किल्ले दुर्ग आणि ढाकोबा (मुरबाड परिसर)
शनिवारी पहाटे ५.०० च्या सुमारास ठाण्याहुन बाईकवरुन निघालो. दोघेच. मुरबाड एस्.टी. स्टॅन्डवर आलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. वाफाळलेला चहा घेतला आणि रामपुर या दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्याचा रस्ता विचारुन घेतला. स्टॅन्डच्या बाजुनेच जो रस्ता धसईला जातो त्याच रस्त्यावर पुढे रामपुर लागते. रामपुरला येईपर्यंत ८.३० वाजत आले. रामपुर गावात एका घराच्या अंगणात बाईक लावली आणि जरा वाट दाखवायला कोणी मिळ्तय का त्याची चौकशी सुरु केली. रामभाऊ नावाचे एक मामा वाट दाखवायला तयार झाले. लगेच निघालो. सुरवातीला गावच्या शेतातून जाणारी वाट मस्त होती. वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेली शेती आणि मधून झुळू झुळू वहाणारं पाणी ! एकदम झकास. लगेच कॅमेरा बाहेर काढला आणि क्लिकायला सुरुवात केली.
एक टेकाड चढून गेलो आणि मागील बाजूस नाणेघाट - जिवधन रांग दिसायला लागली. साधारण ३५-४० मि. झाली असतील. आधी जाऊन आलो असल्याने पुढ्च्या वाटेचा अंदाज आला होता.
बरोबरच्या रामभाऊंना ईथूनच माघारी पाठ्वण्याचा विचार झाला. एका पसरलेल्या झाडाखाली आम्हीसुध्दा क्षणभर पसरलो.
पसरलेल्या झाडाच्या फांद्या आडवे पडून बघीत्ल्या वर मजेशीर दिसत होत्या लगेच क्लिकलो.
ईथून पुढे दुर्गची खडी चढाई सुरू होणार होती. दुर्गची वॉल झाडीतून दिसत होतीच. तिथून पुढे निघालो तर खुट्यादाराकडे जाणार्या वाटेत एके ठिकाणी दरड कोसळ्ली होती, त्यामुळे पूढची वाट गायब ~X( . मोठ्या प्रयत्नाने वाट मिळाली आणि खुट्यादाराकडे निघालो.
या वाटेला खुट्यादाराची वाट असे म्हणतात, याचे कारण असे की वाटेत काही ठिकाणी दगडामघ्ये खरोखरच लाकडी खुट्या ठोकलेल्या आहेत. या खुट्यांचा आधार घेत वरती जायचे. वाटेत सोप्या श्रेणीचे काही कातळट्प्पेही आहेत.
खुट्यादाराच्या वाटेवरुन दिसणारे विहंगम द्रुश्य
साधारण एक्-सव्वा तासात खुट्यादारातुन वरती आलो आणि थबकलोच. आम्ही एवढे कष्ट घेऊन आलो म्हणून समोर आमच्यासाठी फुलांचा गालीचा ठेवलेला होता. लय भारी. परंतु या गालीच्यामुळे आमची दुर्गची वाट हरवली होती.
थोड्या प्रयत्नांनंतर वाट लगेच मिळाली. १५ मिनीटातच दाट झाडीत लपलेले दुर्गाबाईचे मंदिर नजरेस पड्ले.
दुर्गाबाईचे मंदिरात बसलो, थोडे खाऊन, पाणी पिऊन, जरा वेळ विश्रांती घेतली. लगेच ढाकोबाला जायचे होते. दुर्गाबाईच्या मंदिराच्या मागच्या बाजूने, झाडीतून थोडे खाली ऊतरून गेले की आपण एका पठारावर येतो. या पठारावर एक पाण्याची मोठी विहीर आहे. येथूनच पुढे ढाकोबाला रस्ता जातो. लगेच निघालो. मागे लक्षवेधी दुर्ग खूणावत होता.
पठारावर एक गुराखी आणि त्याचा मुलगा भेट्ले त्यांना पुढची वाट विचारुन घेतली
दुपारचे दोन वाजत आले होते, साधारण २ ते २.३० तासात (म्हणजे दिवसा उजेडी) ढाकोबाला पोहोचू असा अंदाज होता. त्यामुळे जरा आरामात क्लिकत क्लिकत चाललो होतो. एके ठिकाणि मोठे कोळ्याचे जाळे दिसले. त्याचे वेग-वेगळ्या अॅंगलने फोटो काढले. निवडुंग दिसले कर क्लिक असे सगळे चालले होते.
तासभराच्या चालीनंतर ढाकोबा आणी दुर्ग यांच्या मध्यावर आलो. येथून ढाकोबा आणी दुर्ग दोन्ही छान दिसत होते.
साडेचारच्या सुमारास ढाकोबाच्या देवळात आलो.
मंदिराच्या बाजूला असलेली विहीर
पाणी पिऊन, विश्रांती घेऊन लगेच सनसेट बघायला निघालो. ढाकोबाचा कोकणकडा प्रेक्षणीय आहे. क्ड्याच्या समोरच नाणेघाट, जिवधन, कळसुबाई रांग सुरेख दिसते. फोटो काढ्णार तर बॅटरी डाऊन, एक्स्टॉ सेल सॅक मध्ये, सॅक देवळात :( . डोळे भरून सर्व पाहून घेतलं आणि पुन्हा देवळात आलो. जेवलो आणि झोपलो. दुसर्या दिवशी सकाळि ऊठ्लो चहा प्यायला, मॅगी खाल्लं आणि १० च्या सुमारास निघालो. ढाकोबाहुन दार्या घाट मार्गे इष्टाच्यी वाडी ईथून किंवा पळू गावातुन पुढे मुरबाड गाठता येतं पण या वाटेने जाऊन झालेल अस्ल्याने आणि आमची बा़ईक रामपुरला असल्याने आम्ही आल्या वाटेने म्हणजे पुन्हा दुर्ग- खुट्यामार्गे रामपुरला जायचे ठरवले.
परतीच्या वाटेवरुन दिसणारे कळसुबाई-अलंग-माळशेज रेंज
वाटेत दिसलेली गो. नी. दांची पावसफुले
साधारण ३.३० च्या सुमारास पुन्हा रामपुरला आलो. बाईक काढली आणि ७.०० वाजता नाक्यावर हजर. :H
गडप्रेमी बज्जु
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 3:13 am | पिंगू
बज्जु अतिशय छान फोटु काढले आहेत........ खासकरुन कोळ्याचे जाळे तर अप्रतिम........
25 Mar 2010 - 6:05 am | बेसनलाडू
पावसफुलेही छानच आली आहेत.
(वाचक)बेसनलाडू
25 Mar 2010 - 10:37 am | कैलास२४३
आजचा दिवस वसूल कऊन दिलास हे फोटो दाखवून....
धनगराचा फोटो अप्रतीम आला आहे..कोणत्यातरी स्पर्धेत पाठवून दे...!!!
25 Mar 2010 - 11:01 am | बज्जु
धन्यवाद मित्रा,
प्रतिक्रीयेबद्द्ल धन्यवाद. माझ्या फोटोशी कोणाची स्पर्धा होऊ शकते का ? 8} >:)
(फाजील आत्मविश्वासू )
बज्जु
25 Mar 2010 - 9:16 am | प्रचेतस
बज्जुभाऊ, सुरेख फोटो व तितकेच ओघवते वर्णन.
खुट्याच्या दाराची वाट सोपी आहे का? कारण ती फार भयंकर अवघड आहे असे आधी ऐकले होते.
-------
(नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही दुर्ग-धाकोबाला न गेलेला) वल्ली
25 Mar 2010 - 9:44 am | बज्जु
खुट्या दाराची वाट सोपी आहे. प्रथमच जाणार असाल तर रामपुर मधुन माहीतगार माणुस घेणं इष्ट.
नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही
ढाकोबालाही अवश्य जाऊन या. तिथुन(ढाकोबाच्या कोकणकड्याहुन) जीवधन आणि खडा पारशी सुरेख दिसतो. जाण्यासाठी योग्य सीझन पावसानंतर साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
गडप्रेमी बज्जु
25 Mar 2010 - 9:21 am | अप्पा जोगळेकर
झकास फोटो. आता आणखीन एक फुलाळलेला रुट सांगतो.
'सिद्धगड- धमधम्या- आहुपे घाट'. लय भारी रुट आहे.
आणखीन एक. तुम्ही सांदण पाहिले आहे काय?
25 Mar 2010 - 9:46 am | बज्जु
सांद्ण काय प्रकार आहे अप्पा ?
बज्जु
25 Mar 2010 - 10:26 am | प्रचेतस
सांदण किंवा संधान दरी ही रतनगडाजवळ साम्रद गावाच्या वाटेवर आहे. दोन्ही बाजूंना दोन प्रचंड कडे व मधे अतीशय अरूंद दरी असे हे निसर्गनवलच आहे. जवळजळ २ किमीचा हा मार्ग सह्याद्रिच्या मुख्य कड्यावर संपतो.
विकिमेपियावर येथे पहा.
-------
(सह्याद्रीप्रेमी) वल्ली
25 Mar 2010 - 10:44 am | बज्जु
धन्यवाद वल्ली,
सुरेख फोटो. विकिमेपियावर सुध्दा पाहिले. आम्ही बाण मार्गे रतनगडावर गेलो होतो. त्या रुट्च्या बाजुलाच ही दरी दिसतेय. आधी माहीत नव्ह्ते. पुन्हा भेट द्यायला हरकत नाही.
बज्जु
25 Mar 2010 - 11:27 am | अमोल केळकर
निसर्गाचा सुंदर अविष्कार चित्रबध्द केल्याबद्दल धन्यवाद
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
25 Mar 2010 - 11:41 am | विमुक्त
फोटो भारी एकदम...
25 Mar 2010 - 11:56 am | झकासराव
छान फोटो आणि वर्णन :)
25 Mar 2010 - 6:22 pm | मेघवेडा
फोटो एकदम क ड क!!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
26 Mar 2010 - 9:56 am | बज्जु
सर्व प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद
गडप्रेमी बज्जु