फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!" (Gangsters in bangles)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
ज. आरीफही C-130त बसून त्या दौर्यावर जायचे होते, पण त्यांनी न जायचे ठरविले. आरिफ यांनी झियांना १० वर्षें साथ दिली होती, कित्येक वेळा झियांना वेळ नसल्यास अशा ठिकाणी झियांच्या बदली त्यांचे नं.२ या नात्याने तेच जायचे. पण अलीकडेच त्यांना कांहींशा घाईघाईने व कसल्याही डामडौलाशिवाय सेवानिवृत्ती दिली गेली होती. म्हणून त्या १७ ऑगस्टला ते रावळपिंडीला आपल्या घरीच राहिले होते.
झियासुद्धा त्या विमानाने जायचे नव्हते कारण कांहीं दिवसापूर्वीच त्यांना लष्करी विमानातून प्रवास करताना मारण्याचा कट रचला गेलेला आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाली होती! पण त्यांच्या लष्करी अधिकार्यांनीच त्यांना लष्करी प्रदर्शन पहायला जाण्याचा आग्रह केला कारण त्या समारंभाला पाकिस्तान व अमेरिका येथून थोर व महत्वाकांक्षी लोक हजर रहाणार होते. शेवटी झिया जरा नाराजीनेच त्या विमानात चढले.
पुढे कित्येक वर्षें आरिफ स्वतःशीच ते स्वतः किती सुदैवी होते याचाच विचार करीत व या दुःखद घटनेच्या महत्वाबद्दल बोलायला नकार देत. पण अलीकडेच ते म्हणाले कीं मे. ज. महमुद अली दुराणींनी १४ ऒगस्टला त्यांना फोन करून अमेरिकन बनावटीच्या "आब्राम्स" रणगाड्यांच्या प्रात्यक्षिकांना हजर रहाण्याबद्दल विचारले होते. झिया त्या आठवड्यात कुठेच विमानप्रवास करायला तयार नव्हते, पण तोफखान्याचे प्रमुख अधिकारी असलेल्या दुराणींनी आग्रह धरला (हे पुस्तक नंतर २००७ साली प्रकाशित झाले तेंव्हां दुराणी पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत होते). शेवटी झिया तयार झाले. ते 'पाक-१' विमानाने इस्लामाबादहून ३०० मैल दक्षिणेला असलेल्या बहावलपूरला गेले. तीन्ही सेनदलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष(१) ज. रहमानही त्या विमानातून जाणार नव्हते कारण ते लष्करी सामुग्रीच्या विक्रेत्यांच्या बडबडीकडे लक्ष देत नसत. पण झियांच्याबरोबर प्रवास करून त्यांचा मनाचा कल जाणून घ्यायची ही संधी सोडायला ते तयार नव्हते.
रणगाड्यांच्या (कांहींशा अयशस्वी) प्रात्यक्षिकांनंतर दुपारचे जेवण घेऊन झिया विमानाजवळ परत आले व त्यांनी विमानाशेजारीच अंथरलेल्या सतरंजीवर बसून दुपारचा नमाज़ पढला. (झियांना स्वतःच्या नम्रपणाचा व धार्मिकतेचा असा टेंभा मिरवण्याची हौस होती.) त्यानंतर ते विमानात चढले. बाकीचे त्यांचे सर्व सहप्रवासीही पाठोपाठ चढले.
विमानाने आकाशात भरारी घेतली न घेतली तेवढ्यात विमानाचा कंट्रोल टॊवरशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर विमानाने जमीनीकडे सूर मारला व त्यानंतर एक-दोन मिनिटे अस्थिरतेत खाली-वर गेल्यावर ते कोसळले, इतक्या जोरात कीं त्याचे फिरणारे पंखे जमीनीत खोल रुतले होते. विमान जमीनीवर आपटल्यावर त्यातल्या १० टन इंधनाने पेट घेतला व ते एका आगीच्या लोळात सापडले व नंतर चार तास जळत राहिले.
त्या विमानावर कुठल्याही रॊकेटचा मारा झाला नव्हता, ते आकाशात असताना स्फोटही झाला नव्हता, जमीनीवर आपटेपर्यंत आगही लागली नव्हती व त्यात कुठलाही यांत्रिक बिघाडही झाला नव्हता. पण नंतर त्या विमानाच्या अवशेषांत कांही स्फोटक द्रव्याचे अंश मिळाले. फक्त अगदी शेवटी दोन आंब्यांच्या पेट्या व त्या रणगाड्याच्या छोट्या प्रतिकृती त्या विमानात चढवल्या गेल्या होत्या ज्यांची तपासणी झालेली नव्हती.
झियांच्या वधाला अनेक कारणें होती. लष्करातील अनेक माथेफिरू अधिकार्यांना झियांचा तापट स्वभाव असह्य होऊ लागला होता. झिया सगळ्या बारीक-सारीक गोष्टीत ढवळाढवळ करत तेही बर्याच जणांना आवडत नसे. बर्याचदा त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांच्या तापट स्वभावामुळे ते नाराज होऊन बाहेर पडत. कांहींना वाटे कीं झियांनी आपल्या देशाला अमेरिकेकडे जिनीव्हा कराराच्या मसूद्याबाबत गहाण टाकले होते तर कांही अधिकार्यांना पाकिस्तानच्या शेजारी मुस्लिम राष्ट्रांबरोबरच्या संबंधांबाबत झिया व त्यांच्या समितीने ठरविलेला मसूदा मान्य नव्हता. झियांच्या निकटवर्ती भ्रष्ट अधिकार्यांमुळेच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे असेही त्यांचे मत होते व त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती.
पाकिस्तानाबाहेरही पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावरून व अफगाणिस्तानमधील युद्धावरून झियांबद्दल नाराजी बाळगणार्यांची संख्याही प्रचंड होती. KGB व KGBकडून प्रशिक्षित अनुयायी प्रणघातक nerve gas वापरून असा हल्ला करू शकत होते. हे कारस्थान इस्रायली हस्तकांचे असण्याचीही शक्यता होती. कारण झियांच्या अण्वस्त्रप्रकल्पामुळे कहूतावर हला करण्याचे त्यांचे मनसुबे होतेच व १९८७पासून त्यांनी खानसाहेबांच्या खरेदी जाळ्यातील अनेक मुख्य पात्रांवर गुप्त हल्ले चढवणे, धमक्या देणे, बॊंबस्फोट घडवून आणणे व blackmail करणे असे प्रकार झाले होतेच. त्यांनी भारतालासुद्धा तसा हला करण्याला प्रोत्साहन दिले होते कारण भारतही पाकिस्तानच्या थापा मारण्याने व धर्मवेडेपणाने व झियांच्या भांडखोर स्वभावामुळे वैतागलेला होता.
अमेरिकेवरही संशय येत होता. झियांच्या वधाने CIAचा व परराष्ट्रखात्याचा खूप फायदा होणार होता. झियांच्यावर अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल खोटे बोलल्याबद्दल, लाचलुचपतीबद्दल, अमेरिकेची मदत कहूताप्रकल्पासठी व हिज्ब-इ-इस्लामी या अतीशय मूलगामी संघटनेच्या गुलबुद्दीन हिकमतयारच्या नेतृत्वाखालील अतिरेकी मुस्लिम घटकांसाठी वापरण्याबद्दल अनेक आरोप खासगीत झाले होते. सौदी अरेबियाच्या गुप्तहेरखात्याने याबद्दल अनेकदा हे अतिरेकी मुजाहिदीन पुढे उलटतील व पाश्चात्य राष्ट्रांवरच हल्ला करतील अशी अमेरिका व युरोपीय राष्ट्रांना चेतावणीही दिली होती.
याखेरीज भुत्तोंच्या मुर्ताझा या मुलाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या 'अल्-झुल्फिकार' (तलवार) या अतिरेकी संघटनेवरही संशय होता. झियांच्या विमानावर हल्ला केल्याचा बदला झियांनी घेतला असे मानले जात असे. (भुत्तोंच्या दुसर्या मुलावर १९८५ मध्ये पॅरिस येथील त्यांच्या सदनिकेत विषप्रयोग करवून ठार केल्याचा आरोप भुत्तो कुटुंबियांनी केला होता.)
