तांडव (ऐसी अक्षरे -१८)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
8 Jun 2024 - 7:43 pm

तांडव-पुस्तक परिचय
लेखक-महाबळेश्वर सैल
अ
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला. आदोळशी आणि आसपासच्या छोट्या टुमदार ,अठरापगड जातीच्या लोकांच्या गावांना नेस्तनाबूत केले. वर्षानुवर्षे वीस ते पंचवीस पिढ्या शेतीवाडी सलोखा

जपत राहत होते. एखाद्या देवाला पुजत होते, सुना बाळं, गाई गुरे ,भरलेल्या भाताच्या राशी, माडाच्या वनात, केळीच्या बागांत खिदळत नाही पण समाधानाने राहत होते. पण पोर्तुगांच्या आक्रमणानंतर पोर्तुगीज राजाने नेमलेल्या व्हाईसराईंनी दिलेल्या योजलेले पाद्री, सोजीरं सैन्य ,कापिताव अशा अनेक गोष्टी अवलंबून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात क्रूस धरून गावागावात अक्षरशः तांडव माजवला. प्रेमावर जणू यांचा विश्वास नसल्याप्रमाणे बळजबरी धमकवून जमीन हडपणे अशा अनेक कारणांनी लोकांना धर्मांतराच्या आगीत लोटलं.

लेखकाने लोभाने धर्मांतरीत होणारे सुखडू नाईक इत्यादी पात्र देखील रंगवले आहेत .तसेच चुकून कधी कपटाने खाऊ घातलेले गाईचे मांस आणि आता बाटलो म्हणून हताश बसलेले गावकरी देखील कसे या जाळ्यात अडकले ते पण दाखवले. तर कधी गुरांसारखे बांधून अख्खा गाव धमकावून धर्मांतरित केले आहे .तेही अनेक कथा अशा एकात एक गुंफलेल्या आहेत.अगदी काळच म्हणावं लागेल प्रत्येकासाठी हा काळ कसा आला ते दाखवले. तुम्ही बाटला आता तुम्ही हिंदू नाही असं असंच जोशात सांगणारे गावकरी ते हळूहळू साऱा गावच कसा धर्मांतरीत ख्रिश्चन झाला याच्या अनेक हृदयाद्रावक कथा आहेत.

याला भरीस म्हणजे अजून एक म्हणजे 'गोवा इक्विंजिशनचा धाक'! या भोळ्या लोकांचे देव मंदिरातून हटवला गावाच्या भूमीतून मंदिर ही दूर केले पण मनाच्या आणि घरात दूर कुठेतरी काळोखात दडलेला तो देव होता तेव्हा कधी समाधानासाठी कोणी पोथी वाचली ,लपून-छपून कावळ्याला, गाईला घास दिला , माऊलींनी कुंकू लावलं ,डोरलं घातलं अशा अनेक कारणांनी इक्विजिंशनने भयानक सजा दिली .आता तुम्ही ख्रिश्चन आहात हिंदूच्या कोणत्याही चालीरीती ती तुम्ही करू शकत नाही. असे म्हणून त्यांना अमानुषपणे गोवापाटणातील इक्विजिंशन मध्ये अनेक शिक्षा दिल्या आणि शेवटची शिक्षा होती ते म्हणजे जिवंतपणे सुळावर जाळणं. हाडे देखील पुरायचे नाही किंवा ते जाळायचे नाही त्याला कधीही मुक्ती द्यायची नाही.

काही हिमतीचे लोक होते ज्यांनी दिगंतराचा प्रवास धरला. गाव सोडून पळ काढला काहींनी डोक्यावर देवाला घेतलं गुर, घरदार शेतीवाडी, म्हातारी आईवडिल सार सारे भरलं गोकुळ टाकून ते पुढे चालत राहिले. पण हा मार्ग देखील तेवढा सोपा नव्हता. दुसऱ्या गावी आसरा मागितला तर त्यांनी दूरचा रस्ता दाखवला ,काहींनी डोक्यावर छप्पर दिले नाही आणि एक भुकेलेल्या रात्री दिवस हे लोक चालत राहिले चालत राहिले. काहींना दूरवर आपले पुन्हा एकदा छोटासा संसार शेती वसवली. हे जेव्हा व्हॉइस राहिला लक्षात आलं तेव्हा त्यांनी लोकांना गोवा बाहेर जाण्याची बंदी घातली आणि काही काही पळून जाणाऱ्या लोकांना पकडून अक्षरशः जिवे मारलं.

लेखकाने पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या संदर्भसूचीतील ग्रंथांची नावे नक्कीच खूप काही घडून गेलेले आहे याची साक्ष देतात. पंधरावे शतक ते अठरावे शतक 'गोवा' कसा उदयास कि लयास आला हे आपल्या लक्षात येतं.

तांडव करताना शिवाने तिसरा डोळा उघडल्यावर समोर येईल ते भस्मसात होतं हे माहीत होतं आंधळा असा धर्मांतराचा तांडव जिवंतपणे अनेकांना जाळत राहिला.

-भक्ती

मुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Jun 2024 - 9:35 am | प्रचेतस

तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही.

ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक.
एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.

अनन्त्_यात्री's picture

9 Jun 2024 - 11:11 am | अनन्त्_यात्री

सोजिरं = Soldiers
आणि कपिताव= Captain (masculine)

दोन्ही मूळ Portuguese शब्दांचे अपभ्रष्ट उच्चार

ओह,हा प्रश्न मी पुस्तक वाचतांनाच विचारायला पाहिजे होता.पूर्ण वेळ ही विशेष नामच समजत होते.