फ्रेंच राष्ट्रपतींचा राजप्रासाद

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
8 Apr 2022 - 2:10 pm

पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.

सोळाव्या लुईकडे या राजवाड्याची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती. 1787 मध्ये त्याने आपली चुलत बहीण डचेस ऑफ बोउर्बोन हिला हे निवासस्थान विकले. रशियातील कोसॅक्स (Cossacks) लोकांनी 1814 मध्ये पॅरिसवर ताबा मिळवला होता, तेव्हा त्यांनी एलिसे राजवाड्यात काही काळ आपला तळ केला होता. त्यानंतर या वास्तूची मालकी त्यांनी पुन्हा तिच्या मूळ मालकिणीकडे डचेस दे बोउर्बोन हिच्याकडे सोपवली. तिने ही वास्तू 1816 मध्ये लुई (अठरावा) याला विकली.

राजघराण्याकडे या वास्तूची पूर्णपणे मालकी आल्यावर तिला राजवाड्याचे महत्व आले. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत या राजवाड्यात पॅरिसमध्ये आलेल्या परदेशी राजकीय पाहुण्यांची राहण्याची सोय केली जात असे.

एलिसे राजवाड्याच्या वास्तुसंकुलात तीन मजली मुख्य मध्यवर्ती इमारत आणि तिच्या पटांगणाच्या भोवतीने असलेल्या एक-एक मजली इमारतींचा समावेश होतो. या संकुलातील सर्व कक्षांना मोठमोठ्या खिडक्या केलेल्या आहेत. मध्यवर्ती इमारतीतील Ceremonial Lounge हा एक महत्वाचा कक्ष आहे. 1889 मध्ये उभारलेल्या या कक्षात नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी, फ्रांसच्या राजकीय भेटीवर आलेल्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला फ्रेंच राष्ट्रपतींनी दिलेली मेजवानी, राष्ट्रपतींनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ख्रिसमस पार्टी असे बरेच समारंभ पार पडत असतात. या संपूर्ण कक्षात लाल रंगाचा नक्षीदार गालिचा अंथरेलला असून सर्व बाजूंच्या भिंती आणि छतावरही अनेक अप्रतिम चित्रे रेखाटलेली आहेत. येथे अनेक झुंबरेही लावलेली आहेत. एकूणच हा कक्ष आलिशान असाच आहे. या कक्षाला माजी राष्ट्रपती मितराँ यांनी आणखी खिडक्या करून अधिक हवेशीर बनवले होते.

एलिसे राजवाड्यातील आणखी एक आकर्षक कक्ष आहे Lounge of the Ambassadors. या कक्षातच राष्ट्रपती फ्रांसमध्ये नियुक्तीवर आलेल्या विविध देशांच्या नव्या राजदुतांकडून परिचयपत्र स्वीकारत असतात. या कक्षाच्या सफेद भिंतींवर सोनेरी कलाकुसर केलेली असून मोठमोठे आरसेही लावलेले आहेत. खाली नक्षीदार गालिचा, त्यावर ठेवलेल्या सोनेरी मुलाम्यातील लाकडी खुर्च्या आणि मेज तसेच छतावरची चित्रं आणि झुंबरं, यामुळे हा कक्षही आलिशान बनला आहे. राष्ट्रपतींचे कार्यालय आणि खासगी कक्ष, Lounge of Portraits, Salon Murat, नेपोलियन (तिसरा) हे ग्रंथालय असे अनेक महत्वाचे आकर्षक कक्ष या राजवाड्यात आहेत.

19व्या शतकाच्या मध्यावर राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या चार्लेस लुईस नेपोलियन बोनापार्ट (नेपालियन-तिसरा) याने या नव्या प्रासादात प्रवेश केला आणि पुढे त्याने एलिसे राजवाड्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्याचा आदेश दिला. नुतनीकरणाचे ते काम पुढे 14 वर्षे चालले होते. त्यावेळी योसेफ लाक्रॉईक्स याने एलिसे राजवाड्याचे जे आरेखन केले होते ते आजवर बहुतांश प्रमाणात कायम आहे.

फ्रेंच राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान बनल्यावर एलिसे राजवाड्यात परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या आणि पाहुण्यांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे 1889 मध्ये येथे एक मोठा स्वागतकक्ष उभारावा लागला. तसेच वीज, दूरध्वनी, सेंट्रल हिटींग यांसारख्या आधुनिक सुविधाही येथे पुरवल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या सध्याच्या पाचव्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींच्या नव्या गरजा लक्षात घेऊन एलिसे राजवाड्याची पुनर्रचना केली गेली. तसेच बऱ्याच कक्षांची अदलाबदलीही केली गेली. मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील Salon Murat मध्ये दर बुधवारी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत असतात. या राजवाड्यात हॉल ऑफ ऑनर, सिल्व्हर रुम, पाऊलिन भोजनकक्ष, व्यक्तिचित्र कक्ष, हॉल ऑफ फेस्टिव्हिटीज, क्लेओपात्रा कक्ष, नील कक्ष इत्यादी अनेक आकर्षक कक्ष आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर जाण्यासाठी बांधलेले जिनेही या राजवाड्याच्या आलिशानतेला शोभेसे आहेत. अशा या पॅरिसमधील एका ऐतिहासिक पण तितक्याच प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या वास्तूच्या उभारणीला 2022 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली आहेत.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/04/blog-post_8.html

इतिहासमुक्तकलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

12 Apr 2022 - 2:16 pm | कर्नलतपस्वी

सुदंर वास्तू,इतक्या वर्षा नंतरही नव्या सारखे दिसतेय.