अमेरिकेच्या CIAचे मुख्य यांनी अमेरिकन सरकारला या अपघाताच्या जागेपासून दूर रहायला बजावलेले होते कारण जर अमेरिकन गुप्तहेर, तंत्रज्ञ आणि अन्वेषक अपघाताच्या जागी लुडबूड करतांना दिसले असते तर अमेरिकेचा या अपघातात हात होता कीं काय असा संशय बळकट झाला असता व असा आरोप कांहीं संघटना करीतही होत्या!
या अपघाताची माहिती कळली तेंव्हां झियांचे वकील/सल्लागार पीरजादा घरीच होते. त्यांनी लगेच त्यावेळी कोण कुठे होता याचा ताळा घेतला व त्यानुसार त्यांना ज. अस्लम मिर्झा बेग यांचा संशय आला. बेग यांनी त्या विमानातून प्रवास करायचे टाळले होते व त्यात पीरजादांना बंडाचा (कुदेता) संशय आला. त्याआधी पीरजादा मध्यपूर्वेच्या दौर्यावरून झियांसाठी सौदी अरेबियातील हेरखात्याकडून धोक्याची सूचना घेऊन आले होते. ते ऐकल्यावर झिया इतके काळजीत पडले होते कीं त्यांनी १५ ऑगस्टला लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांची एक बैठक बोलावली होती जी पाच तास चालली होती.
पीरजादांनी झियांना अजीबात लष्करी विमानांतून प्रवास न करण्याबद्दल आग्रहाने सांगितले होते.
अस्लाम मिर्ज़ा बेग रणगाड्यांचे प्रात्यक्षिक योजले होते व तो परतीचा पाक-१वरचा विमानप्रवास टाळला होता. त्याऐवजी ते बहावलपूरहून वळसा घालून एका दुसर्या विमानातून धामियाल या पंजाबमधील लष्करी तळावर गेले होते व तिथून त्यांची लष्कराची गाडी त्यांना लष्कराच्या मुख्यालयात न्यायला थांबली होती.
गेली १८ वर्षें बेग यांनी त्यांच्या 'पाक-१' मध्ये न चढण्याने त्या विमान अपघातात त्यांचा हात होता असे मुळीच सिद्ध होत नाहीं हेच आपले म्हणणे कायम ठेवले होते. त्यावेळचे सर्वेसर्वा मुशर्रफ यांच्या सरकारी निवासस्थानाच्या जवळच असलेल्या आपल्या चक्लालाच्या कॅन्टोनमेंटमधील कार्यालयात बसून अगदी निर्विकार चेहर्याने त्यांनी झियांच्या मृत्यूप्रसंगाची आठवण करून दिली.
त्यांनी घाईघाईने अपघाताची जागा सोडली होती या त्यांच्यावरील आरोपाची टर उडवून ते म्हणाले कीं एका हेलीकॉप्टरच्या वैमानिकाने कंट्रोल टॉवरला सांगितलेली अपघाताची बातमी त्यांनी ऐकली होती व खालचे अपघाताचे अवशेषही त्यांनी पाहिले होते, पण खाली जाण्यात त्यांना कांहींच अर्थ वाटला नव्हता. कारण त्यांच्या मते त्यांच्यावर पाकिस्तानच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती.
पीरजादा सतत एकाच मुद्द्यावर येत होते कीं झियांच्या मृत्यूने ज. बेग यांचा फायदा होणार होता, कारण झिया लष्करप्रमुख होते व त्यांच्या मृत्यूनंतर बेग यांच्याकडे ते पद आयतेच यायचे होते. आणि झालेही तसेच. धामियलला उतरल्याबरोबर त्यांनी लष्कराच्या प्रमुखपदाची सूत्रें हाती घेतली. पण पीरजादांनी त्यांना राष्ट्रपती होऊ दिले नाहीं.
बेग वेगाने रावळपिंडीकडे येत होते त्याच वेळी गुलाम इशाक खानही इस्लामाबादहून रावळपिंडीकडे येत होते. ते भूतपूर्व अर्थमंत्री, BCCI बँकेच्या सेवाभावी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष, डॉ. खान यांचे खंदे समर्थक व १९८५ पासून पाकिस्तानच्या सिनेटचे अध्यक्षही होते. पीरजादाना खात्री होती कीं पाकिस्तानी जनता आणखी एक लष्करशाही सहन करणार नाहीं. स्वतःला काळजीवाहू पंतप्रधान म्हणून घोषित करण्याची सूचनाही पीरजादांनी फेटाळून लावली. त्यांनी घटनेचा त्वरित अभ्यास करून ज. बेगला थांबवू शकेल असे कलम शोधून काढले. त्या कलमानुसार शासनात पोकळी निर्माण झाल्यास सिनेटच्या अध्यक्षांना राष्ट्रपतीपद घेण्याची तरतूद होती. त्यानुसार गुलाम इशाक खान राष्ट्रपती बनले व ज. बेग यांनी ती तरतूद स्वीकारली. पुन्हा एकदा असामान्य कर्तृत्व असलेल्या एका हुषार वकीलाने पाकिस्तानचे भविष्य घडविण्यात मोठा हातभार लावला होता.
संध्याकाळपर्यंत राष्ट्राध्यक्ष इशाक खान यांनी ज. बेगबरोबर समेट केला व लष्कराच्या समर्थानासह राष्ट्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणात १० दिवस शोक पाळण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी झियांच्या २० ऑगस्ट रोजी केल्या जायच्या दफनाची पूर्ण व्यवस्था केली व त्यांचे दफन जगातल्या सर्वात मोठ्या मशीदीत-शहा फैजल मशीदीत-करायचा निर्णय घेताला. ही मशीद सौदी अरेबियाच्या राजघराण्यातर्फे बांधण्यात आलेली होती व ती दफनविधीसाठी नव्हती. झियांनी सौदी राजघराण्याबरोबर खास संबंध प्रस्थापित केले होते व त्याच्या बदल्यात राजघराण्याने पाकिस्तानच्या अनेक प्रकल्पांना-विशेषतः पाकिस्तानच्या कहूताप्रकल्पाला-वित्तीय सहाय्य केले होते व त्यांना आशा होती कीं त्यांनी झियांच्या मध्यस्तीने मिळविलेल्या क्षेपणास्त्रावर पाकिस्तानी परमाणूबाँब बसवायला मिळेल.
झियांचे दफन होताहोता लाहोर वरिष्ठ न्यायालयाने झियांनी स्थगित केलेली लोकशाही बेकायदेशीर होती व नव्या निवडणुका घेण्यात याव्यात असा निर्णय दिला. यावेळी इशाक खान व बेग यांनी लोकशाहीला मुक्तहस्त (स्वातंत्र्य) मिळणार नाहीं याची पुरेपूर व्यवस्था केली. समेटानंतर एकत्र आल्यावर बेग व इशाक खान यांना बर्याच गोष्टीत साधर्म्य दिसून आले. त्यांनी दहा वर्षांच्या हुकुमशाहीनंतर बदनाम झालेल्या पाकिस्तानी लष्कराला सदाचरणी संघटना म्हणून गौरवले, दोघांना भारतावर बांगलादेशनिर्मितीत पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घ्यायचा होता आणि दोघांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रक्षमतेच्या महत्वाची जाणीव होती व दोघांना डॉ. खान यांच्याबद्दल खूप आत्मीयताही होती. बेग तर त्यांना 'राष्ट्रीय वीरपुरुष'च मानत असत! बेग व इशाक खान यांना खात्री होती कीं पाकिस्तानचा कहूता प्रकल्प त्यांना परमाणूबाँब मिळवून देईल व त्यांच्या लष्कराची स्थिती सुधारून भारताविरुद्ध बदला घ्यायची क्षमता प्राप्त करून देईल. चीन, सौदी अरेबिया व इराण सारखी राष्ट्रें पाकिस्तानला परमाणूबाँबसाठी लाडीगोडी लावणारे नवे मित्रही मिळवून दिले होते.
या दोघांव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये एक तिसरे नेतृत्वही उभरत होते ज्याने पाकिस्तानमधील बदल योग्य दिशेने नेण्यासाठी मदत केली व ते होते एक पाकिस्तानी लष्करातील पडद्यामागून हालचाली करणारे एक अधिकारी व ISI चे नवे प्रमुख ज. हमीद गुल. ब्रिटिश आर्मी स्टाफ कॉलेजमध्ये लष्करी शिक्षण घेतल्यावर त्यांनी चिलखती विभागद्वारा पाकिस्तानी लष्करात आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती व पाकिस्तानात परत आल्यानंतर ते ३-तारांकित जनरल (3-star general) या पदावर होते. १९८७ साली रहमान यांच्याकडून ISI ची सूत्रें हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील युद्धाच्या शेवटच्या पर्वावर देखरेख केली होती. CIAच्या अफगाणिस्तान व पाकिस्तान येथील त्यांच्या बरोबरच्या अधिकार्यांना ते अतीशय उत्साही व सकारात्मक वाटत.
खरे तर ज. गुल स्वतःला एक तत्वप्रणालीनुसार लढणारा योद्धा समजत. १९८०च्या सुरुवातीला त्यांनी समविचाराच्या लष्करी अधिकार्यांना व झियांच्या नेतृत्वाखाली नावारूपास आलेल्या मूलगामी व इस्लामधर्माच्या कर्मठ धर्मगुरूंना आपल्याभोवती जमवायला सुरुवात केली. परिणामतः पाकिस्तानचे संस्थापक जिना यांच्या निधर्मी तत्वांचा त्याग करून पाकिस्तानचे एक कट्टर इस्लामी राष्ट्र बनवायचे मनसुबे त्यांनी रचले.
तब्बल वीस वर्षांनंतर गुल म्हणतात कीं त्यांना पाश्चात्य राष्ट्रांबरोबर काम करणे मुळीच आवडायचे नाहीं. अमेरिकेची मैत्री त्यांना अविश्वसनीय वाटे आणि त्यांच्या मदतीच्या अटी पाकिस्तानच्या हिताच्या नसत. ते आपल्या धर्मगुरू व लष्करी अधिकार्यांना नेहमी सांगत कीं जोवर पाकिस्तान वॉशिंग्टनपासून धोरणस्वातंत्र्य मिळवत नाहीं तोपर्यंत ते दुबळे व वसाहतवादाचे बळी असलेले राष्ट्रच राहील, पाकिस्तान व मध्यपूर्वेतील इतर इस्लामिक राष्ट्रें जागतिक ज्यू विचारसरणीचे मिंधेच रहातील व या बंधनापासून पाकिस्तानने आपली मुक्तता करून घ्यायलाच हवी असे त्यंचे ठाम मत होते व ही मतें ते आपल्या 'चेल्यां'ना नेहमी ऐकवत.
झियांच्या मृत्यूआधी ही तत्वे फक्त चर्चिली जायची, पण पाक-१ पडल्यानंतर ज. गुल जास्त-जास्त लक्षणीय भूमिका कार्यवाहीत आणायच्या प्रयत्नास लागले. आपल्या इस्लामी जमावाच्या संबंधांचा फायदा घेऊन गुल म्हणत कीं मदारसांचे(२) लष्करीकरण करून भारताला रक्तबंबाळ केले पाहिजे. "देवाची सेना" बनवण्याची व मदारसांचे रूपांतर जिहादी निर्माण करण्याची प्रशिक्षण केंद्रे बनविण्याची स्वप्ने ते पहात असत. या मदारसांतील प्रशिक्षक युद्धांत टक्केटोणपे खाल्लेल्या अफगाणिस्तानातील जिहादी व विद्यार्थी अल्लाचे शिपाई अशी त्यांची रूपरेषा होती. ज. बेग यांचाही या योजनेला पाठिंबा होता व त्यांनी अशी प्रशिक्षण शिबिरें दृष्टीआड पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुज़फ्फराबादच्या डोंगराळ भागात स्थापण्याची योजना केली. गुलना अफगाणिस्तानात यशस्वी झालेल्या मुजाहिदीन प्रणालीचा काश्मीरमध्ये करू इच्छित होतो. काश्मीरमध्ये प्रशिक्षित अतिरेकी पाठवायचे व भारताच्या त्यांना स्वातंत्र्य न देण्याच्या धोरणावरून काश्मिरी लोकांच्या भावना भडकवायच्या अशी ती योजना होती. हमीद गुल यांची संघटना प्रत्येक पैलूवर काम करीत असे: भारताविरुद्ध भावना भडकावणे, पाकिस्तानी लष्कराचे पुनरुत्थान करणे व पाकिस्तानात जास्त-जास्त कळकळीची व देशभक्तीपूर्ण इस्लामिक चळवळ सुरू करायची अशी ती योजना होती.
गुलनी असेही सुचवले कीं इशाक खान यांनी पाकिस्तानचा परमाणू कार्यक्रम अमेरिकेची हा कार्यक्रम थांबवायची सूचना फेटाळून लावून अधीक वेगाने राबवावा. गुल यांच्या मतें पाकिस्तानने अमेरिकेच्या सहकार्याने बनवू घातलेला बाँब जलद बनवावा व तो परजावा, क्षेपणास्त्रांची संरचना व बाँबहल्ले बरोबर ठिकाणी टाकण्याची सुविधा/यंत्रणा (delivery system) सुधारावी व पाकिस्तान काय करू शकतो याबद्दल भारताच्या मनात अजीबात संभ्रम रहाणार नाही अशा तर्हेची सज्जड 'समज' द्यावी. त्यांचे असेही मत होते कीं कहूताप्रकल्पाचे तंत्रज्ञान झियांनी सुचविल्याप्रमाणे इतर मुस्लिम उम्माला विकावे व त्यातून आलेल्या पैशाचा वापर करून अमेरिकेच्या खैरातीपासून मुक्तता मिळवावी व स्वतःचा स्वतंत्र पण खूप खर्चिक असे धोरण राबवावे!
बेग यांना वाटे कीं पाकिस्तानने आपले बाँब लपवून ठेवण्याचे धोरण थांबवावे व हे बाँब वापरण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्रे व विमाने मिळवून शत्रूच्या हृदयात भीती निर्माण करावी!
पण लष्कर अद्याप पूर्णपणे सत्तेत नव्हते. लोकशाहीची घोषणा केलेली असल्यामुळे १६ नव्हेंबर १९८८ला निवडणूक व्हायची होती व बेग व आणि गुल आणि त्यांच्यावर घारीसारखी नजर ठेवून असलेले इशाक खान यांना आपली योजना यशस्वी करण्यासाठी आपला उमेदवार पंतप्रधानपदी असायला हवा होता. पाकिस्तानमध्ये एक राजनैतिक समज होता किंवा म्हण होती कीं लष्करी राजवटीचे आगमन जर इतर सर्व उपाय थकल्यावर लोकांना अडचणीत मदत करू शकणारी एकुलती एक परीकथेतली जादुई शक्ती या रूपाने झाले तरच ती यशस्वी होते. गुलना माहीत होते कीं झियांच्या दहाहून जास्त वर्षांच्या राजवटीनंतर पाकिस्तानची जनता लष्कराकडे एक जादुई शक्ती म्हणून पहात नव्हते. बेग यांच्या मदतीने गुलनी मुस्लिम राजकीय पक्षांची IJI(३) या नावाची एक बळकट युती करून तिच्यामागे लष्कराच्या खर्या महत्वाकांक्षा लपविण्याची योजना आखली ज्यात IJI पक्ष निवडणुका लढवेल आणि बेग, गुल व इशाक खान त्या पक्षाला मार्गदर्शन करतील, पैसा पुरवतील, धाकात ठेवतील व त्या पक्षाला हवे तसे वळवतील असे या तीघांनी ठरवले. एकच व्यक्ती या सर्व कटाला शह देऊ शकेल अशी होती व ती म्हणजे बेनझीर ही भुत्तोंची ३५ वर्षीय कन्या. लष्कराला बेनझीरचा तिटकाराही होता व जरबही होती. कारण तिला पाकिस्तानी जनतेचा आणि अमेरिकेचा पाठिंबा होता.
