भाग १. https://www.misalpav.com/node/51032
भाग २ https://www.misalpav.com/node/51038
भाग ३ https://www.misalpav.com/node/51041
विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले. नित्याने जुन्या दिवसांची आठवण म्हणून आज दुसरे काही न आणता सरळ ओल्ड मंक आणली होती. ओल्ड मंकच्या त्या विशिष्ठ व्हॅनिला फ्लेवर चवीने त्या दिवशी मॅफिलीला एक वेगळाच रंग चढला होता. कॉलेजचे दिवस, तेव्हाचे पिण्याचे किस्से, गंमतीजमती, जे हॉस्टेलवर राहीले होते त्यांनी तिकडचे सांगितलेले किस्से यानेच मैफिल सजली. प्रत्येक गृपमधले असे काही ना काही किस्से असतातच की जे कधीही आणि कितीही वेळा ऊगाळले तरी जुने होत नाहीत, प्रत्येक वेळेस तेवढेच हसवतात. असे सगळे किस्से चालू असतानाच आनंदला हॉस्टेलवर आणि ईंजिनिअरींगला असतानाची फेमस असलेली चावट गाणी म्हणायची हुक्की आली. आनंद आणि अभिलापण अर्थातच ती गाणी तोंडपाठ होती. सगळे जण कोरस मधे चढ्या आवाजात गात होते. सगळेच जाम चेकाळले होते. अमोल मस्तपैकी चकणा खात या सगळ्यांची मजा बघत होता.
" च्यायला ह्या नित्याचा असली चावट गाणी म्हणतानाचा व्हिडीओ कोणीतरी एफबी वर टाकायला पाहिजे. कसला सोफेस्टिकेटेड असल्या सारखा वागत असतो कंपनी मधे आणि सोशल मिडियावर. याचं खरं रुप सगळ्यांना दाखवायला हवं."
" अरे ते कंपनीचं सोड, हा किती हरामी आहे हे तिथे किमान तरी चार पाच लोकांना माहित असेल. वहिनींना आणि सासरच्यांनी ह्याचे व्हिडिओ बघितले तर खरी मजा येईल. "
"पण वहिनी आणि बच्चे कंपनी आहे कुठे?"
" त्यांना दोन आठवड्यासाठी तिच्या माहेरी पाठवलं आहे. घर रिनोव्हेट करतोय. पंधरा दिवस तरी जातील. बेड, कपाटं सगळंच नविन करतोय. सोफा पण नविन ऑर्डर केलाय. पेंटींग पण करायचं आहे. मुलांना त्रास नको म्हणून सगळ्यांनाच तिकडं पाठवलं आहे. ऊद्या पासुन काम सुरु होईल. म्हणून म्हणलं आजचा दिवस रिकामा आहे तर एंजॉय करुन घेउ."
" अरे ईतकं चांगलं फर्निचर का बदलतोयस? हा सोफा तर सागवानचा दिसतोय!"
" सागवानचाच आहे. ओएलक्सवर टाकलाय कालच. एकबोटे मधून नविन ऑर्डर केलाय."
" सागवानचा सोफा विकून तू तो जंगली लाकडाचा तकलादू सोफा ऑर्डर केलास?"
"अरे तो होता बापाच्या लग्नातला. झाली त्याला आता चाळीस वर्षे. सगळं घर च्यायला जुनाट दिसतं नुस्ता. चार लोकं घरी येतात, बरं दिसत नाही आता. मी ईतक्या कलिग्सच्या, ज्युनिअर लोकांच्या घरी जातो, कसले मस्त ऐटीत राहतात ते. आपल्या घरी आल्यावर काय म्हणत असतील? आपल्या पगाराप्रमाणे, पोझिशन प्रमाणे राहणीमान पण ठेवावं लागतं ना. शिवाय आत्ता हौसमौज नाही करणार तर कधी करणार? तुला सांगून काय फायदा म्हणा, तुझं निम्मं आयुष्य तर भाड्याने राहण्यात गेलं. स्वतःचं सुंदर सजवलेलं घर असणं यातली मजा तुला काय कळणार? "
" बरोबर आहे" म्हणत अभ्याने विषय थांबवला.
पार्टी संपल्यावर आनंद, अमोल आणि अभि तिघेच पान खायला बाहेर पडले. पान घेऊन निवांत गाडीत येऊन बसल्यावर अमोलने हळूच अभ्याला डिवचलं " बोला देसाई, बोलून टाका मनातलं"
" काय?"
" बोल रे, मला माहित आहे, तुला नित्याने नविन फर्निचर करायला घेतलं ते पटलं नाही. तुला बोलायचं होतं पण तिथे त्याला वाईट वाटायला नको म्हणून जास्त काही बोलला नाहीस."
" मला पटलं नाही असे नाही. त्याने ज्या कारणाने ते करायला घेतलं ते नाही पटलं."
" काय हौसमौज कधी करायची हे?"
" नाही. चार माणसं काय म्हणतील हे!"
" असू दे रे. त्यात काय एवढं. ऐपत वाढली की राहणीमान चांगलं असावं असं वाटतं एकेकाला. असते हौसमौज. नुस्ता पैसा पैसा करत, बँकबॅलन्स बघत आयुष्य काढायचं का? आयुष्यात मजा तरी कधी करायची?'
" मी कधी म्हणालो, हौसमौज करु नका, मजा करु नका, मन मारुन जगा? ऊलट मीच कायम म्हणतो एकांगी आयुष्य जगू नये, लाईफ बॅलन्स्ड असावी. "
" मग काय तर! च्यायला रिटायरमेंट वगैरे साठी आयुष्यभर दमडी दमडी साठवत रहायचं आणि त्या आधीच गचकलो किंवा त्या वेळेस जर मजा करायच्या कंडिशन मधेच नसलो तर काय ऊपयोग त्या पैशाचा? मला तर आजिबातच पटत नाही ते. "
" ते तर आहेच रे. तो चंद्रशेखर गोखले म्हणतो तसं
मरताना वाटलं
आयुष्य नुसताच वाहून गेलं
मला जगायचंय मला जगायचंय म्हणताना
जगायचंच राहून गेलं
असं नको व्हायला."
" येस्स मला पण असंच वाटतं. साला मरताना रिग्रेट नाय पाहीजे आयुष्यात"
" मग तुला सगळं आमच्यासारखंच वाटतं तर तू असा का चेंगटपणा करुन, मन मारून का राहतोस? ना चांगले कपडे, ना मोबाईल, ना गाड्या?"
" तुला कोणी सांगितलं मी मन मारुन जगतो? हौसमौज करत नाही? मी मला हवी ती हौसमौज भरपुर करतो. तुमच्या पेक्षा जास्त करतो."
" वाटत तर नाही तसं..."
" कारण मी हौसमौज माझ्या पद्धतीने करतो, ती कशी करायची ते मी माझ्या पुरतं ठरवलं आहे."
" म्हणजे कशी?"
" सगळे जण कायम म्हणतात ना की चार लोक काय म्हणतील? त्या चार लोकांना मी फाट्यावर मारलं आहे. मी आजिब्बात पर्वा करत नाही, की लोक काय म्हणतात. जे जे चार लोकांत बरे दिसावे म्हणून करावे लागते ते मी आज्जिबात करत नाही. मी फक्त तीच हौस करतो जी माझी स्वतःची आहे"
" आम्हाला अजूनही नाही कळलं."
" सांगतो. माझा मुलगा चार महिने मागे लागला आहे की त्याला गिअरची सायकल हवी आहे. का? तर त्याच्या सगळ्या मित्रांकडे ती आहे. हे सगळे सोसायटीच्या सपाट , ना चढ ना ऊतार असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवतात. ह्यांना गिअरची सायकल कशाला लागते? पण एकाने घेतली की दुसर्याच्या मनात ईर्ष्या निर्माण होते मग तो पण त्यापेक्षा भारी काही तरी आणतो, मग अजून एक मग दुसरा, असं करत करत ती गोष्ट सगळ्यांकडे आली की एखाद्या कडे नसेल तर त्याला पण ती घ्यायची ईच्छा निर्माण होते. याला पिअर प्रेशर म्हणता येईल. खरं तर त्यातल्या एकालाही तेवढ्या भारी सायकलची गरज नसते. पण तरी सगळे घेतात. "
" याचा आपल्या विषयाशी काय संबंध?"
" आहे ना. मोठे पण फार वेगळे नसतात रे. एकाने आयफोन घेतला की दुसर्याला पण घ्यावासा वाटतो. एकाने भारी टिव्ही घेतला की दुसर्याला पण तो हवा हवासा वाटतो. एकाने धूमधडाक्यात लग्न केलं की आपल्याला पण करायचं असतं. कपडे, गाड्या, घर, फर्निचर, लग्न, वाढदिवस, ट्रिप्स..... काय विचारु नकोस. आपल्याला सगळं दुसर्या पेक्षा भारी करायचं असतं. आपल्या मनातली ही जी ईर्ष्या असते ना ती सगळ्याचे कारण असते. कधी कधी ईर्ष्या नसते पण ऊगाच नविन गोष्टी घ्यायची ईच्छा असते. कोणी विचारच करत नाही की ही गोष्ट खरेच मला हवी आहे का? मला गरज आहे का? की फक्त आजूबाजूच्या चार लोकांकडे आहे, त्यांनी केली आहे म्हणून मला करायची आहे? मी जे काही करत आहे ती माझी स्वतःचीच हौस आहे का? मी एखादी गोष्ट फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून घेतोय का, करतोय का?
आपण हौसेला मोल नसतं वगैरे डायलॉग मारुन स्वतःची दिशाभूल करत असतो. हौसेच्या नावाखाली काय काय करत असतात लोक.... त्यातली त्यांची स्वतःची हौस किती आणि समाजाने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे लादलेली हौस किती, पिअर प्रेशर किती हे त्यांना माहित तरी आहे की नाही देव जाणे. "
" मग काय करायचं? आपली हौस कुठली? काय करायचं आणि काय नाही हे कोण ठरवणार? कशाच्या आधारावर ठरवणार?"
"आपणच ठरवायचं. हे सगळं प्रत्येक व्यक्ती प्रमाणे बदलणार, एकाला ज्या गोष्टीची हौस असेल त्याची दुसर्याला असेलच असे नाही. मला कशाची हौस आहे आणि ती किती करायची हे ठरवण्याचा माझा पहिला क्रायटेरिया साधा सरळ आहे. जी गोष्ट तुम्हाला दुसर्या कोणाला दाखवायला, सांगायला, जगातल्या कोणासमोरच फुशारकीने सांगायला परवानगी नसेल आणि तरी ती तुम्हाला करावीशी वाटेल ती तुमची स्वतःची हौस. ती गोष्ट करताना, वापरताना तुम्हाला मनापासून आनंद झाला पाहिजे. तुमचा आनंद दुसर्याच्या प्रतिक्रियेवर अवलंबून नसावा. "
" तू म्हणालास की हा तुझा पहिला क्रायटेरिया आहे. मग अजून किती आणि कोणते तेही सांग आता. ईतका वेळ बोअर केलंच आहेस तर अजून थोडं कर, म्हणजे आजचा तुझा बोअर करायचा कोटा संपून जाईल आणि बाकीचे त्यातून सुटतिल. " आनंदने उगीचंच मधेच अभिला एक टोमणा मारुन घेतला. अभ्याने तो हसण्यावारी घालवून पुढे सांगायला सुरुवात केली.
" मला ईच्छा नव्हती तुम्हाला अजून बोअर करायची, पण आता तुम्ही डिवचलंच आहात तर ऐकाच. मुख्य क्रायटेरिया तीनच आहेत. बाकी दोन चार पोटनियम आहेत. पण मुख्य क्रायटेरिया तीनच. त्यातला दुसरा क्रायटेरीया, हौस या गोष्टीवर किती खर्च करायचा हा. आपल्या टोटल इन्कम पैकी किती टक्के रक्कम हौस या गोष्टीवर खर्च करायची हे आधीच ठरवायचे आणि तेवढीच रक्कम त्यावर खर्च करायची. जसं आपण म्हणतो ना नुस्ताच पैसा पैसा करत कंजूषपणे जगायचं नाही. तसंच हे ही खरे आहे की आलेला सगळा पैसा ऊधळून म्हातारपणी कोणावर तरी अवलंबून रहायची वेळ पण येऊ द्यायची नाही. दोन्ही करायचं. मजा पण करायची आणि भविष्याची सोय पण करुन ठेवायची."
" आणि तिसरा क्रायटेरिया?"
" ऋण काढून सण नाही करायचा. जो पैसा आपल्या कडे नाही, भविष्यात येणार आहे त्या पैशाने हौस करायही नाही. थोडक्यात काय तर हौसेसाठी कर्ज काढायचे नाही. लोक काय वाट्टेल त्या गोष्टींसाठी कर्ज काढतात रे. मी तर काही काही येडे असे बघितले आहेत जे हौस म्हणून गाडीसारखी गोष्ट पण कर्जावर घेतात" अभ्याने आनंद कडे बघत शेवटच्या वाक्यावर जोर देत, डोळे मिचकावत मगाचच्या जोकचा वचपा त्याने कर्ज काढून घेतलेल्या महिंद्रा थार वरुन टोमणा मारुन परतवला.
" बरं चला निघा मग आता तुमच्या तुमच्या त्या डबड्या अॅक्टिव्हा वरुन. मला उद्या सकाळी कामावर जायचं आहे. तुमच्या सारखा रिकाम टेकडा नाहीये मी. "
आनंद गेला तरी अमोलच्या डोक्यातून आधी चालू असलेला विषय काही जात नव्हता.
"अभ्या, मगाशी तू म्हणालास की ईन्कमच्या काही टक्केच रक्कम हौसमौज करायला वापरायची. पण नक्की किती? हे ठरवायचं कसं?"
" असं नाही सांगता येत रे. हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं. असं एकच प्रमाण सगळ्यांसाठी असं नाही करता येणार. पण आपण जे काही ठरवू त्यातच होईल तेवढीच ऐश करायची. जर मी म्हणालो त्या प्रमाणे लोकांना फाट्यावर मारून फक्त आपल्या स्वतःच्या मता प्रमाणे हौस मौज केली तर अगदी कमी पैशात पण छान आणि व्यवस्थित हौसमौज होते. कारण तुम्ही तुमच्याकडचे पैसे सतराशे साठ गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी महत्वाच्या अशा मोजक्या गोष्टींवर खर्च करता."
" हं. बरोबर"
" मला पण माझं प्रमाण ठरवायला हवं."
" ते ठरव. बाकी सगळं नंतर भेटलो की बोलू. मला लेट झाला आता."
" थांब जरा, एका प्रश्नाचे उत्तर राहिलं आहे, फार दिवस तुला विचारेन विचारेन म्हणत होतो. आज नित्या तुला भाड्याने राहण्याविषयी बोलला. तुला गृपमधले सगळेच कधी ना कधी या विषयी बोलले आहेत. प्रत्येकाला हा प्रश्न आहेच की तू भाड्याने का राहतो? तुझ्याकडे पैसे तर काही कमी नाहीत आणि कोणतीही बँक तुला अगदी सहज लोन देईल. मग तू स्वतःचे घर का घेत नाही. "
अभि हसला. बोलू की नको, नेहमी सारखा हा विषय टाळावा का, याचा काही क्षण विचार करुन त्याने सांगायला सुरुवात केली.
" घर विकत घेणं हे माझ्या आर्थिक प्रगती मधली खोड ठरु शकतं म्हणून....
आपण सगळेच घर या गोष्टीशी भावनिकरित्या जोडलेले असतो. प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यात घर ही एक चांगली गुंतवणूक असते, रिअल ईस्टेटचे रेट कायम वाढत असतात असेही आपल्या मनावर ठसलेलं असतं, त्यामुळे सगळे जण घर घ्यायच्या मागे असतात. पण माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अॅसेट नसून लाएबिलिटी असते. तुला हे सगळं ऐकताना आश्चर्य वाटत असेल. पण स्टेप बाय स्टेप विचार करु.
सगळ्यात आधी रिटर्न्स. आपण जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा लाँग टर्म मधे बघितलं तर साधारणतः त्याचे रेट वार्षिक ६-९ टक्क्याने वाढतात. त्यापेक्षा जास्त रिटर्न देणारे अनेक मार्ग मार्केटमधे उपलब्ध आहेत. शिवाय जर ईन्फ्लेशन, आपण बँकेला भरलेलं व्याज कन्सिडर केलं तर तो रिटर्न अतिशय कमी येईल. त्यामुळे राहता फ्लॅट ही काही चांगली गुंतवणूक नाही.
दुसरा विचार करु रेंटल यील्डचा. म्हणजे तुला किती गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो. आपल्या ईथे साधारण एक कोटीच्या फ्लॅट वर २० ते २२ हजार भाडे मिळते. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटी चार्जेस वगैरे सोडले तर वर्षाला साधारण अडीच लाख धरू या. मग त्याचा रेंटल यील्ड २.५% झाला. मी जर याच पैशाचे दुकान घेतले तर मला हाच रेंटल यील्ड ५ ते ६ टक्के मिळतो. मी एखाद्या डिमांड असलेल्या ठिकाणी थोडी जागा घेतली आणि तिथे बांधकाम करुन ते फ्लॅट्स भाड्याने दिले तरी साधारण ५ ते ६% रेंटल यील्ड मिळतो. म्हणजे तिथेही फ्लॅट हा चांगला पर्याय नाही.
आता तिसरा विचार opportunity costचा.
आधी कर्जावर घेतलेल्या फ्लॅटचा विचार करु. कॅल्क्युलेशनसाठी १ कोटीचा फ्लॅट घेऊ. फ्लॅट घेताना मला २०% डाऊन पेमेंट करावे लागणार. म्हणजे २० लाख. त्यानंतर मला महिन्याला कमीत कमी ७० ते ८० हजार हफ्ता पडणार. ते कर्ज कायम माझ्या मानगुटीवर टांगती तलवार राहणार. मला काही करुन ते फेडत रहावे लागणार. मी २० हजार भाडे दिले तर हेच २० लाख मी चांगल्या फंड मधे गुंतवून, ५० ते ६० हजार रुपयाची SIP करु शकतो. यावर अगदी १०% रिटर्न जरी धरला तरी मला २० वर्षात ७-८ कोटी मिळतील. किंवा सरळ एखाद्या Debt fund मधे पैसे पार्क करुन ठेवले आणि मधे अधे जर कुठे चांगली संधी/ जागा उपल्ब्ध झाली तर तिथेही गुंतवणूक करता येऊ शकते.
किंवा हेच २० लाख मी व्यवसाय सुरु करण्या साठी वापरु शकतो. त्यातून येणारे ईन्कम मी अजून कुठे तरी गुंतवू शकतो, ज्यातून अजून जास्त रिटर्न मिळू शकतात. महिन्याला जो हफ्ता जाणार होता त्यातून पण अजून गुंतवणूक करता येते. फ्लॅट लोन वर घतला की मी त्याला बांधील असतो, अडकून पडतो. फ्लॅट लोन वर विकत घेतला की मला त्या फ्लॅट साठी काम करावे लागणार, तो माझ्यासाठी काम नाही करणार. आणि एवढे करुन मला रिटर्न पण अगदी इन्फ्लेशनला कट टू कट बीट करणारे मिळणार.
आता समज दुसरी केस की ज्यात माझ्या कडे एक रकमी एक कोटी तयार आहेत ज्यातुन मी फ्लॅट घेणार आहे. तर मगाशी सांगितलं तसं रेंटल यील्ड जास्त मिळेल अशा ठिकाणी मी ते पैसे गुंतवू शकतो. मी फ्लॅट ऐवजी एक दुकान किंवा ऑफिस घेतले आणि ते भाड्याने दिले तर मला ४० ते ५० हजार भाडे मिळेल, माझे २० हजार घरभाडे वजा करुन वर जे पैसे राहतील ते मी परत अनेक प्रकारे गुंतवू शकतो. किंवा त्या एक कोटीमधे काही गुंठे जागा घेऊन ठेऊ शकतो. पुढे त्या भागात डेव्हलपमेंट आली की तिथे बांधकाम करुन ते विकून चांगले पैसे मिळू शकतात, किंवा भाड्याने दिले तर रेग्युलर ईन्कम पण मिळू शकते, जे म्हातारपणी माझे हात पाय थकल्यावर मला उपयोगी पडेल.
हे सगळे अगदी छोटे छोटे कमी रिस्क असलेले पर्याय आहेत. जरा हात पाय मारत राहिलो आणि जास्त रिस्क घ्यायची तयारी असेल तर काय पैसा बनवता येतो माहितीए....
आपण फ्लॅट घेताना opportunity costचा विचारच करत नाही.
तुला खोटे वाटतील असे माझ्या आयुष्यातले किस्से मी तुला सांगू शकतो. बाबांच्या रिअल ईस्टेटच्या कॉन्टॅक्टसचा मला फार फायदा झाला. ते नसते तर दुसर्या
कोणासोबत तरी चांगले रिलेशन बनवायला लागले असते. सात वर्षापुर्वी एका एजंटने एक डिल आणलं होतं. त्याच्या कडे एक फ्लॅट आला होता. त्या माणसाला एक दोन आठवड्यात फ्लॅट विकून US ला परत जायचं होतं. विनितने स्वतः कागदपत्रं बघितली होती, सगळी कागदपत्रं क्लिअर होती. त्या मालकाला घाई होती, थोडेफार कमी पैसे मिळाले असते तरी फरक पडत नव्हता. मी दहा दिवसाची कमिटमेंट देऊन व्यवहार पुर्ण केला. ६८ लाखात फ्लॅट घेऊन मी तो सात महिन्यात रंगरंगोटी करुन ८५ लाखाला विकून टाकला. सात महिन्यात सगळे खर्च सोडून साडेतेरा लाख सुटले. परत २०१८ मधे बाबांच्या ओळखीने अजून एक डिल आलं होतं. एक बिल्डर होता त्याला एक प्लॉट घ्यायचा होता सव्वा कोटी कमी पडत होते. त्याच्या कडून एक फ्लॅट मार्केट रेट पेक्षा २३ टक्क्यांनी कमी मधे लिहून घेतला. सव्वा कोटी लगेच दिले आणि पन्नास नंतर. साडेतीन वर्षानी तोच फ्लॅट तयार झाल्यावर मी दोन कोटी ५७ लाखाला विकला. कोव्हिडमधे जेव्हा शेअर मार्केट पडले होते तेव्हा एक रकमी ३५ लाख ईंडेक्स फंड मधे टाकले पंधरा की सतरा महिन्यात पैसे दुप्पट झाले. भांडवल काढून घेतलं, जो नफा झाला त्याचे युनिट्स तसेच आहेत. ते वाढत जातील त्याचा हिशोब वेगळाच. असे अजून कमीत कमी सहा सात व्यवहार वेगवेगळे केले मी या बारा वर्षात.
सगळेच व्यवहार फायद्यात गेले असेही नाही. मा्गे डिपी रोडला ६७ लााखात एक दुकान घेतलं होतं, आठ महिन्यांनी नऊ लाख लॅास घेऊन विकावं लागलं. एक बागायती शेत जमिन घेतली होती पंधरा लाख रूपये एकराने, ती साडे दहा लाखात सोडावी लागली. एका कॅालेजच्या मित्रासोबत मिळून एका हॅाटेलमधे ३७ लाख गुंतवले होते. ते पुर्ण बुडाले. चालायचंच. तरी या बारा वर्षात माझं भांडवल पाच पट झालं.
आपण रहायला फ्लॅट घेऊन आपल्या हातातले खेळते भांडवल घालवतो. शिवाय आपली रिस्क टेकिंग कॅपॅसिटी एकदम कमी करतो. मी जर एक फ्लॅट घेऊन, त्यात राहून तो सजवत बसलो असतो तर हे सगळं कसं झालं असतं?
पण हे सगळं झालं माझ्या सारख्या व्यक्तिसाठी, जो अकाउंटला कितीही पैसे असले तरी शांतपणे त्यातली दमडीही वायफळ खर्च न करता, योग्य संधीची वाट बघत बसू शकतो. पण ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही आणि हातात असलेल्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा हे माहित नसेल त्यांच्या साठी फ्लॅट घेणेच योग्य. उगीच नको त्या गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा निदान ते तरी बरे. "
" च्यायला अभ्या एवढा विचार तर मी बापजन्मी सुद्धा केला नसता.... पण तुला तुझ्या बापाच्या कॉन्टॅक्टसचा फायदा झाला सगळ्यांनाच होईल असे नाही. शिवाय ईतक्या मोठ्या रकमा प्रत्येकाच्या आवाक्यात पण नसतात रे."
" कॉन्टॅक्ट्सचं काय रे तयार करता येतात. बाबांचे कॉन्टॅक्ट्स सोडून मी माझे स्वतःचे पण भरपूर तयार केले. जरा हात ढिला ठेवावा लगतो. वेगवेगळ्या लोकांवर मी आज पर्यंत सात ते आठ लाख खर्च केले आहेत. गिफ्ट्स, बाटल्या, पार्ट्या....
आणि भांडवलाचे म्हणशील तर, आपल्या पैकी प्रत्येकाने लग्नात पंधरा वीस लाखाचा खर्च केला, दारात पाच ते पंधरा लाखाची कार ऊभी आहे, खिशात पन्नास साठ हजाराचे मोबाईल आहेत, घर घेताना दहा ते वीस लाखाच्या मधे डाऊन पेमेंट केले आहेत, वीस ते पन्नस हजार हफ्ता भरतात, बायकांकडे दहा वीस तोळे सोने आहे, घरात पाच दहा लाखाचे फर्निचर आहे, लाख दोन लाखाचे टिव्ही- म्युझिक सिस्टीम आहेत. काढ हिशोब....
हे सगळे भांडवल आहे, जे तुम्ही कुजवत बसला आहात. मी हे सगळं बोललो की लोक म्हणतात मग काय सन्याशासारख जगायचं का? हौसमौज कधी करायची? ऐश कधी करायची? हौस मौज करावी रे, पण त्यापायी जर तुम्ही स्वतःचे स्वातंत्र्य गमवून बसला असाल, तर विचार करा की त्याची गरज आहे का आणि तुम्ही जे हौस म्हणून करताय ती खरेच तुमची आहे का? दुसर्याने कोणी तरी आपल्याला भारी म्हणावं, दुसरं कोणीतरी ईंप्रेस व्हावं म्हणून भांडवल घालवून वस्तू कशाला गोळा करायच्या आणि आपले स्वातं त्र्य आर्थिक प्रगतीची संधी घालवून बसायचे. हे सगळे माझ्या डोक्याच्या बाहेरचे आहे?
आणि ज्यांचे आपल्याकडे असलेल्या वस्तुंवरुन, बाह्यरुपावरुन आपल्याशी असलेले वागणे. बदलते किंवा त्यावरुन जे आपल्याला जज करतात असे लोक हवेतच कशाला आयुष्यात? नसलेलेच बरे......."
" खरंय, आता घरी जाऊन काय काय विकून भांडवल तयार करता येतंय बघतो" अमोल स्टँडवरून गाडी काढत हसत हसत उत्तरला
प्रतिक्रिया
26 Jan 2023 - 6:56 pm | सुखी
छान चालू आहे लेखमाला
26 Jan 2023 - 9:53 pm | कर्नलतपस्वी
सबसे बडा रोग
क्या कहेंगे लोग
ही जर गोष्ट समजली तर बऱ्याच गोष्टी सहज सुलभ होतात.
तसेच, अंथरूण पाहून पाय पसरावे ही पण गोष्ट समजली पाहीजे.
रिण काढून सण कशाला करायचे हा जुना विचार झाला.
माझ्यापुरते बोलायचे झाले तर शून्यातून सुरवात आसल्या मुळे सर्व सण रिण करूनच करावे लागले. पण कर्ज काढताना अंथरूणाचा नेहमीच विचार केला.
पहिली गाडी कर्ज काढूनच घेतली. सहकारी म्हणाले एवढी काय जरूर आहे,माझा विचार मांडला,जर सेव्हिंग खर्च केले तर इमर्जन्सी मधे मोठी रक्कम कुठून उभी करणार. कर्जावरचे व्याज व सेव्हिंग मधले व्याज जर गणीत केले तर फक्त, दोन टक्के व्याजाने मोठी रक्कम मिळते, इमर्जन्सी साठी पैसे तयार व हौसही भागली.
शिवाय म्हातारपणात गाडी घेतली तर मुले,जावई सुना चालवणार. बाबा तुम्ही मागे बसा म्हणणार.
सहकार्मचार्यानां पटले व पुढच्याच महिन्यात सात आठ गाड्या हापिसात उभ्या राहू लागल्या.
माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अॅसेट नसून लाएबिलिटी असते.
काही अंशी सहमत पण तरीसुद्धा या करता वेगळेच तर्क दिले तर कदाचित लेखातला हिरो कर्ज काढायला तयार होईल.
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे.
घराची जबाबदारी उचलताना सर्वाचा विचार करावा लागतो आपली मते थोपल्यास बाकीच्यांची घुसमट होते.
पैसे कमवा पण पैशाचे झाड लावून पुढच्या पिढीला आळशी बनवू नका. झाडाचे प्रजोत्पादन दिवस संपले की पुढची पिढी रस्त्यावर येऊ शकते.
पूत सपूत तो क्या धन सिंचे
पूत कपूत तो क्या धन सिंचे
सुवर्णमध्य काढून मस्त जगा...
कविवर्य बोरकर म्हणतात,
तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे
रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना
नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना
त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे
कर्नल तपस्वी म्हणतात,
म्हणून म्हणतो.......
जीव आहे तोवर जगून घ्या
डोळे आहेत तोवर बघून घ्या
काय माहिती.......
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल ?
मेल्यावर काय होईल त्याच उत्तर
मेल्या शिवाय कळणार नाही
म्हणून म्हणतो.....
इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही
येणारा दिवस जगून घ्या
काय माहिती....
देवदूत येतील का यमदूत नेतील
पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील
म्हणून म्हणतो.......
आजच्या करता जगा
उद्याचा विचार फार करू नका...
तुलसीदास म्हणतात,
पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर
तुलसी चिंता क्यू करे तू भज ले रघुवीर
याचाही विचार करावा. म्हणणे एवढेच की प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नाही हे ही तेवढेच खरे.
लेख चांगला आहे. विषय उत्तम रितीने वाचकांपर्यंत पोहचला आहे.
27 Jan 2023 - 12:34 am | सुक्या
लेखमाला सुंदर आहे. आर्थिक गणित कसे बसवावे याचा सुंदर उहापोह...
27 Jan 2023 - 10:44 am | श्वेता व्यास
छान चालू आहे लेखमाला, अभ्याचे विचार पटण्यासारखे आहेत.
27 Jan 2023 - 10:58 am | शित्रेउमेश
खूपच सुन्दर लेखमाला....
28 Jan 2023 - 4:34 pm | टर्मीनेटर
वाचतोय... छान सुरु आहे मालिका!
अभ्याचे काही विचार पटले, काही नाही पटले... पण ते चालायचेच. वरती कर्नल साहेबांनी लिहिलंच आहे की,
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
29 Jan 2023 - 8:58 am | nutanm
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!
29 Jan 2023 - 8:58 am | nutanm
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!