चाय की चर्चा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
2 May 2024 - 3:35 pm

या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे.

चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते.

मला चहा आवडतो. खूप आवडतो. पण म्हणून मी सारखा सारखा चहा पित नाही. फक्त दोनदा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी. संध्याकाळी एक वेळ नसला तरी चालेल. पण सकाळचा मस्ट. मात्र मला चहा जसा आवडतो तसाच बनलेला हवा. मला आवडणारा चहा माझी स्वयंपाकातली असिस्टंट ऊर्फ मदतनीस रोज करते. (मी नेहमी असिस्टंट हा शब्द वापरते. कामवाली, मोलकरीण,नोकर असे शब्द मी वापरत नाही. त्या बायकांनाही डिग्निफाईंग वाटतं.) माझी सूनही चांगला चहा करते. माझ्या सासूबाईही मला आवडतो तसा खूप छान चहा करायच्या. मी स्वतः उत्तम चहा करते.

चहासाठी दूध हवं ते म्हशीचं. भरपूर दाट. गाईचं पांचट दूध चहात टाकलेलं मला आवडत नाही. वाढेना कोलेस्टेरॉल! एक कप चहात अशी कितीशी फॅट असणार? तर म्हशीच्या दुधाचा चहा. त्यात आलं आणि गवती चहा असेल तर सोन्याला सुगंध.(सोनेपे सुहागा हा शब्द मला आवडत नाही. सुहागा शब्द आक्षेपार्ह आहे. का ते कळलेच असेल. म्हणूनच सुहागन,सुहाग, सुहागरात हे शब्दही नामंजूर.) तर साखर फक्त एक चमचा. चहा पावडर एका कपाला फक्त एक चमचा. बस असा चहा हवा. छान मुरलेला. चहाची चव जीभेला कळली पाहिजे. ती जिभेवर रेंगाळत राहिली पाहिजे.

चहा गरमच हवा. गार चहा मला अजिबात आवडत नाही. काही लोक चहा गार करून पितात. ते अगम्य आहे. चहाचा मसाला घालून केलेला फोडणी चहा मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा चहा न प्यायलेला बरा. मला गरमच चहा पण गावंढळासारखा बशीत ओतून प्यायला आवडतो. मी मूळची गावाकडचीच आहे. मी लहानपणापासून तो बशीत ओतूनच पित आलेली आहे. मी बशीत ओतून चहा पिते कारण मला तो लग्गेचच,भरभर,हावरटासारखा प्यायचा असतो. बशीतून फटाफट भुरके घेत चहा प्यायचा. तो गरम गरम, वाफाळता चहा जीभेला, ओठांना, गालांना, घशाला,अन्ननलिकेला सुख देत जठरात जातो. मला हळुहळू सिप करत चहा पिणं कंटाळवाणं वाटतं. पण लोकांकडे गेलं की तो तसाच प्यावा लागतो ना! चहात बिस्किटे बुडवून खायला मला अजिबात आवडत नाही. कारण त्यामुळे चहा लगातार पिण्याच्या सुखात व्यत्यय येतो ना!

चहा अत्युच्च भौतिक सुख देतो. चहाला पृथ्वीवरचं अमृत का म्हणतात ते मला चांगलंच पटलंय. समजलंय.

चांगला चहा सगळ्यांनाच करता येत नाही. रेकाॅर्डिंगसाठी गावोगाव हिंडताना मी अनेक चहा पोटात ढकललेले आहेत. खेड्यातल्या बिनदुधाच्या गूळ घातलेल्या चहापासून ते श्रीमंताकडच्या फिकुटत्या चहापर्यंत. चहा कसा असा जमून यावा लागतो. चहा,दूध, साखर यांचं योग्य प्रमाण पडणं ही गृहिणीपदाची कसोटी असते. काहीजणी पुळकावणी चहा करतात. पाण्याचं प्रमाण खूप. चहा पावडर थोडी. काहीजणी दूध इतकं कमी घालतात की तो चहा काळाकुट्ट होतो. काहीजणी दूध इतकं घालतात की चहाची चवच हरवून जाते. काहीजणी चहा, साखर दोन्हीही इतकं कमी घालतात की आपण नुसतंच गरम पाणी पितोय असं वाटतं. काहीजणी इतकी साखर घालतात की आपण चहा पितोय की बासुंदी असं वाटतं. चहा पिऊन झाल्यावर साखरेच्या अतिरेकामुळं ओठाला ओठ चिकटतात.

मला काॅफीही आवडते. पण चहावर माझं प्रेम जडलंय,तसं काॅफीवर नाही. मला काॅफी आवडते ती काॅफीची रवाळ पावडर टाकून,वेलदोडा घालून, उकळून करतात ती नाही. मला परकोलेटेड काॅफी सर्वांत जास्त आवडते. किंवा मग इन्स्टंट काॅफी आवडते. दूध मला अजिबातच आवडत नाही. त्यात कसलाही "व्हिटा" वगैरे मिसळूनही नाही. पण कोजागिरी पौर्णिमेला चांदण्यात गच्चीवर सुहृदांसमवेत मसाला दूध प्यायला आवडतं. सगळ्यांत आवडतं दूध म्हणजे मी कोल्हापूरला असताना दारासमोर अंगणात उभ्या केलेल्या म्हशीचं आपल्यासमोर पिळलेलं धारोष्ण,फेसाळलेलं, ताजं, किंचित् कोमट असलेलं दाट दूध. त्यात साखर बिखर काहीही मिसळावं लागत नाही. नुसतंच प्यायचं. त्या दुधाला तोड नाही.

चहा पिण्यासाठी मौसमही तसाच लागतो. उन्हाळ्यात भर दुपारी दोन वाजता चहा बरा वाटत नाही. बाहेर पाऊस पडत असताना तो मस्त रंग जमवतो. थंडीतही शेकोटीभोवती बसून कटिंग चहा प्यायला मजा येते.

काहीजणांना चहाचं व्यसन असतं. चहाचा अतिरेक म्हणजे व्यसन. तो प्यायला नाही तर बेचैन होणं म्हणजे व्यसन. मला चहाचं तसलं व्यसन नाही. काहीजणांचं चहा मिळाला नाही तर डोकं दुखतं. विड्राॅवल सिमटमस् अनुभवाला येतात. माझी एक नातेवाईक स्त्री दुपारी अडीच वाजता लग्नाचं गोड जेवण पोटाला तडस लागेपर्यंत जेवली आणि सवयीनं तलफ येऊन तीन वाजता चहा प्यायली. माझे एक नातेवाईक तर दर तासाने चहा प्यायचे. तोही थर्मास मध्ये करून ठेवलेला नाही. दर खेपेला ताजा. सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत. ते म्हणायचे,"चहा टाका. मला चहाला लागली." चहा प्यायल्याशिवाय त्यांना "लागायची" नाही.(असे खूपजणं असतात.) त्या नातेवाईकाची बायको बिचारी सोशिक. जन्मभर तिनं त्याच्यासाठी दरेक तासाने चहा केला.

आता एक महागंमत सांगते. मी जेव्हा ऑफिसात काम करत होते तेव्हा तिथला आमचा सर्वांत मोठा बाॅस , त्याला आम्ही सगळे घोडा म्हणायचो.(त्याच्या आधीच्या बाॅसला टकलू, त्याच्या आधीच्या बाॅसला घुबड.......जाऊ दे. ही इंटरेस्टिंग यादी वाढतच जाईल आणि विषयांतर होईल.) तर ह्या बाॅसला आम्ही सगळे घोडा म्हणायचो. कारण त्याचं तोंड थोडंसं लांबुडकं होतं,दात चौकोनी आणि मोठ्या आकाराचे होते, आणि बोलणं खिंकाळल्यासारखं होतं. एके दिवशी आमच्या रोजच्या मीटिंग मध्ये कुणीतरी आमच्या ऑफिसच्या कॅन्टीन मधून सगळ्यांसाठी चहा मागवला. पहिला घोट घेताच आमचे बाॅस म्हणाले,"कितनी गंदी चाय है ये। अरे ये चाय है या घोडे की सू सू?"

ते ऐकून आम्ही सगळे खो खो हसायला लागलो. बाॅसला वाटलं आपण केलेला जोक सगळ्यांना आवडलाय. सगळे ॲप्रिसिएट करताहेत. तो खुश झाला. तो तेच वाक्य पुन्हा एकदा खिंकाळला. आम्ही सगळे आणखी जोरदार हसलो. पोट दुखेपर्यंत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. काहीजण सोफ्यावरुन पडायच्या बेतात आले.

म्हणजे काही चहा विनोदनिर्मितीही करतात म्हणायचे.

चहा हे आदरातिथ्याचे प्रतीक आहे. घरी आलेल्या पाहुण्याला आपण किमान चहा तरी देतोच. तोही न दिल्यास "साधं चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही." अशी संभावना होते.

आज एक चायवाला देशाचा पंतप्रधान बनला आहे. त्यामुळे चहाला अधिकच ग्लॅमर आलं आहे.

हे आहे आदर्श लोकशाहीचं यश. सर्व स्तरातील नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणारं !

तर अशी ही अशी ही चाय की चर्चा!

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 4:36 pm | चौकस२१२

चहा १ सुंठ घातलेलला पण फार कडवट नाही आणि फार गो ड नाही दूध म्हशीचे आणि ते सुधा ताजे असेल तर मस्तच फार गरम नको
चहा २, चिनी पद्धतीचा फक्त पाणी घातलेलला ८५° तापमान

विवेकपटाईत's picture

2 May 2024 - 5:22 pm | विवेकपटाईत

तुमचा छुपा हेतु मला चहा पिता पिता कळला.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 7:33 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमच्या प्रत्येक लेखाच शीर्षक हिंदी का असतं?? मराठीत लिहिलं तर काही प्रॉब्लम असतो का??

गड्डा झब्बू's picture

2 May 2024 - 11:09 pm | गड्डा झब्बू

सहज कुतूहल म्हणून यांचे सर्व लेखन ही लिंक पाहिली. आजींचे एकूण पासष्ट (६५ ) लेख दिसत आहेत (दोन पाने अनुक्रमणिका मोजता). त्यातील आठ (८) शीर्षके हिंदी आहेत. (महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. )

म्हणजे सर्व नव्हे तर बारा टक्के शीर्षके हिंदी आहेत. हा आकडा कितपत मोठा हे अर्थात सापेक्ष आहे.

चार पाच आंग्ल देखील आहेत. पण बहुतांश मराठी दिसत आहेत.

रूढ प्रसिद्ध वाकप्रयोग किंवा लोकप्रिय गाण्यांची शीर्षके या स्वरूपात अमराठी शीर्षके दिसतात. पण लेखात मात्र कुठे हिंदी इंग्रजी फार मध्ये मध्ये येताना दिसत नाही. त्यामुळे बरे वाटते. हे वैयक्तिक मत.

हा लेख आवडला. भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत चहा वेगवेगळ्या रीतीने बनवला आणि पेष केला जातो. दक्षिणेत उकळता चहाचा अर्क ऐनवेळी गरम दुधाच्या ग्लासात एका फडक्यातून गाळून दोन ग्लासांच्या मध्ये हवेतून एकमेकांत धार पाडून फेसाळ करून देत असत.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 8:33 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराज की जय असे शीर्षक देखील हिंदी मोजले. नाहीतर मग दुसऱ्या कुठल्या भाषेत मोजले गेले असते?

नै नै.. तसं नव्हे अबासाहेब.*

की जय, जिंदाबाद वगैरे मराठी किंवा सर्वभाषिक घोषणांचा भाग होऊन गेल्याने साधारणपणे भाषेच्या पलीकडे गेले आहेत असे म्हणता येईल. पण तसे म्हणता येत नसले तरीही सांगण्याचा मुद्दा इतकाच की तेही धरून आठच शीर्षके हिंदी सापडली. इति. :-)

तळटीप : * यावरून अतृप्त आत्मा यांची आठवण झाली अता.

अताशा कुठे दिसले नाहीत. सकाळी सकाळी सुपर भात वाढणारे आमचे गुर्जी.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 9:16 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली
चित्रगुप्त's picture

3 May 2024 - 12:41 pm | चित्रगुप्त
चित्रगुप्त's picture

3 May 2024 - 12:49 pm | चित्रगुप्त

मस्त खुसखुशीत लेख! आवडत्या विषयावरचा असल्यामुळे आज कित्येक दिवसांनी लॉग इन केले प्रतिसाद द्यायला. खूप सार्‍या बाबतीत तंतोतंत सहमत.

चहाचा मसाला घालून केलेला फोडणी चहा मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा चहा न प्यायलेला बरा. >> अगदी! माझ्या नवर्‍याने चहाचा मसाला आणलेला मी शेवटी लपवून ठेवला ;)

चांगला चहा सगळ्यांनाच करता येत नाही. >> हेही खरेच आहे. मी तर किती तरी ठिकाणी जाताना घरूनच चहा पिऊन निघते.

आजी , लिहीत रहा. तुमचे लेख आले की मी आवर्जून वाचते!

अहिरावण's picture

7 May 2024 - 10:10 am | अहिरावण

चहा आणि चहावाला आम्हाला दोन्ही प्रिय !!

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 10:36 am | अमरेंद्र बाहुबली

चहवाल्याचा तडीपार मित्र?

मुक्त विहारि's picture

12 May 2024 - 9:01 am | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

वामन देशमुख's picture

7 May 2024 - 3:59 pm | वामन देशमुख

चहापुराण आवडलं, आजी.

---

झैरात: मला चहा आवडत नाही पण आमची चहावाली आणि तिचं चहा पिणं मनापासून आवडतं.

श्रीरंग_जोशी's picture

10 May 2024 - 12:07 am | श्रीरंग_जोशी

चहा विषयावरचा हा लेख एकदम फक्कड जमला आहे.
मी स्वतः गेली अनेक वर्षे सुटसुटीत असा मायक्रोवेव्ह ओव्हनमधे केलेला झटपट चहा पितोय. दिवसातून कमाल तीनदाच चहा पितो.

मायक्रोवेव्ह मधील चहा गाळून घ्यावा लागतो की तसाच?

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2024 - 9:08 pm | श्रीरंग_जोशी

चहा पावडरची डीप वापरायची असते. उकळून झाला की डीप काढून टाकायची अन चहा प्यायचा.
नंतर केवळ कप धुवावा लागतो.

तुम्ही १) आधी फक्त पाणी उकळून घेता मायक्रोवेव्ह मध्ये आणि मग डीप डिप ची पुडी टाकता कि २) पुडी सकट गरम करता ?

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2024 - 8:58 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या अनेक वर्षांपासून मायक्रोवेव्ह चहाची पाककृती टंकाळ्यामुळे प्रकाशित करणे राहून जात आहे.
थोडक्यात लिहितो.

  • प्रथम एका कपात पाणी घेऊन त्यात चहाची डीप भिजवून ठेवणे. किमान १५ मिनिटे, घाई असल्यास कप थरथरवणे.
  • नंतर मायक्रोवेव्हमधे तापवणे. मी ४० सेकंद करतो. मायक्रोवेव्हच्या सेटिंग्जनुसार हा वेळ कमी अधिक करावा लागू शकतो.
  • कप बाहेर काढून त्यात दूध ओतणे.
  • पुन्हा एकदा मायक्रोवेव्हमधे गरम करणे.
  • नंतर कप बाहेर काढून, गरम असलेल्या डीपला चमच्याने दाबून त्यातले द्रव कपातल्या मिश्रणात मिसळतो.
  • चहा तयार :-). भिजवून ठेवण्याची वेळ सोडल्यास एका कपाला दोन मिनिटे लागतात. दोन कप चहा करताना ४० सेकंदाऐवजी १ मिनिटभर तापवतो.

मायक्रोवेव्हात गरम केलेले पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात असाही एक मतप्रवाह आहे. मी आणि माझी बायको ते कधीच वापरत नाही. पातेले, कढईत गरम करायला आणि भांडी घासायला लागणारा वेळ परवडला, पण खरोखर मा.वे. धोकादायक असेल तर कशाला विषाची परिक्षा घ्या, असा त्यामागे विचार आहे.
-- माझ्या एका विद्वान प्रोफेसराच्या अनुभवाप्रमाणे अशा विविध हानिकारक गोष्टींविषयी संशोधनास फंडिंग उपलब्ध होत नसल्याने तसे संशोधन होत नाही, कुणी केले तरी ते दाबले जाते. याउलट मायक्रोवेव्ह, इंटरनेटचे तरंग, प्रिझर्वेटिव्हे, डास पळवण्याची साधने वगैरे हानिकारक नसतात, असा प्रचार करायला भरपूर पैसा ओतला जातो. अमेरिकेत शेतावर वाढणार्या गाईंचे ताजे दूध वापरण्यास मनाई आहे. दोन-चार आठवड्याची एक्स्पायरी डेट असलेले, रासायनिक प्रक्रिया केलेले दूध विकणेच कायदेशीर असते. आम्ही लांबून मुद्दाम जाऊन ताजे दूध आणतो, त्यावर NOT FOR HUMAN CONSUMPTION असे ठळक लेबल लावलेले असते. ते घ्यायला आधीपासून बुकिंग करावे लागते आणि ते दुप्पट-तिप्पट महाग असते.
.
पूर्वी कॅन्सर होणारे लोक फार कमी असायचे आता ते प्रमाण प्रचंड वाढलेले असण्यामागे आधुनिक रहाणी, सवयी-सुखसोयींमधून होणारे घातक परिणाम असावेत.
अमेरिकेत बंदूक दुकानात जाऊन विकत घेता येते, पण ताजे कच्चे दूध नाही. "दुनिया पागल है, या फिर मै दीवाना" हे गाणे आठवते.

सस्नेह's picture

11 May 2024 - 7:21 pm | सस्नेह

चा ची च. भारीय.
चा ची चव कधी घेतली नाही तरी हा चा आवढला :)

माझ्या या लेखावर जवळपास वीस प्रतिसाद आले.
वाचनेही भरपूर झाली. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. त्या लेखात एक मुद्दा राहिला आहे. तो इथे टाकते.

"चांगल्या चहाच्या यशाची मेख तो उकळण्यात नसून तो मुरवण्यात आहे. एक कप मोजून चहाचं आधण ठेवायचं. त्याला थोडीशी उकळी आली की त्यात साखर घालून ती विरघळवायची. मग चांगली खळखळून उकळी आल्यावर त्यात चहा टाकायचा आणि पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. दोन मिनिटांनी चहा गाळायचा. चहा नीट मुरल्याची खूण म्हणजे गाळण्यावर चहापत्ती अजिबात येता कामा नये. मग दूध घालून असा मस्त चहा प्यायचा. गप्पा मारायला तुमच्यासारखे दोस्त असतील तर आणखी मजा."
ओके तर मग! पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

तुमची स्नेहांकित आजी.

सर टोबी's picture

21 May 2024 - 4:27 pm | सर टोबी

लेख नेहमीप्रमाणेच छान आणि मी नेहमी उल्लेख करतो त्या निरागासतेने भारलेला होता. एक थोडासा नाउमेद करणारा प्रतिसाद सुरुवातीलाच आला आणि त्यात प्रतिसाद देताना तांत्रिक अडचण उद्भवली.

नेहमीसारखंच लिखाण करीत जा ही आग्रहाची विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2024 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी, 'चाय पे चर्चा' शिर्षक वाचलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीत लेखन वाचायचं राहीलं. आजीही चाय पे चर्चावर आल्या की असे वाटून एक सामान्य चहा विकणारा किती मोठा होतो वगैरे वर लेखन आहे की काय असे वाटले आणि आजीही पॉलिटीक्समधे आल्याचा आनंद झाला होता. आज चहा पिता पिता लेख वाचला. नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या विषयावरील चहाच्या आठवणी गोष्टी आवडल्या. चहा मलाही आवडतो. गरम. आजी आपण जसे रेकॉर्डींगसाठी वेगवेगळ्या गावी चहा पिला तसं मी पण नोकरीच्या गावीचा प्रवास करतांना, माझेही चहावाले ठरलेले. कधी तरी गुळाचा गरम चहा तर, कधी बीगर शक्कर दोन्हीही चहावाल्याला ऑर्डर्स पाठ. मागे एकदा वाट्सॅप विद्यापीठात चहा भारतात कसा आला वगैरेची ष्टोरी वाचलेली. चहाची ओळखच नसती झाली तर, असेही प्रश्न पड्तात. व्यक्तीगणिक चहाची चव बदलते बरं का आजी असे वाट्ते. आता ते कसं माहिती नाही. व्यक्तीगत मला बीनदुधाचा काळा चहा लिंबु पिळून आवडत नाही. भरपूर दुधाचा चहा आवड्तो. कॉफी आवडते. फारच गोड जीभेवर गडद पाक यावा इतक्या अशा चहाचा राग येतो. अशा खुप काही गोष्टी.

आजी, आपल्या लेखनामधे साधे विषय असले तरी त्याची एक खास खुशबू आहे. मला तर तुमचे लेखन आले की टायटनिक सिनेमातली ती ती आजी डोळ्यासमोर येते, जी टायनिक ष्टोरी सांगते, तसं तुम्ही आम्हा मिपाकरांना आयुष्यातील विविध अनुभव सांगत आहात असा फिल येतो तेव्हा लिहिते राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे