ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
18 Sep 2024 - 12:56 pm

नमस्कार मंडळी
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!

कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले? त्यावर माझ्या अल्पमतीने मला जे वास्तव समजले त्यावर थोडा प्रकाश टाकतो. आता तुम्ही म्हणाल की काय किरकिर लावलेय बा या माणसाने? सगळे कसे उत्सवी वातावरण आहे, ठिकठिकाणी रंगीबेरंगी मांडव, पताका ,गाणी , फुललेल्या बाजारपेठा असे असताना हे काय मधेच? तर मग नम्र विनंती की पुढे वाचू नका. कारण मला जे वाटले दिसले खटकले ते मी लिहितोय. कोणाला पटो व न पटो.

तूनळीवर बघितले तर ढोल ताशा पथकांचे अनेक व्हिडीओ सापडतील. आपल्याच मस्तीत वाजवणारे वादक, पुणे ,लंडन,जर्मनी ,अमेरिका येथील पथके ,कलावंत पथक,शिखंडी पथक असे एक ना दोन. तर मंडळी या ढोल ताशा पथकांबद्दल थोडी चर्चा करूया --

उत्सवाच्या साधारण महिनाभर किंवा आधी या पथकांची लगबग, जमवाजमव सुरु होते. त्यात मुख्य कार्यकर्ते ढोल ताशांची बांधणी , ऑर्डर देणे ,पाने (कातडी) तयार करायला देणे, वगैरे यात दंग असतातच पण मुख्य मुद्दा सरावाची जागा मिळणे हा आहे. कारण या जागा शहराच्या परिघावर कुठेतरी वस्तीपासून दूर असतात. त्यात स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त , आमचे आधारस्तंभ अमुक तमुक, उदघाटनावेळी त्यांचा सत्कार वगैरे यथासांग आलेच. आगामी निवडणुकांच्या मुळे त्यांच्या कडून आर्थिक मदतही होताच असावी. पण हे सगळे जागा मिळण्यासाठी आणि निर्वेध सराव होण्यासाठी आवश्यकच आहे आणि करावेच लागत असेल. किंबहुना या पथकातील बरेच जण या नेत्यांचे कार्यकर्तेही असावेत. तेव्हाच ही देवाणघेवाण होत असणार. पण आत्ता तो लेखाचा मुद्दा नाही.

आता हा सराव सुरु झाला की बरेच जण उत्साहाने या मंडळांमध्ये नाव नोंदणी करायला आणि ढोल शिकायला येऊ लागतात. सगळ्यांना एकाच प्रकारचे कपडे घ्यायला साधारण माणशी ८००--९०० रुपये द्यावे लागतात.हा सराव शक्यतो संध्याकाळी २-३ तास आणि विकांताला ४-५ तास असतो. ५०-१०० मंडळी नोकरी धंदा कॉलेज क्लासेस सांभाळून धावपळ करत रोज संध्याकाळी इथे जमतात, सराव करतात आणि दमून भागून घरी जातात. बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात त्यामुळे मुली आणि लहान मुलें एकटी येऊ शकत नाहीत आणि त्याना तिथे नेणे आणणे हे पालकांना अजून एक काम होऊन बसते. हौसेला मोल नाही हेच खरे. यात मी शाळा कॉलेज ची पथके धरत नाही कारण त्यांना सरावाला शाळेची मैदाने वगैरे असतात. आता हे ढोल कंबरेला बांधून वाजवणे यात कंबरेला जखमा होणे, हाताला बोटांना जखमा होणे , खरचटणे, कधी रक्त येणे हे होतेच पण वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की त्या वजनामुळे आणि पाठीवर भार आल्याने लघवीतून रक्त जाणे वगैरेही त्रास होऊ शकतात. पुन्हा हौसेला मोल नाही.

