परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
27 Jul 2009 - 8:31 pm

"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित सिनेव्यक्तिमत्व आहे का ?”
आहे.

“महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का ?“
असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.

“महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते / दिग्दर्शक आहेत का ? “
हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. आता त्यांना हुशार आणि पब्लिकची नाडी बरोबर ओळखणारे निर्मातेही समजण्यास प्रत्यवाय नसावा कारण मराठी माणसाच्या मनाचा नेहमीच हळवा कोपरा राहिलेला महाराजांचा विषय निवडुन त्यांनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या चित्रपटाची निर्मीती केली.

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा एक उत्कृष्ट, चांगला आणि गाजलेला चित्रपट आहे का ?”
एका शब्दात अगर वाक्यात हे सांगणे कठिण आहे. “एखादा चांगला आणि उत्कृष्ट चित्रपट हा गाजेलच असे सांगता येत नाही तसेच एखादा भयंकर गाजलेला चित्रपट हा उत्कृष्टच असेल असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही” हा चित्रपटसॄष्टीचा मुलभुत नियम आहे, तोच इथे चपखल लागु होतो. हा चित्रपट भयकंर गाजला आणि पब्लिकला आवडला हे सुर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे, सादरीकरणही भव्य आहे ह्यातही वाद नाही मात्र मला हा चित्रपट चांगला किंवा उत्कृष्ट वाटला नाही.
मात्र हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ही नक्की कशाची कहाणी आहे ? नक्की कुणावर फ़ोकस करुन हा चित्रपट पुढे सरकरतो ? “
ही कथा आहे एका न्युनगंडाने पिचलेल्या आणि मुंबईतुन हद्दपार होण्याच्या भितीने आत्मविश्वास गमावुन बसलेल्या व आपल्या प्रत्येक अपयशाचे दुसयाच्या कर्तुत्ववानपणावर आणि कष्टावर फ़ोडणा-या एका प्रातिनिधीक मध्यमवर्गीय पापभिरु मराठी माणसाची म्हणजे दिनकर भोसले यांची.
ऒफ़ीसमध्ये, बाजारात, रस्त्यावर, घरी, दुकानात असे पदोपदी अपमान सहन करुन राहणारे दिनकर भोसले, उत्तम मार्क असुन स्वत:च्या मुलाला एका स्वत:च्या मित्राच्या कॊलेजात पैसे देण्याची ऐपत अथवा तयारी नाही म्हणुन इंजिनीयरिंगची ऎडमिशन घेऊन देऊ न शकलेले दिनकर भोसले, मराठी आडनावावे सिनेसृष्टीत अडचण होते अशी स्वत:च्या मुलीची मुक्ताफ़ळे हताशपणे ऐकणारे दिनकर भोसले, स्वतःसाठी एक शर्ट विकत घेण्यासाठी अ‍ॅरियर्सची वाट पहाणारे दिनकर भोसले, ऑफीसमध्ये आपल्या साहेबांचा जाच अकारण सहन करणारे दिनकर भोसले, दररोज घरात विवीध कारणांवरुन आपल्याच बायकोचे टोमणे ऐकुन घेणारे व त्यावरुन तिच्याशी वाद घालणारे दिनकर भोसले.
पण बाहेरच्या जगाचा राग आपल्या अमराठी भाडेकरुंवर अकारण काढणारे हेच ते दिनकर भोसले, दु:ख आणि अपमान दारुच्या नशेत विसरायला एका मद्राश्याच्या बारमध्ये जाऊन अकारण आरडाओरडा आणि अरेरावी करणारे हेच ते दिनकर भोसले, स्वतःच्या अनावश्यक मस्तीमुळे त्याच बारमधुन मार खाऊन बाहेर पडणारे व नशेत बरळत स्वतःच्या घरच्यांना त्रास देणारे हेच ते हेच ते दिनकर भोसले.

"सिनेमाचे मध्यवर्ती कथासुत्र काय आहे ? "
ती आहे एक झुंज, २ असमान पातळीवर असणार्‍या व्यक्तीमत्वांची.
सोशीक, पदोपदीच्या अपमानाने पिचुन गेलेल, आत्मविश्वास हरवुन बसलेले दिनकर भोसले आणि स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय यंत्रणेला खिशात घालणारा, अत्यंत धुर्त आणि मस्तीखोर असा गोसालिया बिल्डर.
गोसालियांचा दिनकररावांच्या ऐन मोक्याच्या जागी असलेल्या राहत्या घराच्या जागेवर डोळा असतो, त्याला तिथे एक कमर्शियल कॉंप्लेस उभे करायचे असते. पण भोसले ती जागा सोडायलाअ नकार देतात व त्याच्या अमिषाला भिकही घालत नाहीत.
ह्या सर्वांमुळे पेटुन उठलेला गोसालिया व आपल्या निर्णयावर ठाम असणारे भोसले ह्यांची झुंज हे मध्यवर्ती कथासुत्र ...

"मग ह्यात शिवाजी महाराजांचा कुठे संबंध येतो ?"
दारुच्या नशेत जेव्हा दिनकररावांवर आपल्या अपमान आनि कुचंबणेच्या आठवणींच्या सहस्त्र इंगळ्या जेव्हा डसतात तेव्हा ते कंत्रोल सुटुन ह्या सर्वांचे खापर आपल्या "मराठीपणावर ( पक्षी : मराठी म्हणुन जन्म घेतल्यामुळे सोसाव्या लागणार्‍या यातनांवर ) " फोडतात व "मला मराठी असल्याचे लाज वाटते" हे वाक्य ओरडुन ओरडुन सांगतात तेव्हा रायगडावरच्या राजदरबारात बसलेल्या महाराजांच्या कानावरचे कल्ले रागाने थरथरुन उठतात. ज्यांना सुखाने जगता ह्यावे म्हणुन आपण ज्या हिंदवी स्वराज्याच्या अट्टाहास केला तोच मराठी माणुस आज आपल्याला "लाज वाटते" असे म्हणतो हे पाहुन महाराजांच्या संतापाला सीमा रहात नाही व ते ह्याचा जाब विचारायला दिनकर रावांकडे निघतात व कथेत "शिवाजी महाराजांचा प्रवेश" होतो.

