आमची पहिली परदेशवारी....७
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
भाग-५ http://www.misalpav.com/node/13495
भाग-६ http://www.misalpav.com/node/13529
भाग-७ http://www.misalpav.com/node/13578
नमस्कार मंडळी,
ब्राझीलला येऊन एक-दीड महिना उलटून गेला. बर्यापैकी फिरून झालेले परंतु खाण्याची खूपच आबाळ होत होती. तसे एडी नवीन-नवीन पदार्थ बनवायची पण ते सगळे त्यांच्या पद्धतीने. मला बऱ्यापैकी तिखट खायची सवय असल्याने माझ्या जिभेची चव गेली होती खरतर आता मी ते मिळमिळीत जेवण जेऊन पूर्ण वैतागलो होतो. नाश्त्याला ब्रेड ,कुकीज,टोस्ट, केक,बिस्कीट असले पदार्थ. जेवणात नुडल्स,फ्राईड राइस,मिरची न वापरून केलेले ते चिकन असले पदार्थ असायचे. वेगवेगळ्या पालेभाज्या त्याही अर्ध-कच्च्या केवळ एवढ्यासाठी मला कधी एकदा भारतात परत जाईल असे झाले होते.सकाळी उठून एडीला बरोबर घेऊन सुपरमार्केट गाठले. कसलेतरी पीठ मिळाले बहुतेक मैदा असावा ते घेतले, साबुदाणा हि सापडला, शेंगदाणे,जाडे हरबरे,लवंग, मिरी, तमालपत्र असे जे मसाल्याचे पदार्थ मिळाले ते घेतले.पण लाल तिखट काही मिळाले नाही. एक लाल तिखट असलेली पुडी मला सापडली पण एडी म्हणाली तो लाल कलर आहे, तरीही खात्री वाटेना म्हणून तेही घेतले. बाकी रवा तूप आणि बरेच काही म्हणजे काही मिळाले नाही.भाज्यांच्या विभागात भेंडी, गवार ,भोपळा ,वांगी, बटाटे,कांदे, कोथिंबीर,आले,लसून अशी खरेदी झाली.हिरव्या मिरच्या काही मिळेनात. दुसर्या एका मॉल मधेही शोधले हिरव्या मिरच्या मिळेनात.तेथे एक छोटीशी मंडई होती तिथे खूप शोधल्यावर हिरव्या मिरच्या सापडल्या. एडीने चिकन, मासे,अंडी घेतले आणि घरी परतलो.होय आज मी स्वतः: काही बनवण्याचा विचार केला होता, पर्यायच नव्हता म्हणाना.एडीने बटाटा, कांदे,टोमातो,भेंडी,आले,कोथिंबीर,मिरच्या,लसून योग्य प्रमाणात कापून घेतले.माझ्या दिग्दर्शनाखाली कामाला सुरवात झाली.कढई मध्ये तेल टाकले ते थोडेशे गरम झाल्यावर त्यात मिरच्या,लसून आणि आले परतून घेतले, जरा वेळाने कांदा घालून चांगला सोनेरी रंग येऊ दिला, मग टोमातो टाकून परतले,ते सर्व एकजीव झाल्यावर त्यात बटाटे टाकून परतले आणि त्यावर झाकण ठेवले.२-३ मिनिटांनी त्यात थोडेसे पाणी टाकले ,चवीप्रमाणे मीठ घातले.मंद आचेवर ठेवले. तोपर्यंत दुसर्या स्टोव्ह वरती भात आणि वालाची उसळ एडीने केली (येथे वरण हा प्रकार नाही).अशाच प्रकारे थोडी भेंडी आणि चिकन बनवले. माझ्यासाठी मिरची वापरून आणि एडीसाठी बिनमिरचीचे.एवढे सगळे झाल्यावर गिट्सचे गुलाबजामून त्यावरील सूचनेप्रमाणे वाचून बनवले ,हे मी बरोबर नेले होते. आता मी गुलाबजामून खाणार मग एडीनेही तिच्यासाठी आपल्याकडे खीर असते तसा काहीसा पदार्थ तयार केला. आमच्यात जणू स्पर्धाच सुरु होती.आता आम्ही चपाती बनवण्याचे काम हाती घेतले. मला भाजी बनवण्याचा थोडातरी पूर्वानुभव होता परंतु चपाती पहिल्यांदाच. एडीला चपाती काय प्रकार आहे तेच माहित नव्हते तरीही चपाती बनवण्याची तिची तयारी होती. पीठ तिनेच मळले त्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागली. एकदाचे जमले आणि नवीनच प्रश्न पुढे आला.ब्राझीलमध्ये कसले आलेय लाटणे. मग तिनेच एक छोटीशी काचेची बाटली शोधून काढली आणि लाटायला सुरवात केली मी भाजण्याचे काम हाती घेतले.पापड तळले आणि शेवटी या सर्वाचा फडशा पाडला. इकडे आल्यापासून आज प्रथमच माझे पोट भरले होते. शेवटी आपले खाणे ते आपलेच. तिने बनवलेल्या मोसंबी आणि सफरचंद ज्युसचा आस्वाद घेऊन आमच्या या खादाडीची सांगता झाली.माझे कुठलेहि पदार्थ एडीने कधीही खाल्ले नाहीत अपवाद फक्त गुलाबजामून आणि पापड. गुलाबजामून तर तिला इतके आवडले कि माझ्या वाट्यालाही येत नसत. असो.खालील फोटो पाहून तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल. अर्थातच 'हसना मना हैं'.
******************
दुपारी बाहेर पडलो. आणि तडक 'पेद्रो दि सिबोला' हे पार्क गाठले. विटोरीयाच्या विमानतळाजवळ असलेले हे एक सुंदर पार्क आहे.सिबोला= कांदा ,पार्कमध्ये एक मोठासा दगड आहे त्याचा आकार काहीसा कांद्यासारखा दिसतो म्हणून हे नाव देण्यात आलेय. येथील फोटो मध्ये ते तुम्ही पाहू शकता पण जालावर जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला याची प्रचीती येईल. मला फोटोग्राफीचे फारसे ज्ञान नसल्याने मला तसे फोटो काढता आलेले नाहीत. पार्कमध्ये गेल्यावर डाव्या बाजूलाच कोंबड्या ,शेळ्या,माकडे, गाई ,ससे असे अनेक प्राण्यांचे दर्शन झाले जे मला या शहरात कधीही झाले नाही.थोडेसे पुढे लहानसा तलाव आणि त्यामध्ये बदके विहार करत होती. आजूबाजूला गर्द हिरवी झाडे आणि मध्ये स्वच्छ डामरी रस्ता. पुढे आल्यावर एक मोठेसे कारंजे ,येथे बरीच लहान मुले अंगावर उडणार्या तुषारांचा आनंद घेत होती. जवळच विमानतळ असल्याने एखादे विमान डोक्यावरून जाई आणि पुढच्याच क्षणी ते विमानलावर अलगद उतरत विसावत होते.आता जास्त काही लिहित बसत नाही हे पहा काही फोटो.
******************
नाताळ जवळ आला असल्याने आम्ही काही खरेदीसाठी मॉलमध्ये आलो. एरव्ही विशेष गर्दी नसलेला हा भव्य मॉल तुडूंब गर्दीने गजबजून गेला होता. कुठल्याही दुकानामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध दुकानामध्ये नानाविध वस्तूंचा खच पडलेला. प्रत्येक दुकानापुढे तेथे असलेल्या सवलत आणि विविध स्कीम्सचे दर झळकत होते.लोकांचा तो उत्साह आणि भरभरून खरेदी पाहून मी अचंबित होऊन गेलो. मॉलच्या मध्यभागी तर दुमजली देखावा उभारण्यात आला होता. सांताक्लौज लहान मुलांना खेळणी आणि चोकोलेत वाटत असल्याने तेथे लहान मुलांचा गराडा पडलेला दिसला. वेगवेगळे हलते पुतळे वापरून केलेला तो देखावा अप्रतिम असाच होता.फोटो पाहून तुम्हालाही त्याचा अंदाज येईल.तिकडेही रीण काढून सण करण्याची पद्धत आहे हि नवीनच माहिती मला एडीने पुरवली.एडीने तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही कपडे ,काही मिठाई खरेदी केली.रस्त्याच्या बाजूची झाडे रंगीबेरंगी दीपमाळा वापरून कलात्मक रीत्या सजवण्यात आलेली होती.आम्ही ज्या पार्कमध्ये शतपावली करायचो तेही रोषनाईने उजळून निघाले होते. एकंदरीत पूर्ण ब्राझील नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज झालेले होते.
************
आमची ओळख झाल्यावर एडीने इंग्रजीची शिकवणी लावली होती.दर सोमवारी सायंकाळी ती ७-९ अशी वेळ असे. तेथील शिक्षक पाचेको आणि विद्यार्थी मोनिका,वाल्डीनिया,डोमिनिक, जायरो आणि गुस्ताव या सर्वाना मला पाहण्याची इच्छा होती. मला त्यांच्या वर्गात बसण्याची विशेष परवानगी देण्यात आली.विस्डम क्लासेस च्या एका वर्गात फक्त ६ विद्यार्थी आणि आता मी सातवा. आम्ही क्लास मध्ये आल्यावर एडीने माझी ओळख करून दिली.क्लास सुरु झाला.हे सर्व जन नोकरी करणारे होते. जायरो तर सोफ्तवेयर इंजीनियर पण त्याला सोप्या शब्दांचे साधे स्पेलिंग सांगता येत नव्हते.आज क्लास ८:३० ला संपवण्यात आला आणि आता मला भारताबद्दल प्रश्न विचारण्यात आले. वाल्डीनिया हिने तर तिथे एवढे साप आहेत आणि तुम्ही लोक त्यांच्या सानिध्यात कसे राहू शकता असा अजब सवाल केला.त्यांना भारताचे नाव सोडून काहीही माहिती नव्हती.माहिती नसली तर चालेल पण बरेच गैरसमजही होते. मोनिकाने तर एडीला एक वीदिओ पाठवला होता त्यात एक हकीम फुटपाथला एका स्त्रीचा दात काढतो आहे अगदी साधी पक्कड वापरून. येथील उच्च शिक्षणही पोर्तुगीज मध्ये असल्याने डॉक्टर,इंजीनियरलाही इंग्रजी बोलता येत नाही.बोलणे तर दूर समजत सुद्धा नाही.मग मी त्यांना भारतात जवळपास ३५० बोली भाषा वापरल्या जातात असे सांगितले.वेगवेळ्या जातीधर्माचे लोक एकत्र आनदाने राहतात अशी काही प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या आजच्या अभ्यासात NEWS हा शब्द होता.त्याची फोड करून N=NORTH,E=EAST,W=WEST,S=SOUTH असा हा शब्द तयार झाल्याचे सांगितले. मी कुठेतरी वाचले होते खरे-खोटे मला माहित नाही पण ठोकून दिले.या माझ्या अगाध ज्ञानावर तर पाचेकोही चकित झाला.मला त्यांनी त्यांची सर्वांची नावे मराठीत फळ्यावर लिहायला सांगितली.असेच पुढे २-३ वेळा मी तेथे अर्ध्या तासाचे लेक्चर घेतले.आणि शाळेतील शिक्षकदिना नंतर सरळ दुसरे व्याख्यान ब्राझीलमध्ये दिले.
*****************
येथून आम्ही कम्बुरी बीचवर पोहोचलो.येथे संध्याकाळी खाद्यजत्रा भरते.चायनीज,केक ,पेस्ट्रीज,आईस्क्रीम,ज्यूस आणि तिकडील निरनिराळे खाद्यपदार्थ यांची छोटी-छोटी टपरीवजा स्टोल्स आणि दुसरया बाजूस भेटवस्तू , कागदी फुले ,गृह सजावटीसाठी लागणाऱ्या लहानसहान वस्तू आणि स्रियांसाठी चाफ,आणि दैनंदिन वापरासाठी लागणार्या वस्तूंची आकर्षक मांडणी केलेली दुकाने.लहान मुलांसाठी विविध खेळ. येथे मला दोन मुले अंगाला चांदीचा रंग लावून उभी असलेली पाहायला मिळाली. एकाने परीचा अवतार धारण केला होता. तो हात जोडून शांतपणे उभा होता.दुसरा थोडासा रोबोसारखी हालचाल करून लोकांची ,विषेत: लहान मुलांची करमणूक करत होता.एखादे लहान मुल त्याला पैसे द्यायला जवळ आले कि तो खाली वाकून त्याच्याकडील पैसे घ्यायचा त्याचवेळेला त्याने अंगावर बसवलेल्या मशीनमधून विचित्र असा आवाज यायचा आणि ते लहान मुल भांबावून जायचे. जरा मोठी मुले आल्यावर तो पैसे घेताना पटकन कोठूनतरी छोटेसे कार्ड काढायचा त्यामध्ये भविष्य लीहिलेले असायचे.पैसे कमावण्याचा त्यांचा अनोखा मार्ग मला आवडला.पुढे चायनीज याकुसोबा खाऊन आम्ही फिरत असताना मला गांधीजी परत एकदा भेटले.मी तर त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतला. पुढे एका दुकानात कुत्र्यांसाठी कपडे होते ,तेथेही बरीच गर्दी होती. आणखी पुढे तर मला एक अगरबत्तीवाला दिसला त्याच्याकडे सर्व भारतीय अगरबत्ती होत्या. सत्यसाई यांच्या फोटोसहित.पुढे बरेचदा आम्ही त्या माणसाला भेटत असू.
