नाईलच्या देशात - ५: कैरोतली मुशाफिरी

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
10 Jun 2010 - 8:09 pm

"आमच्या पाहुण्यांना आम्ही उत्तम व अस्सल चिजा देण्याचा प्रयत्न सातत्याने करतो. मग ते अत्तर असो वा पॅपायरस चित्रकला. खेदाची गोष्ट म्हणजे अनेक लुच्चे विक्रेते वा दलाल पैशासाठी परदेशी पाहुण्यांना नकली वस्तू विकुन फसवतात. मात्र मी तुम्हाला अगदी खात्रीच्या दुकानात नेणार आहे जिथे तुमची फसवणुक न होता तुम्हाला अस्सल कला पाहावयास मिळेल. अत्तर व पॅपायरस चित्रे पाहिली नाहीत तर तुम्ही इजिप्त पाहिला नाहीत असे म्हणावे लागेल" इति अहमद. जगात कुणावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. किंवा खरं सांगायच तर 'धुळवडीच्या दिवशी अंगाला थोडा तरी रंग लागलाच पाहिजे' या चालीवर मी म्हणेन की कुठे प्रवासाला गेलं की थोडी फसवणूक करुन घेतलीच पाहिजे आणि एकतरी वस्तू निरुपयोगी आहे हे ठाम माहित असताना देखिल घेतलीच पाहिजे. (हिच्यासाठी पैचिंगच्या पाचू प्रदर्शनालय/ उत्पादन केंद्रातुन आणलेलं पाचूचं पदक आणि जिच्याकडे इथे नुसत पाहिलं तरी घाम फुटतो अशी रेशमी रजई. असो.)

आम्ही अत्तराच्या प्रशस्त दुकानात दाखल झालो. अर्थातच मालक व अहमद एकमेकांच्या ओळखीचे होते. एकमेकांना अभिवादन करत आम्ही आत शिरलो. रणरणत्या उन्हात तापलेल्या गाडीतुन थंडगार दुकानात शिरताच आम्ही सुखावलो. मालकांनी आमचे तोंड भरुन स्वागत केले. संपूर्ण दुकानात सर्व भिंतींवर काचेची कपाटे व त्यात नाना प्रकारच्य नक्षिदार कुप्या व अनेक आकारातल्या अत्तराने भरलेल्या बाटल्या हे दृश्य मोहक होते. मालकाच्या ताब्यात देऊन अहमदमियॉं "आपण आरामात अत्तरांचा आस्वाद घ्या, मी बाहेर आराम करतो" असे म्हणुन मालकवर्गापैकी दुसऱ्या एका बरोबर बाहेरच्या दालनात गेले. आमचा ताबा तरुण मालकद्वयीने घेतला. मी त्यांनी अत्तरपुराण सुरू करायच्या आंत शितफीने त्यांना अडवले व प्रसाधनगृहाची विचारणा केली. वाळुचा सडकुन खाल्लेला मारा आता त्या भूमीपासून दूर येताच प्रकर्षाने जाणवत होता. अंघोळ शक्य नसली तरी चेहरा स्वच्छ धुणे व केस विंचरणे अत्यावश्यक होते. ’स्वच्छतागृह’हे नावाला साजेसे व प्रशस्त होते. आम्ही ताजेतवाने होऊन स्थानापन्न होताच आग्रही विचारणा झाली, ’काय घेणार? इजिप्तचा चहा, कॉफी की कोक?’ इजिप्तच्या कॉफी विषयी ऐकुन होतो. काल रात्री झालेला पोपट लक्षात घेता मी ’कॉफी तुमच्या पद्धतिची असेल तर निश्चितच आवडेल’ असे सांगितले. ’अलबत! अगदी अस्सल दाट इजिप्ती कॉफी, पिऊन तर पाहा" असे म्हणत त्याने कॉफी मागवली व आतुन क्षणांत इवल्याश्या कप बशा समोरच्या मेजावर आल्या. पाठोपाठ तुपाच्या तांबलीसारख्या पण दांडी असलेल्या स्टीलच्या भांड्यातुन मस्त खमंग वासाची दरवळणारी कॉफी आली.
...

