*यमलार्जुन भंग
एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली. तरीदेखील कृष्ण ती ओढतच राहिला.तेव्हा दोन्ही वृक्ष त्या जोरदार धक्क्याने आवाज करत जमिनीवर उन्मळून पडले. ही कथा विष्णुपुराण आणि महाभारताच्या सभापर्वात आहे. धष्टपुष्ट कृष्णाने उखळी ओढून नेण्याचा प्रयत्न केला तर ते जरासे नाजूक वृक्ष मोडणे साहाजिक आहे.भागवत पुराणांमध्ये यामागे कुबेराच्या दोन मुलांना शापामुळे वृक्षरूप घ्यावे लागले होते.कृष्णाने ते वृक्ष मोडून पाडल्याने त्यांना शाप मुक्त केले अशी कथा आहे.या कथेमुळेच कृष्णाचे नाव दामोदर असे पडले.शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार दामोदर म्हणजेच इंद्रिय निग्रह करून ज्याने उच्च स्थान प्राप्त केले आहे असा .दम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि उदर म्हणजे उत्कृष्ट किंवा वर जाण्याची गती! महाभारतातदेखील दामोदर शब्दाचा उल्लेख आहे. तर भागवत मध्ये दामन या शब्दाचा गाई गुरे बांधतात ते दावे असा अर्थ आहे. ज्याच्या पोटाला दावे बांधले आहेत तो दामोदर.
***
गोकुळ व्रजा मधून वाढत्या लांडग्यांच्या त्रासामुळे गोकुळ वृंदावनात हलवण्यात आले होते. वृंदावनात गोप सवंगड्यांबरोबर कृष्ण मोठा होत होता.त्यांच्याबरोबर तोही गाई गुरे चरायला नेत असे. तो बासरी वाजवायला शिकला होता आणि थुंब्याचा म्हणजेच ढोलकी सारख्या एका वाद्याचा तो सुंदर ताल ही धरत असे.पर्ण वाद्याचा झंकारही करे .यमुनेच्या काठावर खेळ मांडत, कुस्तीचे फड उभे करत असे. दही दूध लोणी भाकर यांचे मिश्रण करून सगळे पदार्थ एकत्र करून काला करत सर्वजण एकत्र भोजन करीत. आणि यातूनच काल्याची प्रथा पडली असावी. असा हा कृष्ण सर्वांचा लाडका नेताच झाला .
***
*वत्सासुर वध
वत्सासूर जंगली गायीच्या गोर्हाच्या रूपात गाई गुरात हुंदडयला लागला. छोट्या गोपालांना शिंगाने मारू लागला .तेव्हा कृष्ण आणि इतर सवंगड्यांनी गोफण गुंड्याने आणि नंतर काट्यांनी या जंगली गोर्हाल्या ठार केले.
*बकासुर वध
जंगलातल्या एका तळ्याकाठी गाई गुरांना पाणी पिण्यासाठी नेले असता.तिथे मोठ्या आकाराच्या बगळ्यांच्या एका थव्याने कालवडी, गुरे ,गोपाल यांच्यावर हल्ला केला. तेव्हा रामकृष्ण यांनी त्या बगळ्यांवर गोफणीतून दगडांचा वर्षाव केला. अनेकांना लोळवले. त्यातला एक तर महाकाय असा भयंकर बगळा होता. त्याने कृष्णावरच हल्ला केला तेव्हा कृष्णाने आपल्या हातातील काठीचा त्याच्या चोचीवरचा जबरदस्त प्रहार केला.त्यामुळे तो बगळा खाली पडला आणि अशा पद्धतीने त्याला तिथेच ठार केले.