"महाराजांच्या येण्याने असा काय फरक पडतो ? "
महाराज दिनकर भोसल्यांचे ब्रेनवॉशिंग करतात व त्याचा खचलेला आत्मविश्वास पुन्हा जागॄत करतात, त्याला हिंमतीने लढायला उद्युक्त करतात, मराठी माणसाने पुन्हा एकत्र येऊन आत्मविश्वासाने उभारले पाहिजे व हिंमतीने संकटाचा सामना केला पाहिजे हा विश्वास त्याच्यात जागवतात. अजुन बरेच काही काही म्हणतात पण मुळ सुत्र तेच त्यामुळे इतकेच ...

" मग नक्की काय बदल होतो भोसल्यांच्यात व त्या परिस्थीतीत ? "
स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि हिंमत परत मिळवलेले भोसले सर्वच पातळ्यांवर आपल्या हिंमतीचे प्रदर्शन घडवतात व यश मिळवतात. मग ते मुलाच्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन असो, वा मुलीचे सिनेमातले करियर मार्गी लावणे असो, आपल्या साहेबाला त्याची जागा दाखवणे असो, पैशाला चटावलेल्या महानगरपाहिकेतल्या शासकिय अधिकार्‍यांची चुक त्यांना कठोरपणे दाखवुन देऊन स्वतःचे काम करुन घेणे असो, वा गोसालियाच्या नाकावर टिच्चुन दुसर्‍या एका मराठी बिल्डरकडुन त्याच जागेवर स्वतःला हवे तसे आणि स्वतःचेही हित पहाणारे कॉप्लेक्स उभारणे असो ह्या सर्व परिस्थीती यश हे दिनकर भोसल्यांचेच असते.
मधल्या काही पटकथेच्या मागणी असणार्‍या घटना रुढीनुसार घडुन शेवटी आपल्याला हवा तसा गोडगोड शेवट होतो व भोसले "मला मराठी असल्याचा गर्व आहे" ह्या वाक्याला एक प्रतिष्ठा मिळवुन देतात ...

"मग हा एवढा चांगला विषय हाताळणारा चित्रपट मला भरकटलेला आणि तद्दन गल्लाभरु का वाटला ? "
सांगतो, सिनेमाच्या सुरवातीपासुन दिनकर भोसल्यांचे जे "अपमान सहन करणे" दाखवलेले आहे ते अत्यंत बटबटीत आणि बेसलेस आहे, एवढा अपमान कोणी अकारण करत नसतो व कोणी केला तर समोरचा सहन करत नसतो, सहन करण्याला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाही, असल्या नेभळट आणि हतभागी माणसाची समाजाला अजिबात गरज नाही. इथे अनावश्यकरित्या अपमानांचे उदात्तिकरण करुन जनमानसाच्या भावनेला हत घालल्याचे व त्या पेटवण्याचा प्रयत्न सुरवातीच्या काही घटनातुन होतो.
ठिकठिकाणी अपमान सहन करणारे दिनकर भोसले मात्र जेव्हा बारमध्ये जातात तेव्हा एवढा कमालीचा माजोरडेपणा, भांडखोरपणा अणि मस्तीखोरपणा का करतात ह एक प्रश्नच आहे ? त्याचे समर्थन कसे होऊ शकते ?
शिवाय जेव्हा महाराजांचा शुभ-आशिर्वाद आणि भेट म्हणुन भवानी तलवार मिळते तेव्हा ह्याच भोसल्यांचे रुपांतर एका सुपर हिरोत होते व रॉबीनहुडसारखी अचाट, अतर्क्य, न पटणारी कॄत्ये करु लागतात. हा काय मुर्खपणा ? ज्या घटना पटणे शक्य नाही किंवा लौकिक अर्थाने शक्य नाहीत त्या ते सहजपणे चुटकीसरशी पार पाडतात ?
महानगरपालिकेचे मदमस्त अधिकारी एका भाषणाने ( किंवा सडेतोड बोलण्याने ) सुधारणे व त्यांनी लगेच इमानदारीने काम करणे, शौर्य पुरस्कार मिळालेला एक पोचलेला पोलीस अधिकारी केवळ शुटिंग चालु आहे म्हणुन भोसल्यांकडुन केल जाणारा अपमान सहन करणे , सरकारात मंत्री असलेल्या एका मंत्राच्या कॉलेजात अ‍ॅडमिशनसाठी म्हणुन भोसल्यांनी त्याला भेटणे व त्याला बोलण्यात गुंतवुन मोबाईलवर त्याचे शुटिंग घेऊन त्याचे फुटेज मिडियाला देणे व मंत्र्याची हकालपट्टी होणे, मुख्यमंत्राने साळसुदपणे "मला असल्या व्यक्तींबरोबर काम करण्यापेक्षा सत्ताच नको " असे बाळबोध विधान करणे , मुलीच्या करियरसाठी भोसल्यांनी एका अमराठी निर्मात्याला भेटणे व त्याला ४ शब्द सुनावणे व त्यामुळे त्याचा कायापालट होऊन त्याने मुलीला साईन करणे व स्वतः मराठी असल्याची कबुली देत स्वतःचा हापीसात मुर्खासारखा मराठीपणाचा डांगोरा पिटणे, एका सराईत गुंडाचा कायापालट केवळ काही प्रसंगामुळे व वाक्यामुळे होणे, ऑफीसमध्ये स्वतःच्या साहेबाला कसेही बोलुन त्यांचीए प्रतारणा करणे व स्वतःला हवी तिथे सही मिळवुन घेणे, शेवटच्या फायनल फायटिंग सीनमध्ये गोसालियावर भवानी तलवारीने वार करणे व इतर ३-४ जणांना असेच सहजपणे कापणे , आपसुकच मिळालेल्या प्रसिद्धिचा फायदा उठवण्यासाठी मुख्यमंत्रांना भेटुन निवडणुक लढवण्याबरोबरच मंत्रीपद मागणे, इत्यादी इत्यादी ....
का हो, ह्या घटना अत्यंत बालीश, बाळबोध आणि हास्यास्पद व तसेच "गल्लाभरु" आणि केवळ टाळ्या मिळवण्यासाठी केल्यासारख्या वाटत नाहीत का ?
माझ्या मते इथे सिनेमा घसरला व क्वालिटी हरवुन बसला ...

