निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो.
ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो.
"आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.
एकदाचं नवसाचं ते मतदान झालं की मी माझी डाव्या हाताची मतदानाची निशाणी असलेली तर्जनी उत्साहानं ग्रुपवर टाकते. आनंदानं,समाधानानं स्वतःशीच हसते.
निवडणुकीच्या निकालाच्या तारखेची तर मी चातकापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत असते. मतदानाच्या सहा,सहा,सात,सात फेऱ्या वाट पाहताना माझ्या ताटकळण्याचा अंत होतो. त्यानंतर एक्झिट पोल. त्यात कोणाला किती सीट मिळणार याचे तर्क वितर्क. शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही अशी अवस्था.
मग एकदाची मतदानाच्या निकालाची तारीख उजाडते. त्याच्या आदल्या रात्री मला आनंदानं आणि उत्सुकतेनं झोप लागत नाही. (शाळेत असताना उद्या ट्रीपला जायचं असेल तर आदल्या रात्री आनंदानं झोप लागत नाही ना, तसं.)
निवडणूक निकालाच्या तारखेला मी भल्या पहाटे उठते. (झोपतेच कुठं म्हणा.)तर मी भल्या पहाटे,ब्राह्म मुहूर्तावर अभ्यंग स्नान करते. मग धूतवस्त्र परिधान करते. भालप्रदेशावर केशराचा टिळा लावते.. नको नको.. अंगारा लावते, किंवा अष्टगंध म्हणूया.
संकटनाशनं स्तोत्र म्हणते. मग माझ्या खोलीत माझ्या आवडत्या कोचावर मांडी घालून बसते,ती दिवसभर. (फक्त बाथरूम आदि कामांसाठी वगळता. बाकी जेवण, चहा पाणी जागेवर.)
दिवसभर डोळ्यांची पापणीही न लववता टीव्हीवर निकाल बघते. माझ्या आवडत्या पक्षाचे यशाचे आकडे चढताना दिसले तर माझे हृदय आनंदाने छातीच्या पिंजऱ्याबाहेर येऊ पाहते. मग आमचे म्हणजे आमच्या राजकारणप्रेमी ग्रुपचे,(यात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आणि घरातले लोक ,असे सगळे आले.) तर आमचे एकमेकांना फोन सुरू होतात. सगळे जण आनंदाने किंचाळत, फोनवर "ओ ला ला" , याsssहू असे चीत्कार करत असतात.
मग आम्हांला एक्झिट पोल चे निकाल आठवतात.
"अरे/अगं एक्झिट पोल मध्ये एवढा मोठ्ठा आकडा सांगितला नव्हता रे/गं.." असं आम्ही एकमेकांना म्हणतो. मग आमच्यातलाच एक "बुद्धिमान"आम्हांला समजावतो.
"हा एक्झिट पोल नसून "एक्झॅक्ट"पोल आहे. हे दिसतंय ते सत्य आहे."दुसरा "बुद्धिमान"म्हणतो", एक्झिट पोलही मॅनेज केलेले असतात. मिडियाही विकला गेलाय."
ही विधानं आपण नेहमी ऐकतो. खरे खोटे ब्रह्मराक्षस जाणे.
निकाल जाहीर होत असताना आपले लाडके उमेदवार निवडून आलेत ना इकडं माझं काटेकोरपणे लक्ष असतं. ते निवडून आले की आम्ही सगळे आनंदित होतो. आमच्यापैकी कुणीही"पित"नाही. ("ओढतही "नाही) पण सिनियर सिटिझन मित्र मंडळींत उगाचच "आज रात्री शॅंपेन पार्टी करायची" असं आम्ही किंचाळतो.
टीव्हीवरही उमेदवारांच्या आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, चाहत्यांचा गुलाल उधळत, नाचत जल्लोष चालू असतो. मला तो जल्लोष ,तो ओसंडून वाहणारा उत्साह बघून आपणही नाचावं असं वाटतं. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हणतात ते उगीच नाही.
