फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे.
१ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला. कार्तिकने त्या सामन्यात ३ चौकार व १ षटकारासह २८ चेंडूत ३१ धावा केल्या आणि भारताच्या पहिल्यावहिल्या टी-२० विजयात सामनावीर होण्याचा मान पटकावला.
१७ जून २०२२… भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालकेतील चौथा सामना.. प्रथम फलंदाजी करताना भारताची टॉप ऑर्डर कोसळली…भारत १३ षटकांत ४ बाद ८१.. इथेपण हिंदी चित्रपटात गुंडांच्या तावडीत सापडलेल्या हिरॉइनला सोडवायला जसा हिरो धावून येतो तसाच दिनेश कार्तिक संघाच्या मदतीला धावून आला. त्याने २७ चेंडूत ५५ धावा करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली..आणि इथेही सामनावीरचा किताब दिनेश कार्तिकलाच मिळाला. या दोन घटनांमधील अंतर आहे १५ वर्षे. या कालावधीत भारतीय क्रिकेट मध्ये अनेक उलथापालथी झाल्या. जुन्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली. काही खेळाडूंनी अगदी थाटामाटात क्रिकेट करिअर चालू केले पण अल्पावधीतच त्यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला... काही खेळाडू लंबी रेस का घोडा वाटत होते पण त्यांच्या कारकिर्दीला कधी सुरुंग लागला समजलच नाही. पण दिनेश कार्तिक मात्र कायम राहिला..त्याच्या वैयक्तिक आयुष्यात १-२ वादळ येऊन गेली पण कार्तिकने कधीच हार मानली नाही.
दिनेश कार्तिकने २००४ साली वयाच्या १९ व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध भारतासाठी पहिला सामना खेळला. या सामन्यात तो फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नाही. पण विकेटकीपिंग करताना त्याने माइकल वॉनला अत्यंत चपळाईने स्टंपआउट केलं. त्यादरम्यान भारतीय टीम व्यवस्थापन एका चांगल्या यष्टिरक्षक फलंदाजाच्या (wicket keeper batsman) शोधात होती. दिनेश कार्तिकच्या रुपात तो मिळाला असं वाटू लागलं. पण जशी लांब केसांच्या धोनीची भारतीय क्रिकेट मध्ये एन्ट्री झाली तसा कार्तिक बाहेर पडत गेला. त्यानंतर तो २००७ चा विश्र्वचषक खेळला, भारतीय संघात तो आत बाहेर होतच राहिला. या सगळ्या दरम्यान २०१२ साली कार्तिकला आपल्या बायकोचे आपलाच टीममेट मुरली विजयशी अफेयर असल्याचं समजलं. हा कार्तिकच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता… यांनतर अनेकांना वाटलं की कार्तिक आता पुन्हा क्रिकेट च्या मैदानावर दिसणार नाही. त्याच्याजागी आपल्यासारखा एखाद दुसरा असता तर सगळं हरलो म्हणून निराशेच्या गर्तेत गेला असता.. पण कार्तिकने हार मानली नाही. भारतीय क्रिकेट मध्ये धोनी राज चालू असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळत नव्हते. पण त्याच्यातील क्रिकेट कधीच थांबल नाही. तो तामिळनाडू कडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिला. तेथील कित्येक युवा खेळाडूंच करिअर घडवण्याचं काम त्याने केले. आयपीएल मध्ये पण त्याचा धमाका चालूच होता. याच जोरावर त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले.
२०१८ ला श्रीलंकेमध्ये निदास ट्रॉफी (Nidhahas Trophy) चालू होती. भारत विरुद्ध बांगलादेश अंतिम सामना होता. १६७ धावांचा पाठलाग करताना भारताची १८ षटकांत पाच बाद १३३ अशी अवस्था झाली होती. शिखर धवन, रोहित शर्मा, के एल राहुल असे धुरंदर फलंदाज तंबूत परतले होते. भारताला १२ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता होती. भारत पराभवाच्या छायेत होता.. बांगलादेशच्या खेळाडूंनी तर नागीण डान्स वैगेरे करून विजयाचा जल्लोष करायला सूरवात देखील केली होती. पण त्याचवेळी मैदानावर कार्तिकची एन्ट्री झाली. त्यादिवशी कार्तिकने बांगलादेशी गोलंदाजीची अक्षरशः लक्तरे काढली. त्याने २ चौकार व ३ षटकरांसह फक्त ८ चेंडूत २९ धावा काढल्या आणि हारलेला सामना जिंकवून दिला. त्या दिवसानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी आजतागायत नागीण डान्स काही केलेला नाही. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सुद्धा त्याची निवड झाली. त्या स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात दिसला नाही. २०२० ला त्याने अचानक कोलकाता नाईट रायडर्स च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. यानंतर सगळीकडे चर्चा चालू झाली की कार्तिकला कोलकाता ने कलटी दिली… कार्तिक संपला.. पण त्यामागचं खर कारण वेगळंच होत, त्याच्या बायकोचं miscarriage झाल होत. तो यूएई मधून भारतात यायला निघाला पण त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तू माझी काळजी करू नको, तू खेळ. कौटुंबिक संकटाला सामोरे जाताना त्याच्यावरचा ताण थोडासा कमी करण्यासाठी कोलकाता ने त्याला कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं होत. २०२१ मध्ये तो भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान समालोचकच्या (Commentator) भूमिकेत पण दिसला. आता सहसा निवृत्त झालेले खेळाडूच कॉमेंटरीच्या नादाला लागतात, यामुळे पुन्हा एकदा सर्वांना वाटू लागलं की कर्तिकची कारकीर्द संपली. काहींनी त्याच्या रिटायरमेंट चे स्टेटस सुद्धा ठेवायला सुरवात केली. कोलकाता संघाने देखील त्याला मेगा ऑक्शन आधी संघातून रिलिज केलं होत.
पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत हिंदी चित्रपटातील हिरो प्रमाणे त्याने आधी आयपीएल आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये धडाकेबाज एन्ट्री केली.
२०२२ च्या आयपीएल ऑक्शन मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने ५.५० करोड मोजून त्याला संघात घेतले. इथेसुद्धा अनेकांनी त्याच्या सलेक्शन वर शंका घेतली. आरसीबीला तेवढ्याच किंमतीत आणखी चांगला फलंदाज मिळाला असता, ३६ वर्षाच्या कार्तिकचा संघाला काहीएक उपयोग नाही वैगेरे वैगेरे... पण ज्यावेळी आयपीएल २०२२ ला सुरवात झाली तेव्हा कार्तिकने आपल्या धडाकेबाज फिनिशिंग खेळीने सर्वांची बोलती बंद केली. ज्या कार्तिक वर हा आता संपलाय असा शिक्का बसला होता त्याने एकट्याच्या जीवावर सामने फिरवले. भल्या भल्या गोलंदाजांना लोळवले. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १८३.३३ च्या Strike Rate ने ३३० धावा कुटल्या. आयपीलमधील कामगिरीच्या जोरावर त्याची भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी निवड झाली. आतातर २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी पण त्याचा विचार चालू आहे. ज्या लोकांनी तो संपला अशी गर्जना केली तेच लोक कार्तिक सारखा एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असणारा फलंदाज नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी निवडला जावा अशी मागणी करत आहेत.
आयपीएल सुरू असताना दिनेश कार्तिक बद्दल Social Media वर एक पोस्ट फिरत होती..दिनेश कार्तिकला त्याच्या बायकोच्या पोटात दुसऱ्याच बाळ आहे हे समजलं..त्यानंतर तो दारू प्यायला लागला, देवदास झाला, त्याने क्रिकेट सोडून दिले.. त्याला आयपीएल संघातून काढून टाकलं.. तमिळनाडूची कॅप्टन्सी त्याच्याकडून काढून घेतली. तो जीव द्यायला निघाला होता असं बरच खोटं त्यात लिहल होत... त्या स्टोरी मध्ये इतका मसाला होता की, बॉलीवूडचा चित्रपट निघाला असता. पण ती स्टोरी फेक होती. मसाला लावलेल्या स्टोरीला व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही पण त्यानादात खरी स्टोरी कुठेतरी मागे राहते आणि ज्या माणसाला क्रेडिट मिळायला पाहिजे त्याला ते मिळत नाही. पण कार्तिक ना कधी जीव द्यायला निघाला होता ना कधी त्याने क्रिकेट सोडलं. त्याने प्रत्येकवेळी एका नव्या उर्जेसह स्वतःला पुन्हा उभ केलं. त्याने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली.
कार्तिक हा फक्त क्रिकेट खेळाडूंसाठी नाही तर सततच्या अपयशामुळे बेजार झालेल्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा बनला आहे. कितीही संकट आली, कितीही पिछेहाट झाली तरी शेवटपर्यंत माघार न घेता अपना टाइम आयेगा म्हणत लढत राहायचं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची हाच धडा दिनेश कार्तिक आपल्याला देऊन जातो..
प्रतिक्रिया
23 Jun 2022 - 5:05 pm | चौथा कोनाडा
+१
अपयशातून बाहेर यायला प्रचंड शक्ति एकवटावी लागते, दिनेश कार्तिक हे करू शकला हे थक्क करणारे आहे !
हॅटस् ऑफ दिनेश कार्तिक !
झकास +१ लिहिलंय सुजित जाधव !
23 Jun 2022 - 5:05 pm | मोहन
कार्तिकचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण तो लेखातून छान उलगडला आहे.
23 Jun 2022 - 6:04 pm | खेडूत
छानच! लेख आवडला.
दिनेश कार्तिकला खूप शुभेच्छा!
24 Jun 2022 - 12:08 am | श्रीगुरुजी
खूप छान लिहिलंय. त्याचे वाढलेले वय लक्षात घेता तो अजून फार तर एखादे वर्ष भारतासाठी खेळू शकेल.
25 Jun 2022 - 11:33 pm | सुजित जाधव
हो अजून एक वर्ष खेळेल...भारताने या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याने फिनीशर म्हणून चांगला खेळ केला तर त्याचा इतक्या वर्षांचा संघर्ष व संयम सार्थकी लागेल...
24 Jun 2022 - 1:11 pm | श्वेता व्यास
निदास ट्रॉफी मधील सामना पाहिल्यापासून या खेळाडूविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाला होता की या खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार न्याय मिळाला नाही. बाकीची वैयक्तिक माहिती आताच समजली. नक्कीच यापुढेही तो काहीतरी मार्गदर्शक करत राहिलच. दिनेश कार्तिकला शुभेच्छा!
25 Jun 2022 - 11:24 pm | सुजित जाधव
चौथा कानोडा, मोहन, खेडूत, श्रीगुरुजी, श्वेता व्यास... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार...
26 Jun 2022 - 6:02 pm | सुखी
मस्त लिहिलंय... दिनेश कार्तिक आवडता खेळाडू आहे..
https://youtu.be/dkiZK7PIJL4
4 Jul 2022 - 1:14 pm | चावटमेला
दिनेश कर्तिक हा खरं तर खूप गुणी खेळाडू, पण बर्याचदा आपल्यातील क्षमतेला योग्य न्याय देवू न शकल्यामुळे म्हणा किंवा धोनी च्या संघातील आगमनामुळे म्हणा, तो काहीसा झाकोळून च गेला. २००७टी २० विश्वचषकात त्याने स्लिपमध्ये डावीकडे सूर मारून घेतलेला अप्रतिम झेल, निदाहास ट्रॉफी फायनल मधील सनसनाटी खेळी, अशा काही मोजक्या प्रसंगांतून तो स्वतःच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देत राहिला, पण सातत्य कधीच राखता आले नाही. ह्या आयपीएल मध्ये मात्र फॉर्म ऑफ हिस लाईफ मधे होता. देव करो आणि ह्य टी २० विश्व्चषकात खेळून तो उंचावण्यात योगदान द्यावे, म्हणजे कार्तिक पुराण सुफळ संपूर्ण होईल
8 Jul 2022 - 9:58 am | अभिजीत अवलिया
छान लेख.
निदास ट्रॉफी मधील अंतिम सामना अजूनही आठवतो. बांगलादेशच्या खेळाडू व समर्थकांना तर प्रचंड धक्का बसल्यासारखे वाटत होते दिनेशच्या खेळीनंतर. अजूनही बर्याचदा यू टूयूबवर त्याची ती लाजवाब खेळी पाहत बसतो मी.