" मग पाहण्यासारखे आहे तरी काय नक्की ? "
येस्स, नक्कीच पाहण्यासारखे आहे व शिवाय त्यातुन बोध घेण्यासारखेही बरेच काही आहे.
खासक्रुन महाराजांचे सुरवातीचे काही डायलॉग्स बरेच काही सांगुन जातात. सर्व व्यवसाय परकीय ( पक्षी : अमराठी ) व्यक्तींने बळकावले ह्याचे खापर त्यांच्यावर न फोडता तुम्ही स्वतः झटुन कामाला लागले पाहिजे, कसलेही काम करण्याची लाज नाही वाटली पाहिजे, " आमची कुठेही शाखा नाही" ह्याचा अभिमान व वाटता लाज वाटुन व्यापाराचा विस्तार केला पाहिजे, "वेडात मराठी वीर दौडले सात" नव्हे तर "वेडात मराठी वीर दौडले एकसाथ" हे झाले पाहिजे असे मोलाचे संदेश महाराज दिनकररावांना व प्र्यायाने आपल्याला देतात.
हे डायलॉग्स लिहणार्‍या कलाकाराला सलाम, फारच उत्तम जमले आहेत ...
शिवाय महाराजांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या अडचणींचा सामना त्यांनी धिराने व आपल्या चातुर्याने कसा केला व त्याचा आजही कसा उपयोग होऊ शकतो हा संदेशही हा चित्रपट नक्की देतो ...
"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो ...

"तांत्रिक बाबी, सादरीकरण आणि कलाकारांच्या पर्फोर्मन्सबद्दल काही ... "
काही तुरळक आक्षेप सोडले तर तांत्रिकदॄष्ट्या भव्यदिव्य असा हा सिनेमा आहे. बहुतेक सर्व कलाकारांचे काम उत्तम आहे, सचिन खेडेकरने उभारलेला दिनकर भोसले मस्तच. मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता, केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले.
आता महत्वाचे म्हणजे तो बहुचर्चित आणि भव्यव्दिव्य असा "एक करोड रुपयांच पोवाडा" ...
माझ्या मते शुद्ध मुर्खपणा कारण तो जेवढा जमायला हवा तेवढा अजिबात जमला नाही. आयुष्यात मी पाहिलेल्या अनेक "अफजलखानाच्या वधा"च्या प्रसंगातला सगळ्यात फालतु/बेताबेताचा/फसलेला प्रयोग ह्या सिनेमातला, ह्यापेक्षा पुण्यातल्या गणेशोत्सवात मस्त जमतो हा प्रसंग डेकोरेशन म्हणुन. आता त्यासाठी १ करोड कुठे आणि का घातले हे काही कळाले नाही. त्य पोवाड्यातले काव्य अप्रितम पण ते भरत जाधवांच्या साजातुन ऐकताना सर्व मज्जा निघुन गेली, उदेश उमप हा एक मस्त ऑप्शन होऊ शकला असता ...

" हा सिनेमा नक्की काय सांगतो व आपल्यात काय बदल घडवायला प्रवॄत्त करतो ? तो का पहावा ?"
मुळात ही कहाणी आज जरी दिनकर भोसल्यांची वाटत असली तरी ही गाथा आहे शतानुशतके चालत आलेल्या मराठी माणसाची, त्याच्य मनोवॄत्तीची, त्याच्या लढ्याची व त्याच्या यशापयशाची ...
आपला स्वाभिमान आणि हक्क अबाधित राखण्यासाठी लढलेल्या, झुंजलेल्या, शत्रुच्या नाकावर टिच्चुन यश मिळवणार्‍या अशा थेट ज्ञानोबा माऊली, तुकोबांपासुन ते शिवाजी महाराजापर्यंतच्या, लोकमान्य टिळकांपासुन ते बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसुर्य सावरकरापर्यंतच्या, यशवंतराव चव्हाणांपासुन ते सीडी देशमुखांपर्यतच्या व कालच्या बाळासाहेब ठाकर्‍यांपासुन ते आजच्या राज ठाकर्‍यांपर्यंतच्या अनेक महान मराठी व्यक्तीमत्वांच्या लढाऊपणाचा वारसा आणि आत्मसन्मानाचे बीज आपल्यापर्यंत आणणार्‍या एका क्षात्रतेजाची ...
परिस्थीती जरी बदलत असली तरी समस्या त्याच आहेत, मराठी माणुसही तोच आहे त्याच्या लढाऊपणा आणि हक्कासाठी कुणाविरुध्दही उभारण्याचे सिंहाचे काळीज बरोबर घेऊन. मराठी माणसाचा आत्मसन्मानही तोच आहे, त्याचा कणखरबाणाही अजुन तसाच आहे," मोडेन पण वाकणार नाही " हे अजही मराठी माणुस अभिमानाने म्हणतो व त्याप्रमाणे वागतोही.
फक्त काही काही वेळा काळाच्या जादुमुळे म्हणा अथवा निसर्गचक्राला अनसरुन म्हणा हे "मराठी स्फुलिंग" राखेच्या ढिगार्‍याखाली दबले जाते व त्याचे "तेज" कमी होते, ह्याचा अर्थ ते विझले असा होत नाही, आता त्याला जरुर असते ती कुणीतरी एक "जादुई फुंकर" मारण्याची, त्याने सगळी धुळ उडुन जाईल व मराठी कर्तुत्वाचे क्षात्रतेज पुन्हा तळपुन उठेल ....
पुन्हा एकदा " मी मराठी असण्याचा अभिमान वाटतो" हे वाक्य मोठ्ठ्या अस्थेने उच्चारले जाईल ...

इतिहासात अनेक लोकांनी हे फुंकर घालण्याचे काम केले, बरीच नावे मी वरच्या परिच्छेदात घेतली, बहुसंख्यही राहुन गेली.
पण आजच्या काळात हेच काम " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा सिनेमा करतो असे आमचे मत आहे म्हणुन प्रत्येकाने हा सिनेमा जरुर पहा असे तळमळीने वाटते ...
तेवढ्या एकाच बाबीसाठी बाकी सर्व गोष्टी आणि चुका माफ ...

धन्यवाद ...!!!!

कलासमाजमौजमजाचित्रपटलेखशिफारसप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

27 Jul 2009 - 9:03 pm | लिखाळ

चांगले लिहिले आहेस.
पेटार्‍यातून पळून जाण्याचा प्रसंगाला समांतर असा पोत्यातून पळण्याचा प्रसंग सुद्धा असाच. पण ते जाऊ दे !

या चित्रपटामुळे मराठी मुलखातल्या वातावरवणात काय फरक पडला? तरूण लोक मराठी लँग्वेज परफेक्ट बोलायला लागले का? मराठी रिक्षावाल्यांचा/ बस कंडक्टर-डायवरांचा/ घरी येणार्‍या पलंबर-इलेक्ट्रिशियन इत्यादिंचा, सरकारी सेवकांचा माज आता अजून चमकून उठला का? की मराठी बांधवांशी ते बंधुभावाने वागायला आहेत? अशी काही निरिक्षणे सुद्धा नोंदवावीत अशी विनंती.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

ऋषिकेश's picture

27 Jul 2009 - 9:18 pm | ऋषिकेश

ह्या चित्रपटाची भली-बुरी अनेक परिक्षणे वाचली. त्यातील हे सर्वोत्तम परिक्षण!

डानराव, लगे रहो! लै भारी

मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता, केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले

अधोरेखित वाक्य सोडल्यास अगदी मनातील बोललात! भरत जाधवने त्या पोवाड्यात जे काहि केलं आहे ते पाहून त्याला घाईची लागली असावी असेच मला वाटत आले आहे . :)

महेश मांजरेकर हा मात्र प्रस्तुत भुमिकेत जराही शोभत नाहि. शिवाजी महाराजांचे डोळे असे प्यायल्यासारखे सतत तांबरटलेले असतील असे वाटत नाहि. महाराजांची घोडेस्वारी हा तर उत्तम विनोदाचा नमुना ठरावा

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

टारझन's picture

27 Jul 2009 - 9:34 pm | टारझन

भरत जाधवने त्या पोवाड्यात जे काहि केलं आहे ते पाहून त्याला घाईची लागली असावी असेच मला वाटत आले आहे .

मला तर तो कोणताही डायलॉग खालच्या ओठांत तंबाखुचा बकणा भरून केकटतो की काय असा वाटतो ...
बाकी मकरंद आणि सिद्धार्थ ह्यांना रोल फिट झाले नाहीत पण .. मक्याचा "केसभर गजरा आणि गावभर नजरा" ह्या डायलॉगचं टायमिंग केवळ अप्रतिम होतं ..

भाग्यश्री's picture

27 Jul 2009 - 11:05 pm | भाग्यश्री

ऋषिकेशशी सहमत..
मांजरेकर अगदी सहन होत नाही त्या रोलमधे! दुसरा कोणीही चालला असता तिथे इतका मला त्या रोलमधे तो आवडला नाही!!

पिक्चर चांगला आहे.. पण अतिशय अतिशयोक्ती करण्याच्या नादात सुरवातीच्या काही प्रसंगातच माझा रस जाऊ लागला.. अरे इतका पदोपदी अपमान? जिथे जाईल तिथे?? काय अर्थं आहे का त्याला!
आणि ते मराठी असण्याचा गर्व ही वाक्यरचनाही कानाला खूप खटकली! त्यावर सचिन खेडेकर जे मुठ वळवून अभिनय करतो त्याने मलातर अतिशय हसू आले! :))

असो.. मला हा पिक्चर तसा चांगला असूनही विशेष आवडला नाही! थिएटर मधे अजुन ५० लोकांबरोबर पाहीला असता तर थोडा फरक पडला असता... पण मराठी माणसाने हा पिक्चर पाहून काहीतरी भारावून गेल्यासारखे करायची काही गरज नाहीये! इतका पदोपदी अपमान सहन कोणीच करत नसेल, आणि त्यावर उपाय हा पिक्चर पाहणे नक्कीच नसेल! उगीच इमोशनल व्हायची काय गरज.. करमणूकीला चांगला आहे. ... :|

http://www.bhagyashree.co.cc/

मस्त कलंदर's picture

27 Jul 2009 - 11:39 pm | मस्त कलंदर

>>अरे इतका पदोपदी अपमान? जिथे जाईल तिथे?? काय अर्थं आहे का त्याला!

अक्षरशः पट्लं... मला वाटतं की त्याना मराठी आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय की गरीब आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय हेच कळलं नाहीय... मी मुंबईतल्या बर्‍याचशा मोठ्या दुकानात, हॉटेलमध्ये नि मॉल्स मध्ये गेलेय.... तिथल्या लोकांशी इंग्रजीत बोललो तरी सोबतच्या लोकांशी मराठीत बोललं जातं.. अशावेळी ते लोकही मराठी असो वा अमराठी, मराठीत संभाषण चालू करतात... अशा वेळी कुणी कुत्सितपणा दाखवल्याचं स्मरत नाही..

मी वसतीगृहात रहात असताना माझ्या ग्रुपमधल्या इतर सगळ्या मुली उत्तर भारतीय होत्या... त्यांनी कशावरूनतरी एकदा घाटी हा शब्द दोनतीन वेळा अपमानास्पद रित्या वापरला.... तेव्हा त्यांना "Wats so bad in being ghati? I am a ghati girl" असं थोड्याश्या करड्या सुरात विचारल्यानंतर त्यांनी तो शब्द निदान माझ्यासमोर तरी वापरणं बंद केलं होतं.... (त्यातल्या बर्‍याचजणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी होत्या.. नि मी मॅम... त्यामुळे सहसा कुणी माझ्याशी पंगा घेत नसत.. नि तसे प्रसंगही उद्भवत नसत हेही तितकंच खरं)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विशाल कुलकर्णी's picture

28 Jul 2009 - 12:03 pm | विशाल कुलकर्णी

अगदी पटलं.

अवांतर : मुंबईत जेव्हा नवीन आलो होतो, दहा वर्षापुर्वी. तेव्हा बर्‍याचदा इथले आग्री, कोळी समाजातले मित्र घाटी, घाटी असा उल्लेख करायचे. एकदा रागाच्या भरात बोलुन गेलो...
"भXXनो कंबरेला फडकं गुंडाळुन पार्श्वभाग दाखवत फिरत होतात, आम्ही आलो म्हणुन पँटी घालायला शिकलात. (इथे कंबर आणि पार्श्वभाग ला त्यावेळी वेगळे शब्द वापरले होते)" त्यानंतर मात्र कधी घाटी म्हणुन ऐकायला मिळाले नाही.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नम्रता राणे's picture

28 Jul 2009 - 2:49 pm | नम्रता राणे

त्यांना मराठी आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय की गरीब आहे म्हणून अपमान होतोय असं म्हणायचंय हेच कळलं नाहीय...
अगदी बरोबर... चित्रपटाचा आशयच मुळात कळत नसल्यामुळे चित्रपटाचा विषय पुर्णपणे भरकटला आहे.
मांजरेकरांच्या तारटवलेल्या (?) डोळ्यात महाराजांच्या नजरेतला करारीपणा शोभतो का? माझी बॅट म्हणजे मीच ओपनर बॅट्समन असे म्हणणार्‍या बाळांसारखे... माझा चित्रपट म्हणजे मीच शिवाजी.. असे तर नव्हे? त्या भुमिकेला काही तरी अर्थ आहे का?
मांजरेकराच्या मराठीबाबतच्या अभिमानाबद्द्ल शंकाच नाही आज त्यांनी हिंदी चित्रपटात नेहमीच मराठी कलाकारांना प्राधान्य देऊन चमकवले आहे.. नेहमीच मराठीचा गोडवा गायला आहे..
पण मांजरेकर या चित्रपटास मात्र तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत.

