ये रे ये रे पावसा! भाग - १

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
27 Aug 2009 - 11:49 am

'ढगफुटी' म्हणजे नक्की काय असतं हे गेल्या शनिवारी अनुभवलं. महामार्गावरून जाताना आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाचा शिडकावा झालेला दिसत होता पण जसजसे आमचे गाव जवळ येऊ लागले तसतशी हवा ढगाळ होऊ लागली.
त्या अंधारलेपणात एकदम जोरदार पाउस सुरू झाला. पाण्याचे सपकारे इतके जोरात होते की वायपरचा जेमतेमच उपयोग होत होता. बर्‍याचश्या वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला थांबणे पसंत केले. मी वाहनचालक असते तर नक्की थांबले असते,
पण नवरा चालक असल्याने तो 'थांबायचे नाही' म्हणाला व हळूहळू का होइना आम्ही जाऊ लागलो. आपल्या घराजवळच्या नदीला नक्की पूर येणार व काठाजवळ घरे असणार्‍यांना दुसर्‍याजागी तात्पूरते जावे लागणार असे काहीसे बोलणे चालू होते
आणि दोघांनाही आठवला २००० सालचा जुलै महिना.

चतुरंगाच्या नव्या नोकरीमुळे आम्ही दोघे पुण्याचे घर बंद करून सामानसुमान बांधून हैद्राबादला जाण्यासाठी सज्ज झालो होतो. हैद्राबादला पाऊस कमी व उन्हाळा खूप, त्याबद्दलचे अनुभव व किस्से नातेवाईकांनी उत्साहाने कानावर घातले होते.
तिथे गेल्यावर मामेसासर्‍यांनी त्यांच्या माहितीतली आजूबाजूची घरे दाखवली. एका एजंटकडेही जाऊन आलो. एकतर बरीचशी घरे म्हणजे छोटे मोठे बंगलेवजा होती, आम्हाला ती फार मोठी वाटायची . जी अपार्टमेंट्स पसंत पडायची त्यांचे भाडे
जास्त किंवा ऑफिसपासून बरेच लांब! २६ जूनला नवी नोकरी सुरू झाल्यावर आमच्या घरशोधणीला जरा ब्रेक लागला. दरम्यान सिंकंदराबादमध्ये राहणार्‍या माझ्या आतेभावाला फोन केला. त्याने उत्साहाने आमंत्रण दिले व घर मिळेपर्यंत इथेच येउन
रहा असेही आग्रहाने बजावले. झाले......बॅगा उचलून त्याच्याकडे रहायला गेलो. त्याने त्याच्या ऑफिसात चौकशी केली असता श्री. कृपेश्वर काकांचे घर भाड्याने द्यायचे आहे असे समजले. संध्याकाळी नवरा आल्यावर घर बघायला गेलो.
आतेभावाच्या घरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर असलेले घर ........घर कसले चार भल्यामोठ्या खोल्या व आजूबाजूला मोठी बाग असलेला बंगलाच होता तो! कमी उंचीच्या जोत्यावर असलेल्या घरात मोठा व्हरांडा, नंतर पंधरा बाय वीस फूटांची
हवेशीर लिव्हिंगरूम, त्यानंतर स्वयंपाकघर असे एका ओळीत, तर डाव्याबाजूला दोन मोठ्या बेडरूम्स! मागच्या दारी मोलकरणीसाठी कामाची जागा! घराबाहेरून वर गच्चीवर जाण्यासाठी जिना, तर दुसर्‍याबाजूला कार पार्क करण्यासाठी जागा होती.
गच्चीवरच्या मोठ्या टाकीने पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला होता.नव्या शहरात आता किती शोधायचे? जवळच घर घेण्याचा वहिनीचा आग्रह व कृपेश्वरकाकांच्या 'नसलेल्या' अटींकडे बघून 'हो' म्हणून टाकले.

आधीचे भाडेकरू जाऊन दोन महिने झाले असूनही घर चांगलेच स्वच्छ ठेवले होते. बाग मात्र आडवीतिडवी वाढली होती. बराच पालापाचोळा साठल्याने जीवजंतूचा वावरही 'होल वावर इज अवर्स' असा चाललेला होता. बागेला चांगली सहा फुटी मजबूत
भिंत, त्यावर टोकदार काचांचे तुकडे वगैरे.......काम अगदी झोकात होतं तर! सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जमेल तसे भिंतीवर चढून आम्ही दोघांनीही घराच्या मागच्या बाजूला नुसता 'नालाच' आहे ना? हे पाहून घेतले. मला तर तो मोठ्या
ओढ्यासारखा वाटला. पाण्याचा आनंदीआनंद असल्याने त्यात सगळा सुका कचरा साठला होता. जाऊ दे झालं, आपल्याला काय करायचयं? असा विचार मनात आला.

पुण्याला बाबांना कळवून सामान हैद्राबादला पाठवायची व्यवस्था केली. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ लागणार होता. "आता सामान येइपर्यंत इथेच रहा, तुला आसपासचा भाजीबाजार व इतर दुकाने दाखवून ठेवते." वहिनीने सांगून टाकले.
आम्ही तरी दुसरे काय करणार म्हणत राहिलो. जुलैच्या दोन तारखेला संध्याकाळी सामान आले. घर मोठे असल्याने जमेल तसे अस्ताव्यस्त सामान ठेवून ट्रकचालक व मजूर निघून गेले. आता बघू......उद्यापासून सामान लावूयात असे ठरवून वहिनीकडे
परत आलो. दुसर्‍या दिवशी उत्साहाने आम्ही दोघी तिच्या घरातले काम आवरून माझ्या नव्या घरी आलो. घर मोठं व सामान कमी अशी अवस्था झाली होती. आमचं छोटं डायनिंगटेबल मोडल्याचं लक्षात आल्यावर 'आता मोठं आणि नवं घ्यायला मिळणार'
असा आनंदही झाला. आधी स्वयंपाकघरातले सामान जरूरीपुरते लावून घेतले. त्यावेळी डावीकडच्या घरातून कुतुहलानं आपल्याकडं पाहिलं जातय असंही लक्षात आलं. 'पाशा'काकू, त्यांची पाच मुले व दादीमाँची ओळख झाली. उजवीकडचा शेजार मात्र
पूर्ण तेलुगु असल्यानं ओळखीचा प्रश्न येणार नाही अशी माहीती डावीकडच्यांनी पुरवली. दुपारी वहिनीच्या घरी परतणे भाग होते.

दुसरा दिवस हा बेडरूमचे सामान लावण्यातच गेला. आता हॉलमध्ये पॅकिंग मटेरियलचा बराच कचरा साठला होता. सौ. सासूबाईंनी 'लागले तर असू दे ' या नावाखाली बरेच सामान दिल्याचे दिसून आले. उदबत्तीच्या घरापासून ते कढई-पातेल्यापर्यंत आणि
भरपूर पांघरुणे-चादरींपासून ते पायपुसण्यापर्यंत. दोन महाभयंकर जड अश्या नव्याकोर्‍या गाद्याही त्यातच होत्या. आता ह्या गाद्या कुठे ठेवायच्या? नंतर बघू म्हणत तिथेच हॉलमध्ये राहू दिल्या. रहायला येण्यापुरते घर नक्की लागले आहे अशी खात्री करून
आम्ही चार जुलैला रात्रीच आमच्या घरी रहायला गेलो. पाच तारखेला लग्नाचा वाढदिवस झाला व आणखी दोन चार दिवसातच हैद्राबादच्या पाण्याने आपला हिसका दाखवला!

त्याचं झालं असं, आमच्या घरमालकीणबाई सौ. चामुंडेश्वरीकाकू यांनी आठवणीने काकांबरोबर निरोप पाठवून पिण्याचे पाणी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यानच 'आले तर येते, नळाकडे सतत लक्ष ठेवावे लागते' असे सांगितले! त्यांनी त्यांचा माळी पाठवून
बागही बर्‍या अवस्थेला आणून दिली. मला तर काय घराच्या जोत्याबरोबरच आकाशही ठेंगणं वाटू लागलं. दुसर्‍या दिवशी बाहेरून आणायच्या वस्तूंची लिस्ट तयार केली. पिण्याचे पाणी साठवण्यासाठी आठवणीने काहीतरी व्यवस्था करावी लागणार होती.
रात्री झोपताना सगळ्या कामांची मनात उजळणी करून झोपले खरी, पण पहाटे कुणा बाईमाणसाच्या रडण्याओरडण्याने जाग आली. खिडकीकडे पाहिलं तर अजून अंधारच होता. नवर्‍याला उठवले तर म्हणाला,"नेहमीप्रमाणेच तुला स्वप्न पडलंय, झोप आता!"
पुन्हा थोड्यावेळाने रडण्याचा आवाज! आता मात्र मी फारच अस्वस्थ होउन चतुरंगाला शेजारी काय झालय हे पहायला सांगितले. "ते तेलुगुमध्ये काय बोलतायत .....काही समजत नाहीये." त्याने कानोसा घेत सांगितले. त्यांच्या घरी काही वाईट घडलं असावं
असा समज करून घेत आम्ही पुन्हा झोपलो. जरा उजाडत आलं असेल नसेल तेव्हढ्यात ओरडण्याचे बरेच आवाज कानावर आदळले. आतामात्र खिडकी उघडून काय प्रकार चाललाय म्हणून बघायला खिडकीकडे सरकले तर काचेवर बाहेरच्या बाजूला फूटभर
लांबीचा साप, बरेच किडे व पाली होत्या! ई ऽऽऽ ग बाई! आदल्या दिवशीच्या माळीकामामुळे इतके दिवस सुखेनैव नांदत असलेले हे सगळे बेघर होउन इतक्या एकोप्याने खिडकीच्या काचेवर बसलेत असं वाटलं. पण असा एखादा साप पाहून बरेच लोक ओरडतील
यावर विश्वास बसत नव्हता.

(क्रमशः ;))

समाजजीवनमानराहणीराहती जागाअनुभव

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

27 Aug 2009 - 12:07 pm | पर्नल नेने मराठे

मस्त ....येउ द्या...
'होल वावर इज आवर' ;)
चुचु

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2009 - 12:08 pm | स्वाती दिनेश

लागली का तुला पण क्रमशःची लागण.. उत्सुकता जास्त ताणू नको बाई, लवकर लिही पुढचा भाग.. ह्या भागाने वातावरण तर मस्त तयार झाले आहे.
स्वाती

sneharani's picture

27 Aug 2009 - 12:19 pm | sneharani

'होल वावर इज आवर' he khup chhan

शाल्मली's picture

27 Aug 2009 - 12:25 pm | शाल्मली

हे काय हे?
गोष्ट ऐन रंगात आल्यावर क्रमशः काय टाकतेस अगं? बरं दिसतं का ते? ;)
आता पुढचा भाग कधी टाकणार आहेस बाई? आजच्या आजच टाकला गेला पाहिजे!
हा भाग मस्तच!

आमचं छोटं डायनिंगटेबल मोडल्याचं लक्षात आल्यावर 'आता मोठं आणि नवं घ्यायला मिळणार' असा आनंदही झाला.

=))
रंगाशेट पाकिटाची काळजी घेत चला.. ;)

--शाल्मली.

स्मिता श्रीपाद's picture

27 Aug 2009 - 12:39 pm | स्मिता श्रीपाद

क्रमशः बद्दल आधी निषेध..निषेध..निषध.....:-)

लवकर लिहा ना पुढे काय झालं ते...

स्सही सुरुवात...

विजुभाऊ's picture

27 Aug 2009 - 2:21 pm | विजुभाऊ

छान लिहिलेत हो.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2009 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेस, पुढचा भाग लवकर टाक! (हो हे मी सांगत्ये! ;-) )

अदिती

चित्रा's picture

27 Aug 2009 - 11:27 pm | चित्रा

येऊ दे पुढचा भाग लवकर.

प्रभो's picture

27 Aug 2009 - 2:38 pm | प्रभो

मस्त्.....पुढचा भाग लवकर टाका...म्हणजे ऑफिस मधे बसुन वाचता येइल.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2009 - 3:09 pm | बिपिन कार्यकर्ते

... मला हक्क नाहीये बोलायचा (असं लोक म्हणतील म्हणून आधीच मीच स्वतः म्हणतो ;) ) पण ते क्रमशः नको ब्वॉ... माणसाने कसं धडधडधड बोलावं / लिहावं. उगाच आपलं क्रमशः टाकायचं म्हणजे काय हे? आँ? असो. पण लिहिलंय छानच आणि पुढचा भाग लगेच टाका हो म्याडम.

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

28 Aug 2009 - 1:08 am | अनिल हटेला

ऐसाईच बोल्ताये....;-)

पू भा प्र.....
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

श्रावण मोडक's picture

27 Aug 2009 - 3:10 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...

लिखाळ's picture

27 Aug 2009 - 4:16 pm | लिखाळ

वा .. मस्त .. पुढे लिहा लवकर...

जोत्याबोअरोबर आकाश ठेंगणे.. :)

पूर आलेला दिसतो.. सरपटणारे प्राणी वर चढून बसले म्हणजे !!

-- (अंदाजपंचे)लिखाळ.
चालतं एकवेळ चालते पण चाल मात्र चालत नाही ;)

मदनबाण's picture

27 Aug 2009 - 4:33 pm | मदनबाण

भाग २ ची वाट पाहत आहे... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

सूहास's picture

27 Aug 2009 - 5:39 pm | सूहास (not verified)

वाचतो आहे..
सू हा स...

स्वाती२'s picture

27 Aug 2009 - 10:32 pm | स्वाती२

मस्त! पुढचा भाग लवकर येऊ दे.

प्राजु's picture

27 Aug 2009 - 11:34 pm | प्राजु

पुढे काय झालं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

27 Aug 2009 - 11:38 pm | अनामिक

पुढचा भाग लवकर टाका...

-अनामिक

टारझन's picture

27 Aug 2009 - 11:51 pm | टारझन

हॅहॅहॅ ! आपली शैली डेव्हलप होत्येय का ? अंमळ छाण..
पु.ले.शु रेवती तै !

- टी

रेवती's picture

28 Aug 2009 - 12:25 am | रेवती

आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद!
पुढचा भाग आज टाकण्याचा प्रयत्न करते.

रेवती

मीनल's picture

28 Aug 2009 - 2:08 am | मीनल

टाक लवकर.
वाचायच आहे पुढच.
मीनल.

इंटरनेटस्नेही's picture

4 Oct 2010 - 2:11 am | इंटरनेटस्नेही

छान आहे. 'ये तेरा घर ये मेरा घर' ही गझल आठवली.

(वाचक) इंट्या.