झियांच्या विमान अपघातात एक अतीशय लोकप्रिय व सर्व लोकांच्या आदरास पात्र असलेले मुत्सद्दी अर्नॉल्ड राफेल मृत्युमुखी पडल्याच्या धक्क्यात सापडलेल्या अमेरिकेला लक्षात आले कीं झियांच्या वारसाबद्दल तिने आधीपासून विचारच केलेला नव्हता. झियांच्यानंतर पाकिस्तानात पुढे आलेले नवे नेते जास्तकरून अमेरिकेच्या विरुद्धच होते व त्यांची निष्ठा मूलगामी 'उलेमां'च्या(४) बाजूला होती व त्यांचा विचार अण्वस्त्रांवर कबजा करण्याचा होता. 'व्हाईट हाऊस'च्या situation room मध्ये कोलिन पॉवेल यांच्या अध्यक्षतेखाली एक आणीबाणीची बैठक झाली. पॉवेल १९८७साली रेगन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाले होते. पेंटॅगॉनचे आर्मिटेज, राजकीय बाबींचे उपपरराष्ट्रमंत्री मायकेल आर्माकॉस्ट, CIAच्या मध्यपूर्व विभागाचे थॉमस ट्वेट्टेन आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे मध्यपूर्व व दक्षिण आशिया विभागाचे ज्येष्ठ संचालक रॉबर्ट ओकली यांच्यासारखे पाकिस्तानबद्दल माहिती असलेले अनेक मुत्सद्दी त्या बैठकीला हजर होते.
ओकलींच्या मते अमेरिकेचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे हे पहिले पाऊल होते. त्यांना बेग यांच्यावर झियांच्या हत्येबद्दल पाकिस्तानातील अनेकांना संशय होता हे माहीत नव्हते. अफगाणिस्तानातील युद्धाची भावी दिशा, काबूलमधील नव्या सरकारस्थापनेचे अपूर्ण कार्य, पाकिस्तानी लष्करातील कांहीं घटकांच्या आणि भारतीय लष्कराच्या भावी हालचालींबद्दलची काळजी असे अनेक विषय होते.
परराष्ट्रमंत्रालयातील पाकिस्तानविषयीचे तज्ञ अमेरिकेने नवे धोरण आखावे अशा मताचे होते. कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्री तेरेसिता शाफर यांचेही हेच मत होते. हुकुमशाहीऐवजी पाकिस्तानात स्थिर व भक्कम लोकशाही स्थापण्यात अमेरिकेने मदत करणे (खासकरून पाकिस्तानकडील असुरक्षित अण्वस्त्रांसाठी तरी), त्यादृष्टीने होऊ घातलेल्या निवडणुकांना अमेरिकेने अनुमोदन देणे आणि विजयी होऊ घातलेल्या आणि ऑक्स्फर्ड व हॉवर्डला शिकलेल्या बेनझीरला समर्थन देणे हेच अमेरिकेच्या हिताचे आहे असे तिचे मत होते.
या बैठकीनंतर ओकलींना अमेरिकेचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज शूल्ट्झ यांच्याकडून निरोप आला कीं त्यांनी ओकलींना पाकिस्तानचे नवे राजदूत नेमले असून त्यांनी दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर प्रयाण करावे कारण ते झियांच्या दफनविधीसाठी इस्लामाबादला जायला निघाले होते.
शूल्ट्झ यांची हट्टीपणाबद्दल ख्याती होती, पण ओकलींना इस्लामाबादमधील आणीबाणीची परिस्थिती हाताळायची ही संधी आवडली. टेक्सासचे ओकली सरळसोट व अधिकार गाजवणारे होते व त्यांच्यावर 'व्हाईट हाऊस' आणि पाकिस्तानी नेते विश्वास ठेवीत. आर्माकॉस्ट व आर्मिटेज यांच्याबरोबरच्या आधीच्या इस्लामाबादच्या भेटीची त्यांची आठवण ताजी होती. त्यावेळीही पाकिस्तानला विश्वासात घेण्याच्या गरजेची चर्चा त्यांनी केली होती. इस्लामाबादला पोचल्यावर शूल्ट्झनी बेग व इशाक खान यांना सांगितले कीं ओकली अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमले गेले आहेत व अमेरिका पाकिस्तानला पूर्ण सहाय्य देणार आहे. ओकलींनी लगेच बेनझीरशी संपर्क साधायचा प्रयत्न केल्या. त्या आधीच ISI ने निर्मिलेल्या भोवर्यात गटांगळ्या खात होत्या.
शिफारस, जातीयवाद, विश्वासघात, लबाडीचे व्यवहार, ब्लॅकमेल व मधयुगीन सरंजामशाही या सार्या प्रकारांनी बजबजलेले पाकिस्तानातले राजकारण पहाता वॉशिंग्टन एक लहान मुलांचा खेळ वाटावा. त्या स्वतः १९८२ साली थोडक्यात मृत्यूपासून वाचल्या होत्या. झियांनी त्यांना घाणेरड्या सुईने इंजेक्शन देऊन त्यांच्या रक्तावर विषप्रयोग करण्यासाठी एक डॉक्टरही पाठवला होता. पण सुदैवाने त्या वाचल्या व लंडनला औषधोपचारांसाठी गेली. तिथून परतल्यावर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. झियांना त्यांना मनोरुग्ण ठरवून आयुष्यभर तुरुंगात डांबायचे होते पण त्याणा त्यांच्या अमेरिकेतील मित्रांनी दबाव आणून सोडवले.
ऑक्स्फोर्ड युनियनला १९८४ साली दिलेल्या भाषणात झियांनी सांगितले होते बेनझीर गृहकैदेत नसून कुणीही त्यांना भेटू शकतो. बेनझीरचे वर्गमित्र असलेले पीटर गॅलब्रेथ यांनी त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला व बेनझीर यांच्या अटकेवरून डिवचले. त्यानंतर बेनझीर यांना १९८४ ला सोडण्यात आले. त्यानंतर त्या दोन वर्षें हद्दपारीत काढली व नंतर PPP पक्षाच्या नामधारी अध्यक्षा या नात्याने त्या परत आल्या.
मग झियांचे विमान आकाशातून कोसळले. बेनझीर म्हणाल्या, "ही ईश्वरेच्छाच असावी!". फाशी दिलेल्या भुत्तोंची मुलगी म्हणून असलेली त्यांची जनमानसावरील मोहिनी व तिची किंमत यांची जाणीव असलेल्या बेनझीर जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. पण याच वंशावळीच्या दुव्यामुळे त्या पाकिस्तानी लष्कराच्या तिरस्काराला पात्र झाल्या होत्या.
१९८८च्या ऑक्टोबरमध्ये बेग आणि गुल बेनझीर यांच्या मागे लागले. त्यांनी मतदानासाठी ओळखपत्र असणे ही आवश्यक अट करून PPPच्या २० टक्के मतदारांना (ज्यात गरीब शेतकरी आणि शहरातला नव्याने आलेला कामगारवर्ग होता) मतपेटीपासून दूर ठेवले. त्यानंतर गुल यांनी IJI युतीला बिनबुडाचे आरोप करता येतील अशी माहिती दिली जी IJIचे उमेदवार पुन्हापुन्हा वापरू लागले. त्यात मुख्य मुद्दे होते कीं बेनझीरसारख्या महिला मुस्लिम देशाच्या पंतप्रधान होणे, त्यांचे पाश्चात्य देशातील शिक्षण आणि अमेरिकेशी असलेले त्यांची मैत्री या गोष्टी होत्या. त्याहून जोरदार मुद्दा होता अण्वस्त्रांचा. गुल यांनी IJIच्या उमेदवारांना बेनझीर यांच्यावर "राष्ट्रीय सुरक्षितेला धोका" या नात्याने हल्ला करायला उद्युक्त केले.