टारझन's picture

27 Jul 2009 - 9:19 pm | टारझन

डाणबा !!! एक णंबर्स परिक्षण !!! तोलून मोलून लिहीलंय ..
उगाच कुठे लैच्यालै आणि कैच्याकै कौतुक नाय :)
तु ह्यावर अजुन कसं लिहीलं नाहीस असा प्रश्न पडला होता .. :)

- (डॉनप्रेमी) टार्‍या
(हिणता सेवा बंद करण्यात आली आहे)

भडकमकर मास्तर's picture

27 Jul 2009 - 11:30 pm | भडकमकर मास्तर

डान्राव,
एकदम वस्तुनिष्ठ परीक्षण.....
शब्दांचा फुलोरा नाही, अनावश्यक अलंकारिक भाषेचा वैताग नाही....
आणि प्रश्नोत्तराचा फॉर्म्याट मस्तच..
...
शंभरपैकी पंचाण्णव गुण...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2009 - 9:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, परिक्षण आवडलं. एकूणच पोस्टर्स पाहून आणि इकडे तिकडे वाचून चित्रपट पहावा असं वाटलं नव्हतं, आता याचा आनंद होत आहे.

मास्तर, एकदा मास्तरी शैलीत चित्रपट परीक्षण येऊ देत. बरेच दिवस झाले.

अदिती

नंदन's picture

27 Jul 2009 - 11:53 pm | नंदन

उत्तम परीक्षण. मास्तर म्हणतात तसा प्रश्नोत्तरांचा फॉर्मॅट जमला आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

28 Jul 2009 - 1:20 am | Nile

हेच म्हणतो. परीक्षण आवडले. फॉर्मॅट आवडला!

पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांच्या भावनांचे केलेले भांडवल भरपुर व्याज देउन गेले तर! :)

धनंजय's picture

4 Aug 2009 - 2:51 am | धनंजय

परीक्षणाचा फॉर्म्याट यशस्वी झाला आहे!

अनामिक's picture

28 Jul 2009 - 12:19 am | अनामिक

डॉन्राव... उत्तम परिक्षण!
कधीएकदा हा चित्रपट ऑनलाईन येतोय असे झाले होते... तेवढीच निराशा चित्रपट पाहिल्यानंतर झाली.

-अनामिक

श्रावण मोडक's picture

28 Jul 2009 - 12:27 am | श्रावण मोडक

कलाकृतीच्या परिचयाचा नवा फॉर्मॅट आवडला. :)

योगी९००'s picture

28 Jul 2009 - 12:35 am | योगी९००

परिक्षण अतिशय उत्तम..बहुतेक बाबतीत आपली मते जुळली आहेत.

मात्र मला महेश मांजरेकर यांनी साकारलेला शिवाजी आवडला. प्रमुख भुमिकेत असूनही स्वत:चे प्रसंग वाढवले नाही. तसेच उगाच स्वतःचे जास्त डायलॉगही ठेवले नाहीत. नाहीतर याचाही अतिरेक झाला असता.

पण याच मांजरेकरांनी नंतर कुठल्यातरी चॅनलला या चित्रपटाविषयी बोलताना मात्र अतिरेक केला होता. एकतर तारवटलेले डोळे, त्यात मराठीतून विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरे यामुळे हा माणूस डोक्यात गेला होता.

पण "हे राजे.." हे गाणे सु़खविंदरकडून म्हणून घ्यायची काय गरज होती? कोणी मराठी गायक नाही का चालला? मधले मधले काही शब्द तर कळतच नाहीत. अर्थात सुखविंदरवर राग नाही. त्याने गाणे उत्तम गायलेय.

खादाडमाऊ

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2009 - 1:01 am | बिपिन कार्यकर्ते

डान्राव!!! जबरदस्त परिक्षण. शब्दनशब्द पटला. तुमच्या शैलीबद्दलतर काही बोलायलाच नको. प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट मस्तच.

जन्माच्याकर्मा शारजा मधे मराठी चित्रपट आला म्हणून अगदी आवर्जून बघितला. चित्रपट तद्दन फिल्मी, भडक आणि अतिरेकाकडे झुकणारा वाटला. बर्‍याच ठिकाणी अगदी बाळबोध संवाद, भाबडा आशावाद आहे. कोणतंच कॅरॅक्टर नीट पकड घेत नाही. त्यातल्यात्यात सचिन खेडेकरनेच चांगले काम केले आहे, पण संवाद, कथा आणि दिग्दर्शनाच्या मर्यादांमुळे त्यालाही मर्यादा आहेत. आयटम साँग उग्गाच्च घुसवलेले आहे. भरत जाधव पूर्णपणे फसलाय आणि मकरंद अनासपुरेचे टायमिंग चांगले आहेच. मांजरेकरांना मोठ्या पडद्यावर महाराजांच्या रूपात बघणे अशक्य झाले होते शेवटी शेवटी. कॅमेरा त्यांच्यावर गेला की त्यांच्या डोळ्यांखालच्या आयबॅग्जच डोळ्यात भरत होत्या पटकन.

एकदा बघावा... फुकट मिळाला तर आणि फार अपेक्षा न ठेवता.

