मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
23 Jul 2025 - 2:29 pm

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

"हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.
आता तिला एकेक आठवू लागले.
***
ती एक ५५ वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदवल्याचा अनुग्रह ४५ व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी.. ते ही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णुसहस्त्रनाम, म्हणून नंतर कान्होबाला, रामरायाला , महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज एक तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नामसंकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते.

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आले होते. नाका-तोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटामिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, इकेजी मशीन ची टिक टिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते.

"आई आई ग! डोक्यातली कळ सहन होत नाहीये". ती दोन्ही हातांनी डोके दाबून धरत कण्हत होती. सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. "बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं ! काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी, हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते. आणि तोंड उघड बघू जरा.. हे समाधीचे तीर्थ आणले आहे , ते देते. !

डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्त्राव थांबत नव्हता.अन त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती. दोन डॉक्टर, १ नर्स ची टीम तिच्याभोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते. तिची मुलगी, मुलगा ही बाहेर उभे होते.
"काय बरे आई म्हणत होती? "श्रीराम जयराम जय जय राम" , महाराज " .... आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एकसलग येऊ लागली. आणि झालं.. डॉक्टरांची पळापळ सुरु झाली. "Sister, ward boy .. keep OT ready! Check BP First ! आपल्या रक्तपेढीतून बी पॉजिटीव्ह रक्ताच्या ६ बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब! "त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तास ऑपरेशन चालले.

ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले. ' हे बघा..आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत पण प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेव्हल लो झाल्याने she is now in deep unconsciousness state . थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचा ही असू शकतो आणि म्हटले तर ३ महिनेही ... अन म्हटले तर अनेक वर्ष ही जाऊ शकतात.
दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले.. तिची आई मटकन खाली बसली. मुलगी आज्जीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली. मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला.
*
डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला वेदनांची जाणीव नष्ट झाली. या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागली. संवेदना नव्हत्याच.. हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळात विहरु लागला होता. इथून जाता जाता तिला तिची हतबल होऊन बसलेली आई दिसली, रडणारी गोजिरवाणी लेकरे दिसू लागली ... काडी काडी जमवून केलेला संसार, कित्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर फ्लॅट, हे सगळं सगळं दिसू लागले. इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते. बरोबर काहीही न्यायची मुभा नाही. हो ! नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले. चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले. " .... इथून फक्त नामच न्यायची परवानगी आहे तर,"ती मनाशी उद्गरली.
दोन आडदांड काळेकभिन्न दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या, खोल, अश्या अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत.. या स्थितीत किती काळ गेला कुणास ठाऊक. अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख्ख प्रकाश दिसू लागलाय. खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय.. त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे उगाचच तिला वाटून गेले. त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहर्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाहीयेत.
अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केलय. सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे. बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती, त्या बाडमध्ये डोके खुपसून बसली आहे. तेवढ्यात ती सिंहासनाधिष्टीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडधारी व्यक्तीला काहीतरी विचारते. बाड धारी व्यक्ती सगळा हिशेब मांडते. आपल्याला कळेल अश्या भाषेत सगळा पाप- पुण्याचा हिशेब सांगितला जातोय. "महाराज, सुमारे १३५० वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे, १७७५ वेळा परनिंदा, २१० वेळा खोटेनाटे बोलून, लाच देऊन, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन काही मिळवणे, ५७ वेळा प्राण्यांना इजा करणे, ८५ वेळा फुकटचे घेणे अश्या गोष्टी सदरहू महिलेच्या नावावर आहे.
आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला. गतायुष्यातली कर्मे लख्खपणे समोर आली.
पुन्हा तो बाडधारी त्या क्रूर दिसणार्या व्यक्तीच्या कानाला लागला. आता पुण्यकर्म किती केली आहेत त्याची यादी. १५ वेळा भुकलेल्याला अन्नदान केले, २२ वेळा वृद्धास सहकार्य केले, दरवर्षी मन्दिरात दानधर्म, आणि नामजप केलेला आहे. वयाच्या ४५व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह ... रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे.
तेवढ्यात एक दूत सिंहासनाधिष्टित व्यक्तीशी बोलताना ऐकू येते," महाराज, वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे. सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते. आणि विचारते, काय निरोप आहे?
आणि ते दोघे त्यांच्या कानाला लागतात. पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर, सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात, " हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.

"जी महाराज ' एवढेच अस्पष्टसे तिच्या तोंडून उद्गार निघाले.
तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणाच्या पुण्यबळावर एक संधी देत आहोत. पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय? त्यानुसार जन्म मिळेल. नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल. एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
" मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. " ती एवढेच बोलू शकली.
यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली. तिला सिंहासनासमोर आणण्यात आले. 'हे बघ, तुझे सद्गुरू येथून अंतराळात खूप दूरवर आहेत. त्यांना भेटण्याइतकी पुण्याई तुझी नाही. फक्त एक करू शकतो... त्यांनी पोह्चवलेले १३ जीव .. जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अश्या साधकांशी आम्ही तुझी भेट घडवू शकतो. फक्त ६० विपळे.
"विपळे म्हणजे?' तिने उत्सुकतेने विचारले.
"इथे काळाची परिमाणे वेगळी आहेत. तरीही सांगतो. भारतीय कालमापनानुसार एक पळ म्हणजे ६० विपळे. थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे २४ सेकंद. फक्त २४ सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे, मंजूर आहे?." समोरून उत्तर आले. तिने होकारार्थी मान हलवली.
"ए, कोण आहे रे तिकडे? या बाईंना इथून ३३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 'अँड्रोमीडा सुदर्शन 'आकाशगंगेवरील 'सिग्नेट बी ' ताऱ्यावर घेऊन जा.
आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच झाली. बरोबर पुन्हा तेच दोन काळेकभिन्न व्यक्तित्व. अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाऊक. काही वेळातच ते एका मोठ्या दालनात उभे होते. दोन्हीही दूत दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले . तिच्या डोळ्यावरचा कपडा दूर झाला. सुरवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले.. ते धुके दूर झाल्यावर तिला एकेक सूक्ष्मदेह दिसू लागले.
सगळ्यांच्या हातात जपमाळ होत्या. सगळे गोलाकार बसलेले होते. आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एकेक चेहरे दिसू लागले.
अरे बापरे, हे तर पूज्य भाऊसाहेब, त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब, ... पु. रामानंद महाराज, पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज, आणि चक्क पु प्रल्हाद महाराज, पु. जिजामाय, आणि इतरही श्रीमहाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिलेले असे १३ सूक्ष्मदेह तिथे होते. विशेष म्हणजे सर्व जण ध्यानमग्न होते.
तिने भीत भीतच सर्वांना " जय श्रीराम " म्हणून साष्टांग नमस्कार घातला.
"बाळ... " धुक्यातुनच एक हाक कानावर आली. पु. तात्यासाहेब बोलत होते. ती नखशिखांत हादरली.
"बाळ, आज तुझे जन्मजन्मांतरीचे नामाची पुण्याई फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली. पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्रीमहाराज इथे आता भेट देणार आहेत. तुला जी २४ सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच."
"महाराज, महाराज...तिने आर्ततेने हाक मारली.
भानावर आल्यावर "इथे पू. बुवा दिसत नाहीत"!! तिने चाचरत विचारले.
"बाळ, महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे.
श्रीमहाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे. इथून ४२८ लक्ष महापद्म अंतरावर असलेल्या "केनिस बटू- जी या चक्राकार आकाशगंगेतील केप्लर या सूर्यमालेतील 'एपसिलोन विराट' या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे. आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरु आहे. पृथ्वीवर जसे त्यांचे १११ वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे २०२४ साल म्हणजे १११ वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले. लवकरच त्यांची तेथील अवतारासमाप्तीची तिथी आलेली आहे. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत. तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहेत. तुला त्यांचे दर्शन होईलच.

आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून जातील असा आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो. त्यातून सहस्ररश्मीला लाजवेल असे तेज:पुंज , तेजस्वी,सुवर्णकांती, प्रसन्न चेहऱ्याचे असे श्रीमहाराज दिसू लागतात. कपाळावर त्रिपुंड, पीतवर्ण, उंचेपुरे, गळ्यात रुद्राक्ष माळ, पुष्पमाला, अंगात पांढरी शुभ्र कफनी , डोक्यावर गणेश टोपी असे श्रीमहाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात. . सर्वजण साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घालतात.

श्रीमहाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात, ख्याली खुशाली विचारतात. अन सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात, "माय, श्रीरामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवले आहे बरं. तू आता जोमाने नामाला लाग. तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही, तितके मला कळते. त्यामुळे दुश्चित्त होऊ नका. तुम्ही दुश्चित्त झालात की मी इकडे अस्वस्थ होतो. भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालला आहे असे समजा. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका,मी तुमचा भार घेतला आहे, असे समजा. मनापासून मला हाक मारा, तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा, बरे का बाळ! "
" जी " डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू ती आता थोपवत ही नाहीये.
"महाराज.... एक विनंती! ती कसेबसे उच्चारते.
महाराज, आपल्या मुखातून 'श्रीराम जयराम, जय जय राम' हे ऐकण्याची इच्छा आहे. एक माळ जप आपल्यासोबत.... !
" हो हो "सगळे जण एकमुखाने मान्यता देतात. "आम्ही तुमच्या मागून म्हणतो".
धीरगंभीर आवाजात श्रीमहाराज सुरु करतात, "श्रीराम जय राम, जय जय राम " ... श्रीराम जयराम जय जय राम.... श्रीराSSSSSम जयराSSSSSम जय जय राSSSम!
सगळे जण श्रींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांच्यामागोमाग म्हणत आहेत. आणि श्रीमहाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत, "श्रीराSSSSम जयराSSSSSम जय जय राSSSम!" जणू काही म्हणत आहेत, माझ्या हृदयातले प्रेम मी तुम्हाला देतो आहे.
***
तब्बल तीन महिने १३ दिवस महिने उलटून गेलेत तिच्या कोमात जाण्याला. हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने, मुलाने, मुलीने सुरु ठेवला आहे. सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतलेत. आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करतेय. आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईच्या ध्यानात येते.
"सिस्टर.....? डॉक्टर...? इकडे या! हे बघा... " अश्या हाका मारत लगबगीने आई बाहेर धाव घेते. . पुन्हा आत लेकीजवळ येते. तिची बोटे आता हातात माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत. आणि तिच्या मुखातून अस्पष्टसे उद्गार बाहेर येऊ लागलेत. आई, तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर "श्रीराम..." असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्टसा उच्चार ऐकू येतो. जाणिवेच्या प्रांतात ती परत येत होती..! आई तर आनंदाने वेडीच होते. डॉक्टर येऊन तपासतात, आणि तिथेच किंचाळतात, " Oho, Oho ... Its a miracle ... तिच्या आईला खांद्याला धरून गदागदा हलवत म्हणत आहेत, "आई, तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय! त्यांच्या मुलीला, मुलाला कळवा.. ! डॉक्टर स्वतः आनंदाच्या घाईघाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला निघतात.
ती परत आली ... पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच. श्रींनी दिलेले १५ वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडी मध्ये वाया घालवणार नव्हती, कारण त्यातले काहीही बरोबर येणार नव्हते, फक्त 'नामच ' बरोबर येते याची तिला खात्री पटली होती. !

एव्हाना ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयु मधील चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडेतीन महिन्यांनी शुद्धीवर येतोय ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर वाऱ्यासारखी पसरली होती.

__________
कथा सम्पुर्ण काल्पनिक!

समाजप्रकटनविचारसद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

26 Jul 2025 - 5:01 pm | प्रसाद गोडबोले

अंहं
ही कथा काही भावली नाही.
महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism.

नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते.
एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे.

मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे.
ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे.

हा तुकोबांचा अभंग पहा :

राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।।
ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।।
रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।।
तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।।

तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे.

त्यानंतर व्हायचे ते होऊ दे
देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

कर्नलतपस्वी's picture

26 Jul 2025 - 5:58 pm | कर्नलतपस्वी

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे.
आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही.

एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३'s picture

28 Jul 2025 - 12:48 pm | आर्या१२३

<<नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते.
एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे.<<<

प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती.

<<मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे.
ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले.<<<
नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2025 - 7:28 pm | प्रसाद गोडबोले

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो.

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते.

मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !.

रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे.
त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे -

" मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll "

नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको.

नामाचे साध्य ही अवस्था आहे -

देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥

राम

कर्नलतपस्वी's picture

30 Jul 2025 - 12:37 pm | कर्नलतपस्वी

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते.

प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते.

मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !.

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा.

विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे.

मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते.

नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ

माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे.

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥
नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥
पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥

जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात,

नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ ||
ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ ||
नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ ||
हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ ||

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो.

पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ।
भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥
विठ्ठल सधर भिवरा तें नीर ।
नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥
शिवसुरवर चिंतिती सुस्वर ।
कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान ।
मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥

उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप ।
नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥
तें रूप विनट विठ्ठल सकळ ।
सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥
रजतमें दूरी नामाची माधुरी ।
निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥
भवाब्धितारक नावाडा विवेक ।
पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥
विश्व हें तारिलें नामचि पिकलें ।
केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ ।
दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥

परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले.

सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा.

चुकभुल देणे घेणे.

कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jul 2025 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा

जरा जास्त सोपीकरण करून -
थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे.
प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे.
राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही.

मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे.
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।।

नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे !

जैसा दीपें दीपु लाविजे,
तेथ आदील कोण हें नोळखिजे।
तैसा सर्वस्वें जो मज भजे,
तो मीची होऊनि ठाके ॥

मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे !

हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ !
निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !!
- समर्थ रामदास स्वामी.

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !!

इत्यलम

राम

कर्नलतपस्वी's picture

30 Jul 2025 - 2:09 pm | कर्नलतपस्वी

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !!

शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा.

इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा's picture

29 Jul 2025 - 5:25 am | मारवा

अवघड आहे.
कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास
असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली
तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते
भयावह आहे
कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही
केवळ नाम
केवळ नाम
अवघड आहे
हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय
केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे.
कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार
अवघड आहे

आण

विवेकपटाईत's picture

29 Jul 2025 - 10:52 am | विवेकपटाईत

नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2025 - 7:31 pm | प्रसाद गोडबोले

चूक

ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे

चूक.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2025 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान ।
ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

Bhakti's picture

30 Jul 2025 - 10:33 am | Bhakti

पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे.
निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४'s picture

29 Jul 2025 - 2:57 pm | श्वेता२४

त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म's picture

29 Jul 2025 - 4:16 pm | स्वधर्म

खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या.

आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे.

>>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे.

हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३'s picture

29 Jul 2025 - 5:42 pm | आर्या१२३

<<पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे.<<
लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा.
लेखाचा हेतु हा नव्ह्ता.

खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर.
हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे.

नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच.

<<,अवघड आहे.
कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते<<<
नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही.

आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे.

आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते.

दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.)

श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते.
दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ?
बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ?
सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही.
नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे.
नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो.
हे ही सोडा
जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत.
यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम ।

सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात.

नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते.

व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय.

स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते.

परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये.

नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत.

बाकी असो ...

श्वेता व्यास's picture

29 Jul 2025 - 7:03 pm | श्वेता व्यास

कथा म्हणून आवडली.
अति सर्वत्र वर्जयेत् !
माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही.
उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)