का ? का? का?

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
9 Jun 2022 - 1:30 pm

मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा-

१) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं. काही वेळा अनेक जण तिला (फारसं महत्त्वाचं कारण नसताना)छळत असतात.

२) कुठलीतरी एक सत्य गोष्ट कुणीतरी,कुणापासून तरी लपवत असतं आणि त्यावर एक वर्षभर मालिका चालते.

३) प्रत्येक मालिकेत नायक, नायिका यांचं प्रेम जमायला किमान एक वर्ष तरी लागतंच. मग त्यांच्या लग्नात विघ्नं येतात. अनेक संकटांनंतर त्यांचं लग्न लागतं.(एकदाचं) एकदोनदा तर भलत्याच माणसाशी तिचं लग्न होण्याचा प्रसंग उभा ठाकतो. तो भलता माणूस खलप्रवृत्तीचाच असतो. पण त्या खलनायकाचं "एखादं सत्य" बाहेर येतं आणि प्रसंग टळतो आणि काळजीत पडलेला महिलावर्ग सुस्कारा सोडतो. मालिका कोणतीही असो. कथानक हेच म्हणजे अगदी हेच.

४) एखाद्या मालिकेत एखादी घटना, प्रसंग पाॅप्युलर झाली की झाडून सगळ्या मालिकांमध्ये तेच घडलेलं दाखवतात. सध्या नायिकेला एखादी मुलगी असलेली दाखवण्याची टूम आहे.

५)आपण साजरे करत असलेले सर्व सण मालिकांमध्ये ही साग्रसंगीतपणे साजरे होतात. प्रत्यक्षात पाडवा, मालिकेत पाडवा.प्रत्यक्षात दिवाळी, मालिकेत दिवाळी.

६) मालिकेतल्या लग्नात हळद लावणे,औक्षण करणे, सप्तपदी,हार घालणे हेच विधी दाखवतात. लग्नात खूप कमी माणसं असतात पण हाॅल खूपच दिमाखदार सजवलेला असतो. मेहेंदी, संगीत,जोडे लपवणे इ.महाराष्ट्रीय लग्नात नसलेले विधी हमखास दाखवले जातात.

७) मालिकेत आजारी माणसाला नेहमी फक्त आणि फक्त टोमॅटोचंच सूप देतात.

८)जेवणाचं ताट नेहमी पूर्ण वाढलेलं असतं. भरपूर भात,चार पोळ्या, आमटी,भाजी,इ.इ.(हाॅटेलातली राईस प्लेटसारखी एकवाढ करुन टाकलेली) मग ते जेवणारं एखादं लहान मूल असो की आजारी माणूस असो, की म्हातारं माणूस असो. दूध सुद्धा पूर्ण ग्लासभर आणायचं. ते पिणारी व्यक्ती कुणीही असो.

९) मालिकेत पात्रांचे स्वभाव अचानक बदलतात. पूर्वी दुष्ट असलेली मामी, काकू अचानक चांगली वागू लागते. तर चांगली सासू सुनेवर विषप्रयोग करण्याइतकी दुष्ट बनते.

१०)दिवा विझणे ,उजवा कौल,डावा कौल इ.अंधश्रद्धांचा(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.)सुकाळ असतो. देवादिकांवर, कुण्या स्वामी, महाराजांवर तर कित्येक मालिका आहेत. भोळ्या भाबड्या अशिक्षित भारतीय जनतेला त्या खऱ्या वाटतात ,ही वस्तुस्थिती आहे.

११) मालिकांमध्ये पाणी पाजणे हा प्रकार सर्रास घडत असतोच असतो. कुणी बाहेरून आलं रे आलं की तत्क्षणी,"बसा हं,मी पाणी आणते."कुणी संतापलं की"तुम्ही आधी पाणी प्या."(टेबलावर पाण्याचा भरलेला जार आणि ग्लास तयारच असतो.) कुणी घाबरलं, पाणी पाजा. कुणी उत्तेजित झालं, पाजा पाणी. अरे किती पाणी पाजाल!

१२) खुद्द नायिका,तिची सासू,जाऊ, थोडक्यात मालिकेत काम करणाऱ्या सर्व स्त्रिया रात्री झोपताना सुद्धा अंगावर भरजरी कपडे, सर्व दागिने घालून झोपतात. झोपेतून जागे झाल्यावर त्यांचे केस जराही विस्कटलेले नसतात. ॲक्सिडेंट होऊन हाॅस्पिटलला ॲडमिट असले तरी मेकअप,आयलायनर, लिपस्टिक,केस सगळं शाबूत!

१३) मालिकेत मोठमोठे बंगले असतात पण नोकरमाणसं मुळीच नसतात. एखादी जादा शहाणी स्वयंपाकीण असेल पण झाडूपोछावाली बाई दिसणार नाही. (सिनेमासाठी किंवा कॉमेडी शो साठी राखीव?)

१४)भाषा तर विचारुच नका "तुला हसतात"नाही"तुझ्यावर हसतात"."मला मदत कर"नाही."माझी मदत कर.""तुझ्या बाबतीत हे काय घडलं?"नाही."तुझ्यासोबत हे काय घडलं?"
"मैं तुमसे प्यार करता हूॅं।"ऐवजी मैं तेरे पर प्यार करता हूॅं।"असं म्हटलं तर चालेल का?

१५) मालिकेत नायिका नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा जास्त दिवस गरोदर राहते. अनंत काळ. घरातील सर्वांचं कल्याण होईपर्यंत दिग्दर्शक तिला काही बाळंत होऊ देत नाही. कित्येक महिने तिचं पोटही मोठं दिसत नाही. पाळी चुकल्यापासून लगेच तिची काळजी घ्यायला सुरुवात!"तू वाकू नको,काम करु नको, विश्रांती घे."इ.इ.आम्ही सामान्य बायका नवव्या महिन्यापर्यंत काम करतो!

असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. निर्माते तेच दाखविणार आणि इतर पर्याय उपलब्ध असूनही आमच्यासारखे लोचट प्रेक्षक ते बघणार, त्याच त्याच जाहिरातींसकट!

..कुटे ग्रुपचे गुड मॉर्निंग तूप, दूध, तिरुमला ऑइल खा, मजेत रहा. हॅपीनेसची चिंता डोन्ट वरी..

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2022 - 1:46 pm | श्रीगुरुजी

१) प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक भागात एक महिला दुसऱ्या महिलेला थोबाडीत मारण्याचा एक प्रसंग असतोच.

२) बहुतेक सर्व मालिकांमध्ये महिलाच खलनायिका असतात.

३) मालिकांमधील सध्याच्या काळातील महिला सुद्धा नवऱ्याला अहो जाहो म्हणतात.

४) पाणी घालून ताक किंवा आमटी वाढवावी, तसे प्रत्येक मालिकेत अतर्क्य प्रसंग आणून मालिका वाढवित नेतात.

सौंदाळा's picture

9 Jun 2022 - 2:18 pm | सौंदाळा

श्रीयुत गंगाधर टीपरे, काय पाहिलेस माझ्यात, विधाता, गोट्या, हॅलो इस्पेक्टर यासारख्या अनेक मालिका आणि पुर्वी १२ का १३ भागात संपणार्‍या मालिका आता का येत नाहीत काय माहित.
सध्याच्या मालिका माझ्या घरी पण कोणी बघत नाही. स्मार्ट टीव्ही, फायर स्टीक वगैरे पर्याय घेऊन दर्जेदार कार्यक्रम बघतो.
येत्या काही दिवसात केबल बंद करायचा विचार आहे.

अशोक्,सचिन्,लक्ष्या छाप मराठी चित्रपटांनी बोअर करुन सोडले होते त्यानंतर "श्वास" च्या निमित्ताने मराठी चित्रपटांनी कात टाकली. मराठी प्रेक्षक सिनेमा बघायला चित्रपट गृहात जाउ लागले. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळु लागला. तसे मालिकांबाबत होण्याची गरज आहे. प्रेक्षकांना गृहित धरुन केलेला बिनडोक पणा किती दिवस चालणार?
आजी-मी तर म्हणतो कशाला बघता टि.व्ही.? यांचा टी आर पी घसरला की येतील सरळ. सरळ मोबाइलवर एम एक्स प्लेयर, प्लानेट मराठी, यु ट्युब बघा. बर्‍याच दर्जेदार मालिका आहेत.

आग्या१९९०'s picture

9 Jun 2022 - 3:13 pm | आग्या१९९०

घरात टीव्ही नाही परंतु आजूबाजूच्या चर्चेतून ऐकून असतो. ह्याचाच परिणाम हल्ली आपल्याकडे लग्नात दिसतो. मेहंदी कार्यक्रम त्याचे फोटो/व्हिडिओ शूटिंग, प्रि वेडींग शूटिंग, हळदीला वधू वरांचा , घरच्यांचा नाच ( खास कोरिओग्राफरकडून बसवला जातो ). लग्नाच्या वेळी पालखीतून, हत्तीवरून वधू वरांची एन्ट्री. वधुवरांवर फुलांचा वर्षाव करत सिनेमा स्टाईल नाचणाऱ्या भाड्याच्या मुली. सगळा मार्केटिंगचा प्रकार आहे. रील लाईफ आणि रिअल लाईफ मधला फरक हळू हळू कमी होतोय.

ज्याला परवडते ते करतील.

आग्या१९९०'s picture

9 Jun 2022 - 7:44 pm | आग्या१९९०

मालिकेतल्या लग्नात हळद लावणे,औक्षण करणे, सप्तपदी,हार घालणे हेच विधी दाखवतात. लग्नात खूप कमी माणसं असतात पण हाॅल खूपच दिमाखदार सजवलेला असतो. मेहेंदी, संगीत,जोडे लपवणे इ.महाराष्ट्रीय लग्नात नसलेले विधी हमखास दाखवले जातात.
ह्यावर माझे निरीक्षण आणि त्यामागील तर्क सांगितले. कोणी काय करावे ह्याची तक्रार नाही माझी. उलट एकजण तक्रार करत होता की हे प्री वेडींगचे फोटो मित्र आपल्याला what's app वर का पाठवतात ? त्याला म्हटले नको बघत जाऊ.सोप्पंय. काहींना बफेची ताटं वाट्या काऊंटरवरील तोकड्या कपड्यातील मुलीही खटकतात.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2022 - 4:04 pm | कानडाऊ योगेशु

करेक्ट निरिक्षण आज्जे.
अजुन काही निरिक्षणे
१. नायक/नायिकेचा काही कारणाने स्मृतिभ्रंश होणे. (यादगाश्त चली जाती है.)
२. नायक/नायिकेची प्लास्टीक सर्जरी.
एकदा का हे ट्विस्ट टाकले कि मालिका कुत्रा जसा शेपुट पकडण्यासाठी वळत वळत राहतो तशीच मालिका वळत वळत राहते.
अजुन एक इर्रिटेटींग प्र्कार म्हणजे दोन मुख्य पात्रांची ताटातूट झाली आहे. त्यांचे भेट होता होता वाचण्याचे असे काही प्रसंग टाकतात कि रिमोट फेकुन टीवी फोडु वाटते. म्हणजे एक पात्र एका लिफ्ट ने खाली येतेय तर दुसरे तेव्हाच बाजुच्या लिफ्ट मध्ये आत जाते.
दोन पात्र अगदी जवळ आलेत एकाला कुणकुण लागली आहे कि ते पात्र आजुबाजुला आहे तेव्हा ते पहिले पात्र त्या दिशेने पाहते तो तिथले पात्र काही कारणाने एकतर खाली तरी वाकते किंवा वळते तरी.

पाषाणभेद's picture

9 Jun 2022 - 6:32 pm | पाषाणभेद

टीआरपी धागा

सरिता बांदेकर's picture

9 Jun 2022 - 7:15 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलंय.

सरिता बांदेकर's picture

9 Jun 2022 - 7:15 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2022 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निरिक्षण एक नंबर बाकी, नंबर १५ वाचून हहपुवा झाली. =))
आजी लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

हा हा !

या पाणी पाजण्याचा (माझा) काहीही संबंध नसताना मी विक्टिम झालेलो आहे ! :)

श्वेता२४'s picture

10 Jun 2022 - 12:00 pm | श्वेता२४

उत्कृष्ट निरीक्षणे आज्जी. नुकतीच अजुनही बरसात आहे नावाची पकाऊ मालीका त्यातील कलाकारांमुळे पाहायची इच्छा झाली. त्यावेळी वेळ वाचवण्यासाठी एक साक्षात्कार झाला तो म्हणजे केवळ प्रोमो बघणे. असं करुन मी ती मालीका बघण्याचा वेळ वाचवला. त्यानुसार मी काही अन्य मालीकांचेही फक्त प्रोमो पाहते आता.काही फरक पडत नाही. सध्या नवीन फॅड म्हणजे हिंदी मालिकांचा मराठी रिमेक. एवढी आत्या,मामा,मामी,काका,काकू यांच्यासहीत एकत्र कुटुंब असणारी मराठी कुटुंबे कुठे राहीलीत आता? शिवाय काही मालिकांमध्ये सधन घरांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी विरोध हा हास्यास्पद विषय हाताळला जातोय. मुळात महाराष्ट्र हे मुलींच्या शिक्षणासाठी आघाडीवर आहे आणी किमान मध्यम व उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात तर यासाठी विरोध नसतोच. त्यामुळे युपी,राजस्थान च्या पार्श्वभूमीवरच्या हिंदी मालिकांचे रिमेक महाराष्ट्रीयन पार्श्वभूमीवर विसंगत वाटतात. असो.

sunil kachure's picture

10 Jun 2022 - 12:45 pm | sunil kachure

बाकी मालिका कशा ही असू ध्या सिरियल मधील स्त्रिया घरात पूर्ण वेळ खूप tiptop असतात.
केस मोकळे सोडून,व्यवस्थित मेकप करून,भारतीय वेशात,सुंदर हास्य नेहमी चेहऱ्यावर.
जेवण पण पराठा पासून सर्व चमचमीत.

अशी बायको घरी असेल तर मला वाटत नवरा ऑफिस ल पण जाणार नाही.
सर्व कसे गोड गोड.

पण त्याच टीव्ही मालिकांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा असतो.
कोणत्या ही व्यापारी सिनेमा पेक्षा ह्या मालिकांचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे.
जे बाजारात विकले जाते ते उत्पादित केले जाते.
स्मार्ट टीव्ही सर्रास सर्व घरात आहेत.
इंटरनेट,विविध ॲप सर्रास प्रतेक घरात आहेत.
अनंत पर्याय आहेत..
त्या मुळे पाहिले जसे दूरदर्शन चे दोन च चॅनेल होते आणि पर्याय नव्हता ही अवस्था आता नाही
ज्यांना रिअल स्थिती वर आधारित कार्यक्रम पाहिजेत ते पण असतात. आर्ट फिल्म कोणी बघत नाही.
रिॲलिटी असते त्या मध्ये.
डॉक्युमेंट्री कोणी बघत नाही.
नॅशनल geography ni craze निर्माण केली होती.
लोकांना मनोरंजन हवं असते.
ज्ञान नाही.
स्वप्नात राहायचे असते.
म्हणून तर दारू पासून विविध मादक द्रव्यांचे मार्केट खूप तेजीत आहे.
दुःख,संकट,अडचणी विसराय च्या असतात.

टिलू's picture

11 Jun 2022 - 7:25 pm | टिलू

अजून एक नेहमी दिसणारी (खटकणारी ) गोष्ट म्हणजे:
या मालिकेमधल्या नायिका अतिशय सोशिक आणि अति गरीब अशा असतात. म्हणजे कितीही अन्याय झाला तरी कुणाला सांगायचं नाही. अगदी नवऱ्याला किंवा स्वतःच्या आई वडिलांना, भावाला etc. सगळे दोष स्वतःवर घ्यायचे.
आणि या मालिका अति ताणून झाल्यावर प्रेक्षक जेव्हा कमी होतात, तेव्हा या मालिका literally १-२ एपिसोड मध्ये गुंडाळतात. सगळे व्हिलन, खाष्ट सासू, नणंद वगैरे एकदम चांगले होतात. सरळ होतात. प्रेमाने वागायला लागतात. करून करून भागले आणि देव पूजेला लागले असं काहीतरी.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jun 2022 - 7:47 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या मालिकांपेक्षा न्युज चॅनल्स जास्त मनोरंजन करतात. चंद्रकांत पाटलांची नी ईतर भाजप नेत्यांची वक्तव्ये.

sunil kachure's picture

11 Jun 2022 - 8:57 pm | sunil kachure

न्यूज चॅनेल आणि ते पण हिंदी हे म्हणजे हे खरे तर कॉमेडी चॅनेल च आहेत.
खुप मनोरंजन होते.

विजुभाऊ's picture

12 Jun 2022 - 12:40 am | विजुभाऊ

मी राष्ट्रपती झालो तर सर्वप्रथम न्यूज चॅनेल्स बंद करेन. बहुतेक हिंदी न्यूज चॅनेस निर्बुद्ध बातम्या दाखवात असतात. त्यांच्या मते लखनौ , कनौज , दिल्ली , नॉयडा , आणि आसपासचा इलाखा हा म्हणजे भारत. या चॅनेल्स वर दक्षीण भारतातल्या बातम्या कधीच सविस्तर दिल्या जात नाहीत. चेन्नई मधे किंवा त्रिची मधे एखादी महत्वाची घटना घडत असेल त्य अपेक्षाही या चॅनेल्स ना लखनौ च्या श्यामली इलाक्यातील एखाद्या गल्लीत दोन महिलांमधे मारामारी झाली ही ब्रेकिंग बातमी असते.
बहुतेक न्यूज चॅनेल्स एकच बातमी देत असतात.
मराठी न्यूज चॅनेल्स ची वेगळीच तर्‍हा . म्हणजे समजा मुख्यमंत्री / राऊत /पवार बोलत असतील तर सर्व चॅनेल्स तेच दाखवत असतात.
जागतीक घडमोडींवर भाष्य करणारा एकही मराठी चॅनेल नसावा? औद्योगीक प्रगती वर काही सांगणारा एकही मराठी चॅनल नसावा?

कंजूस's picture

12 Jun 2022 - 2:57 am | कंजूस

साम हा एक सकाळ पेपर्स ( पवार?)यांचा मराठी चालेल असावा.
TV9 - तेलंगणातील,
ABP MAJHA - आनंद बजार पत्रिका,बंगाल.
Zee चोवीस तास - गोयलचा होता.
हे इतर बातम्या देणार नाहीत.

हिंदीमधला News nation मात्र नवीन बातम्या आणि त्यांच्या बातमीदाराच्या देतो.

कपिलमुनी's picture

12 Jun 2022 - 1:45 am | कपिलमुनी

या मालिकांचा टार्गेटेड ऑडीयंन्स च वेगळा आहे.

त्यामुळे त्या लोकांना/ बायकांना मालिका आवडतात .. बघतात..

कंजूस's picture

12 Jun 2022 - 2:58 am | कंजूस

सहमत.

नचिकेत जवखेडकर's picture

13 Jun 2022 - 7:23 am | नचिकेत जवखेडकर

कपिलमुनींशी सहमत. मागे खुपते तिथे गुप्ते मध्ये भार्गवी चिरमुलेनी सांगितलं होतं की, ती जी कुठली मालिका करत होती त्यात तिचा खूप छळ होतो असं दाखवलं होतं. आणि काही भाग असे होते की जिथे तिची बाजू वरचढ दाखवली होती तेव्हा त्या मालिकेचा टीआरपी खूप कमी झाला होता. कारण का तर जो बहुसंख्य महिलावर्ग होता जो त्यातल्या दैनंदिन गोष्टींना स्वतःच्या आयुष्यात रिलेट करायचा, त्या वर्गानी ती मालिका बघणं सोडून दिलं होतं.

कंजूस's picture

12 Jun 2022 - 3:00 am | कंजूस

एक प्रेक्षक वाढला आहे . 😀

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2022 - 4:47 pm | चौथा कोनाडा

हा ... हा ... हा ... हा ...

मालिकाग्रस्त प्रेक्षकाचे तीव्र आक्रंदन

श्रीगुरुजी-तुम्ही सांगितलेले प्रकारही मालिकांमधून घडतात.
सौंदाळा-खरंच,तेरा भागाच्या मालिका बऱ्या वाटतात.

राजेंद्र मेहेंदळे-मी ओटीटी प्लॅटफॉर्म वरच्या मालिका बघते. पण त्यांत कमालीचा हिंसाचार आणि भडक स्त्री पुरुष संबंध चित्रण असते.
आग्या १९९०-खरंच, भपकेबाजपणाचं प्रदर्शन वाढत चाललंय.

Trump-बरोबर आहे तुमचं मत.

कानडाऊ योगेशु-तुमचं निरीक्षण पटलं. द्या टाळी.
पाषाणभेद-खरंय तुमचं म्हणणं.

सरिता बांदेकर-धन्यवाद.

प्रा.डाॅ. दिलीप बिरुटे-धन्यवाद. मी लिहिणार, लिहिणार.
उन्मेष दिक्षीत-हा!हा!

श्वेता २४-मीही काही मालिकांचे फक्त प्रोमो बघते. कथानक समजतं. हिंदी मालिकांचे रिमेक महाराष्ट्रीय पार्श्वभूमीवर विसंगत वाटतात,हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
Sunil kachure-तुमची पहिली प्रतिक्रिया गंमतीशीर दुसरी विचार करायला लावणारी.

टिलू-तुमचं म्हणणं पटलं.
अमरेंद्र बाहुबली-न्यूज चॅनल्स करमणूक करतात हे तुमचं म्हणणं पटलं. Sunil kachure यांचं तसंच म्हणणं आहे.

विजुभाऊ-खरंय.
कंजूस-मान्य आहे.
नचिकेत जवखेडकर-भार्गवी चिरमुले म्हणाल्या ते बरोबर आहे. पटतं.
कंजूस,चौथा कोनाडा-धन्यवाद.