अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Sep 2022 - 4:30 pm

१. एक प्रेमपत्र

२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

६. अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

७. अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं

१७ सप्टेंबर २०२२

✪ "ओह! मी किती क्युट होते रे!"
✪ ते छोटं बाळ कुठे गेलं! ए वक़्त रूक जा, थम जा ठहर जा वापस जरा दौड़ पीछे!
✪ उत्तराखंडमधल्या गमती आणि दिल्लीवरून परतीचा प्रवास
✪ मी जगातली सगळ्यांत लकी मुलगी आहे!
✪ शाळेत जाताना स्वागत करणारी फुलं!
✪ ना शेरवा का डर, ना बाघवा का डर, डर त डर टिपटिपवा का डर!
✪ मस्ती आणि मज्जा

प्रिय अदू, हा तुझा आठवा वाढदिवस!! अदू, आता तू चक्क आठ वर्षांची झालीस! म्हणजे आमच्या पिढीच्या दृष्टीने सांगायचं तर कुछ कुछ होता है मधल्या छोट्या अंजलीएवढी झालीस! तुझा एक फोटोही पाहा अगदी तसाच होता! प्रत्येक वर्षाच्या किती तरी आठवणी‌ आहेत. पण आता हे आठ वर्षं पूर्ण झाल्याचं खूप जाणवतंय! आणि राहून राहून त्या छोट्या बाळाची- इवल्याशा अदूची आठवण येतेय- ते बाळ जे सरपटत सरपटत एका खोलीतून दुस-या खोलीत जायचं, जे खूप गोड आवाजात किंचाळी फोडायचं, जे कडेवर घ्यायला खूप हलकं होतं, जे कडेवर येऊन मला बरोबर खांद्यावर चावायचं, चित्कारून हसायचं, माझ्याशी खूप खेळायचं आणि हो ते बाळ दुपारी झोपायचं सुद्धा! कधी तर कडेवरही झोपायचं! अगदी गेल्या वर्षापर्यंत तू छोट्या बाळासारखी रांगत रांगत खोलीत यायचीस. तुला कडेवर घेता यायचं. आता तुला कडेवर जवळ जवळ घेता येतच नाही. आणि आता तू मलाही ढकलू शकतेस, पाडू शकतेस अशी मोठी झाली आहेस!

आणि अदू, एकदा तुला लॅपटॉपवर तुझेच लहानपणीचे फोटो दाखवले तर तुला किती आनंद झाला! तू लगेच म्हणालीस, ओह, निनू, मी इतकी क्युट होते! राहून राहून त्या बाळाच्या आठवणी येतात. ज्याने मला गोष्टी सांगायला शिकवलं, खेळवायला शिकवलं, वेगवेगळे आवाज काढायला शिकवलं. जे बाळ इतकं गोड होतं की नुसतं माझ्या शर्टाच्या बटनामुळे आनंदित व्हायचं! उडणा-या पक्षाकडे बघून हसायचं! त्या बाळाला मी फार मिस करतो. आताही तू तितकीच गोड आहेस. पण त्या लहानपणाची मजा खूप वेगळी होती! त्यावेळचं तुझं आनंदाने ओरडणं! तू अक्षरश: आनंदाने शक्ती लावून हसायचीस आणि रडू यायचं तेव्हा ते तुझं ध्यान असायचं!