तर आता उत्सवाचा पहिला दिवस उजाडतो. इतका सराव केल्यावर भरपूर सुपाऱ्या मिळालेल्या किंवा मिळवलेल्या असतात. बहुतेक वेळा २-३ ठिकाणी एकाच वेळी वाजवायचे असते त्यामुळे पथकाचे भाग पडतात. काही लोक इकडे तर काही तिकडे. ढोल ताशे आणि मावतील तितके वादक टेम्पो मधून आणि बाकीचे आपापल्या दुचाकीवरून तिथे पोचतात. साग्रसंगीत ढोल बांधणे वगैरे होते. २-४ तास वादन होते, मग कधी कडक ऊन तर कधी रिमझिम पाऊस. पण त्याची पर्वा कोण करतो? तर इथे हे वादक जीव तोडून वाजवत असतात आणि आजूबाजूची मंडळी मस्तपैकी मोबाईल वर व्हिडीओ वगैरे काढत असतात किंवा नाचत असतात. एक वादन इथे झाले की दुसरे वादन तिथे, मग तिसरे अजून कोणीकडे , असे दिवसभर हे लोक टेम्पोने फिरतात. वाटेत कधीतरी सरबत किंवा वडापाव वगैरे मिळते किंवा स्वतःच विकत घेऊन खावे लागते. बरे यात नवे वादक जुने वादक असाही भेदभाव असतो. म्हणजे सोसायट्यांची सुपारी असेल तिथे ज्युनियर वादक चालतात ,पण लक्ष्मी रोड, अलका चौक वगैरे ठिकाण असेल तर जुने जाणते वादकच ढोल हाती घेतात आणि नव्या मुलांना साखळी धरून उभे राहणे वगैरे शेलकी कामे करावी लागतात. बरे! बघे लोक तरी सरळ असतात का? साखळी तोडून आत येण्याचा प्रयत्न करणे , अडवल्यास शिव्या देणे, वादक मुलींना धक्के मारायचे चान्स बघणे वगैरे यथासांग चालतेच. ते तर कुठेही गर्दीत चालतेच म्हणा. मग येरवडा वगैरे ठिकाणी सुपारी असेल तर मुलींना मध्यभागी ठेवणे आणि दांडगट मुलांना बाजूला ठेवणे अशी रचना करावी लागते. त्यातही मानाच्या गणपतीसमोर कुठल्या पथकाला वादनाचा चान्स मिळाला वगैरे राजकारण असतेच . तो मोठा प्रतिष्ठेचा मुद्दा असतो, नाहीतर इतका सराव करून फायदाच काय?

तर दिवसभर असे सगळे करून कधीतरी रात्री हि मुलें त्यांच्या तळावर म्हणजे सरावाच्या जागी येतात. त्यात मुलीही असतात. यात कधीतरी रात्री १-२ किंवा जास्तही वाजतात . त्यांना दिवसभर जेवण दिलेले नसते, कारण उलटी होईल. मग रात्री त्यांना इथे जेवण दिले जाते आणि मग त्यांचे पालक त्यांना घरी घेऊन जातात.(एकदाचे)

हा झाला पहिला दिवस. इतर दिवशीही कुठेकुठे सुपाऱ्या असतात , ज्यांना जमेल ते वादक आपापली कामे सांभाळून तिथे तिथे जाऊन वादन करतात. आणि मग येते अनंत चतुर्दशी. हा तर सर्वात मोठा दिवस. सकाळी सकाळीच सगळ्या वादकांना सरावाच्या जागी बोलावले जाते. टेम्पो कसा कसा कुठे जाणार, पथकाचे किती भाग करायचे, वगैरे सगळे नियोजन करून टेम्पो सुटतात. आणि मग पहिले कोथरूड, मग कर्वे नगर,मग लक्ष्मी रस्ता ,मग अजून कुठे अशी भ्रमंती चालू होते. सगळीकडे रस्ते अडवलेले , भयानक आवाजात डीजे लावलेले, कुठे प्यायलेले ,झिंगणारे लोक असे उत्सवी वातावरण असते. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता हि पथके गरागरा फिरत राहतात. मधेअधे पाणी सरबत, वडापाव किंवा हलका नाश्ता करतात. अगदीच थकले तर टेम्पोत आडवे होतात आणि पुन्हा वादनाला उतरतात. दमतात, हाताच्या जखमा ,भूक तहान वगैरे विसरून झपाटून वाजवतात, ध्वज नाचवतात , साखळी धरून उभे राहतात, आणि सगळे झाल्यावर कधीतरी पहाटे किंवा सकाळी उजाडल्यावर आपापल्या सरावाच्या ठिकाणी परत येतात. मग पुन्हा मुलांचे पालक त्यांना तिथे आणायला जातात आणि थकलेल्या , झोपाळलेल्या वादकांना घेऊन घरी येतात. आणि गणेशोत्सव संपल्याबद्दल गणेशाचे आभार मानतात.

या सगळ्यात मी कुठेही पैशाचा विषय आणलेला नाही. घेतलेल्या सुपाऱ्या किती रुपयांच्या, त्यांचे पैसे कोण घेतात? या सगळ्यात कोणाचा फायदा होतो? हे तर सर्व सोडाच. पण किमान सर्व मुलांना दिवसभरात चांगले जेवण नाश्ता दिला जातो किंवा नाही ? त्यांना आपले कपडे/युनिफॉर्म घेण्यासाठीही पैसे का द्यावे लागतात? त्यांना /विशेष करून मुलींना किमान देहविधींची सोय कुठे असते? यासाठी काही नियमावली आहे का ? वगैरे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत.

आतापर्यंत मीही गर्दीत सामील होऊन हे सगळे एन्जॉय करत होतो. पण आता एक पालक म्हणून मला हे सगळं भयानक अंगावर आलंय आणि ही वेदना कुठे सांगावी हे समजत नाहीये. अर्थात पटत नसेल तर पाठवू नका मुलाला तिकडे हा पर्याय आहेच. त्यासाठी कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. पण जर हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चालत असेल, तर त्याला काहीतरी नियमावली ,फ्रेमवर्क , किमान सोयी सुविधा, सरावाला सुरक्षित योग्य जागा, वगैरे वर काही साधक बाधक चर्चा व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.

तर आपण सर्व मोठ्या मनाने माझी ही कटकट ऐकून वाचून इथवर आलात त्याबद्दल मनापासून आभार.
आपलाच एक मिपाकर

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Sep 2024 - 1:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख दिसत नाहीये बहुतेक

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2024 - 1:36 pm | कर्नलतपस्वी

ढोलपथक तयार झाले आहे. पहिल्या दिवशी स्थापनेला तेच असतात. टिम साईझ बर्‍यापैकी म्हणजे चाळीस एक मुले मुली स्त्रीपुरुष आहेत.ढोल ताशा,रिपेरीं स्वखर्च. उत्सव संपला की कुठेतरी मिसळपाव वगैरे.

शेवटच्या दिवशी बाहेरून वादक येतात. पंचवीस तीस हजार घेतात.तासभर वाजवतात. पाणी नाष्टा मंडळ देते.

या वर्षी सोसायटीचे पथक बाहेर गेले होते.

सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.

छंद म्हणून एखाद वर्ष ठिक पण वर्षानुवर्ष वेठबिगार ठिक नाही.

पालक पाल्यांना विचार करावा.

लेखकाशी सहमत.

चौकस२१२'s picture

18 Sep 2024 - 3:48 pm | चौकस२१२

सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.?
कोणत्या परदेशात? काय कळले नाही ? परदेशात हौसे साठी करतात ... मला नाही वाटत कुठे अजून त्यातून पैसे निर्माण झालाय

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2024 - 7:09 pm | कर्नलतपस्वी

अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे.

अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे. हो बहुतांशी , पण तुमचा मुद्दा काय तोच नाही कळला आणि ते सुद्धा परदेशातील पाथकांबाबत ? या देशातून अश्या पथकातून भाग घेणाऱ्यांचे शोषण पथकाचा म्होरक्या करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला नाही वाटत उलट पदरचा पैसे घालावे लागतात ,
अर्थात असे हाऊसेने किती दिवस करणार हे आहेच म्हणा
आणि दुसरे म्हणजे येथे पथकाला सराव वैगरे करायला जाणे हे कष्ट असले तरी सुसह्य असते का रणे साहजिक आहेत ...
माझा एक मित्र दर रविवारी १००+ किमी एकेरी जाऊन सराव करतो, सगळी हौस , काही वर्षांनी थांबेल पण ज्याने हे पथक सुरु केले ते फक्त पैशासाठी करत नसावेत ,
पुढे लोकसंख्या वाढली कि याचा उद्योग होईल पण तेव्हा सुद्धा इथलं लेबर लॉ , इन्शुरन्स वैगरे पाळावे लागतील असो हा प्रश्न मुख्यत्वे करून भारतात आहे येथे पुढे उदभवू शकतो

ही तर भयानक आपबीती सांगितली.स्त्रीयांदेखील जड ढोल वापरून याचा (abdominal cavity ला) जास्त त्रास होतो हे ऐकून आहे खखोमाना.

वामन देशमुख's picture

18 Sep 2024 - 4:06 pm | वामन देशमुख

हं.

वेगळा, विचारणीय विचार मांडला आहे.

हैद्राबादेत पुण्याहून (पुणे जिल्ह्यातून) ढोल पथके येतात. एका पथकात चाळीस ते पन्नास लोक असतात. मागच्या वर्षी मुलींचेही एक पथक मागविले होते.

एक पथक दोन लाख ते पाच लाख कमाई करते. (त्यांचा म्होरक्या तितके घेतो).

ढोल वाजविणारे, ताशा वाजविणारे, झेंडे नाचविणारे, इतर मदत करणारे आणि त्यांचा मुकादम असा संच असतो.

सर्वजण DCM ट्रक मध्ये बसून येतात. दोन-तीन दिवस काम करून निघून जातात.

(माझे एक परिचित इथे इवेंट मॅनजमेन्टमध्ये आहेत; त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारून)

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2024 - 7:27 pm | अमरेंद्र बाहुबली

ढोल पथका बद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या. सामायिक केल्याबद्दल धन्यवाद.

रामचंद्र's picture

19 Sep 2024 - 7:22 pm | रामचंद्र

मुद्दा खराच आहे, पण याला लेझीम हा चांगला पर्याय आहे. त्यात अधिक जोशही आहे. त्यापासून उपद्रव होण्याची शक्यताही फारशी दिसत नाही. मात्र त्याचा का विचार होत नाही ते समजत नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2024 - 8:15 pm | चौथा कोनाडा

अगदी हेच म्हणणार होतो ! १००% सहमत.

लेझीम हे लयदार नृत्य असतं , जशी शाळेतल्या मुलांची पीटी बघायला मजा येते तशीच मजा लेझीम येते. छम छम असा मंजुळ आवाज असतो. त्यात वेगवेगळ्या हालचाली / हात असतात . सुंदर वाटतं बघायला !

ढोल वादन कसे काय म्हणवते कुणास ठाऊक ? ढोल बडवणे हाच योग्य शब्द आहे ... जसं काही महाभारताचं युद्ध करायला निघालेत अश्या आवेश्यात ढोल बडवतात... हालचालीत फारसं नाविन्य नसतं असतो तो छाती दड्पुन टाकणारा आवाज ... धडकी भरून टाकणार आवाज. आवाजाचे प्रदूषण नुसतं.

ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2024 - 10:23 pm | कर्नलतपस्वी

पुण्यात नोकरीत असताना हलगी आणी लेझीम टिम बनवली होती. पाचव्या दिवशी विसर्जित करताना बंडगार्डन घाटावर दोन तास आमचे सैनिक खेळत होते.बघण्यासाठी खुपच गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊ नये म्हणून खेळ आवरता घेतला होता.

हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2024 - 5:55 pm | चौथा कोनाडा

मस्तच ! १०१+

हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

अगदी

आणि सैनिकी बॅण्ड ही देखिल देखणीय व श्रवणीय सुंदर कलाकृती असते ! खुप मजा येते !

लेखाच्या आशयाशी आणि कर्नलसाहेबांच्या मताशी अगदी जोरदार सहमत.

बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लेझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच.

आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc

सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा.

दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA

बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

रामचंद्र's picture

22 Sep 2024 - 1:15 am | रामचंद्र

मुळात लेखात सदर वादनाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा अथवा ध्वनिप्रदूषणाचा उल्लेख नाही, वादकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शोषण हाच मुद्दा आहे. म्हणजे वादकांची योग्य काळजी घेतली गेल्यास त्या वादनावर निर्बंध/नियंत्रण नसावे असे त्यात अनुस्यूत असावे.

बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात

आहात कुठे? पिंचिं मधे या जागा इमारतींच्या जवळची मैदाने, हमरस्त्याच्या बाजूचे रिकामे प्लॉट्स अशा ठिकाणी आहेत. जवळच्या इमारतींमधे संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० आवाज यायचा. माझ्या घराजवळ एक पथक होते. माझ्या बहिणाच्या घराजवळ दोन बाजूंना दोन पथके. अजून किमान दोन ठिकाणी रहिवाशी इमारतींजवळ सराव चालू असलेला पाहिला.
तुम्ही खूपच बारकावे मांडले आहेत. एकंदरीत हा प्रकार मला अजिबात आवडत नाही.

रामचंद्र's picture

20 Sep 2024 - 1:25 am | रामचंद्र

परंतु या प्रकाराला धर्म, संस्कृती, प्रादेशिक अस्मिता, परंपरा, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबींमुळे जोरदार समर्थन व बळ मिळत असल्यामुळे यात चांगल्या अर्थाने काही बदल, सुधारणा किंवा नियंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी बोलताना एक संबंधित पदाधिकारी म्हणाले, की वैद्यकीय वस्तुस्थिती अशीच असली तरी आम्ही हे प्रकार चालू ठेवणार आहोतच.
लेखकाने म्हटल्याप्रमाणे हौसेला मोल नाही आणि आमच्या हौसेपुढे आम्ही अन्य कुठल्या गोष्टींची पर्वाही करत नाही!

कंजूस's picture

20 Sep 2024 - 7:35 am | कंजूस

ढोल मोठा असतो.

पण त्याचा आवाज फारसा निघत नाही. शिवाय ताशाशी मेळ खात नाही. चीनमध्ये ढोल वाजवतात पण ते एका जागी ठेवलेले असतात. (बीजिंग ओलिंपिक्स).

हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि झांज वाजवायचो.एकच ढोल असायचा.तो ढोल पुढे नेण्यासाठी एका चाकाच्या लोखंडी स्ट्रक्चरवर असायचा .पथकाबरोबर ती ढोलच्या चाकाची गाडी पुढे पुढे जायची.गळ्यात बांधून कमरेवर लटकून कितीतरी किमी.चालणं....यावर विचार हवा.

अमर विश्वास's picture

22 Sep 2024 - 9:53 am | अमर विश्वास

वेठबिगारी कशी काय ? तिथे जाणारे स्वतःला हौस (खाज) असते म्हणून जातात .. त्यांना कोणी घरात घुसून बळजबरीने नेत नाही ...

खूप पूर्वी ढोल पथकात भाग घेतला होता .. सुदैवानी त्यावेळी माझे ५० ढोल .. माझे शंभर असला आचरटपणा नव्हता .. असला प्रकार नव्हता ... टोल वगरे तर नव्हतेच

मस्त अनुभव होता ... पण पथकात भाग घेतला स्वखुशीने .. बाहेर पडलो स्वखुशीने ..

नठ्यारा's picture

22 Sep 2024 - 3:31 pm | नठ्यारा

ढोल हे एक रणवाद्य आहे का ? बहुतेक हो. त्यामुळे ते नागरी वस्तीत वाजवायची गरज नाही, असं माझं मत. एकंदरीत धपाधप आवाज करणे ही पाश्चात्य संगीतातनं निघालेली टूम वाटते. ते ऱ्हिदम व बेस वर आधारित आहे. याउलट भारतीय संगीत मेलडी वर आधारित आहे. कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावे ही विनंती.
-ना.न.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Sep 2024 - 4:30 pm | अमरेंद्र बाहुबली

चक्क तुम्हाला मराठी प्रतिशब्द सापडू नये? आश्चर्य आहे. :)

नठ्यारा's picture

22 Sep 2024 - 10:38 pm | नठ्यारा

अहो काय सांगायचं आता. माझं सांगितिक अगाध (अ)ज्ञान पाहता मराठी प्रतिशब्द न सापडणंच इष्टं !
आ.न.,
-ना.न.

विअर्ड विक्स's picture

24 Sep 2024 - 8:49 pm | विअर्ड विक्स

एकूणच लेखाचा रोख नकारार्थी वाटला . मी स्वतः एका ढोल पथकाचा सदस्य होतो . आता वय नि कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. मी मुंबईतील पहिल्या पथकासाठी ढोल वादन करायचो, एक नंबर वादन करते आमचे पथक!!! आमच्या पथकाने तर मुख्यमंत्री निधी ला सुद्धा मदत केली आहे , अजय अतुल, लता दि अशा अनेक नामवंतांसोबत काम केलंय

वेठबिगारी हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे. सरावासाठी कमीत कमी २-३ महिने द्यावे लागतात . गणपतीत पथकाला किमान पाच सुपाऱ्या जरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी १० तास वादन . यामध्येसुद्धा वादक हे पाळीनुसार बदलतात कोणावर ताण येत नाही. सरावावेळी पाणी व तत्सम जागेचे भाडे ह्याचा खर्च अनेकदा पदरमोडच असते. बदल्यात मिळते काय फक्त वादनसुख!!!! मी तर अनेकदा दोन पाळीत वादन केले आहे कोणी गैरहजर राहिल्यामुळे स्वखुशीने , दोन वडापाव साठी नव्हे !!

राहिली गोष्ट पाठ दुखी व तत्सम आजार, जगात कोणतीही गोष्ट केली कि काय दुष्परिणाम होतात याचे खंडीभर रीसर्च पेपर आहेत प्रत्येक गोष्ट त्यानुसार करायला लागलो तर जीवन कठीण होईल. ताशेवाले स्वतः कानात कापसाचे बोळे घालून वाजवतात , कोणी मनगटाला बँड, कोणी कमरपट्टा लावून वाजवतात. हौसेला मोल नसते हेच खरे !!!!! पथकासाठी किती स्वतःला वाहून घयावे हा स्वनिर्णय आहे , काहीजणांसाठी पथक म्हणजे च जीवन असते काही जणांसाठी पथक हे एका मर्यादेपुरतेच असते. हि मर्यादा स्वतःच ठरवलेली चांगली

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2024 - 9:03 pm | चौथा कोनाडा

या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण त्या व्यतिरिक्त "आवाज प्रदुषण आणि इतरांना २-३ महिने उपद्रव याचं काय करायचं ? हा मुद्दा राहिलाच की !

धर्मराजमुटके's picture

30 Sep 2024 - 10:15 pm | धर्मराजमुटके

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?
वेठबिगारी नव्हे ही तर खाजवून आणलेली खरुज.

रामचंद्र's picture

30 Sep 2024 - 11:52 pm | रामचंद्र

थेट आणि सुस्पष्ट (आणि अस्सल पुणेरी)!