आमची पहिली परदेशवारी....९
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
भाग-५ http://www.misalpav.com/node/13495
भाग-६ http://www.misalpav.com/node/13529
भाग-७ http://www.misalpav.com/node/13578
भाग-८ http://www.misalpav.com/node/13617
नमस्कार मंडळी,
आजचा हा भटकंती वरचा शेवटचा लेख. असा तर आणखी खूप ठिकाणी फिरलो पण थोडीशी आपल्यालाही काही ठिकाणची ओळख व्हावी म्हणून इतका प्रपंच केला. आज या २-३ ठिकाणची भ्रमंती केलेला अनुभव लिहितो आहे .जे काही लेखन मि केले आहे तो माझा अनुभव आहे १००% खरा. मी कधीकाळी ब्राझीलला जाईल असे मला कधीच वाटले नव्हते आणि मी कधी एखादी लेखमाला लिहू शकेल असे तर मला स्वप्नातही वाटले नव्हते. खरेतर माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही. एवढे दिवस आपण हे कॉमेंट्री सारखे असलेले लिखाण सहन केलेत तसे आणखी एक भाग सहन करा. मग मी येथे परत फक्त वाचक बनून राहील. मला वाचनाचा हव्यास आहे लिखाणाचा तर अजिबातच नाही.माझा हा लेख (किंवा लेखमाला म्हणू हवे तर) पहिला आणि शेवटचा/ची आहे असे मी आजच जाहीर करतो. कुणाला आवडले असेल कुणाला नसेलही. सर्वांचे आभार मानतो. चूकभूल माफी असावी. धन्यवाद.
***************************
इथे आल्यापासून पहिल्यांदाच सकाळी पाच वाजता उठावं लागलं, कारण मला येथील रेल्वे बघण्याची फार इच्छा होती. मला वाटले प्लाटफार्मवर जाऊन रेल्वे बघावी.चार दोनदा क्लिक करावं आणि चालू पडावं. पण ते शक्य नाही असे एडीने मला सांगितले.कारण इथे विनातिकीट प्लाटफार्मवर जाता येत नाही. मग आम्ही रेल्वेचे तिकीट आरक्षित केले. कोलेटिना येथे जाण्यासाठी.इथे रेल्वेचे जास्त जाळे नाही.सकाळी ७ वाजता एक विटोरिया-बेला होरीझोन्ते अशी एकच पेसेंजर रेल्वे जाते.परत कुठलीही रेल्वे नाही,फक्त संध्याकाळी बेलाहोरीझोन्ते इथून सकाळी ७ वाजता सुटलेली रेल्वे विटोरियाला पोहोचते.
त्यामुळे पर्याय नव्हता. सकाळी आवरून ६ वाजता बस थांब्यावर आलो तर बाजूच्या टपरीवजा हॉटेलमध्ये बरीच गर्दी दिसली. कुठलीशी फुटबाल टीम होती आणि जवळपास २५-३० तरुण असावेत.विशेष म्हणजे ते सकाळी ६ वाजता बियर पीत नाचत होते. त्यापेक्षाही मी जास्त चकित झालो ते या गोष्टीने कि ते ज्या गाण्यावर नाचत होते ते होते "नगाडा, नगाडा,नगाडा बजा" असे कुठल्याशा हिंदी सिनेमाचे गाणे. मला त्या मालकाबरोबर बोलण्याची इच्छा झाली होती पण एडी नको म्हणाली आणि आम्ही बस पकडून रेल्वे स्टेशनला आलो. जरासा वेळ होता काही फोटो घेतले आणि रेल्वेत जाऊन बसलो. येथे सोडवायला येणार्या लोकांनाही आतमध्ये सोडत नव्हते.शिवाय प्रत्येकाला आपले ओळखपत्र दाखवणे गेजेचे होते.मी पारपत्र दाखवले होते.२*२ अशी आसने होती, मध्ये बरीच जागा होती. प्रत्येक डब्यामध्ये टीव्ही, फिल्टरचे थंड पाणी अशा सुखसोयी होत्या. आसने आरामशीर होती अगदी पाठीमागे घेतले तर झोपण्यासाठी खूपच आरामदायी.मला आपल्या दख्खनच्या राणीची आठवण झाली जिने मी नेहमी प्रवास करतो.थोड्याच वेळात गाडी सुरु झाली आणि एक माणूस आला, तो प्रत्येक सीटला एक प्लास्टिकची पिशवी अडकवून निघून गेला. कोणी काहीही खाल्ले तर कचरा त्यामध्ये टाकायचा.मला हि पद्दत आवडली. मी कुणालाही कचरा खिडकीबाहेर टाकताना पहिले नाही. मी खिडकीत बसून बाहेरचा प्रदेश न्याहाळत होतो आणि काहीबाही फोटो टिपत होतो.थोड्या वेळाने एक माणूस ट्रोली घेऊन आला, आम्ही केक आणि कॉफी घेतली. फेरीवाला वगैरे हा प्रकार इथे दिसत नाही. कोलेतीनाला उतरलो आणि लगेच शहरात जाणारी बस मिळाली . बस खचाखच भरली होती कारण यानंतर ३० मिनिटे दुसरी बस नव्हती. रेल्वे स्टेशन पासून शहर लांब असल्याने सर्वांनाच बसने प्रवास करायचा होता. २० मिनिटातच शहरात आलो. एदिलाही इथले काहीही माहित नसल्याने थोडी विचारपूस केली. हे एक तालुकावजा गाव असल्याने विशेष काही पाहण्यासारखे नव्हते. एक मोठी नदी गावामधून वहात असल्याने गाव दोन भागात विभागले गेलेले होते. नदीवरील पुलावरून उगाचच पलीकडे गेलो. बराच पाऊस झाला असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती.नदीचे नाव 'स्वीट रिव्हर' असे होते पण आता या क्षणालातरी तिचे पाणी एकदम गढूळ दिसत होते. पलीकडे असाच गावामधून फेरफटका मारला. आणि एका छोट्याशा दुकानात प्रवेश केला.दुकानाची मालकीण रोझीने इंग्रजीमध्ये बोलायला सुरवात केली. मी मोठमोठ्या शहरात फिरलो पण या रोझीएवढे अस्खलित इंग्रजी बोलणारे मला तरी कोणी भेटले नाही. तिने माझी विचारपूस केली , लगेच एडीला आणि मला शुभेच्छाही दिल्या. आणि एक-दोन घ्यायचे तिथे चांगले पाच टौप गळ्यात घातले.तिला असे वाटत होते मी बळीचा बकरा आहे आणि हे सर्व पैसे मी देणार आहे. तसे तिने बोलूनही दाखवले.एडीची हि खासियत, नवीन कपडे खरेदी हि तिची सर्वात आवडती गोष्ट. मग मी रोझीला त्या शहरात काही पाहायला आहे का विचारले. तर तिने येथे तसे विशेष काही नाही पण येथील मुली पाहण्यासारख्या आहेत ( सुंदर आहेत) असे सांगून माझी मस्करी केली. आणि बोनस म्हणून इथे एक चांगले हॉटेल आहे तिथे जेवण खूप अप्रतिम मिळते अशी माहिती दिली. तसही लंच घेतले नसल्याने आम्ही ते हॉटेल गाठले. मि आपली नेहमीचे भात आणि वालाची उसळ,बटाटा फ्राय,सलाड घेतले. इतके चवदार जेवण मला यापूर्वी आणि नंतरही कुठल्याही हॉटेलमध्ये मिळाले नाही.सहसा एकदा वाढून घेतल्यावर परत काहीही न घेणारया एडीने आज तीनदा वेगवेगळे पदार्थ घेतले.तिने मलाही त्याचा आग्रह केला.मी चवही घेतली पण नेहमीप्रमाणे मला ते बेचव वाटले.पण तिने परत एकदा कॉलेतीनाला फक्त या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येऊ असे मला सांगितले. एडीला खाण्याची इतकी आवड आहे कि ती मी फक्त खाण्यासाठी जगते (जगण्यासाठी खात नाही) असे बिनदिक्कत सांगते. बाहेर आल्यावर असेच तासभर हे दुकान ते दुकान असे भटकत राहिलो, बस पकडली आणि वितोरीयाला परत आलो.
**********************
विटोरियाचे वातावरण जवळपास मुंबईसारखे आहे. दमट हवामान असल्याने फार फिरल्यावर दमायला होत असे. त्यात अधेमधे अचानक पाउस येतो आणि त्यानंतर परत गर्मी चालू तर कधी थंडी असे लहरी हवामान . इथेहि जोराच्या पावसानंतर शहरामध्ये रस्ते पाण्याने भरून वाहतात, घरामध्ये पाणी घुसते असले प्रकार होतात. विशेषत: साओ आणि रिओ ला. एकदा तर एक मोठो पूलच अर्धा वाहून गेल्याचे मी टीव्ही वर पहिले. या समस्या सार्वत्रिक असाव्यात असे मला वाटते. मला मुंबईच्या गरम हवामानाची सवय असल्याने मला इथे कुठलाही त्रास झाला नाही, या ७० दिवसात मी कधीही आजारी पडलो नाही, पण माझे वजन ३-४ किलोने कमी झाले होते ते जेवण आवडत नसल्याने. घरी मी बनवायला सुरवात केली होती पण आम्ही बर्याचदा कुठे-कुठे भटकत असू त्यामुळे हि समस्या कायम होती.मला एखाद्या हिलस्टेशनला भेट देण्याची इच्छा होती म्हणून एडीने सांता तेरेसाची दोन तिकिटे आरक्षित केली. बसने चार तास लागणार होते. मी नेहमीच खिडकीजवळ बसत असे आणि एडीने याबद्दल कधीही तक्रार केली नाही. बसने शहराला मागे टाकले , हायवे रिकामाच होता बस वेगाने पुढे सरकत होती. मी बाजूच्या निसर्गाचे निरीक्षन करत होतो. बहुतेक घरे हि शेतात एकटी-दुकटी दिसत होती. रस्त्याच्या कडेला छोटे मोठे लाकडी गेट आणि पुढे घरापर्यंत लाल मातीतून वळणावळणाने जाणारा रस्ता. आजूबाजूला झाडाची गर्दी असलेली ती बंगलीवजा घरे, बहुतेक घरासमोर चारचाकी वाहने, त्यापुढचे हिरवे शेत , आणि संपुर्ण शेताला तारेचे कम्पाउन्ड. मलातरी हायवेवर एखादे जनावर आलेय असे दृश्य कधीही पहायला मिळाले नाही.आता बसने हायवे सोडला आणि डावीकडे वळण घेतले, थोडे पुढे येऊन एक छोटेसे गाव लागले तिथे बस थांबली, बहुतेक लोकांनी चहापाणी घेतले आम्हीही कॉफी घेतली आणि बस पुढे मार्गस्थ झाली.आता एक वळण घेऊन बस कच्च्या रस्त्याने पुढे जात होती. या भागात बराच पाउस झालेला असल्याने बाजूला पाणी साठलेले दिसत होते. संपूर्ण अशा कच्च्या घाटरस्त्याने बस अतिशय हळूहळू जात होती. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी, पाउस जरी पडून गेला तरी आता थोडेसे उन पडले होते. काही ठिकाणी समोरून अचानक दुसरे वाहन येई आणि रस्ता अरुंद असल्याने चालकाला बरीच कसरत करावी लागत असे. रहदारी फार म्हणजे फारच कमी होती. आजूबाजूच्या घरामधील लोकांची कामाची लगबग सुरु होती. या रस्त्यावर प्रथमच मी कॉफीची झाडे पहिली. आणि लोकांना शेतात काम करताना पाहिले. काही ठिकाणी गुरे चरताना दिसत होती पण त्यामागे कुठेही मला गुराखी दिसला नाही. आताशा घाटरस्ता पार करून बस एका चांगल्या रस्त्याला लागली. आता हवेतील गारवा चांगलाच जाणवत होता आणि थोड्याच वेळाने आम्ही नियोजित ठिकाणी उतरलो. या गावामध्ये बहुतेक बैठीघरे होती,मधेच एखाददुसरे दुमजली घर दिसे.छोटी छोटी बैठी आणि टुमदार घरे आकर्षक रीतीने बांधलेली होती. आम्ही चालतच गावातून फेरफटका मारला, दुपार झाली असल्याने जेवण उरकून घेतले आणि गावाच्या थोड्याशा बाहेर असलेल्या बागेमध्ये आलो. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी आकर्षक आणि मोठी बाग बघून मला नवल वाटले.बागेच्या दोन्ही बाजूला बागेपेक्षाही सुंदर असे बंगले होते. एकसारखा दुसरा दिसत नव्हता. चौकशी करता असे समजले कि येथे बरेच जर्मन वंशाचे लोक राहतात .खूप पूर्वीपासून इथे ते लोक स्थाईक झाले आहेत आणि गावात त्यांची संख्या ८० % होती. इथेच एक बायोलोजीकाल पार्क असल्याचे समजले. २ किमीवर असले तरी आम्ही चालतच निघालो. आजुबाजुला उंच उंच डोंगररांगा, दुपार असूनही कोवळे भासणारे ऊन, सर्व परिसरावर धुक्याची छाया पसरलेली. हवा तर इतकी मोकळी आणि शुद्ध कि थकवा असा वाटतच नव्हता आणि अंगात उत्साह भरून राहिला होता. या भागात काही बरीच दुमजली घरे आणि काहीसं शहरी वातावरण जाणवत होते. पार्कमध्ये प्रवेश केला आणि पार्क कसले ते पूर्णतः जंगलच होते. आम्ही थोडेसे पुढे गेलो आणि मला एक गोष्ट खटकली ती तिथे त्यावेळेला तरी आम्ही सोडून मला कोणी दिसले नाही.मला थोडीशी भीती वाटली . मागे येऊन ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा भीतीचे काहीही कारण नाही असे समजले आणि निश्चिंत होऊन मग आम्ही सर्व पार्क पालथे घातले. इथे रंगीबेरंगी पोपट, एक वेगळ्याच जातीचे खुपच लहान असे माकड पाहायला मिळाले. बरेचसे कासवही होते त्यातले एक कासव उलटे पडले होते,त्याची सरळ होण्याची धडपड चालू होती आणि त्याला काहीही आधार नसल्याने सरळ होताही आले नसते.एडीने मला त्याला सरळ करण्यास सांगितले मला त्याला हात लावायची किळस वाटली.तेथे पिंजरा नसल्याने एडी आतमध्ये गेली,तिने त्याला सरळ तर केलेच , त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याच्याशी गप्पा मारत बसली.मलाही आत बोलवले पण मी नकार दिला. मला कासव हा प्राणी बिलकुलच आवडत नाही तिथे हि एडी त्यांच्यात जाऊन बसली होती. १५-२० मिनिटांनी त्याच्याशी गप्पा मारून झाल्यावर ती बाहेर आली. मग मला तिने पूर्वी घरात एक कासव पाळले होते, त्याच्या सवयी, खाणेपिणे, ते मेल्यावर ती किती रडली आणि कशी दुख्खी झाली होती ते सांगितले.प्राण्यावर तिचे मनापासून प्रेम आहे,पण तरीही ती फक्त झुरळाला घाबरते. माझ्या चायनीज चाटींग मैत्रिणींचा तर ती कॉक्रोच असाच उल्लेख करते. इथेच मी हमिंग बर्ड पहिले. हमिंग बर्ड या छोट्याशा पक्षावर येथील एका शास्त्रज्ञाने बरेचसे संशोधन केलेले होते आणि त्यानेच हे पार्क उभारले होते. येथे बरेचसे लोक या हमिंग बर्ड चा अभ्यास करण्यासाठी येतात असे समजले. तो शास्त्रज्ञ ज्या घरामध्ये येथे राहत असे तेथे पाण्याच्या बाटल्या टांगून ठेवलेल्या होत्या आणि बाटलीच्या तळाशी छोटासा पाईप आणि त्याला एक सूक्ष्म छिद्र होते. ते हमिंग बर्ड बरोबर त्या छिद्राला चोच लावून पाणी पीत. ते उडत असताना आवाज होतो. त्यांच्या पंखांची खूपच जोरात हालचाल झाल्याने हा आवाज येतो त्यामुळे त्यांना हमिंग बर्ड म्हणतात.चिमणी सारखा दिसणारा पण आकाराने चिमणीपेक्षा खूपच लहान असे हे बरेच हमिंग बर्ड, त्यांचा होणारा तो लयबद्ध आवाज आणि त्यांची होणारया विलक्षण चपळ हालचाली यांचे निरीखन करत बराच वेळ गेला. माझ्याकडे याचे वीडीओ आहेत. १८ ते २० एमबी असल्याने ते येथे टाकता येणार नाहीत . नंतर तेथे काही प्राणी जतन केलेला एक विभाग आहे तेथे गेलो. फोटो टाकले आहेत. बाहेर पडलो कॉफी घेतली आणि रस्त्याने जाताना एक सुंदर,छोटासा , साधासा बंगला मला आवडला त्याचा फोटो घ्यायचा विचार होता पण तिथे दोन सुंदर मुली बसलेल्या होत्या. मी फोटो काढावा तर त्याना शंका घ्यायला जागा होती. म्हणून एडीला सांगितले.तिने त्यांना तसे विचारले तर त्या आतमध्ये निघून गेल्या. मग मी फोटो घेतला. मला जर राहण्यासाठी ब्राझीलमधील कुठले एकच ठिकाण निवडायचे असेत तर ते असेल सांता तेरेसा. बस थांब्यावर परत आलो. बसला अवकाश होता म्हणून समोरच्या आईसक्रीमच्या दुकानात गेलो. खूप विविध प्रकार होते. एडीने मला विचारले मी आपले जे रंग बरे वाटले ते चार-पाच गोळे घेतले. एडीने तर ८-१० घेतले. मला तर त्यातला एकही प्रकार आवडला नाही. फारच वेगळी चव त्यामुळे मी ते तसेच सोडून दिले.फारशी गर्दी नसल्याने आम्ही तेथेच बसून वेळ घालवला. बस आली आणि परतताना वेगळ्याच मार्गाने आम्ही विटोरियाला परतलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.
********************
आज आमचा 'गुआरापारी' या नामचीन बीचवर जाण्याचा बेत ठरला होता. आमची ओळख झाल्यापासून खूप वेळा मी हे नाव एडीकडून ऐकले होते. तसे तर या परिसरात बीचला तोटा नाही पण या बीचवर एडीची विशेष मर्जी होती. मलाही उत्सुकता होतीच मग काय सकाळीच निघालो.जुनिअरलाही बरोबर घेतले आणि बस पकडली. तो असला कि आम्ही बीचवरच्या वाळूमध्ये फुटबॉल खेळायचो. तासंतास आम्ही पाण्यामध्ये डुंबत असायचो. मला समजत नसले तरी तो माझ्याशी गप्पा मारायचा असा हा जुनिअर माझा मित्र झाला होता. तीनेक तासाचा हा रस्ता ,शेवटपर्यंत हायवेचा प्रवास, पोटातील पाणीसुद्धा हलत नव्हते इतका आरामदायी प्रवास करून आम्ही गुआरापारीला पोहोचलो. हे बर्यापैकी मोठे शहर होते, मोठमोठे मॉल नजरेत भरत होते आणि बरेच पर्यटकही रस्यावर भटकताना दिसत होते. विशेष म्हणजे बस आगारापासून हा बीच ६-७ मिनिटाच्या अंतरावर आहे. सुरवातीलाच एक मोठेसे हॉटेल लागले, ते ओलांडून पुढे गेल्यावर लांबच लांब,वक्राकार फारच सुंदर बीच नजरेत भरतो. इथे खुप हॉटेल्स आहेत आणि हा पर्यटकांचा खूपच फेवरेट असा बीच आहे. डावीकडे संपूर्ण उंचउंच इमारती, उजवीकडे मोठासा फुटपाथ त्यावर ठराविक अंतरावर असलेली झाडे,रुपेरी वाळू आणि २-३ किमी पसरलेला हा बीच आणि क्षिताजापर्यंत पसरलेला समुद्र. पोटपूजा उरकून सरळ समुद्रातच उतरलो. मधेच बाहेर येऊन फुटबाल खेळायचा आणि काही वेळाने परत पाण्यात. सात वाजता परत निघालो. आता काही फोटो:-
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 5:41 pm | गणपा
आधी येडीचा फोटु दिसल्या शिवाय प्रतिक्रिया देणारच नव्हतो. ;)
पण काय करु भागच एवढा दमदार झालाय की रहावल नाही.
(त्या कासवांना काही प्रायव्हसी द्या की विलास राव ) ;)
7 Aug 2010 - 12:51 am | मराठमोळा
गणपाच्या काळ्या आणी पांढर्या वाक्यांशी बाडीस... :)
6 Aug 2010 - 6:01 pm | पुष्करिणी
हाही भाग छानच झालाय.
इतकं चांगल लिहायला यायला लागल्यावर लिखाण संन्यास का बरं जाहिर केला तुम्ही ?
हो आणि बजेट कसं जमवलं त्याही बद्द्ल अफाट उत्सुकता आहे
6 Aug 2010 - 5:49 pm | मीनल
तिला पहायचेच आहे .
तूम्ही लेखन बंद करू शकत नाही.
तरी ` पुढे चालू ` असा शेवटी बदल करावा.
6 Aug 2010 - 5:53 pm | नंदू
विलासराव,
येडीचा फोटो शेवटपर्यंत न टाकल्या बद्दल तुमचा तीव्र निषेध.
असो. यापुढे केवळ वाचनमात्र राहण्याची भिष्मप्रतिज्ञा मागे घ्याल अशी अपेक्षा करतो.
बाकी लेखमालीका आवडली हे वेगळे सांगणे न लगे.
नंदू
6 Aug 2010 - 5:57 pm | भारतीय
पुन्हा एकदा छान लेख.. तुमची लेखमाला खुपच मस्त जमलीये..तुम्ही सर्व मिपकरांनाच ब्राझिलची सफर घडवून आणलीत.. हि लेखमाला संपली असे तुम्ही जाहीर केले आहे, पण तुम्हीच कुठेतरी लिहिल होतं कि शेवटच्या लेखात एडी बाईंचा फोटो चिकटविन असे.. कुठे आहे चि. सौ. का.एडी बाईंचा फोटो? तुम्ही अजून लिहाच हो विलासराव.. मिपाकरांच्या सर्व शंका दूर व्हायलाच हव्यात्..(मर्जी तुमची), म्हणजे ९८ हजारात ६८ दिवसांचे मॅनेजमेंट कसे केलेत? एडी बाईपण भारतात येणारना?तिथून निघताना हिरो-हिरॉईन ची (अर्थात एडी-विलासराव!) प्रतिक्रिया काय होती? ईन शॉर्ट, कहानी का एण्ड क्या हुआ?
हे झाले ह्याच लेखाबद्दल.. पण तुमची लेखनातील हतोटी बघता तुम्ही ईतर विषयांवरदेखील लिहावे असे मनापासून वाटते..
7 Aug 2010 - 4:55 am | माया
सहमत आहे.
6 Aug 2010 - 6:19 pm | विलासराव
आजचा हा भटकंती वरचा शेवटचा लेख.
एवढे दिवस आपण हे कॉमेंट्री सारखे असलेले लिखाण सहन केलेत तसे आणखी एक भाग सहन करा.
शेवटी क्रमशः लिहिलेले आहे.
लिखाणात काहीतरी चुक राहीलेली दिसते आहे.
6 Aug 2010 - 6:35 pm | रेवती
लेखन लेखन!
फोटू आवडले.
रस्त्यांवरची स्वच्छता नजरेत भरण्यासारखी आहे.
पुढच्या भागात तुमच्या मैत्रिणीचा फोटो टाकाच राव विलासराव!
6 Aug 2010 - 7:05 pm | मृत्युन्जय
विलासराव लेखमालिका लैच भारी. प्रवासवर्णन देखील अप्रतिम.
कृपा करुन पुढच्या भागात असे सांगु नका की एडी कोणी नव्हतीच म्हणुन. आणि असेल (असेल म्हणजे काय असलीच पाहिजे) तर तिचा फोटो टाकायला तेवढा विसरु नका बघा. नाहीतर भगवद्गीते शिवाय महाभारत वाचल्यासारखे वाटत राहील.
6 Aug 2010 - 7:52 pm | समंजस
मस्त विलासराव साहेब :)
हा भाग सुद्धा झक्कास आहे. तुम्ही खुपच सविस्तरपणे बाझील ची सफर घडवून आणलीय.
खरंतर पहिल्यादांच एवढी विस्तॄत प्रवासवर्णनमाला माझ्या वाचण्यात आली आहे त्या मुळे आणि फोटो टाकताना सुद्धा हात आवरता न घेतल्या बद्दल तुम्हाला विशेष धन्यवाद.
[ शेवटची कशाला..आणखी इतरही प्रवासमाला येउ द्यात..ती चीन ची सुद्धा येउ द्या ;) ]
6 Aug 2010 - 8:05 pm | टिउ
पुढील भाग वाचण्यास उत्सुक. त्यानंतरही लिखाण थांबवु नये ही विनंती...
6 Aug 2010 - 10:29 pm | शिल्पा ब
एडीच्या फोटोच काय झालं? बाकी लेखमाला छानच...फोटोसुद्धा छान...आवडलं.
6 Aug 2010 - 11:26 pm | भाग्यश्री
लेखमाला खूप आवडली!!
छोट्या छोट्या डिटेल्समुळे व फोटोंसहीतचे वर्णन एकदम आवडले.
पुढचा भाग लिहीलाच पाहीजे! एडी कुठाय आणि ??
7 Aug 2010 - 12:33 am | piu
एडीचा फोटो दाखविल्याशिवाय तुमची लेखमाला संपूर्ण होउ शकतच नाही.
7 Aug 2010 - 1:10 am | सुनील
माझा हा लेख (किंवा लेखमाला म्हणू हवे तर) पहिला आणि शेवटचा/ची आहे असे मी आजच जाहीर करतो. कुणाला आवडले असेल कुणाला नसेलही.
असे नका म्हणू. लिहा आणि फोटोही काढा.
साधासा बंगला मला आवडला त्याचा फोटो घ्यायचा विचार होता पण तिथे दोन सुंदर मुली बसलेल्या होत्या. मी फोटो काढावा तर त्याना शंका घ्यायला जागा होती. म्हणून एडीला सांगितले.तिने त्यांना तसे विचारले तर त्या आतमध्ये निघून गेल्या. मग मी फोटो घेतला.
येडचाप आहात! (ह. घ्या)
क्रमशः
ही त्रुटी का हिंट?
लेखमाला आवडली. एका वेगळ्याच देशाबद्दल वाचायला बरे वाटले. पुलेशु.
7 Aug 2010 - 9:57 am | विलासराव
येडचाप आहात! (ह. घ्या)
हे बाकी बरोबर बोललात.........
7 Aug 2010 - 10:39 pm | भिरभिरा
विलासराव , लेखमाला सलग वाचुन काढली.मस्त जमुन आलीय्..लिखाण पहिल्यांदाच करत असाल तर थांबवु नका.
पण तेवढं'येडी ' च्या फटुचं..
7 Aug 2010 - 11:12 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम लेखमाला. आवडली तर आहेच. पण एक नवीन देश बघायला मिळाला. तुम्ही अजूनही बरेच लिहू शकाल ब्राझिलबद्दल असे वाटते. शिवाय इतर विषयही आहेतच. लिहा हो... काय भाव खाता? ;)
येडी कुठाय?
8 Aug 2010 - 10:08 am | विलासराव
उत्तम लेखमाला. आवडली तर आहेच.
धन्यवाद.
काय भाव खाता?
हा हा हा........बिपिनदा लेखन हा माझा प्रांत नाही म्हनुन!!!!!!
9 Sep 2013 - 11:56 am | भ ट क्या खे ड वा ला
पुढचा प्रवास जोडीने (येडीच्या) करा आणि लिहा ,लेखन थांबवू नका.