फसवणूक-प्रकरण तिसरे: "मृत्यूच्या दरीत"

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 11:47 am

फसवणूक-प्रकरण तिसरे: "मृत्यूच्या दरीत"
(या लेखातील सर्व मतें मूळ लेखकद्वयींची आहेत)
अखेरीस १८ मार्च १९७८ रोजी लाहोरच्या उच्च न्यायालयाने भुत्तोंना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्या वकीलांनी अपील करायचा निर्णय घेतला पण बेनज़ीरला माहीत होते कीं सर्वोच्च न्यायालयही लाहोर कोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच करेल व ती शिक्षा ताबडतोब अमलात आणली जाईल. तिने मुर्ताझाला(१) ताबडतोब वॉशिंग्टनला जाऊन तिचे कॉलेजमधील सहविद्यार्थी पीटर गॅलब्रेथ (जे त्यावेळी प्रतिनिधिगृहात सिनेटच्या परराष्ट्रसंबंधांबद्दलच्या समितीचे सल्लागार म्हणून काम करत होते) यांना भेटून त्यांच्याकरवी केनेडी कुटुंबियांची, किसिंजरची, रॉकफेलरची, बुश-४१ची व राष्ट्रपती कार्टर यांची भेट घ्यायला सांगितले. मुर्तझाने खूप मेहनत घेतली आणि परिणामत: इस्लामाबादला क्षमायाचनेसाठी आलेल्या अर्जांचे ढीग पडले. पण झियांवर त्यांचा कांहींही परिणाम झाला नाहीं. ते म्हणत कीं कुणीही अपरिवार्यही नाही व कायद्यापेक्षा वरचाही नाहीं.

सिहाला येथे खान यांना शोक करायलाही वेळ मिळाला नाहीं. ४ एप्रिल रोजी जेवताना त्यांनी हेनीला त्यादिवशीच्या यशस्वी प्रयोगाबद्दल सांगितले कीं त्यांनी UF6 वायूचा P-1 सेंट्रीफ्यूजमध्ये घातला व शुद्धीकृत युरेनियम मिळविले. "मी आज पाश्चात्य राष्ट्रांची मक्तेदारी नष्ट केली आहे." असे ते तिला म्हणाले. त्यांनी गुलाम इशाक खान व आगाशाही (वित्त व परराष्ट्र मंत्री) यांना अधिकृतरीत्या पत्र लिहिले. पण झियाने अण्वस्त्रांवरचा मुलकी अधिकार खालसा केलेला होता व स्वत:चे "चीफ ऑफ स्टाफ" ज. अरिफ यांची सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

भुत्तोंना लष्कर अण्वस्त्रांवर पकड बसवेल याची आधीपासूनच काळजी होती. म्हणूनच १९७२च्या त्यांनी मुलतानच्या बैठकीला एकही सेनाधिकारी बोलावला नव्हता. लष्कराला बंधकामाकरिता, सुरक्षेसाठी आणि ISI अधिकार्‍यांना घटकभागांच्या शोधासाठी वापरले होते. पण आता खान लष्कराच्या अधिपत्याखाली आले.

जुलै ७७ सालच्या त्यांच्या पहिल्या-वहिल्या भाषणात झियांनी स्वत:ला "इस्लामचा शिपाई" असे संबोधून लष्कर व धर्म यांची सांगड घातली. झियांचे घराणे जलंदरचे आणि ते सौदी अरेबियाच्या 'वहाबी' पंथाला जवळच्या 'देवबंदी' पंथाचे कट्टर उपासक होते. "सुन्ना" या प्रेषक महंमद यांच्या जीवनावर आधारित आदर्श जीवनपद्धतीवर पूर्ण निष्ठा असणारे झिया हे एक मौलवींची मनोरचना असलेले लष्करी अधिकारी होते व त्यांनी पाकिस्तानमध्ये ब्रिटिश कायद्यावर आधारलेल्या दंडधारासंहितेऐवजी शारि’या कायदा लागू करण्याची तयारी केली.

धर्म व जमल्यास 'बाँब' या दोन्हीबद्दल झियांच्या योजना होत्या. त्यांना हा युरेनियम शुद्धीकरणाचा व अण्वस्त्र बनविण्याचा प्रयोग फक्त पाकिस्तानसाठी नव्हे तर सार्‍या 'उम्मा'साठी(२) यशस्वी व्हायला हवा होता. थोडक्यात झियाने अणूबाँम्ब बनायच्या आधीच तो सगळ्या मुस्लिम जगाला अर्पण केला होता.

दहा वर्षें ज. आरिफ यांनी झियांचे सेनाध्यक्ष (Chief of Army Staff) व कहूता प्रकल्पाचे उपाध्य़क्ष अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पाडल्या. आता सेवानिवृत्त झालेले आरिफ ती दहा वषें पाकिस्तानातले सर्वात दुसर्‍या क्रमांकाचे बलवान नागरिक होते. पूर्वी कहूता प्रकल्पाच्या इमारतींच्या कामासाठी लष्कराच्या मुख्यालयात आलेले असतांना खानसाहेबांना भेटल्याची त्याना आठवण होती. खानसाहेबांच्या युरेनियम शुद्धीकरणाच्या यशाची बातमी कळल्यावर आरीफ य़ांनी त्यांचे अभिनंदन केले व तो दिवस पाकिस्तानसाठी सर्वात महत्वाचा दिवस होय असे उद्गार काढले. भुत्तोंना ही बातमी तुरुंगात मुनीर यांच्याकडून कळली. नंतर भुत्तोंना रावळपिंडीच्या तुरुंगात फाशीचे कैदी (death-row prisoner) नं. ३१८३ म्हणून हलविण्यात आले.

खानसाहेबांनी आपली निष्ठा आता झियांना अर्पिली. त्यांनी स्वत:ला त्यांच्या कामात झोकून दिले. कॅनडात रहाणार्‍या अजीजसाहेबांच्या(३) मैत्रीत त्यांना विरंगुळा लाभे. सुरुवातीला खाननी अजीजसाहेबांनाही कहूताला आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. नंतर अजीजसाहेबांशी जगातील सर्वात गुप्त कार्यक्रमाबद्दल सहज पकडला जाऊ शकणारा असुरक्षित पत्रव्यवहार सुरू करण्याची चूक त्यांनी केली. खानसाहेबांचे पहिले पत्र अजिजना जून १९७८मध्ये मिळाले. त्यात खानसाहेबांनी अमेरिकच्या इमर्सन कंपनीची उपकंपनी इमर्सन इंडस्ट्रियल कंट्रोल्स् या ब्रिटिश कंपनीकडे अर्न्स्ट पिफ्फलमार्फत मागविलेल्या high-frequency inverters समजून घेण्यासाठीचे बरेच प्रश्न विचारलेले होते. या उपकरणांबद्दलची पत्रके (Manuals) कॅनडाहून आली होती. इमर्सन कंपनीने 'तस्सेच' inverters कॅपेनहर्स्ट (चेशायर) येथील ब्रिटिश न्युक्लियर फ्युएल्सला पुरवले होते. एवढे असूनही कुठल्याच कंपनीने धोक्याची घंटा वाजविली नाहीं!

खानसाहेबांनी मोठ्या उत्साहात ४ जून रोजी UF6 वायू त्यांच्या सेंट्रीफ्यूजच्या प्रतिकृतीत घालून जे शुद्धीकृत युरेनियम वाहेर काढले त्याची कार्यक्षमता शास्त्रीय हिशेबाइतकीच चांगली आली. खान म्हणाले कीं मग ते त्यांच्या वरिष्ठांकडे या कार्यक्रमासाठीच्या अंदाजपत्रकातून आणखी पैसे मागायला गेले. ही सुवार्ता ऐकून त्यांचे वरिष्ठही खूष झाले. त्यांनी खानसाहेबांचे अभिनंदन केले व त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

मुख्य कहूता कारखान्याचे कामही तुफान वेगात चालले होते. जपानहून आलेला व सिमेन्सचा असे दोन गट तिथे कार्यरत होते. स्वित्झरलंडच्या "कोरा" कंपनीकडून आलेली वायूकरणाची व पुनर्घनीकरणाची यंत्रसामुग्री तीन C-१३० जातीच्या वाहतुकी विमानात घालून आधीच पोचली होती. वातानुकूलनतज्ञ जावेद मिर्ज़ांना यंत्रसामुग्रीच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले होते. ब्रि. सजवाल लवकरच नियंत्रण कक्षाचे (control room) काम संपवण्याच्या बेतात होते.

