सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष

प्रचेतस's picture
प्रचेतस in विशेष
19 Sep 2012 - 2:33 pm
श्रीगणेश लेखमाला २०१२

मिसळपाव नव्या रूपात सुरू करताना श्रीगणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्रीगणेश लेखमालेची सुरुवात होत आहे. यात पहिले पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे, ते महाराष्ट्राच्या पहिल्या ज्ञात इतिहासाच्या रूपात. महाराष्ट्राच्या आद्य इतिहासात इथे दंडकारण्य होतं असं मानलं जातं. त्यानंतर काही आदिम जमातींनी वसाहती केल्या. पण लिखित किंवा इतर काही पुराव्यांच्या स्वरूपात इथला त्या काळचा इतिहास फारसा आढळत नाही. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सुरू होतो तो प्रबळ पराक्रमी सातवाहनांपासून.

सातवाहन, भारत देशीच्या विस्तृत भूभागावर सुमारे ४५० ते ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ राज्य केलेली एकमेव भारतीय राजवट, महाराष्ट्राचा आद्य राजवंश. सातवाहनांच्या पूर्वकाळातील अशोकाच्या शिलालेखांत रथिक, भोजक व पेतेनिक यांचे उल्लेख आढळतात पण ते तेव्हढ्यापुरतेच.

सातवाहनांच्या उदयानंतर मात्र त्यांनी खोदवलेल्या गुहा, तत्कालिन शिलालेख, त्यांनी पाडलेली नाणी, इ. पुरातत्वीय पुरावे तसेच गुप्तकाळात निर्माण झालेली पुराणे, हाल सातवाहनाने संकलित केलेली गाथा सप्तशती, गुणाढ्याची बृहत्कथा, शुद्रकाचे मृच्छकटिक यांसारख्या ऐतिहासिक दस्तावेजांमुळे तत्कालिन कालखंडाविषयी बरीचशी माहिती मिळू शकते.

अर्थात सातवाहनांवर काही लिहायचे म्हणजे तो एका मोठ्या लेखमालेचाच विषय होईल. त्यामुळे याविषयी फारसे विस्तारात न जाता सातवाहन आणि त्यांचे परंपरागत शत्रू शक-क्षत्रप यांच्या संघर्षावर काही प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे.

तत्कालीन सातवाहन साम्राज्य नकाशा

कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःच्या नावाची तांब्या-शिशाची नाणी पाडली व सातवाहन राज्याची मुहूर्तमेढ रोविली. (साधारण इस. पूर्व २३०)याच्या नंतरच्या पिढीचा, बहुधा सातवाहनाचा पुत्र सिमुक (श्रीमुख) सातवाहन गादीवर आला. याच्या कारकिर्दीत सातवाहन राज्य लहानसेच असावे पण याच्या नावाची स्वतंत्र नाणी आहेत. सिमुकानंतर त्याचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने सिमुकाचा भाऊ कण्ह (कृष्ण)हा सातवाहनांच्या गादीवर आला व कण्हानंतर पहिला सातकर्णी हा सातवाहन राजा झाला. कण्हाचे व प्रथम सातकर्णीचे संबंध तणावाचे असून त्याला आपले राज्य कण्हाशी लढूनच मिळवावे लागले असावे असे अभ्यासक मानतात कारण नाणेघाटातल्या प्रतिमा लेखात कण्हाची प्रतिमा दिसत नाही.

ह्या प्रथम सातकर्णीने सातवाहनांचे राज्य मध्यप्रदेशातल्या विदिशा पर्यंत नेऊन भिडवले असावे असे सांची येथील शिलालेखावरून समजते. हा अत्यंत सामर्थ्यवान सातवाहन राजा. याची पत्नी प्रख्यात सातवाहन सम्राज्ञी नागनिका उर्फ नयनिका. प्रथम सातकर्णीच्या काळातच नाणेघाटाची निर्मिती झाली. नाणेघाटाच्या सुरुवातीचीला कड्यात नागनिकेने गुहा खोदविली तेच सातवाहनांचे एकमेव ऐहिक लेणे. सातवाहनांनी केलेले अश्वमेध, राजसूयादिक यज्ञयाग, त्यात केलेला विपुल दानधर्म तसेच सातवाहनांच्या राजेकुलाच्या प्रतिमा व त्याखाली त्यांची नावे इ. उल्लेख त्यात कोरलेले आहेत.

नाणेघाटातल्या प्रतिमालेखाबद्दल श्री जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ह्या धाग्यावर अधिक माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/18892
नाणेघाटाची नळी

सातवाहनांचे नाणेघाटातील ऐहिक लेणे

नाणेघाटाबरोबरच इतरही अनेक घाटवाटा व त्यांचे संरक्षक दुर्ग मुख्य सह्यधार व त्यांच्या उपत्यकेत निर्माण केले गेले. बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला गेला. ग्रीक, रोमन लोकांबरोबर व्यापाराला सुरुवात झाली. रोम, इस्तंबूल, अलेक्झांड्रिया आदी शहरांमधून येणार्‍या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल (चौल), कलियान (कल्याण), श्रीस्थानक (ठाणे), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरात येऊन पडू लागल्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून खोदीव घाटमार्ग पार करू लागले व पैठण, तेर, नाशिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. हळूहळू व्यापाराची भरभराट होऊन सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले. राज्य विस्तार पावू लागले. पैठण ही सातवाहनांची राजधानी. तिची किर्ती दूर दूर पसरू लागली व याच व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातवाहनांच्या समृद्ध राज्यात क्षत्रपांचा प्रवेश झाला.

क्षत्रप म्हणजे प्रांताधिपती. क्षत्रप मूळचा संस्कृत शब्द नाही तो पर्शियन भाषेतील शब्द क्षत्रपन यांपासून बनलेला आहे. क्षत्र म्हणजे राष्ट्र. राष्ट्राचा कारभार पाहणारे ते क्षत्रपन. मध्यपूर्वेतून शकांच्या रानटी टोळ्यांची वरचेवर आक्रमणे होऊ लागली. शक मूळात वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेले असल्याने शकांना स्वतंत्र असे नेतृत्व नव्हते. प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असे.

सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले. प्रथम कनिष्काने कच्छ जिंकून तेथे त्याने कार्दमक वंशीय 'चष्टन' याची आपला क्षत्रप म्हणून नेमणूक केली. पुढे कनिष्काने महाराष्ट्राच्या उत्तर भागात 'भूमक' हा क्षहरात वंशी दुसरा क्षत्रप नेमला. क्षहरात हा सुद्धा पर्शियन शब्द असून क्षहर म्हणजे नगर व राद् म्हणजे अधिपती. अर्थात नगराधिपती. भूमकाने गुजरात, काठेवाडाचा काही भाग, माळवा या प्रांतांवर आक्रमण करून त्यांचा ताबा मिळवला. त्याने महाराष्ट्राचा किती प्रदेश जिंकला होता याचे उल्लेख मात्र सापडत नाही. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण राजवट कमजोर होऊन शकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली व ते स्वतःस स्वामी, राजा, महाक्षत्रप अशा विशेषणांनी गौरवू लागले. क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या निरनिराळ्या प्रांतात लहान लहान राज्ये चालवू लागली. मथुरा, पंजाब, तक्षशीला यांवर अंमल करणार्‍या क्षत्रपांस 'उत्तरी क्षत्रप' तर माळवा, गुजरात, उज्जैन, उत्तर महाराष्ट्र यांवर अंमल करणार्‍यांस पश्चिमी क्षत्रप म्हणत असत. भूमकाच्या नंतरच्या पिढीतील नहपान क्षत्रपाने सातवाहनांची बरीचशी राज्यलक्ष्मी हरण करून जुन्नर, नाशिक, कोकण, विदर्भ आदी विस्तृत प्रदेश बळकावत सातवाहनांना पार प्रतिष्ठान (पैठण) पर्यंत ढकलले. स्वतः नहपानाने जुन्नर ही राजधानी केली असावी असे काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार मानले जाते. नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा कालउल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.

नहपान क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे

शक क्षत्रपांच्या सततच्या हल्ल्यांनी जेरीस आल्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन गेली. सह्याद्रीतील घाटमार्ग क्षत्रपांच्या ताब्यात गेल्यामुळे सातवाहनांकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ खुंटला गेला. तत्कालिन सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात सातवाहन राज्य गलितगात्र होऊन गेले. त्याच्या अमलाखाली फक्त दक्षिण महाराष्ट्राचा भूभाग राहिला होता असे दिसते. अशातच शिवस्वाती सातकर्णी याची पत्नी गौतमी बलश्री हिच्या पोटी एका पराक्रमी पुत्राचा जन्म झाला तोच गौतमीपुत्र सातकर्णी.

गौतमीपुत्र सातकर्णी अतिशय कुशल, धोरणी आणि महाप्रतापी होता. त्याने आपल्या कारकिर्दीच्या पंधरा सोळा वर्षात हळूहळू आपले सामर्थ्य वाढवत नेऊन परकी आक्रमकांच्या दास्यातून आपले साम्राज्य मुक्त करण्याचा निश्चय केला. सर्वप्रथम त्याने विदर्भावर स्वारी करून वेण्णा(वैनगंगा) नदीच्या काठावर असलेल्या पौनी (कुशावती) ह्या नगरीच्या क्षत्रपांचा उच्छेद केला व स्वतःला 'बेणाकटकस्वामी' म्हणून घोषित केले. नंतर त्याने पश्चिमेकडच्या प्रदेशात चाल करून नहपानाने बळकावलेल्या प्रदेशावर आक्रमण केले. त्याची आणि नहपानाची घनघोर लढाई नाशिकजवळच्या गोवर्धन पर्वताजवळ झाली. हा गोवर्धन पर्वत नेमका कुठला ते आता समजत नाही पण हा बहुधा त्र्यंबकेश्वरनजीकचा डोंगरी प्रदेश असावा. तीत नहपानाचा संपूर्ण पराभव होऊन तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधे आश्रयार्थ पळून गेला. या विजयानंतर गौतमीपुत्राने लागलीच नाशिकच्या लेण्यांस भेट देऊन तेथील बौद्ध भिक्षुसंघास 'अजकालकीय' नावाचे शेत निर्वाहासाठी दान केले व तसा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये केला. याच लेखात गौतमीपुत्र स्वत:ला बेणाकटकस्वामी म्हणवतो. नाशिकचे युद्ध गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी झाले होते. गौतमीपुत्राच्या राज्यारंभाचे वर्ष निश्चितपणे माहीत नाही पण नहपानाच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष शके ४६ आहे. त्यानुसार इस. १२५ मध्ये ही घटना घडली असावी.

नाशिक येथील विजयानंतर गौतमीपुत्राने सह्याद्रीमध्ये नहपानाचा पाठलाग करून त्याचा समूळ वंशविच्छेद केला व लागलीच कार्ले येथील लेणीला भेट देऊन तिथल्या बौद्ध संघाला निर्वाहासाठी करजक नावाचे गाव दान देऊन तसा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरविला. दोन्ही शिलालेखांतील वर्णनानुसार ह्या दोन युद्धात सुमारे पंधरा दिवसांचे अंतर होते असे दिसते. गौतमीपुत्राच्या कार्ले शिलालेखावरून नहपानाचा विच्छेद मावळप्रांती झाला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या युद्धात फार मोठी कत्तल झाली. गौतमीपुत्राने नहपानाची सर्व नाणी जप्त करून त्यावर पुन्हा आपली मुद्रा उमटवून ती नाणी परत वापरात आणली. अशी जवळजवळ तेरा हजार नाणी सापडली आहेत.

गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदीचे नाणे

नहपानाच्या पराभवानंतर स्वस्थ न बसता गौतमीपुत्राने आणखी मोहिमा उघडल्या व गुजरात, राजस्थान, ओरिसा, मध्यप्रदेश इ प्रदेशापर्यंत त्याचा राज्यविस्तार केला. ह्या पराक्रमामुळे त्याची किर्ती संपूर्ण भरतखंडात पोहोचली.

क्षहरात कूळ समूळ नष्ट केल्याबद्दल त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले गेले. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा गौरवपूर्वक उल्लेख केला गेला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असेही त्याला म्हटले गेले. उत्तर,दक्षिण मोहिमांमध्ये गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असे म्हटले गेले आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' अर्थात एक ब्राह्मण म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदम' असेही नाशिक शिलालेखात म्हटले आहे.

गौतमीपुत्रानंतर त्याचा पुत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी गादीवर आला. हा सुद्धा आपल्या पित्यासारखाच पराक्रमी होता. गौतमीपुत्राच्या निधनानंतर उज्जैनचा महाक्षत्रप कार्दमकवंशीय रूद्रदामन आणि सातवाहन यांच्यात सख्य होऊन रूद्रदामनाने आपली कन्या पुळुवामीला दिली. पण तरीही सातवाहन आणि क्षत्रपांमधले संघर्ष चालूच राहिले. वासिष्ठिपुत्र पुळुवामीला नर्मदेच्या उत्तरेचा प्रदेश आणि कोकणचा काही भाग गमवावा लागला. रूद्रदामनाने वासिष्ठिपुत्र पुळुवामीचा दोनदा पराजय केला पण तो जावई असल्यामुळे त्याचा समूळ उच्छेद केला नाही असे त्याने गौरवाने जुनागढच्या शिलालेखात कोरून ठेविले आहे. या शिलालेखातच पुळुवामीचा उल्लेख 'दक्षिणापथपति' असा केला आहे यावरून पुळुवामीच्या सामर्थ्याची कल्पना यावी. ह्याला उत्तरेकडचा थोडासा प्रदेश जरी गमवावा लागला असला तरी ह्याने दक्षिणेत प्रचंड विस्तार करून आख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात आणला होता.

रूद्रदामन क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे

पुळुवामीनंतर गौतमीपुत्र श्रीयज्ञसातकर्णी हा गादीवर आला. हा सुद्धा स्वतःच्या नावापुढे गौतमीपुत्र असे बिरुद लावत असे. हा शेवटचा महाप्रतापी सातवाहन सम्राट. याने अपरान्ताचा गमावलेला प्रदेश पुन्हा एकदा रूद्रदामनाच्या वंशजांकडून जिंकून घेतला व सातवाहन राज्ये पुन्हा एकदा कळसास पोचवले. ह्याने सत्तावीस वर्षे राज्य केले व आपली सत्ता पश्चिमसमुद्रापासून पूर्वसागरापासून प्रस्थापित केली. विदिशा व काठेवाडापर्यंतही त्याचा अंमल असावा असे काही तेथे सापडलेल्या यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवरून दिसते. पुळुवामी आणि यज्ञसातकर्णीने शिडाच्या जहाजांची मुद्रा असलेली नाणी पाडली होती यावरून त्यांचे समुद्रावरचे प्रभुत्त्व सिद्ध होते.

वासिष्ठिपुत्र सातकर्णीचे शिडाच्या जहाजाची मुद्रा असलेले नाणे

श्री यज्ञ सातकर्णीचे नाणे

श्री यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या साम्राज्याच्या र्‍हासाला प्रारंभ झाला. सातवाहनांची सामंत घराणी प्रबळ होत जाऊन त्यांनी पैठणची सातवाहनांची केंद्रिय सत्ता झुगारून दिली. व्यापारही बंद पडू लागल्याने सातवाहन साम्राज्य कमजोर होत गेले. उत्तरेत इशवदात (ईश्वरदत्त) महाक्षत्रपाने शके १५१ (सन. २२९) मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचा पाडाव करून सत्ता बळकावली. ह्या ईश्वरदत्ताने सुमारे २० वर्षे राज्य केले असावे. इस. २५० मध्ये पुन्हा एकदा राज्यक्रांती होऊन आभीरवंशीय ईश्वरसेनाने क्षत्रपांचा पराजय करून उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. याच्या आधीच इस. २३० मध्ये विदर्भातही सातवाहनांची सत्ता संपुष्टात येऊन मुंडवशीयांनी आपले राज्य स्थापन केले व सातवाहन पूर्णतः दक्षिणेत (आंध्रात) ढकलेले गेले व दक्षिणेतही थोडक्याच कालावधीत त्यांचा इक्ष्वाकूवंशी शतमूलाने पाडाव केला व सातवाहन सत्ता पूर्णपणे लयास गेली.

गुजरात, काठेवाड, माळवा ह्या पश्चिमेकडच्या प्रदेशात मात्र पश्चिमी क्षत्रपांचा अंमल गुप्तांच्या राजवटीपर्यंत चालू राहिला. समुद्रगुप्ताने विदिशेपर्यंत गुप्त साम्राज्य स्थापन केले व त्याच्या पुढे चंद्रगुप्ताने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व अशा तर्‍हेने जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत आपल्या साम्राज्यात आणला व तत्पुर्वी खाली दक्षिणेत सातवाहनांची राजवट संपूर्ण नष्ट होऊन लहान लहान प्रांतिक राज्ये निर्माण होऊन दक्षिण भारताचा चेहरामोहरा बदलला.

अशा तर्‍हेने एक वैभवशाली राज्य समाप्त झाले. सातवाहनांनी विस्तृत प्रदेशात केवळ दिर्घकाळ राज्य केले इतकेच नव्हे तर स्थापत्य, कला, साहित्य, संस्कृती, शिल्प, चित्रकला यातही संस्मरणीय अशी प्रगती केली. व्यापारास उत्तेजन देऊन जनतेस सुखी, समृद्ध केले आणि परकियांशी प्राणपणाने लढून आपले गमावलेले राज्य परत मिळविले व मातृभूमीस स्वतंत्र केले. याकाळात सातवाहनांची सतत क्षत्रपांबरोबर लहानमोठी युद्धे होत राहिली. प्रदेश मिळवावे लागले, गमवावे लागले. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० ह्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी महाराष्ट्र देशी तसेच आंध्रातही सत्ता टिकवून धरली व महाराष्ट्राचे पहिले स्वतंत्र ज्ञात राज्यकर्ते झाले. ह्या सातवाहनांनीच सह्याद्रीत बांधलेल्या बहुतांश किल्ल्यांचा वापर गुप्तांनी,चालुक्यांनी, राष्ट्रकूटांनी, शिलाहारांनी व नंतर यादवांनी केला तसेच अधिक किल्ले बनवून भरही घातली. यादवसत्तेच्या पाडावानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी मात्र हे किल्ले, येथील प्रदेश आपल्या साम्राज्यात आणिला पण पुढे ह्याच सह्याद्रीच्या एका सातवाहननिर्मीत शिवनेरी नामक दुर्गावर छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व पुढे ह्याच किल्ल्यांच्या सहाय्याने तसेच नवे किल्ले उभारून महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचे दिवस दाखवले. असे सातवाहनांचे मोठे ऋण इये देशी आहे.

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2012 - 4:11 pm | जयंत कुलकर्णी

मस्त ! वल्ली मी मागे कधितरी या शिलालेखाचे मराठीत रुपांतर केले होते त्याचा दुवा पाहिजे असल्यास देऊ शकतोस म्हणजे ज्याला वाचायचे आहे त्याला वाचता येईल. अर्थात ही आपली एक सुचना.... आग्रह नाहीच..

प्रचेतस's picture

19 Sep 2012 - 6:30 pm | प्रचेतस

धागा लिहिताना मिपा बंद असल्याने दुवा मिळू शकला नव्हता. आता तो धाग्यात अपडेट केला आहे. :)

@ मन१: मध्य आशियाच बरोबर आहे. लिहिण्याच्या ओघात मध्यपूर्व टंकले गेले. :)

मन१'s picture

19 Sep 2012 - 6:21 pm | मन१

सविस्तर वाचून प्रतिसाद देतो.
"मध्यपूर्वेतून शकांच्या रानटी टोळ्यांची वरचेवर आक्रमणे होऊ लागली. " ह्यात दुरुस्ती करावी वाटते.
शक हे मध्य आशियातून आले. मध्य पूर्व आशियातून नाही.
मध्य आशिया :- इराण- अफगाणिस्तानच्या उत्तरेस सुरु होणारा टोकाकाडला थोडा भाग, १९९० पर्यंत यु एस एस आर मधील दक्षिणी देश, हे खुष्कीच्या उत्तरेकडील रस्त्याने चीनला जोडलेले आहेत.(सिक्यांग प्रांत) ऑक्सस नदीच्या आसपासचा प्रदेश ही त्यांची मुख्य भूमी असल्याचा काहिंचा अंदाज.
बाकीचे फुरसतीत.

चावटमेला's picture

19 Sep 2012 - 7:05 pm | चावटमेला

माहितीपूर्ण लेख. आवडीचा विषय असल्यामुळे लेख आवडलाच. बादवे, एक शंका आहे. त्या नाण्यांवरची लिपी कोणती? अक्षरे इंग्रजी वाटत आहेत.

हाच प्रश्न माझ्याही मनात आला. तसंच या नाण्यांचा कालखंड आणि त्यावरची चित्र कोणाची आहेत हे कसं काय ओळखतात?

नाण्यांवरची लिपी ब्राह्मी आहे. सातवाहनांची नाणी नेहमीच ब्राह्मी पाकृतात तर क्षत्रपांची ब्राह्मी प्राकृत तर काहीवेळा ब्राह्मी संस्कृतातही आढळतात.
नाण्यांवर त्या राजाचे नाव तसेच कालगणनेचा उल्लेख काहीवेळा केलेला दिसतो.

@स्वॅप्सः नाणेघाटातल्या भग्न मूर्ती काळाच्या उदरात गडप झाल्या असाव्यात.

तर्कवादी's picture

3 Dec 2021 - 5:17 pm | तर्कवादी

नाण्यांवरची लिपी ब्राह्मी आहे

नहपान क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे यावर तर बरीच अक्षरे रोमन लिपीतील वाटत आहेत ते कसे ? P,A,I,W ही अक्षरे तर सहज वाचता येतात. ब्राह्मी आणि रोमन लिपीत साम्य आहे का ?

आपले बरोबर आहे, क्षत्रपांच्या नाण्यांवरची लिपी प्राचीन ग्रीक आहे तर सातवाहनांची ब्राह्मी आहे. क्षत्रपांची काही नाणी ब्राह्मीतही आहेत.

स्पा's picture

19 Sep 2012 - 8:15 pm | स्पा

वल्ली सर
लेख अप्रतिम बांधला गेलाय..
खूप माहिती मिळाली..

एकदा सविस्तर लिहायला सुरुवात करा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Sep 2012 - 8:23 pm | निनाद मुक्काम प...

दर्जेदार आणि माहितीपूर्ण
असेच आणखी लेख येउद्या

जेनी...'s picture

19 Sep 2012 - 9:09 pm | जेनी...

छा गये वल्ली तुम तो
अतिशय देखणा लेख .

एस's picture

19 Sep 2012 - 11:03 pm | एस

नाणेघाटातील त्या मूर्त्या आता कुठे आहेत हे सांगू शकाल का? दरवेळी तिथे जातो तेव्हा नुसते पावलांचे अवशेष पाहून मन खिन्न होते.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2012 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

--^--^--^--

किसन शिंदे's picture

20 Sep 2012 - 5:42 am | किसन शिंदे

अप्रतिम लेखन!!

अर्थात या विषयावर तू ह्यापेक्शाही जास्त लिहू शकतोस हे माहितेय, त्यामूळे आता नविन लेखमाला सुरू करावीच अशी विनंती आहे.

प्रशांत's picture

20 Sep 2012 - 10:47 am | प्रशांत

अप्रतिम व माहितीपूर्ण लेख

मृत्युन्जय's picture

20 Sep 2012 - 10:51 am | मृत्युन्जय

सुंदर लेख हो संपादक साहेब :)

गोमट्या's picture

20 Sep 2012 - 11:14 am | गोमट्या

अतिशय सुन्दर लेख !! बर्‍याच अभ्यासाअन्ति लेख लिहिला आहे. खुप आवडला.

अन्या दातार's picture

20 Sep 2012 - 12:30 pm | अन्या दातार

खरंतर कित्येक दिवस याची वाट बघत होतो. आज सवड मिळाली वाटते.

अप्रतिम लेख. पुभाप्र

खुपच महत्वपूर्ण माहितीचे संकलन केले गेले आहे हे नमूद करु ईच्छीतो...

आणि हो नवनियुक्त संपादक श्री वल्ली यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन....

इरसाल's picture

20 Sep 2012 - 5:42 pm | इरसाल

अशी महिती शालेय पाठ्यपुस्तकांतुन मिळणे अशक्य.
ज्ञानसंवर्धन होत आहे. धन्यवाद.

मालोजीराव's picture

20 Sep 2012 - 6:25 pm | मालोजीराव

स्वारगेट ला भेट झाली तेव्हा तू म्हणालेलास या लेखाबद्दल त्यामुळे लेखाची वाट पाहत होतो वल्ली,
लेख झक्कास झाला आहे,एकाच लेखात सगळ्या सातवाहन राजांची ओळख करून दिलीस हे बरं केलस,सविस्तर प्रतिक्रिया देईनच.
जमल्यास सातवाहनांच्या राज्यव्यवस्थेबद्दलही लेख टाक वाचायला आवडेल.

>>> हाल सातवाहनाने संकलित केलेली गाथा सप्तशती, गुणाढ्याची बृहत्कथा, शुद्रकाचे मृच्छकटिक यांसारख्या ऐतिहासिक दस्तावेजांमुळे तत्कालिन कालखंडाविषयी बरीचशी माहिती मिळू शकते.
-- यापैकी काही हातात असेल तर एक लेख यावर यायलाच पाहिजे.

>>> जमल्यास सातवाहनांच्या राज्यव्यवस्थेबद्दलही लेख टाक वाचायला आवडेल.
१०० % अनुमोदन !

मोहनराव's picture

20 Sep 2012 - 8:09 pm | मोहनराव

जबरदस्त!!

सस्नेह's picture

20 Sep 2012 - 8:31 pm | सस्नेह

महाराष्ट्राच्या संपन्न इतिहासाची सफर घडवणारा सुरेख लेख !
सातकर्णींपासून महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती सुरू झाली असे समजायला हरकत नाही. गौतमीपुत्र हा या परंपरेचा निर्माणकर्ता. हा इतिहास शालेय पुस्तकांतून फारच त्रोटक दिलेला आहे. इथे सविस्तर समजला. धन्यवाद, वल्ली.

सुनील's picture

20 Sep 2012 - 9:58 pm | सुनील

सुरेख माहिती.

एका लेखापेक्षा लेखमाला केली असतीत तर अधिक चांगले झाले असते.

पिवळा डांबिस's picture

21 Sep 2012 - 1:07 am | पिवळा डांबिस

काय माहितीने ठासून भरलेला धागा आहे हा!!! जबराट!!
बाकी शिवकालपूर्व महाराष्ट्राची माहिती तशी सामान्यजनांना दुर्मिळ आहे. आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांनी त्यात आणखी अवर्णनीय उज्जेड पाडला आहे!!
तुम्ही इथे खूपच माहिती दिली आहे. अजून कोण-कुणाचा-नक्की कोण हे माझ्या नीटसं लक्षात आलेलं नाहिये, पण लेख पुन्हा वाचीन!!
:)

श्रीरंग_जोशी's picture

21 Sep 2012 - 2:29 am | श्रीरंग_जोशी

एका महत्त्वाच्या ऐतिहासिक कालखंडाबद्दल एवढी सारी रोचक माहिती प्रथमच वाचायला मिळाली.
वल्ली यांच्या सहजसोप्या लेखनशैलीमुळे लेख एकदम वाचनीय झालेला आहे.
याखेरीज मालोजीरावांच्या सूचनेला माझेही अनुमोदन.

माहितीपूर्ण आणि तरीही कंटाळवाणा नसलेला अभ्यासपूर्ण लेख !
मिपावर आजवर वाचलेल्या उत्तम लेखां पैकी एक.

प्राची अश्विनी's picture

12 Apr 2024 - 2:12 pm | प्राची अश्विनी

+11

विसुनाना's picture

21 Sep 2012 - 4:47 pm | विसुनाना

संग्राह्य लेख. आभारी आहे.

सुहास..'s picture

21 Sep 2012 - 4:52 pm | सुहास..

क्या बात ! क्या बात !!

गुजरात, काठेवाड, माळवा ह्या पश्चिमेकडच्या प्रदेशात मात्र पश्चिमी क्षत्रपांचा अंमल गुप्तांच्या राजवटीपर्यंत चालू राहिला. समुद्रगुप्ताने विदिशेपर्यंत गुप्त साम्राज्य स्थापन केले >>

गुप्त साम्राज्य च ना ?

पैसा's picture

21 Sep 2012 - 5:33 pm | पैसा

खास वल्ली शैलीत संपादक म्हणून छान सुरुवात झाली! आता न थांबता सातवाहनांवर लेखमालिका लिहायला घे बघू!

महत्वपूर्ण माहितीपर लेखन ! :)

यशोधरा's picture

21 Sep 2012 - 6:08 pm | यशोधरा

लेख वाचला, अतिशय आवडला, पण पुन्हा एकदा सावकाशीने वाचणार आहे.

कवितानागेश's picture

21 Sep 2012 - 6:29 pm | कवितानागेश

चांगली माहिती.
पुढच्या लेखाची वाट बघतेय.
स्वगतः शाळेत का बरे असे शिकवत नाहीत?

चित्रा's picture

22 Sep 2012 - 5:08 am | चित्रा

थोडी नवी माहिती मिळाली. (सत्तेचा शेवट इ.) धन्यवाद. काहीची उजळणी झाली.

शाळेत का बरे असे शिकवत नाहीत?

+१.

इष्टुर फाकडा's picture

21 Sep 2012 - 7:13 pm | इष्टुर फाकडा

भारी लेख ! खुपच मस्त

धनंजय's picture

22 Sep 2012 - 3:15 am | धनंजय

धन्यवाद, वल्ली. खूप चांगली माहिती मिळाली.

धन्यवाद, या साठी बरेच जण बरेच दिवस तुझ्या मागे लागले होते, त्याचा आरंभ जाहला उत्तम.

प्रास's picture

23 Sep 2012 - 8:28 pm | प्रास

लगे रहो वल्लीशेठ!
छान लेख, उत्तम माहिती.
साला अशा प्रकारे इतिहास शिकलो असतो तर आज अभ्यास करून काहीतरी ऐतिहासिक काम केले असते ;-)

अविनाशकुलकर्णी's picture

24 Sep 2012 - 2:03 am | अविनाशकुलकर्णी

सुंदर लेख

खुशि's picture

25 Sep 2012 - 4:04 pm | खुशि

सुन्दर! माहितीपुर्ण लेख.खुप आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2012 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

साला, आमच्या वेळचे इतिहासाचे पुस्तक या वल्लीने लिहीले असते तर तेव्हा आम्हालाही या विषयात रस वाटला असता. आता बराच उशीर झाला आहे.
पैजारबुवा,

लेख अतिशय सुंदर व उत्तम झाला आहे.

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 2:20 pm | अनिल तापकीर

सुंदर

चित्रगुप्त's picture

11 Sep 2013 - 9:38 pm | चित्रगुप्त

माहितीपूर्ण लेख. सातवाहन, क्षत्रप, किशाण, शक इ. नावे वाचलेली असली तरी त्याबद्दल नेमकी माहिती नव्हती. या लेखानंतरच्या काळातील अन्य राज्यांबद्दल लेख लिहिले असल्यास दुवा द्यावा.

स्थापत्य, कला, साहित्य, संस्कृती, शिल्प, चित्रकला यातही संस्मरणीय अशी प्रगती केली.

त्या वास्तुकलेचे, चित्र-मूर्तीकलेचे नमुनेही द्यावेत म्हणजे सातवाहन काळची नेमकी कला कोणती हे कळेल.

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 9:47 pm | प्रचेतस

धन्यवाद.

वास्तुकला म्हणजे दुर्ग, लेणी इत्यादी. ते तर आजही आपल्या समोर आहेत. हडसर, शिवनेरी, लोहगड, विसापूर, निमगिरी, हरीहर, साल्हेर, ब्रम्हगिरी याशिवायही कित्येक किल्ले सातवाहन काळातले. शिवाय कित्येक हिनयानपंथीय लेणी पण त्याच काळच्या.

तत्कालीन लेण्यांमध्येही चित्रे कोरली जात असत पण ही शक्यतो चौकटी नक्षीच्या स्वरूपात असत.

बाकी अधिक माहिती येथे मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Satavahana_dynasty#Cultural_achievements

बॅटमॅन's picture

12 Sep 2013 - 1:00 pm | बॅटमॅन

अतिसुंदर लेख. स्पावड्या म्हणतोय त्याप्रमाणे बांधणी फार सरस झाली आहे. ती विशेषकरून आवडली. माहितीतले बरेच बारकावेही नव्याने कळाले.

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 5:01 pm | जेम्स वांड

तुम्ही लिहिल्याप्रमाणे

तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले.

लोणी कसे निर्यात होत असेल त्याकाळी ? कारण लोणी वितळणे हा प्रॉब्लेम असतो. अर्थातच आधुनिक कोल्ड स्टोरेज चेन्स वगैरे तर तेव्हा अस्तित्वात नसणार, तर मग रोम, मध्यपूर्व (पर्शिया), ग्रीस/ तुर्की/ वगैरे भागात "विक्रीयोग्य लोणी" कसे पोचवले जात असेल ह्यावर काही सांगू शकाल का ?

प्रचेतस's picture

1 Dec 2021 - 5:37 pm | प्रचेतस

हे लोणी अर्थातच विशुध्द स्वरूपात नसावेच. थोडेफार मीठ लोण्यात टाकून हे लाकडी अथवा मातीच्या भांड्यात सीलबंद करून मुरवले जाई जेणेकरून ते टिकू शकेल. वितळत तर अर्थातच असणार पण मुरल्यावर इतके वितळत नसावं असे वाटते.

टर्मीनेटर's picture

1 Dec 2021 - 5:53 pm | टर्मीनेटर

हो तसेच असावे…
मागे नॅशनल जिॲाग्राफीकवर २००० वर्षांपुर्वीचे सीलबंद लोणी सापडल्याचे वाचले होते.

असो, तुमचा आणखीन एक चांगला माहीतीपुर्ण लेख ह्या निमीत्ताने वाचायला मिळाला!

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 6:09 pm | जेम्स वांड

पण अश्या लोण्याचा खाण्याला उपयोग तो काय असणार ? एकतर ते खारट असणार अन त्यातही मुरलेले म्हणजे काय बोलायला नको, मला वाटतं शिवशाही काळात जसे रांजणात साठवलेले तूप जखमा भरायला वापरत तसा काहीसा उपयोग असावा काय ?

त्याशिवाय , पाश्चात्य ट्रेडिशन्समध्ये कूकिंग फॅट म्हणून बटर थेट गरम तव्यावर घालून त्यात मग भाज्या मांस वगैरे "सौते" करण्याची परंपरा आहे, क्लेरिफाईड बटर किंवा घी/घृत/तूप हे त्याकाळी तिथे कितपत चलनात असेल कल्पना नाही, आपल्याकडून तत्काळी युरोपात तूप तर एक्स्पोर्ट होत नसेल ? कारण बहुउपयोगी, औषधी, रुचकर, उत्तम शेल्फ लाईफ आणि परिवहन सुलभतेत लोण्यापेक्षा तुपच सरस अन लॉजिकल वाटते आहे मला.

प्रचेतस's picture

1 Dec 2021 - 6:30 pm | प्रचेतस

आजचे अमूल बटर जसे खारवलेले असते तसे काहीसे स्वरूप असावे असे वाटते. तूप तर निर्यात होत होतेच, टिकण्याच्या दृष्टीने तूप उत्तमच. या व्यापाराचा उल्लेख 'पेरीप्लस ऑफ एरिथ्रीयन सी' या कुण्या अज्ञाताच्या आणि हिरोडोटस ह्या ग्रीक प्रवाशाच्या लेखनात आला आहे मात्र त्याचे नेमके संदर्भ हुडकून काढणे क्लिष्ट आहे.

शाम भागवत's picture

3 Dec 2021 - 7:39 pm | शाम भागवत

लोण्यातले मीठ काढण्याकरता लोणी पाण्यात टाकतात. लोण्यातले मीठ पाण्यात मिसळून जाते व लोणी शुध्द होते. आजही ही पध्दत वापरली जाते. अन्यथा लोण्याला वास यायला लागतो.

नागनिका's picture

6 Dec 2021 - 12:53 pm | नागनिका

उस्मानाबाद येथील तेर गावामध्ये उत्खननात सातवाहन कालीन चांदणी बाहुली सापडली होती.... अशीच सेम बाहुली रोम मधील एका संग्रहालयामध्ये देखील आहे.. तसेच या उत्खननामध्ये ग्रीक धाटणीच्या काही सुरया देखील सापडल्या आहेत.

नागनिका's picture

6 Dec 2021 - 12:54 pm | नागनिका

*चंदनी बाहुली

जेम्स वांड's picture

6 Dec 2021 - 1:14 pm | जेम्स वांड

ग्रीक धाटणीच्या सुरया - एम्फोरा ?

नागनिका's picture

8 Dec 2021 - 5:50 pm | नागनिका

ग्रीक धाटणीच्या सुरया - एम्फोरा ?

मद्यपानाच्या सुरया

तेर येथे एक सातवाहन कालीन विहीर सापड्ल्याची बातमी वाचली होती.

समग्र वल्ली पुस्तक काढायला हवे.

शाळेत शिकवणार नाहीत पण शालेय अभ्यासक्रमात अधिक वाचनासाठी या सदरात विविध पुस्तकांची नावं टाकायला काय अडचण आहे? ज्याला परवडेल, जमेल, आवडेल तो त्याच्या आवडीची पुस्तके वाचेल.