थांबणं हा जीवनाचा स्वभाव नाहीय! जे आहे ते पुढे जाणार आहे. आत्ता आहे ती अवस्था बदलणार आहे! गती हाच निसर्गाचा नियम आहे! त्यामुळे तुला असं लहान तो ठेवणार नाहीय. पण तरी मनामध्ये तुझं लहानपण सतत आठवत राहातं आणि हवंहवंसं वाटतं. तुझ्यासोबत केलेली मस्ती, काढलेले आवाज, तुझं खाल्लेलं जंगल आणि शेंडी! आणि हो, लक्षात ठेव ती शेंडी माझीच आहे आणि तुझ्याकडे फक्त सांभाळायला दिली आहे! तसंच तू घेतलेली टमडी, टमकडी, ब्याऊ, पाबई अशी नावं आणि मला दिलेली टोमड्या, ब्याऊ, निनू अशी नावं! आणि तू मला दिलेलं- सध्या ट्रेंडिंग असलेलं नाव- टॉइंड्या! ही नावं लिहीणंही किती गमतीदार आहे! हे सगळं बघून खरंच वाटतं की, ए वक़्त रूक जा, थम जा ठहर जा, वापस जरा दौड़ पीछे! मला समाधान एका गोष्टीचं आहे की, प्रत्येक वर्षामधील असंख्य गोड गोड आठवणी मी तुझ्या दर वर्षीच्या पत्रात लिहून ठेवल्या आहेत! आणि अर्थात् माझ्या फोटोग्राफिक स्मृतीमध्ये त्या सदैव लाईव्ह आहेतच! आणि आपण एवढी मजा करतो की ती पुढेही आपण करतच राहणार आहोत!


उत्तराखंड आणि दिल्लीचा अविस्मरणीय प्रवास

गेल्या वर्षात आपण खूप गमती- जमती केल्या. गेल्या वाढदिवसाच्या वेळेस तू शाळा सुरू नसल्यामुळे खूप नाराज होतीस. तुझी नवीन केंद्रीय विद्यालय शाळा सुरू झाली होती, पण ऑनलाईन शाळेचा तुला कंटाळा आला होता. कार्टून बघत, आर्टस आणि क्राफ्ट करत तू स्वत:चं मनोरंजन करायचीस. कधी तुझ्या फ्रेंडसना- भाऊ- बहिणींना व्हॉईस मॅसेजेस करायचीस. आपण मिळूनही कधी गोष्टी बनवायचो. ऑक्टोबरमध्ये मात्र खूप मजा आली. आपण १५ दिवसांसाठी उत्तराखंडला- पिथौरागढ़ला गेलो होतो. आणि तू तर आम्ही परत आल्यानंतरही बर्फ बघण्यासाठी थांबलीस! आणि तिथे असतानाही आम्ही गूंजीला गेलो होतो तेव्हा काही दिवस आमच्यापासून लांब राहिलीस. बुंगाछीना, सत्गड़ आणि बस्तडीमध्ये घालवलेले तुझे दिवस मात्र खरोखर खूप स्पेशल होते! हिमालयामध्ये गावातलं शेत, खूप सारे भाऊ- बहिणी- मावश्या- आजी- आजोबा आणि कल्लू- भोटू हे मोठे भ्याऊ आणि खूsssप बक-या, झाडं, सगळीकडे पर्वत अशा गोष्टींची मजा तू घेतली होतीस! मला आठवतंय सत्गडमध्ये गच्चीवर तुला पहिल्यांदा क्रिकेट नीट खेळता आलं होतं! आणि आपण नंतर बुंगाछीनामध्ये एक छोटा ट्रेकही केला होता. त्यामध्येही तुला थोडा वेळ कडेवर घ्यावं लागलं होतं! आणि सत्गडलाही पाय-या चढताना अनेकदा तू चाललीस आणि एकदा त्या चढाच्या वाटेवरसुद्धा मी तुला कडेवर घेऊ शकल्याचा आनंद झाला होता. अशी आपण खूप खूप मजा केली होती! आणि तू तर आमच्यापेक्षाही जास्त मजा केलीस. कारण तू पुढे महिनाभर राहिली होतीस! आणि तुला कळत होतं की, किती वेगळ्या गोष्टी तुला अनुभवता येत आहेत! तुला करमणार अशा अनेक गोष्टी असल्या तरी तू इतकी लहान होतीस की, तुला रडूही येणं खूप स्वाभाविक होतं. पण तिथेही तू फार अशी रडली नाहीस. तेव्हाही आम्ही सोडून आलो तेव्हा आम्हांला बाय करून झाल्यानंतर मात्र तुला आलेलं रडू, नंतर अगदी कडक थंडीमध्येही परत रमलेली तू आणि ओमीक्रॉनच्या सावटामुळे मी तुला आणायचं ठरवलं तेव्हाही रडलेली तू! बर्फ पडण्याच्या काही दिवस आधीच तुला आणावं लागलं.

