कहाणी स्फूर्तिदेवतेची

क्रान्ति's picture
क्रान्ति in जनातलं, मनातलं
28 May 2009 - 9:01 am

ऐका स्फूर्तिदेवते तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वेडी यक्षकन्या रहात होती. बालपणापासून तिला आपला शब्द-सुरांशी खेळण्याचा छंद! नवनवे शब्द गोळा करावे, त्यांना सुरांत गुंफून त्यांच्या माळा, गोफ विणत रहावेत आणि त्यांच्यातच रमून जावं हेच तिचं काम. कायम आपली आपल्यातच गुंतलेली. यक्षपित्यानं तिच्यातलं हे वेड जाणलं आणि तिची ओळख करून दिली साहित्याच्या अफाट विश्वाशी. अलिबाबाच्या गुहेत जावं आणि डोळे दिपावेत तशी हिची अवस्था झाली. हरखून गेली ती तो अमोल ठेवा पाहून. त्या विश्वात रमली, रुजली, गुंतत गेली. विचारांचे तरंग तिच्या मनात उठत राहिले, त्यांना शब्दरूप देत गेली. यक्षपित्याला परमानंद झाला. चिमुकल्या यक्षकन्येचं कौतुक झालं. थोरामोठ्यांनी तिचे बोबडे बोल नावाजले. एका महान सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वानं तिच्या शब्दबंधांनी प्रभावित होऊन तिचं गुरूपद स्वीकारलं, तिला आपला वारसा दिला. भरभरून आशिर्वाद दिले. ती फुलत गेली, बहरत गेली. तिचं शब्दविश्व समृद्ध होत गेलं. असेच दिवस सरत गेले.
मधल्या कालावधीत तिच्या आयुष्यात बरीच स्थित्यंतरं घडली. तिचं अवघं विश्व बदललं. ते बदल असे होते, की ती फुलता फुलता अचानक कोमेजूनच गेली! तिच्या संवेदना गोठून गेल्या, शब्द हरवून गेले, सूर दिसेनासे झाले. पंख कापलेल्या पाखरासारखी ती कैद झाली अदृश्य पिंज-यात. एका अनाकलनीय कोशात गुरफटून गेली. फुलपाखराचं सुरवंट झालं! यक्षपित्याच्या यातनांना अंत नव्हता. काय करून बसलो आपण हे? या मनस्विनीला असं कधीच पाहिलं नव्हतं, खुरटलेलं, सुकलेलं. त्याची धडपड सुरू होती, हिनं कोशाबाहेर पडावं म्हणून. पण खळाळून वहाणा-या नदीचं एका डोहात रूपांतर व्हावं, असं काहीसं तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. वाट्याला आलेले भोग सोसत कोशालाच आपलं विश्व मानून ही मूक झाली होती. शब्दसुरांशी तिचं नातं तुटलं होतं इतर नाती सांभाळता सांभाळता. यक्षपित्याला कळत नव्हतं, हे असं का झालं.
एक दिवस त्यानं तिला गुरुदेवांकडे नेलं. त्यांना हिच्या शब्दसुरांच्या दुराव्याची हकीकत सांगितली. गुरुदेवांनी तिला बोलती करायचा खूप यत्न केला, पण ही आपली गप्पच. ते चिडले, रागावले, आणि हिला म्हणाले, "माझे शब्द लक्षात ठेव. एक दिवस असा येईल की लिहिल्याशिवाय तू जगू शकणार नाहीस!" ही बिचारी उगीच राहिली. पुन्हा गेली गुरफटून आपल्या कोशात. जसं काही कधी हे झालंच नव्हते. मध्यंतरी असा विचित्र वणवा आला, की हिचं जपलेलं सारं शब्दभांडार जळून खाक झालं! [हीच कशी वाचली न कळे!] मग सुरू झाला एक अविरत संघर्ष, स्वतःचा स्वतःशीच. गुरुदेव, यक्षपिता तोवर न परतीच्या वाटेवर गेले होते, आता ही एकटीच आपल्या कोशात. तिची स्फूर्तिदेवता तिच्यावर रुसली होती, की हीच रुसली होती स्वतःवर?
जवळजवळ दोन तपं अशीच सरली. तिच्या पिंज-याचे गज भक्कम होत गेले. कोशाच्या भिंती हवा सुद्धा आत जाणार नाही, अशा मजबूत झाल्या. आणि अचानक एक दिवस कुठूनतरी एक कोवळी सुगंधी झुळूक त्या कोशात शिरली. हे काय? ही आली कुठून? यक्षकन्या चमकली. हळूच डोकावून पाहिलं, तर हिच्या "उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत"आलेला! फुलांचे गंधित बहर, कोकिळाचे मंजुळ गीत, उल्हासाचे खळाळते झरे, वा-याच्या सुरेल लकेरी घेऊन! हिनं मनाची कवाडं घट्ट बंद करून घेतली. जसं आपण काही पाहिलंच नाही! पण आतून ती अस्वस्थ झाली, वेड्या मनाची चलबिचल झाली. का हा असा अवेळी छळतोय? इथे न निखारा, न ठिणगी, शोधतोय काय हा या राखेत? सगळे कोंब जळून गेले वैशाखवणव्यात, आता कुणासाठी हा बहराचा निरोप घेऊन आलाय?
पुन्हा पुन्हा तो वेडा वसंत हिला खुणावत राहिला, ही पुन्हा पुन्हा त्याच्या आर्जवांना टाळत राहिली. त्याच्यापासून दूर दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिली.
क्रमशः

कथाजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

28 May 2009 - 9:03 am | विनायक प्रभू

सुरुवात.

अवलिया's picture

28 May 2009 - 9:05 am | अवलिया

वा! मस्त सुरुवात झाली आहे !!
पुढिल भाग लवकर टाका :)

--अवलिया

अनामिक's picture

28 May 2009 - 9:24 am | अनामिक

सुंदर सुरवात... पुढचा भाग लवकर येऊ द्या!

-अनामिक

सायली पानसे's picture

28 May 2009 - 9:37 am | सायली पानसे

मला समजला आणि आवडला पण खुप. लवकर येउदे पुढचा भाग क्रांतीताई....वाट पाहते.

मनीषा's picture

28 May 2009 - 11:42 am | मनीषा

सुंदर कहाणी ...!!!

पुढील कहाणी लवकर लिहा ..

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2009 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म्म क्रांतीतै मस्तच लिहिलयस .....

थोडा अंदाज आलाय यक्षकन्येबाबत :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अमोल केळकर's picture

28 May 2009 - 1:06 pm | अमोल केळकर

मस्त . पूढला भाग लवकर येऊ दे

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

प्राजु's picture

29 May 2009 - 12:39 am | प्राजु

सुरूवात आवडली.
पुढचा भाग कधी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जयवी's picture

30 May 2009 - 3:08 pm | जयवी

आई गं..... क्रान्ति...... !!
फार सुरेख लिहिते आहेस.........पुढच्या भागाची उत्सुकता वाढलीये...लवकर लिही.