कार्यक्षम परदेशस्थ पाकिस्तान्यांना कहूतात काम करण्यास उद्युक्त करण्यासाठी खानसाहेबांनी परदेशी वृत्तपत्रांत जाहिरातीवर जाहिराती दिल्या. त्यात सरकारी नोकरी, लठ्ठ पगार, पेन्शन याशिवाय इस्लामाबाद येथे नवी घरे (जी आजन्म त्यांचीच रहातील) अशी प्रलोभने दाखवली व इच्छुकांनी पाकिस्तानच्या औद्योगिक प्रगतीसाठी त्या-त्या देशातील दूतावासात जाऊन अर्ज करायला सांगितले. त्यांनी अजीजसाहेबांनाही त्यांच्या माहितीतील परदेशस्थ पाकिस्तान्यांची माहिती देण्यास सांगितले. अजीजसाहेबांनी अमेरिकेतील व कॅनडातील वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झालेल्या लोकांची यादी पाठवली. थोडक्यात काय तर खानसाहेबांना उच्चपदी कर्तृत्ववान माणसेच हवी होती.

दरम्यान ब्रिटिश सरकारला खानसाहेबांचे हे 'जाळे' अचानक आढळले ते मत्सरापोटी! Inverters च्या पहिल्या आयातप्रकरणी अर्न्स्ट पिफ्फलने किमतीच्याबाबतीत आपल्याला फसविले अशी खानसाहेबांची धारणा झाली व त्यांनी पहिल्या २० inverters च्या पुरवठ्यानंतरची पुढची मागणी ग्रिफिनकडे नोंदविली. परिणामत: नाराज झालेल्या पिफ्फलने मजूर पक्षाचे खासदार श्री. अलाऊन यांच्याकडे हे inverters पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पात वापरले जाणार आहेत अशी कागाळी केली. खा. अलाऊन हे युद्धविरोधी मोहिमेचे अध्वर्यू होते व त्यांनी 'कॉमन्स'मध्ये याबाबत प्रश्न विचारला. परिणामत: ऊर्जामंत्री श्री बेन यांनी खास चौकशीचा हुकूम दिला व तोवर या निर्याती गोठवून टाकल्या.

'कॉमन्स'च्या चौकशीत असे आढळून आले कीं पिफ्फल्ने इमर्सन कंपनीच्या स्विंडन कारखान्यातून या आधी २० inverters पाकिस्तानला पुरवले होते. इमर्सन कारखान्यातील सर्वांना हे inverters युरेनियमच्या शुद्धीकरणप्रकल्पातच वापरले जाणार याची खात्री होती पण त्यांनी याबाबत कांहींच कारवाई केली नाहीं कारण त्यांना खात्री होती कीं पाकिस्तानी लोक इतकी अत्याधुनिक व गुंतागुंतीची यंत्रसामुग्री कधीच वापरू शकणार नाहींत व ती ठेवल्या ठिकाणी गंजून जाईल. पण जेंव्हा त्यांना पाकिस्तानी तंत्रज्ञांनी या invertersमध्ये अत्यंत गुंतागुंतीचे फेरबदल सुचविले तेंव्हा इमर्सन कंपनीच्या उच्चपदस्थांना आपल्या गिर्‍हाइकाला कमी लेखण्याची चूक केल्याची जाणीव झाली.

बेन यांच्या चौकशीतून असे निष्पन्न झाले की पिफ्फलने पाठविलेली यंत्रसामुग्री जरी कायदेशीर असली आणि ब्रिटनची कांहींही चूक झाली नसली तरी त्यावेळचे नियम परिणामकारक नव्हते.
या चुकीमुळे पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र बनू शकले. पुढे त्यावर्षीच्या नव्हेंबरपासून inverters निर्यात करण्यासाठी परवाना आवश्यक झाला. पण उशीर झाला होता.

त्यानंतर निर्यातीबद्दलच्या कायदेदुरुस्तीमुळे ब्रिटनमधल्या कुणालाही खानसाहेबांच्या कंपनीबरोबर व्यापार करणे अवघड होऊन बसले. या नवीन कायद्यानुसार ग्रिफिनना दोनदा निर्यात परवाना नाकारण्यात आला. कारण खानसाहेबांकडून हवे असलेल्या मालाची यादी आल्याबरोबर त्यातला हुबेहूब प्रत्येक पदार्थ निर्यातनियंत्रणाखाली यायचा. ग्रिफिनचे समर्थन असायचे कीं त्याने या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात हे कधीच विचारले नाहीं व प्रत्येक गोष्ट निर्यातनियमाप्रमाणे विकली. जेंव्हा त्याला अधिकार्‍यांनी सांगितले कीं हे सामान परमाणूप्रकल्पात वापरले जात आहे तेंव्हा तो म्हणायचा की खानसाहेबांचा प्रकल्प परमाणूच्या शांतीपूर्ण उपयोगासाठी आहे आणि यात कांहींच गैर नाहीं. तेंव्हापासून हेच समर्थन ग्रिफिन वापरत असे.

पण अधिकार्‍यांना ते पटले नाहीं व ग्रिफिनना सरकारकडून त्रास होऊ लागला. त्यांच्या बॅंकेच्या सवलती कमी करण्यात आल्या, कर-खात्याचे अधिकारी त्यांना त्रास देऊ लागले, पोलीस त्यांना दारू पिऊन, जास्त वेगाने गाडी चालविल्याबद्दल मुद्दाम पकडू लागले. तरी जेंव्हा ग्रिफिन बधले नाहींत तेंव्हा MI5 कडून त्यांना ५०,००० पौंड देऊ केले गेले. तरीही त्यांनी सांगितले की त्यांची निष्ठा विकाऊ नाहीं. पण खानचे इतर अनेक सहकारी या प्रलोभनाला बळी पडले. उदाहरणार्थ खानसाहेबांच्या कॉम्प्यूटरतज्ञाला ब्रिटिश लोकांच्या बाजूने काम करण्यासाठी 'बेंटली' गाडी देऊ केली. ते त्याने मान्य केले. खानसाहेबांना हे कळल्यावर त्यांनी १९८० साली या फितुराला दरवाजा दाखवला.

या अडचणींवर मात करण्यासाठी ग्रिफिन व अब्दुस सलाम यांनी इंग्लंडच नव्हे तर युरोपबाहेर दुबईच्या free-trade zone मध्ये जायचे ठरविले. ब्रिटनमधून दुबईला निर्यात करणे सोपे आणि दुबईहून हा माल कुठेही पाठवणे सोपे होते.

याकाळी पाकिस्तातील भयभीत जनता सहज हमरातुमरीवर यायची. त्यातही जेंव्हा भुताटकीने पछाडल्यासारखे दिसणारे भुत्तो सर्वोच्च न्यायालयात डिसेंबरमधे आले तेंव्हा ज. आरिफनाही दया आली. भुत्तोंवर खुनाच्या आरोपाखाली खटला चालवल्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा डागाळत होती व ही शरमेची गोष्ट होती असे ते म्हणाले. भुत्तोंनी पुन्हा अमेरिकेवर हस्तक्षेपाचा आरोप केला पण अशा काट्याच्या वेळीही त्यांनी खान किंवा युरेनियम शुद्धीकरणाचा उल्लेख केला नाहीं. पण शेवटी त्यांची ही देशभक्तीही त्यांना वाचवू शकली नाहीं.

२ फेब्रुवारी ७९ला प्रे. कार्टर यांच्या विनंतीस न जुमानता सर्वोच्च न्यायालयाने भुत्तोंचा क्षमाअर्ज फेटाळून लावला. त्याबद्दलची खिन्नता कळवितानाच खानसाहेबांनी सेंट्रीफ्यूजेसची 'साखळी' (cascade) करून युरेनियमचे अण्वस्त्रयोग्य शुद्धीकरण करण्याच्या चांचणीला ते पहिल्यांदाच तयार झाल्याचे अजीजसाहेबांना कळविले. मुख्य कारखान्याच्या कामाने वेग पकडला होता, सेंट्रीफ्यूजेसचे 'बी-१' दालन, प्रयोगशाळा व कार्यालयाची इमारत संपत आली होती. एप्रिलपर्यंत सर्व सेंट्रीफ्यूजेस तिकडे हलवायची योजना होती. पण पाकिस्तानात कर्तबगार मनुष्यबळ मिळत नव्हते.

मार्चच्या अखेरीस सेंट्रीफ्यूजेसची 'सा़खळी' बसवून चालूही झाली. UF6 वायूसाठी उतावीळ झालेल्या खानसाहेब सांकेतिक भाषेत म्हणाले कीं ७९ अखेरीस लोणीकारखाना चालू होईल व केक बनवू लागेल, पण त्यासाठी 'अन्ना'ची नितांत जरूरी आहे.