पाकिस्तानकडे अणूबाँब असलाच पाहिजे व बेनझीर या बाबतीत विश्वसनीय नाहींत असा प्रचार करायला सांगितले. बेनझीर पाकिस्तानला अमेरिकेला 'विकतील', त्या अमेरिकेच्या गुप्तहेर आहेत व आपली सर्व अण्वस्त्राबद्दलची गुपिते त्या अमेरिकेला देतील, त्या भारतापुढे ताठपणे उभ्या राहू शकणार नाहींत वगैरे, वगैरे मुद्दे प्रचारात येऊ लागले. त्यानुसार IJIच्या उमेदवारांनी पत्रके वाटायला सुरुवात केली. एका मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधानपदी एका महिलेने निवडून येण्याला इस्लामची परवानगी आहे का हा मुद्दाही त्यात होता. गुल यांनी आवळपट्टी आणखीच आवळली. त्यांनी अपमानास्पद घोषणा असलेली अतीशय विकृत व्यंगचित्रे प्रसारित केली ज्यात बेनझीर व त्यांची आई नुसरत यांचे चेहरे निर्लज्जपणे सायकल चालविणार्या पोहण्याच्या पेहरावातील 'मॉडेल्स'वर चिकटवून त्यांना "बांगड्या ल्यायलेल्या गुन्हेगार" असे संबोधण्यात आले. अशा अर्थाची पत्रकें विमान भाड्याने घेऊन पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर आणि गांवांवर टाकायलाही गुल यांनी मागे-पुढे पाहिले नाहीं. इम्तियाज़ अहमद या ISIच्या अधिकार्याला भुत्तो खानदानाच्या फोटोंचे जुने संग्रह शोधायला सांगितले व त्यात त्यांना बेनझीरच्य़ा मातोश्री नुसरत यांना (त्यावेळी त्या पाकिस्तानच्या First Lady होत्या) प्रसिडेंट फोर्ड यांच्याबरोबर १९७५च्या भेटीत नृत्य करतांना दाखविले होते. गुल यांनी IJIच्या उमेदवारांना "बेनझीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सतत असाच अमेरिकेच्या पकडीत असेल" असा अपप्रचार करायलाही उद्युक्त केले. पण गुलना अशा विकृत गोष्टी केल्याची अजीबात लाज नव्हती. ते म्हणत कीं १९८८ची निवडणूक सर्वात जास्त न्याय्य व रास्त निवडणूक होती.
बेग आणि गुल यांनी ही निवडणुकीचे रूपांतर त्यांच्या गुप्त जाहिरनाम्याच्या यशासाठी परमाणूप्रकल्पावरील एक सार्वमतच (referendum) केले! "नुसरत भुत्तो पाकिस्तानच्या कहूताप्रकल्पाची अमेरिकेकडुनच्या तपासणीस अनुकूल आहेत" असा अपप्रचारही सुरू केला आहे, जरी पाकिस्तानातील बहुसंख्य प्रभावी पक्ष अण्वस्त्रनिर्मितीच्या मुद्द्याचे उघडपणे समर्थन करत नसले तरी निवडणुकीचे अत्यंत भारित असे वातावरण कांही पक्षांना परमाणूप्रकल्पाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतील, IJIच्या प्रचाराच्या शुभारंभसभेत त्यांच्या नेत्यांनी अण्वस्त्रे असणे पाकिस्तानच्या अस्तित्वाला जरूरीचे आहे अशा अर्था चा प्रचार सुरू केला" अशा अर्थाची गुप्त तार ओकली यांनी वॉशिंग्टनला पाठविली. (खरे तर ही थाप ISI नेच वृत्तपत्रांत सारली होती.) त्याचा परिणाम असा झाला कीं वॉशिंग्टनच्या बाजूच्या बेनझीर याही याविषयावर टोकाचा पवित्रा गेत आहेत असेही ओकलींनी वॉशिंग्टनला कळविले.
१६ नोव्हेंबरला निवडणुका आटोपल्या आणि बेनझीर यांनी २१५ जागात ९२ जागा जिंकून निसटता विजय मिळाला. बेग आणि गुल यांनी इशाक खानना निवडणुकीचे परिणाम तात्प्रते स्थगित करण्याचा सल्ला दिला व ISI ने हरलेल्या पक्षांची युती बनविण्याचा प्रयत्न चाली केला. बेनझीर यांनी १५ दिवस वाट पाहूनही इशाक खान यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. जगळ्यात जास्त जागा जिंकूनही त्यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण मिळाले नाहीं.
अमेरिकेने बेनझीरना मदत करण्यासाठी बाहेरून प्रयत्न चालूच ठेवले. सालाबादप्रमाणे रेगन यांची "पाकिस्तानकडे अणूबाँब नाहींत"चे प्रशस्तीपत्रक द्यायची वेळ आली होती. बेनझीरना जर सरकार बनवायची संधी मिळण्यासाठी यावेळी पाकिस्तानला वार्यावर न सोडता त्याला संपूर्ण समर्थन देणे आवश्यक होते. रेगननी त्यानुसार पाकिस्तानच्या बाजूने प्रशस्तीपत्रक दिले. पाकिस्तान त्यावेळी नेतृत्वहीन परिस्थितीत असूनही त्यांनी प्रतिनिधीगृहाला पाकिस्तानकडे अणूबाँब नाहीं व पाकिस्तान मदत मिळण्यास संपूर्णपणे पात्र आहे अशी खात्री दिली. रेगन यांच्या या विधानाला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बुश (थोरले) यांनीही पाठिंबा दिला. त्यांनीही एका वेगळ्या पत्राद्वारे पाकिस्तानला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. ACDA चे नॉर्म वुल्फ, CIA चे गॉर्डन ओएलर व परराष्ट्रमंत्रालयातील इतरही अनेक लोकांना धक्काच बसला. कारण झियांच्या मृत्यूआधी खानसाहेबांची खरेदीची कारवाई जास्तच वेगाने चालली होती आणि त्यांचे आणि PAEC चे हस्तक युरोपभर खरेदीच्या ऑर्डर्स देत फिरत असलेले दिसत होते. आणि यावर कळस म्हणजे इस्लामाबादमध्ये कट्टर मुस्लिम संघटना सरकार ताब्यात घ्यायच्या दृष्टीने जोरदार हालचाली करत होत्या.
पण बेनझीर यांची अमेरिकेशी असलेली जवळीक शेवटी त्यांच्या फायद्याची ठरली कारण त्यांच्या निवडीच्या शिक्कामोर्तबावरच ६० कोटी डॉलर्सचे आर्थिक सहाय्य अवलंबीन होते. शेवटी पीरज़ादांच्या सहाय्याने बेग आणि गुल यांना शांत करण्यात यश आले. लष्कराने बेनझीर अधिकार ग्रहण करतील पण त्यांचे सरकार लंगडत चालेल असा निर्णय घेतला. सारी सरकारी यंत्रणा बेग, गुल आणि इशाक खान यांच्या हाताच्या बोटाच्या इशार्यावर नाचत असताना बेनझीर यांना त्यांच्या वडिलांचे दंतवैद्य डॉ. जा़फर नियाजी़(५) हेच फक्त सल्ला द्यायला उरले होते. तेही १९७९ साली लंडनला पळून गेले होते व खानसाहेबांनी पैशाने घेतलेल्या सदनिकेत रहात होते. निवडणुकीच्या आधी ते इस्लामाबादला आले होते व त्यांनी PPPच्या कांहीं कार्यकर्त्यांना एकत्र आणले होते. खालच्या खोलीत भूतपूर्व हवाईदलप्रमुख हकीमुल्ला, जुल्फिकार अली खान व भूतपूर्व ISIचे अधिकारी ज. इफ्तिकार अली खान थांबले होते. त्यांनी सल्ला दिला कीं बेनझीरनी इशाक खानना राष्ट्रपतीपदावर राहू द्यावे व ते काय करतात ते पहात रहावे. ते हाडाचे सनदी नोकर होते व ते कायद्याने वागतील असेही त्यांचे मत होते. बेनझीरना कांहीं पर्याय नव्हताच व त्यांनी हा सल्ला मान्य केला.
