नमस्कार मिपाकर्स!
खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली.
आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं.
म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.
माझी कल्पना अशी:
- आंतरजालावरील देशविदेशातील माहिती अन् बातम्यांतून, वर उल्लेखल्याप्रमाणे निवडक आणि उत्तम अशा एक - दोन बातम्या निवडायच्या.
- त्याची माहिती थोडक्यात, एक - दोन ओळींत मराठीत मांडायची (हे महत्त्वाचं!)
- सोबत त्या-त्या बातमीची आंतरजालीय लिंक संदर्भासाठी द्यायची.
दर महिन्यासाठी ताज्या घडामोडींचं सदर असतं, तसंच हेही चांगल्या बातम्यांचं सदर महिन्याकाठी सुरू करायचं.
अटी दोनचः
- राजकारण हा विषय वर्ज्य ठेवायचा. कारण त्यासाठी अनेक लेख अन् त्यावरील वाद/प्रतिवाद मिपावर चालूच असतात.
- बातमी ही चांगली, सकारात्मक असावी. सर्जनशील, प्रेरणादायक असली तर फारच उत्तम.
अर्थात् हा माझा विचार. आपलं सगळ्यांचं काय मत?
राघव
प्रतिक्रिया
11 Aug 2025 - 6:54 am | चित्रगुप्त
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते.
--- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?)
-- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते.
-- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक.
'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर)
असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.
11 Aug 2025 - 11:37 am | प्रसाद गोडबोले
चित्रगुप्त काकांशी सहमत.
चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत.
तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच.
आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत.
तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.
11 Aug 2025 - 11:44 am | कंजूस
आवडला धागा आणि उपक्रम.
नक्कीच लिहीन.
12 Aug 2025 - 7:21 am | कुमार१
उत्तम आणि अत्यंत गरजेचे.
12 Aug 2025 - 10:54 am | गवि
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा.
तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास..
चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत.
मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते.
असो.
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
12 Aug 2025 - 11:51 am | विवेकपटाईत
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात.
1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख.
2. शेतीत नवीन प्रयोग करणार्यांच्या बाबतीत लेख
3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख
4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत
5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि
6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि
13 Aug 2025 - 4:59 pm | राघव
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद!
चित्रगुप्त:
अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील.
पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही.
संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल.
होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-)
चित्रगुप्त, प्रसादः
चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये!
विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण.
त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-)
राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात.
त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं.
गवि:
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-)
विवेकपटाईत:
तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे.
त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही.
बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो.
पुनःश्च धन्यवाद!
शुभम्
13 Aug 2025 - 8:46 pm | चित्रगुप्त
छान.
13 Aug 2025 - 8:55 pm | चित्रगुप्त
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?
20 Aug 2025 - 7:57 pm | पाषाणभेद
प्रत्येक चांगल्या बातमीसाठी वेगळा धागा तयार केल्यास वाचनात व प्रतिसाद देण्यात सुलभता येईल.