२८ मार्चचा दिवस गुप्तपणे वावरायचा खानसाहेबांचा शेवटचा दिवस होता. त्या रात्री "त्स्वाइट्स डॉयशं फर्नझेहेन (ZDF)" या पश्चिम जर्मनीतील दूरचित्रवाणीवाहिनीने खानसाहेबांचा 'पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचे प्रमुख' असा पर्दाफाश करताना हा प्रकल्प 'आल्मेलो' येथून चोरलेल्या सेंट्रीफ्यूजेसच्या आराखड्यांवर आधारलेला आहे असा गौप्यस्फोट केला. ही बातमी युरोप व उत्तर अमेरिकेत एकाद्या वणव्यासारखी भडकली व त्यामुळे डच गुप्तहेरसंघटनेला चौकशी सुरू करणे भाग पडले.

खानसाहेबांच्या घूसखोरीच्या व चोरीच्या प्रत्येक घटनेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल स्वत:ला झोडपून घेण्यापेक्षा डच सरकारने सार्‍या चुका लपवून ठेवण्याचे ठरविले. वित्तमंत्रालयाने/सरकारने ठरविले कीं हॉलंडमधून पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्पाला काडीचीही मदत झालेली नाहीं. खासगीत युरेंको, FDO, UCN, वित्तमंत्रालय यांनी एक-दुसर्‍यावर चूक ढकलली व खानसाहेबांच्या भूतपूर्व प्राध्यापकांना व सहविद्यार्थ्यांना शिफारसपत्रे दिल्याबद्दल दोषी धरले. पण हे सर्व चालू असताना FDO चा विक्रिखात्याचा मॅनेजर इस्लामाबादला खानसाहेबांचा पाहुणचार घेत होता.

त्यामुळे मे १९७९ च्या अंतरिम अहवालात खानसाहेबांना युरेंकोच्या सेंट्रीफ्यूज-तंत्रज्ञान-संशोधन विभागांच्या अतीशय कमी महत्वाच्या विभागांतच प्रवेश होता असे जेंव्हा जाहीर झाले तेंव्हा कुणालाच आश्चर्य वाटले नाहीं. खानसाहेबांच्या चांभारचौकशांबद्दल तक्रार करणार्‍याना सज्जड दम देण्यात आला, फीरमनना अटक करून त्यांची डच गुप्तहेरखात्यातर्फे कसून चौकशी करण्यात आली व त्यालाही दम भरण्यात आला कीं त्याने या विषयावर तोंड बंद ठेवावे कारण त्यात हॉलंडला धोका आहे. पण दुसर्‍या एका अती गुप्त चौकशीत खरी परिस्थिती सांगताना BVD ने मंत्र्यांपुढे कबूल केले कीं १९७५ साली पाकिस्तानला कायमचे जायच्या आधी खानसाहेब महिनोन्महिने माहिती चोरत होते व त्यात CNOR/G-2 सेंट्रीफ्यूजेसच्या संरचना व ड्रॉइंग्जसुद्धा होती. इतकेच नव्हे तर युरेंकोच्या शास्त्रज्ञांनी जी-२ पेक्षाही जास्त सुधारित 4-M जातीचे सेंट्रीफ्यूज शोधले होते त्याचीही ड्रॉइंग्ज पाकिस्तानात असण्याची शक्यता होती.

१९७५ साली फीरमनच्या शंकांबद्दल, १९७६ साली खानसाहेबांच्या FDO च्या अधिकार्‍यांना विचारलेल्या तांत्रिक चौकशीबद्दल, १९७७ साली FDO च्या कंत्राटदारांनी CNOR चे घटकभाग पाकिस्तानला विकल्याबद्दल ब्रिटनला व जर्मनीला अंधारात ठेवल्याचा त्यांना खूप संताप आला. इस्रायलला इस्लामी बाँबपासून सर्वात जास्त खतरा होता त्यामुळे तेही भडकले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी डच पंतप्रधानांना पत्र लिहून पाकिस्तान, इराण व लिबिया यांना अण्वस्त्रसज्ज बनविल्याने इस्रायलच्या सुरक्षिततेवर उद्भविलेल्या नव्या संकटाबद्दल सविस्तर लिहिले पण काहींही उपयोग झाला नाहीं. वॉशिंग्टनचा तर BVD काडीचाही विश्वास नव्हता. कार्टर यांनी CIA ला स्वत:ची वेगळी चौकशी करून खानसाहेबांनी 'कसे', 'कधी' व 'काय' चोरले याचा अंदाज घेण्याच्या आज्ञा दिल्या.

इस्लामाबादमधील क्षोभाचा अण्वस्त्रप्रकल्पावर कांहींच परिणाम झाला नाहीं. १९७९च्या मार्चअखेरीस खानसाहेबांना झियाकडून आढावा देण्याबद्दल बोलावणे आले. आदल्या दिवशी जाग्रण करून बनविलेले एक १०-पानी पत्र घेऊन ते गेले. त्यात झियांनी भुत्तोंना माफ करावे अशीही शिफारस होती.

पण झियांनी ती विनंती धुडकावून लावली. खोट्या आरोपांखाली न केलेल्या गुन्ह्याबद्दल खटला घातल्यानंतर भुत्तोंना सोडून दिल्यास ते नक्कीच सूड उगवतील अशी झियांना खात्री होती. झियांनी त्यांना ३ एप्रिलच्या पहाटे फाशी देण्याची तयारी सुरू केली. त्या दिवशी खूप वारा असल्यामुळे भुत्तोंचे शव त्याच दिवशी रावळपिंडीहून भुत्तो कुटुंबियांच्या 'लारकाना' येथील कबरस्तानाच्या जागी पोचवणे अशक्य होईल असे हवामानखात्याने सांगितल्यामुळे भुत्तोंना आणखी एक दिवस जगू देण्यात आले.

३ एप्रिलला बेनझीर व नुसरत (पत्नी) यांना शेवटच्या भेटीसाठी रावळपिंडीला आणण्यात आले. आरिफ म्हणाले कीं भुत्तोंनी धीरोदात्त मुद्रा ठेवली होती. नुसरतबाई शांत पण मानसिक तणावाखाली होत्या, तर बेनझीर मात्र कोसळली, हुंदके देत रडू लागली. पित्याने लेकीला परदेशी जायचा सल्ला दिला. तुरुंगाच्या गजातून त्यांचा हात पकडून ती म्हणाली, "बाबा, तुम्ही लोकशाहीसाठी सुरू केलेला लढा मी चालूच ठेवेन."

३ तारखेच्या संध्याकाळी जेलरनी भुत्तोंना जमीनीवर बसलेले पाहिले. भुत्तोंनी कागद, पेन व दाढीचे सामान मागविले. बहुदा त्यांना मुल्लासारख्या चेहर्‍याने मरायचे नव्हते. ते जवळ-जवळ दीड तास लिहीत राहिले. रात्री दहा वाजता त्यांनी आपल्या खोलीचा केर काढायला सुरुवात केली. ते विचारात व सैर-भैर झाल्यासारखे भासले. ११ वा. ते झोपले. पहाटे पावणेदोन वाजता त्यांना फाशीच्या कक्षात नेण्यात आले व त्यांच्या गळ्याला फांस लावण्यात आला, चेहर्‍यावर पिशवी चढविण्यात आली व बरोबर दोनच्या ठोक्याला फाशी दिली गेली. कांहीं मिनिटांतच तुरुंगातील डॉक्टरने ते मेल्याचे जाहीर केले.

त्यानंतर कांहींच दिवसांनी लंडनमधील एका छापखान्यातील भारतीय जुळारी तो जुळवत असलेले साहित्य वाचू लागला तेंव्हा त्याला ते भुत्तोंनी तुरुंगातून मृत्युशय्येवरून लिहिलेले साहित्य आहे असे लक्षात आले. ते ३०० पानांचे बाड चोरून पाकिस्तानातून गडबडीने बाहेर काढण्यात आले असावे. भारतीय जुळार्‍याने आपल्या एका मित्राला फोन लावला, त्याने दुसर्‍यला असे करत-करत शेवटी ही गोष्ट भारतीय राजदूतांच्या कानावर गेली. त्यांनी याबद्दल दूतावासातील RAW विभागाला कळवले. RAW ने त्याची प्रत मिळवून दिल्लीला पाठविली व ती श्री गिरीश सक्सेना या RAW च्या उच्चपदस्थाकडे पोचली. भुत्तोंनी "मला जर फाशी देण्यात आले तर" या शीर्षकाखाली आपल्या गुढग्यावर कागद ठेवून लिहिलेले ते मृत्युशय्येवरचे निवेदन होते. भुत्तोंना फाशीवर चढविण्याआधी त्यांच्या देशकार्याला कमी लेखण्यासाठी व त्यांच्यावरच्या खुनाच्या आरोपासंबंधीचे खोटेनाटे पुरावे असलेली श्वेतपत्रिकांची मालिकाच झियाने प्रसिद्ध केली होती. याच श्वेतपत्रिकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने भुत्तोंचे अपील रद्दबातल केले होते. हे निवेदन सक्सेनासाहेबांना मिळेपर्यंत भुत्तोंनी आपल्याविरुद्धच्या आरोपांना इतकी मुद्देसूद उत्तरें दिल्याचे जगाला माहीत नव्हते. भुत्तोंनी लिहिले होते कीं ते मृत्युकोठडीत असून श्वेतपत्रिकांतील खोट्या आणि लज्जास्पद आरोपांचे परिणामकारक खंडन करण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री त्यांना उपलब्ध नव्हती. असे असले तरीही त्यांनी या परिच्छेदांत त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.

भुत्तोंनी स्वत:च्या बचावासाठी लिहिलेला भाग वाचता-वाचता सक्सेना भुत्तोंना त्यांच्या ज्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल अभिमान होता त्या भागापर्यंत पोचले. "मी पंतप्रधानपद सोडून या मृत्युकोठडीत आलो त्यावेळी पाकिस्तान पूर्णपणे अण्वस्त्रसज्ज बनण्याच्या उंबरठ्यावर होते. दक्षिण आफ्रिका व इस्रायल ही राष्ट्रेंही पूर्णपणे अण्वस्त्रसज्ज आहेत हे आपल्याला माहीत आहेच. ख्रिश्चन, ज्यू, हिंदु व साम्यवादी राष्ट्रे अण्वस्त्रसज्ज आहेत. फक्त मुस्लिमांकडेच ही सज्जता नाहीय्. पण ते आता बदलणार आहे. अण्वस्त्राच्या भीतीखाली वावरणार्‍या ८ कोटी पाकिस्तानी जनतेच्या तूलनेत माझ्या एका आयुष्याला काय किंमत आहे?" पाकिस्तान व पाकिस्तानी जनता जगू शकेल याबद्दलचा १९७६ सालचा महान करार त्यांच्या ११ वर्षांच्या परिश्रमपूर्ण व निग्रहपूर्ण सार्वजनिक कामगिरीत महत्वतम मानला जाईल असे भुत्तोंनी लिहिले होते.

पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज होत आहे हे भारताला माहीत होते पण या तिरकस उल्लेखामुळे सक्सेना गोंधळून गेले.
सक्सेना, RAW, संरक्षण व परराष्ट्रखाते येथील अभ्यासक भुत्तोंना काय म्हणायचे असावे याबद्दल विचारात पडले. आपल्या हस्तलिखितात भुत्तोंनी पाकिस्तानच्या परमाणू कार्यक्रमाच्या महत्वाचा ठासून उल्लेख केला होता व त्याअर्थी ते कुठल्या तरी देशाबरोबर झालेल्या कराराबद्दलच बोलत आहेत असे सर्वांना वाटले. भारताला पाकिस्तानचा "युरेनियम शुद्धीकरणप्रकल्प" एक कोडेच होते. भारतीय हेरखात्याला हे माहीत होते कीं हे तंत्रज्ञान पाकिस्तानला युरोपातून मिळाले होते आणि १९७६ पासून खानसाहेबांच्यावर भारतीय हेरखाते नजर ठेवून होते. पण बाँबची संरचना करायला, तो बनवायला किंवा क्षेपणास्त्र बनवायला पाकिस्तानला कोण मदत करणार होते, कहूतासारखा मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प कोण चालवणार होते असे अनेक अनुत्तरित प्रश्न होते कारण पाकिस्तानकडे काहींच नव्हते! पैसे मध्यपूर्वेतून आले होते व रशिया यात नक्कीच गुंतला नव्हता कारण तो भारताला शस्त्रे पुरवत होता. आधी भारतीय हेरखात्याला वाटले कीं भुत्तो फ्रान्सबद्दल प्लुटोनियमच्या पुन:प्रक्रियेबद्दल बोलताहेत. पण तो करार १९७६च्या मार्चमध्येच झाला होता. म्हणजे भुत्तो दुसर्‍याच गोष्टीचा उल्लेख करत होते.

भुत्तोंची ११ वर्षें गृहीत धरल्यास हा रहस्यमय कराराची सुरुवात १९६५ सालची होती. याच वर्षी पहिले भारत-पाक युद्ध झाले होते व याच वर्षी भारत वापरून झालेल्या इंधनाच्या सळ्या प्लुटोनियम पुन:प्रक्रियेच्या तारापूरच्या कारखान्यातून अनधिकृतपणे काढताना पकडला गेला होता व या घटनेमुळे सार्‍या जगात भारत प्लुटोनियम बाँब बनवीत आहे असा समज झाला होता. याचवर्षी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली मदत थांबविली होती व याच वर्षी भुत्तोंनी वल्गना केली होती कीं एक वेळ पाकिस्तानी लोक गवत खाऊन जगतील पण स्वत:चा अणूबाँब बनवितील. याच वर्षी पाकिस्तान व चीन यांच्यात व्यापारकरारही झाला व चीनने पाकिस्तानला काश्मीरप्रश्नावर उघड पाठिंबाही दिला होता. त्याक्षणी सक्सेनांची "ट्यूब" पेटली. भुत्तोंची सर्वात जास्त महत्वाची कामगिरी होती चीनबरोबर झालेला बाँबबांधणीबाबतचा करार!

चीनबरोबरच्या खास राजनैतिक संबंधांच्या यशस्वी वाटाघाटीचे शिल्पकार होते आगाशाही. त्यांनी सक्सेनांचे अनुमान बरोबर असल्याचे मान्य केले. ते लेखकद्वयाला म्हणाले की १९६५ साल पाकिस्तानला निर्वाणीचे होते. पाकिस्तानने चीनबरोबर केलेल्या कराराने पाकिस्तानला जे सहाय्य अनेक पिढ्या उपलब्ध करून दिले गेले ते इतरत्र कुठेच मिळाले नसते. १९७१ सालापर्यंत चीनमधून हद्दपार केले गेलेले चॅंग-काई-शेक अमेरिकेच्या सहाय्याने चिनी जनतेचे प्रतिनिधित्व करत, पण पाकिस्तानने जेंव्हा चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षापरिषदेचे कायमचे सदस्य बनविण्याच्या कामगिरीत पुढाकार घेतला तेंव्हा ते दोन देश आणखीच जवळ आले. आगाशाही त्यावेळी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत होते. ते म्हणाले कीं पाकिस्तानने १३ राष्ट्रांची समिती बनविली होती व जेंव्हा अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातले तेंव्हाचे राजदूत बुश-४१ आगाशाहींना म्हणाले कीं तैवानला काढून टाकू नका तेंव्हा त्यांनी त्यांच्या बेजिंगयेथील राजदूताला सल्ला दिला कीं कांही लोक चीनच्या बाजूला आहेत तर कांहीं तैवानच्या. तरी चीनने राजनैतिक दबाव चालू ठेवावा. दुसर्‍या दिवशी आगाशाहींच्या समितीचा विजय झाला व चीन प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघटनेत सामील झाला.

१९७१ साली जेंव्हा पूर्व पाकिस्तानवरून पाकिस्तान-भारत युद्ध झाले त्यावेळी चीन पाकिस्तानच्या सहायासाठी धावून आला. त्याने भारताच्या सिक्किम सीमेवर सैन्याची जमवाजमवही केली. पण भारताने जेंव्हा लोपनोर येथील चीनच्या अण्वस्त्रकेंद्रावर बाँबहला करण्याची धमकी दिली तेंव्हा ते मागे हटले. पुढच्याच वर्षी भुत्तो सत्तेवर आले व त्यांनी चीनबरोबर शस्त्रास्त्रखरेदीबाबत अनेक करार केले व पुढच्याच वर्षी जेंव्हा भुत्तो चीनला गेले तेंव्हा शास्त्रज्ञ व लष्करी तज्ञ यांची मोठी तुकडी बरोबर घेऊन गेले व आधीचे करार बळकट करून आले.

चीनने परमाणूतंत्रज्ञानाबाबतीत ६० साली कॅनडाकडून पाकिस्तानला मिळालेली 'KANUPP' अणुभट्टी चालवायला घेतली कारण अमेरिकेच्या दबावाखाली तिची मरम्मत करायला कॅनडा तयार नव्हता. १९७६ साली ती थांबलीच होती पण भुत्तो परत आल्याबरोबर चिनी तंत्रज्ञ आल्याचे अमेरिकेच्या हेरयंत्रणेने पकडले. अमेरिकेने UF6 वायू पुरविणे बंद केल्यामुळे व खानसाहेबांची योजनाही रखडल्यामुळे व पाकिस्तानकडे तो बनवायची यंत्रणा नसल्यामुळे चीनने तोसुद्धा पुरवायची तयारीही दर्शविली अन्यथा तो प्रकल्पच रखडला असता. युरेनियम शुद्धीकरण करणारे फारच थोडे देश आहेत त्यापैकी या दोन देशात सहकार्य सुरू झाले. चीनने अण्वस्त्राची शक्ती वाढवणारे ट्रिटियमसुद्धा पाकिस्तानला पुरवले व बाँब बनविण्याच्या व अण्वस्त्र वाहू शकतील अशा क्षेपणास्त्रांच्या संरचनाही दिल्या. चीनने अशा तर्‍हेने अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कराराला जाणूनबुजून सुरुंग लावला.

ज. आरिफ म्हणाले कीं चीन हा देव न मानणारा, खुल्या बाजारपेठेच्या विरोधी व हुकुमशाही देश आहे. पण गेल्या ५० वर्षांत चीनने व पाकिस्तानने एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत एकदाही ढवळढवळ केलेली नाहीं. चीनने कधीही पैसे घेतले नाहींत किंवा अटीही घातल्या नाहींत. पुढे झियांच्या काळात झियांनी पैसे द्यायची तयारी दर्शविली तेंव्हा चीनने स्वत:च्या संयुक्तराष्ट्रप्रवेशाच्या वेळच्या पाकिस्तानच्या सहाय्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून पैसे घ्यायला नकार दिला.

७९च्या एप्रिलमध्ये कहूताबद्दल कॅनडाच्या वृत्तपत्रांत गदारोळ चालला होता व सर्व वार्ताहार खूपच प्रचार करत होते. याचा उल्लेख करत अजीजसाहेबांनी विद्युतउपकरणांबाबत मोटोरोला, वेस्टिंगहाऊस व युनियन कार्बाईड या कंपन्यांकडून मिळविलेली माहिती खानना पाठविली.
मीडियाच्याकडून होणार्‍या विकृतीकरणाला कांहीं मर्यादाच नाहींत आणि सारे जग पाकिस्तानशी जणू वैर करत आहे असे खानसाहेबांना वाटले! पण त्यांना एक गोष्टीचे समाधान होते कीं पाकिस्तानने जगाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतच्या लोकांची जणू झोपच उडवली होती. पण या प्रचारामुळे खानसाहेबांच्या प्रगतीवर वाईट परिणाम होत होता. ब्रिटिश व अमेरिकन कंपन्यांनी त्यांच्याबरोबर केलेले करार रद्द केले होते आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने भुत्तोंना फाशी दिल्याच्या दोनच दिवसानंतर अवैधपणे युरेनियमचे शुद्धीकरण करणार्‍या राष्ट्रांना लागू होणार्‍या "सायमिंग्टन घटनादुरुस्ती"च्या आधारे पाकिस्तानवर पुन्हा निर्बंध लागू केले होते. खानसाहेबांच्या मते त्यांना आणखी सहाच महिने हवे होते!

पण परदेशांहून होणारा घटकभागांचा पुरवठा कधीतरी थांबेल याची भीती असलेल्या खानसाहेबांनी वैकल्पिक योजना केलीच होती. युरोपियन कंपन्यांकडून त्यांनी आधीच सगळ्या मालाचे साचे (moulds) विकत घेऊन ठेवले होते व त्यामुळे ते घटकभागांचे उत्पादन पाकिस्तानात करू शकत होते. चीन पाकिस्तानला कच्चा माल, बाँबच्या व क्षेपणास्त्रांच्या संरचना वगैरेमध्ये मदत करू शकत असला तरी याबाबतीत त्याची मदत अशक्य होती कारण चीन सेंट्रीफ्यूजऐवजी डिफ्यूजनपद्धती वापरत असे. खानसाहेब तर सेंट्रीफ्यूजेसच्याबाबतीत आत्मनिर्भर झाले होते व अद्ययावत यंत्रसामुग्री बनवत होते व ती अमेरिकेच्या अर्ध्या किमतीत निर्यात करून विदेशी मुद्रा कमवायची स्वप्ने बघत होते.

अजीझनी त्यांना कळविले कीं त्याच्या प्रकल्पाबद्दल अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात चर्चा होत होती. पाकिस्तानी लोकांची हुशारी व चतुरस्त्रता पाहून प्रतिनिधींना धक्काच बसला होता. इतकेच काय कीं उपपरराष्ट्रमंत्री पिकरिंग तर म्हणाले कीं त्यांना थांबवायच्या दृष्टीने आता फार उशीर झाल्यामुळे अमेरिका पाकिस्तानचा प्रकल्प थांबवू शकत नाहीं.

कार्टरमंत्रीमंडळ मध्य्पूर्वेतील आणि अफगाणिस्तानातील आणीबाणीला तोंड देण्यात गुंतले असल्याने पाकिस्तानला ताकीद देण्याच्या परिस्थितीत नव्हते. रशियाच्या पाठिंब्याने झालेल्या तख्तापालटामुळे (coup) ७८च्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये साम्यवादी सरकार आले व महत्वाकांक्षी रशियाचा प्रभाव वाढला. रशियन सरकार भारताला एक महत्वाचे मित्रराष्ट्र मानत होते. पाकिस्तानने अमेरिकेला हस्तक्षेप करायचा आग्रह केला पण नुकतेच व्हिएतनामच्या जबड्यातून बाहेर पडलेल्या अमेरिकेला पूर्ण युद्धात पडायचे नव्ह्ते. म्हणून कार्टरनी मर्यादित प्रचार-प्रतिहल्ल्याची परवानगी दिली व पैसाही मंजूर केला. तसेच CIAलाही पाकिस्तानी सीमेवरील पश्तून मुजाहिदीन सैन्याला रशियाच्या पंज्याखालच्या सरकारी सैन्यावर गनिमी हल्ले करायचे प्रशिक्षण व शस्त्रास्त्रे पुरवायची मंजूरी दिली. त्याचवेळी इराणमधील परिस्थितीही बिघडत चालली होती. तिथे ७९च्या फेब्रूवारीत शहा हद्दपार झाले होते व इस्लामिक क्रांतीद्वारे आयातुल्ला खोमेनी नावाचे शियापंथीय धर्मगुरू राज्यावर आले होते. या क्रांतीमुळे पाकिस्तानचेही धाबे दणाणले होते कारण पाकिस्तानला शहांचा जरी तिटकारा असला तरी खोमेनींचा तिटकारा त्याहून जास्त होता. खोमेनींना झियांबद्दल नावड होती व त्यांच्यावर अविश्वास होता. झियांनी ज्या तर्‍हेने भुत्तोंना मारले होते त्याचा खोमेनींना धक्काच बसला होता. (भुत्तोंची पत्नी नुसरत शिया होती!) याउलट पाकिस्तानची २० टक्के जनता शिया होती व पाकिस्तानच्या इस्लामीकरणाकरिता जे सुन्नी कायदे झियांनी लादले होते ते न मानण्याची हिंमत खोमेनींच्या सत्तग्रहणानंतर त्यांना आली होती!

खोमेनींनी अमेरिकेचे उत्तर इराणमधील 'कान' (listening stations-गुप्त बातम्या गोळा करायची केंद्रें) बंद केले. त्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अधिक सक्रीय भाग घेण्याबाबत पाकिस्तानशी चर्चा सुरू केली. पाकिस्तानने अमेरिकेचे नवे "कान व डोळे" बनायला संमती दिली.

तोलास तोल या न्यायाने व पाकिस्तानला अण्वस्त्रतंत्रज्ञानापासून मागे हटविण्यासाठी कार्टरनी एकेकाळी धोरणविषयक निर्देशक असलेल्या व अण्वस्त्रप्रसारप्रतिबंध खात्याचे प्रमुख असलेल्या जेरार्ड स्मिथ यांना खान यांच्या हालचालींची गाजावाजा न करता व झियांना न डिवचता माहिती काढण्याची कामगिरी सोपविली. स्मिथ यांनी त्याआधी "Strategic Arms Limitation Treaty (SALT)"च्या चर्चेत अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. त्याची परिणिती निक्सन-ब्रेझनेव यांच्यात SALT करारावर सहीही झाली होती. स्मिथना मदत करायला परराष्ट्रखात्यातील रॉबर्ट गालुच्ची यांना नेमले.

गालुच्ची तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबतच्या महत्वाकांक्षांचा छडा लावण्यात मग्न होते. त्यांनी आता युरेनियम शुद्धीकरणाच्या प्रकल्पाबद्दलच्या गुप्त माहितीचे पुरावे जमवायला सुरुवात केली. ते IAEA चे निर्देशक झिगवार्ड एकलुंड यांना जून ७९ मधल्या व्हिएन्ना बैठकीत याबद्दल पूर्ण माहिती देण्याच्या तयारीत होते. या अहवालावरून कार्टरना कहूता हालचालींविषयी निर्णय घेण्यात मदत होणार होती. गालुच्ची अहवालाची सुरुवातीची माहिती फारच धक्कादायक होती. त्याबाबत तत्परतेने कारवाई करण्याची आवश्यकता होती. गालुच्चींनी खानसाहेब व अजीजसाहेबांच्यामधील खासगी पत्रव्यवहाराचा मागोवा घेतला. IAEA ला समजतील अशा गोष्टींच्या पलीकडून काम करून, सेंट्रीफ्यूजबद्दलच्या अज्ञानाचा व परिणामत: अमेरिका व पश्चिम युरोपातील निर्यातीबद्दलच्या नियंत्रणात असलेल्या तृटींचा फायदा घेऊन खानसाहेबांनी युरेनियमच्या शुद्धीकरण यंत्रसामुग्रीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू आयात केली होती. एवढेच नव्हे तर सुटे भागही स्वत:च बनवायला सुरुवात केली होती.

खानसाहेबांनी त्यांची पावलं इतकी झपाझप टाकली होती कीं पाश्चात्य हेरसंस्था त्यांची कृत्ये जाणून घेण्याचा प्रयत्नच अद्याप करीत होत्या! १९७८ या एका वर्षांत खानसाहेब स्वयंपूर्ण झाले. खानसाहेबांची सेंट्रीफ्यूजचे स्वरूप व कुठला भाग कुठून आला हे सहज समजावे म्हणून गालुच्चींनी एक रंगीत चित्र बनविले. ते पाहिल्यानंतर पाश्चात्य राष्ट्रांच्या संगनमताची व वरवरच्या अज्ञानाची पातळी थक्क करणारी होती. कांहीं कंपन्यांनी तर आपले प्रतिनिधी कहूताला ठेवले होते व याबद्दलची सरकारकडून चौकशी चालू असतानादखील पाकिस्तानचे डच कंपन्यांवर मागणी नोंदवणे चालूच होते.

स्मिथ व्हिएन्नाला गेले आणि त्यांनी एकलुंडना सज्जड दम मारला. त्याआधी गालुच्ची पाकिस्तानला गेले व राजदूतावासातली गाडी घेऊन ते कहूताला गेले. त्यांना आत जरी जाऊ दिले नाहीं तरी ते कांहीं छायाचित्रे काढू शकले जी त्यांनी एकलुंडना दाखविली. एकलुंडसाहेबांनी अशी विशाल सुविधा बांधल्याचे कळल्याने धक्काच बसल्याचे सांगितले. पण त्यांना या आधी याबद्दलचे खूप इशारे आले होते. इतकेच काय पण युरेंकोच्या इंजिनियरने त्यांना टणक व महाग असलेल्या व फक्त विमानांत व सेंट्रीफ्यूजमध्ये वापरल्या जाणार्‍या "मॅरेजिंग (maraging) स्टील"च्या पाकिस्तानच्या मोठ्या मागणीची झेरॉक्स प्रतही दाखविली होती. पण IAEA तिकडे दुर्लक्ष केले होते!

एकलुंड यांनी हे सर्व जाहीर करायची परवानगी स्मिथ यांच्याकडे मागितली कारण हा बनाव उघडकीला आल्यास पाकिस्तान थांबेल असे त्यांचे मत होते. पण स्मिथ यांनी अशी परवानगी नाकारली. उलट ते म्हणाले कीं पाकिस्तान अजूनही अण्वस्त्र बनविण्याच्या टप्प्यापासून खूप दूर आहे व यातली गुप्तता चालूच ठेवावी. स्मिथ तर तारेवरची कसरतच करत होते जेणे करून पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीप्रकल्पाला एका बाजूला आवर घालता येईल व त्याच वेळी दुसर्‍या बाजूला अमेरिकेची इतर खाती पाकिस्तानी लष्कराशी लाडीगोडी चालू ठेवतील.

पण कांहींच आठवड्यानंतर कहूता आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आलेच कारण गालुच्चींच्या माहितीच्या आधारावर फ्रान्सच्या राजदूतास व प्रथम सचीवास कहूताच्या फार जवळून गेल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती. पाकिस्तानी सुरक्षा अधिकार्‍यांनी त्यांना नंतर अटकेतही टाकले. २४ तासांच्या मौनानंतर झियासाहेबांनी फ्रेंच सरकारला बजावले कीं त्यांचे मुत्सद्दी जर बॉनेटवर फ्रेंच ध्वज लावून गेले असते तर अशी वेळ आली नसती. याला उत्तर म्हणून फ्रेंच सरकारने झियाला बास्तिय्य दिनानिमित्त्यच्या समारंभात बोलावले नाहीं व युगोस्लाव्हियाचा राजदूत आपला ध्वज फडकावत कहूताजवळून अत्यंत हळू वेगाने गाडीचालवत गेला. पण असल्या नाटकी घटना आगामी गंभीर पेचप्रसंगाला लपवू शकत नव्हत्या!

आता सगळ्याच आयाती थंडावल्या! पण खानसाहेबांच्या कल्पकतेमुळे त्याने फारसे बिघडले नाहीं कारण इन्व्हर्टर व ट्रान्सफॉर्मर आता पाकिस्तानातच बनू लागले होते. त्यांची (कृष्ण)कृत्यें जाहीर झाल्यामुळे त्यांनी युरोपमधील वृत्तपत्रांत जहाल पत्रें लिहायला प्रारंभ केला. ते लिहीत कीं स्वत:कडे हजारो अण्वस्त्रे असताना व रोज नवे चांचणीस्फोट करत असतांना पाकिस्तानने या क्षेत्रात छोटेसे पाऊल टाकले तर ते सैतान आणि दुष्ट कसे? पण अमेरिकनांना कहूताप्रकल्प हे "छोटेसे" पाऊल वाटत नव्हते. भूतपूर्व उच्चाधिकारी, तज्ञ शास्त्रज्ञ व लष्करी उच्चाधिकारी यांची एक समिती पाकिस्तानविरुद्ध कडक पवित्रा घ्यायला तयार झाली. त्या समितीच्या निर्देशकांनी सांगितले कीं त्यांना भारताच्या अण्वस्त्रचांचणीसारखीच एक भयंकर भविष्य डोळ्यासमोर दिसत आहे. ज्या निर्यातीवर नियंत्रण व पाकिस्तानला निषिद्ध मालाचा पुरवठा केलेल्या कंपन्यांवर आता आम्ही अमल बसवला असला तरी कदाचित आम्हाला फार उशीर झालेला असावा!

फोर्ड यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केलेल्या स्कौक्रफ्ट यांनी कहूतावर लष्करी हल्ला चढवायचा वादग्रस्त प्रस्ताव मांडला. हेच याआधी जेरार्ड स्मिथनी सुचविले होते व इस्रायलचाही असाच मनसुबा होता.

जरी असा कुठलाही निर्णय घेतला गेला नव्हता तरी अमेरिका कहूताप्रकल्प घातपाताद्वारे किंव कमांडोंच्या हल्ल्याद्वारे नामशेष करण्याची योजना आखत आहे असे वृत्त न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे पाकिस्तानने मिग-१९, मिराज व 'क्रोताल' क्षेपणास्त्रे व विमानविरोधी तोफा कहूताभोवती उभ्या केल्या. अमेरिका व कॅनडा येथे रहाणार्‍या पाकिस्तानी शास्त्रज्ञांवर त्यांनी खानसाहेबांना माल पुरविल्याच्या आरोपाखाली आरोप करण्यात आले होते व त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. हे ऐकल्यावर खानसाहेब खूप भडकले.
एक शेवटचा राजनैतिक उपाय म्हणून स्मिथ यांनी परराष्ट्रमंत्री आगाशाही व आरिफ यांना वॉशिंग्टनला बोलावून घेतले. अफगाणिस्तानात केलेली मदत व इराण्च्या शहाचे पतन याबद्दल कौतुक होईल या आशेने आलेल्या या दोघांना अमेरिकेला फक्त अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलच बोलायचे आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटले.

आगाशाही प्रथम कार्टरना व नंतर ब्रेझेन्स्कींना भेटले. त्यांनी विचारले, "भारताने बाँबचांचणी केली आहे व तुम्ही अण्वस्त्रप्रसाराच्या विरुद्ध आहात मग आम्हासारख्या अण्वस्त्रसज्ज नसलेल्या राष्ट्रांना संरक्षण का देत नाहीं?" पुन्हा नकारघंटा वाजली. मग झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे आगाशाही, आरीफ, राजदूत याकूब व संरक्षणसचीव जिलानी होते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री सायरस व्हान्स, उपपरराष्ट्रमंत्री वॉरन ख्रिस्तोफर आणि दहा-एक CIA चे अधिकारी बसले होते. तिकडे बघून आगाशाही म्हणाले कीं आपल्याला कार्टर काय सोविएत रशिया समजतात कीं काय?

ख्रिस्तोफरनी पाकिस्तानवर NPT करारावर सही करण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने "भारताने केली तर आम्ही करू"चा पाढा चालू ठेवला. ख्रिस्तोफरनी पाकिस्तानकडून वचन मागितले कीं ते हे तंत्रज्ञान इतर राष्ट्रांना देणार नाहींत. याला पाकिस्तान तयार होते. मग ख्रिस्तोफर म्हणाले कीं तुम्ही अण्वस्त्रचांचणी करता कामा नये. आगाशाही म्हणाले कीं आम्ही याच्या आसपासही नाहीं. जेंव्हा तिथे पोहोचू तेंव्हा बघू!

व्हान्स आगाशाहींना शेजारच्या खोलीत घेऊन गेले. तिथे स्मिथ बसले होते. ते म्हणाले, "तुम्ही अण्वस्त्रे बनवून आपली सुरक्षितता वाढवायचा प्रयत्न करीत आहात, पण भारत तुमच्या खूप पुढे गेला आहे व तुम्हाला नष्ट करू शकतो. तुम्ही 'मृत्यूच्या दरी'त(४) प्रवेश करीत आहात." आगाशाही म्हणाले, "तुमच्यासारख्या अण्वस्त्रतज्ञापुढे मी काय बोलणार? पण एवढे नक्की कीं अण्वस्त्रें हातात असणे महत्वाचे आहे त्यांचा उपयोग करणे तितके महत्वाचे नाहीं एवढे मला समजते!" हे ऐकल्यावर स्मिथ निरुत्तर झाले!

इतक्यातच इराणच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या राजदूतावासावर हल्ला करून ६६ अमेरिकन मुत्सद्द्यांना ओलीस ठेवल्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावर आवर घालण्याचा विषय मागे पडला. इराणी विद्यार्थ्यांची मूळ योजना होती तीन दिवस अमेरिकन दूतावासावर कब्जा करून इराणच्या अमेरिकेविरुद्धच्या तक्रारींच्या याद्या (communiqués) एका पाठोपाठ एक प्रसिद्ध करायच्या. पण मग इराण्यांचा विचार बदलला व तेरा महिला व काळ्या अमेरिकन मुत्सद्द्यांना सोडून बाकीच्यांना ओलीस धरून ठेवले. तेवढ्यात एक आवई उठली कीं अमेरिका व इस्रायल यांनी मक्केतील मुख्य मशीदीवर कब्जा केला आहे. त्याबरोबर सार्‍या मुस्लिम जगतात संतापाची लाट उसळली व २१ नव्हेंबरला जमात-ए-इस्लामी या संघटनेने अमेरिकेच्या पाकिस्तानातील दूतावासावर हल्ला करून ती इमारत जाळली. त्यात चार लोक मृत्यू पावले. अमेरिकेच्या कराचीतील उपदूतावासात घुसण्याचा प्रयत्न झाला व कांहीं आठवड्यात त्रिपोली येथील दूतावासावरही हल्ला झाला पण अमेरिकेच्या मरीन्स फौजेने तो परतवला.

दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे जरी राजनैतिक संबंध कडवट झाले तरी सत्य परिस्थिती अशी होती कीं अमेरिकेला या भागात दुसरा कुठलाच मित्र उरला नव्हता. आगाशाहींना कूर्ट वाल्डहाईमकडून ओलीस ठेवलेल्या मुत्सद्द्यांच्या मदतीसाठी आलेल्या विनंतीनुसार ते खोमेनींना पुन्हा मार्चमध्ये भेटले. आयातुलांना त्यांनी पाकिस्तान कसे इराणी क्रांतीला मान्यता देणारे पहिले राष्ट्र होते याची आठवण करून दिली व म्हणाले कीं तुमचे मित्रही म्हणताहेत कीं ओलीस ठेवणे कायद्याविरुद्ध आहे. खोमेनी उत्तरले कीं तुम्ही त्यांना मुत्सद्दी म्हणत असाल पण ते तर पक्के गुप्तहेर आहेत. आगाशाहींनी खोमेनींना एकदा वल्डहईम यांची भेट घ्यायची विनंती केली. त्याला उत्तर म्हणून खोमेनी म्हणाले कीं तुम्ही आमच्या हुतात्म्यांची थडगी पहा आधी.

पण या वाटाघाटी अचानक थांबल्या कारण इराणचे नवे नेते रफसंजानी यांनी त्यांना रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसल्याचे आगाशाहींना सांगितले. एक साम्यवादी देश एका मुस्लिम राष्ट्राला गिळत होता! केजीबीच्या एका तुकडीने अफगाणिस्तानच्या गणवेषात येऊन पंतप्रधान अमीन यांना व त्यांच्या मैत्रीणीला गोळ्या घातल्या होत्या. रशियाचे ८५,००० सैनिक काबूलकडे निघाले होते. आगाशाही पहिले विमान पकडून इस्लामाबादला आले.

अमेरिकेपुढे फारसे पर्याय नव्हते. कारण रशिया दक्षिण आशिया व मध्यपूर्वेतील राष्ट्रेही गिळंकृत करण्याची शक्यता होती. पुढचे आक्रमण इराणवर असण्याची शक्यता होती. ब्रेझिन्स्कींच्या दृष्टीने रशियाला थांबविणे आवश्यक होते. पण स्वत:चे सैन्य पाठवायला अमेरिका तयार नव्हती. म्हणून अफगाणिस्तानी बंडखोरांच्या सहाय्याने लढाई करायचा त्याचा सल्ला होता. उघड मदत करून रशियाला डिवचून चालले नसते कारण त्यात पाकिस्तानचा बळी पडला असता. मग पाकिस्तान्च्या मदतीने अमेरिकेची रसद आखाती प्रदेशातून पाकिस्तानमधून पेशावरमार्गे खैबरखिंडीतून अफगाणिस्तानला पोचविणे हा एकच मार्ग होता. याला ISI संघटनेचा पाठिंबा हवा होता व अमेरिकेची प्रचंड आर्थिक मदत हवी होती.

पण एक अवघड प्रश्न होता. वरील सर्व साध्य होण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानला विश्वासात घ्यायला व बंडखोरांना मदत करायला उद्युक्त करायला हवे. यासाठी आपल्या पाकिस्तानबरोबरच्या धोरणात मूलभूत बदल व्हायला हवा, त्याला आश्वासने द्यायला हवीत, जास्त शस्त्रे द्यायला हवीत व आपल्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या धोरणाची सुरक्षाधोरणावर कुरघोडी होता कामा नये. थोडक्यात ब्रेझिन्स्की कार्टरना ज्या मूळ मुद्द्यावर ते निवडून आले होते त्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या धोरणालाच सोडायला सांगत होते. तोवर अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या बंडखोराना फक्त ५ लाख डॉलर्स तेही CIA च्या अंदाजपत्रकातून व "राजनैतिक थैली"द्वारा अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या अपरोक्ष रोकड मिळत होते. पण आता लागणारी अधिक रक्कम प्रतिनिधीगृहाच्या संमतीने द्यावी लागणार होती व प्रतिनिधीगृहाने पाकिस्तानवर युरेनियम शुद्धीकरणाबद्दल जाब विचारला होता. त्यामुळे सायमिंग्टन घटनादुरुस्तीनुसार अमेरिकची आर्थिक व लष्करी मदत बंद करावी लागणार होती. खानसाहेबांनी केलेल्या तस्करीबद्दलच्या "लंडन ऑब्झरवर"मध्ये आलेल्या कोलिन स्मिथ व श्याम भाटिया यांनी लिहिलेल्या लेखावर खानसाहेब भडकले. त्यांच्या मते हा लेख इतका हीन व अश्लील होता कीं त्याच्याबद्दल विचार करणेही अपमानास्पद होते.

पण तरीही त्यांनी त्या लेखाला असत्य विधानांनी व अप्रत्यक्ष टोमण्यांनी भरलेला व सवंग वृत्तपत्रकारितेने भरलेला होता असे म्हटले. श्याम भाटिया या "अनौरस हिंदू"ला पाकिस्तानबद्दल कांहींही वस्तुनिष्ठ लिहिणेच शक्य नाहीं. दोघांनी हॉलंड म्हणजे अण्वस्त्रें बनवायचा कारखाना असून तिथे कांहींही भाजी घेतल्यासारखे विकत घेता येते असा आभास निर्माण केला आहे असाही आरोप केला.
---------------------------------------
टिपा:
(१) बेनझीरचा धाकटा भाऊ. याचाही पुढे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
(२) विकिपीडियावरील व्याख्येप्रमाणे *उम्मा* म्हणजे आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील मॉरिटॅनियापासून पाकिस्तानपर्यंत पसरलेले मुस्लिम जगत्. मलेशिया व इंडोनेशिया हे देश उम्मामध्ये सामील केले जात नाहींत असे दिसते.
(३) अजीजसाहेबांचेही नांव अजीज खान असेच आहे. पण खानांची गर्दी झाल्यामुळे इथे अजीजसाहेब हे नांव वापरले आहे.
(४) या शब्दप्रयोगावरूनच या प्रकरणाचे नांव "मृत्यूच्या दरीत" असे देण्यात आले आहे.
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter 9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

24 Feb 2010 - 3:09 pm | Dhananjay Borgaonkar

काळे काका सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुमच्या मुळे ही लेखमाला आमच्या पर्यंत पोचते आहे.
अतिशय सुंदर अनुवाद केला आहे.
अनुवादित आव्रुत्तीचे सर्व हक्क राखुन ठेवा.

अतिशय सुंदर्..पुढच्या प्रकरणाच्या प्रति़क्षेत.

धनंजय

प्रिय धनंजय,
मी ज्या उद्देशाने हा अनुवाद करत आहे ते उद्दिष्ट साध्य होत आहे याचा आनंद होतोय्. हे पुस्तक खरंच प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचले पाहिजे.
सुधीर काळे
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

मदनबाण's picture

25 Feb 2010 - 7:57 am | मदनबाण

अत्यंत सुंदर लेखमाला... :)

(वाचक)
मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

या प्रकरणाचे भाषांतर करत असताना एक गोष्ट लक्षात आली कीं १९६५ साली जेंव्हा भुत्तोंनी चीनबरोबर व्यापक असा करार केला तेंव्हा राष्ट्रपती होते अयूबखान व भुत्तो होते परराष्ट्रमंत्री! त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या कंपूत होते. त्यांची निष्ठा अशी विभागलेली नव्हती. पण तरीही असा करार भुत्तोंनी केला व अमेरिकेने भिवया वर चढवल्या नाहींत हे आश्चर्यच नाहीं कां?
पण पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाने ज्या दोन विरुद्ध दिशा घेतल्या व हे "दोन दिशां"चे धोरण यशस्वीपणे आजपर्यंत चालूही ठेवले आहे याचे कौतुक वाटते. चीनच्या संयुक्त राष्ट्र प्रवेशाच्यावेळी अमेरिकेवर आर्थिक मदतीसाठी पूर्णपणे अवलंबिलेले असूनही उघड-उघड चीनच्या बाजूने पाकिस्तानचे उभे रहाणे म्हणजे जरासे धार्ष्ट्याचेच होते. इतके कीं बुश-४१ना (जे त्यावेळी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत होते) आगाशाहींना येऊन विनंती करावी लागावी कीं तैवानला हाकलू नका हे विपरीतच वाटले. हा अमेरिकेची दुर्बलता कीं पाकिस्तानचा मुत्सद्दीपणा? ९/११ नंतर बुश-४३ने जसे सांगितले (either you are with us or with them!) तसे १९६५ साली जर सांगितले असते तर ही पाकिस्तानची दुटप्पी नीती पराजित झाली असती! पण अमेरिकेचा बोटचेपेपणा नडला?
शेवटी अमेरिकेने 'बाळा'चे अती लाड केले, त्याला अण्वस्त्राचे खेळणेही घेऊन दिले व 'बाळा'ने असे प्रताप दाखविले कीं अमेरिका-चीनकडून लाटलेले अण्वस्त्रे बनवायचे तंत्रज्ञान अमेरिकेचे "वैर्‍यातले वैरी" इराण व उत्तर कोरियाला दिले. पुढच्या प्रकरणांत येईलच कीं हे तंत्रज्ञान त्यांनी लिबियाच्या कर्नल गद्दाफीलाही दिले होते, पण तो पकडला गेला व त्याला हा नाद सोडावा लागला.
अमेरिकेचे असले बोटचेपे धोरण आजही चालू आहे. ते भोगायला मात्र आपल्याला लागतेय्. यातून भारताला मार्ग काढावा तर लागेलच, पण कसा?
आपल्या अलिप्ततावादाच्या धोरणासमोर पाकिस्तान्यांनी दोन्ही दलांचे सभासदत्व स्वीकारून मात केली हे मात्र खरे!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

सायबा's picture

25 Feb 2010 - 8:48 pm | सायबा

सुधीरभाऊ,
हे प्रकरणही मस्त जमले आहे! अनुवादही छान झाला आहे. तुमच्या या मालिकेमुळे आमची खूप सोय झाली आहे, कारण इंग्रजी पुस्तक आम्ही नक्कीच वाचले नसते.
पुढच्या प्रकरणाची वाट पहात आहे.
सायबा

प्रमोद देव's picture

27 Feb 2010 - 10:57 am | प्रमोद देव

इतका अनुवाद मस्त झालाय.
काळेसाहेब,पुढील लेखनाला शुभेच्छा देतानाच म्हणतो की... आपल्या मेहनतीला,चिकाटीला शतश: वंदन.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

अमोल खरे's picture

27 Feb 2010 - 1:26 pm | अमोल खरे

आणि तो ज्या चिकाटीने तुम्ही अनुवादित केलाय त्याला तोड नाही.

सुधीर काळे's picture

27 Feb 2010 - 1:26 pm | सुधीर काळे

धन्यवाद, देवसाहेब!
http://www.indianexpress.com/news/Sharif%20met%20Osama%20fiv.../515253/
ही लिंक वाचा. आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आली आहे. बातमी सणसणीखेज आहे पण सप्टेंबर २००९ची आहे. खरे-खोटे माहीत नाहीं, पण खरे असल्यास पाकिस्तानी नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात कसे निराळे असात हे पुनश्च दिसून येईल.
आज मुशर्रफबद्दल ही बातमी झी-न्यूजवर वाचली!
http://www.zeenews.com/News607311.html हा दुवा उघडा व माझा सर्वात "लाडका" पाकिस्तानी नेता (सरडा) मुशर्रफसाहेबांची ही वक्तव्ये वाचा. झी-न्यूजला मी खालील प्रतिसाद पाठविला आहे! अजून प्रसिद्ध झाला नाहींय्. झाल्यास नंतर लिंक पाठवेन.
I have always described Musharraf is a chameleon! So nothing surprising when we see him in new colours. He still conceals that he is the one who helped build the terrorist network in occupied Kashmir. This is well-documented in the book “Deception” by Adrian Levy & Catherine Scott-Clark.
If what he says is true, how does he describe the “bomb-a-day” situation in Pakistan? Does Musharraf call people of Swat and Waziristan as “freedom fighters” as he likes to call the terrorists in J&K? He, like most Pakistani leaders, Military or Civil or ISI, fails to realize that terrorists have no religion, no nation or no faith. They are just hired operatives and can be provoked to do anything by those who always provoke them. If Muslim youth of India feel alienated in India, the Pakistani youth are alienated twice as much there.
Only thing that is harvested in Pakistan is hatred and misdirected attacks on innocent people both here and in Pakistan.
Will a good leader ever rise from the ashes of politics in Pakistan?
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

या दुव्यावर मी लिहिलेला प्रतिसाद (खालून चौथा ) झी-न्यूजवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जरूर वाचा.
http://www.zeenews.com/News607311.html
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

पारंबीचा भापू's picture

3 Mar 2010 - 10:24 am | पारंबीचा भापू

सुधीरभाऊ,
बरेच दिवसांनी मिसळपाववर आलो. तुमचा लेख नेहमीप्रमाणे आवडला. पुढचा लौकर येऊंदे.
भापू