्दुधर्मात घेतल्यावर हे परत फारसे कुठं दिसत नाहित. पण दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हे महाराजांबरोबर होते. त्यानंतर ते संभाजीराजांच्या चाकरीत सुद्धा होते.१६८१ मध्ये ते बागलाणात लढ्त असल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते लौकरच वयोमानाने मरण पावले.
काही नविन नोंदी :- महाराज मोहीमेवर असताना अत्यंत कमी सरंजाम बरोबर बाळ्गत. सुरत लुटीच्यावेळी प्रत्यक्षदर्शी इंग्रजांच्या वर्णनानुसार मराठयांच्या तळावर १च साधा तंबु होता.त्यात स्वतः महाराज बसत व रहात. बाकी फौज उघड्यावरच राही.
दक्षिण दिग्विजयाच्यावेळी महाराजांचा मुक्काम कर्नाटकात त्रिवादी येथे असताना,फ्रेन्च वकील जर्मेल त्यांच्या भेटीला आलेला होता. तो ३ दिवस तळावर राहीला. तो लिहितो :- "स्वतःचा १ व कारभार्याचा १ अशा २ तंबु पलीकडे कोणतेही जड सामान शिवाजीकडे नाही. फौजतले सर्व घोडे सरकारी मालकीचे असून दर २ स्वारास ३ घोडे नेमून दिलेले आहेत."
या उलट औरंगजेबाचा 'गुलाल महल' नावाचा शामियाना होता. याच्यावर अत्यन्त किमती रत्ने जडवलेली होती,व हा एखाद्या मोठ्या महालाच्याच आकाराचा होता.
महाराजांचे समुद्रप्रेम :- माहाराजांना समुद्रस्नानाची अत्यन्त आवड होती. लहान असताना ( म्हणजे नक्की किती वयाचे असताना हे कळ्त नाही) ते मुद्दाम महाडजवळच्या बाणकोट्च्या खाडीवर राहीले होते.
महाराजांचे आरमार :- महाराजांच्या आरमारातील नावा व जहाजांचे प्रकार. यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. पण त्यांची नावे खालीलप्रमाणे :-
गुराब्,तरांडी,गलबत्,दुबारे,शिबाड्,पगार्,मचवा,बाथोर्,तिरकटी,पाल.
जहाज बांधणीच्या/ दुरुस्तीच्या गोद्या खालील ठिकाणी होत्या :-
विजयदुर्ग्,सिन्धुदुर्ग,कुलाबा,रत्नागिरी,अंजनवेल.
संदर्भ :-
इंग्लिश व डच रेकार्ड्स
मराठा रियासत्-सरदेसाई
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 11:05 am | अवलिया
चांगली माहिती.
धन्यवाद.
9 Aug 2010 - 11:42 am | अर्धवट
+१ असेच म्हणतो
9 Aug 2010 - 1:08 pm | भारतीय
माहीतीबद्दल धन्यवाद.. अजून वाचण्यास आवडेल..
9 Aug 2010 - 2:00 pm | गणपा
अजून वाचण्यास आवडेल..
9 Aug 2010 - 1:47 pm | जोशी 'ले'
तंजावर च्या भोसले घराण्या बद्दल पुढील लेख वाचण्यात आला होता त्याचा हा दुवा
http://www.loksatta.com/lokprabha/20040528/lphist.htm
तसेच अजून काही माहिती असेल तर जरूर द्यावी
9 Aug 2010 - 3:23 pm | प्रियाली
लोकप्रभेतील लेख आवडला. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मूळ लेखही माहितीपूर्ण आहे.
9 Aug 2010 - 2:25 pm | श्रीराजे
उत्तम माहिती........!
अजुन माहिती मिळाल्यास छानच..
9 Aug 2010 - 3:07 pm | धमाल मुलगा
धन्यवाद हो जोशीबुवा!
छान माहिती दिलीत. तुमच्याकडच्या ऐतिहासिक संदर्भग्रंथांमधुन अशीच भरपूर माहिती आमच्यासारख्यांना मिळावी ही प्रेमळ विनंती.
काझी हैदरबद्दल मुळीच ठाऊक नव्हते. ह्याने कोणकोणत्या मोहिमा/मसलतींमध्ये हेजीबगिरी केली ह्याची काही माहिती कोण्या दस्ताऐवज/रुमालांमध्ये सापडते का? जाणुन घेण्याची इच्छा आहे. :)
नेताजी पालकर : ग्रँड डफच्या नोंदींआधारे लिहिलेले भाषांतरीत पुस्तक 'नेताजी पालकर' ( आत्ता लेखक आठवत नाही. नंतर पाहुन सांगेन.) ह्यामध्ये नेताजी पालकरांचा लहानपणापासुनचा काळ, महाराजांच्या पदरी कसे रुजु झाले, ते महंमद कुली खान होण्याइथपर्यंतचाच काळ नमुद आहे. दुर्दैवाने ज्यांना 'प्रतिशिवाजी' असे ओळखले जायचे त्या वीराबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे ह्याचे वाईट जरूर वाटते.
उमाजींवरुन आठवले, कोकणातील शिर्के हेदेखील राजघराण्याशी नाते सांगतात. त्याबद्दल काही माहिती मिळु शकेल काय?
असो,
हा लेख क्रमशः आहे असे मानतो, आणि पुढील भागांची वाट पाहत आहे. :)
9 Aug 2010 - 3:58 pm | llपुण्याचे पेशवेll
उमाजींवरुन आठवले, कोकणातील शिर्के हेदेखील राजघराण्याशी नाते सांगतात. त्याबद्दल काही माहिती मिळु शकेल काय?
कोकणातील शिर्क्यांची मुलगी संभाजीराजांना दिली होती. गणोजी शिर्के ज्यानं गद्दारीने संभाजी महाराजाना पकडून दिले तो संभाजी महाराजांचा मेव्हणाच होता.
सध्यातरी इतकेच माहीत आहे.
25 Sep 2010 - 12:33 pm | चिगो
संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई शिर्केंच्या घराण्यातल्या.. सुभेदारी काढून घेण्याचा सुड म्हणुन गणोजी शिर्क्यांनी संभाजीराजांचा घात केला. संभाजी आणि येसूबाईंचा पुत्र म्हणजे शाहुराजे. ह्यांना औरंगजेबाने दिल्लीत ठेवले. तिथून त्यांना बाळाजी विश्वनाथ ह्यांनी मुत्सद्देगिरीने परत आणले. (म्हणूनच नंतर पेशवाई पिढीजात झाली). नंतर स्वराज्याची विभागणी वगैरे...
15 Sep 2010 - 5:53 pm | मालोजीराव
मोगलि दफ्तर खान्यामध्ये काही नोंदी आहेत कि संभाजी काळात पालकर मोगलांना मिळाले ! आता हे पालकर म्हणजे नेताजीच का ,याचा संदर्भ फार अंधुक आहे ...(शोध घ्यावा ) , छत्रपतींची एक पत्नी सुद्धा पालकर घराण्याची होती, पण नेताजी आणि त्यांच्या नातेसंबंधाचा स्पष्ट धागा कुठेच सापडत नाही. कारण खोपडे घराण्याला सुद्धा पालकर पदवी होती. त्यामुळे confusion आहे.
15 Sep 2010 - 6:32 pm | धमाल मुलगा
>>संभाजी काळात पालकर मोगलांना मिळाले ! आता हे पालकर म्हणजे नेताजीच का ,याचा संदर्भ फार अंधुक आहे ...
ह्म्म....
शिवाजीराजांनी पुर्वाश्रमीच्या नेताजी पालकरांना जे महंमद कुली खान झाले होते त्यांना शुध्दीकरण करुन पुन्हा धर्मात घेतलं होतं असं वाचुन आहे. शंभूराजांच्या काळच्या त्या पालकरांबद्दल नाही बुवा काही माहिती.
15 Sep 2010 - 8:38 pm | जिप्सी
महाराजांच्या एक कन्या कमळजाबाई(सकवारबाईंपासून झालेली) ही जानोजी पालकरास दिलेली होती,ते मोगलांना मिळाले असल्याची शक्यता आहे. त्याचे संदर्भ शोधायला लागतील. पण नेताजी पालकर पुन्हा मोगलांना मिळाले असल्याची शक्यताच नाही.
खोपडे घराण्याला सुद्धा पालकर पदवी होती याच्या बद्दल मला आजच कळाले.
9 Aug 2010 - 3:11 pm | जिप्सी
खरं तर हा लेख लिहिताना मला त्याला थोडी प्रस्तावनासुद्धा लिहायची होती पण लेख पोस्ट केल्यावर लक्षात आलं कि प्रस्तावना विसरूनच गेली. त्यामुळं आता ती इथ लिहीत आहे.
आपण सर्वानीच शिवचरित्र वाचलेलं असतं,पण त्या पलीकडं सुद्धा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. मुळातच मराठ्यांच्यात लिहून ठेवायची पद्धतच नव्हती, पराक्रम करायचा आणि विसरून जायचे. सभासद बखर वाचताना लक्षात येते की ,महाराजांचे अनेक सरदार आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. मग मी अशाच सरदारांचा ढुंढाळा घ्यायला सुरुवात केली. आणि मग अशीच अनेक दुर्लक्षित रत्ने सापडायला लागली,जी कधीच ईतिहासाच्या काळोखात लुप्त झालेली आहेत.
अशाच काही अनोळखी व्यक्ती आणि घटनांबद्दल पुढेही लिहायचा विचार आहे. अनेक मि.पा. करांचा ईतिहासाचा
उत्तम अभ्यास आहे,त्यानीही नवनवीन माहीती पुरवावी म्हणजे दुर्लक्षित रत्नांना मानवंदना दिल्यासारखी होईल.
9 Aug 2010 - 4:52 pm | नितिन थत्ते
>>खरं तर हा लेख लिहिताना मला त्याला थोडी प्रस्तावनासुद्धा लिहायची होती पण लेख पोस्ट केल्यावर लक्षात आलं कि प्रस्तावना विसरूनच गेली.
रोचक माहिती.
9 Aug 2010 - 3:14 pm | क्लिंटन
छान माहिती. अजून वाचायला आवडेल.
अफजल वधाप्रसंगी शिवाजी महाराजांचे पुत्र शंभूराजे सुमारे अडिच वर्षाचे होते.आपल्यास दगाफटका झाल्यास शंभूराजांना गादीवर बसवून नेताजी पालकरांच्या अधिपत्याखाली सैन्य अशी व्यवस्था ठेवावी असे महाराजांनी ठरविले होते असे वाचल्याचे आठवते. उमाजीला एवढे महत्व दिलेले प्रथमच वाचनात आले आहे. समजा उमाजी एवढी जबाबदारी देण्याइतका विश्वासातला असला तर नंतरच्या काळात त्याचा काहीच उल्लेख कसा सापडत नाही?
9 Aug 2010 - 3:28 pm | जिप्सी
क्लिंटनराव हाच तर खरा घोटाळा आहे,मी सुद्धा इतके दिवस "आपल्यास दगाफटका झाल्यास शंभूराजांना गादीवर बसवून नेताजी पालकरांच्या अधिपत्याखाली सैन्य अशी व्यवस्था ठेवावी असे महाराजांनी ठरविले होते" असेच समजत होतो,पण मलासुद्धा हा उल्लेख "मराठा रियासत्"मध्ये सापडला. आणि मी वर म्हटल्याप्रमाणे हा उमाजी नंतर हरवूनचं गेला.
संभाजीमहाराजांची १ कन्या भवानीबाई सुद्धा अशीच हरवली आहे. त्याच बरोबर संभाजीमहाराजांचे २ दासीपुत्र होते तेही हरवलेतं.
