काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.
सैंधव मीठ ज्याला
हिमालयीन मीठ-हिमालयाच्या पायथ्याशी सापडतं
सैंधा /सैंधव मीठ -सिंधू नदीच्या भागात सापडते
खेवडा/खैबुर/लाहिरी मीठ-पाकिस्तानमधील खेवडा प्रांतात याच्या खाणी आहेत.
गुलाबी मीठ-रंगाने गुलाबी आहे.
Rock salt-खनिज पदार्थापासून मिळवलं जातं.
जगातली मीठाची दुसर्या क्रमांकाची खाण पंजाब -पाकिस्तान येथे आहे.आणि ती इतकी मोठी आहे की आणखीन कित्येक शतकं यातून सहज सैंधव मीठ मिळवता येईल.
५००-६०० लक्ष वर्षांपूर्वी या भागातील समुद्र बाष्पीभवन प्रक्रियाने आटले.मीठाचे अधिक प्रमाणात अंश येथे उरले.पुढे बर्फ,लाव्हा यामुळे यांचे जमिनीखाली दाबून खडक बनत राहिले.भूगर्भातील टेक्टॉनिक हालचाली सुरू झाल्या.मोठ्या दाबाने हे मिठाचे डोंगर पर्वत रांगा होऊन वर आल्या.अल्केझांडर द ग्रेट या भागात मोहिमेवर असताना त्याच्या युद्धातल्या घोड्याने हे डोंगर चाटले व चाटतच राहिला त्यामुळे या खारट गुलाबी पर्वताची ओळख जगाला झाली.पाकिस्तान यांची निर्यात भारताला करतो,त्यांच्याकडे याच्या प्रोसेसिंगचे तंत्रज्ञान नाही.भारत या खडकांवर प्रकिया (शुद्धीकरण)करुन यांची निर्यात जगभर करतो.
याचे विशिष्ट गुणधर्म म्हणजे सोडियम क्लोराईड (NaCl)शिवाय यात मग्नेशिअम, पोटॅशियम ,कॅल्शियम आयर्न आढळते.आयर्न आक्साईडमुळे रंग गुलाबी आहे.परदेशातील नागरिक या गुलाबी खडकापासून शोभेच्या वस्तूही बनवतात .
याच हिमालयीन मीठावर गंधक प्रक्रिया करून काळे मीठ बनवतात.ज्याची चव वेगळी होते.बाजारात समुद्री मीठावर प्रक्रिया करून बनवलेल्या काळ्या मीठाचाही सुळसुळाट आहे.
तरीही सैंधव मीठामध्ये आयोडिन (जीवाश्म प्रक्रियेत मिसळते?) नाही.अयोडिन हे समुद्री मीठात आढळते जे थायरॉईड ग्रंथीना कार्य करण्यासाठी गरजेचे आहे.तरीही केवळ सोडियम क्लोराईड बरोबर आणखीन भरपूर मिनरल मिळवण्यासाठी सैंधव मीठ उपयोगी आहे.पण कोणतेही मीठ असो प्रमाणात खावे.
-भक्ती
प्रतिक्रिया
3 Jul 2023 - 3:54 pm | विजुभाऊ
हे सोडियम क्लोराईड नसते तर मॅग्नेशियन क्लोराईड असते. दोन्हीची चव खारटच असते.
3 Jul 2023 - 5:48 pm | Bhakti
नाही हो विजूभाऊ सोडियम क्लोराईडच असतं ९९%

4 Jul 2023 - 11:25 am | विजुभाऊ
चूक मान्य.
3 Jul 2023 - 5:48 pm | कॉमी
सैंधव मिठामध्ये जे मिनरल असतात ते खूप कमी प्रमाणात असतात. त्याचा काही उपयोग हवा असेल तर खूप जास्त सैंधव मिठ आहारात ठेवावे लागेल. इतके, की त्यामधला सोडियम हा अपायकारक ठरेल. म्हणजे ह्या मिठाच्या वापरातून काही उपयोग होतो असे अभ्यासात अढळून आलेले नाही.
तसेच, शरीराला उपयोगी मिनरल सारखेच, शरीराला अपायकारक मिनरल सुद्धा सूक्ष्म प्रमाणात सैंधव मिठात असतात.
ट्विटर वर @TheLiverDr ह्यांनी सगळे सोर्स देऊन ह्यावर लेख लिहिला आहे.
https://twitter.com/theliverdr/status/1667873745716023298
3 Jul 2023 - 6:04 pm | Bhakti
चांगला लेख,खरच सैंधव मीठ फारच ग्लोरीफाईड झाल आहे.
अशुद्ध असताना एवढे नको असलेले मिनरल आहेत तर..
3 Jul 2023 - 6:38 pm | मुक्त विहारि
मीठ फक्त चवी पुरतेच....
3 Jul 2023 - 6:56 pm | प्रचेतस
कालच ह्या मिठाच्या दगडांनी भरलेल्या दोन गाड्या आळेफाटा नगर रस्त्यावर दिसलेल्या होत्या, इथं पिंपरीत पण कायम असतात.
लहानपणी काळे मीठ चघळायला आवडत असे, त्याची बारीक पूड करून बडीशेपमध्ये टाकून खायला पण भारी लागे.
3 Jul 2023 - 8:24 pm | गवि
जिथे समुद्र नाही तिथे मजबुरी म्हणून हे वापरले जात आले आहे. सोडियम खेरीज अन्य क्लोराइड्स , सल्फाइड्स देखील असल्याने रंग वेगवेगळे. हायड्रोजन आणि सल्फाइडचा पादरट वास.
पण तरी चाट किंवा फ्रूट प्लेटवर चविष्ट.
यात एक गंमत आहे. अमुक हजार वर्षे जुने हिमालयातील सैंधव अशी प्रसिद्धी असलेले सैंधव एखादी कंपनी पॅक करून विकते आणि तिच्यावर काही महिन्यांची एक्सपायरी डेट छापते. कायद्यापुढे काय करणार?
3 Jul 2023 - 8:40 pm | Bhakti
4 Jul 2023 - 12:32 am | चित्रगुप्त
मिठाविषयी माहितीपूर्ण लेखन आवडले, अलेक्झांडरच्या घोड्याने चाटल्यामुळे या पर्वताची ओळख 'जगाला' झाली, ही माहिती प्रथमच कळली. बाकी पाश्चात्यांनी अलेक्झांडर, ज्युलियस सीझर, नेपोलियन, अकबर इत्यादिकांना 'ग्रेट' ठरवून शतकानुशतके सातत्याने तसा प्रचार केलेला असला, तरी अजुनही आपण त्यांची री ओढत रहाणे कितपत सयुक्तिक आहे, असा प्रश्न पडला आहे.
4 Jul 2023 - 6:31 am | कर्नलतपस्वी
चॉकलेटचा डोंगर शोधुन काढा ना!
आमचे आजोबा कंजूस आहेत. ते दररोज कॅडबरीची एकच वडी देतात
चाटायला.
आरारा... पुन्हा टंकाळ्याची मिश्टेक.
चाखायला म्हणायचं होतं.
(चॉकलेट वेडा भाचा )
4 Jul 2023 - 10:54 am | मुक्त विहारि
तुमच्या साठी एक लिंक पाठवतो ....
https://images.app.goo.gl/A5kTGWfXeTt5Ehfu7
4 Jul 2023 - 8:43 pm | चौथा कोनाडा
खारट्ट .... आय मीन नमकीन लेख.
सैंधव मीठ आज काल वापरात आहेच , पण त्याच्या खडकांचे फोटो ते ही ट्रक मधले पहिल्यांदाच पाहिले या पोस्ट मुळे.
धन्यू भक्ति !
4 Jul 2023 - 10:19 pm | इपित्तर इतिहासकार
मिठाचा महिमा अगाध आहे.
रोमन साम्राज्यात किंवा एकंदरीत प्राचीन इतिहासात मिठाला अनन्यसाधारण महत्व होते. इतके की रोमन फौजांत मीठ हे पगार म्हणून वाटले जाई. रोमन भाषेत मीठ म्हणवले जाई सॅलेरीयम , अन् ह्यावरून आलाय पगारासाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द "सॅलरी"
असाच इतिहास अभ्यास आवडतो आम्हाला म्हणून राहवले नाही लिहिणे.
- (नुसताच) इपित्तर इतिहासकार.
बाकी तो ट्रक ड्रायव्हर पूर्ण गृहस्थी सोबत घेऊन चालतो आहे का काय ह्या फिरतीवर असे वाटले तो वरती लटकवलेला नीळा ट्रक पाहून.
5 Jul 2023 - 7:08 am | Bhakti
वाह!नवी माहिती समजली.
येस वेशभूषेवरून तो ट्रकचा मालक भारत-पाकिस्तान सीमारेषावरील पंजाबचा वाटत होता त्याच्याबरोबर बायकोही होती.
5 Jul 2023 - 9:40 am | इपित्तर इतिहासकार
जगातील सगळ्यात कठीण लवण उर्फ मीठ व्यापार हा "ट्रान्स हिमालयन मिठाचा व्यापार" असे. (आजच्या) चीन मधील शिंजियांग (Xin Xiang) मधून, काशगर मधून वगैरे तिबेटियन व्यापाऱ्यांचे काफिले याक वर मिठाच्या गोणी लादून लडाख मध्ये उतरून तिथल्या वेगवेगळ्या valleys मध्ये ते विकत आणि बदल्यात जव, लोकर, अक्रोड, अक्रोडाच्या लाकडाचे गोठ, जर्दाळू वगैरे सामान परत घेऊन जात.
ते याक असेच काहीसे दिसत असतील.
5 Jul 2023 - 5:10 am | चौकस२१२
भारत या खडकांवर प्रकिया (शुद्धीकरण)करुन यांची निर्यात जगभर करतो.
हि प्रक्रिया नक्की काय असते? काही माहिती असेल तर नक्की द्या
5 Jul 2023 - 11:54 am | Bhakti
प्रक्रिया केवळ मोठे खडक मशीनने फोडून पावडर /क्रिस्टल बनवणे.आणि इतर दगड वगैरे गोष्टी काढून टाकणे.
5 Jul 2023 - 6:44 am | वामन देशमुख
पादेलोण, शेंदेलोण, शेंदेमीठ, सेंधा नमक, उपासाचं मीठ, काळं मीठ, रॉक् सॉल्ट् ... यांबद्धलचा हा लेख आवडला.
5 Jul 2023 - 12:08 pm | टर्मीनेटर
सैंधव मीठ हा पदार्थ चांगलाच परिचित असला तरी त्याविषयीची सामान्यज्ञानात भर टाकणारी माहिती असलेला हा छोटेखानी लेख आवडला, त्यावरचे प्रतिसादही छान आहेत.
अशाप्रकारे विकल्या जाणाऱ्या 'क्रुड' सैंधव/हिमालयीन मिठाच्या ह्या दगड धोंड्यांचा उपयोग प्रत्यक्ष सेवनासाठी किती जण करत असतील ह्याची मला कल्पना नाही पण घरगुती शेळी पालन करणारे मुस्लिम लोकं मात्र त्यांचा वापर करताना पाहिले आहेत. (व्यावसायिक गोट फार्मवाले करतात का हे माहिती नाही.) विविध वनस्पतींची पाने हा शेळ्यांचा नैसर्गिक आहार. ग्रामीण भागात तो सहजासहजी उपलब्ध होतो. पण शहरी/निमशहरी क्षेत्रातील मोहल्यांमध्ये घरगुती शेळी पालन करणाऱ्यांना तो रोज उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने ते गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्ये किंवा बाजारात तयार मिळणाऱ्या कोरड्या पशुखाद्याचा वापर करतात, ज्याच्या परिणामी बकऱ्यांना अपचनाचा त्रास होण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. त्यावर साधा सोपा घरगुती उपाय म्हणून एका घमेल्यात ह्या मिठाचा दगड ठेवतात. बकरे/बकऱ्याही हुशार असतात, कुठल्याही प्रशिक्षणाशिवायही त्या खाणे झाल्यावर जरुरी पुरता तो दगड चाटतात. ठेवलाय एवढा मोठा दगड म्हणून विनाकारण त्याला चाटत बसत नाहीत 😀
सैन्द्रिय पद्धतीने शेती करणारेही वनस्पतींची लोह, जस्त, सल्फेट आणि विशेषतः मॅग्नेशियमची गरज भागवण्यासाठी ह्या मिठाच्या सौम्य द्रावणाचा वापर करतात.
असो.. पाकिस्तानातले सैंधव/हिमालयीन/खेवडा मिठावरचा लेख तर छान झाला, आता पुढील लेखासाठी तुम्हाला 'हिंग' (Asafoetida) हा विषय सुचवतो. प्राचीन काळापासून भारतीयांच्या रोजच्या खाण्यातलया ह्या पदार्थाचे मूळ भारतात नसून ते मध्य आशियातील पूर्व इराण आणि अफगाणिस्तानात आहे 😇
5 Jul 2023 - 12:25 pm | प्रचेतस
माहितीपूर्ण प्रतिसाद.
हे तर अगदी अभयारण्यातही दिसते. जंगलात पाणवठ्यांजवळ हे सॉल्ट लिक ठेवलेले असते. ह्या विषयी माझ्या मेळघाटाविषयक एका धाग्यात लिहिले होते.
ह्याविषयी अधिक लिहा. कारण हिंगाचा उल्लेख हरिवंशात (खिलपर्वात) स्पष्टपणे येतो. अर्थात तेव्हा पूर्व इराण, अफगाणिस्तान हे तत्कालीन जंबूद्विपाचेच भाग असल्याने वर्णन येणे साहजिकच आहे.
5 Jul 2023 - 1:06 pm | टर्मीनेटर
'सॉल्ट लिक' बद्दलची माहिती रोचक आहे! लॉकडाउन काळातला असल्याने बहुतेक मेळघाटाविषयक हा सुंदर लेख माझ्या वाचनातुन निसटला असावा, तो ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने आज वाचायला मिळाला. खुप छान चित्रदर्शी लिहिलंय 👍
तुर्तास तो बॉल मी भक्तिंच्या कोर्टात टोलवला आहे, त्यामुळे त्यांना लिहु देत. (आणि त्यांनी लिहिण्याचे नाहीच मनावर घेतले तर मी त्या विषयाला हात घालीन 😀)
भागवत पुराणातही हिंगाचा उल्लेख आहे.
5 Jul 2023 - 1:38 pm | Bhakti
मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :)
आणि या लेखाचं श्रेय आमच्या ह्यांना जातं कारण रस्त्यावरून जाताना,"थांब थांब पाकिस्तानच मीठ घेऊ या"असं म्हणाले."काय आपण पाकिस्तानचं मीठ खातो?"
अशी माझी संभ्रम अवस्था झाली.
5 Jul 2023 - 3:11 pm | अहिरावण
>>>मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :)
लिंकवर क्लिक करा
https://www.sspandian.com/wp-content/uploads/2022/02/perungayam.jpg
किंवा
5 Jul 2023 - 2:09 pm | टर्मीनेटर
ह्याचा अर्थ तुम्ही हिंगावर लेख लिहिण्यासाठी केलेली सुचना/विनंती धुडकावताय असा घ्यायचा का 😂 😂 😂
5 Jul 2023 - 4:28 pm | Bhakti
हा हा ,

नाही तसं नाही.पण सध्या सौदीचे ओले खजूर पहिल्यांदा पाहिले,ते मोठ्या प्रमाणात कुठे मिळतेय त्याचा विचार सुरू आहे.डोक्यात खजूर आहे सध्या :)
तुम्ही हिंगाच मनावर घ्या.येऊ द्या मस्त लेख.
5 Jul 2023 - 4:50 pm | इपित्तर इतिहासकार
हे तुम्हाला सौदी मधून आले असतील तर भारीच.
पण असेच पिवळे अन् लाल खजूर (ओले) गुजरात मधून येतात. कच्छ भागात शेती होते त्यांची. कच्छी खारेक म्हणतात. खायला मधुर अन् तुरट असतात थोडे, घशात खवखवते जास्त खाल्ले तर. मजा असते एकंदरीत.
5 Jul 2023 - 4:38 pm | टर्मीनेटर
काय योगायोग आहे बघा... दहा-बारा दिवसांपुर्वी सौदीहुन परतलेल्या एका मित्राने तिथल्या बेस्ट क्वालीटीच्या खजुरांचा बॉक्स दिला होता. त्यातले बऱ्यापैकी आम्ही आषाढि एकादशीला खाउन संपवले होते, शेवटचे दोन-चार राहीले होते ते आत्ता मी गट्टम केले आणि तुम्ही इथे खजुरांचा विषय काढलात 😀
करतो मग आता प्रयत्न...
5 Jul 2023 - 5:14 pm | अथांग आकाश
वाह! नविन माहिती मिळाली!!

6 Jul 2023 - 9:49 pm | Bhakti
शेजारी धागा आहे.प्रतिसादानिमित्ताने त्यात लिहिलंय सारख धन्यवाद म्हणू नये ;)
सर्वांना एकत्रित धन्यवाद !
-भक्ती
7 Jul 2023 - 6:14 pm | चौथा कोनाडा
मला तर हिंगणे हे ग्राम नाम हिंगा वरून आलंय की काय असं वाटतं !
पुर्वी हिंगाचा वैगरे व्यापार असावा का तिथे ?