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 12:40 pm | सहज
हाही भाग उत्तम.
5 Aug 2010 - 12:53 pm | नगरीनिरंजन
लै मजा केली की राव तुम्ही.
लेखन खूपच चांगलं होत चालले आहे. लगे रहो.
5 Aug 2010 - 1:00 pm | गणपा
मस्तचं :)
5 Aug 2010 - 1:18 pm | नेत्रेश
कुणी असे साहस कधी करु शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जात होते. खरे सांगयचे तर, फोटो नसते तर तुमच्या या सफरीच्या वर्णनावर विश्वासही बसला नसता.
आधी बरेच जणांनी सांगितलेले परत लिहीण्याचा मोह आवरत नाही..."विलासराव, तुसी ग्रेट हो| तोहफा कुबुल करो|"
++++++++++++++++++++++++++++++++++++++++
NEWS <= (N=NORTH,E=EAST,W=WEST,S=SOUTH) = ज्ञानात भर पडली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++
5 Aug 2010 - 1:22 pm | सहज
विलासरावांच्या मुशाफिरीवर एक उत्तम सिनेमा, मालीका बनु शकते. हिरो, हिरॉइन, परदेश, उच्च लोकेशन्स, एडव्हेंचर....... सगळे काही आहे कथेत! एकदम हटके!
5 Aug 2010 - 1:24 pm | विलासराव
ग्रेट वगैरे काही नाही हो.
पण तरिहि तोहफा कुबुल सरकार!!!!!!!
5 Aug 2010 - 1:53 pm | पक्या
सुरेख वर्णन. फोटोज ही मस्त.
5 Aug 2010 - 2:01 pm | समंजस
हा भाग सुद्धा एकदम मस्त!!
[अवांतरः विशेष माहिती नसताना सुद्धा ठोकून देणे हे आपलं खास भारतिय वैशिष्टय तिथे सुद्धा जपल्या बद्दल अभिनंदन :) आणि ब्राझील मधे जाउन शिकवणी देल्या बद्दल परत अभिनंदन :) ]
5 Aug 2010 - 3:47 pm | योगी९००
मस्त मजा आली वाचून्..
सुरवातीला वाटत होते की चुकून पाककृतीतला लेख तर वाचत नाही ना..पण नंतर मात्र मजा आली..
एडी कोठेच बरोबर दिसली नाही फोटोत..तिचा पण फोटो टाका..!!!
5 Aug 2010 - 5:55 pm | रेवती
वाचतीये.
पदार्थ चांगले बनवलेले दिसताहेत.
फोटो आवडले.
5 Aug 2010 - 7:27 pm | मीनल
लेखन अगदी सहजतेने केलेले आहे. म्हणून वाचनीय आहे.
5 Aug 2010 - 7:58 pm | प्रभो
मस्त!!
5 Aug 2010 - 10:33 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय... विशेषतः ठोकून देणे हि प्रथा परदेशात जाऊनसुद्धा पाळल्याबद्दल अभिनंदन. :-)
पुढचा भाग येऊ द्या.
5 Aug 2010 - 11:39 pm | पुष्करिणी
हाही भाग मस्तच झालाय. ग्रेट आहात, एक्दम साग्रसंगित बरेच पदार्थ पण बनवलेत.
11 Jul 2024 - 7:52 am | चित्रगुप्त
ही लेखमाला प्रकाशित होऊन येवढी वर्षे उलटून गेल्यावर आज मी प्रथमच वाचतो आहे. खूपच रोचक आहे.