बेनझीरना माहीत होते कीं कुठल्याही परिस्थितीत लष्कराशी आणि राष्ट्राध्यक्षांशी व्यवहार करण्यासाठी व लष्कराशी समन्वय साधण्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत लागणार होती. स्वतःला फारसा अनुभव नसल्याने त्यांनी दारायुस सायरस मिनवाला (त्यांना सगळे हॅपी या लोकप्रिय नावाने ओळखत) यांची त्यासाठी निवड केली. ते पारशी असून कराचीच्या शाळेत शिकले होते व त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मेट्रोपोल हे हॉटेल चालवत असत व त्यांचे सर्वांशी-विशेषतः संपूर्ण उपखंडात व मध्यपूर्वेत-चांगले संबंध होते. त्यांना "मुक्त राजदूत" हे पद स्वीकारायला बेनझीर यांनी राजी केले.
पण हा सर्व एकतर्फी मामला होता. इशाक खाननी हॅपींना जास्त गडबड होणार नाहीं असे वागायचा सल्ला दिला. हॅपींनी ते मान्य केले. इशाक खाननी सल्ला दिला कीं बेनझीर यांनी लष्कराला मान द्यावा. हॅपींनी ते मान्य केले. इशाक खाननी अण्वस्त्रांच्या विषयापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला तोही हॅपींनी मान्य केला. शेवटी इशाक खाननी बेनझीरना आत बोलावले. त्यांनी बेनझीरना सांगितले कीं परराष्ट्रमंत्रीपदी कुणाला निवडायचे हे ते सांगतील. झियांच्याकाळी परराष्ट्रमंत्री असलेले साहबजा़दा याकूब खान यांचे नांव सुचविण्यात आले त्याला बेनझीरनी मान्यता दिली.
एवढे करूनही इशाक खान यांचे समाधान झाले नाहीं. त्यांनी पीरजा़दा यांना PPP ला कसा लगाम घालावा याबद्दल सल्ला द्यायला सांगितले. पीरजा़दांनी बेनझीरना थेट फोन केला. त्यांनी तिला भुत्तोंच्या वधात त्यांचा हात नव्हता हे सांगितल्यावर पुन्हा एक तडजोड करण्यात आली. साधारणपणे पाकिस्तानातील सर्वात मोठे राज्य पंजाब. त्याचे राज्यपाल साधारणपणे केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाचे नेमले जातात. पण यावेळी त्या पदावर IJI च्या नवाज़ शरीफ यांची निवड झाली. ते उद्योगपती होते व नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत IJIतर्फे निवडणूक लढले होते. ते हमीद गुलचे 'हस्तक' होते व गुलनी शरीफना सर्व गोष्टींत बेनझीरना जमेल तितका त्रास द्यायचा सल्ला दिला.
बेनझीर सत्तेवर तर आल्या पण अधिकारहीन होत्या. वर असलेले राष्ट्राध्यक्ष तिचा तिरस्कार करीत, लष्कराचा पाठिंबा असलेले धूर्त नेते नवाज़ शरीफ त्यांच्यावर छुपा हल्ला करायला टपले होते व परराष्ट्रमंत्र्यांच्या निष्ठाही इतरत्रच होत्या.
त्या लष्कराला इतक्या घाबरल्या होत्या कीं बेग आणि गुल यांच्याबरोबरच्या पहिल्या बैठकीत त्या ओकलींना घेऊन गेल्या. त्यांना लष्कराबाबतीत, अण्वस्त्रांबाबतीत व अफगाणिस्तानबाबतीत हस्तक्षेप न करण्यास सांगण्यात आले. त्यांना वाटले कीं त्या पंतप्रधान तर झाल्या पण अधिकार कसलाच नव्हता! त्या घाबरल्या होत्या कारण लष्कराशी गाठ होती आणि लष्करी अधिकारी तर सामुदायिक कत्तल करायला मागेपुढे न पहाणारे होते!
त्या जेंव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयात काम सुरू करायला आल्या तेंव्हा त्यांच्या लक्षात आले कीं त्यांना कांहींच सुविधा दिसल्या नाहींत. कागद नाहीं, पेन्सिल नाहीं व फक्त एक मदतनीस! त्यांनी ज. बेगना फोन केला आणि कुठलीच सरकारी फाईल त्यांच्याकडे कां नव्हती याबद्दल विचारणा केली. बेग उत्तरले कीं सगळ्या फायली राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कार्यालयात मागवून घेतल्या होत्या. त्यांनी फायली त्यांच्याकडे आल्या पाहिजेत असे ठणकावून सांगितल्यावर त्यांना जे कागदपत्र मिळाले ते पाहून हॉवर्डमधून राजकारणाबाबतच्या पदवीधर असलेल्या व व ऑक्स्फर्डहून तत्वज्ञानात MA झालेल्या बेनझीर सुन्न झाल्या. झियांनी पाकिस्तानचे जणू अपहरण केले होते. GNP पैकी शिक्षणावर फक्त २.६ टक्के खर्च करणारे पाकिस्तान लष्करावर मात्र ६.७ टक्के खर्च करीत असे. देशात दर १० शिपायांच्यामागे फक्त १ डॉक्टर होता. त्यावर्षी पाकिस्तान २६० कोटी डॉलर्सच्या लष्करी साहित्याची आयत करणार होता. लष्कर जणू स्वयंभू होते व त्यांना जनतेशी कसलेच देणे-घेणे नव्हते! पाकिस्तान आतल्या बाजूला कोसळत होते व बेनझीर यांचा जणू श्वासच कोंडला होता.
पण बेनझीर खंबीर होत्या. त्यांनी एक छोटे प्रतिनिधीमंडळ इंग्लंडची लोकशाही कशी चातते त्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला पाठविले. पण बेग आणि गुल आणि इशाक खान यांनी आधीच पाकिस्तानच्या नजीकच्या भवीष्यकाळाच्या कार्यक्रमाचा आराखडा आखला होता: लष्कराचे संघटन, भारताला काश्मीरमध्ये अफगाणिस्तानसारख्या सशस्त्र बंडाळीला तोंड द्यायला लावणे आणि पाकिस्तानला प्रतिहल्ल्यापासून अण्वस्त्रांच्या गर्भित धमकीने वाचवणे.
बेनझीरचा स्वतःचाच एक कार्यक्रम होता. त्यांनी राजीव गांधींना फोन करून एकमेकांच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा करार करायचे परस्पर ठरविले. हे सारे बेग आणि गुल यांच्या कार्यक्रमांच्या विरुद्ध होते!
यापुढे जाऊन बेनझीर यांनी इशाक खान यांच्याबरोबरच्या ठरावाबाहेरील एक गोष्ट करायचे ठरविले. त्यांनी राजीव गांधींच्या बरोबर सियाचेनबद्दल बोलणी करायचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्यामते हा बर्फाने वेढलेल्या भागासाठी रक्त सांडण्यात कांहींही अर्थ नव्हता. पण बेग आणि गुल यांना पाकिस्तानच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करण्यात अभिमान वाटे. १९८४ साली भारताने "Operation Meghadoot" द्वारा भारतीय सैन्यातील गिर्यारोहण पथक तिथे पाठवून तो प्रदेश ताब्यात घेऊन पाकिस्तानला दुखावले होते. तीन वर्षांनंतर पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर दिले व बर्फात युद्ध करू शकणारी खास कमांडो तुकडी निर्मून 'बिलाफाँड पास' येथील भारतीय प्रदेश जिंकला, पण मग सगळेच घालविले. त्या तुकडीचा म्होरक्या होता तोफखान्यातील तरुण अधिकारी परवेज़ मुशर्रफ! पण इकडे बेनझीर शांततेसाठी प्रयत्नात असतानाच पाकिस्तानी लष्कर काश्मीरवर आणखी एक गुप्त हल्ला करण्याची तयारी करीत होता.