खोलातं जावं तेव्हढ थोडचं.
9 Aug 2010 - 6:36 pm | क्लिंटन
हो मला पण हा उल्लेख मराठी रियासत आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकांमध्ये सापडला.या दोन्हींचे संदर्भमूल्य मोठे आहे आणि त्यात उल्लेख केलेल्या गोष्टीच बहुतांश वेळा प्रमाण मानण्यात येतात.आपल्या लेखातून असे ध्वनीत होत आहे की या दोन्ही पुस्तकांपेक्षा अधिक विश्वासार्ह संदर्भ आपल्याकडे आहे. तो नक्की कोणता हे सांगू शकाल का?वेळ मिळेल तसा तो संदर्भ वाचून भविष्यकाळात इतिहासाविषयी मते त्यानुसार बनविता येतील.
क्लिंटन
9 Aug 2010 - 3:40 pm | जिप्सी
कोकणातील शिर्के हेदेखील राजघराण्याशी नाते सांगतात :- कोकणातील शिर्के हे महाराजांचे दुहेरी व्याही होते. महाराणी येसुबाईसाहेब या शिर्के घराण्यातल्या. संभाजीमहाराजांना पकडून देण्यात मोलाचा वाटा असणारे गणोजी शिर्के हे त्यान्चे मेव्हणेच. महाराजांच्या कन्या राजकुंवर उर्फ राजसबाई या शिर्क्यांच्यात दिलेल्या होत्या.
9 Aug 2010 - 3:53 pm | धमाल मुलगा
आभारी आहे.
अशीही वंदता ऐकुन आहे, की राजांना भवानी ही पोर्तुगिज तलवार शिर्क्यांनी भेट म्हणुन दिली. खरेखोटे ठाऊक नाही. त्याबद्दल सविस्तर लिहाल काय?
9 Aug 2010 - 4:06 pm | जिप्सी
फार खोलात नाही जात पणं भवानी तलवार महाराजांना खेम सावंतांकडून मिळाली. (महाराजांनी त्यांना २००/३०० होन त्याबद्दल दिलेले आहेत) हि तलवार जलचरांच्या मुलुखात म्हणजे हबसाणात तयार झालेली होती. तलवार म्हणण्यापेक्षा फिरंग असे म्हणणे योग्य ठरेल. ( जनात :- या विषयावर एकदा सविस्तर बोलूया आपण. मनात:-तुम्ही तर माझ्या पुढच्या लेखाचं मटेरियल घालवून राहीले ना भाऊ !!!!) ;-)
9 Aug 2010 - 4:32 pm | धमाल मुलगा
कोकणाचा संदर्भ लक्षात होता...देणार्याचं नाव मात्र चुकलं म्हणायचं.
असो.
>>हि तलवार जलचरांच्या मुलुखात म्हणजे हबसाणात तयार झालेली होती.
हबसाणातली? मग पोर्तुगिज तलवार कोणती?
- (ढ) धम्या.
>>जनात :- या विषयावर एकदा सविस्तर बोलूया आपण. मनात:-तुम्ही तर माझ्या पुढच्या लेखाचं मटेरियल घालवून राहीले ना भाऊ !!!!
=)) =)) =))
मंडळ क्षमक्ष्व आहे. मापी द्या येकडाव. :D
जाऊंद्या तुमच्या मार्गानं..आता आमी काय त्यात काड्या घालत न्हाई. :)
29 Oct 2010 - 5:20 pm | मालोजीराव
सातारच्या छत्रपतींकडे उदयराजे भोसले यांच्या ताब्यात असणारी भवानी तलवार
दसरा शस्त्र पुजनाच्या वेळी !
29 Oct 2010 - 9:06 pm | नितिन थत्ते
:O
मग अंतुले मुख्यमंत्री असताना लंडनमधून आणणार होते ती कोणती?
9 Aug 2010 - 4:16 pm | छोटा डॉन
जिप्सीराव, लेख आणि तुमचे प्रयत्न एकदम कौतुकास्पद आहेत.
