नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
25 Jul 2022 - 1:31 pm

काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती.

शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले!

युट्युबवर पाच, दहा, पंधरा लाख किंवा त्याहुनही जास्त सबस्क्राइबर्स असणारे युट्युबर्स/चॅनल्स संख्येने कमी नाहीत, पण त्यांवरचा कंटेंट हा बहुतांश इंग्रजी किंवा हिंदी भाषेतला असल्याने त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा असतो. परंतु भाऊंच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या ९८ ते ९९% मराठी* आणि जवळजवळ ‘वन मॅन शो’ टाईपच्या एकखांबी-एकहाती** युट्युब चॅनलने हा पल्ला गाठणे ही गोष्ट खचीतच कौतुकास्पद आहे.
( * लोकाग्रहास्तव काही व्हिडिओज हिंदी भाषेत आहेत. ** आंतरराष्ट्रीय राजकारण/घडामोडींवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी, स्वाती तोरसेकर ह्यांचे काही व्हिडिओज ‘एषा पृथ्वी’ सदरांतर्गत आहेत. )

आभारप्रदर्शनासाठी केलेल्या ‘पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट’ व्हिडिओत भाऊंनी ह्या यशाचे श्रेय अनेक घटकांना दिले आहे आणि त्यांच्या काही मर्यादा/तांत्रिक त्रूटी ह्यावरही भाष्य केले असले तरी माझ्यापरीने ह्या यशाचे मूल्यमापन करताना गेल्या काही वर्षांत सुरूवातीला त्यांचा वाचक मग अल्पकालीन प्रेक्षक आणि आता श्रोता अशा झालेल्या माझ्या प्रवासात आलेले काही अनुभव/निरिक्षणे मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच!

पाच-साडेपाच वर्षांपूर्वी भाऊ तोरसेकर हे नावही मला माहिती नव्हते पण मिपावरच चर्चा प्रतिसादात कोणीतरी ‘जागता पहारा’ ह्या त्यांच्या ब्लॅागवरील एका लेखाची लिंक दिली होती. तो लेख वाचला आणि आवडला म्हणून त्यांचे अन्य लेखही वाचायला सुरूवात केल्यावर मात्र त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही. घरी असो की ॲाफीसमध्ये ब्राऊझरवर कामासाठीच्या टॅब्जच्या जोडीला एका टॅबमध्ये 'मिपा' आणि दुसऱ्या टॅबमध्ये 'जागता पहारा' उघडलेला असायचा. त्यांच्या नव्या ब्लॅागपोस्टची प्रतिक्षा असायची!

पुढे एप्रिल २०२० मध्ये पहिल्या लॅाकडाऊन काळात त्यांनी ‘प्रतिपक्ष’ हे युट्युब चॅनल सुरू केल्यावर मात्र त्यांचे ब्लॅागवरील लेखन कमी कमी होत सप्टेंबर २०२० नंतर नविन लेखन येणे बंदच झाले.
नियमितपणे त्यांचे लेख वाचायची सवय झाली असल्याने पुढचे काही दिवस चुकल्या चुकल्यासारखे झाल्यावर काही महिन्यांनी (युट्युबचा वापर राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पहाण्यासाठी करण्याची कल्पनाच सहन होत नव्हती तरीही) नाईलाजाने प्रतिपक्ष चॅनलला भेट देऊन भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला आणि घोर निराशा झाली!
निकृष्ट सिनेमॅटोग्राफी, कंटाळा येण्याइतपत अतिशय संथगतीतले बोलणे, वारंवार चष्मा काढणे/लावणे, गाल, नाक, कान, डोके खाजवणे, मध्येच रिमोटने AC चालु/बंद करणे अशा प्रेक्षकांना विचलीत करणाऱ्या क्रिया-देहबोली, अनावश्यक गोष्टी काढुन टाकण्यासाठी आवश्यक असलेला व्हिडिओ एडीटींगचा अभाव अशा अनेक कारणांनी अत्यंत निरस वाटल्याने तो पहिलाच व्हिडिओ देखील मी पुर्णपणे पाहु शकलो नव्हतो. मग पुढचे काही महिने प्रतिपक्षच्या वाटेला फिरकलोच नाही!

आता नक्की किती महिने झाले असतील ते आठवत नाही (कदाचीत एखाद वर्षही झाले असेल) पण पुन्हा मिपावरील चर्चेतल्या एका प्रतिसादात कोणीतरी भाऊंचे संथ व्हिडिओ पहायला कंटाळा येत असल्याचा उल्लेख केला आणि त्यावरच्या उप्रतिसादात मिपाकर शाम भागवत ह्यांनी प्लेबॅक स्पीड १.५ करून भाऊंचे व्हिडिओ पहाण्याचा सांगीतलेला उपाय वाचला आणि, अरेच्चा… DIY किंवा तत्सम प्रकारातले जाणीवपुर्वक स्पीड वाढवून अपलोड केलेले कित्येक व्हिडिओज आपण त्यातल्या स्टेप्स नीट समजून घेण्यासाठी प्लेबॅक स्पीड ०.५ वा ०.७५ असा कमी करून पहातोच की, तीच क्रिया भाऊंचे व्हिडिओ पहाताना उलट करण्याची कल्पना आपल्याला सुचली कशी नाही असा विचार करून स्वत:च्याच डोक्यात टपली मारून घेत प्लेबॅक स्पीड वाढवून मोबाईलवर प्रतिपक्ष पहायला सुरूवात केली आणि मी प्रतिपक्षचा नियमीत प्रेक्षक झालो!

त्यानंतर प्रतिपक्षवरचे शंभरेक व्हिडिओज पाहुन झाल्यावर प्रत्येक व्हिडिओत एकच नेपथ्य (बॅकग्राउंड) आणि वर उल्लेखीलेल्या त्यांच्या क्रिया, देहबोली वगैरे वगैरे बघून परत कंटाळा येऊ लागला परंतु ह्यावेळी मी प्रतिपक्ष पासून दुरावलो नाही ह्याचे कारण म्हणजे वेळीच सुचलेले शहाणपण!
त्यावेळच्या त्राग्यात एक विचार मनात चमकून गेला की, आपण प्रतिपक्षवर येतो ते भाऊंचे विश्लेषण ऐकण्यासाठी, त्यांची मते समजून घेण्यासाठी, श्रवणसुखाच्या जोडीने नेत्रसुखाचीही अनुभूती देण्यासाठी भाऊ म्हणजे Aleena Rais Live च्या 'अलीना रईस' (Aleena Rais) किंवा Gravitas Live / Gravitas Plus च्या 'पालकी शर्मा-उपाध्याय' (Palki Sharma-Upadhyay) थोडीच आहेत? तेव्हा भाऊंचे व्हिडिओज आपण बघण्याऐवजी नूसते ऐकु तर शकतो की!

‘भिक नको पण कुत्रं आवर’ ह्या म्हणीच्या धर्तीवर ‘पैसे घे पण जाहिराती आवर’ असं म्हणायची वेळ युट्युबने आणली होती/आहेच. जाहिरातींच्या भडीमारा पासुन मुक्ती मिळवण्यासाठी YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घेतले होते त्यामुळे युट्युबचे ॲप मिनीमाईज करून इतर ॲप्स वापरत असताना किंवा फोन लॅाक करूनही बॅकग्राउंडला व्हिडीओ प्ले होत असल्याने हा उपाय चांगलाच कामी आला आणि मी प्रतिपक्षचा प्रेक्षक न रहाता श्रोता झालो. त्याचा आणखिन एक फायदा म्हणजे माझा स्क्रिन टाईम कमी झाल्याने डोळ्यांनाही थोडा आराम मिळू लागला. YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावर भाच्याच्या सुचनेवरून गेले काही महिने YouTube Vanced वर युट्युब (सर्व प्रिमीयम फिचर्स चकटफु वापरत 😀) बघत असल्याने हाच नित्यक्रम अद्यापही कायम आहे!

असो, ह्या लेखाचा उद्देश भाऊंवर किंवा त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ चॅनलवर टिका करण्याचा नक्कीच नाही. काही त्रूटी/ कमतरतांचा उल्लेख भाऊंनी स्वत: ह्या आणि त्यांच्या अन्य व्हिडिओज मध्ये प्रांजळपणे केलेला आहेच, पण त्यांचा एक चाहता वाचक, प्रेक्षक आणि श्रोता ह्या नात्याने माझी काही निरिक्षणे, काही गोष्टींमुळे होणारा रसभंग व तो दुर करण्यासाठी केलेले उपाय ह्यांचा गोषवारा माझ्याप्रमाणेच मिपावर असलेले भाऊ तोरसेकरांचे अनेक चाहते, वाचक, प्रेक्षक आणि श्रोते तसेच अशा सर्वांसाठी ह्या छोटेखानी लेखातुन मांडला आहे.

सोशल मिडिया वरील भाऊंच्या चॅनलचे हे यश मेनस्ट्रीम मिडियाचा घटता प्रभाव तर दर्शवतेच पण त्याच बरोबर अत्यंत कमी/मर्यादित संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करत, कुठलाही चमचमाट, झगमगाट न करता केवळ चांगल्या कंटेंटच्या जोरावर तयार केलेले अनौपचारीक असे व्हिडिओज बनवुनही असे घवघवीत यश मिळवता येते ह्याचेही उत्तम उदाहरण आहे!

इतक्या कमी वेळात ‘प्रतिपक्ष’ ला मिळालेल्या ह्या यशाबद्दल भाऊंचे हार्दिक अभिनंदन! सध्या त्यांच्या मागे दिसणाऱ्या Silver YouTube Creator Award च्या जागी लवकरात लवकर १० लाख सबस्क्राइबर्स चा टप्पा गाठल्यावर मिळणारे Gold YouTube Creator Award बघायला मिळो अशा शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

मांडणीशुभेच्छाअभिनंदनलेखअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Jul 2022 - 1:45 pm | कुमार१

छान परिचय करून दिलात.
मला स्वतःला व्हिडिओ पाहण्याचे प्रकार आवडत नसल्याने मी यापासून दूर आहे.

बघून लिहितो.

कर्नलतपस्वी's picture

25 Jul 2022 - 2:10 pm | कर्नलतपस्वी

कोविड मधे डॉक्टर रवी गोडसे मधुरा किचन,शिंदे कुटुंब आसे बर्‍याच मराठी तुनळ्या सुरू झाल्या.विषयात रस नसल्या मुळे बघत नाही. बाकी आपला लेख चांगलाच आहे.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 2:36 pm | टर्मीनेटर

कुमार साहेब, कंजूस काका आणि कर्नल साहेब
प्रतिसादासाठी आपले आभार 🙏

@ कुमार१,

मला स्वतःला व्हिडिओ पाहण्याचे प्रकार आवडत नसल्याने मी यापासून दूर आहे.

मी भरपूर व्हिडीओज बघतो. अर्थात वेगळ्या विषयावरचे, राजकीय विश्लेषणत्मक फक्त भाऊंचे बघतो.

@ कंकाका,

कधी पाहिला नाही यांचा चानेल.

कोणाचा? 'अलीना रईस' की 'पालकी शर्मा-उपाध्याय ह्यांचा 😀 😀 😀
जोक अपार्ट, भाऊंचा म्हणत असाल तर मला त्यांच्या ब्लॉग आणि युट्युब चॅनल बद्दल मिपावरच समजलं होतं. त्यानंतर मी त्यांचे लेख वाचू लागलो आणि व्हिडीओज पाहू / ऐकू लागलो!

@ कर्नलतपस्वी
डॉक्टर रवी गोडसे ह्यांचे कोविड विषयीचे १-२ व्हिडीओज पाहिल्याचे आठवतंय.

त्यामुळे भाउंच्याऐवजी दुसरा कोणता चानेल पाहता हासुद्धा प्रश्न बाद. घटनांचा आढावा समजून घेण्यासाठी इंडिया टुडे मासिक १९८५ पासून वाचतो. त्यात बदल नाही. त्यांचा चानेलही आहे पण तिकडे जात नाही.
परदेशी बातम्यांसाठी france24. ( Bbc नाही.)
भारतीय बातम्यांसाठी न्यूजनेशन बरा आहे. महाराष्ट्रासाठी झी २४ तास,एबिपीमाझा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2022 - 2:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

कोविडच्या काळात भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी, अनय जोगळेकर आणि अश्विन अघोर ही मंडळी बर्‍याच घरात पोचली.

वर्तमान पत्रातील किंवा टिव्हीवरील निसटलेल्या किंवा निसटवलेल्या बातम्या किंवा त्या बातम्यांच्या निसटलेल्या बाजू या लोकांमुळे समजतात.

भाऊंचा श्रोतावर्ग तर यात बराच मोठा आहे. त्यांची व्हिडीओ अपलोड करायची ठरलेली वेळ नाही तरी सुध्दा त्यांचा नवा व्हिडीओ आला की पहिल्या तासाभरातच पहाणारे अनेक जण आहेत हे त्या व्हिडिओ खालच्या आकड्यांवरुन दिसुन येते.

आपल्याला फार काही माहित आहे असा आव आणात तारस्वरात ब्रेकिंग न्युज देणार्‍यांच्या आणि त्यांचे विष्लेषण करणार्‍यांच्या भाऊगर्दीत भाऊंचे वेगळेपण लक्षात येते. त्यांचे विवेचन अभ्यासपूर्ण असते तरीही त्यात सहज गप्पा मारल्याचा भाव असतो. बोलता बोलता ते अनेक जुने नवे संदर्भही देतात. हातात कागद न घेता थेट कॅमेर्‍याकडे पहात अस्खलीत बोलतात, म्हणूनच एकवढ्या मोठ्या संख्येने त्यांना श्रोता वर्ग लाभला आहे.

या वयात त्यांनी मिळवलेले यश खरेच कौतुकास्पद आहे. त्यांचा श्रोता वर्ग असाच वृध्दींगत होत राहो या शुभेच्छा.

पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 2:55 pm | टर्मीनेटर

+१०००
👍

चौथा कोनाडा's picture

25 Jul 2022 - 8:35 pm | चौथा कोनाडा

अगदी !

+१,००१

कंजूस's picture

26 Jul 2022 - 7:59 am | कंजूस

यूट्यूबपेक्षा पॉडकास्ट करावे. दृष्ये नसतातच. मुद्दे कळण्यासाठी चेहरा बघण्याची गरज नाही.
पेपर व इतर साइट्सवर येणारे लेख ऐकण्याचीही सोय असते ते बरे पडते.
शिवसेना (२) ऐकला पाहिला. हे सर्व ठिकाणी उगाळून झालेले सांगितले.

"जागता पहारा" चा मीही बर्‍यापैकी नियमित वाचक होतो. पण भाऊंचे विडिओज बघणे/ऐकणे कंटाळवाणे होत जाते हे तेवढेच खरे.
एकच गोष्ट परत परत उगाळत सांगण्याची त्यांची पद्धत ही सहजपणे आलेली असली तरीही फार होते.
नीट संकलन केल्यास साधारण ४ ते ५ मिनिटांत संपू शकणारे मॅटर, ते २०-२५ मिनिटांचे लांबण लावत चालवतात त्यानं वैताग होतो. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांचा विडिओ सापडला तरीही फॉरवर्ड करत बघणे सगळ्यात इष्ट. पण यानं नियमित बघणे/ऐकणे कंटाळवाणे होते.
वरच्या पट्टीत बोलण्याच्या सवयीमुळे असेल किंवा एकटेच बोलत असल्याने असेल कदाचित, पण जरावेळानंतर त्यांचा आवाज चिरका होत जातो. यामुळे देखील जास्त वेळ बघणे/ऐकणे शक्य होत नाही.

बाकी ते अनुभवी पत्रकार विश्लेषक आहेतच, त्यात वाद नाही.
त्यांचे माहितीचे सोर्स देखील भरपूर आहेत, ज्याचा त्यांना पुढील अंदाज बांधण्यासाठी उपयोग होत असतो. त्यामुळेच त्यातले कंटेंट इटरेस्टींग असते.

जर मोजक्या शब्दांत, पसारा न मांडता विडीओ केले आणि ते वरच्या पट्टीतले बोलणे जरा खाली आणले, तर त्यांचे विडीओज पाहणार्‍यांची संख्या सहज दुप्पट होऊ शकेल. :-)

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 4:33 pm | टर्मीनेटर

जर मोजक्या शब्दांत, पसारा न मांडता विडीओ केले आणि ते वरच्या पट्टीतले बोलणे जरा खाली आणले, तर त्यांचे विडीओज पाहणार्‍यांची संख्या सहज दुप्पट होऊ शकेल. :-)

+१०००
तुमची बाकीची निरीक्षणेही बरोबर आहेत. एकच गोष्ट परत परत उगाळत सांगण्याच्या त्यांच्या सवयी बद्दल मी त्यांच्या वयोमानाचा विचार करून लिहिण्याचे टाळले होते, त्याच अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यासाठी त्यांनी व्हिडीओ एडिट करून अपलोड करणे गरजेचे आहे पण नेमका त्याचा अभाव आहे!
आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या चॅनलवर Comments turned off असल्याने प्रेक्षकांना काही सूचनाही करता येत नाहीत.

क्लिंटन's picture

25 Jul 2022 - 5:59 pm | क्लिंटन

च्या चॅनलवर Comments turned off असल्याने प्रेक्षकांना काही सूचनाही करता येत नाहीत.

त्याचे कारण आहे. प्रतिपक्ष सुरू होण्यापूर्वी भाऊ पोस्टमन या युट्यूब चॅनेलवर मधूनमधून जायचे आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ करायचे. त्या चॅनेलवरील एका व्हिडिओत त्यांनी शरद पवारांच्या राजकारणावर एक व्हिडिओ केला होता. म्हणजे पवारांनी त्यांच्या काँग्रेस गटाकडून निवडणुक लढवून १९८० मध्ये ५४ जागा आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीलाही ५४ जागाच. तसेच पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले (१९७८ मध्ये) तेव्हा जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक वगैरे मंडळींनी त्यांची पहिली निवडणुकही लढवली नव्हती. पवार ४० वर्षे ५४ चे ५४ वरच राहिले पण इतर सगळ्यांनी स्वतःचे पक्ष काढून स्वबळावर निवडणुक जिंकून दाखवली (ममता आणि पटनायक यांनी एकापेक्षा जास्त वेळा) वगैरे मुद्दे त्यात होते. त्यावर कोणीतरी वाह्यातपणा करत पवारांविषयी हिंसक कमेंट केली. ती कमेंट बघून पुण्यातील राष्ट्रवादीचा स्थानिक नेता लक्ष्मीकांत खाबिया याने भाऊ तोरसेकरांनी शरद पवारांच्या हत्येचा कट केला आहे आणि त्याची चौकशी व्हावी अशी तक्रार शिवाजीनगर पोलिसात दाखल केली. या प्रकाराचा भाऊंना दोन दिवस विनाकारण त्रास झाला होता. मुंबईहून जाऊन शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन दिवस खेटा मारायला लागल्या होत्या. वास्तविकपणे भाऊंकडे बघून ते घरी आलेले झुरळ तरी मारू शकत असतील की नाही अशीच शंका येते. अशा माणसावर हत्येचा कट केल्याचा गुन्हा दाखल झाला. भाऊ सगळ्यात पहिल्यांदा तपास करणार्‍या अधिकार्‍यासमोर गेले तेव्हा भाऊंना बघून तो अधिकारी फिदीफिदी हसत होता म्हणे. हा अनुभव लक्षात घेता प्रतिपक्ष सुरू झाल्यापासून त्यावर कोणतीही कमेंट लिहायला त्यांनी परवानगी दिलेली नाही.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 6:19 pm | टर्मीनेटर

हे राम!
🤦‍♂️
एवढा मोठा इतिहास आहे होय Comments turned off ठेवण्या मागे!

सविस्तर माहितीसाठी आभारी आहे 🙏

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 7:10 am | अमरेंद्र बाहुबली

पवाराना मारायची थेट धमकी कमेंट मध्ये होती नी त्या व्यक्तिला भाऊंच्या विडीओतून चिथावनी मिळाली असं सिध्द होत होतं. ते तर पवार साहेबांनी हलक्यात घेऊन सोडलं नाहीतर भाऊंना पुढचे विडीओ जेल मधून बनवावे लागले असते.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 9:21 am | क्लिंटन

मिपाचा वापर खोटेनाटे पसरवायला होऊ नये या उदात्त हेतूने मिपावर प्रत्येक ठिकाणी पिंक टाकणारे अ.बा...

पवाराना मारायची थेट धमकी कमेंट मध्ये होती नी त्या व्यक्तिला भाऊंच्या विडीओतून चिथावनी मिळाली असं सिध्द होत होतं.

सिध्द करायचे काम कोर्टाचे असते. कोणत्या कोर्टात हे सिध्द झाले होते? कोर्टात केस उभी राहणे सोडाच पोलिसांनीच त्या केसमध्ये काही अर्थ नाही म्हणून तपास बंद केला होता. तरीही ते सिध्द होत होतं हा तुमचा दावा असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करा आणि असे पुरावे तुमच्याकडे नसतील तर प्रत्येक ठिकाणी कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा.

@संपादक मंडळः संबंधित आय.डी प्रत्येक ठिकाणी एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसाद देत असतो ते तुम्ही कसे चालवून घेता?की मिपावरही ऐसीप्रमाणे कधीही बघावे तेव्हा ३-४ पेक्षा कमी सदस्य हजर अशी परिस्थिती आल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? अर्थात तशी तुमचीच इच्छा असली तर आम्ही तरी काय करणार बापडे?

आग्या१९९०'s picture

26 Jul 2022 - 9:39 am | आग्या१९९०

मिपावरही ऐसीप्रमाणे कधीही बघावे तेव्हा ३-४ पेक्षा कमी सदस्य हजर अशी परिस्थिती आल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का?
ऐसीची तुलना मिपाशी? सदस्य हजर असो वा नसो तिथे सकस लेख आणि चर्चा वाचायला मिळतात .अजून काय हवे? उगाच संख्या वाढवून रतीब घालण्यापेक्षा नक्कीच बरे. मिपा संपादक मंडळ योग्य ते निर्णय घेत असते हे वारंवार दिसून येते.

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 9:57 am | जेम्स वांड

अबाला बडवण्याच्या मधेच ऐसी अक्षरे कुठून आले ? तुम्ही पण कैच्याकै प्रतिसाद देता हे पाहून नवल वाटले.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 10:07 am | श्रीगुरुजी

पूर्ण सहमत आहे.

कोणताही धागा असो वा खरडफळा, सर्वत्र हेच सुरू आहे. कोणत्याही विषयाचा बादरायण संबंध मोदी, फडणवीस, शहांशी जोडून यथेच्छ पिंका टाकणे सुरू आहे. यातून काही नवीन माहिती मिळत असती किंवा काही मुद्देसूद चर्चा होत असती तर एकवेळ चालवून घेता आलं असतं. पण अत्यंत चुकीचे निष्कर्ष, शून्य माहिती या आधारावर सर्वत्र पिंका टाकून सर्व धागे, खरडफळा नासवून टाकणे हे योग्य आहे का?

खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी स्वत:ला बाजुला ठेवण्याचा प्रयत्न करतो.
श्री अमरेंद्र बाहुबली यांनी सगळीकडे उच्छाद मांडला आहे.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 2:39 pm | क्लिंटन

खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी स्वत:ला बाजुला ठेवण्याचा प्रयत्न करतो.

मी सुध्दा बराच काळ तेच करत होतो पण आपल्या थापेबाजीला कोणी आव्हान देत नाही हे बघितल्यावर संबंधित सदस्य जामच सोकावला आणि कोणत्याही चर्चेत, खरडफळ्यावर जाऊन प्रत्येक ठिकाणी विनाकारण बादरायण संबंधही नसलेल्या गोष्टींची पिंक टाकायला लागला. या प्रकाराला कुठेतरी पायबंद बसायला हवा. एकेकाळी मिपा दर्जेदार चर्चेसाठी प्रसिध्द होते. विरोधी मत असले तरी ते योग्य प्रकारे, कोणत्यातरी मुद्द्याच्या आधारे मांडले जायचे. हा मनुष्य अशीच घाण करत राहिला तर त्या प्रकाराला कंटाळून सध्या जे काही १५-२० सदस्य हजर असतात ते पण येणे बंद होईल ही भिती आहे. एकेकाळी मिपावर ५०+ सदस्य अगदी नेहमीच ऑनलाईन असायचे. सगळ्यात जास्त आकडा ८८ इतका बघितला होता. ते दिवस परत यायला हवेत. आणि त्यासाठी असल्या उपद्रवी सदस्यांना रोखणे गरजेचे आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 2:52 pm | श्रीगुरुजी

चालू घडामोडींचा धागा असो वा एखाद्याला श्रद्धांजली असो वा क्रिकेटवर धागा असो किंवा खरडफळा असो, हा सदस्य प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक प्रतिसादाचा बादरायण संबंध मोदींशी जोडून अत्यंत खोटे, दर्जाहीन प्रतिसाद अशुद्ध मराठीत देऊन संपूर्ण धागा व खरडफळा नासवून टाकतो. फेकाफेकी आहेच आणि ती सुद्धा अत्यंत दर्जाहीन अशुद्ध भाषेत. स्वत:ला कणभरही माहिती नसताना वाटेल ते बेछूट आरोप करून अतर्क्य निष्कर्ष काढून सर्वत्र घाण करून ठेवायची हे प्रकार कोठेतरी थांबले पाहिजे.

एकेकाळी मिपा दर्जेदार चर्चेसाठी प्रसिध्द होते. विरोधी मत असले तरी ते योग्य प्रकारे, कोणत्यातरी मुद्द्याच्या आधारे मांडले जायचे.

हा काळ नेमका कधी होता ते जाणून घ्यायला आवडेल, मिपावर वाटेल तसे वैयक्तिक होताना मी बघितले आहे लोकांना अगदी वाचनमात्र होतो तेव्हापासून. आता तत्कालीन सभासदाची नावे घेण्यात अर्थ नाही, मिपावर चर्चा दर्जेदार कधी होती तो कालखंड सांगाच सर प्लीज !

बाकी तुम्ही, बळी, गुरुजी आपापसात भांडा नाहीतर नांदा मला काही घेणेदेणे नाही, पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका, मुवींच्या पिंका पण विसरू नका ह्या नादात, वाटेल तिथे ते पण वाटेल ते प्रतिसाद देतच असत, आपला तो बाब्या तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही क्लिंटनजी.

प्रतिसाद पिंका तर सोडाच, हा अख्खा धागा आहे

त्यामुळे सौहार्दाचे संबंध अन ओलावा असलेल्या चर्चचे मिपावर कधी फड जमले हा मला खरेच प्रश्न पडला आहे.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 3:37 pm | क्लिंटन

मिपावर चर्चा दर्जेदार कधी होती तो कालखंड सांगाच सर प्लीज !

मिपाच्या जन्मापासून साधारण २०१२-१३ पर्यंतचा काळ तसा होता. त्यातही कोणी कधी वैयक्तिक व्हायचे नाही असे नाही. पण आतापेक्षा प्रमाण बरेच कमी होते.

पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका,

हे मी कधी म्हटले आहे आणि कुठे?

मुवींच्या पिंका पण विसरू नका ह्या नादात, वाटेल तिथे ते पण वाटेल ते प्रतिसाद देतच असत, आपला तो बाब्या तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही क्लिंटनजी.

मग नक्की काय करावे असे अपेक्षित आहे? अगदी प्रत्येक वाटेल त्या प्रतिसादावर जाऊन टोकायचे का? तेवढा वेळ आणि संयम माझ्याकडे नाही. क्षमस्व. खरं तर मी काही ठराविक धागेच उघडून बघतो बाकीचे तर उघडूनही बघत नाही त्यामुळे इतर धाग्यात काय चालते हे मला कळायचेही नाही. मागच्या वर्षी ताज्या घडामोडींचे बरेच धागे मी काढले होते. पण मुविंच्या लिंकाळपणामुळे बघताबघता १५० प्रतिसाद त्यात व्हायचे म्हणून काही काळ ते नवे धागे काढणेही बंद केले होते. बहुतेक त्याविषयी लिहिलेही होते. त्या पलीकडे काय करणे अपेक्षित आहे? इथे अबांच्या दोनच प्रतिसादांना पुरावे मागून टोकले आहे. तसे टोकण्यायोग्य अबांचे कितीतरी जास्त प्रतिसाद मिळतील. म्हणून प्रत्येक प्रतिसादाला टोकत बसायचे का? तेवढा वेळ आणि उत्साह असेल तर ते करेनही. पण याक्षणी तरी नाही.

प्रतिसाद पिंका तर सोडाच, हा अख्खा धागा आहे

त्याच धाग्यावर माझ्या गॅरी ट्रुमन या आय.डी मधून लिहिलेला प्रतिसादही आहे. २०१५ मध्ये तो आय.डी मी घेतला होता. त्याचे असे झाले की अमेरिकेत हिलरी क्लिंटन २०१६ च्या निवडणुकांना उमेदवार असणार या बातम्या येत होत्या आणि हिलरी अध्यक्षपदावर यायला मला नको होत्या (माझ्या विरोधाला कोण विचारते म्हणा तरी आपलं एक वैयक्तिक मत). अशावेळेस क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा वगैरे गोष्टी पुढे येऊन सगळा विचका व्हायचे पोटेंशिअल होते. म्हणून तो नवीन आय.डी मी घेतला होता. त्या प्रतिसादातच "गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे." असे लिहिले होते. अजून काय करणे अपेक्षित आहे?

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 3:56 pm | जेम्स वांड

मिपाच्या जन्मापासून साधारण २०१२-१३ पर्यंतचा काळ तसा होता. त्यातही कोणी कधी वैयक्तिक व्हायचे नाही असे नाही. पण आतापेक्षा प्रमाण बरेच कमी होते.

२०१२-१३ नंतर असे काय बदलले म्हणाल ?

पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका,

हे मी कधी म्हटले आहे आणि कुठे?

नाही असे तुम्ही म्हणले नाहीत खरे, हा प्रश्न किंवा र्हेटोरिक जरा इम्पलसिव्ह झाले, दिलगिरी व्यक्त करतो त्याबाबत.

इथे अबांच्या दोनच प्रतिसादांना पुरावे मागून टोकले आहे. तसे टोकण्यायोग्य अबांचे कितीतरी जास्त प्रतिसाद मिळतील. म्हणून प्रत्येक प्रतिसादाला टोकत बसायचे का? तेवढा वेळ आणि उत्साह असेल तर ते करेनही. पण याक्षणी तरी नाही.

प्रत्येकाला टोकू नका, अबांच्या धडाडीपुढे ते शक्यही नाही. पण अबांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद करणे न करणे तुमच्या हाती असेल, तो टोटल क्लिंटन पद्धतीने व्हावा , पॉईंट्स अँड रीटोर्ट हे ज्ञानवर्धक असावेत, मेरी भैस को अंडा क्यू मारा टाईप नाही, अबांचे मुद्दे रुजू व्हावेत कारण त्यावर तुमच्याकडून स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट अपेक्षित असते, इतके तरी नक्कीच करू शकाल न?

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 4:21 pm | क्लिंटन

भाऊ तोरसेकरांच्या चॅनेलपासून धागा बराच भरकटतो आहे तरीही हा एक प्रतिसाद लिहितो. उर्वरीत चर्चा खरडवहीत करू. नाहीतर धागाच हायजॅक व्हायचा.

२०१२-१३ नंतर असे काय बदलले म्हणाल ?

बर्‍याच गोष्टी झाल्या. त्यापूर्वी ८-९ वर्षे भाजप समर्थक त्यांच्या पक्षाला अनुकूल परिस्थिती नव्हती म्हणून सबड्युड असायचे. पण २०१३ मध्ये मोदींसारखा चेहरा मिळाल्यानंतर ते पण आक्रमक झाले. त्यापूर्वी ८-९ वर्षे भाजप समर्थकांना दोनदा शतप्रतिशत हरविले वगैरे बोलले तरी त्याला काही प्रत्युत्तर देता यायचे नाही. मोदींनाही मौत का सौदागर, हिटलर वगैरे अनेक गोष्टी बोलल्या गेल्या तरीही त्या निमूटपणे ऐकून घ्याव्या लागत होत्या. पण २०१३ नंतर परिस्थिती एकदम पालटली. भाजप समर्थकांकडून नुसते अरे ला कारेच नाही तर उलटा हल्लाही सुरू झाला. मग दुसर्‍या बाजूकडूनही भक्त वगैरे म्हणणे सुरू झाले. या सगळ्यातून चर्चेची पातळी खालावली. अर्थात यात माझाही वाटा आहेच. दुसर्‍या कोणी भक्त म्हटल्यावर मी पण त्यांना गुलाम म्हटले आहे. काहीही असले तरी सुरवात कोणी केली, कुठून आणि कोणत्या कारणाने झाली हे सांगता येणे कठीण आहे. सुरवात २०१३ पासून झाली का की २००४ ते २०१३ मध्ये जे काही झाले त्याची ती प्रतिक्रिया होती हा पण दुसरा मुद्दा आहे. कारण काहीही असले, सुरवात कुठूनही झाली असली तरी चर्चेचा डिस्कोर्स खालावला ही सत्य परिस्थिती आहे.

दुसरे म्हणजे २०१२-१३ नंतरच्या काळात मिपावर काही सदस्य येणे जवळपास बंद झाले. त्यातले बरेच ऐसीवर गेले किंवा अन्य काही कारणांनी ते येणे बंद झाले. त्यांची मते बहुतेक वेळा पटायची नाहीत पण तरीही त्यांनी कधी मुद्दे सोडून वैयक्तिक चर्चा केली नव्हती. हे सदस्य येणे बंद झाल्यामुळे मुद्द्यावर आधारीत चर्चा करणारे, वैयक्तिक न होणार्‍यांचा आकडा कमी झाला.

अबांचे मुद्दे रुजू व्हावेत कारण त्यावर तुमच्याकडून स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट अपेक्षित असते,

हे सगळे करता येईल पण त्यासाठी मुद्देही तसेच हवेत ना? याच धाग्यात अबांनी म्हटले आहे की ती हिंसक कमेंट टाकणार्‍याला भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओमुळे चिथावणी मिळाली हे सिध्द होत होते. आता अशा दाव्यांवर स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट काय देणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:39 pm | अमरेंद्र बाहुबली

@संपादक मंडळ,
क्लिंटन, श्रीगुरूजी, ट्रंप आणी ईतर दोघेतीघे ह्या भाजप समर्थकांनी माझ्या विरूध्द मोर्चा ऊघडलाय. अतिशय खालच्या भाषेत माझ्यावर चिखलफेक केली जातेय हे वरील प्रतिसाद वाचून आपल्या लक्षात येईल. मी कुणालाही वयक्तिक काहीही बोललेलो नाही. ह्या लोकांनी केलेल्या दाव्यांवर मी फक्त पुरावे मागीतलेत, त्यामुळे ह्या लोकांची गोची झालीय. पवारद्वेष, ठाकरेद्वेष, मविआद्वेष ह्यावर लिहीलेल्या प्रतिसादांबद्दल मी ह्यांच्याकडे पुरावे मागीतले होते. कालच ट्रंप ह्यांचा ऊडालेला “ब्राम्हण कोण होते?” हा धागा ह्याची जिवंत साक्ष आहे. माझे विचार लोकांना पटत नसेल तर माझी हरकत नाही पण माझ्यावर जी वयक्तिक चिखलफेक हे लोक करताहेत ती त्वरीत थांबवण्यात यावी अशी विनंती करतो. व सदर सन्माननीय सदस्यांना समज देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

चिखलफेक? तुमच्यावर? नाही हो.. असे करणे/होणेच शक्य नाही. इतरांना तो अधिकार कसला? ती तर तुमची मक्तेदारी आहे! ;-)

@संपादक महोदय, मी मागेही राजेश१८८ या आयडी साठी लिहिलेले आहे. आज पुन्हा वेळ आली.
प्रत्येक धाग्याचा खफ करणे, लोकं भांडतील अशा पद्धतीने उकसवणारे/खोचक प्रतिसाद लिहिणे हे अबांचे नित्य काम झालेले दिसते. किंबहुना तेच करण्यासाठी इथे आलेले आहेत असे वाटायला लागले आहे. वर क्लिंटन देखील हेच म्हणताहेत. उलट मते असणे, हीटेड अर्ग्युमेंट्स होणे यात गैर नाही. ते उलट अपेक्षीत आहे. पण सतत अकारण असे करत राहणे कोणालाच आवडणार नाही. अबांना सांगून ते ऐकणारे नाहीत, कारण त्यांचा तो अजेंडाच आहे. त्यामुळे आपण योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती.

प्रसाद_१९८२'s picture

26 Jul 2022 - 2:58 pm | प्रसाद_१९८२

श्री अमरेंद्र बाहुबली यांनी सगळीकडे उच्छाद मांडला आहे.
---
+१००
ते राजेश११८ परवडले, असे म्हणण्यांची वेळ सध्या आली आहे. असंबध लिहित असले, तरी त्यांच्या प्रतिसादात किमान लॉजिक(?) तरी असे. इथे मात्र सगळ्याचीच बोंब आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 3:28 pm | अमरेंद्र बाहुबली

श्री अमरेंद्र बाहुबली यांनी सगळीकडे उच्छाद मांडला आहे. तुमचा धागा ऊडाला ज्यात तुम्हा पवारांवर खोटे आरोप केले होते, त्यामुळेच तुन्हाला असं वाटतंय ना?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jul 2022 - 12:14 pm | अमरेंद्र बाहुबली

क्लिंटन साहेब, ही बातमी जशीच्या तशी छापून आली होती वृत्तपत्रात नी भाऊंना खेटेही त्यामुळेच मारावे लागले होते. ओनलाईन एडीशन ला सापडली की टाकतो.
संबंधित आय.डी प्रत्येक ठिकाणी एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसाद देत असतो ते तुम्ही कसे चालवून घेता? माझे प्रतिसाद अद्न्यान मूलक आहेत हे जिथल्या तिथे सिध्द करा जसं मी मिपाचा खोट्याच्या प्रचारासाठी वापर होतोय हे दाखवून देतोय. तुम्हाला वाटतं म्हणून काही अद्न्यान मूलक ठरत नाही.
मिपावरही ऐसीप्रमाणे कधीही बघावे तेव्हा ३-४ पेक्षा कमी सदस्य हजर अशी परिस्थिती आल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? अर्थात तशी तुमचीच इच्छा असली तर आम्ही तरी काय करणार बापडे?
मिपावर गर्दी जमवून पवार, ठाकरे, मविआ ह्यांबद्दल खोटं लिहीनार्यांपेक्षा खरं लिहीनारे चारच आयडी असतील तरी चालेल असं मला वाटतं, बाकी मी पुरावे मागू लागल्यापासून मिपावर काहीही खोटं लिहानारे पांगलेत हे तुमच्या दृष्टीस आलंच आहे, एक धागा सुध्दा ऊडवला गेला, त्यात पवारांबद्दल खोटं लिहीलेलं होतं. धागाकर्त्याला वाटलं खपून जाईल, पण पुरावा धागा ऊडून दोन दिवस झालेत तरी देऊ शकले नाहीयेत लेखक महाशय.

क्लिंटन's picture

26 Jul 2022 - 1:52 pm | क्लिंटन

ही बातमी जशीच्या तशी छापून आली होती वृत्तपत्रात नी भाऊंना खेटेही त्यामुळेच मारावे लागले होते. ओनलाईन एडीशन ला सापडली की टाकतो.

लक्ष्मीकांत खाबियाने भाऊ तोरसेकरांविरोधात तक्रार दाखल केल्याची बातमी देऊ नका. ते मीच वर लिहिले आहे. तुमचा दावा पवाराना मारायची थेट धमकी कमेंट मध्ये होती नी त्या व्यक्तिला भाऊंच्या विडीओतून चिथावनी मिळाली असं सिध्द होत होतं. याचे पुरावे द्या. भाऊंच्या व्हिडिओतून नक्की कोणती चिथावणी मिळाली आणि कशी आणि मुख्य म्हणजे ते सिध्द कसे आणि कुठे होत होते हे बघायचे आहे. आणि ते पुरावे नसतील तर उगीच भारंभार कचरा मिपावर आणू नका.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2022 - 2:05 pm | श्रीगुरुजी

आकाशात एखादा ढग दिसायचा अवकाश, ढगफुटी होऊन प्रचंड पुरात शहर वाहून गेले अशी फेकाफेकी करणाऱ्यांना पुरावे मागायचे नसतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 4:54 pm | अमरेंद्र बाहुबली

भाऊ भक्तांना स्वप्नांच्या जगात नेतात पण निवडणूका वास्तवीक जगात आणतात.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 5:03 pm | टर्मीनेटर

निवडणूका वास्तवीक जगात आणतात.

+१
त्यांच्याच प्रतीक्षेत आहे 😀

कपिलमुनी's picture

25 Jul 2022 - 5:06 pm | कपिलमुनी

भाऊ पोटार्थी आहेत त्यामुळे पास..

उत्सुक लोकांनी भाऊ २०१४ पूर्वी काय लिखान करायचे .. तरूण भाऊंच्या पत्रकारीतेचा प्रवास ह्या गोष्टी शोधाव्यात..
भाजप साठी राणें इतकेच भाऊ पवित्र आहेत

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली

कसाबने तुरूंगातून भाजपसाठी एखआद पान लिहीलं असतं तर भआजपेयींनी त्यालाही पवित्र करून घेतलं असतं.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 5:11 pm | अमरेंद्र बाहुबली

कसाबने तुरूंगातून भाजपसाठी एखआद पान लिहीलं असतं तर भआजपेयींनी त्यालाही पवित्र करून घेतलं असतं.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 5:19 pm | टर्मीनेटर

भाऊ २०१४ पूर्वी काय लिखान करायचे

वेळ काढून वाचायला पाहिजे! जागता पहारा वर २०१२ चे २४ आणि २०१३ चे १३१ लेख दिसत आहेत 😳

रात्रीचे चांदणे's picture

25 Jul 2022 - 5:20 pm | रात्रीचे चांदणे

भाऊंचे विचार फारच एकतर्फी आहेत, जागता पाहरावर तसा त्यांनी इशातही दिलेला होता. एकतर्फी विचारांमुळे त्यांचे व्हिडीओ फारच कंटाळवाणे मलातरी वाटतात त्यामुळे बरेच दिवस झाले त्यांचा चॅनेल बघितला नाही. पण जे काही आहे त्याची ते शांतपणे मांडणी करतात.

टर्मीनेटर's picture

25 Jul 2022 - 5:38 pm | टर्मीनेटर

भाऊंचे विचार फारच एकतर्फी आहेत, जागता पाहरावर तसा त्यांनी इशातही दिलेला होता.

+१
त्यासाठीच लेखात "वाचायला सुरूवात केल्यावर मात्र त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही." हे लिहिले आहे.

पण जे काही आहे त्याची ते शांतपणे मांडणी करतात.

सहमत आहे, आक्रस्ताळेपणा नसतो. आणि म्हणूनच त्यांच्या लेखन / विवेचनातला आशय/राजकारणातील बारकावे समजून घेण्यासाठी मी त्यांना फॉलो करतो, त्यांचे सगळेच विचार/मते पटत नसली तरी!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 5:25 pm | अमरेंद्र बाहुबली

भाऊंच्या पवारांवरील टिपण्ण्या म्हणजे सुर्यावर थूंकण्याचा प्रकार.

भाऊंच्या पवारांवरील टिपण्ण्या म्हणजे सुर्यावर थूंकण्याचा प्रकार.

तसेही असू शकेल, शक्यता नाकारता येत नाही!
४२ दिवसात वाढलेले १ लाखाच्या वर सबस्क्रायबर्स आणि मिळालेले ५ कोटी Views हे कदाचित त्याचेच द्योतक असावेत 😀

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 6:34 pm | अमरेंद्र बाहुबली

गतधी साधी ग्रामपंचायत ही न लढलेले भाऊ जेव्हा पवारांचा कारकिर्दीवर टिका करताता तेव्हा त्यांचेच हसू होते हे त्यांच्या ईतकं वय वाढूनही लक्षात कसे आले नाही.

तुम्हि कधी लोकसभा निवडणुकीत उमेदवार होता का? विचारण्याचे कारण म्हणजे तुम्हि मोदी वर टिका करता म्हणजे तुम्हाला राज्य चालवण्यचा अनुभव असणार (तुमच्या वरील मतानुसार).

व्हिडीओ बघितल्यावर अभिप्राय देतो 🙏

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2022 - 6:13 pm | श्रीगुरुजी

भाऊ बऱ्याचदा समतोल बोलतात. पण बऱ्यापैकी कंटाळवाणी शैली आहे. पण जेव्हा उपहासगर्भ बोलतात तेव्हा रोचक बोलतात.

परंतु त्यांच्या मनात बाळ ठाकरेंना अढळ स्थान आहे. एकप्रकारची भक्ती म्हणता येईल. त्यामुळे बाळ ठाकरेंच्या चुकांवर फार क्वचित बोलतात किंवा खूप वरवर बोलतात. भाजपने सेनेकडून हिंदुत्व स्वीकारले असे हास्यास्पद निष्कर्ष भाऊंनी काढले आहेत. बाळ ठाकरे अत्यंत दिलदार, सत्तानिर्मोही, कॉंग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांशी वैयक्तिक मैत्री केली पण हातमिळवणी केली नाही, अगदी मुस्लिम लीग व आणिबाणीला पाठिंबा ही सुद्धा धूत राजकीय खेळी, सेनेमुळे भाजप महाराष्ट्रात उभा राहिला, १९६१ नंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते सेनेत गेले, १९८६ नंतर तत्कालीन समाजवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सेनेत गेले वगैरे निष्कर्ष वारंवार सांगतात जे बहुतांशी चुकीचे आहेत.

अमित शहांशी झालेल्या चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ठाकरे मुख्यमंत्रीपदाविषयी कधीही बोलले नव्हते हा भाऊंचा अजून एक दावा चुकीचा आहे. युती जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सेनेला निम्मा वेळ मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे युतीत ठरले आहे हे ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. याची चित्रफीत मी पाहिली होती. जुलै २०१९ मध्ये इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी स्पष्ट सांगितले होते की पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री असणार असल्याचे युतीचर्चेत ठरले आहे. सेनेचे इतर नेते प्रचारकाळात वारंवार मुख्यमंत्रीपदाविषयी बोलले होते. परंतु मतदानाची वेळ येईपर्यंत एकही भाजप नेत्याने विरोध केला नव्हता. भाऊ पत्रकार असूनही हे त्यांना का माहिती नसावे?

राज ठाकरे हे भाऊंचे अजून एक नीलाक्षतनय. आता राज योग्य पावले टाकताहेत, ते पुढील निवडणुकीत नक्कीच चमत्कार करून दाखविणार असे भाऊ २०१९ विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने सांगताहेत.

पुढील विधानसभा निवडणूक मविआ पक्ष एकत्र लढले तरी त्यांना एकत्रित ७५ पेक्षा कमी जागा मिळतील व भाजपला स्वबळावर किमान १७५ जागा मिळतील हे भाकीत भाऊ मागील काही महिन्यांपासून वारंवार करीत आहेत.

अर्थात भाऊंकडे जुनी माहिती खूप आहे. त्यांची काही भाकिते पूर्वी नक्कीच बरोबर आली आहेत. परंतु भाऊंपेक्षा सुशील कुलकर्णी व अनय जोगळेकर जास्त प्रभावी वाटतात. मी त्यांच्या काही चित्रफिती पाहतो, पण ते सांगतात त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही.

परंतु त्यांच्या मनात बाळ ठाकरेंना अढळ स्थान आहे. एकप्रकारची भक्ती म्हणता येईल.

सहमत! पण मला वाटतं हा एकट्या भाऊंचा दोष नसावा. कारण बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तिमत्वाची जादूच अशी काही होती की त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती मग ती आयुष्यात एकदाच का त्यांना भेटली असूदेत पण शक्यतो त्यांच्या विरोधात काही वाईट बोलतही नाही आणि त्यांच्याबद्दल काही वाईट/अपशब्द ऐकून घेण्याचीही त्याची मनस्थिती नसते, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. भाऊ तर नुसते त्यांच्या संपर्कातच नव्हते तर मार्मिकचे संपादक असल्याने काही वर्षे बाळासाहेबांच्या सहवासात होते त्याचा हा परिणाम असावा!

बाकीची तुम्ही दिलेली माहिती आणि निरीक्षणेही बरोबरच आहेत आणि म्हणूनच मी लेखात "त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही." हे वाक्य लिहिले आहे.

अर्थात भाऊंकडे जुनी माहिती खूप आहे. त्यांची काही भाकिते पूर्वी नक्कीच बरोबर आली आहेत.

+१००.
त्यांच्याकडची जुनी माहिती, संदर्भ हेच घटक बहुतेक वाचक/प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यात मोलाची भूमिका बजावत असावेत.
त्यांची नवीन भाकिते कितपत खरी ठरतात हे बघण्यासाठी मात्र निवडणुका होईपर्यंत वाट बघावी लागणार!
धन्यवाद 🙏

मुक्त विहारि's picture

25 Jul 2022 - 6:50 pm | मुक्त विहारि

भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2022 - 7:51 pm | धर्मराजमुटके

बर्‍याच जणांनी वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. माझीही प्रतिक्रिया थोड्याफार फरकाने सारखीच आहे. मात्र एखादा मराठी राजकारणावरील भाष्यकार एवढे दर्शक मिळवू शकतो हेच मोठे यश आहे. मराठी माणसाला राजकारण आणि क्रिकेट बायकोपेक्षा जास्त प्रिय असते असे कुठेतरी वाचले होते ते बहुधा खरे असावे.

कंजूस's picture

25 Jul 2022 - 8:12 pm | कंजूस

मराठी माणसाला राजकारण आणि क्रिकेट बायकोपेक्षा जास्त प्रिय असते असे कुठेतरी वाचले होते ते बहुधा खरे असावे.

खरेच आहे. होम मिनिस्टरमध्ये ( झी मराठी चानेलवरचा एक विनोदी कार्यक्रम) बऱ्याच महिलांनी हे सांगितले आहे. "बघण्याचा कार्यक्रमात नवऱ्याकडच्या सगळ्यांनी बघितले पण'ह्यां'नी बघितलेच नाही म्हणून दुसरा आणखी एक कार्यक्रम ठेवावा लागला."
"का?"
" ते क्रिकेट बघत होते आमच्याकडे टीवीवर."

अरेच्या चूकून स्टार्ट टाईम ३८:०० मिनिटांना सेट झालाय. सुरवातीपासून जरूर पहा. नक्की एन्जॅाय कराल.

सतिश गावडे's picture

25 Jul 2022 - 9:43 pm | सतिश गावडे

एखादा मराठी राजकारणावरील भाष्यकार एवढे दर्शक मिळवू शकतो हेच मोठे यश आहे.

ही Confirmation Bias ची किमया असू शकते.
त्या परिप्रेक्ष्यात एखाद्या विचारसरणीचे समर्थक जितके जास्त तितके त्या विचारसरणीच्या भाष्यकाराचे "यश" अधिक असेल.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2022 - 9:48 pm | धर्मराजमुटके

तोरसेकरांचे युट्यूब व्हिडीओ पासूनचे उत्पन्न
इथे भाऊ साधारण किती पैसे कमवत असतील याचा अंदाज येतो.

कपिलमुनी's picture

26 Jul 2022 - 12:15 pm | कपिलमुनी

भाऊ पोटार्थी आहेत असे वरती म्हणलो आहे ते याच साठी

डँबिस००७'s picture

26 Jul 2022 - 2:21 pm | डँबिस००७

अगदी बरोबर.
भाऊ तोरसकर हे पोटार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी बोललेल पास.
राजदीप सरदेसाई व बरखा दत्त सारखे हाडाचे पत्रकार भाऊ नाहीत.
महामहीन द्रौपदी मुर्मू जींच्यां निवडणुक जिंकल्यावर, पत्रकारांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्यात ते बघुन कोण किती व कसे कातडे ओढुन आहे हे लक्षात येते.

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 2:34 pm | जेम्स वांड

कपिलमुनींच्या मताशी मी सहमत असेलच असे नाही, कारण भाऊ पोटार्थी आहेत वा नाहीत, त्यांना पोटासाठी ते भलामण करतात किंवा विश्लेषण करतात त्या पक्षाकडून काय मिळते ते पण मला माहिती नाही, ती जबाबदारी कपिलमुनी घेवोत, माझे काही बेसिक प्रश्न आहेत फक्त.

१. भाऊ पोटार्थी आहेत ह्या विधानातून , बरखा/ राजदीप निस्पृह पत्रकार आहेत हे विधान अन निष्कर्ष कसे काढलेत ?

२. धागा भाऊंवर आहे, कॉमेंट भाऊंवर आहे, धागा अन कॉमेंटकर्त्यांच्या तोंडी कश्याला शब्द घुसवताय ?? ते जे बोललेत त्यांची जबाबदारी आहेच पण जे बोललेत त्याला प्रत्युत्तर बरखा राजदीप विकेलेले असणे नसणे कसे होऊ शकते ??

३. परत, धागा विषय भाऊ, कॉमेंट आली भाऊंवर त्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी म्हणणार , कश्यासाठी ? भाऊंचे पोटार्थी असणे चूक आहे असे पण म्हणलेलं दिसत नाहीये कॉमेंटकर्त्याने, मग गहजब कश्याला ? का भाऊ पोटार्थी आहेत हे विधान करण्यास कॉमेंटकर्त्याने इतरांना निस्पृह/ विकले गेलेले इत्यादी सर्टिफिकेट वाटणे कायद्याने बंधनकारक आहे म्हणताय ??

तुमचं आमचं काही वैयक्तिक वितुष्ट नाही बुआ (निदान आमच्याकडून तरी) पण एकंदरीत इतकी ढळढळीत लॉजिकल फॉलसी दिसली म्हणून विचारतोय, नक्की काय लाईन ऑफ थॉट्स आहे तुमची ??

राघव's picture

26 Jul 2022 - 3:38 pm | राघव

उपरोध आहे तो.

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 3:59 pm | जेम्स वांड

व्हॉट अबाऊटरी !?

डँबिस००७'s picture

26 Jul 2022 - 5:05 pm | डँबिस००७

भाऊ पोटार्थी आहे !!

ह्यात "पोटार्थी" शब्दालाच माझा आक्षेप आहे. जगात सगळेच पोटासाठीच काम करतात, राजदीप व बरखा त्याला अपवाद नाहीत.
बाकी माझा प्रतिसाद कपीलमुनीं यांना होता, तुम्ही कश्याला तसदी घेता ?

जेम्स वांड's picture

26 Jul 2022 - 5:48 pm | जेम्स वांड

आपल्या लक्षात आलं नसेल तर सांगतो,

मिसळपाव वर नेस्टेड अन थ्रेडेड व्युज पद्धतीने लेटेस्ट सगळ्यात खाली प्रकारात प्रतिसाद दिसतात, धागा स्क्रोल करताना ते 'दिसतात' दिसले की त्याला आम्ही 'प्रतिसाद' देतो, कारण

२००७ च्या गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली तीच मुळात "मराठी माणसाला व्यक्त होण्याचे एक व्यासपीठ" म्हणून, आता सांगा बरं तुमच्या विनंतीला मान देऊन तसदी घेऊ नको का मालकांच्या मेहनतीला प्रणाम करून थोडी घेऊनच टाकू तसदी म्हणे मी ?

ता.क. - फक्त कपिलमुनी ह्यांच्यासोबत जमाडीजम्मत प्रतिसाद गुप्तपणे खेळायचे असल्यास मिपा चालकांनी व्यनि उर्फ व्यक्तिगत निरोप सुविधा दिली आहे हं, किंवा खरडवही पण आहे, लाभ घ्या, ओपन थ्रेड वर प्रतिसाद येणारच, पचत अन पटत नसले तर तो तुमचा प्रश्न आमचा नाही.

जगात सगळे पोटार्थी असतात हा साक्षात्कार व्हायचा मुहूर्त अंमळ मजेशीर वाटला इतकेच... असो, तुमचे म्हणणे मान्य ! जगात सगळे पोटार्थी आहेतच, हे सुलभ ज्ञान जरूर लक्षात ठेवेन :)

डँबिस००७'s picture

26 Jul 2022 - 2:21 pm | डँबिस००७

अगदी बरोबर.
भाऊ तोरसकर हे पोटार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी बोललेल पास.
राजदीप सरदेसाई व बरखा दत्त सारखे हाडाचे पत्रकार भाऊ नाहीत.
महामहीन द्रौपदी मुर्मू जींच्यां निवडणुक जिंकल्यावर, पत्रकारांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्यात ते बघुन कोण किती व कसे कातडे ओढुन आहे हे लक्षात येते.

मदनबाण's picture

25 Jul 2022 - 10:04 pm | मदनबाण

मी भाऊंचे लेखन त्यांच्या ब्लॉगवर जाऊन काही काळ वाचले होते, त्याचे प्रतिपक्ष या चॅनलवरील व्हिडियो मी अधुन-मधुन पाहत असतो.
मराठी मेनस्ट्रीम मिडिया आणि पत्रकार जे विष्लेषण करत नाहीत त्याच गोष्टींवर भाऊ उत्तम विश्लेषण करतात ते देखील कोणतीही लिखित माहिती त्यांच्या समोर न ठेवता.
मला स्वाती तोरसेकरांचे व्हिडियो देखील विशेष आवडतात कारण त्या राजकारण सोडुन इतर विषयांवर भाष्य करतात. भाऊंनी देखील इतर विषयांवर बोलायला हवं कारण सात्यत्याने राजाकारावरील विवेचन कंटाळवाणे होते. [ मला तरी व्यक्तिगत रित्या सारखं राजकारणावरच भाष्य केलेले पहायला / वाचायला आवडत नाही. ] अगदी उदा. म्हणुन हल्लीच एक मोठी घटना झाली, ती म्हणजे चीनला मागे टाकुन हिंदूस्थानच्या अदानी समुहाने इस्रायलच्या हायफा बंदराचे ३१ वर्षासाठी असलेले कंत्राट मिळवले आहे. या विषयावर भाऊंचे किंवा स्वाती तोरसेकरांचे भाष्य यायला हवे होते असे एक मराठी श्रोता म्हणुन मला वाटते.
भाऊंची दाणगी स्मरणशक्ती आणि त्या आधारे संदभ देण्याची हातोटी उल्लेखनीय आहे. स्व:ताला जास्त तात्रिक माहिती नसुन देखील त्यांनी उत्तम विश्लेषण वेळोवेळी केलेच आहे पण यात उत्तम असे यश मिळवले आहे ही नक्कीच कौतुकाची आणि उल्लेखनिय बाब आहे. या धाग्याच्या निमित्त्याने त्यांचे मी या यशा बद्धल मनःपूर्वक अभिनंदन करतो.

जाता जाता :- त्यांच्या चॅनल कडुन राजकारणा बरोबरच हिंदूस्थानाच्या दृष्टीकोनातुन महत्वाच्या ठरणार्‍या आणि घडणार्‍या महत्वाच्या घडामोडींवर देखील भाष्य करावे अशी एक दर्शक आणि श्रोता म्हणुन माझी इच्छा व्यक्त करत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin Sanghvi

कानडाऊ योगेशु's picture

26 Jul 2022 - 3:53 pm | कानडाऊ योगेशु

शीर्षकातली काही शब्दच नवे लेखन मध्ये दिसत होते ते पाहुन वाटले कि भाऊंनी मिपाचे सदस्यत्व घेतले कि काय?

राघव's picture

26 Jul 2022 - 4:42 pm | राघव

हा हा! भारी! :-)

शिनुमासंबंधित तारे,तारका,घटना यांवर कोण बोलतात चांगले?

करोना काळात काही भाऊंचे काही व्हिडिओ पाहिले होते.खुप विश्लेषणात्मक वाटले.म्हणजे एखाद्याला सवय,आवड लागेल,परत ऐकावे वाटतील एवढा आशय नक्कीच मिळतो.

छान लेख धागा आहे.

गामा पैलवान's picture

27 Jul 2022 - 3:09 am | गामा पैलवान

भाऊरावांच्या लेखनाचा चाहता आहे. त्यांचा व्यासंग अफाट म्हणू की दांडगा. पण ती चलचित्रं पाहणं नको वाटतं. एकतर ती वेळखूप घेतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संदर्भ म्हणून उल्लेखता येत नाहीत. त्याकरता लेख बरे पडतात. पण काये की भाऊंरावांचं वय झालं असल्याने लेखन टंकण्याचा ताण असू शकतो. मराठी बोललेलं तत्काळ छापण्याची सुविधा कुठे मिळेल काय?

-गा.पै.

कंजूस's picture

27 Jul 2022 - 9:52 am | कंजूस

English to Marathi translator
(( https://play.google.com/store/apps/details?id=free.translator.englishtom... ))by CrazyDeveloperG
Available on Android 8 - 12
10k wordsही भाषांतर करते पटकन. बोललेलं टाईपही होतं.

गा.पै. यांच्याशी सहमत. त्यांचा जवळजवळ प्रत्येक लेख वाचत असे, बऱ्याचदा प्रयत्न केला पण ते व्हिडिओ पाहणं काही जमत नाही. लेखाची मजा व्हिडिओत नाही.

शाम भागवत's picture

27 Jul 2022 - 12:40 pm | शाम भागवत

मी स्पीड १.५ करतो. माझी तूनळी वर्गणी प्रिमीयम स्वरूपाची असल्याने मोबाईलचा स्र्कीन ऑफ केला तरी चालतो. मोबाईल हातात किंवा खिशात ठेवयचा. कानात इअर बडस घालायची. घरात बसून किंवा कामे करता करता हिंडत फिरत ऐकता येते. मात्र आपण घरात एकटेच असलो तर फोन आला किंवा घरातील कोणी आपल्याशी बोलल्यास झटकन कळत नाही. त्यासाठी एकाच कानात इअर फोन घालायचा. तेवढे पुरते.

मस्त वेळ जातो. पूर्वी खूप श्रीमंत लोकं वर्तमानपत्रे / आलेली पत्रे वाचून दाखवायला माणसे ठेवायची. अगदी ती सर्वीस मिळते.
:)

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2022 - 4:53 pm | श्रीगुरुजी

भाऊ किंवा तत्सम तूनळी चित्रफीती मी पहात नाही, भ्रमणध्वनीवरील आवरण मिटवून फक्त बोलणे ऐकतो व ऐकताना इतर काही काम सुरू असते.

हे मी शेखर गुप्ता इत्यादी हिंदी पत्रकारांच्या बाबतीत करतो. भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि मुद्द्यावर यायला वेळ घेतात की ऐकत असलो तरी लक्ष कधीच भलतीकडे गेलेले असते.

मला आठवते त्याप्रमाणे भाऊ सामना पेपरात काही काळ तरी नक्कीच होते, त्यामुळं बाळासाहेब, राज ठाकरे इत्यादी मते ही तिथून आलेली आहेत, ती तशीच असणार.

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2022 - 11:18 am | श्रीगुरुजी

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत. बरेचसे सेनेकडे, काहीसे भाजपकडे झुकलेले आहेत. पण खूप सभ्य व उपरोधिक बोलतात. त्यांच्याकडे खूप माहिती सुद्धा आहे.

सतिश गावडे's picture

28 Jul 2022 - 11:46 am | सतिश गावडे

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.

भाऊंचे व्हिडिओ पाहवत नाहीत, सादरीकरण आणि भलामण ही दोन कारणे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा "जागता पहारा" हा ब्लॉग वाचनीय होता, पण भाऊंनी नंतर लेखनाचा गियर बदलला आणि त्या ब्लॉगची रया गेली.

तर ही जेव्हा ब्लॉग वाचनीय होता तेव्हाची गोष्ट. भाऊ लिखाणातील दोन पार्टी कोण आहेत यावरून कुणाला झुकते माप द्यायचे हे ठरवत असावेत बहूधा तेव्हा.

म्हणजे दोन भावाविषयी ते काही लिहीत असतील तर धाकट्या भावाची बाजू घ्यायचे. जर राज्य आणि देशपातळीवरील उजव्या बाजू असतील तर ते राज्यपातळीरील उजवी बाजू लावून धरायचे. आणि उजवे विरुध्द इतर अशा सामन्यात ते अर्थातच उजव्या बाजूने असायचे.

मधल्या काळात जी बाजूंची गुंतागुंत झाली त्यात कोणती बाजू घ्यायची हे ठरवताना कदाचित त्यांचा गोंधळ उडाला असेल :)

शाम भागवत's picture

28 Jul 2022 - 11:15 am | शाम भागवत

भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि मुद्द्यावर यायला वेळ घेतात की ऐकत असलो तरी लक्ष कधीच भलतीकडे गेलेले असते.

अगदी. अगदी.
:)

भाऊची विश्लेषणची शैली आवडते. सामान्य लोक कशी विचार करतात ते कळते. बरेचदा मोठे मोठे पत्रकार त्यांच्या दुनियेत वावरत असतात.
त्यांच्या चित्रफिती सातत्याने बघणे कामामुळे व इतर व्यापामुळे जमत नाही. जेव्हा महत्वाची गोष्ट होते, निवड्णुक असते तेव्हा ते बघण्याचा प्रयत्न करतो.

कंजूस's picture

28 Jul 2022 - 12:51 pm | कंजूस

अर्ध्या तासाच्या वक्तव्यात सहा मुख्य वाक्ये असतात.

शाम भागवत's picture

28 Jul 2022 - 3:02 pm | शाम भागवत

हो.

डँबिस००७'s picture

28 Jul 2022 - 2:29 pm | डँबिस००७

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.

भाऊ नि:पक्षपाती असावेत असा आग्रह का ?
जर आयडल सिचुएशन मध्ये पत्रकार म्हणुन नि:पक्षपाती असावेत असा दावा असेल तर तो दावाच चुकीचा आहे कारण ही आयडल सिचुएशन नाही आणि सर्व पत्रकारांनी आपापले पक्ष निवडलेले आह्रेत. त्यात वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, राजदिप सर देसाई, बरखा दत्त,
विनोद दुआ, रविश कुमार, प्रणय जेम्स राय , राहुल कंवल इतकेच कायतर लल्लन टॉपचा ह्रषभ द्विवेदी, लाँड्रीचा सिकरी "द वायरचा" सिद्धार्थ वरदराजन हे सगळे डावे धार्जीणे लोक आहेत.

भाऊ तोरसेकर हे पत्रकार आहेत असे वाटत नाही. म्हणजे, कि ते ऑन ग्राउंड जाऊन नवीन माहिती आणतात असे काही दिसले नाहीये. ते घरबसल्या बातम्या वाचतात आणि त्यावर त्यांची मते सांगतात. राजकीय विश्लेषक हे पत्रकार म्हणण्यापेक्षा योग्य ठरेल.

त्यांच्या बातम्यांचा परीघ अगदी लहान असतो असा माझा समज आहे. एकूण, आपल्याला माहित असलेली व पाच मिनिटांत ऐकता येईल अशी बातमी, एकाच बाजूने रटाळपणे ३०-४५ मिनिटं ऐकणे हे दिव्य लोकं कसकाय करतात ह्याचे आश्चर्य वाटते. मला व्यक्तिष: या प्रकारात फारसे मूल्यवर्धन दिसत नाही. हा, काही ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी ते चांगली सांगू शकतात, आपल्या क्लिंटन साहेबांप्रमाणे. पण आपला त्यातला रस मर्यादित असल्याने त्यासाठी इतका रटाळ व्हिडीओ बघणे शक्य नाही.

आमच्या घरातले अनेक वयस्कर लोक झोपताना भाऊ तोरसेकरांचा व्हिडीओ लावतात आणि घोरू लागतात.

शाम भागवत's picture

28 Jul 2022 - 3:01 pm | शाम भागवत

आणि घोरू लागतात.
:)))

सतिश गावडे's picture

28 Jul 2022 - 3:00 pm | सतिश गावडे

भाऊ नि:पक्षपाती असावेत असा आग्रह का ?

आहे आग्रह. तुम्ही पण धरा ना तसा आग्रह तुम्ही यादी दिलेल्या पत्रकार लोकांकडून. =))

गंमतीचा भाग सोडा, असा कुणाचा काही आग्रह दिसत नाही. माझा तरी नाही. धागा भाऊंच्या विषयी असल्याने केवळ निरीक्षण व्यक्त केलंय. तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहात.

जेम्स वांड's picture

28 Jul 2022 - 9:35 pm | जेम्स वांड

तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहात

सहमत.

शाम भागवत's picture

28 Jul 2022 - 3:11 pm | शाम भागवत

YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावर

मी फॅमिली पॅक घेतो. त्यामुळे मी व घरातील आणखीन ५ जणांना प्रमिअम वर्गणीचे फायदे मिळतात. आपण ५ ईमेल ॲड्रेस फक्त कळवायचे असतात.
महिना ₹१८९. ६माणसांना म्हणजे दरदिवशी दरमाणसी ₹१ एवढाच खर्च येतो. मला तरी फुकट घेण्यापेक्षा थोडे पैसे मोजले की बरे वाटते.

आणि त्यात कमी साईजचा विडिओ डाऊनलोड करतो.( दहा पंधरा एमबी) मग तो हवातसा प्लेब्याक करून पाहतो. म्हणजे पर्यटनचे विडिओ असेच पाहतो. बऱ्याच विडिओत काही विशेष
नसतं. वेळ आणि डेटा वाचतो.

(( पण हे youtube go app गूगलने हल्लीच काढून टाकले आहे. ))फोनमध्ये डाउनलोड केलेले असेल तर डिसेंबरपर्यंत चालेल.

धर्मराजमुटके's picture

28 Jul 2022 - 9:55 pm | धर्मराजमुटके

कोणाकडे भाऊ तोरसेकरांचा संपर्क क्रमांक असेल किंवा विरोपाचा पत्ता असेल तर ह्या चर्चेचा दुवा पाठवून द्या.

अनन्त अवधुत's picture

29 Jul 2022 - 11:23 am | अनन्त अवधुत

पण त्यांनी लिहिणे बंद केले आणि व्हिडीओ कडे वळले. मी मोबाईल वर फार काही ऐकत नाही आणि व्हिडीओ पण पाहत नाही. त्यामुळे त्यांचा एकही व्हिडीओ पाहीला नाही. त्यांच्या लिखाणाचा मात्र पंखा आहे, कारण त्यांचे संदर्भ. जुने संदर्भ देण्याची त्यांची हातोटी खूप चांगली आहे.