मीही वय विसरून जमेल तितपत नाचते, आनंदानं चित्कारत स्वतःभोवती गिरक्या घेते. घरच्यांना मिठ्या मारते. अर्थात आपल्या मनातला पक्ष निवडून आला तरच. नाहीतर तोंडे उतरलेली आणि एकमेकांचे सांत्वन, सुन्न मौन अवस्था वगैरे.
तर सर्व जागांचे निकाल आले आणि माझं आवडतं सरकार बहुमताने आले की मी शेळीचं आय मीन गोमातेचं (A1 किंवा A2 जे असेल ते) पिशवीतून येणारं दूध पिऊन दिवसभराचा धिंगाणा थांबवते, आणि माझा उपास सोडते. (बरीच वर्षे झाली शेळीचे दूध आउटडेटेड झाल्याला.)
माझा हा फसफसून येणारा उत्साह बघून माझी शेजारीण म्हणते,"इश्य, इतकं काय त्याच्यात? दुसऱ्या दिवशी पेपरात कळतं की कोण जिंकलं ते! मी माझं कामधाम आटपलं की दुपारी चार वाजता पेपरवर नजर टाकते."
मी विचारलं,"मतदान करायला गेला होतात का?"
ती म्हणाली, "नाही ग, माझ्या वन्सं आणि त्यांचे मिस्टर त्याच दिवशी आमच्या घरी जेवायला आले. सुट्टी होती ना! मग मतदान राहिलंच."
मी तिला मनोमन साष्टांग दंडवत घातला. ही बया भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅचही लाइव्ह न बघता, दुसऱ्या दिवशी पेपरात कोण जिंकलं बघत असेल.
बघूया मग उद्या निकाल!
यावर एक "द्या टाळी" तो बनती हैं यार.."
प्रतिक्रिया
3 Jun 2024 - 2:13 pm | कंजूस
कुणाला तरी बहुमत असावं एवढीच उत्सुकता असते.अपक्ष किंवा छोट्या जिंकलेल्यांची मोठ्यांकडून रस्सीखेच आणि कायम तणाव नको.
3 Jun 2024 - 2:31 pm | अहिरावण
पण इतकं सुद्धा बहुमत नको की साथीला आलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं जावं !!
3 Jun 2024 - 3:10 pm | श्वेता व्यास
अगदी माझ्यासारखंच आहे तुमचं आजी :D
मला वाटलं होतं की राजकारण, राजकारणी, फार कशाला आपल्या मतदारसंघातील उमेदवार या कोणाशीही काहीही संबंध नसताना उगीच लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उत्साह फक्त मलाच आहे, किंवा तुम्ही हे उपहासाने लिहिलं असेल तर कल्पना नाही :)
3 Jun 2024 - 3:26 pm | Bhakti
छान खुसखुशीत लिहिलंय.
3 Jun 2024 - 3:56 pm | चित्रगुप्त
आजीचे लिखाण हे 'साध्याही विषयात आशय मोठा' आपल्या खुसखुशीत शैलीत समर्थपणे मांडण्याचे उत्तम उदाहरण असते.
" इश्य " म्हणणार्या काही बायका अजून जगात शिल्लक आहेत हे वाचून ड्वाळे पाणावले आणि गतकाळातील 'इश्य' म्हणणार्या काही मोहक तरुणी आठवल्या.
-- (गेले ते दिवस)
3 Jun 2024 - 4:45 pm | भागो
(गेले ते दिवस) >>> अगदी अगदी. "अय्या" पण गेले. अय्या आणि इश्श्य ह्यांची जोडी होती.
दिवस एकदा गेले कि परत नाही येत!
3 Jun 2024 - 4:13 pm | अथांग आकाश
एका पाकिस्तानी च्यानलचा अँकर म्हणतोय एन डि ए ३५३ ते ४२९ जागा जिंकेल! तिकडचा मिडिया सुद्धा विकला गेलाय का काय :) खरे खोटे उद्या कळेलच!!
3 Jun 2024 - 4:29 pm | अनन्त्_यात्री
https://www.misalpav.com/node/38918
4 Jun 2024 - 7:28 am | गवि
उत्तम वर्णन. असाच उत्साह सर्वत्र दिसतो आहे. आणि हल्ली जास्त वाढला आहे.
चला, निवडणूक निकाल बघता बघता चर्चा करायला हाच धागा वापरावा हे बरे.
किती वाजता सुरू होणार आहे मोजणी? कधीपर्यंत फायनल कळेल?
4 Jun 2024 - 9:29 am | गवि
NDA आणि India आघाडी यातील गॅप कमी कमी होत चालली. जनतेचा काय कौल आहे कळेना. पण हे अतिशय रोचक होत आहे. लोकशाहीची ताकद .. !!!
4 Jun 2024 - 9:50 am | Vichar Manus
परत एकदा मोदी सरकार येतंय, 300 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर.
4 Jun 2024 - 10:05 am | गवि
२७५-२२५ असे दिसतेय. ४०० सोडा, ३०० पार झाले तरी पुष्कळ. असे तूर्त चित्र. मोदी येतील मोस्टली. पण प्रचंड बहुमत? तूर्त काहीच कळत नाहीये.
4 Jun 2024 - 10:56 am | Bhakti
#४००ठार...
4 Jun 2024 - 11:03 am | सोत्रि
४०० पार हे तसंही शक्य नव्हतं हे मोदीशहांना पण माहिती होतं. निवडणूकीतलं स्लेजिंग होतं ते.
पण भाजपाला बहुमत ही मिळणं कठीण दिसतंय सध्याच्या आकड्यांवरून, पण एकंदरीत भाजपा+ (एनडीए) सरकार बनवेल असं दिसतंय.
- (स्थिर सरकारची अपेक्षा असलेला) सोकाजी
4 Jun 2024 - 11:35 am | कर्नलतपस्वी
Surprised.
4 Jun 2024 - 11:40 am | हणमंतअण्णा शंकर...
१. स्थानिकांच्या जागा गेल्या असणार, किंवा त्यांना अपेक्षित विकास झालेला नसणार
२. इतका प्रचंड संयम ठेवून, संघर्ष करून मंदिर झाले पण मोदींना वर्षभर थांबता आले नाही. इतक्या घिसाडघाईत प्राणप्रतिष्ठा करायला नको होती. सगळा राजकीय इवेंट केला मोदींनी. लोकभावना इतकी गृहीत धरू नयेत.
4 Jun 2024 - 11:36 am | हणमंतअण्णा शंकर...
मोदींनी हा धडा जरी घेतला तरी पुरेसे. वाटेल ती नौटंकी खपवून घेणार नाहीत, तुम्हाला विकास करावा म्हणून निवडून दिले होते असा स्पष्ट इशारा लोकांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात जर भाजप ने राजकारणाचा चिखल केला नसता तर आज चित्र वेगळे असते.
4 Jun 2024 - 11:41 am | गवि
सहमत. मोदीच येतील पुन्हा. पण अधिक जमिनीवर राहून भाजप राज्य करेल हा जनतेला फायदा. जनतेची लोकशाहीची ताकद अशी दिसते.
4 Jun 2024 - 11:52 am | कर्नलतपस्वी
गवई भौं बरोबर सहमत.
4 Jun 2024 - 11:55 am | कर्नलतपस्वी
गवी भौं बरोबर सहमत.
कदाचित २२६+२०+नितीश+ चंद्रबाबू बद्दल काय मत आहे.
4 Jun 2024 - 11:42 am | Bhakti
4 Jun 2024 - 11:52 am | गवि
तेच कारण ठरले असावे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे लोकांचे पाठबळ टिकून राहिले.
4 Jun 2024 - 11:56 am | Bhakti
#evmने घेतला दहा वर्षांनंतर मोकळा श्वास ;)
4 Jun 2024 - 5:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सकाळपासूनच वेफर्स,पॉप्कॉर्न खात टी.व्हि.पाहणे चालु होते. एकंदरित येणारे कल पाहता , मतदार भाजपाला हेच सांगू पाहतात की "अतिरेक करू नका. प्रत्येकवेळी ईतिहास खणून काढुन लोकांना पेटवायची गरज नाही. सारखे हिंदु-मुस्लिम करू नका. उठ्सूठ विरोधी नेत्याना जेल्मध्ये टाकू नका. तुमच्या नेत्यांची ऐषारामी राहणी आम्ही पाहत आहोत. तेव्हा अजून एक चान्स तुम्हाला देत आहोत."
4 Jun 2024 - 5:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नवनित राणा हरल्या ते बरे झाले. ह्यांचे आचरट वर्तन डोक्यात जायचे. स्मृती ईराणी हरल्या तेही बरे झाले. संसदभवनात फक्त हातवारे करुन ओरडणे ही ह्यांची खासियत.
उज्ज्वल निकम हरले तेही योग्यच झाले. वास्तविक भाजपाकडे चांगल्या नेत्यांची तशी कमी नव्हती. पण उमेद्वार निवडताना फक्त जिंकण्याची शक्यता आणि पैसा.. बाकी काहीच बघायचे नाही. ही अमित शहांची कथित चाणक्य नीती.
ज्या राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले नाही तेथे भाजपाचा बर्यापैकी विजय होताना दिसत आहे.
4 Jun 2024 - 7:22 pm | अहिरावण
ध्रूवीकरण अंगाशी आले... आता बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा.. घरं तोडायला नको.
5 Jun 2024 - 10:01 am | सुक्या
बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा..
त्याची पण गरज नाही. धुर्व राठी बोललाच आहे .. काय गरज आहे हायवे ची.. काय गरज आहे विमानतळांची...?
5 Jun 2024 - 10:05 am | अहिरावण
अच्छा ! पण धृवराठीला तर विमाने लागतात ना? तो काय छपरावरुन उडणार?
5 Jun 2024 - 11:58 am | कर्नलतपस्वी
ध्रुव राठी चे काम झाले. आता भेटेल पुढच्या निवडणुकीत.
5 Jun 2024 - 12:42 pm | अहिरावण
तोवर नवा राठी माठी गाठी साठी नाठी येईल... :)
5 Jun 2024 - 2:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
त्या आकाश बॅनर्जीने गेले काही महिने आकाश पाताळ एक करुन भाजपा विरोधात आघाडी उघडली होती. आमचे नव-बुद्धिवादी निखिल वागळे,असिम सरोदे,निरंजन टकले हेही भाजपाविरोधात प्रचार करत होते. खुद्द काँग्रेसवाल्यांचा जेवढा विरोध नव्हता तेवढा ह्या लोकांचा भाजपाला विरोध होता.!ह्यांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रु आणि दुसर्या डोळ्यात दु:खाश्रु अशी झाली आहे. कारण पुढची ५ वर्षे भाजपाच सत्तेवर असणार आहे.
5 Jun 2024 - 2:30 pm | अहिरावण
त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली असावी =))
5 Jun 2024 - 3:20 pm | कर्नलतपस्वी
अवघड जागी दुखणं आणी जावई बापू वैद्य..
4 Jun 2024 - 7:25 pm | अहिरावण
नितीश पंलटू पंतप्रधान होऊ शकतात.... लोकशाही झिंदाबाद
13 Jun 2024 - 10:41 am | आजी
या लेखाची पुष्कळ वाचने करून त्यावर अनेक प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे खूप आभार..