बिपिन कार्यकर्ते

क्रान्ति's picture

28 Jul 2009 - 8:23 am | क्रान्ति

मी जेव्हा हा चित्रपट मोठ्या कौतुकानं पाहिला, तेव्हा हेच प्रश्न पडले होते! सगळी उत्तरं मिळाली. चित्रपट मनापासून न आवडलेल्या माझ्यासारख्या अनेकांच्या भावना या परीक्षणात मांडल्या आहेत.
खरंच मराठी माणूस केवळ नाव बदलून जगू शकतो ताठ मानेनं? त्याला बाकी काही पर्याय नाही? मग मांजरेकर हे अगदी लक्षात येणारं [कर हा खास मराठी प्रत्यय!] नाव का बदललं गेलं नाही? ६४ कला, ज्ञान-विज्ञान, राजकारण, समाजकारण, कितीतरी क्षेत्रात जगन्मान्यता मिळवणार्‍या पं. भीमसेन जोशी, पं वसंतराव देशपांडे, वसंत देसाई, जयंत नारळीकर, विजय भटकर, बाबा आमटे, डॉ. मांडके, मंगेशकर कुटुंबीय, ऑस्करचा प्रवास करून आलेली अगदी खास मराठमोळ्या वळणाची आपल्या "श्वास"ची टीम यांनी तर नावं बदलली नाहीत! [माधुरी दिक्षीत वगैरे मराठी मुलींची नावं बदलली, पण ती प्रथेमुळे! ;) ] मराठी माणसावर इतके वाईट दिवस अजून तरी आलेले दिसले नाहीत, की त्याने प्रत्येक दु:ख आणि अपमान विसरण्यासाठी बारमध्ये बसून टल्ली होईपर्यंत ढोसावी, आणि मार खाऊन लोळावं! [किती मराठी माणसं पाहिली अशी मांजरेकरांनी कुणास ठाऊक?] भ्रष्ट अधिकारी हा फक्त मराठीच असतो का? :?
त्या बांदेकर बाई तर मंदबुद्धीच वाटतात. :D काय ते लहान मुलासारखं गाडी खेळत बसणं! छे, डोक्यात गेला तो पांचट प्रकार! आणि ते बालाजी प्रकरण पण फालतू! अनारसपुरे आणि भरत जाधव कंटाळवाणे (|: झालेत आता. सिद्धार्थ मात्र ठीक वाटला. बाकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पटलं, आणि त्याच विचारानं हा चित्रपट पाहिला. अजून असंच लिखाण येऊ दे.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

विशाल कुलकर्णी's picture

28 Jul 2009 - 11:55 am | विशाल कुलकर्णी

मराठी म्हणुन ज्यापद्धतीने त्याचा अपमान, अवहेलना झाल्याचे चित्रपटात दाखवले आहे तसा तो अगदी बिहार, युपी मध्येही होत नाही. हा टोकाचा अतिरेक चित्रपटाच्या मुळ हेतुवरच आघात करतो. खरेतर आणखीही खुप वेगवेगळ्या पद्धतीने ते अधोरेखीत करता आले असते. सहज बोलतानाही दर दोन शब्दांनंतर दहा हिंदी, इंग्रजी शब्द वापरणार्‍या मांजरेकरांनी (पर्यायी मराठी शब्द न सापडणार्‍या मांजरेकरांनी) मराठी व मराठी माणसावर भाष्य करावे ही कल्पनाच हास्यास्पद वाटते.
भरत आणि मकरंद दोघेही अपयशी ठरतात, त्यामानाने सिद्धार्थ जाधव खुप उजवा वाटतो. पण त्याच्या भुमिकेलाही फारसा वाव दिलेला नाहीये. सचिन खेडेकर मस्तच.
पण अति आदर्शवादही खटकतो बर्‍याचदा. कदाचित सादरीकरणाचा दोष असावा. बाकीच्यांबद्दल बोलणेच नको. एक अतिशय सुरेख कल्पना अक्षरशः वाया घालवलीय. बर्‍याच वेळा प्रदीप दळवींच्या "चेतक" कादंबरीची आठवण होते.
बाकी समिक्षणाचा फॉर्मॅट मस्तच आहे. मिपावरील बाकी समिक्षकांनीही अवलंबायला हरकत नाही. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नीधप's picture

28 Jul 2009 - 12:05 pm | नीधप

>>ऑस्करचा प्रवास करून आलेली अगदी खास मराठमोळ्या वळणाची आपल्या "श्वास"ची टीम यांनी तर नावं बदलली नाहीत! <<
संदीप सावतांनी आडनाव शर्मा, चोप्रा, बहल असं काहीतरी केलंय असा विचार करून जाम हसायला आलं. ;)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सहज's picture

28 Jul 2009 - 8:32 am | सहज

तुमच्या शैलीबद्दलतर काही बोलायलाच नको. प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट मस्तच.

असेच म्हणतो.

दिपक's picture

28 Jul 2009 - 9:28 am | दिपक

सुंदर परिक्षण. :) ते लिहिण्याची कल्पकता भारीच. चित्रपटात भरत जाधव तिथे फिट बसलाच नाही. त्यामानाने सिद्धुने मस्त काम केले आहे.

"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो ...

सहमत !

निखिल देशपांडे's picture

28 Jul 2009 - 9:45 am | निखिल देशपांडे

डॉनराव परिक्षण मस्तच जमले आहे....
प्रश्न उत्तर स्वरुपातले सादरीकरण आवडले
बाकी चित्रपटा बद्दल बोलायचे तर आहेच तो गल्लाभरु चित्रपट पण मराठीतील तांत्रिक दॄष्ट्या चांगला चित्रपट म्हणुन पाहिला आवडला.
निखिल
================================

अमोल केळकर's picture

28 Jul 2009 - 10:51 am | अमोल केळकर

उत्तम परिक्षण
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2009 - 11:03 am | प्रकाश घाटपांडे

परिक्षणाचा फॉरमॅट आवल्डा ब्वॉ. यकदम सुसंवादी. हा फॉरमॅट पुढे लोकप्रिय होईल असे भाकीत वर्तवतो
ज्योतिर्दुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

महेश हतोळकर's picture

28 Jul 2009 - 12:04 pm | महेश हतोळकर

परीक्षण आवडले आणि पटले सुद्धा.
प्रश्नोत्तराचा फॉर्म्याट पण आवडला.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2009 - 12:19 pm | स्वाती दिनेश

मात्र हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.
अगदी अगदी...
परीक्षण मस्तच लिहिले आहेस.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jul 2009 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

डॉन्राव अतिशय उच्च दर्जाचे परिक्षण लिहिले आहेत.