’इजिप्तची अत्तर बनविण्याची कला फार पुरातन व गुप्त. ही विद्या वंशपरंपरागत आलेली. इजिप्तची ही परंपरागत अत्तरे पाश्चिमात्य अत्तरागत फवारणीची वा उडुन जाणारी नसतात कारण ती तैल असून त्यांचा मंद गंध दिर्घकाळ दरवळतो. माहिती देता देता सेवकवर्ग एकापाठोपाठ एक अत्तराचे बाटले/ कुप्या घेऊन येत होते. मालक आग्रहाने आम्हाला माहिती देता देता प्रत्येक अत्तर थोडेसे लावुन घ्यायला सांगत होते. खास स्त्रियांची अत्तरं, फक्त पुरूषांसाठीची अत्तरं, समाईक वापराची अत्तर, एक ना अनेक. बरे अत्तरे केवळ गंधासाठी नसुन त्यांचा उपयोग वातावरण निर्मिती, थकवा दूर करणे, डोकेदुखी पासुन आराम, चित्त उल्हासित करणे, असे अनेक असल्याचे समजले. खरेतर मला अत्तर वा कृत्रिम सुगंधाचा फारशा षौक नाही. पण इथली काही अत्तरे खरोखरच मंद सुगंधाने दरवळणारी भासली. ह्या अत्तरांचे फाये बनवायचे नाहीत, तर हाताला व कानाखाली मानेला किंचित लावायची असतात हे ज्ञान मिळाले. अत्तरे नुसती लावण्याखेरीज दोन थोंब अंघोळीच्या पाण्यात टाकुन अंघोळ करायची कल्पना मला फारच भावली. दुसरा तर नवाबी शौक! नाजुक काचपात्रात थोडे पाणी घेऊन त्यावर चार थेंब अत्तर टाकायचे आणि खाली वात लावायची, सर्वत्र मंद प्रकाशाबरोबर मंद सुगंधही पसरतो हे ऐकुन मी मोहरुन गेलो. अत्तरांचे सुगंध तरी किती. नाना फुलांच्या नावांबरोबरच ’सिक्रेट्स ऑफ डेझर्ट’ सारखी नावेही होती. अखेर महिलावर्गासाठी गुलाब, पुरुष मंडळींकरता पॅपायरस व तिथले वशिष्ठ्य म्हणुन कमळाचे अत्तर अशी निवड केली. अर्थात थोडी घासाघीसही झालीच मग नेहेमीप्रमाणे ’ही अस्सल चीज आहे, स्वस्तात देणे शक्य नाही; बाजारात अशीच हुबेहुब दिसणारी नकली अत्तरे मिळतात व ती नकली असतात म्हणुन स्वस्तात विकली जातात. एकदा आलात तर कायमची आठवण म्हणुन न्यायची तर अस्सल वस्तू न्या, मला दोन पैसे नाही मिळाले तरी बेहेत्तर’ असे म्हणत अखेर भाव ठरले. हे विक्रेते भावनेला हात घालण्यांत मोठे हुषार. चीनमध्ये एका तांब्याची भांडी रंगकाम, नक्षीकाम व सुवर्णविलेपन करुन विकणाऱ्या कारखान्यात विक्रेतीचे काम करणाऱ्या मुलीने मला असेच निरुत्तर केले होते. प्रवासी भाव पाडुन मागु लागताच त्या मुलीने आवाहन केले ’तुम्ही पर्यटक तर मजा करायलाच घराबाहेर पडला आहात, आनंदासाठी दोन पैसे खर्च करणे तुम्हाला सहज शक्य आहे; तुम्ही भाग्यवान आहात. मात्र मी इथे पगारी नोकर आहे, मला किमतीच्या मर्यादा पाळाव्याच लागतात नपेक्षा अधिक सवलत दिली गेल्यास ते पैसे माझ्या पगारातुन कापले जातील!’ कुणी पोटाचा निर्वाळा दिला की पर्यटक काय घासाघीस करणार? येणारे पर्यटक भाव करणार हे समजुन भाव थोडे चढेच सांगितले जातात व नंतर सवलत दिली जाते. मात्र विनाकारण किंमत पाडायची गरज नाही, पर्यटक काही झाले तर ’पुन्हा कशाला इथे येतोय? आलोच आहोत तर काहीतरी आठवण घेऊन जाउ’ असे म्हणत काही ना काही नेणारच हे विक्रेत्यांना ठाऊक असते. ती तीन अत्तरे आम्ही बाटल्यांमध्ये घेतली व बरोबर परत गेल्यावर मित्रमंडळी, नातेवाईक, कचेरीतले सहकारी यांना भेट म्हणून ते भरुन देण्यासाठी छोट्या विविध आकाराच्या कुप्याही घेतल्या.
.