अजुन पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
ह्यानिमित्ताने अजुन काही 'बॅलन्सड' चर्चा झाल्यास आनंद होईल.
लिहा, पुढच्या भागाची वाट पहात आहे ...
>>फार खोलात नाही जात पणं भवानी तलवार महाराजांना खेम सावंतांकडून मिळाली.
+१, असेच मानतो.
हे खेम ( की लखम सावंत ) हे कोकणातील अंमलदार होते असे माहित आहे. त्यांना कोकणात व्यापारासाठी आलेल्या शिद्दी हाबसाणांकडुन ही फिरंग मिळाली व नंतर महाराजांकडे ती आली असे ज्ञात आहे.
चु.भु.द्या.घ्या.
9 Aug 2010 - 4:24 pm | रश्मि दाते
छान माहीती,अजुन लिहा आवडेल वाचायला
9 Aug 2010 - 4:49 pm | जोशी 'ले'
हि वंदता शिर्क्यान बद्दल नसून खेम सावंता बद्दल आहे कि त्यांनी महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार भेट दिली व तीच भवानी तलवार होय. वास्तविक खेम सावंत हे स्वराज्याचे दुश्मन होते
9 Aug 2010 - 4:57 pm | अर्धवट
हेच शृंगारपुराचे सावंत का?
9 Aug 2010 - 5:17 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या माहीतीनुसार तेरेखोलचे. सावंतवाडीचे.
येथे थोडी माहीती मिळेल. श्रूंगारपूर माझ्याही माहीतीप्रमाणे राजेशिर्केंकडेच होते.
शृंगारपूर शाक्तांसाठी प्रसिद्ध होते.
9 Aug 2010 - 6:13 pm | धमाल मुलगा
येस येस...सावंतवाडी....आठवलं आता.
धन्यवाद रे पुप्या.
9 Aug 2010 - 4:58 pm | जिप्सी
खेम सावंत हे स्वराज्याचे दुश्मन होते ---- खेम सावंत नेहमीच तळ्यात मळ्यात करणारे होते. वेळ्प्रसंगी त्यानी पोर्तुगीजांची सुद्धा मदत घेतली. तसे ते विजापूरकरांचे जहागिरदार होते.
9 Aug 2010 - 5:10 pm | जिप्सी
हेच शृंगारपुराचे सावंत का? :---- अर्धवटराव मला पण जरा शंका वाटती पणं माझ्या माहीतीप्रमाणं शृंगारपुराचे आणि पालीचे शिर्के जहागिरदार होते. परत एकदा संदर्भ बघून पक्क सांगतो.
9 Aug 2010 - 7:08 pm | प्रभो
मस्त माहिती..
9 Aug 2010 - 7:41 pm | हेम
मराठा रियासतीतील आपण काढलेल्या नोंदी आमच्यात वाटल्याबद्दल धन्यवाद...
महाराजांच्या आरमार बांधणीचे मुख्य सुत्रधार दर्यासारंग व इब्राहीमखान (बहुतेक..) यांनाही यादीत घ्या की.. महाराजांची आरमार बांधणी सुरु झाली ती ठाण्याच्या दुर्गाडी किल्ल्याच्या साक्षीने, .. आणि मराठा आरमारासंबंधी अधिक माहितीकरिता बी. के. आपट्यांचे 'हिस्टरी ऑफ मराठा नेवी अँड मर्चंट्शीपस्' पुस्तक आहे.
ता.क.चौकशी- रियासतीची नवी आव्रुत्ती कधी येणार कोणाला माहित आहे कां?
10 Aug 2010 - 12:10 pm | जिप्सी
क्लिंटनराव्,हा पोवाड्याचा उल्लेख मला सुद्धा सरदेसाईंच्या मराटा रियासतीतच(शककर्ता शिवाजी) सापडला,आणि तत्कालीन काव्ये,पोवाडे वगैरे ईतिहासाचे साधन म्हणून वापरतात उदा. कविंद्र परमानंदांच शिवभारत. राज्य कुणी करावे हा विषय सोडून द्या ,पण उंमाजी नावाचा एक राजपूरुष होता इतके तरी खरं मानता येइल ना? बास उद्देश तोच आहे.
अवांतर :- शिवाजीकी आग्रा भेट नावाचे एक पूस्तक प्रकाशित झालेले आहे. ले. घनश्यामजी माथुर. हे पुस्तक राजस्थान अर्काइव्हज मधल्या अस्सल संदर्भांवरून लिहिलेले आहे,हे पुस्तक वाचल्यावर आग्राहून सुटका या विषयाला वेगळीच कलाटणी मिळ्ते.
11 Aug 2010 - 12:49 pm | llपुण्याचे पेशवेll
अशाच धाटणीचे एका जोशी आडणावाच्या लेखकाने लिहीलेले 'आग्र्याहून सुटका' नावाचे पुस्तकही आहे.
11 Aug 2010 - 6:34 pm | स्वप्निल..
>>अवांतर :- शिवाजीकी आग्रा भेट नावाचे एक पूस्तक प्रकाशित झालेले आहे. ले. घनश्यामजी माथुर. हे पुस्तक राजस्थान अर्काइव्हज मधल्या अस्सल संदर्भांवरून लिहिलेले आहे,हे पुस्तक वाचल्यावर आग्राहून सुटका या विषयाला वेगळीच कलाटणी मिळ्ते.
याबद्दल अजुन लिहू शकता का?
बाकी माहिती मस्त :)
10 Aug 2010 - 5:04 pm | स्पंदना
खुप रोचक माहिती , लेखात अन प्रतिसादात पण.
आवडल.
10 Aug 2010 - 5:57 pm | जिप्सी
>>खरं तर हा लेख लिहिताना मला त्याला थोडी प्रस्तावनासुद्धा लिहायची होती पण लेख पोस्ट केल्यावर लक्षात आलं कि प्रस्तावना विसरूनच गेली.
रोचक माहिती. ------------> थत्ते साहेब सदर धागा आमचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आहे. कमीत कमी या धाग्यावर तरी बाष्कळ प्रतिसाद देऊ नये ही नम्र विनंती. आपल्याच शब्दात सांगायचं तर "दुसर्याने लिहिलेल्यावर कॉमेण्ट मारणे सोपेच असते". आपल्याबद्दल आम्हाला आदर आहे तो अबाधित राहो !
बहुत काय लिहिणे ! आपण सुज्ञ असा !!
11 Aug 2010 - 9:38 am | नितिन थत्ते
आपल्याला माझा प्रतिसाद आपल्या लेखनावरील बाष्कळ प्रतिसाद वाटला असेल तर क्षमस्व. प्रत्यक्षात तो तुमच्या लेखनावर नव्हताच.
संपादकमंडळाने सध्या लेखकास लेखाचे संपादन करू न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावर अनेक सदस्य हा निर्णय बदलावा म्हणून मागणि करीत आहेत. या विषयावर एक [ कौलही ] येऊन गेल्याचे आपणास माहिती असेल.
त्यामुळे स्वयंसंपादन नसल्याने जेव्हा कोणी लेखक अडचण झाल्याचे सांगतो तेव्हा त्या त्या ठिकाणी मी तसेच अनेक सदस्य अशा प्रकारची कॉमेण्ट लिहितात. यात संपादकांना जास्तीत जास्त केसेस निदर्शनास आणून देणे एवढाच उद्देश असतो.
अवांतर : हल्ली थोर व्यक्तींचा कशाने अपमान होईल हे सांगता येत नाही. (शिवाजीमहाराज ऐवजी शिवाजी असे लिहिल्यानेही अपमान होतो असे अलिकडेच मला सांगण्यात आले). त्यामुळे मी अशा व्यक्तींविषयी मिसळपाववर हल्ली काही लिहीत नाही.
सध्या माझा प्रतिसाद बाष्कळ नव्हता हे पटावे.
11 Aug 2010 - 5:12 am | बेसनलाडू
नवीन, रोचक माहिती कळली. वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आग्रा भेट व सुटका यांना असलेली वेगळी वळणे, अधिक विश्वासार्ह संदर्भांमधून पुढे येणारा इतिहास यांबद्दल वाचायला जास्त आवडेल. कृपया या विषयावर जमेल तसे जमेल तितके लिहीत रहावे, चर्चा घडवत रहावी.
(वाचक)बेसनलाडू
11 Aug 2010 - 7:31 am | मदनबाण
माहिती आवडली,पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत... :)
11 Aug 2010 - 8:49 am | आनंदयात्री
छान रे जिप्सी. लेख आवडला.
सेतुमाधव पगडींचे 'तंजावरचे मराठे' वाचले आहेस का ?
हवे असल्यास घेउन जा वाचायला.
11 Aug 2010 - 12:24 pm | शहराजाद
लेख आवडला.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
11 Aug 2010 - 12:40 pm | दिपक
उत्तम माहिती. अजुन वाचायला आवडेल.
आमच्या एका जालमित्राचे शिवरायावरील ब्लॉग्ज.
http://itihasachyasakshine.blogspot.com/
http://shreeshivchatrapati.blogspot.com/
11 Aug 2010 - 1:04 pm | समंजस
नविन आणि फारशी माहित नसलेली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद जिप्सी साहेब.
11 Aug 2010 - 1:18 pm | पारिजात
नविन माहिती बद्द्ल धन्यवाद,
महाराज्याच्या पुत्नन्या विशयी पहिल्यादाच वाचनात काहि आल. .......
!! याच्या विशयी आनखी माहिती असल्यास जरुर लिहीने. !!
11 Aug 2010 - 5:27 pm | जिप्सी
आनंदयात्री अण्णा, खरंचं धन्यवाद ! आपल्याकडंन पुस्तक जरूर घेतो, त्या निमित्यानं आपल्याशी भेटसुद्धा होईल.पगडीं म्हणजे आमच्या सारख्या आळशी लोकांचे आवडते,त्यांची पुस्त़कं म्हणजे गायडं हो आपल्यासाठी. वाचा आणि पास व्हा !
सगळ्यांसाठी :- प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.लवकरच आजुन १ लेख टाकतो !
12 Aug 2010 - 3:27 am | येडा अण्णा
>>>>>>>हेच शृंगारपुराचे सावंत का? :---- अर्धवटराव मला पण जरा शंका वाटती पणं माझ्या माहीतीप्रमाणं शृंगारपुराचे आणि पालीचे शिर्के जहागिरदार होते. परत एकदा संदर्भ बघून पक्क सांगतो.
शृंगारपुराचे जहागिरदार सुर्यराव सुर्वे होते आणि पालीचे जहागिरदार जसवन्तराव होते. पिलाजीराव शिर्के (येसुबाइन्चे वडिल) हे सुर्व्यान्चे कारभारी होते.
15 Sep 2010 - 6:21 pm | कवितानागेश
आरमाराबद्दल फारशी माहिती कुठे वाचली नहिये..
पण काही गलबताची 'मोडेल्स' कोल्हापूरच्या राजवाड्यातील संग्रहालयात आहेत.
27 Sep 2010 - 10:19 pm | हेम
मराठा आरमारासंबंधी अधिक माहितीकरिता बी. के. आपट्यांचे 'हिस्टरी ऑफ मराठा नेवी अँड मर्चंट्शीपस्' पुस्तक. यांत आकृत्याही दिल्या आहेत.
15 Oct 2010 - 6:52 pm | जयंत कुलकर्णी
एक मनुवादी कावळा श्री. मेहेंदळे यांनी शिवाजीचे आरमार नावाचे पुस्तक नुकतेच लिहून प्रसिध्द केले आहे. हे पुस्तक ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी फारच उपयुक्त आहे.
या कावळ्याचे यासाठी आभार मानवेत तेवढे थोडेच आहेत !
25 Sep 2010 - 12:37 pm | मितभाषी
इतिहास घडवला मावळ्यांनी ।
पण तो लिहिला मनुवादी कावळ्यांनी ।।
25 Sep 2010 - 1:51 pm | विसुनाना
शाबास, याला म्हणतात प्रतिक्रिया!
मनुची नावाचा एक 'मनु'वादी आम्हाला माहित आहे. :)
26 Sep 2010 - 8:09 pm | हेम
इतिहास घडवला मावळ्यांनी
बंबात घातला त्यांच्या वारशांनी..
बंबात घातलेल्या पुराव्यांचा जाळ न् धूर संगच....
25 Sep 2010 - 9:35 pm | जिप्सी
@चिगो:- औरंगजेबाने दिल्लीत ठेवले. तिथून त्यांना बाळाजी विश्वनाथ ह्यांनी मुत्सद्देगिरीने परत आणले. (म्हणूनच नंतर पेशवाई पिढीजात झाली). नंतर स्वराज्याची विभागणी वगैरे ----> स्वराज्याची विभागणी ही पेशव्यांच्यामुळं झाली नाही,ती एका तहाद्वारे झाली.तो महाराणी ताराराणी(करवीर संस्थान) आणि शाहू महाराज(सातारा संस्थान) यांच्यात झाला. त्या तहाला वारणेचा तह म्हणतात.त्यातहानुसार वारणा नदीच्या दक्षिण भाग महाराणी ताराराणींकडे तर उत्तरेचा भाग शाहू महाराजांकडे अशी वाटणी करण्यात आली. आणि पेशव्यांचा उदय त्यानंतरच्या काळात झाला. पेशवाई जरी पिढिजात असली तरी एकाही पेशव्याने शाहू महाराजांना पदच्युत करायचा प्रयत्न केला नाही. सर्व कारभार सातारकर छत्रपतींच्या नावेच चालत असे. जर तुम्ही बाजीराव्,नानासाहेब्,माधवराव पेशवे यांच्या पत्रांवरील शिक्के बघीतले असतील तर तुम्हाला माहीती असेलच.(बघीतले नसल्यास त्यांच्या काही पत्रांच्या माझ्याकडे झेरॉक्स आहेत्,त्या मी तुम्हाला जरूर दाखवीन)
आपण या विषयावर अधिक अभ्यासासाठी करवीर रियासत्,सरदेसाईंच्या मराठा रियासतीतील पुढील खंड,ग्रँट डफचे हिस्टरी ऑफ मराठाज वाचू शकता.
26 Sep 2010 - 8:16 pm | वेताळ
आताची वंशज आहे काय?
26 Sep 2010 - 10:41 pm | जिप्सी
होय ! सातार्याचे भोसले हे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचे वंश़ज आहेत्,तर कोल्हापूरकर भोसले हे राजाराम महाराजांचे वंश़ज आहेत.
@भावश्या-मनु आणि मनुवाद या विषयावर मला बोलायचे नाही. पण महाराजांच्या विषयीच्या धाग्यावर गरळ ओकल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
15 Oct 2010 - 3:38 pm | मितभाषी
धन्यवाद जिप्सी
15 Oct 2010 - 4:17 pm | यशोधरा
मस्त माहिती. अजूनही असे लेख येउदेत.
28 Oct 2010 - 9:47 pm | Parag Purandare
चान्गलि माहिति दिलित. शिवाजि महाराजान्चे आर्मार असे गजानन मेहेन्दळ्यान्चे नवे पुस्तक बाजारात आले आहे. खुप उपयुक्त माहिति त्या पुस्तकात दिलि आहे. आपण जरूर वाचावे.
19 Jan 2011 - 3:59 pm | मालोजीराव
हा कावळा म्हणजे मराठा सरदार अप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वंशज होय (ते आपले अ ब चौक वाले हो ) असे ऐकून आहे