सायंकाळच्या गंमती जमती.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
17 Dec 2024 - 1:23 pm

खूप म्हणजे खूपच पूर्वी, लहानपणी शाळेला जाताना मला बसचा कंडक्टर म्हणायचा,"ए पोरी, लवकर चढ. तुझं दप्तर पडतंय बघ." नंतर काही वर्षांनी कंडक्टर मला "ताई" म्हणायचा. मग मावशी, काकू म्हणायला लागला. या संबोधनातल्या चढत्या श्रेणीवरुन माझ्या वाढत्या वयाची श्रेणी तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल. त्यानंतर आता तर मी म्हातारी किंवा चांगल्या शब्दांत वृद्धा, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. येत्या काही वर्षांत मी अतिज्येष्ठ नागरिक होईन. लेखाच्या शीर्षकातला "सायंकाळ" म्हणजे काय ते आता स्पष्ट झालं असेल.

तर.. आता लाल बस, आणि रेल्वे पण कायमची सुटली. कारण उंच पायऱ्या लांघून आत चढता येत नाही. रिक्षात बसायची तर मला नेहमीच भीतीच वाटत आली आहे. रिक्षावाले यमराजांकडून कार्यभार घेऊन आल्यासारखे बेफाम मुक्तमोकळेपणाने रिक्षा चालवत असतात. एक पाय मुडपून, सीटवर तिरपे बसून सुसाट वेगाने रस्ता कापतात. कधी बसला तर कधी टॅंकरला चाटून रिक्षा नेतात तर कधी दुसऱ्या रिक्षाशी सलगी करतात. कधी पादचाऱ्यांशी तर कधी दुचाकीवाल्यांशी चकमक करायला जातात. जेंव्हा रिक्षाने प्रवास शक्य होता तेव्हा मी जीव मुठीत धरून, दोन्ही हातांनी समोरची किंवा छताला असलेली आडवी लोखंडी दांडी घट्ट पकडून, डोळे मिटून, दीर्घ श्वसन करत रिक्षात बसत असे. तोंडाने कधी "धीरे चलाव" किंवा "हळू चालवा" अशा द्वैभाषिक निष्फळ सूचना देत असे. आताशा हाडांची खूपच काळजी घ्यावी लागत असल्याने सुटली बाई ती रिक्षा ! आता अगदीच लागली तर टॅक्सी, नाहीतर घरची गाडी आणि विमान ही माझी वाहनं आहेत. एसी मात्र मला सर्वत्र लागतो हं..!!

वयाने एकेक अवयव निकामी होत जातात हे दर दिवशी जाणवतं. वृद्धांची स्थिती वृद्धच समजू शकतील. त्याकडे हसत बघितले की त्रास जरा कमी होतो इतकेच. म्हणून हे लिहायचं.

बाहेर कुठे जाता येत नसल्याने मी बहुधा घरीच असते. मनोरंजन म्हणून टीव्ही हा मुख्य उपाय. पण.. टीव्ही वरच्या वीट (वीट कसली, विटाच त्या..) आणणाऱ्या मालिका, कंटाळवाण्या बातम्या. फार इलाज नसल्याने त्याही बघते. पण.. जास्त वेळ टीव्ही बघितला की डोळे ओढले जातात, थकतात. वाचन हा वेळ घालवण्याचा दुसरा मार्ग. तिथेही एक पण आहेच. जास्त वेळ वाचलं की डोळे दुखतात, कोरडे पडतात. डोक्यात काही शिरायचे बंद होते. डॉक्टरांनी डोळ्यांत टाकायला ड्राॅप्स दिले आहेत. ते दिवसातून तीन वेळा डोळ्यांत टाकायला सांगितले. आता घरातली इनमीनतीन माणसं व्यस्त, व्यग्र, बिझी. ती दिवसातून तीन वेळा ड्राॅप्स टाकायला कशी उपलब्ध होणार? मग मी कामवालीला पकडते. एकदा तिला म्हटलं,"माझ्या डोळ्यांत हे औषध टाक". तिनं त्या बाटलीला अटॅच्ड ड्राॅपर माझ्या डोळ्याच्या इतका जवळ आणलान, की मला वाटलं ,तो आता माझ्या बुबुळात घुसणार आणि माझी "अमर अकबर अँथनी"तल्या निरुपा राय सारखी दृष्टी जाणार. आणि कुठल्यातरी दगडावर टाळकं आपटल्यावर मला दिसायला लागणार. (सगळे आय सर्जन गेले तेल लावत!) मी घाईघाईने माझ्या कामवालीला माझ्या डोळ्यापासून दूर दूर केलं. मग विचार केला, आपणच स्वावलंबी होऊया. आपणच आपल्या डोळ्यांत औषध टाकूया. मी एका हाताच्या बोटांनी वरची आणि खालची पापणी फाकवली आणि थेंब टाकण्यासाठी बाटली दाबली. तेव्हा आणखी एक "पण" लक्षात आला. बोटांची ताकद आणि पकड अतिशय कमी झालेली. ती आय ड्रॉप्सची प्लॅस्टिकची कुपी माझ्यासाठी इतकी कठीण होती की माझ्या बोटांनी ती दाबली जाईना. मग खूपच जोर लावला तर त्या बाटलीलाच माझी दया आली असावी. ड्रॉप तर पडला .. पण हाताची थरथर.. त्यामुळे औषधाचा थेंब कधी माझ्या वरच्या पापणीवर तर कधी खालच्या पापणीवर पडायचा. कधी गालावर पडायचा. अचानक बाटलीतून इतके थेंब पडायचे की गालावरून आसवांसारखे ओघळू लागायचे. एका साध्या सहज गोष्टीसाठी अशी कसरत.

माझी म्हातारीची मान दुखते. मान दुखू नये म्हणून अनेकजण पट्टा लावतात. तोही लावून बघितला. पण त्यामुळे मान आपल्या केंद्रीय वित्तमंत्र्यांसारखी नेहमी ताठ राहते. त्यामुळे मान आणखीच दुखते हो. आणि ताठ मानेनं जगणं सोपं नाहीये.

मग एक दिवस मी गुगलवर "मानदुखी उपाय" हे शब्द टाकले. तर इंग्रजी, मराठी, हिंदी, तिन्ही भाषांमध्ये इतकी माहिती आली की काही विचारू नका. ती वाचायची तर डोळे थकणार.
नंतर अनेक दिवस ती माहिती यूट्यूबवर पण येत होती. हो मी झेपेल तितपत यूट्यूब देखील बघते. राजकीय विश्लेषण वगैरेंच्या आशेने. पिच्छाच पुरवला माझा. मानदुखीवर ॲलोपथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, यूनानी वगैरेचे तज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन, जनरल प्रॅक्टिशनर, फिजिओथेरपीस्ट, घरगुती उपचार वगैरे वगैरे, सगळ्यांच्याच पोस्ट्स होत्या. याशिवाय कोणती नस दाबल्यावर,हाताचा कोणता बिंदू दाबल्यावर, बोटांची कोणती मुद्रा केल्यावर मानदुखी थांबेल यांबद्दल माहिती होती. नशीब, कोणत्या देवापुढे कोंबडं कापल्यावर मानदुखी बरी होईल हे सांगितलं नव्हतं. माझ्या शेजारणीनं ,"आमच्या यांचे लेपवाले मालिश करणारे आहेत एकजण. त्यांच्याकडे चला. ते तुमच्या मानेला एक झटका देऊन पिरगाळतात. एकदाच कटकन् आवाज येतो आणि मान कायमची बरी होते." असं सुचवलं. तिला मी थरथरत्या मानेनं आणि बोबडी वळलेल्या स्वरात नकार दिला.

एकूण हे सगळं ऑनलाईन वाचून माझा इतका गोंधळ उडाला की मी सरतेशेवटी मी चोळणे, शेकणे, विश्रांती घेणे हे घरगुती आणि सुरक्षित उपायच केले.

झोप आरोग्यासाठी महत्त्वाची. त्याबाबत आणखीच वेगळी एक गंमत या वाढत्या वयाची. रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपले तर डावा हात दुखतो कारण डाव्या खांद्यात आर्थरायटिस आहे. उजव्या कुशीवर झोपलं तर उजव्या कानात प्राॅब्लेम असल्यानं चक्कर येते. उताणं झोपलं तर डायफ्रॅमवर प्रेशर आलंय असं वाटतं आणि श्वास घ्यायला त्रास. पालथं झोपलं तर बरगड्या अतीव दुखतात. बरं, उशी म्हणजे माझी एक न सुटलेली समस्याच आहे. माझ्या मानेला, डोक्याला सुटेबल अशी उशी मला मी जन्मून पंच्याहत्तर वर्षं लोटली तरी सापडलेली नाही. तरी चालवून घेतलं. पण आताशा तर कोणतीच उशी आरामदायक होत नाही. एखादी फार पातळ वाटते तर दुसरी खूप उंच. कधी मऊ फुसफुशीत तर कधी अतिशय टणक. मग थोडावेळ वापरून मी उशी बाजूला टाकून देते आणि शेवटी डोक्याखाली दोन्ही हात घेऊन झोपते.