घरपर्यंत त्या नाजुक वस्तु सुखरूप पोचाव्यात म्हणुन मालकानी त्या नाजुक कुप्या भरपूर कापसात लपेटुन मग छोट्या खोक्यात भरून वर चिकट्पट्ट्यांनी बंद करुन दिल्या. आमचा सुगंधी टप्पा संपला.

टळटळीत दुपार झाली होती, पोटात कावळे कोकलु लागले होते. बाबा रे, ’जेवायचे काय’ असे अहमदाला विचारायच्या आधीच तो म्हणाला, ’जेवायचे हॉटेल जरा दूर आहे, इथे तशी बरी हॉटेल्स नाहीत (असतील ती एकदम पंचताराकित असावीत वा स्थानिक असावीत). बाजारहाट हे सदर संपवून संग्रहालय पाहायला जाताना वाटेत पडेल असे हॉटेल ठरलेले असावे. बव्हंशी सर्व हॉटेलांची तऱ्हा साधारण सारखीच. प्रथम स्वागतपेय म्हणुन बियर वा डबाबंद शीतपेय वा फळाचा रस, मग स्वयंसेव्य भोजन मग आइस्क्रिम/ फळं. आम्ही रस्ते, चौक, गल्ल्या पार करीत असताना अचानक आमच्या भुकेल्या नजरेला एक अद्भुत दृश्य दिसले. अरुंद गल्लीतुन मंदगतीने, सावधतेने मार्ग काढताना आम्हाला रस्त्याच्या कडेला एका भटारखान्यातुन टमटमीत रोट्या घेउन उतरणारा एक मनुष्य दिसला. भुकेल्या पोटी व तेही जेवायची वेळ टळुन जात असताना असे दृश्य म्हणजे विश्वामित्रासमोर मेनका. आम्ही तात्काळ अहमदला गाडी थांबवायला सांगितली. आम्हाला खबुस खायचे आहेत हे लक्षात येताच तो स्वतः उतरला. मात्र ’तुम्ही बसा’ असे तो म्हणत असतानाही आम्ही उतरलोच. सर्व दर्शनात एक भटारखानाही होऊन जाउ दे! आम्ही आधाशागत तो गरमागरम रवाळ असा खबुस खायला सुरुवात केली, अर्धा संपतो न संपतो तोवर गाडी एका पॅपायरास कलादालनासमोर उभी राहीली.

’फॅरॉनिक पॅपायरस म्युझियम’. घाईघाईने खबुस संपवत आम्ही त्या दुकानात शिरलो. स्वागताला डब्ल्यु डब्ल्यु ई मधल्या बॅटिस्टा सारखा दिसणारा गोरा, उंचनिंच मालक सामोरा आला. त्यानेही ’तुमच्या दुसऱ्या घरात तुमचे स्वागत असो’ असे म्हणत आमचे स्वागत केले. मग काय घेणार अशी पृच्छा झाली आणि आम्ही दुकानातल्या कलाकृती पाहत असतानाच गरमा गरम चहा आला. मग आम्ही समोरच्या मेजावर जमा झालो. दुकानदाराने पॅपायरसचे झुडुपच आणुन दाखवले.

पॅपायरस ही पाण्यातली वनस्पती. पाती गवतासारखी मात्र खोड पातळ आणि अगदी केळी वा कर्दळी सारखे. मग मालकाने आम्हाला त्या खोडाचे मोठे उभे तुकडे करुन पॅपायरस पत्र बनवायची कृति दाखवली.
खोडाच्या उभ्या तुकड्यांच्या पातळ कापट्या काढायच्या, त्या एक उभी तर एक अडवी अशा झापा विणल्यागत ठेवत जायच्या, मग वरुन त्यावर तलम कापड घालुन, त्यावर दाब देउन त्यातला सगळा जलांश काढुन घ्यायचा आणि दडपणासाठी वर वजन ठेवायचे. दोनेक दिवसात भुर्जापत्रागत पॅपायरसपत्र तयार.

मग त्यांनी आम्हाला अस्सल पॅपायरस व नकली पॅपायरस जे केळी वा तत्सम झाडापासून बनते; ते कसे ओळखायचे वगैरे समजावले. अर्थातच त्याच्या कलादालनातील सर्व कलाकृती ह्या अस्सल असल्यची ग्वाही त्याने दिली. आपल्याला पॅपायरस मधले कितपत समजते वा चित्र पॅपायरस ऐवजी अन्य पत्रावर असले तर काय बिघडते हे वेगळे.

तिथे प्रदर्शित केलेल्या सर्वच कलाकृति सुंदर होत्या. अनेक राजे, राण्या, पौराणिक दृश्ये/ प्रसंग, प्राचिन इजिप्ती संस्कृतितील कथानके वा व्यक्तिमत्वे इत्यादीवर तसेच अनेक शकुन, अपशकुन, बोधचिन्हे वा सूचक चिन्हे यावर आधारित अशा त्या कलाकृती होत्या. ती शैली, पॅपायरस वर काढल्यामुळे कागदावरील/ कॅनव्हासवरील पेक्षा आलेला वेगळाच परिणाम, ते उजळ रंग व रंगसंगती य सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणुन चित्रे फारच मोहक दिसत होती. अगदी ४ फूट उंच व ६ फूट रुंद अशा चित्रांपासून ते सहा इंच रुंद व चार इंच उंच अशा चिमुकल्या आकारपर्यंत असंख्य चित्रे होती. अचानक लक्षात आले की चिरंजीव शेजारी नाहीत. जरा शोध घेताच चिरंजीव पलिकडच्या भागात चित्रे निरखताना दिसले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. शाळेत चित्रकला या विषयात उत्तिर्ण होण्यासाठी वहीत काढाव्या लागत असेलेल्या चित्रांची किमान संख्या भरण्यासाठी प्रत्येक नातेवाइकाला वेठीस धरणारे चिरंजीव चित्रांचा आस्वाद घेत आहेत यावर विश्वास बसणे कठीण होते. मात्र पुढच्याच क्षणी खांबा आड उभी असलेली मालकाची सोनेरी केसांची षोडषा कन्या त्याला जातीने चित्र दाखवित असल्याचे ध्यानात आले. मग बरोबर आहे. आम्ही चित्रे पाहत असताना चित्राचा विषय, रंगसंगती, प्रतित होणारा अर्थ याबरोबरच किंमतही वाचत होतो. अखेर दोन चित्रे पसंत केली. तिकडे चिरंजीवही दोने चित्रे घेउन आले होते. एक राणीचे तर एक काळ्या मांजराचे. इथे चित्र विकत घेतले की लगेच त्यावर सोनेरी शाईने आपले नाव व दिनांक लिहुन देतात. जर राजा व राणीचे एकत्र चित्र असेल तर अर्थातच राजाच्या डोक्यावर अगदी वर कडेला विकत घेणाऱ्या कुटुंबातील पतीचे व राणीच्या डोक्यावर पत्निचे नाव लिहुन दिले जाते. नांवे अर्थातच ’हायरोग्लिफिक’ इजिप्ती चित्रलिपीत लिहिली जातात. आमचीही लिहिली गेली.

चित्रे कडक पुठ्ठ्याच्या नळकांड्यात गुंडाळी करुन भरली गेली. हसतमुख मालक व त्याच्या मुलीला टाटा करुन आम्ही निघालो. आता पटकन जेवण उरकुन संग्रहालयाकडे कूच करायचे होते.

हे ठिकाणअनुभवशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 9:38 pm | प्रियाली

शेवटच्या फोटोत तुमचे नाव लिहिलेले असेल तर हायरोग्लीफ वाचण्यासाठी रोझेटा स्टोन चुकलं रोझेटा पपायरस मिळाला. :-)

बाकी, सर्व चित्रे-फोटो उत्तम. वरच्या चित्रांत अनुबिस माणसांना हाताशी धरून घेऊन चालला आहे तशी चित्रेही पर्यटकांना नावे लिहून देतात का?

लेख सुगंधी झाला आहे. लेखमाला मस्तच.

चित्रे कृपया एका खाली एक लावा. लेख रुंदीत फारच वाढला होता. आता ठीक केला आहे.

सर्वसाक्षी's picture

10 Jun 2010 - 11:59 pm | सर्वसाक्षी

संपादनाबद्दल आभार!

चित्रे वर खली कराय्चे कसे वा एका अंगाला घेउन पुढे लेखन कसे आणायचे तेही विसरलो:)

- नावे बरोबर आहेत - बळवंत , अर्चना. आणि हो, आपण विनंती केल्यास घेतलेल्या चित्रावर नाव व तारीख घलुन देतात

साक्षी

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 10:40 pm | चतुरंग

इजिप्शियन अत्तरांच्या कुप्या काय सुंदर आणि नाजूक दिसताहेत वा!
पॅपायरस पत्र बनवण्याची कृतीही रंजक आहे.

मध्यंतरी मी शांघायला गेलो होतो त्यावेळी सिल्कचा ड्रेस असाच घासाघीस करुन घेतलेला आठवला - त्या खरेदीची सुद्धा एक वेगळी मजा असते! :)

(चित्रात तुमची नावे दिसताहेत - राजाच्या डोक्यावर 'बलवंत' आणि राणीच्या डोक्यावर 'अरुणा' किंवा 'अपर्णा' असा शब्द लिहिलेला दिसतोय.)

चतुरंग

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 10:54 pm | प्रियाली

डावीकडून उजवीकडे वाचलेत ना! ;) अर्पणा किंवा अर्चना तर नव्हे?

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 10:59 pm | चतुरंग

डावीकडून उजवीकडेच अर्थपूर्ण नाव बनले.
ह्या दुव्यावरचा तक्ता वापरला.

चतुरंग

धनंजय's picture

10 Jun 2010 - 10:54 pm | धनंजय

वर्णन आणि चित्रे मस्तच.

सहज's picture

11 Jun 2010 - 2:32 am | सहज

कॉफी, अत्तर, पॅपायरस चित्र....

सुरेख वर्णन.

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 2:50 am | शिल्पा ब

काय सुंदर चित्रे आहेत !!!...अत्तराच्या बाटल्या खूपच नाजूक...तुमचा हेवा वाटला अगदी..असेच लिखाण आणि चित्रे येऊ द्या.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रभो's picture

11 Jun 2010 - 3:21 am | प्रभो

जहबहरा साक्षीसर!!

चित्रा's picture

11 Jun 2010 - 5:39 am | चित्रा

अत्तराच्या दुकानात स्वतःच फिरून आल्यासारखे वाटले. सुंदर वर्णन.

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 10:26 am | मदनबाण

वा... उत्तर घेण्यासाठी तरी मला एकदा तिथे जाण्याची संधी मिळाली पाहिजे... ;)
लेख सुंदर आहे. :)

(सध्या मस्क अंबर या अत्तराच्या प्रेमात असलेला)...
मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

यशोधरा's picture

11 Jun 2010 - 10:34 am | यशोधरा

सुगंधी टप्पा भारी :) लेख, भाषाशैली, फोटो सारेच आवडले.
प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला आधीच्या भागांच्या लिंक्स देण्याची विनंती करते.

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2010 - 2:02 pm | स्वाती दिनेश

फार सुरेख सफर चालली आहे,
स्वाती