नाईलच्या देशात - ६: कैरो उत्तरार्ध (संग्रहालय/ खान्-ई-खलिली)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
19 Jun 2010 - 4:05 pm

नाईलच्या काठाकाठाने वस्तुसंग्रहालयाकडे जाताना आम्हाला कैरोचे एक वेगळेच रुप दिसत होते. निळिशार नाईल, रुंद रस्ते, उंच इमारती, सर्वत्र हिरवीगार झाडे. पहिल्या दर्शानात कैरोची जी सुमार शहर अशी प्रतिमा मनात रुजली होती ती आता बदलत होती. आम्ही एका झकास दिसणाऱ्या पुलावरुन नाईल ओलांडली आणि एक झोकदार वळण घेउन वस्तुसंग्रहालयाच्या दारात अवतरलो. हातात फक्त दोन तास होते. अहमद आम्हाला घेउन उतरला आणि आम्ही प्रवेश करते झालो. मात्र पहिल्या पावलालाच नाट लागली. इथे आत जाताना कॅमेरा नेण्याची परवानगी नाही, तो प्रवेशद्वाराशेजारच्या चौकीत जमा करावा लागतो. जाताना बिल्ला दाखवुन कॅमेरा ताब्यात घ्यायचा. संग्रहालया मध्ये असणारे अनेक नमुने, मानवी संस्कृतिचे अवशेष, मूर्ती, पुतळे, चित्रे, दरवाजे, हजारो वर्षे जतन केलेले राजघराण्यातले देह - ’ममीज’, मुखवटे, जवाहिर, पेटारे एक ना अनेक असंख्य वस्तू टिपायला मी उत्सुक होतो. मात्र पदरी निराशा आली.

पिकते तिथे विकत नाही वा मलयपर्वतात राहणारी भिल्लीण चंदनाची लाकडे जळणात वापरते या म्हणींचा प्रत्यय इजिप्तच्या बाबतीत आला. मुळात इथल्या जनतेला फरशी जाणीव नव्हती, राजसत्तेला जाणीव नव्हती की औदासिन्य होते की पुरातन संस्कृतिच्या अवशेषांना अनन्य साधारण महत्त्व असू शकते वा जगाच्या दृष्टिने आद्य मानवी जीवन व जीवनमानाचे पुरावे हे अमोल आहेत हे कुणालाच माहित नव्हते कोण जाणे. मात्र कैरो संग्रहलयच नव्हे तर पुढे अनेक प्राचिन वास्तु पाहताना वारंवार जाणवले की बहुतेक संशोधन हे बाहेरच्या संशोधकांनी केले आहे इतकेच नव्हे तर उशीराने का असेना पण इजिप्त शासनाला जाग येइपर्यंत या प्राचिन व आद्य मानवी संस्कृतिचे बहुसंख्य अवशेष हे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी अनेक देशातील संग्रहालये भूषवित आहेत. अनेक राज्यकर्त्यांनी गाफिलपणे, अज्ञानाने वा किंकर्तव्यबुद्धिने अनेक अप्रतिम वस्तु, पुतळे मुक्तपणे भेट दिलेले आहेत वा दान केलेले आहेत. दुर्दैवाने एखाद्या मंदिराच्या दर्शनीभागात डाव्या हाताला एखादा रेखिव पुतळा असावा आणि उजवीकडे रिकामे जोते असावे व मग समजावे की तिथेही अगदे डावीकडे आहे तसाच पुतळा होता मात्र आता तो अमुक एक देशात आहे. अनेक अप्रतिम वास्तुंमध्ये काळाच्या नजरेआड झालेल्या वा वाळुत गाडल्या गेलेल्या त्या वास्तु पश्चिमात्य संशोधकांनी शोधुन काढुन, अभ्यास करुन त्या वास्तुंमध्ये आपले नाव व संशोधनाची तारीखही कोरलेली आढळली. मुळात इजिप्तची प्राचिन मानवी संस्कृति अगदी अठराव्या शतकापासुनच पाश्चिमात्य देशातील अनेक प्राचविद्या अभ्यासकांना आकर्षित करु लागली होती. जसजशा प्राचिन वस्तु सापडत गेल्या तसतशी या संशोधकांची व देशांची तृष्णा अधिकाधिक तीव्र होत गेली, संशोधक येत राहीले आणि अमुल्य ठेवा म्हणाव्यात अशा असंख्य वस्तु तुरिन, पॅरिस, लंडन व बर्लिन आदी शहरांतील संग्रहालयात जमा होत राहिल्या. मात्र १८३० मध्ये चॅम्पोलिअन स्कूलच्या एका विद्वानाने तत्कालिन पाशा मुह्म्मद अलि याला या वस्तूंचे मोल समजावुन त्याला अशा सर्व वस्तू एकत्रित आणुन त्या सुरक्षित व जतन करण्यासाठी खास यंत्रणा निर्माण करण्याचा सल्ला दिला व अखेर एझ्बेकिया तलावाकाठी एक छोटेखानी संग्रहालय उभे राहिले. पुढे ते कैरोमध्ये स्थलांतरित झाले, मात्र त्याचा आवाका फारसा नव्हता. सुरुवातीला सगळ्या वस्तुंची व्याप्ती केवळ एका दालनापुरती मर्यादित होती.मात्र १८५५ मध्ये ऑस्ट्रियाचा आर्कड्युक मॅक्झिमिलिअन याने आपल्या कैरो भेटीत पाशा अब्बास याला काही वस्तु देण्याची गळ घातली आणि दिलदार पाशाने त्या दालनातल्या सर्व वस्तू त्याला देउन टाकल्या! आणि अशा तऱ्हेने इजिप्तच्या प्राचिन वस्तुंचे पहिले संग्रहालय व्हिएन्ना येथे स्थपन झाले. सुदैवाने १ जुन १९५८ रोजी लुव्र संग्रहलयाने तेथील एका संचालकाला - ’ऑगस्ट मॅरियट’ याला इजिप्तच्या प्राचिन वस्तु हस्तगत करण्यासाठी इजिप्तला नियुक्त केला. तेथे लवकरच त्याची नियुक्ती ’प्राच्य उत्खनन संचालक’ म्हणुन झाली. तो सहकुटुंब इजिप्तमध्ये राहु लागला. त्याने पुरातन वस्तु जतन कार्यक्रमा अंतर्गत कैरो जवळच्या बौलक बंदरानजिकच्या नदी नौकानयन कंपनीचे मुख्यालय ताब्यात घेण्याची परवनगी मिळवली. तिथे त्याने मध्य पूर्वेतील सर्वप्रथम ’राष्ट्रिय वस्तुसंग्रहालय’ अधिकृत रित्या स्थापन केले. त्याचे औपचारीक उद्घाटन दिनांक १८ ऑक्टोबर १८६३ रोजी झाले. पुढे ते १८९१ साली गिझा पॅलेस येथे तर १९०२ मध्ये कैरो येथे म्हणजे सध्या आहे तेथे स्थलांतरित केले गेले.

अहमदचा इथे बराच राबता असावा हे त्याच्या वावरण्यावरुन सहज लक्षात येत होते.आमच्यासारखे अनेक पर्यटक तिथे होते. साहजिकच मोठा घोळका आला की गर्दी व त्या सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात त्यांच्या म्होरक्याचे माहिती देणे हा उपद्रव होता खरा. मात्र अशा वेळी अहमद आम्हाला पुढच्या दालनात नेत असे व तो लोंढा पुढे सरकला की आम्ही पुन्हा अलिकडे जात असू. कालमानानुसार अनेक वस्तु, पुतळे व मूर्ती इथे जतन करुन ठेवल्या आहेत. निरनिराळ्या प्रकारचे दगड अहमदने आम्हाला दाखविले जे कामासाठी/ पुतळे कोरण्यासाठी वापरले गेले होते. मूर्ती पाहताना बहुतेक करुन डोळ्यांच्या जागी खाचा होत्या. मात्र बुबुळे जिथे शाबूत होती तिथे खास प्रकारच्या मौल्यवान दगडाने बनविलेली ती जिवंत भासणारी बुबुळे नजर खिळवुन ठेवत होती. सॅण्ड स्टोन, ग्रॅनाईट, डायोराईट असे नाना प्रकारचे दगड शिल्पकामासाठी वापरले गेले होते. पुतळे पाहताना अहमदने आम्हाला त्यांचे एक वौशिष्ठ्य दाखविले ते असे की पुरूष हे बाहेर उन्हात काम करात असल्याने त्यांचे पुतळे हे गेरु वा गडद रंगाचे होते तर स्त्रिया महालात उन्हापासुन सुरक्षित वातावरणात असल्याने स्त्रियांचे पुतळे पांढरे केले होते. मृत्यु नंतरचे जीवन हे खरे चिरंतन या भावनेतुन व श्रद्धेतुन मृतदेहाचे मंदिर आणि त्या मृतात्म्यासोबत त्याला भावी दिर्घ आयुष्यासाठी लागणारी साधने व संपत्ती मृतदेहाबरोबर सामावली जाऊ लागली. त्या ऐश्वर्याचे नमुने थक्क करणारे होते. ज्या काळात आधुनिक तंत्रज्ञान नव्हते, अभियांत्रिकी शास्त्र विकसित झालेले नव्हते, यंत्रसामुग्री नव्हती त्या काळात निर्माण केल्या गेलेल्या वास्तु त्यांचे सौंदर्य व भव्यता या दोन्हींसाठी आजही थक्क करतात. केवळ स्थापत्यच नव्हे तर शास्त्र, वैद्यक, धातुशास्त्र, वस्त्रनिर्मिती, लेखन, रंगकाम-रंगसाहित्य, ईत्यादी अनेक शास्त्रे वा कला इथे दिसुन येत होत्या. अनेक रंगीत पुतळे हे जसे सापडले तसे म्हणजे कोणतेही आधुनिक रंगकाम वा डागडुजी न करता जतन केलेले आहेत हे ऐकल्यावर चार पाच हजार वर्षांपूर्वी बनविलेले रंग जे आजही टिकुन होते त्यांच्या निर्मात्यांच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटणे स्वाभाविकच होते.

सर्वात भव्य आणि आ वासायला लावणाऱ्या वस्तु म्हणजे तुतेनखामनेच्या बरोबर पुरले गेलेले एकहुन दुसरा थोडा मोठे असे सोने व जवाहिराने मढवलेले सात पेटारे! कोरिव नक्षिकाम केलेले ते मजबुत व जडजुड लाकडी पेटारे पाहता आत संपत्ती किती असावी याची कल्पनाही करवत नाही. पेटारे कसले, त्यातला मोठा पेटारा तर एखाद्या खोलीसारखा होता. लहान पेटाऱ्यावर तुतेनखामेन शत्रुवर हल्ला चढवुन दाणादाण उडवित आहे असे दृश्य रंगविले होते. एका सोन्याचा मुलामा दिलेल्या मंदिरासारख्या दिसणाऱ्या पेटाऱ्यात ’कॅनोपिक अर्न’ म्हणजे जेव्हा मृतदेहाचे ममिकरण करण्यात येते तेव्हा देहातुन काढुन टाकलेले हृदय, काळिज, आतडी, फुफ्फुसे एत्यादी अवयव ठेवुन तोंड सीलबंद केले रांजण ठेवलेले होते. त्या सर्व अवयवांचे रक्षण करणारी ’आय्सिस’ ही अरोग्य, प्रजनन, समृद्धी इत्यादिची देवताही पुतळ्याच्या रुपात कोरलेली होती.