अजुन हा चित्रपट पाहिला नाही, ३० रुपायात डी व्ही डी येतेच आहे तेंव्हा बघु. परिक्षण वाचुन तर आता ३० रुपयेही घालवावेत का कोणी मित्र डी व्ही डी विकत घ्यायची वाट बघावी असे वाटु लागले आहे ;)

©º°¨¨°º© छोटा परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

इनोबा म्हणे's picture

28 Jul 2009 - 2:55 pm | इनोबा म्हणे

एक नम्बर परिक्षण लिहिले आहेस...

हम्म, आमच्या प्रतिसादातील एक हिणकस शब्द संपादित केला गेला. हो हो तोच शब्द, जो माननीय मालक हवे तिथे हवे तेव्हा वापरु शकतात. आम्हाला मात्र त्याची सवलत नाही. टाळ्या!

-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

जे.पी.मॉर्गन's picture

28 Jul 2009 - 3:47 pm | जे.पी.मॉर्गन

मी हा चित्रपट २ वेळा चित्रपटगृहात पाहिला - एकदा "प्रभात" ला आणि एकदा "सिटीप्राईड" ला. लोकांच्या प्रतिसादात जमीन-आस्मानाचं अंतर होतं. सिटीप्राईडला सर्वांत उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ते म्हणजे एका कॉलेजकन्यकेचं अस्फुट "वॉ..............व". ह्याउलट प्रभातला कित्येक संवाद ऐकूच आले नाहीत. राजांच्या 'एंट्री' ला तर पब्लिकनी थेटर डोस्क्यावर घेतलं होतं.

परीक्षण झकासाच... सगळेच मुद्दे पटले. फकस्त येक्दा प्रभातला पिटात बसून पिक्चर बघा डानराव... मंग समजेल हा चित्रपट नक्की कोणासाठी आणि कशासाठी होता ते. 'गल्लाभरू' शब्द वापरला आहेच ना तुम्ही?

ऋषिकेश's picture

28 Jul 2009 - 4:57 pm | ऋषिकेश

फकस्त येक्दा पिटात बसून पिक्चर बघा

+१.
आमच्या इथल्या चित्रपटगृहात म्हारांजांची यंट्री वन्समोअर घ्यायला लावली पब्लिकने. मी एखाद्या चित्रपटाचे रिळ उलटे फिरवून वन्समोअर झालेले पहिल्यांदाच पाहिले

चित्रपट फारसा आवडला नसला तरी तो पिटात बसून बघणे हा अत्यंत मजेदार अनुभव होता

(वन्स मोअर टैम प्रतिक्रीया देणारा) ऋषिकेश

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2009 - 5:58 pm | भडकमकर मास्तर

शिवाजी द बॉस सिनेमात साउथला असे बर्‍याचदा करावे लागते असे ऐकले होते... नाहीतर हाणामार्‍यांची वेळ येते
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

दशानन's picture

28 Jul 2009 - 3:49 pm | दशानन

परिक्षण अतिशय उत्तम..बहुतेक बाबतीत आपली मते जुळली आहेत.

+++++++++++++++++++++++++++++

सूहास's picture

28 Jul 2009 - 4:00 pm | सूहास (not verified)

सुहास

आशिष सुर्वे's picture

28 Jul 2009 - 5:22 pm | आशिष सुर्वे

मी हया चित्रपटातून एक बोध मात्र घेतला...

समस्त 'मराठी' समाजाने एकत्र यायला हवेय.

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Jul 2009 - 5:42 pm | ब्रिटिश टिंग्या

बरा होता!

@डान्या,

नवीन फॉरमॅट लै भारी! :)

मुक्तसुनीत's picture

28 Jul 2009 - 5:44 pm | मुक्तसुनीत

परीक्षण आवडले. विषयाची व्याप्ती डॉन राव म्हणतात तशी मोठी आहेच. पण चित्रपटाचा उत्कृष्ट परामर्ष घेतला आहे असे वाटले. वर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या तोंडी असलेली चार वाक्ये सोडता, या चित्रपटात हाताशी काही लागेल असे दिसत नाही. आणि ती चार वाक्ये म्हणजे ठाकरे कुटुंबीयांपैकी एखाद्याच्या तोंडची उचलून घालावीत तशी दिसताहेत. म्हणजे एकूणच , काही ढोबळ सत्यांचा उपयोग भावनांच्या उद्रेकाकरता असा एकूण फॉर्म्युला. उद्योजक वृत्ती , क्षात्रतेज या सर्वाना आवाहन देणार्‍या शिवाजीराजांपासून इथेतिथे डाफरणार्‍या नि भवानी तलवार चालवणार्‍या - थोडक्यात अशक्यप्राय अशा , टिपिकल मसाला गोष्टींपर्यंतचा - प्रवास वाचताना रोचक वाटला.

परीक्षण उत्तम जमले आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

प्रसन्न केसकर's picture

28 Jul 2009 - 5:57 pm | प्रसन्न केसकर

मला पोवाडा पहिल्यांदा ऐकला तेव्हा आवडला. पण रविवारी रायगडचा राजबंदी पाहिला डीव्हीडीवर अन त्यातला शेवटचा पोवाडा ऐकुन मी शिवाजीराजेमधल्या पोवाड्याची सगळी छाप पुसुन गेली.

---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

रम्या's picture

3 Aug 2009 - 3:51 pm | रम्या

"रायगडचा राजबंदी"? हा सिनेमा आहे की नाटक? कलाकार कोण आहे. प्रश्न अगदीच बालीश वाटल्यास क्षमस्व! _/\_
आम्ही येथे पडीक असतो!

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2009 - 4:46 pm | प्रसन्न केसकर

हा भालजी पेंढारकरांचा सिनेमा आहे, कृष्णधवल. स्टारकास्ट मधे सुर्यकांत अन सुलोचना आहेत. सिनेमा संपताना सावळारामांचा पोवाडा आहे, अवर्णनिय.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रसन्न केसकर's picture

3 Aug 2009 - 4:46 pm | प्रसन्न केसकर

हा भालजी पेंढारकरांचा सिनेमा आहे, कृष्णधवल. स्टारकास्ट मधे सुर्यकांत अन सुलोचना आहेत. सिनेमा संपताना सावळारामांचा पोवाडा आहे, अवर्णनिय.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

सुमीत's picture

29 Jul 2009 - 2:42 pm | सुमीत

परिक्षण उत्तम, अगदी जे चांगले आहे त्याला चांगले आणि वाईटाला वाईट असे लिहिले आहे.
परिक्षण अगदी असेच तटस्थ असावे लागते आणि ते तुम्ही अप्रतिम रित्या लिहिले आहे.
जाता जाता हा चित्रपटाने मराठी जणांना जागे केले का? तर उत्तर नाही हेच आहे, अगदी स्वतः महाराज आले तरीही.

छोटा डॉन's picture

29 Jul 2009 - 4:07 pm | छोटा डॉन

परिक्षण आवडले / नाही आवडले असे आवर्जुन कळविणार्‍या / न कळविणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार ...!!!

आता महत्वाचा मुद्दा,
बरेच जण वर प्रतिसादात म्हणातात की " ह्या सिनेमानंतर मराठी माणसात काय फरक पडला ? "
लिखाळरावांनी तर प्रश्नांची जंत्रीच दिली आहे.
मॉर्गनसाहेब पिटात बसुन हा चित्रपट पहावा म्हणजे त्याच्या वास्तवातल्या प्रेक्षकवर्गाशी नाळ जोडली जाईल असा सल्ला देतात ...

ह्याच सर्व मुद्द्यांचा सविस्तर उहापोह करणारा आणि माझे मत मांडणारा सविस्तर प्रतिसाद थोड्याच वेळात टाकतो, हे मुद्दे महत्वाचे आहेत असे ( माझे ) मत आहे.
धन्यवाद ...!!!

------
छोटा डॉन

JAGOMOHANPYARE's picture

29 Jul 2009 - 4:44 pm | JAGOMOHANPYARE

गल्लाभरु चित्रपट .......... आणि सल्लाभरू, हल्लाभरू सुद्धा...

पण तरीही गल्लाभरू म्हणावेसे वाटत नाही... कारण मग मम्मी, जुरासिक पार्क, मिस्टर इन्डिया, हम आपके है कौन.... हे सगळे काय समाजसेवा म्हणून काढलेले चित्रपट होते काय ? हा प्रश्न निर्माण होतो...

<<<<<<<सुखविन्दर ऐवजी मराठी गायक हवा होता... >>>>>>>>>>.. ( हृदयनाथ, शोनक अभिशेकी, अवधूत गुप्ते, अजित कडकडे, श्रिधर फडके, सुरेश वाडकर, सन्जीव अभ्यन्कर, बाल गन्धर्व... नेमकं कोण तुम्हाला अपेक्षित आहे?)

योगी९००'s picture

29 Jul 2009 - 6:00 pm | योगी९००

खादाडमाऊ

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2009 - 6:48 pm | llपुण्याचे पेशवेll

करेक्ट हेच म्हणतो.. अजय अतुल सुधा चालले असते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2009 - 6:30 pm | कानडाऊ योगेशु

रजनीअण्णाचा शिवाजी द बॉस चे परिक्षण सकाळ मध्ये वाचले होते.त्यात असे लिहीले होते की व्यावसायिक यशस्वी चित्रपट काढणे आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचुन आणणे ही कला रजनीअण्णाला चांगली जमली आहे.

उगाच कलात्मकतेच्या,प्रबोधनतेच्या वाटेला न जाता निखळ करमणुक देणारा चित्रपट एखादा बिग बजेट मराठीतही का काढला जाऊ नये.

वरील प्रश्नाला माझामते "मी शिवाजी.." काही प्रमाणात उत्तर देतो असेच म्हणावे लागेल.

गल्लाभरु,मसाला वगैरे बिरुदांबद्दल म्हणाल तर अमिताभचे त्याला सुपरस्टारपदापर्यंत घेवुन जाणारे चित्रपट तरी कोणत्या लायकीत मोजायचे?

माझ्यामते "मी शिवाजी..." च्या आधीचा सक्सेसफुल मसाला बिगबजेट व्यावसायिक चित्रपट हा बहुदा "बिनधास्त" असावा.

संदीप चित्रे's picture

30 Jul 2009 - 11:34 pm | संदीप चित्रे

>> इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि चुकीचा आहे असे आमचे मत आहे

चला -- माझ्या मताचा अजून कुणीतरी भेटला ह्याचा आनंद झाला :)

सुहास's picture

31 Jul 2009 - 3:42 am | सुहास

सुरे़ख परिक्षण..! मला हा पिक्चर एकदा पहायच्या लायकीचा वाटला.. खूपसा "लगे रहो मुन्नाभाई" च्या जवळ जाणारा.. मला न आवडलेले मुद्दे..
१. महेश मांजरेकर शिवाजीच्या रोलमध्ये असणं.
२. "गर्व बाळगा" हा संदेश.. तो "अभिमान बाळगा" असाच हवा होता..!
३. डि. वाय. पाटील या शिक्षण सम्राटाचा अतिशय आदराने केलेला उल्लेख...

प्रश्न फक्त उल्लेखाचा नाही तर लेखक-दिग्दर्शकाच्या सामान्य ज्ञानाचा आहे..! हीच डी. वाय. पाटील सारखी मंडळी परप्रांतीय विद्यार्थ्यांना कसे प्रवेश देतात व त्यांना महाराष्ट्रात स्थायिक व्हायची कशी संधी देतात लेखक-दिग्दर्शकाच्या गावीही नसावे याचे आश्चर्य वाटले..!

--सुहास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट पाहिल्यानंतर आपले परिक्षण पुन्हा वाचले. प्रतिक्रिया लिहिण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही. शिवाजी महारांजाच्या भुमिकेतले महेश मांजरेकर सहन करावे लागले.या अनेकांच्या मताशी आम्हीही सहमत आहोत. अपमान आणि अपमान, चित्रपटात मराठी माणूस म्हणजे जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेला. अगदी भिकार्‍यासारखा दाखवलाय. पापलेट खरेदी करायची हिम्मत नै म्हणजे लैच झाले. मराठी माणसांना अभिमान वाटणारी अशी जी नावे संवादाच्या निमित्ताने येतात त्याने जरा सुखावल्यासारखे वाटते. मराठी माणसाने अंतर्मुख व्हावे इतका भडीमार नक्कीच चित्रपटात आहे. अरे हो, शाहीर भरत जाधवच्या जागेवर कोणीही अनोळखी कलाकार चालला असता. असो,

डॉन्याचे परिक्षण मात्र एक लंबर...मालक अजून येऊ द्या..!

-दिलीप बिरुटे