तुला घेऊन केलेला दिल्ली ते परभणी प्रवास! तू तर मावशीसोबत पिथौरागढ़- दिल्ली थकवणारा प्रवास करून आली होतीस. तुला खूप झोप येत होती आणि कसबसं मी तुला जागं ठेवून स्टेशन गाठलं. तेव्हा मला कल्पना आली की, महिलावर्गाला बच्चे कंपनीला घेऊन जाताना किती कठीण जात असेल! निजामुद्दीनच्या बाहेरच असलेल्या हॉटेलमधून स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोहचणं ही माझ्यासाठी एक बिकट मोहीम होती! पण तूही तुझी एक बॅग घेतलीस आणि माझा हात धरून चालत राहिलीस. सीटवर गेल्या गेल्या मस्त झोपलीस. आणि नंतर तुझ्या हिंदी आणि मराठी बोलण्यातून आणि मस्तीतून सगळ्या सहप्रवाशांना हसवलंस! सतत खेळत राहिलीस, सगळ्यांना हसवत राहिलीस. सगळा प्रवास छान झाला, पण परभणीत प्लॅटफॉर्मला ट्रेन आल्यावर तुला उलटी झाली. पण विशेष म्हणजे तिथेही तुझी तक्रार नव्हती.

तू मनाने खूप शांत आहेस, आतून खूप निश्चिंत आहेस. एक खूप खोलवरची समज तुझ्यात आहे. त्यामुळे तुझ्या खूपशा गोष्टी तू स्वत:च करतेस आणि त्याही अगदी व्यवस्थित करतेस. तुझा व्यवस्थितपणा इतका की, माझी एखादी गोष्ट कुठे होती हे तुलाच विचारावं आणि तू ते सांगावंस! दिल्लीहून परतल्यावर थोडे दिवस आपण परभणीला राहिलो. तिथे तू अनन्या- आजूसोबत खेळलीस. परभणीचं घर आपण सोडणार म्हणून तुला वाईटही वाटलं. पण तुझी तिथेही तक्रार नव्हती. तू जे आत्ता समोर आहे, त्यामधून आनंदी राहण्याचा पर्याय बरोबर शोधतेस. परभणीचं घर सोडावं लागलं, हे तुझ्या खूप मनात होतं. कारण तू खूप नंतर एकदा आजोबांना बोललीस की, काय हो आबा, परभणीचं घर का सोडलं? तेव्हा तू त्यांना शिक्षा म्हणून रोज एक गोष्ट सांगायला सांगितलंस! आपण सगळे परभणीहून पुण्याला एका छोट्या बसने आलो तेव्हा गाण्याच्या भेंड्यांमध्ये तुला माहित असलेली गाणी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं- ही गाणी तुला कधी माहिती झाली असं वाटायचं! (उदा., साजनमधलं गाणं)!

आर्ट आणि क्राफ्ट

कोरोना राक्षसाच्या नंतरच्या दिवसांमध्ये आपल्याला चिकू पिकू मासिकाने खूप सोबत केली नाही! त्यातल्या गोष्टी तुला इतक्या आवडायला लागल्या! पाठच झाल्या! आणि तुझ्यामुळे ऐकून ऐकून त्या मलाही आवडायला लागल्या. चिकू पिकूमुळे तुझं मराठी पक्कं कसं होईल ही माझी काळजी निघून गेली. खूप आवडीने तू वाचायला लागलीस. आणि कधी कधी तर मला चिडून पत्र लिहीते आणि फेकतेस माझ्या अंगावर! चिकू पिकूच्या ताईंना तू एकदा मॅसेज केलास पाहा. त्यात तू बोलली की मला सगळ्याच ताया आवडतात. मी तुला विचारलं असं का म्हणालीस, तेव्हा तुझं उत्तर होतं एकीचच नाव घेतलं तर बाकीच्यांना वाईट वाटेल ना! अशी तुझी समज आहे. कोरोनानंतर शाळा सुरू होण्याच्या आधीचे काही महिने आपण खूप सोबत होतो. कारण तुझी नानी उत्तराखंडला थांबल्यामुळे मला फार प्रवास करता येत नव्हता. त्यात खेळायला थोडेच मित्र आणि बाहेरची भिती ह्यामुळे आपण घरीच असायचो. इथे तुझी तू आर्ट आणि क्राफ्ट कला आणखी पुढे नेलीस. काही ना काही सतत करत बसायचीस. स्टेपलरच्या पिनांनी पुस्तक किंवा वही बनवणं तुला फारच प्रिय! हे दिवस तसे कठीण गेले, कारण आई सोबत असली तरी दिवसभर आपणच सोबत असल्यामुळे चिडचिडही व्हायची. किंवा कधी कधी मग तुला तुझे ते पेपा, रुद्रा, पिनाकी ह्यांच्यासोबतही सोडून द्यावं लागायचं. कारण माझीही कामं असायचीच ना. कधी कधी आपण अनन्या- आजूकडे डिएसकेला जायचो, तेव्हा तर तू दिवसभर माझ्याशी बोलायचीही नाहीस, इतकी बहिणींमध्ये मिळून जायचीस! आणि एकदा आपण तिकडे जायला निघालो तेव्हा तू म्हणालीससुद्धा की, मी जगातली सगळ्यांत लकी मुलगी आहे! मला दोन बहिणी आहेत, आजी- आजोबांकडे मी जातेय. तिथे तू तुफान एंजॉय केलं. मग तुम्ही सोबत खेळणार, सोबत पुस्तक वाचणार, तारा राणीही सोबत बघणार आणि सोबतच झोपणार. आणि मी तुझ्याशी खेळायला आलो की तू ओरडणार आतू वाचव! तिथून आल्यावर मात्र तुला बहिणींच्या विरहाचा त्रास झाला आणि होतो अजूनही... हे क्राफ्ट करून करून आणि काही व्हिडिओज बघून तुला अनेक कल्पना सुचतात. त्यामध्ये तू डबल टेप वापरून स्टिकर्स बनवायला शिकलीस! म्हणजे आधी एखादं चित्र काढायचं- स्मायली, प्राणी किंवा तुझा तो लाडका एकशिंगी म्हणजे युनिकॉर्न किंवा बीटीएस आर्मी. किंवा कधी स्टारसुद्धा. मग त्याला तू रंगवतेस. त्यानंतर पर्र पर्र अशा चिकटपट्ट्यांनी त्याला एक प्रकारचं लॅमिनेशनच करतेस. आणि मग छोटा डबल टेपचा तुकडा लावून चिटकवता येणारं स्टिकर बनवतेस! तुझ्या ह्या काही ट्रिक्स मलाही आवडल्या! मीही असं स्टिकर बनवू शकतो आता!

शाळेत जाताना स्वागत करणारी फुलं!

हळु हळु कोरोना राक्षसाने सगळ्या मुलांच्या इच्छाशक्तीपुढे हार मान्य केली आणि हळु हळु तो निघायच्या तयारीला लागला. आणि लवकरच शाळा सुरू होणार असं कळालं. आणि आपल्यासाठी तर त्यामुळे खूपच गंमत झाली. कारण आपण चाकण सोडून औंधला राहायला आलो, तुझ्या शाळेजवळ! तुझ्या शाळेमुळे आपल्या ब-याच गोष्टी बदलल्या. नवीन घर मिळालं. त्यामुळे अनेक जण नेहमी भेटायला यायला लागले. तुला कबीर नावाचा अगदी जीवलग मित्र मिळाला! तोही बिचारा बिल्डिंगमध्ये कोणी फ्रेंड नाही म्हणून उदास होता! त्याची व तुझी किती लवकर गट्टी झाली! आजी- आजोबाही पुण्यात आल्यामुळे जास्त भेटायला लागले. नंतर तर मामा- मामीही नागपूरवरून परत पुण्यात आले. पण ह्याही पेक्षा शाळा सुरू झाली ही गोष्ट फारच मोठी होती. मला आठवतोय तो दिवस. कोरोनाने दोन वर्षं पूर्ण खाल्ल्यानंतर अखेर तिसरीचं वर्ष सुरू झाल्यावर एप्रिलमध्ये शाळा सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी तू पहाटे लवकर उठून तयार झालीस. नव्हे, तू रात्रीच सगळं दप्तर आवरून लवकर झोपली होतीस. इतकी तुझी वेळेची जाणीव पक्की आहे! शाळेत जायला आपण निघालो तेव्हा तुझ्या स्वागताला अंगणात फुलांचा सडा पडलेला होता! शाळा सुरू झाल्यानंतर किती तरी दिवस तू हवेत तरंगतच होतीस. खरं तर एकदम नवीन वातावरण, लिहीण्याचा- वाचण्याचा ताण आणि दमछाक. पण तू त्यातल्या आनंददायक गोष्टींकडेच बघत होतीस. काही लोक तक्रार- केंद्रित असतात. पण तू आनंद- केंद्रित आहेस. नवीन शाळेमध्ये तुला खूप काही छान वाटलं. खूप दिवसांनी तुझ्या वयाचे मित्र- मैत्रीण भेटायला मिळाले. शाळेतली क्लासरूम- मैदान आणि शिक्षकही मिळाले. नंतर तर स्कूल व्हॅनमधले मित्र- मैत्रिणीही मिळाले.

मुलांना उत्तम गोष्ट दिली की जी उत्तम नाही ती थांबव असं अजिबात सांगावं लागत नाही. शाळेमध्ये आणि नंतर होमवर्क- शुद्धलेखन अभ्यास- स्वाध्याय ह्यामुळे तू इतकी रमलीस की तुझे ते टीव्हीतले पेपा- रुद्र- पिनाकी वगैरे मित्र आपोआप कमी झाले! शिवाय शाळेमुळे आणि चिकू पिकूमुळे लवकरच तुझी वाचण्याची व लिहीण्याची मंदावलेली गाडी फास्ट झाली. वाढदिवसाला हॅरी पॉटरचं पहिलं पुस्तक देणार म्हणून मी त्या गाडीच्या इंजिनाला अजून पुढे ढकलायचा प्रयत्न करतोच आहे! पुस्तकातल्या गमतीही तुला आवडायला लागल्या. गोष्ट व कविता वाचायची आवड वाढली. तू छोटी होतीस बघ, तेव्हाचं तुझं एक गाणं होतं पडले पिलू पाहते लिलू असं. तेच गाणं चिकू पिकूच्या अंकात आलं तेव्हा तुला ते वाचताना खूपच गंमत आली! इतकी की तू ते गाणंच सुरू केलं! खूप वेळेस तू ते गाणं म्हणत होतीस! आणि तुझ्या शाळेतही तुला मस्त मस्त गोष्टी मिळतात! ती टिपटिपवा गोष्ट तर किती मजेदार आहे!

ना शेरवा का डर, ना बाघवा का डर, डर त डर टिपटिपवा का डर!

ती गोष्ट तुला वाचून दाखवताना तुलाही गंमत वाटली आणि मलाही! ह्या वर्षीच्या अजून खास आठवणी म्हणजे झोंबी आणि ज्युरासिक वर्ल्ड हे पिक्चर! झोंबी बघताना तुला अजिबातच भिती वाटली नाही. उलट तुला त्या झोंबींचं हसूच येत होतं! ह्या पिक्चरची एक गंमत मात्र झाली. पिक्चरमध्ये झोंबी आल्यानंतर काही दिवस घरामध्येही‌ मधूनच छोता छोता झोंबी सगळ्यांना दचकवत होता! ज्युरासिक वर्ल्डला तर मजाच झाली! मला वाटलं होतं की तुला खूप भिती वाटेल, तू चल बाहेर म्हणशील! पण झालं उलटंच! डायनॉसॉरला बघून तू इतकी जास्त चेकाळलीस आणि तुला इतकी मजा वाटली! भितीचा तर लवलेश नाही! तू‌ तर अजिबात घाबरली नाहीस, पण नंतर घरात मधूनच कुठूनही किंकाळी फोडणा-या छोट्या छोट्या डायनॉसॉरला सगळे जण घाबरत होते! आणि मी जेव्हा तुझी नक्कल केली तेव्हा मात्र तूही दचकायचीस! असंच तू सध्या सगळ्यांना भॉsssक भॉsssक करतेस. आणि मीसुद्धा बरोबर "जैसी करनी वैसी भरनी" (तुझ्याच कार्टूनमधलं वाक्य) म्हणून तुलाही तसंच दचकवतो! तुझे सध्याचे लाडके कार्टूनचे मित्र म्हणजे ते पेपा डुकरं, बाईस्का जुबाईस्का रुद्रा, कर भला तो हो भला म्हणणारा तो कोण माणूस का प्राणी आणि गिटार वाजवणारे ते मोठे मोठे अस्वल! ह्या तुझ्या कार्टून्समध्ये काय ती एकशिंगी म्हणजे युनिकॉर्नची क्रेझ! कमाल आहेत बाबा ते लोक. तुझ्या वस्तुंमध्ये- खेळण्यांमध्ये जिथे बघावं तिथे एकशिंगीच! मग ते शाळेचं दप्तर असेल, टिफिन बॅग असेल, पेन्सिल असेल किंवा अगदी ड्रेस- पर्ससुद्धा! ह्या लोकांकडून खरंच मार्केटिंग शिकलं पाहिजे! तुझ्या कार्टूनमधल्या मित्रांची व प्राण्यांची चौकशी केलीस की कशी हसतेस! आणि एकशिंगी बघून मी दचकतो ते बघून तर तुला फारच आनंद होतो आणि माझ्यासमोर बरोबर क्लेचा एकशिंगी करून लपवून ठेवतेस!

मस्ती आणि मज्जा

अदू, तू आता "एवढी मोठी" झालीस आणि कडेवर न घेता येणारी झालीस जवळ जवळ! तू इतकी मोठी होऊनही आपण मस्त मजा करतोच आहोत! मग तू शाळेत जातेस तेव्हा कधी कधी रस्त्यावर गाडीमधून एखादा मोठा भ्याऊ खिडकीतून डोकं बाहेर काढताना दिसतो! किंवा व्हॅनची वाट बघताना मधूनच एखादा पेपा पळत येतो! एकदा मी तुला बोललोसुद्धा पाहा की, तुला पेपा इतका आवडतो तर त्याला तू कडेवर का घेत नाहीस किंवा त्याच्या पाठीवर तरी का बसत नाहीस! आपण बॅडमिंटन खेळतानाची मज्जा वेगळीच. त्यातही तुझं ते चिडणं आणि माझ्यावर रागावणं. आणि रागावून म्हणतेस कट्टी, कायमची कट्टी! आणि मी जेव्हा म्हणतो अहा हा, वा वा, छान! तेव्हा लगेच तू म्हणतेस नाही, बट्टी, आत्ताच्या आत्ता बट्टी! आपण बॅडमिंटन खेळताना झाडावर चढलेली मनीमाऊ! ह्या गोष्टी मीसुद्धा तुझ्याइतक्याच एंजॉय करतो! किंवा तू शाळेमधून आलीस की आपण पाय-यांनी वर येतो. तेव्हा मी हळुच तुला कळणार नाही असं पुढे सरकतो आणि दरवाजाकडे येतो आणि म्हणतो येस, पहिला नंबर! तेव्हा तू धावून मला ओव्हरटेक करते. किंवा कधी कधी म्हणते की, जा हं तू पुढे (मला काही फरक पडत नाही)! किंवा कधी तू माझ्या मागे लागली असते आणि मी पळत असतो. पळता पळता एकदम मी मध्येच उभा राहतो आणि तू येऊन मला आदळतेस आणि ओरडून म्हणतेस निनू, तू वेडा आहेस का! तू किती फनी आहेस! फोनवर बोलतानाही कधी कधी तू सुरुवातच अशी करतेस, वेड्या राक्षसा! तू मला दिलेली काय ती नावं! सध्या टॉईंड्या हे नाव प्रचलित आहे! टाईप करायलाही कठीण आहे हे नाव! कुठून कुठून तुला टोमड्या, टॉईंड्या अशी नावं सुचतात बरं!

तुझं ते औ पाबईसारखे आवाज काढणं सध्या जरा कमी झालंय! पण तुझी नौटंकी, एक्टिंग आणि ओव्हर एक्टिंग अजिबात थांबलेली नाही! रडण्याची नक्कल तर इतकी अद्भुत करतेस! सगळे हावभाव, सूर तसे! अगदी थयथयाटच! त्याबरोबर डोळ्यांमध्ये अश्रू दिसावेत म्हणून पाण्याचे थेंबही लावतेस! रडल्याची एक्टिंग करत करत आईला फोन लावतेस. आणि कधी कधी चिडलीस की हाताची घडी घालून तोंड फिरवतेस! कधी जेव्हा मला तुझ्यापासून सुटका हवी असते तेव्हा मीसुद्धा तुझ्याशी खोटं खोटं भांडतो आणि तेही तुला लगेचच कळतं! कधी झोपल्याची एक्टिंग काय करतेस, कधी दबा धरून बसतेस! तुझी स्मृती खरंच खूप तल्लख आहे, त्यामुळे तुला तुझ्या लहानपणाच्या आठवणीही लक्षात आहेस. मांडीवर कशीबशी आडवी होऊन झोपल्यासारखं करतेस आणि सांगतेस मला, झोपेचा पहिला- दुसरा- तिसरा गेअर आणि मग घोरायला लागते! अगदी एकदा ऐकलेल्या गोष्टीही तुला बरोबर लक्षात राहतात!

ह्या वर्षीच्या अजून आठवणी म्हणजे शाळेसोबतचा तुझा ड्रॉईंग क्लास! तुझी चित्र आता अजून सुंदर होत आहेत. चित्र काढण्यासाठी जो संयम लागतो, स्थिर चित्त लागतं ते तुझ्याकडे आहे. त्यामुळे तुझ्या वाचनाच्या कंटाळ्याची मला फारशी काळजी वाटत नाही! मला जेव्हा तुला आठवण करून द्यायची असते पुस्तकाची तेव्हा मी फक्त तुला वाचन कंटाळे म्हणून चिडवतो! किंवा तू लहानपणी वाचायचीस तसं अडकत अडकत वाचून दाखवतो! तेव्हा तुझ्या चेह-यावरचे हावभाव आणि त्वेष बघण्यासारखा असतो! गेल्या दोन महिन्यांमधली अजून एक गंमत म्हणजे आपण सोबत केलेल्या डबलसीट राईडस! अजून वर्ष- दोन वर्ष तरी आपण अशा राईडस करू शकू! तुला सायकलवरून शाळेत सोडताना किंवा नदीवर फिरायला नेताना आलेली मजा खूप वेगळी! एकदा तर चक्क आपण डबलसीटवरच गिरीशकाकाकडे गेलो, १५ किलोमीटर डबलसीट राईड झाली! तेव्हा थोडासा पाऊसही होता. त्यावर तुझं म्हणणं होतं, इतक्या बारीक पावसाला तर मुंगीही घाबरणार नाही! अशी ही आठ वर्षांची आनंदयात्रा अदू! कितीही सांगितलं तरी पूर्ण होणार नाही अशी ही गोष्ट!

एक गोष्ट तुला सांगतो आणि पत्र थांबवतो. तुला ससा व कासवाची गोष्ट माहिती आहेच. त्या गोष्टीमध्ये नंतर झालेली गंमत सांगतो. हरल्यामुळे ससा खूप नाराज होता. सगळे जण त्याला हसायचे. मग नंतरच्या सशांनी ठरवलं की, आपण जिंकून दाखवायचं. मग त्याने परत एकदा कासवाला चॅलेंज केलं. रस्ता आधीचाच होता. शर्यतीची‌ वेळ ठरवली आणि निघाले. ह्यावेळी ससा एकदम सावध होता. आधीच्या सशाने केली ती चूक तो करणार नव्हता. वाटेत कुठेही त्याने डुलकी घेतली नाही, बसलाही नाही. तो वेगाने पळत पळत गेला आणि पोचला आणि जिंकलासुद्धा! कासव मागेच राहिलं. ते हरलं. सशाला आनंद झाला, पण कासव नाराज झालं. नाराज झालेल्या कासवाने परत एकदा सशाला चॅलेंज केलं! ससा तयार झाला. ह्यावेळी रस्ता कासवाने आखला. त्याला हवा तसा. गोळी झाडल्यावर दोघंही निघाले. ससा लगेच पुढे गेला. वाटेत एक डोंगर होता, तो ससा वेगात चढला. आणि नेमकी त्याच्या पुढे दरी होती. तिथून तो घसरला आणि समोर एक छोटी नदी होती, तिथे जाऊन अडला. त्याला काही पोहता येत नव्हतं. कासव हळु हळु डुलत आलं आणि त्याने ती नदी आरामात पोहून पार केली. नदीच्या पलीकडेच हिरवा झेंडा होता. कासव ह्यावेळी जिंकलं.

पण ससा हरल्याचं कासवालाच वाईट वाटलं. दोघांची मैत्री झाली होती ना. दोघांनीही विचार केला की, अशी शर्यत आता परत परत नको. एकदाच शेवटची रेस खेळूया. मग त्यांनी तोच रूट ठरवला. सुरुवातीला जमीन, डोंगर आणि मग नदी असलेला. दोघंही निघाले. पण ह्यावेळी त्यांच्यात मैत्री होती, म्हणून सशाने सुरुवातीला कासवाला पाठीवर घेतलं. दोघंही वेगात निघाले. कासवाने सशाला डोंगरावर थोडं थांबवलं, आरामात डोंगर उतरायला सांगितलं, घसरू दिलं नाही. पुढे नदी आली तिथे ससा थांबला. तिथे कासव उतरलं आणि त्याने सशाला पाठीवर घेतलं आणि दोघंही पार झाले आणि दोघंही एकाच वेळी पोहचले आणि जिंकले!

हे पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

- निरंजन वेलणकर. 09422108376 (तिला लिहीलेली आधीची पत्र वाचायची असतील किंवा तिचे लिटल डकचे आवाज व गोष्टी- गाणी ऐकायची असतील तर मॅसेज करू शकता).

समाजजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Sep 2022 - 5:27 pm | मुक्त विहारि

बघता बघता, मुलांचे बालपण संपून जाते आणि राहतात त्या आंबट-गोड आठवणी ....

Nitin Palkar's picture

17 Sep 2022 - 8:05 pm | Nitin Palkar

खूप छान लिहिलंय. काळ परवाच वाचलेली संकर्षण कर्हाडेंची ही कविता आठवली.
https://www.youtube.com/watch?v=WRL9GRnj9qw

पाषाणभेद's picture

18 Sep 2022 - 12:14 pm | पाषाणभेद

छान आहे पत्रसंवाद, आजकाल तो कमी होतोय.

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 1:06 am | मुक्त विहारि

पण ...

भुर्जपत्रे ते संगणकीय लिखाण, असा बदल प्रवास सुरू आहे ...

कदाचित मन ते मन, अशी देखील संपर्क यंत्रणा, भविष्यात प्रत्यक्षांत येऊ शकते ....

पत्रांची जागा आता, लघू किंवा दीर्घ संदेशांनी घेतली आहे...

(तुमच्या बरोबर प्रतिसाद करतांना, दिवाळीच्या अंकासाठी लेख सुचला... योग्य व्यक्ति बरोबर चर्चा केली की, वादे वादे जायते संवादः, हे पटते)

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2022 - 7:25 pm | कर्नलतपस्वी

दिवाळीच्या अंकासाठी लेख सुचला...

वाट पाहू. विषय छान आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2022 - 12:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमचे सातत्य वाखाणण्याजोगे आहे.
आदू मोठी भाग्यवान आहे
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2022 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दीर्घ असलेले स्वगत आवडलं. अदू गोड आहे.

-दिलीप बिरुटे

मार्गी's picture

21 Sep 2022 - 3:33 pm | मार्गी

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!