प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
20 Mar 2022 - 12:54 pm

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं.

कधी ट्रेकिंग, कधी फिरण्यासाठी तर कधी मदत कार्यासाठी कश्मीरला प्रवास झाले. कश्मीर खो-यात अनेक जागी फिरायचा योग आला- श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, छत्तीसिंगपोरा (जिथे बिल क्लिंटन भारतात आले असताना ३६ शीखांना मिलिटरीच्या पोशाखातील अतिरेक्यांनी ठार मारलं होतं) आणि शंकराचार्य हिलसुद्धा! लहानपणापासून कश्मीरबद्दल खूप वाचलं होतं. हा चित्रपट बघताना मी बघितलेलं कश्मीर, तिथे अनुभवलेल्या गोष्टी व घटना आठवल्या. जम्मूमधून टॅक्सीने श्रीनगरला जाताना सोबतचे कश्मीरी लोकांचं अबोल असणं आणि बोलणं टाळणं, श्रीनगरमध्ये ऑटो रिक्षावाल्याने पहिले हिंदु का मुसलमान हे विचारणं, श्रीनगरमध्ये गोळीबार, दगडफेक (स्टोन पेल्टिंग) बघणं, छत्तीसिंगपोरामध्ये अजूनही शीख लोक राहात असलेले दिसणं, अनंतनागला इस्लामाबाद आणि शंकराचार्य टेकडीला सुलेमान टॉप म्हंटलं जाणं, काही स्थानिक लोक सतत एक प्रकारचं अंतर ठेवून असणं, सेनेच्या सततच्या मोठ्या उपस्थितीमुळे स्थानिकांना होत असलेली गैरसोय हे सगळं बघितलं. हेसुद्धा अनुभवलं की, अनेक प्रकारचे फरक, भिन्न पार्श्वभूमी, वेगळ्या प्रकारचं राहणीमान हे सगळं असूनही लोकांमध्ये आत्मीयता आणि सरलताही आहे. मधुर कश्मिरी बोलीमध्ये हिंदी व संस्कृत शब्दही ऐकले. ह्या सगळ्या अनुभवांच्या आधारे म्हणावसं वाटतं की, ह्या चित्रपटाने सगळ्यांसमोर असं एक सत्य आदळलं आहे जे बहुतांश लोकांसमोर आत्तापर्यंत आलेलं नव्हतं.

(जम्मू- कश्मीरमध्ये २०१४ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळच्या मदत कार्यातील सहभागाचे अनुभव इथे वाचता येऊ शकतात निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)

चित्रपट बघून वाटलं की अगदी विचारपूर्वक हा एक प्रकारे केलेला सर्जिकल स्ट्राईकच आहे. ज्या सिस्टीमने आजपर्यंत हे सत्य समोर येऊ दिलं नव्हतं, त्या सिस्टीमवर हा सरळसरळ केलेला हल्ला आहे. चित्रपटाचं सादरीकरण, कलाकारांचे अभिनय, मांडणी इ. बद्दल काही सांगण्याची गरज नाही. फक्त इतकंच म्हणेन की, चित्रपट अतिशय सटीक वार करणार आहे आणि एक प्रकारे मधमाशांचं पोळं उठवणारा आहे. निश्चितच वेगवेगळे कंगोरेही ह्या पूर्ण विषयाला आहेतच. पण चित्रपटाचा हेतुच मुळी एक बाजू समोर आणणं आहे आणि चित्रपट त्यामध्ये यशस्वी झाला आहे. कोणत्याही विषयाला ३६० अंशाने बघताना अनेक अनेक मुद्दे समोर येतात, बाजू दिसतात. त्या आहेतच. पण तरीही चित्रपटात जे सत्य समोर मांडलं गेलंय, ते ज्वलंत सत्य आहे. आणि ते आपल्याला ज्वलंत ह्यामुळे वाटतं, कारण आजपर्यंत त्या दिशेमध्ये घनघोर अंध:कार होता.

शेवटी इतकम्च म्हणेन की, हा चित्रपट जो परस्पेक्टीव्ह देतो, तो कोणाच्या विरुद्ध नाही आहे. जे आहे, ते अगदी प्रामाणिकपणे समोर आणलं गेलंय. आणि सत्य नेहमी कडवंच असतं. सत्य सहन करण्यासाठी तर मोठी हिंमत आणि साहस पाहिजे. ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विवेक अग्निहोत्री जी आणि अन्य सर्वांचं खूप अभिनंदन! प्रकाशात आलेल्या ह्या सत्याची जवाबदारी आपण सर्वांची आहे. आपल्या देशातील पूर्ण सिस्टीम, पूर्ण प्रशासन आणि समाजतंत्र त्यासाठी जवाबदार आहे. इतकीच अपेक्षा आता आहे की, आपण सगळ्यांकडे वेगवेगळे दृष्टीकोन आणि परस्पेक्टीव्हज ऐकून घेण्याची व त्यांच्यावर विचार करण्याची क्षमता यावी व जे आहे ते खरं खरं बघण्याचं साहस यावं. तसं झाल्यास आपण ह्या चित्रपटातून शिकलो असं म्हणता येईल. धन्यवाद.

समाजजीवनमानप्रकटनप्रतिसाद

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Mar 2022 - 4:27 pm | चंद्रसूर्यकुमार

चित्रपट बघून वाटलं की अगदी विचारपूर्वक हा एक प्रकारे केलेला सर्जिकल स्ट्राईकच आहे. ज्या सिस्टीमने आजपर्यंत हे सत्य समोर येऊ दिलं नव्हतं, त्या सिस्टीमवर हा सरळसरळ केलेला हल्ला आहे.

सहमत

sunil kachure's picture

20 Mar 2022 - 6:48 pm | sunil kachure

The Kashmir file सिनेमा आला.अतिशय क्रांतिकारी सिनेमा आहे.लोकांस 1990 मध्ये काश्मीर मध्ये काय घडले हे माहीत पडले
काश्मिरी हिंदू वर कसे अत्याचार झाले हे माहीत पडले.
सरकार नी सिनेमाची दखल घेतली .काश्मीर प्रशांची घेतली की नाही ते माहीत नाही.

आता पुढे बघायचे आहे ही जागी झालेली जनता काश्मीर मध्ये राहायला कधी जाते. आहे.
आता 370 पण नाही
सर्व जागृत जनते नी काश्मीर मध्ये एक दोन एकर जागा घेवून तिथे घर बांधावे .
आणि हिंदू ची संख्या काश्मीर मध्ये वाढवावी.
सरकार नी सर्व गुन्हेगार लोकांना शिक्षा द्यावी.
काही वर्षात काश्मीर हिंदू बहुसंख्य राज्य झाले तर च ह्या सिनेमा मुळे जनता आणि सरकार जागृत झाले असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2022 - 9:07 pm | चौथा कोनाडा


सर्व जागृत जनते नी काश्मीर मध्ये एक दोन एकर जागा घेवून तिथे घर बांधावे .


हास्यास्पद !!!

सौन्दर्य's picture

22 Mar 2022 - 11:04 pm | सौन्दर्य

कोचुरे जी तुम्ही चांगले मुद्दे मांडलेत.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट फक्त काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी निर्मित केला गेला आहे. ह्या चित्रपटामुळे अनेक गोष्टी देशातील जनतेला कळल्या ज्या इतकी वर्षे लपवून ठेवल्या गेल्या किंवा सौम्य स्वरूपात मांडल्या गेल्या. ह्या सिनेमाचे तात्कालिक फलित म्हणजे हिंदू-मुस्लिम समाजातील वाढती तेढ.

पण त्याच बरोबर 'काश्मिरी पंडितांना त्यांचे जन्मस्थान परत हवे आहे, तेथे जाऊन त्यांना पुन्हा राहायचे आहे' त्या बाबतीत फारच कमी लोकं बोलताना दिसतात. नुसते ३७० हटवल्याने श्रीनगरला काश्मिरी पंडितांचे लोंढे जायला निघतील ह्या भ्रमात कोणीही असू नये. काश्मीर खोऱ्यात जाऊन सुखाने राहायचे असेल तर तेथे अहोरात्र सुरक्षा प्रदान केली गेली पाहिजे. तेथे सर्वांगीण विकास घडून आला पाहिजे तरच काश्मिरी पंडित किंवा भारतातले इतर नागरिक तेथे जातील. सद्य परिस्थितीत ती शक्यता फार दूरची दिसतेय.

काश्मिरी पंडितांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी पण आज ३२ वर्षांनंतर हे कितपत शक्य आहे हे सांगायला कोणी ज्ञानी नकोय.

मिसळपाववरच एका लेखात मी म्हटलेलं पुन्हा लिहितोय की ज्यावेळी देशातील इतर नागरिक काश्मीरमध्ये राहायला जातील त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का "आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत" म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल. सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.

सुखी's picture

20 Mar 2022 - 9:39 pm | सुखी

सहमत

मार्गी's picture

22 Mar 2022 - 3:49 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

काश्मीरमधे निवडणुका झाल्यावर खरा अंदाज येईल. तोपर्यंत मी फक्त वाचत राहणार.
:)

मुक्त विहारि's picture

24 Mar 2022 - 8:39 am | मुक्त विहारि

छान लिहिले आहे....