अजून रडगाणं संपलं नाही. ऐकायला कोणी मिळालं की सांगत राहणे हेही वृद्धांचंच खास लक्षण. तर.. गुडघे आणि त्याच्या समस्या तर फारच मजेशीर. माझे गुडघे दुखतात पण नी कॅप घालणं गैरसोयीचं होतं. आता म्हातारपणात साडीच्या निऱ्यांचा फलकारा घेऊन चालता येत नाही म्हणून मी पंजाबी ड्रेसच वापरते. नी कॅप घातली तर पायांच्या हालचालीबरोबर ती गुडघ्यांच्या खाली उतरते. सलवारीच्या वरुन ती वर ओढता येत नाही. फार वाकता येत नाही. कंबर दुखते म्हणून पट्टा लावावा तर सोफ्यावर, खुर्चीवर बसलं की तो सरकून छातीवर येतो. गुडघे दुखतात म्हणून टीव्ही वरची, सिनेमातली गाणी लिहिणाऱ्या एका कवीने केलेली एक जाहिरात पाहून एक तेल आणलं. ते तेल गुडघ्यावर चोळताना कामवालीनं इतकं रगडून काढलं की गुडघे जास्तच दुखायला लागले आणि ते तेल सलवारींना लागून सलवारी तेलकट झाल्या.

वरच्या दातांची पडझड झाली आणि डेंचर आलं. तर मला"तथदधन" ही दंत्य व्यंजनं नीट म्हणता येईनात. सगळे मित्रमैत्रिणी फोनवरचं माझं बोलणं ऐकून, भीड, लाज, लज्जा, शरम, मर्यादा, मुर्वत न बाळगता मला प्रश्न विचारायचे,"कवळी बसवली आहेस का ग! उच्चारांवर परिणाम झालाय तुझ्या!"

खरं तर xxxx तेही माझ्याच वयाचे! ह्यांना काय कवळ्या नसतील बसविल्या? अशी टिंगल. पण दोस्ती के खातीर माफ किया!

एकूण काय तर जो दुखत नाही असा एकही अवयव आता माझ्या शरीरात नाही. ते कधी एकत्रित दुखतात तर कधी आळीपाळीने तर कधी एकेकटे, स्वतंत्रपणे दुखतात.
डोळ्यांना चष्मा, कानात श्रवणयंत्र,तोंडात कवळी, कमरेला, मानेला पट्टा असे विविध दागिने घालून मी मिरवत असते. मी लिहिलेलं तुमच्यासारख्या गुणग्राही वाचकांसमोर ठेवत असते. लिहिताना हात थरथरतो. मोबाईल वर टाईप करताना एकाऐवजी दुसरंच अक्षर टाईप होतं. माझ्या नव्या पिढीतल्या नातवानं, मोबाईलसमोर शब्द बोलून ते कसे टाईप होतात ते शिकवलं. पण हे नवं तंत्रज्ञान माझ्या डोक्यात शिरलं नाही आणि जे काही थोडेफार कळले ते डोक्यात टिकलं नाही. मी बोलायची पण काही शब्द स्क्रीन वर वेगळेच उमटायचे. ते पुन्हा दुरुस्त करायला लागायचे. यात वेळ जायचा. ह्या कसरतीपुढे मी माझे हात टेकले. पुन्हा बोटांनी टाईप करायला लागले. माझ्या नातवाने मला दिसू नये अशा पद्धतीनं कपाळाला हात लावला. पण मी ते चोरुन पाहिलं. खूप तरुण लोक काहीतरी नवीन छंद जोपासा, नवीन शिका वगैरे मनापासून सांगतात. पण शरीराचा रोज वाढत जाणारा असहकार त्यांना जाणवणे शक्य नाही.

वृद्ध निरक्षरांना अक्षरं लिहायला शिकणं अवघड का वाटतं. कंटाळवाणं का वाटतं, एकूणच काही नव्याने शिकायला आणि करायला आयुष्याच्या या टप्प्यात नकोच का वाटतं ते मला आत्ता आयुष्याच्या सायंकाळी कळलं आहे...!!

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

17 Dec 2024 - 3:57 pm | विवेकपटाईत

वाचताना मजा आली. हा लेख वाचून भविष्याच्या सामना करण्याची मानसिक तयारी निश्चित होईल.

वामन देशमुख's picture

17 Dec 2024 - 4:25 pm | वामन देशमुख

आज्जे, "तुझ्या गमतीजमती वाचून गंमत वाटली" असे कसे म्हणू? आयुष्याच्या सांजवेळीचे दैनंदिन अनुभव व्यक्त करताना तुझ्या विनोदी निवेदनामागची वेदनेची काळी छाया लपून राहत नाही.

शारीरिक शक्तीची मर्यादा आहेच, पण तू तुझे मन सतत ताजे ठेवले आहेस हे तुझ्या लिखाणातून नेहमीच जाणवते. पन्नास वर्षांपूर्वीचे तुझे गणेशोत्सव दर्शन हे तर अगदी मास्टरपीस म्हणावे लागेल!

"सांज ये गोकुळी" पासून ते "संध्याछाया भिवविति हृदया" पर्यंत तुझा प्रवासातील तुझ्या गमतीजमती अजून किमान पंचवीस वर्षे तरी मिपाखरांना रिझवत राहाव्यात ही श्रीरामाचरणी प्रार्थना.

- (आज्जीचा नातू) द्येस्मुक् राव

मुक्त विहारि's picture

17 Dec 2024 - 5:46 pm | मुक्त विहारि

वयोमानानुसार आलेल्या शारिरीक व्याधी स्वीकारणे फार कमी लोकांना जमते. तुम्ही अतिशय उत्तम रित्या, ह्या व्याधी स्वीकारल्या आहेत.

उशी बाबत सहमत आहे.

मला पांघरूण पण ठराविक लागते.

आमची आज्जी पण तुमच्या सारखीच होती.

प्रचेतस's picture

17 Dec 2024 - 6:52 pm | प्रचेतस

आजी, एकदम खुसखुशीत लेखन.
शाळेत असताना श्री. कृ कोल्हटकरांचा एक धडा होता, त्यात त्यांनी विनोदाचे प्रकार वर्णिले होते. त्यात कारुण्यातून झालेल्या विनोदनिर्मितीचीही उदाहरणे होती. आपला लेख ह्याच जातकुळीतला वाटला.

लिहिते राहा, वाचत असतोच.

सुबोध खरे's picture

18 Dec 2024 - 10:25 am | सुबोध खरे

आजी

काही वर्षांपूर्वी आमच्या आईची एक मैत्रीण माझ्या दवाखान्यात आली होती. वय वर्षे ७५.

त्या सांगत होत्या कि अरे डॉक्टर आजकाल माझे गुढघे फार दुखतात आणि कंबरही दुखते.

मी त्यांना म्हणालो , 'काकू, एक काम करा. घरभर फिरून पहा ७५ वर्षांपूर्वीची कोणती वस्तू तुमच्या घरात चालू आहे.

त्या एक मिनिट विचार करून म्हणाल्या - तू म्हणतोस ते खरं आहे. घरात एकही वस्तू ७५ वर्षे जुनी आणि चालू अशी नाही.

मग मी त्यांना म्हणालो कि काकू तुमची गाडी स्कुटर घड्याळ किंवा अशी कोणती वस्तू ७५ वर्षे चालू आहे ते आठवतंय का?
त्या नाही म्हणाल्या.

मग मी म्हणालो कि तुमचा ७५ वर्षाचं शरीर अजून चालू आहे यात आनंद मानायचा कि दुःख? तरुणपणी तुम्ही काढलेल्या कष्टांमुळे तुमचं शरीर झिजलं आहे. त्याला रामबाण असा उपाय काही नाही. तेंव्हा जर काही दुखत असेल तर त्यावर तात्पुरता उपाय करून आनंदी राहणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे.

श्री मंगेश पाडगावकर यांच्या भाषेतच म्हणायचं तर

जगायचं कसं कण्हत कण्हत

कि

गाणं म्हणत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Dec 2024 - 1:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

खरे आहे, रोज मरे त्याला कोण रडे. हा लेख वाचुन आतापासुनच म्हातारपणची तयारी करावी म्हणतो

मुक्त विहारि's picture

18 Dec 2024 - 6:39 pm | मुक्त विहारि

तीन M जवळ ठेवा...

१. Money
२. Manpower Young and Reliable
३. Medical Treatment for immediate and Reliable.

ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2024 - 6:39 pm | मुक्त विहारि

तीन M जवळ ठेवा...

१. Money
२. Manpower Young and Reliable
३. Medical Treatment for immediate and Reliable.

ह्या तीन गोष्टी असतील तर, म्हातारपण थोडे सुखावह होते.

नेहमीप्रमाणेच खुसखुशीत आणि खुमासदार लेख 👍
(आजीच्या लेखनाचा पंखा) टर्मीनेटर

खुसखुशीत विनोद पण अंत्॑र्मुख करणारा
लै भारी लिहीलय आज्जे.
तुम्ही जात्यात आहात
आम्ही सुपात आहेत. इतकेच.

कर्नलतपस्वी's picture

18 Dec 2024 - 9:21 pm | कर्नलतपस्वी

आयुष्याची आता झाली उजवणं
येतो तो क्षण अमृताचा

आमची पण सत्तरी झाली पण वाटत नाही. उर्वरित आयुष्यातील शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी अट्टाहास.

किल्लेदार's picture

19 Dec 2024 - 3:09 am | किल्लेदार

एकदम खुसखुशीत लेख आजी. खूप आवडला.
वाचताना जेवढी मजा आली तेवढीच स्वतःबद्दल शंकाही आली की इतक्या खिलाडू वृत्तीने हे सगळं स्विकारता येईल का?

हो...

सहज शक्य आहे.

एक ना एक दिवस, शरीराचा त्याग करावा लागेल, हे मूलभूत वाक्य.

मग, त्या केंद्र वाक्या भोवती, आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती नुसार, साठी नंतरचे आयुष्य आखायचे...

सुरुवातीला नक्की काय करायचे? हे समजणार पण नाही.

पण, एकदा विचार करायला सुरुवात केली की जमून जाते.

एक गोष्ट मात्र लक्षांत घ्या की दुसऱ्याचा सदरा आपल्याला होत नाही. आपणच आपल्या सदऱ्याचे माप घ्यायचे.

कळलं सारं. विनोद नाही पण सत्य परिस्थिती आहे.

वृद्धाश्रमाचा एक चानेल पाहण्यात आला https://youtube.com/@jyotipatait4590?si=ghg84zBGe9SrB1-1

__________________
मोबाईल सोडा आणि टॅब्लेट घ्या. मोठा स्क्रीन उपयोगी पडेल. फोन कॉल होतो स्पिकरवरच. ऐकण्याचा प्रश्न सुटेल. कोणाशी काय बोलणं झालं हेसुद्धा रेकॉर्डिंग होतं ते पुन्हा ऐकता येईल. टाइपिंगही सोपं होतं. वाटसपही WhatsApp ही चालतं. विडिओ, विडिओ कॉल छान करता येतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहता येतील. जियो कार्ड टाकलं तर टिवीचे. चानेलसुद्धा पाहता येतील. ( कोणता ? Realme Pad2 , 8+256 GB) . वायरलेस / किंवा वायर्ड कीबोर्ड पाऊसही जोडून कंपुटरसारखा वापरता येतो. घरात इतरांनाही उपयोगी. तेवीस हजारांत.
अप्रतिम वस्तू. संपर्काचे उत्तम साधन.

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2024 - 6:44 pm | चौथा कोनाडा

खुसखुशीत म्हणता म्हणता चट्का लावणारं लिहिलं की आजी !

असं काही वाचलं की काही जण जात्यात आहेत आणि आम्ही सुपात आहोत हे जाणवतं !'

असो. भारी लिहिलयं, मन मोकळं करणारं लिहिलंय ! छान खुसखुशीत लिहता, लिहित रहा.
आमच्या सारखे तुमचे मिपाकर पंखे तुम्च्या धाग्याची वाट पहात असतात याचा विश्वास बाळगा.

जय आजी, जय मिपा !