असंख्य वर्षांनी तुतेनखामेनचे दफनस्थान सापडले होते. नंतरच्या प्रवसात आम्ही लक्झर येथे सम्राटांच्या दरीत (व्हॅली ऑफ किंग्ज) तुतेनखामेनचे दफनस्थळ पाहिले. मात्र पिरॅमिडमधील दफन स्थळ वा गाभाऱ्याची रचना आम्हाला अहमदने समजावुन सांगितली. दफनमंदिरातील अनेक मौल्यवान वस्तु येथे प्रदर्शित केल्या होत्या. १९२२ साली दैर-अल-बेहरी येथे उत्खनन करीत असता हॉवर्ड कार्टर या इंग्रज पुरात्त्वसंशोधकास रॅमसिस सहावा याच्या दफनमंदिराखाली तुतेनखामेच्या दफनमंदिराचा शोध लागला. अनेक आक्रमणे व लुटमारीपासून तुतेनखामेनचे मृत्त्योत्तर स्मारक उत्तम अवस्थेत होते. येथे सापडलेल्या वस्तु पाहुन संशोधकांचे डोळे दिपले. गाभाऱ्यातील संपत्तिने भरलेले रांजण, एकात एक अशा तीन शवपेट्या - पैकी अगदी गाभ्यातली संपूर्ण्त: शुद्ध व भरिव सोन्याची! बाहेरच्या दोन सोन्याचा गिलावा केलेल्या लाकडी पेट्या. या पेट्या संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत. तुतेनखामेनची त्याच्या देहाच्या आकाराची पेटी पाहण्यासारखी आहे. संपूर्ण सोन्याची ही देहाकृति पेटी निळ्या, लाल व इतरही रंगांच्या मौल्यवान रत्नांनी मढवलेली असुन छातीजवळ दोन्ही हात एकमेकावर फुलीच्या आकारात घडी केलेल्या अवस्थेत असुन हातात राजदंड/ राजचिन्हे आहेत. मस्तकावरील कवच वजा शिरोभूषणाच्या मध्यभागी कपाळाच्या बरोबर वर गिधाड व नागाची राजदर्शक व देवत्व प्रतित करणारी चिन्हे आहेत. तुतेनखामेनचा हुबेहुब मूळ चेह्ऱ्याबरहुकुम बनविलेला शुद्ध सोन्याचा व निलरत्नाने मढविलेला अंतिम मुखवटाही होता. या मुखवट्यावरही मसतकावर शिरोभूषणात नाग व गिधाड कोरलेले होते. कोरलेले म्हणण्यापेक्षा मूर्तिरुपात ओतकाम करुन त्य मुखवट्यात एकजीव करण्यात आले होते. इथे सोन्याचे अनेक अलंकार होते तसेच मौल्यवान रत्नांचेही दागिने होते. रत्नांमध्ये कोरलेले अनेक चिन्हे व पशु पक्षी वा किटकही होते.

मग आम्ही शेवटच्या दालनात दाखल झालो. ज्याची कमालीची उत्सुकता होती ते ममीजचे दालन. प्राचिन इजिप्तमधील तत्कालिन समजाप्रमाणे राजघाराण्यातील व्यक्ति मृत झाल्यावर ती पुढच्या चिरंतन प्रवासाला निघते. मग या प्रवासासाठी तो देह टिकवलाच पाहिजे! यासाठी देह जतन करण्याची पद्धत विकसित झाली होती तीच ममीकरण प्रक्रिया. मृतदेहातील सर्व अंतर्गत अवयव काढुन टाकल्यावर विशिष्ठ तेले व मसाले यांचे लेपन करुन संपूर्ण देहावर कापडी पट्ट्या गुंडाळल्या जात आणि नवजात अर्भकाला जसे कपड्यात गुंडाळतात तसे मृतदेहाला लपेटले जात असे. काढलेले अवयव एका रांजणात जतन केले जात असत. हे रांजण मसाले भरुन बंद केल्यावर रांजणावर मानवाचे वा प्राण्याचे मस्तक कोरले जात असे. काचेच्या पेट्यांमध्ये असे अनेक ममीकृत देह ठेवेलेले होते. येथे तुतमॉस, ओमेनहॉटेप, रामसीस, स्युसेन्नेअस, स्मेन्ख्कारे एत्यादी घराण्यातील अनेक ममीज आहेत. अर्थातच संग्रहालयाच्या तिकिटाव्यतिरिक्त ममी दालनात प्रवेश करण्यासाठी वेगळे तिकिट घ्यावे लागते.

सगळे ऐवज पाहताना वेळ कस गेला समजलेच नाहे. अहमदने आम्हाला जाणीव करुन दिली आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर संधीप्रकाश पसरला होता, परिसरातही दिवेलागणी होत होती. अहमदने दूरवर उभी केलेली गाडी बोलावली. इथुन साधारण एक तास म्हणजे सायंकाळची वाहतूक लक्षात घेता एक तास ’खान-ई-खलिली’ बाजार. पुन्हा तिथुन अर्धा-पाऊण तासावर गिझा रेल्वे स्थानक. गाडी रात्री दहाची. म्हणजे ’खान-ई-खलिली’ बाजारात आम्हाला जेमतेम अर्धा-पाउण तास मिळणार होता. ठिक आहे. तेवढा तर तेवढा. नाहीतरी घेण्यापेक्षा तिथे फेरफटका महत्वाचा! गाडी पुन्हा एकदा नव्या कैरोचा रुबाब दाखवित पळु लागली. सुरेख रस्ते, झगमगते दिवे, भपकेबाज इमारती, अलिशान संकुले पाहत आम्ही अगदी मुंबईच्या बॅलार्ड पियर, हुतात्मा चौक वगैराचा भास व्हावा अशा भागात आलो. हा सगळा बाजारपेठ-खरेदी सदरातला भाग होता. मोठमोठुया भव्य प्रदर्शिनी, अलिशान दुकाने, झगमगाट असा एकुण कुठल्याही शहराच्या ’खरेदी परिसर’ शोभेल अशा भागात आम्ही दाखल झालो. गाडी एका गजबजलेल्या रस्त्याच्या टोकाला थांबली. अहमदने आम्हाला खाली उतरवित उजव्या हाताची उंच मिनार असलेली मशिद दाखवली. e6

बरोबर ४५ मिनिटांनी तो आम्हाला त्या मशिदीपाशी भेटणार होता. हाच तो खान-ई-खलिली बाजार!

बाहेर संपूर्ण रस्ता म्हणजे खाऊ रस्ता होता. e6

सर्वत्र उपाहारगृहे व खाण्यापिण्याच्या गाड्या, ठेले यांची रेलचेल. हातातला मर्यादित वेळ पाहता आम्ही मोह टाळत थेट बाजारात घुसलो. अहमदने आम्हाला नीट समजावले होते की आम्ही शक्यतो पोलिस चौक्यांमध्ये असलेल्या म्हणजे सुरक्षित भागातच फिरावे. पलिकडे तसाच बाजार होता, मात्र हा भाग पर्यटकांसाठी असल्याने इथे गस्त होती तर पलिकडे स्थानिकांचा गजबजाट व गर्दी असल्याने चोरी-चपाटीची शक्यता होती. e6

आतमध्ये बोळाच्या दोन्ही अंगाला अनेक लहान दुकाने होती. e6

बहुतेक दुकानातुन शोभेच्या वस्तु, स्मरणिका, पिरॅमिडच्या प्रतिकृती, स्फिंक्सच्या प्रतिकृती, चिनी मातीच्या निरनिराळी चित्रे रंगविलेल्या बशा, धातुच्या बशा/ तबके, मुखवटे, पुतळे, बोधचिन्हे, शाली विक्रीसाठी ठेवलेले होते. पिरॅमिड्स जवळ्च्या दुकानात त्याच्या प्रतिकृती महाग असणार व त्या या बाजारात स्वस्त मिळणार हे आम्ही आतापर्यंतच्या प्रवासाच्या अनुभवातुन ताडले होते. वर अहमदमियॉंना तसे विचारून खुंटा बळकट करुन घेतला होता. साहजिकच पिरॅमिड्स, स्फिंक्स, शोभेच्या ताटल्या, क्लिओपात्राचा मुखवटा, वगैरे किरकोळ खरेदी केली.