*अघासूर वध
घनदाट जंगलात एका भागात अजगर -अघासूर आल्याचे रामकृष्णांच्या कानी आले. एक दिवस ते सर्व आपल्या सवंगड्यांसह गाईंना घेऊन त्या जंगलात गेले. पुष्ट गाई पाहून अघासूर पुढे आला व एका गायीला गिळू लागला. तेवढ्यात कृष्ण व इतर सवंगडी यांनी अजासुरावर हल्ला केला. त्याला मारण्यासाठी धनुष्यबाण, भाले काठ्या, गोफणी ,कुऱ्हाडी ,कोळती अशी आपली वेगवेगळी सगळी हत्यारे त्यांनी वापरली. अघासूराने गाईला तर सोडलेच परंतु सर्व सवंगड्यांनी कुऱ्हाडीने व कोयत्याने चिरून चिरून अघासूराचे तुकडे केले अशा तऱ्हेने अघासुराचा वध झाला.
या तीनही कथा केवळ भागवतात आहेत. विष्णुपुराण ,हरिवंश अथवा महाभारतात सापडत नाहीत.
*धेनकासूर वध
वृंदावनात एका भागात ताल वृक्षांचे घनदाट जंगल होते. या भागात गाढवासारखे तोंड असलेल्या वनवृषभांचा मोठा सुळसुळाट होता. या वनवृषभांना धेनकासुर असे म्हटले जाई. धेनकासूर असलेल्या जंगलाच्या भागात मात्र अतिमधुर फळे खायला मिळत असत आणि तेथे गाईंसाठी भरपूर गवतही होते. त्यामुळे रामकृष्णाने धाडसाने व पराक्रमाने गोपाळांसह धेनकासुर म्हणजेच वनवृषभ यांना ठार करण्याचे अथवा जंगलातून दूर करण्याचे ठरवले. सर्व सवंगडी हे तीर कमटे काठ्या भाले गोफणी अशी हत्यारे घेऊन तालवनात पोहोचले .वनात पोहोचल्यावर गोपाळ मोठमोठ्याने हाकारे -कुकारे द्यायला लागले, ओरडायला सुरुवात केली. तर काहींनी बरोबर आणलेले शंख वाजवायला सुरुवात केली. कित्येकांनी बरोबर आणलेले शिंगेदेखील वाजवायला सुरुवात केली.सगळीकडे जंगलामध्ये गोपाळांनी केलेला हाहाकार ऐकू येऊ लागला. त्यामुळे वनवृषभ भयंकर डरकाळी फोडीत व पाय आपटत तेथे हजर झाले. अशावेळी वृषभांवर सगळ्यांनी दगड मारले. विलक्षण त्वेषाने हल्ले चढवले. त्यामध्ये बरेच वनवृषभ मारले गेले आणि तालवन सर्वांसाठी खुले झाले.
*कालिया मर्दन
कालिया मर्दन ही कथा सर्वच पुराणांमध्ये आढळते. कालिया नागाचा फणा पकडून कृष्णाने त्याच्याबरोबर केलेल्या घनघोर युद्धाची सर्वांनाच माहिती आहे लेखकाच्या मते ही अलौकिक कथा नसून वृंदावनाच्या परिसरात येऊन कालियाप्रमुख नाग जमातीच्या लोकांनी तो प्रदेश विषमय करण्याच्यादृष्टीने त्या परिसरात राहणाऱ्या यादवात अंधाधुंद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याला पायबंद घालून नागांना त्या भागातून घालवून लावण्याचा कृष्णाचा तो प्रयत्न असला पाहिजे.
*प्रलंब वध
कंसाने गोकूळातील कोण दोन बलवंत -दोन गोपी आहेत हे खात्री करण्याकरता प्रलंबनामक आपल्या एका विश्वासातील बलदंड माणसाला वृंदावनात पाठवले. सर्व सवंगडी एकदा हरिण- क्रीडा नामक खेळ खेळत होते. यामध्ये ज्याला हरिणासारखी उडी पाठीवरून मारता येणार नाही त्याला शिक्षा होत असे. त्याला आपल्या सोबतीला पाठीवर बसून विशिष्ट अंतर धावावे लागेल. प्रलंब या खेळात हरला आणि तो बलरामाला पाठीवर घेऊन जंगलाच्या वाटेने डोंगराच्या चढणीकडे धावू लागला .तो वेगळ्याच दिशेने धावत असल्यामुळे पाठीवरच्या बलरामाने त्याला थांबायला सांगितले व आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण प्रलंब तेथे थांबला नाही. तेव्हा त्याचा इरादा समजल्यावर बलरामाने त्याच्या डोक्यावर इतक्या जोराने मुष्टी प्रहार केला की तो तोतया गोपाळ मरून खाली पडला. आणि हीच कथा प्रलंबसुर वध झाली.
*गोवर्धन
गोपालांनी देखील आपल्या दुग्ध व्यवसायाला स्मरण करून गायींची पूजा करावी. पावसामुळे गाईंना आवश्यक असलेला गवत -चारा निर्माण होतो. त्यामुळे आवश्यक तो पाऊस हा ढग डोंगरांनी अडवल्यामुळे पडतो. म्हणून गोवर्धन डोंगराची पूजा करावी असे कृष्णाला वाटत होते. तेव्हा इंद्रयागा ऐवजी गोवर्धन याग करावा आणि पूजनासाठी गोधनाची पूजा करावी असे त्याने सर्वांना सुचवले. कृष्णाच्या या कल्पनेला सर्वांनी पाठिंबा दिला.त्यावर्षी गोकुळवासीयांनी इंद्रयागा ऐवजी मोठ्या समारंभ पूर्वक गोवर्धन याग पार पाडला. नाचत गात वेदमंत्र घोषाने त्यांनी हा उत्सव साजरा केला. पण नंतरच शरद ऋतूमध्ये एक धुवांधार पाऊस गोकुळात बरसला. विजांचा लखलखाट ,ढगांचा गडगडाट झाला. नदी नाले भरले, यमुनेला पूर आला. सर्वांनी कृष्णाला साकडे घातले, संकटातून वाचवण्याची याचना केली. कृष्ण म्हणाला आपण इंद्रायागाऐवजी गोवर्धनाची पूजा बांधली,पूर आला. तर आपण आता गोवर्धनालाच शरण जायचे. गुरेढोरे सोडा आणि घरातील अन्नधान्य चीज वस्त्र जे लादता येईल ते गुरांवर लादा.गोवर्धनाकडे चला .गोप गोपी आणि गाईगुरे संरक्षणासाठी कृष्णाने करंगळीवर पाऊस थांबेपर्यंत पर्वत धरला हे दैविकरण हरिवंश सारख्या ऐतिहासिक ग्रंथात शोभत नाही असे लेखकाचे मत आहे. त्यांच्यानुसार या कथेचा लौकिक अर्थ एवढाच म्हणता येईल की यमुनेला पूर आला तिचे पाणी गोपांच्या गाई गुरांच्या गोठ्यात आणि घरात शिरू लागले. तेव्हा सखलभागातून गोपांना त्यांच्या गाईगुरांना संरक्षणसाठी कृष्णाने गोवर्धन पर्वताच्या उतारावरील उंच प्रदेशात नेले आणि त्यांचे पुरापासून संरक्षण केले.
संदर्भ - शोध कृष्णाचा-प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक -प्रा. डॉ.राम बिवलकर
प्रतिक्रिया
25 Jun 2024 - 8:19 am | चित्रगुप्त
छान सुरु आहे मालिका. चित्रांमुळे प्रेक्षणीयही होत आहे.

यातील काही चित्रे पूर्वी 'कल्याण' मासिक यायचे त्यातल्यासारखी वाटली. काही 'इस्कॉन' च्या पुस्तकातली. तुम्हाला कुठे मिळाली ? कांगडा चित्रे (Kangra paintings: विषेषतः Geet Govind) पण बघा.
25 Jun 2024 - 10:33 am | Bhakti
सुंदर चित्र! धन्यवाद!
मी गुगल इमेज शोधून (सर्चकरून ) जे चित्र आवडते ते घेत आहे.पण यापुढे चित्राचा संदर्भठिकाण (सोर्स)ही देत जाईन.
25 Jun 2024 - 5:12 pm | भागो
अनेक नवनवीन माहिती आणि कथा वाचायला मिळत आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद .