ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?
नमस्कार मंडळी
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले? त्यावर माझ्या अल्पमतीने मला जे वास्तव समजले त्यावर थोडा प्रकाश टाकतो. आता तुम्ही म्हणाल की काय किरकिर लावलेय बा या माणसाने? सगळे कसे उत्सवी वातावरण आहे, ठिकठिकाणी रंगीबेरंगी मांडव, पताका ,गाणी , फुललेल्या बाजारपेठा असे असताना हे काय मधेच? तर मग नम्र विनंती की पुढे वाचू नका. कारण मला जे वाटले दिसले खटकले ते मी लिहितोय. कोणाला पटो व न पटो.
तूनळीवर बघितले तर ढोल ताशा पथकांचे अनेक व्हिडीओ सापडतील. आपल्याच मस्तीत वाजवणारे वादक, पुणे ,लंडन,जर्मनी ,अमेरिका येथील पथके ,कलावंत पथक,शिखंडी पथक असे एक ना दोन. तर मंडळी या ढोल ताशा पथकांबद्दल थोडी चर्चा करूया --
उत्सवाच्या साधारण महिनाभर किंवा आधी या पथकांची लगबग, जमवाजमव सुरु होते. त्यात मुख्य कार्यकर्ते ढोल ताशांची बांधणी , ऑर्डर देणे ,पाने (कातडी) तयार करायला देणे, वगैरे यात दंग असतातच पण मुख्य मुद्दा सरावाची जागा मिळणे हा आहे. कारण या जागा शहराच्या परिघावर कुठेतरी वस्तीपासून दूर असतात. त्यात स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त , आमचे आधारस्तंभ अमुक तमुक, उदघाटनावेळी त्यांचा सत्कार वगैरे यथासांग आलेच. आगामी निवडणुकांच्या मुळे त्यांच्या कडून आर्थिक मदतही होताच असावी. पण हे सगळे जागा मिळण्यासाठी आणि निर्वेध सराव होण्यासाठी आवश्यकच आहे आणि करावेच लागत असेल. किंबहुना या पथकातील बरेच जण या नेत्यांचे कार्यकर्तेही असावेत. तेव्हाच ही देवाणघेवाण होत असणार. पण आत्ता तो लेखाचा मुद्दा नाही.
आता हा सराव सुरु झाला की बरेच जण उत्साहाने या मंडळांमध्ये नाव नोंदणी करायला आणि ढोल शिकायला येऊ लागतात. सगळ्यांना एकाच प्रकारचे कपडे घ्यायला साधारण माणशी ८००--९०० रुपये द्यावे लागतात.हा सराव शक्यतो संध्याकाळी २-३ तास आणि विकांताला ४-५ तास असतो. ५०-१०० मंडळी नोकरी धंदा कॉलेज क्लासेस सांभाळून धावपळ करत रोज संध्याकाळी इथे जमतात, सराव करतात आणि दमून भागून घरी जातात. बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात त्यामुळे मुली आणि लहान मुलें एकटी येऊ शकत नाहीत आणि त्याना तिथे नेणे आणणे हे पालकांना अजून एक काम होऊन बसते. हौसेला मोल नाही हेच खरे. यात मी शाळा कॉलेज ची पथके धरत नाही कारण त्यांना सरावाला शाळेची मैदाने वगैरे असतात. आता हे ढोल कंबरेला बांधून वाजवणे यात कंबरेला जखमा होणे, हाताला बोटांना जखमा होणे , खरचटणे, कधी रक्त येणे हे होतेच पण वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की त्या वजनामुळे आणि पाठीवर भार आल्याने लघवीतून रक्त जाणे वगैरेही त्रास होऊ शकतात. पुन्हा हौसेला मोल नाही.
तर आता उत्सवाचा पहिला दिवस उजाडतो. इतका सराव केल्यावर भरपूर सुपाऱ्या मिळालेल्या किंवा मिळवलेल्या असतात. बहुतेक वेळा २-३ ठिकाणी एकाच वेळी वाजवायचे असते त्यामुळे पथकाचे भाग पडतात. काही लोक इकडे तर काही तिकडे. ढोल ताशे आणि मावतील तितके वादक टेम्पो मधून आणि बाकीचे आपापल्या दुचाकीवरून तिथे पोचतात. साग्रसंगीत ढोल बांधणे वगैरे होते. २-४ तास वादन होते, मग कधी कडक ऊन तर कधी रिमझिम पाऊस. पण त्याची पर्वा कोण करतो? तर इथे हे वादक जीव तोडून वाजवत असतात आणि आजूबाजूची मंडळी मस्तपैकी मोबाईल वर व्हिडीओ वगैरे काढत असतात किंवा नाचत असतात. एक वादन इथे झाले की दुसरे वादन तिथे, मग तिसरे अजून कोणीकडे , असे दिवसभर हे लोक टेम्पोने फिरतात. वाटेत कधीतरी सरबत किंवा वडापाव वगैरे मिळते किंवा स्वतःच विकत घेऊन खावे लागते. बरे यात नवे वादक जुने वादक असाही भेदभाव असतो. म्हणजे सोसायट्यांची सुपारी असेल तिथे ज्युनियर वादक चालतात ,पण लक्ष्मी रोड, अलका चौक वगैरे ठिकाण असेल तर जुने जाणते वादकच ढोल हाती घेतात आणि नव्या मुलांना साखळी धरून उभे राहणे वगैरे शेलकी कामे करावी लागतात. बरे! बघे लोक तरी सरळ असतात का? साखळी तोडून आत येण्याचा प्रयत्न करणे , अडवल्यास शिव्या देणे, वादक मुलींना धक्के मारायचे चान्स बघणे वगैरे यथासांग चालतेच. ते तर कुठेही गर्दीत चालतेच म्हणा. मग येरवडा वगैरे ठिकाणी सुपारी असेल तर मुलींना मध्यभागी ठेवणे आणि दांडगट मुलांना बाजूला ठेवणे अशी रचना करावी लागते. त्यातही मानाच्या गणपतीसमोर कुठल्या पथकाला वादनाचा चान्स मिळाला वगैरे राजकारण असतेच . तो मोठा प्रतिष्ठेचा मुद्दा असतो, नाहीतर इतका सराव करून फायदाच काय?
तर दिवसभर असे सगळे करून कधीतरी रात्री हि मुलें त्यांच्या तळावर म्हणजे सरावाच्या जागी येतात. त्यात मुलीही असतात. यात कधीतरी रात्री १-२ किंवा जास्तही वाजतात . त्यांना दिवसभर जेवण दिलेले नसते, कारण उलटी होईल. मग रात्री त्यांना इथे जेवण दिले जाते आणि मग त्यांचे पालक त्यांना घरी घेऊन जातात.(एकदाचे)
हा झाला पहिला दिवस. इतर दिवशीही कुठेकुठे सुपाऱ्या असतात , ज्यांना जमेल ते वादक आपापली कामे सांभाळून तिथे तिथे जाऊन वादन करतात. आणि मग येते अनंत चतुर्दशी. हा तर सर्वात मोठा दिवस. सकाळी सकाळीच सगळ्या वादकांना सरावाच्या जागी बोलावले जाते. टेम्पो कसा कसा कुठे जाणार, पथकाचे किती भाग करायचे, वगैरे सगळे नियोजन करून टेम्पो सुटतात. आणि मग पहिले कोथरूड, मग कर्वे नगर,मग लक्ष्मी रस्ता ,मग अजून कुठे अशी भ्रमंती चालू होते. सगळीकडे रस्ते अडवलेले , भयानक आवाजात डीजे लावलेले, कुठे प्यायलेले ,झिंगणारे लोक असे उत्सवी वातावरण असते. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता हि पथके गरागरा फिरत राहतात. मधेअधे पाणी सरबत, वडापाव किंवा हलका नाश्ता करतात. अगदीच थकले तर टेम्पोत आडवे होतात आणि पुन्हा वादनाला उतरतात. दमतात, हाताच्या जखमा ,भूक तहान वगैरे विसरून झपाटून वाजवतात, ध्वज नाचवतात , साखळी धरून उभे राहतात, आणि सगळे झाल्यावर कधीतरी पहाटे किंवा सकाळी उजाडल्यावर आपापल्या सरावाच्या ठिकाणी परत येतात. मग पुन्हा मुलांचे पालक त्यांना तिथे आणायला जातात आणि थकलेल्या , झोपाळलेल्या वादकांना घेऊन घरी येतात. आणि गणेशोत्सव संपल्याबद्दल गणेशाचे आभार मानतात.
या सगळ्यात मी कुठेही पैशाचा विषय आणलेला नाही. घेतलेल्या सुपाऱ्या किती रुपयांच्या, त्यांचे पैसे कोण घेतात? या सगळ्यात कोणाचा फायदा होतो? हे तर सर्व सोडाच. पण किमान सर्व मुलांना दिवसभरात चांगले जेवण नाश्ता दिला जातो किंवा नाही ? त्यांना आपले कपडे/युनिफॉर्म घेण्यासाठीही पैसे का द्यावे लागतात? त्यांना /विशेष करून मुलींना किमान देहविधींची सोय कुठे असते? यासाठी काही नियमावली आहे का ? वगैरे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत.
आतापर्यंत मीही गर्दीत सामील होऊन हे सगळे एन्जॉय करत होतो. पण आता एक पालक म्हणून मला हे सगळं भयानक अंगावर आलंय आणि ही वेदना कुठे सांगावी हे समजत नाहीये. अर्थात पटत नसेल तर पाठवू नका मुलाला तिकडे हा पर्याय आहेच. त्यासाठी कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. पण जर हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चालत असेल, तर त्याला काहीतरी नियमावली ,फ्रेमवर्क , किमान सोयी सुविधा, सरावाला सुरक्षित योग्य जागा, वगैरे वर काही साधक बाधक चर्चा व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
तर आपण सर्व मोठ्या मनाने माझी ही कटकट ऐकून वाचून इथवर आलात त्याबद्दल मनापासून आभार.
आपलाच एक मिपाकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख दिसत नाहीये बहुतेक
आमच्या सोसायटीत ....
सर्व काही गौडबंगाल आहे.
शंका व्यक्त केली....
अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम
ही तर भयानक आपबीती सांगितली
हं.
ढोल पथका बद्दल बऱ्याच गोष्टी
मुद्दा खराच आहे, पण याला
अगदी हेच म्हणणार होतो ! १००%
२००७ मधे ...
मस्तच ! १०१+
लेझमाची मजा ढोलताशाला नाही
मुळात लेखात सदर वादनाने
बरे या सरावाच्या जागा कुठेतरी
परंतु या प्रकाराला धर्म,
ढोल मोठा असतो.
हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि
वेठबिगारी कशी काय ? तिथे
ढोल रणवाद्य आहे का ?
चक्क तुम्हाला मराठी प्रतिशब्द
माझी संगीतसाधना ....
लेखाचा रोख नकारार्थी
या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण
ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?
थेट आणि सुस्पष्ट (आणि अस्सल