e6 e6e6e6अत्तराच्या कुप्या अत्तराच्या दुकानात न घेता इथे घेतल्या असत्या तर चार पैसे वाचले असते हे लक्षात आले. असो. एक अत्तराचा नाजूक दिवा घेतला. (पोचेपर्यंत त्याला मुक्ति मिळालेली होती ते सोडा). अर्चनाने छोट्या शालीही घेतल्या (स्टोल). इजिप्शियन नक्षीच्या व रंगसंगतीच्या शाली वजा ओढण्या झकास होत्या. घासाघीस करताना दुकानदाराने 'स्वस्त हव्या तर चीनी देतो' असे सांगितले. त्याने इजिप्तच्या शालीची वाखाणणी करताना भारताच्या काश्मिरी शालिंचीही तारिफ केली व त्याच्या दुकानात काश्मिरी शालीही असल्याचे सांगितले. अर्चनाच्या हस्तसंचाचा गजर झाला आणि आम्हाला समजले की वेळ संपत आली आहे. मग आम्ही निमूटपणे बाहेर आलो आणि ठरलेल्या जागेकडे चालु लागलो. आजुबाजुचे खाऊ राज्य नजरेआड करुन. पुन्हा एकदा कैरोचा आणखी एक भाग. आपल्या मुंबईतल्या मलबार हिल, वाळकेश्वर सारखा एकदम श्रीमंती थाटाचा. बव्हंशी निवासी भाग होता. हळुहळु गर्दी ओसरती दिसली. नाईलच्या काठाने रस्त्याच्या दिव्यांखालुन आमची मार्गक्रमणा सुरू होती. आता आम्ही मुख्य रस्ता सोडुन जरा आतल्या भागात शिरलो. कशी कुणास ठाउक, पण रेल्वे स्थानक जवळ येताच कशीतरी कुठेतरी आभासी जाणीव होते खरी, तशीच ती आताही झाली. गाडी डावे वळण घेत गिझा स्थानकात शिरली. पहिला अहमद तिथे हजर होताच. दुसऱ्या अहमदाला खुदा हाफिज करीत आम्ही पहिल्या अहमदाच्या ताब्यात गेलो. आमचे सामान मोजुन हातगाडीवर चढवुन अहमद हमालाला गाडी व डब्याचे स्थान सांगुन आम्हाला आत घेउन गेला. मुख्य कैरोच्या मानाने गिझा हे स्थानक छोटे होते. साधारण आपल्या करीरोड-चिंचपोकळीच्या धर्तीचे. सावधपणा म्हणताना आम्ही बरेच आधी येउन ठेपलो होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहत व गप्पा मारत वेळ गेला. मधे एकदा मस्त कडक इजिप्ती चहाही झाला. अखेर गाडी आली. आम्ही आणि आमचे सामान आमच्या खोलीत पोचले याची खात्री करुन अहमद निघाला, आम्ही त्याचा निरोप घेतला. लवकरच गाडी सुटली. गाडी हलताच मी कैरोला टाटा करण्यासाठी बाहेर दरवाज्यापाशी आलो. पाहतो तर काय रेल्वेच्या पुलाखाली नेहेमीचे सुपरिचित दृश्य दिसले.
e6

खरेतर कैरोचा मुक्काम दोनच दिवसांचा पण बरेच दिवस तिथे असल्यासारखे वाटत होते. गाडी वेग घेऊ लागली आणि मी आत आलो. आता वेध होते आस्वानचे.

हे ठिकाणआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Jun 2010 - 7:20 pm | सहज

कैरो संग्रहालयाचे काही फोटो येथे बघता येतील.

वाचतो आहे.

ऋषिकेश's picture

19 Jun 2010 - 10:37 pm | ऋषिकेश

छान लिहिले आहे.. छायाचित्रांपेक्षा वर्णनात्मक भाग जास्त असल्याने अधिक मजा आली.
अजून येऊ द्या
सूचना: लेखाच्या आधी/नंतर आधीच्या भागांची सुची द्यावी. एखादा वाचायचा राहिलेला भाग शोधणे सोपे होईल

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

स्वप्निल..'s picture

20 Jun 2010 - 1:57 am | स्वप्निल..

>>पिकते तिथे विकत नाही वा मलयपर्वतात राहणारी भिल्लीण चंदनाची लाकडे जळणात वापरते या म्हणींचा प्रत्यय इजिप्तच्या बाबतीत आला. मुळात इथल्या जनतेला फरशी जाणीव नव्हती, राजसत्तेला जाणीव नव्हती की औदासिन्य होते की पुरातन संस्कृतिच्या अवशेषांना अनन्य साधारण महत्त्व असू शकते वा जगाच्या दृष्टिने आद्य मानवी जीवन व जीवनमानाचे पुरावे हे अमोल आहेत हे कुणालाच माहित नव्हते कोण जाणे

हे जसच्या तसं आपल्याला पण लागू होते ..

प्रभो's picture

21 Jun 2010 - 12:21 am | प्रभो

हाही भाग मस्त!!!

धनंजय's picture

22 Jun 2010 - 1:41 am | धनंजय

वाचतो आहे. मजा येते आहे.

(आदल्या भागांचे दुवे लेखात द्यावेत - ऋषिकेशच्या सूचनेला अनुमोदन.)

प्रियाली's picture

22 Jun 2010 - 2:41 am | प्रियाली

लेखन अर्थातच आवडले. त्यामानाने, यावेळचे फोटो साधारण वाटले. (बहुधा, संग्रहालयाचे फोटो बघता न आल्याने असावे पण सहज यांच्या दुव्याने ही उणीव थोडीफार भरून निघाली.)

असो.

आस्वानचे वर्णन आणि अबु सिंबेलबद्दल वाचण्यास उत्सुक.

मदनबाण's picture

22 Jun 2010 - 10:18 am | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहत आहे. :)

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg