ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे (ऐसी अक्षरे... मेळवीन -१२)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Sep 2023 - 1:19 pm

सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.
a
अनुक्रमणिका पाहता,चार विविध विषय क्षेत्रातील संस्कृती,दैवत , आस्थेची स्थाने,लोकमान्यता असलेले श्रद्धा विषयांचे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. पहिल्या भागातील लेखांत महाराष्ट्र आणि जवळील राज्यातील माहित नसलेल्या व माहिती असलेल्या ‘गुरु’ परंपरेविषयी समजते.दुसऱ्या भागात स्त्री देवता माहिती वाचायला मिळते.यातील सीता,उमा राधा यांचे निराळे पैलू समोर येतात.राधा या लेखात राधा नाचवणे या परंपरेपासून तमाशा पर्यंतचा प्रवास वाचण्यासारखा आहे.कालिदासरचित नायिका शकुंतला,यक्ष प्रिया,अनुसया मृछाकटीकम ची नायिका वसंतसेना ,गीतगोविन्दम रचना जयदेव या अभिजात साहित्याची रसाळ वर्णने लेखांत आहे.
संत चक्रपाणी यांवर रा .ची यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलेच आहे ,पण एका गुजराती मनुष्याचा महाराष्ट्रात संत चक्रपाणि आणि महानुभाव पंथाचा उगम वाढ यात अनेक नवीन माहिती दाखवतो.शैव पंथाविषयी अनेक गोष्टी विविध लेखात विस्तृत मांडली आहे.जय गंगे जय भागीरथी या लेखात एक शिव भक्तीची उगम गंगा आणि एक कृष्णसावळी यमुना यांचा संगम ,कुंभयात्रेसाठीचे महत्व वाचनीय आहे.विंचू चावला लेखात संत एकनाथ यांच्या साहित्याने भारुड ही देणगी जनमानसाला दिली.लंकेची पार्वती हा शब्द अपभ्रंश आहे ‘लंजा पार्वती’ ‘,लज्जागौरी’ म्हणजेच ‘अनावृत्त जगन्माता’ याचा गंधही सामन्यांना नसेल.निषाद या आदिम जमातींची मनोरंजक तितकीच विश्वसनीय माहिती वाचताना त्यांनी प्रथम नांगर वापरले तसेच अनेक शब्द संस्कृत भाषेला प्रदान केले.वीस अंक निषादसाठी महत्वाचा त्यांनीच अठरा वीसे म्हणजे १८*२०=३६० असे वर्षाचे दिवस मोजले पण अपभ्रंश झाला ‘अठरा विश्वे’ सदाकाळ या अर्थानेच.आदित्य राणूबाई सौराष्ट्र ,काश्मीर,राजस्थान ,नेमाड ,महाराष्ट्र अशा अनेक भागांत सुर्योपासक गटाची माहिती देतेच .तर हिचे मूळ इराणचे राज्ञई (रानी)याच्याशी निगडीत आहे.इराण मधील सुर्योपासक सूर्यच्या राण्या रशन आणि नर्शेफ नावावरून भारतात झाल्या राज्ञई आणि निक्षुभा.
असे अनेक धर्मोइतिहात्मक संशोधांवर आधारलेले लेख वाचत राहणे या पुस्तका निमित्ताने पर्वणीच आहेत.
रा.चि.ढेरे या उपासकांचे तत्त्वज्ञान ,संस्कृतीचे महान कार्य पाहून मी थक्क झाले.
https://marathivishwakosh.org/53640/
-भक्ती

मुक्तकप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

यांची बरीच पुस्तके वाचनालयात आहेत. ती सर्व धार्मिक, पौराणिक कथा, तत्त्वज्ञान यावर संशोधन आणि मते अशी आहेत. ती चाळली पण समजणे मला कठीण वाटली.

हे पुस्तक छान आहे.सहज सुंदर भाषा आहे.

कर्नलतपस्वी's picture

29 Sep 2023 - 5:47 pm | कर्नलतपस्वी

झपाटलेलाचं म्हणलं पाहिजे. एक माणूस केवढे वाचन लिखाण करू शकतो,प्रेरणादायक. पुस्तक खरेदी करताना यांची बरीच पुस्तके समोर येतात पण कधी घेतली नाहीत. पुढील वेळेस बघीनं.

धन्यवाद

Bhakti's picture

30 Sep 2023 - 12:07 pm | Bhakti

_/\_

प्रचेतस's picture

30 Sep 2023 - 9:50 am | प्रचेतस

गुरुवर्य रा. चिं. ढेरे यांची काही दुर्मिळ पुस्तके संग्रही आहेत. मात्र हे पुस्तक अजून घेतलेले नाही. परिचयाबद्द्ल धन्यवाद. हे पुस्तक अवश्य घेणार आहे.

Bhakti's picture

30 Sep 2023 - 12:06 pm | Bhakti

_/\_

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2023 - 1:06 pm | चौथा कोनाडा

रोचक धागा.
सुंदर पुस्तक परिचय.
त्यांची एक दोन पुस्तके फार पूर्वी वाचली होती. आता पुन्हा वाचायला हवीत.
धन्यवाद !

Bhakti's picture

30 Sep 2023 - 7:06 pm | Bhakti

_/\_

अनन्त्_यात्री's picture

30 Sep 2023 - 6:21 pm | अनन्त्_यात्री

महाराष्ट्रात संत चक्रपाणि आणि महानुभाव पंथाचा उगम वाढ यात अनेक नवीन माहिती दाखवतो" या वाक्याचा अर्थ कळला नाही..

Bhakti's picture

30 Sep 2023 - 7:05 pm | Bhakti

पण एका गुजराती मनुष्य महाराष्ट्रात येऊन संत चक्रपाणि होतात आणि महानुभाव पंथाचा उगम व वाढ कशी होते याविषयी लेखात खुप नवीन माहिती मिळते.

चक्रपाणि म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर, महानुभाव पंथाचे संस्थापक. रामदेवराय परम विठ्ठलभक्त आणि महानुभव विठ्ठलाला मानत नसल्याने रामदेवराय आणि महानुभवांत मोठे वैर निर्माण झाले. कधीतरी लिहिन ह्याविषयी.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 8:44 pm | अमरेंद्र बाहुबली

कधीतरी कशाला घ्या मनावर नी लगेचच लिहून सोडा.

चक्रपाणी वायले आणि चक्रधर वायले.
चक्रपाणि म्हणजे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक. त्यांच्यानंतर श्री. गोविंद प्रभू आणि त्यानंतर चक्रधर स्वामी अशी गुरु परंपरा आहे.
महानुभाव ग्रंथांतील मराठी ( की प्राकृत) वाचणे एक रोचक अनुभव असतो.बर्‍याच शब्दांचे अर्थे समजून घेण्यासाठी महानुभाव शब्दकोशाची मदत घ्यावी लागते.
कृष्ण, एकमुखी दत्त ही या संप्रदायाची दैवते. दुसर्‍या देवतांचे प्रसाद न खाणे, नवरात्रीचे दिवे बघणे निषिद्ध, श्राद्धभोजन न खाणे, मृत्युपश्चात जाळण्याऐवजी पुरणे, श्राद्धकर्म न करणे अशा अनेक गोष्टींमु़ळे हा संप्रदाय बरेच जणांना वेगळा वाटतो. पुर्वीच्या काळात हा संप्रदाय अगदी पंजाब, काश्मीर पर्यंत पोहोचला होता. आजही महाराष्ट्रातल्या गावागावात यांचे अनुयायी आढळतात. गुलाबी / पांढर्‍या रंगाचे कपडे, डोक्यावर एक वेगळ्या प्रकारची टोपी, संप्रदाय कार्याला वाहिलेल्या स्त्रियांनी काळी वस्त्रे परिधान करणे इत्यादी ठळक लक्षणे. गावठी भाषेत यांना "मानभाव" म्हणतात.
काळाच्या मानाने जास्त क्रांतिकारक विचार असलेला संप्रदाय म्हणून देखील याची ओळख आहे.

बाकी गुजराती माणुस महाराष्ट्रात येऊन संप्रदाय स्थापन करतात याचे आज आपल्याला विशेष वाटते पण असे अभिसरण पुर्वीच्या भरतखंडाला नवीन नाही. देशाविदेशात पसरलेल्या आणि ९० टक्के गुजराती भाविक असलेल्या स्वामिनारायण संप्रदायाचे भगवान स्वामिनारायण उत्तर प्रदेशात जन्माला आले. मात्र त्यांना सगळ्यात जास्त भक्त गुजरातेत मिळाले.

आज आपण हिंदी भाषिकांचा द्वेष करतो पण रामही भैय्या, कृष्णही भैय्या, विठ्ठल कानडाऊ अशी सरमिसळ सगळीकडे चालत आलेली आहे. विविधतेत एकता यालाच म्हणतात बहुतेक.
पिकते तिथे विकत नाही ही म्हण देवांनाही लागू होते.

टिप : जोतिबा / खंडोबा हा शंकराचा अवतार नाही अशा अर्थाचे बहुतेक ढेर्‍यांचेच विधान आहे बहुतेक (चूकभूल माफ) त्याचा उल्लेख या पुस्तकात आहे काय ?

असो. सध्या इतकेच.

प्रचेतस's picture

30 Sep 2023 - 10:16 pm | प्रचेतस

चक्रपाणि महानुभव पंथाचे संस्थापक असे कधी वाचले नव्हते. मात्र हरिपाळदेव यास गोविंद प्रभू यांचा उपदेश प्राप्त होऊन त्यांनी नाव त्यागून चक्रधर हे नाव घेतले आणि महानुभव पंथ स्थापला हे माहीत आहे. म्हणूनच चक्रपाणि हे नाव म्हणजेच चक्रधर यांचेच वाटले. लीळाचरित्रात चक्रपाणि यांचा उल्लेख येतो का हे तपासून पाहतो.

धर्मराजमुटके's picture

1 Oct 2023 - 12:51 pm | धर्मराजमुटके

माझाही नाम साधर्म्यामुळे गोंधळ झाला लिहिताना. महानुभाव पंचकृष्ण मानतात.
१. श्रीकृष्ण चक्रवर्ती (द्वारकेचा राणा)
२. एकमुखी दत्तात्रेय प्रभू (बद्रिकाश्रम) )
३. श्री. चक्रपाणी प्रभू (चांगदेव राऊळ)
४. श्री. गोविंद प्रभू
५. श्री. चक्रधर स्वामी
हे शेवटचा अवतार असले तरी पंथाचे संस्थापक हेच आहेत हे तुमचे म्हण़णे बरोबर आहे. त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव हरपाळदेव. यांचा मृत्यू झाला तेव्हाच योगायोगाने चांगदेव राऊळ किंवा श्री चक्रपाणि प्रभू. यांचा आत्मा मृत हरपाळदेवाच्या शरीरात प्रविष्ट झाला आणि हरपाळदेव जिवंत झाला.
म्हणून तात्विक दृष्ट्या तुम्ही चक्रपाणि आणि चक्रधर स्वामी एक म्हणाले ते बरोबर असले तरी चक्रपाणि आणि चक्रधर ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या असे उल्लेख आढळतात. शिवाय महानुभावांनी पुजायच्या फोटोत वरील पाचही अवतारांचे दर्शन होते.

प्रचेतस's picture

1 Oct 2023 - 2:49 pm | प्रचेतस

संग्रही असलेले काही ग्रंथ उचकटले असता महानुभव संप्रदायाबद्दल अधिक माहिती मिळाली.

तुम्ही म्हणता तसा पंचकृष्णाबद्दलचा श्लोकच चक्रधरांच्या सूत्रपाठात आहे.
जैसे द्वापरी श्रीकृष्णचक्रवर्ती ।।१।।
जैसे सैहाद्री श्रीदत्तात्रेय प्रभु ।।२।।
जैसे द्वारावतीए श्रीचांगदेवो राऊळ ।।३।।
जैसे ऋद्धिपुरी श्रीगुंडम राउळ ।।४।।
जैसे प्रतिष्ठानी श्रीचांगदेवो राउळ ।।५।।

अर्थात हा सूत्रपाठ चक्रधरांनंतर लिहिला गेलेला आहे तरी त्यात नाथसंप्रदायाचे दैवत दत्त आणि चांगदेव राऊळाचा समावेश केला गेला असल्याने महानुभवांनी दत्तसंप्रदायातली तत्वे थोड्याफार प्रमाणात घेतली असावी असे म्हणता येईल. श्री गुंडम म्हणजे श्री गोविंद प्रभू तर पाचवा अवतार म्हणजे स्वतः स्वामी चक्रधर. यात चांगदेव राऊळालाच चक्रपाणि म्हणत. यातही त्याचे पिता जनकनायक याने फलटणच्या चांगदेवाला नवस केला तर माता जनकाइसे हिने चाकणच्या चक्रपाणिला नवस केला म्हणून बापाकडून ह्याचे नाव चांगदेव ठेवले गेले तर आईकडून चक्रपाणि. हरिपाळदेवाच्या मृत्यूनंतर चांगदेव (चक्रपाणि) याने त्याच्या मृत शरीराचे प्रवेश करून त्यास जिवंत केला व हरिपाळदेवाचाच पुढे स्वामी चक्रधर झाला. अर्थात ह्या कथा सोडून दिल्यास रिद्धपुरातल्या गोविंद प्रभु (श्री गुंडम) यांनी हरिपाळदेवास अनुग्रह केला व त्यांचाच पुढे चक्रधर स्वामी झाल्यानंतर त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली असे मानता यावे.

प्रचेतस आणि धर्मराजमुटके वाह खुप छान व्यासंग आहे .
A
हे पुस्तकात लिहिले आहे .माझ्याही माहितीनुसार चक्रपाणि आणि चक्रधर एकच म्हणून चक्रधर ऐवजी चक्रपाणि लिहिले.इथे सांप्रदाय शब्द महानुभाव चक्रधर यांच्या आधीच संस्थापित झाला अशा अर्थाने आहे का?
@धर्मराज
होय ,पुस्तकात त्यांनी स्कंदाला खंडोबा मानले जाते .मल्लारिमाहात्म्य ग्रंथात शिवाने मणी-मल्ल दैत्य मारण्यासाठी खंडोबा अवतार घेतला.तर ज्योतिबा हिमालयातील केदारनाथाचा अवतार आहे असे लोक मानतात लिहिले आहे.पुढे त्यांचे म्हणणे आहे की खरे हे दोन्ही देव भैरवनाथ वर्गातले आहे.म्हणजे क्षेत्रपाळ म्हणजेच क्षेत्रपती म्हणजेच शेतजमीन म्हणजेच केदार .याचा अर्थ ते यांना शिवाचा अवतार मानत नाही असाच होतो बहुतेक.

कसचं कसचं ??
प्रचेतस यांच्याशी माझी तुलना पाहून मला
"पायरीसी कैसे शिवू आम्ही जाती हीन"
"कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणी"
असले काही बाही अभंग, सुविचार मनात आले :)
झालेच तर मराठीच्या बाईंनी शिकविलेला उपमा, उपमेय, अतिशयोक्ती अलंकार वगैरे डोळ्यासमोरुन तरळून गेले.

असे काही नाही हो, व्यासंग तर अजिबात नाही. आवड आहे इतकेच.

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2023 - 7:55 am | कर्नलतपस्वी

फलस्थ नगरे जातं द्वारावत्यां निवासिनम |

नौम्यहं चक्रपाणी तं जनकद्विजनंदनम ||

चक्रधर आणी चक्रपाणी एकचं आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Oct 2023 - 10:54 pm | अमरेंद्र बाहुबली

व्वा. मिपावर अतिऊच्च बौध्दीक चर्चा पुन्हा जोर धरू लागल्यात. मला जूना काळ २००८-०९ चा आठवतोय जेव्हा अश्या चर्चा व्हायच्या. (तेव्हा मी मिपावर वाचनमात्र वा सदस्य नव्हतो) :)

टर्मीनेटर's picture

2 Oct 2023 - 12:32 pm | टर्मीनेटर

महानुभाव पंथाविषयी मला फार काही माहिती नाही, पण त्या पंथात 'फ्री सेक्स' हि संकल्पना मान्य असल्याची ऐकीव माहिती आहे.
हे खरं आहे का?

फ्री सेक्स म्हणता येणार नाही मात्र ईश्वरप्राप्ती साठी विषयप्रेमही आवश्यक आज असे काहीसे महानुभव तत्वज्ञान आहे.

विषयप्रेम हे पुरभजनासारखेच स्वतंत्र साधन आहे. कारण पुरभजनात दुसऱ्या खाद्य पदार्थांनी परमेश्वराची सेवा करावयाची तर विषयप्रेमात आपले शरीरच परमेश्वराच्या सेवेला लावायचे असते; आणि तेही आत्यंतिक आवडीने. दोहोंनीही परमेश्वराची 'सेवा' च घडते. इतर पदार्थांनी त्याची सेवा करण्यापेक्षा आपल्या शरीराने त्याची सेवा करणे अधिक चांगले. विषयप्रेम हेहि परमेश्वराचे संचारी प्रेम होय. ईश्वरी प्रेमाचा संचार झाल्याने भक्ताला श्री मूर्तीतील अव्यक्त ईश्वरस्वरूप जसे स्पष्टपणे दिसते तसे विषय प्रेमियालाहि दिसते.

विषय प्रेमालाही व्यभिचाराचे स्वरूप येऊ शकते कारण परमेश्वराप्रति विषयप्रेम व्हायला जीवाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणाचाच उत्कर्ष कारणीभूत होतो.

अर्थात महानुभव तत्त्वज्ञान थोडे किचकट असल्याने आणि ह्याविषयी अधिक वाचल्याशिवाय भाष्य न करणे उचित ठरावे.