महाराष्ट्राचा आद्य वंश – सातवाहन घराणे

नागनिका's picture
नागनिका in जनातलं, मनातलं
4 May 2022 - 6:07 pm

( नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त दैनिक संचार मध्ये प्रकाशित झालेला लेख)
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण इतिहास महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या लेखा मागील उद्देश आहे.

प्राचीन कालखंड म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २३० चा तो कालखंड होता. संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.

वैदिक धर्मीय असणाऱ्या सातवाहनांनी अश्वमेध, राजसूय, अनारंभनीय इत्यादी यज्ञ करून आपला दरारा संपूर्ण भारत खंडामध्ये निर्माण केला होता. या घराण्याने भारतीय इतिहासाला अनेक वीर राजे दिले आहेत. याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने “तीसमुद्दतोयपीतवान” (म्हणजे ज्याच्या वाहनाने घोड्याने तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे) ही बिरुदावली धारण केली होती. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र वैभवाच्या उत्तुंग शिखरावर होता. ही संपन्नता पाहून नहपान नावाचा एक शक राज्यकर्ता महाराष्ट्रावर आक्रमण करु लागला. इसवी सन १२५ च्या सुमारास नहपान आणि गौतमिपुत्रामध्ये नाशिक येथील गोवर्धन परिसरात घनघोर युद्ध झाले. यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा दारुण पराभव केला आणि त्याच्या चांदीच्या व सोन्याच्या सर्व नाण्यांवर आपली विजय मुद्रा उमटवली आणि ती चलनात आणली. नाशिक येथील जोंगलटेंभी येथे झालेल्या उत्खननामध्ये अशा १३,२५० नाण्यांचा संचय सापडला आहे. पराभूत नहपान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लपून बसला असता, त्याचा पाठलाग करून गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ उच्छेद केला. नहपान शकाच्या नाशामुळे महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची कोणत्याही परकीय आक्रमकाची छाती झाली नाही. तसेच वायव्येकडील ग्रीक व पह्लवांनी गौतमीपुत्राची चांगलीच धास्ती घेतली होती. गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार मध्यप्रदेशातील विदिषा नगरी पर्यंत वाढवला होता. याच्या कालखंडात दक्षिण व मध्य भारतामध्ये सातवाहनांची प्रबळ सत्ता होती.

देवी लेणे
नाशिक येथील गौतमीपुत्राच्या आईने खोदलेले देवी लेणे

सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. अशा उत्तम कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता!

सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती. याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती. तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.

तेर बाहुली
तेर येथे उत्खननामध्ये मिळालेली हस्तिदंती बाहुली

इटली बाहुली
इटलीतील संग्रहालया मधील बाहुली

बहुतांश सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

नागनिका
नागनिकेचे नाणे

स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे. सातवाहन राजांनी अनेक गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या कालखंडामध्ये केली होती. हेच गड-किल्ले पुढील शिलाहार व राष्ट्रकूट वंशी राज्यांनी वापरले. छत्रपती शिवरायांनी ज्या गड-किल्ल्यांच्या जोरावर हिंदवी साम्राज्य उभे केले त्यातील काही किल्ले हे कदाचित सातवाहन स्थापित असतील !

साहित्य, स्थापत्य, शिल्पकला याबरोबरच व्यापार-उद्योग, धार्मिक समन्वय आणि सुनियोजित शासन व्यवस्था अशा अनेक कसोट्यांवर सातवाहन घराण्याने महाराष्ट्राला जागतिक पटलावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते. महाराष्ट्र दिन साजरा करताना या सुवर्ण इतिहासाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

संदर्भ ग्रंथ- १. सातवाहन कालीन महाराष्ट्र (रा. श्री. मोरवंचीकर)

२. प्राचीन भारताचा इतिहास (जी. बी. देगलूरकर)

३. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (डॉ. वा. वि.मिराशी)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 May 2022 - 6:31 pm | मुक्त विहारि

"गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल."

--------

परवाच एका भारतीय ब्रिटिशा बरोबर, हीच चर्चा झाली होती.

हिंदू धर्मात, स्त्रीयांना मानाचे स्थान होते. बहु पतीत्वाची चाल देखील, समाजाने स्वीकारलेली होती.

बहू पतित्वाची? ऐकिवात किंवा वाचनात नाही.स्त्री राज्य होते वाचले होते, पण त्यालाही पुरावा नाही,काळही नाही. चांदोबा मध्ये वाचले होते बस.

मुक्त विहारि's picture

5 May 2022 - 7:18 pm | मुक्त विहारि

प्रेमिकांना, जातीभेदाचा अडसर देखील न्हवता.

इतकेच नाही तर, विधवा स्त्री पुनःविवाह करू शकत होती.

त्यावेळी स्त्रीयांना जितके स्वातंत्र्य होते, तितके आज देखील नाही

उदाहरणार्थ, एखादी गणिका, कर देऊन मुक्त होत होती. (आत्ताच्या घटकेला, गणिकेला हे स्वातंत्र्य नाही.)

कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या ग्रंथात, स्त्रीयां विषयक कायदे, लग्न संस्थे विषयी कायदे, ह्यात पुरेसा उल्लेख केलेला आहे...

(मला फोटो चिकटवता येत नाहीत. जमल्यास, कुणाला तरी सांगतो.)

वैयक्तिक आर्थिक, शैक्षणिक आणि सुसंस्कृत उन्नती साठी, कौटिल्याचे अर्थशास्त्र, हा ग्रंथ मला तरी उपयोगी पडला .... "साहित्य", हे कॅलिडोस्कोपिक असल्याने, ग्रंथ वाचना नंतर, तुमची प्रतिक्रिया माझ्या विरूद्ध लेखील असू शकते...

कंजूस's picture

4 May 2022 - 7:29 pm | कंजूस

इतिहास अभ्यास आवडला.
ठिकठिकाणच्या लेण्यांना क्रमांक दिले आहेत. त्याबद्दल संक्षिप्त ओडिओ बनवल्यास तिथे गेल्यावर ऐकता येईल. हे काम पाच सहा जणांनी एकत्र येऊन वाटून केल्यास लवकर पूर्ण होईल.

sunil kachure's picture

4 May 2022 - 7:38 pm | sunil kachure

गौरव शाली इतिहास पण माहीत नव्हता.तुम्ही माहीत करून दिलात.धन्यवाद.

निमिष ध.'s picture

4 May 2022 - 7:55 pm | निमिष ध.

हा सुंदर लेख लिहील्याबद्दल धन्यवाद. मला नेहमीच मराठी उदयाच्या आधी महाराष्ट्रात असलेली सत्ता आणि राज्ये याचे आकर्षण राहिलेले आहे. सातवाहन असे राजे होते की ज्यांनी संस्कृत किंवा कन्नड भाषा न वापरता पाकृत ही आपली राज्यकारभाराची भाषा ठेवलेली होती. त्यामुळे राजाश्रया मुळे पुढे मराठीचा फायदा झाला असेल. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी यादव राज्यामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला.

अजून तुम्हाला ज्ञान असेल तर लेखमाला तयार करून बाकीच्या राज्यांची माहिती करून दिल्यास नक्की आवडेल.

Bhakti's picture

4 May 2022 - 7:56 pm | Bhakti

गौरवशाली आणि सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने

.
मलाही जुन्नरचा किल्ला पाहायची उत्सुकता होती,पण दोन तीन वर्षांत जेव्हा सातवाहन बद्दल समजले ,तेव्हा नाने घाट पाहायची उत्सुकता अधिक आहे.
उत्तम लेख.

कंजूस's picture

4 May 2022 - 8:55 pm | कंजूस

१) लेण्याद्री आणि बाजूच्या लेण्या (१८ बहुतेक. खूप शीलालेख)
२) जुन्नरचा रविवारचा बाजार
३) जुन्नरच्या दक्षिणेलाही बऱ्याच लेण्या आहेत.
४) जुन्नर गावातलाच शिवनेरी ( सोपा गड)
५) घाटघर मार्गावर पूर मंदिर,
चावंड किल्ला (जरा अवघड) मोठा जलाशय. ( या जलाशयाच्या दुसऱ्या काठाने आल्यास निमगिरी,हडसर किल्ले)
घाटघर गावापुढे नाणेघाट सुरुवात आणि तो प्रसिद्ध सातवाहन कालीन रांजण, एक मोठं लेणं आणि घाट उतरून ( सोपा ) जुन्नर - कल्याण रस्त्याला येतो तिथून वैशाखरे गाव दोन किमी, टोकावडे पाच किमी.

नाणेघाटाचा संरक्षक आणि त्या परिसरातील सर्वात तालेवार दुर्ग जीवधन विसरलात :)

कंजूस's picture

4 May 2022 - 9:58 pm | कंजूस

ती ओळ राहिलीच का!
पण असेही तो अवघडच आहे. त्याला पाहात पाहात नणेघाट उतरायचा. किंवा फार तर नानाचा अंगठा जाता येईल. एक मात्र की आपले वाहन असेल तर असून आडचण नसून खोळंबा.

प्रचेतस's picture

5 May 2022 - 6:53 am | प्रचेतस

जीवधन तसा अवघडच आहे, घाटघरकडून येणाऱ्या मार्गावर पावठ्यांच्या ठिकाणी आता रेलिंग लावून मजा घालवलीय. कोकण दरवाजावर एक छोटा पॅच वगळता उतरणे तसे साधारण आहे मात्र पदरातल्या दाट झाडीत रस्ता हरवून जातो.

नगरी's picture

5 May 2022 - 3:36 pm | नगरी

दोस्तहो मला तिथून कोकणात उतरायचे आहे.

प्रचेतस's picture

5 May 2022 - 3:41 pm | प्रचेतस

तिथून फक्त पश्चिम बाजूस असलेल्या नाणेघाटाच्या पठारावरच उतरता येईल. कोकणात उतरण्यासाठी तुम्हाला नाणेघाट किंवा भोरांड्याच्या दाराचा वापर करावा लागेल.

Bhakti's picture

5 May 2022 - 6:36 am | Bhakti

वाह
👍
तूर्तास https://youtu.be/IbF6s__8PVY नाणेघाट

तर्कवादी's picture

5 May 2022 - 10:44 am | तर्कवादी

१) लेण्याद्री आणि बाजूच्या लेण्या (१८ बहुतेक. खूप शीलालेख)
२) जुन्नरचा रविवारचा बाजार
३) जुन्नरच्या दक्षिणेलाही बऱ्याच लेण्या आहेत.

जुन्नर किल्ला व लेण्या याबद्दल मिपावर एखादा धागा आहे का ? किंवा दुसरा कुठला ब्लॉग असल्यास लिंक देवू शकाल काय ?

हा घ्या धागा
जुन्नर
मिपावर काही शोधायचे असेल तर गुगलवर असे पायपोस करायचे
उदा. मिसळपाव जुन्नर
मिसळपाव अजिंठा
हाच उपाय मायबोली वरचे लेख शोधतांना करू शकता.
भटकंती साठी मराठीत मिळवणे मस्त झालय 😄

तर्कवादी's picture

5 May 2022 - 12:40 pm | तर्कवादी

धन्यवाद भक्तीजी

तर्कवादी's picture

5 May 2022 - 11:59 am | तर्कवादी

१) लेण्याद्री आणि बाजूच्या लेण्या (१८ बहुतेक. खूप शीलालेख)
२) जुन्नरचा रविवारचा बाजार
३) जुन्नरच्या दक्षिणेलाही बऱ्याच लेण्या आहेत.

जुन्नर किल्ला व लेण्या याबद्दल मिपावर एखादा धागा आहे का ? किंवा दुसरा कुठला ब्लॉग असल्यास लिंक देवू शकाल काय ?

जुन्नरला पहिली छोटेखानी भटकंती झाली :)
वर्णन.

प्रचेतस's picture

4 May 2022 - 9:21 pm | प्रचेतस

लेख आवडला, सातवाहनांबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच.

नागनिका's picture

5 May 2022 - 4:11 pm | नागनिका

लेख आवडला, सातवाहनांबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच

अगदी खरं

सुखीमाणूस's picture

4 May 2022 - 11:44 pm | सुखीमाणूस

धन्यवाद असा उत्तम लेख लिहुन आमचे महाराष्ट्रा बद्दलचे ज्ञान वाढवल्याबद्दल.

वामन देशमुख's picture

5 May 2022 - 4:13 am | वामन देशमुख

नागनिका, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

ह्याच विषयावर पूर्वी थोड्या वेगळ्या अंगाने एक लेख लिहिला होता.

सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष

तर्कवादी's picture

5 May 2022 - 11:05 am | तर्कवादी

सातवाहन कालखंडाबद्दलचा माहितीपूर्ण लेख आवडला. ह्या कालखंडालाच मध्ययुग म्हणतात ना ?
वर प्रचेतस यांनी नमूद केलेला धागाही वाचला होता...
मला इतिहासाची आवड आहे पण मुळातून अभ्यास करण्याची वा संदर्भ ग्रंथ वाचण्याची कुवत नसल्याने असे लेख म्हणजे पर्वणीच
बालपणी "भारत एक खोज" मालिका बघितली होती. आता २-३ वर्षापुर्वी पुन्हा थोडी बघण्याचा प्रयत्न केला पण त्यातील गाण्यांचा फार कंटाळा येतो, त्यातली गाणी काढून टाकलीत आणि मालिका पुन्हा नव्याने प्रसिद्ध केली तर बघायला आवडेल.

साधारणपणे इसवीसनाच्या दहाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत मध्ययुग समजले जाते.

sunil kachure's picture

5 May 2022 - 1:42 pm | sunil kachure

Ad इसवी सालानंतर.bc इसवी साल पूर्वी.
इसवी साल मोजतात
येशू ख्रिस्त ह्यांच्या जन्मा अगोदर एक वर्ष आणि जन्मा नंतर एक वर्ष.
पहिला गहन प्रश्न.
येशू ख्रिस्त ह्यांचा जन्म झाला ते वर्ष कोणते?
ते काल्पनिक आहे की खरे?
दुसरा गहन प्रश्न .
पिरामिड असु किंवा प्राचीन शिला लेख,प्राचीन भाषा,प्राचीन सर्व धर्माचे अत्यंत विचारशील धर्म ग्रंथ, .
ह्यांचा काळ पण सरासरी त्याच काळातील.
मग इतक्या पुरातन काळात .
लोक लिहीत होती,शिल्प तयार करत होती,जीवनाला मार्ग दर्शक ठरेल असेल विचार लिहीत होती.
विश्वाचे निर्मिती,ग्रह ,तारे ह्या विषयी पुर्ण माहिती होती.
मग त्या काळातील माणूस नक्कीच प्रगत असणार.
भाषेचा शोध आणि वापर.लिपी अतिशय कठीण काम त्या काळात झाले.कोणती फळं,धान्य , मांस मानवी शरीरास योग त्या काळी माहीत होते.
आणि तेव्हाचे सर्व प्रकार आज पण लागू होतात.
म्हणजे त्या वेळी माणूस खूप हुशार प्रगत असलाच पाहिजे.

नगरी's picture

5 May 2022 - 3:22 pm | नगरी

नाग कन्या,लेख अप्रतिम,बरेच खोदले आहे.पण हे वाचून अकलेत (dnyanat) भर पडली

नगरी's picture

5 May 2022 - 4:01 pm | नगरी

सगळे फोटो गायब आहेत

गामा पैलवान's picture

5 May 2022 - 8:01 pm | गामा पैलवान

नागनिका,

लेख छान आहे. माहितीत भर पडली. तुम्हीही त्या राणीचं नाव घेतलेलं दिसतंय. :-) हिच्यावरनं पुढील सातवाहनी राणी आठवली. तिचं नाव गौतमी बलश्री. तिने सातवाहनांच्या तीन पिढ्या ( पती, पुत्र व नातू ) घडवल्या. तिच्यासंबंधी इथे माहिती आहे : https://rupalimokashi.files.wordpress.com/2010/05/virmata.pdf ( रुपाली मोकाशी तुम्हीच तर नाही ....? )

साडेचार शतकं हा फार मोठा कालखंड आहे. सातवाहनांमुळे महाराष्ट्रास व भारतास कमालीचं स्थैर्य लाभलं. याच काळात भारताच्या पश्चिम तटावरून पूर्वतटापर्यंत खुष्कीचा मार्ग सुरक्षित केला गेला असावा असा माझा कयास आहे. अन्यथा युरोपीय जहाजांना अतिपूर्वेकडे जाण्यासाठी श्रीलंकेस वळसा घालून जावे लागे. तो मार्ग वादळे व इतर उपद्रवामुळे सुरक्षित नव्हता. त्याला पर्याय म्हणून दख्खन भूमार्ग सातवाहनांनी विकसित केला असावा.

आ.न.,
-गा.पै.

नागनिका's picture

9 May 2022 - 12:46 pm | नागनिका

नाणेघाट हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल!

गोरगावलेकर's picture

16 May 2022 - 9:16 am | गोरगावलेकर

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची अभ्यासपूर्ण ओळख आवडली