बेनझीर यांची तिसरी चूक होती पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पात जबरदस्तीने घुसण्याची. तिने PAEC चे मुनीर अहमद खान व कहूताच्या खानसाहेबांना भेटायला बोलावले, पण त्यांनी नम्रतेने भेटायला नकार दिला. त्यानंतर कांहीं आठवड्यांनी बेनझीरना सांगण्यात आले कीं मुनीर खान व खानसाहेब इशाक खानना भेटायला येणार आहेत व त्या जर तिथे आल्या तर सर्वांचीच भेट होईल. बेनझीरना वाटले कीं अशी संधी पुन्हा मिळेल कीं नाहीं कुणास ठाऊक. म्हणून त्या जायला तयार झाल्या. होय-नाहीं कर्ता-करता शेवटी एकमत झाले कीं पंतप्रधान या नात्याने त्यांचा अण्वस्त्रप्रकल्पाशी संबंध असणे योग्यच होते. मग त्यांनी एक त्रिमूर्ती प्रशासन (troika) स्थापले व त्यात इशाक खान, बेग व बेनझीर Nuclear Command Authority चे सभासद झाले. एका डावपेचावर त्यांचे एकमत झाले. बेनझीरना वाटत होते कीं अमेरिकेला सरळ सांगावे कीं पाकिस्तानकडे सगळे घटकभाग असले तरी पाकिस्तान त्यांपासून बाँब बनवणार नाहीं व अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यासाठी युरेनियमच्या अतिशुद्धीकरणाचा वेग कमी केल्याचे त्यांना सांगावे. या सर्व सूचना मान्य झाल्याचे त्यांना अश्चर्यच वाटले होते! या कराराला बेनझीर प्रणाली हे नांव द्यायचेही ठरले. बेग न्नंतर म्हणाले की ही त्रिमूर्ती म्हणजे एक ढोंग होते व केवळ बेग यांच्या फेब्रूवारीतील नियोजित वॉशिंग्टन भेटीत पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत स्थिरता प्राप्त करत आहे अशी प्रतिमा करण्यासाठीच त्यांनी या प्रणालीला कबूली दिली होती.
बेग एका हाताने देत असतांना गुल दुसर्या हाताने घेऊन जात होते. ISI ने मुंबईच्या सलमान रश्दीलिखित Satanic Verses या पुस्तकाच्या प्रती मिळविल्या व त्यातील प्रक्षोभक भागांना अधोरेखित करून त्या प्रती त्यांनी मौलाना कौसर नियाज़ी(५) यांच्याकडे पाठविल्या. हे आधी भुत्तोंचे माहिती मंत्री व खानसाहेबांचे कट्टर समर्थक होते. पण अलीकडे ते कट्टर मूलगामी इस्लामकडे वळले होते. गुल यांनी त्या प्रती त्यांच्याकडे पाठविल्या आहेत हे त्यांच्या लक्षात आले व ते उर्दूत रश्दी यांच्याविरुद्ध लिहू लागले व त्यांना जनतेचे समर्थनही मिळू लागले.
पाकिस्तानमध्ये "देवाचा शब्द" आदरणीय समजला जाई व कुराणातील आशयाला अतीशय सन्मानाने जतन केले जाई. नियाझी यांच्या लिखाणामुळे एक नवी क्रांतीच गुल यांच्या हातात आली. कांही दिवसांतच निदर्शने सुरू होऊन अमेरिकेच्या व ज्यूंच्या विरोधात घोषणा होऊ लागल्या. बेनझीरना त्यांच्या लोकशाहीभिमुख प्रवृत्ती बाजूला ठेऊन त्या पुस्तकावर बंदी आणावी लागली. तरीही निदर्शने चालूच राहिली व १२ फेब्रूवारीला USIS च्या इमारतीला वेढण्यात आले व तेहरानसदृश परिस्थिती निर्माण झाली.
पण गुल यांनी असे जाहीर केले कीं रश्दींच्या 'Satanic Verses' चे व बेनझीर यांच्या 'Daughter of the East' चे प्रकाशक एकच होते! त्यामुळे बेनझीर यांची प्रतिमा एक कमी पारख असलेली व पाकिस्तानसारख्या संकुचित मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान होण्यास अयोग्य अशी बाई अशी झाली!
बेनझीर व थोरले बुश यांची भेट टोकियोमध्ये (तोक्यो) सम्राट हिरोहितोंच्या अंत्यविधीच्या वेळी झाली. Satanic Verses ने लागलेल्या आगी व अण्वस्त्रप्रकल्प हे दोन विषय कार्यक्रमपत्रिकेच्या अगदी वर होते. बुश यांनी जरी रेगन यांचे प्रशस्तीपत्रक देण्याचे धोरण सुरूच ठेवले असले तरी त्यांना मिळणार्या खानसाहेबांच्या खरेदीची जी अथक सत्रे चालली होती त्याबद्दलच्या गुप्त माहितीमुळे ते अस्वस्थ होते. बेनझीरनी बुशना खात्री दिली कीं त्यांना बुश यांना वाटणारी कळकळ कळत होती. दरम्यान ज. बेग रेगन यांचे मावळते 'राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार' कॉलिन पॉवेल व बुश यांचे आगामी 'राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार' ब्रेंट स्काऊक्राफ्ट यांना भेटायला वॉशिंग्टनला गेले असताना पाकिस्तान टीव्हीवरील अमेरिकन ध्वज जाळण्याच्या प्रतिमा व अमेरिकेविरुद्धच्या घोषणांमुळे बेग यांचे स्वागत थंडच झाले. "पाकिस्तानने अण्वस्त्रांबाबत पावले उचलली नाहींत तर हा प्रकल्प बंद झाला नाहीं तर अमेरिकेला घटनादुरुस्तीप्रमाणे पाकिस्तानची मदत बंद करावी लागेल. मग सगळेच जाईल. भारताबरोबर जर युद्ध करायचे नसेल तर ही पावले पाकिस्तानला घ्यावीच लागतील असेही बेग यांना सांगण्यात आले.
पण बेग यांच्यावर कांहींच परिणाम झाल्याचे दिसले नाहीं! त्यांच्या डोक्यात अमेरिकेच्या पलीकडील नवे मित्र शोधायचे होते. परत आल्यावर त्यांनी इशाक खान यांची भेट घेतली व सांगितले कीं त्यांचे स्वागत ठीक झाले व त्यांनी युरेनियम अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम थांबवायला संमती दिली होती कारण अतिशुद्धीकृत युरेनियमचा साठा पुरेसा असल्याने असे मान्य करण्यात पाकिस्तानचे कांहींच नुकसान नव्हते! बेनझीरनी इशाक खान यांची भेट घेऊन अमेरिकेच्या मदतीचा किती निधी यायचा होता व त्यातील किती पैसे कहूताप्रकल्पावर खर्च व्हायचे होते याचीही माहिती त्यांनी मागितली. पण इशाक खान यांनी ती माहिती देण्यास नकार दिला व सांगितले कीं हा अण्वस्त्र प्रकल्प असल्याने त्यांना याबाबत कांहींही माहिती असण्याची गरज नव्हती.
बेनझीरला लल्षात आले कीं पावले न वाजवता चालण्यात कांहींही अर्थ नव्हाता व त्यापेक्षा असलेली व्यवस्था मोडून काढून नवी व्यवस्था उभी करणे जास्त श्रेयस्कर! त्या दृष्टीने त्यांनी तीन्ही सेनदलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष दर्यासारंग इफ्तिकार सिरोहींना बडतर्फ करून PPP वाला मनुष्य त्याजागी आणला. इशाक खान यांनी आग्रह धरला कीं सेनाधिकार्यांना नेमण्याचा किंवा बदतर्फ करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच होता व त्यांनी बेनझीर भुत्तोंनी केलेली नेमणूक रद्द केली! बेनझीरने पुन्हा एकदा लाहोरचे कोअर कमांडर ले. ज. आलम महसूद यांना पूर्ण जनरलची पदोन्नती देऊन भूदलाचे उपसेनापती नेमले. बेग १९९१च्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार होते व त्यादृष्टीने बेगने नेमलेल्या ज. गुल या वारसदारापेक्षा ही नेमणूक जास्त सोयीची होती. पण लष्कराने या नेमणुकीलाही विरोध केला. भुत्तोंच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशांच्या नेमणुकीबाबत व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नेमणुकीबाबतही बेनझीरना नमते घ्यावे लागले.
लष्कर आणि पंतप्रधान यांच्यातील सततची लठ्ठालठ्ठी व अमेरिकेच्या रागीट प्रतिक्रिया यामुळे खानसाहेब भडकले! त्यांना केवळ कहूताच्या संरचनेच्या अद्ययावततेबद्दलच आणि बाँबच्या संरचनेच्या क्षेत्रात PAEC ची त्यांच्यावर होणारी कुरघोडी याबद्दलच काळजी नव्हती तर बेनझीर अमेरिकेच्या आग्रहाखातर पूर्ण कहूताप्रकल्पच थांबवतील अशीही भीती त्याना वाटत होती. म्हणून त्यांनी हक्कानी नावाच्या जुन्या मित्राला व 'द मुस्लिम'च्या भूतपूर्व वार्ताहाराला गाठले. हक्कानींनी पूर्वी ISI व हमीद गुलबरोबर IJI च्या संघटनेबरोबर व नवाज़ शरीफ यांच्याबरोबरही काम केले होते आणि बेनझीरला थांबविण्याचे प्रयत्न केले होते. हक्कानींच्या बरोबरच्या बैठकीत खानसाहेब चिडचिडे झाले होते. त्यांना बेनझीरच्या विरुद्धच्या लोकांकडून बेनझीरवर दबाव आणून पाहिजे होता.
पण यावेळेपर्यंत बेनझीरना घालवणे ही ISI ची गरज झाली होती. अफगाणिस्तानच्या राजकारणातून बाजूला रहाण्याचे वचन न पाळता बेनझीर यांनी गुल यांना युद्ध बंद करण्याबद्दल व कायमचा शांतता प्रकल्प सुरू करण्याबद्दल भाषण दिले होते. त्यात चर्चेत मान्य केलेल्या व रेखीवपणे आखलेल्या दोन्ही राष्ट्रांच्या सीमा आणि मुजाहिदीनना दिलेली शस्त्रास्त्रे ISI ला परत देण्याबद्दलची योजना होती. हे गुलना आवडले नव्हते आणि त्यांनी बेनझीरना जिवे मारण्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली होती. त्यांनी त्याबाबत पेशावर येथे वसलेल्या एक लढवय्या व भांडवलदार मुजाहिदीनची भेट घेतली होती! अद्याप पश्चिम व दक्षिण आशियात कुणाला माहीत नसलेले ओसामा बिन लादेन हे सौदी अरेबियाच्या प्रस्थपित व्यवस्थेबाबत भिन्न मत असलेले गृहास्थ होते. ओसामा बिन लादेन यांच्या कुटुंबियांनी बांधकामाच्या कंत्राटात पैसे कमावले होते व त्यांचे भरभराटीला आलेल्या अनेक मित्रांबरोबर व राजकीय पुढार्यांबरोबर गाढ संबंध होते. ते कंटाळले होते व आयुष्याला नवा हेतू देण्याच्या खटपटीत होते. पेशावरच्या ISI च्या कार्यालयातून त्यांच्याशी दोस्ती झालेल्या ओसामांकडे गुल यांचे एक काम होते. त्यासाठी त्यांनी नवाज़ शरीफ व ओसामा बिन लादेन यांची गाठ घालून दिली. ते दोघे (बिन लादेन व नवाझ) एकत्र येऊन एकादा कू घडवून आणतील व बेनझीरना घालवून देतील अशी आशा गुलना होती. आणखी दोन बैठकी अनुक्रमें पेशावर व लाहोरला झाल्या. बेनझीरला सत्तेवरून खाली खेचणे व तिला संपवणे असे उद्देश यावेळी चर्चिले गेले होते. ओसामाने या मोहिमेचा खर्च करावा आणि बेनझीरला संपवावे असे ते उद्दिष्ट होते. ओसामांनी १ कोटी डॉलर्स उभे केले होते पण ते वापरायला एक अट होती. नवाज शरीफ यांनी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे रूपांतर एका धर्माधिष्ठित मुस्लिम राष्ट्रात करायचे व तिथे शारिया कायदा लागू करायचा, एक रुक्ष ईश्वरसत्ताक राज्य स्थापायचे जे अफगाणिस्तानच्या तालीबानच्या पगड्याखाली वाढेल ही ती अट!
----------------------------------------------------------------------------------------
(१) Chairman of the joint chiefs of staff committee
(२) मद्रासा (madrasah): या धार्मिक शाळा असतात व त्यांचा उपयोग या वेळेपासून अतिरेक्यांना 'घडविण्या'त पाकिस्तानी सरकार करू लागले.
(३) Islami Jamhoori Itihad
(४) An organized political body that exercises power in the name of religion in specific countries such as the Islamic Republic of Iran or the Ottoman Empire.
(५) यांच्या नावाचा उल्लेख दुसर्या प्रकरणात (लोणी कारखाना) शेवटच्या परिच्छेदात आला आहे.
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------
प्रतिक्रिया
7 May 2010 - 1:34 pm | मदनबाण
काका, भाषांतराचा हाही भाग आवडला...
पाकिस्तान स्वतःच्या विनाशाकडे फार वेगाने धावत आहे. पाकिस्तान अमेरिकेकडुन जितकी मदत लाटता येईल तितकी ते लाटतच आहेत.पण पाकिस्तानातले कट्टरपंथी हे पूर्णपणे अमेरीकेच्या विरोधात असुन जर त्यांच्या हातात किरणोत्सारी पदार्थाचा काही भाग जरी लागला (याची शक्यता दिवसेन दिवस वाढत चालली आहे.)तर त्याचा वापर ते डर्टीबाँब च्या स्वरुपात अमेरिकेच्या विरोधात नक्कीच करतील अशी शक्यता जास्त आहे.
सध्या टाईम स्केयर मधे विफल झालेला हल्ला ही एक सुरुवात आहे असेच वाटते.
मदनबाण.....
Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER
7 May 2010 - 3:50 pm | सातबारा
पुढच्या भागाची वाटच पहात होतो. नेहमी प्रमाणेच उत्कंठावर्धक. मुशर्रफ बद्द्ल वाचायला अधीर आहे.
भाषांतर करण्याच्या तुमच्या चिकाटीला सलाम !
अवांतर : ते दोघे (बिन लादेन व नवाझ) एकत्र येऊन एकादा कू घडवून आणतील व बेनझीरना घालवून देतील . कू ला कट म्हणता येईल का ?
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
9 May 2010 - 5:38 pm | सुधीर काळे
कू (coup) म्हणजे प्रहार. Coup d'etat (कुदेता) म्हणजे आघात करून प्रस्थापित सरकार गादीवरून खाली खेचणे. त्यात कट-कारस्थान असू शकते किंवा अचानक बंडाळीही होऊ शकते. मुशर्रफ यांचे गादीवर येणे बहुदा अचानक असावे कारण ते श्रीलंकेहून पाकिस्तानला परत येत असताना नवाज़ शरीफ यांनी त्यांचे (PIA) विमान कराचीला उतरू दिले नाहीं. पण त्यांनी पायलटवर ते उतरविण्याची जबरदस्ती केली व खाली आल्यावर शरीफ यांची उचलबांगडी केली!
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo
10 May 2010 - 6:43 pm | सुधीर काळे
विकीपीडियावरील माहिती:
A coup d'état (English: /ˌkuːdeɪˈtɑː/, French: [ku deta]; plural: coups d'état) is the sudden unconstitutional deposition of a government, usually by a small group of the existing state establishment—typically the military—to replace the deposed government with another body; either civil or military.
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
7 May 2010 - 4:02 pm | Dhananjay Borgaonkar
काका,
नेहमीप्रमाणेच हाही लेख जबरदस्त.
सियाचीन बाबत राजीव गांधींबरोबर झालेली बोलणी हा प्रकार माहित नव्हता मला.
7 May 2010 - 6:32 pm | सुधीर काळे
राजीव गांधी व बेनझीर हे दोघेही फाळणीनंतरच्या (Post-partition generation) पिढीचे होते व त्यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या मनस्ताप व हाल-अपेष्टा स्वत: पाहिल्या/सोसल्या नव्हत्या. त्यामुळे ते दोघे एक नव्या दिशेने प्रवास करतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती.
असेही वाचनात आले आहे कीं जर दोन्ही बाजूचे (भारताच्या बाजूचे व पाकिस्तानच्या बाजूचे) ढुढ्ढाचार्य मधे आले नसते तर एव्हाना भारत-पाक यांच्यातील शत्रुत्व इतिहासजमा झाले असते!
पण दुर्दैवाने तसे झाले नाहीं.
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo