नीज भरते दिशांत
माझे रिते नीजपात्र
उतरूनि ये अंगणी
जरी हळुवार रात्र
रात्र रात्र जागते
गोड स्वप्नातूनि
धुंद गात राहते
अबोल मौनातूनि
येती कानी दुरून
सूर सारंगीचे छान
मन खाई हेलकावे
वाऱ्यावर जसे पान
पान पान जागते
पाचूच्या बनातूनि
शुभ्र सोनसकाळी
झळाळते दवातूनि
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
4 Mar 2022 - 8:59 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली कविता..
मस्त
पैजारबुवा,
4 Mar 2022 - 9:11 am | प्रचेतस
झकास एकदम.
4 Mar 2022 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
10 Jun 2022 - 4:24 pm | कुमार१
आवडली कविता..
11 Jun 2022 - 11:58 am | तुषार काळभोर
पण कृपया निरुपण करावे. म्हणजे आम्हा अरसिकांना नादमयतेच्या पलिकडे आनंद घेता येईल.
13 Jun 2022 - 3:17 pm | चित्रगुप्त
"कवित्व शब्दसुमनमाळा - अर्थपरिमळ आगळा" असे समथांनी कवित्वाचे वर्णन केलेले आहे, परंतु अलिकडल्या बर्याच कवितांमधून 'आगळा अर्थपरिमळ' फारसा प्रचितीस येत नाही. गोग्गोड शब्द-प्रतिमांच्या माळांमधून दोन-तीनदा आरपार जाऊनसुद्धा काही अर्थ हाती लागलेला नाही असे वाटले. 'निजपात्र' म्हणजे 'स्वतःचे पात्र' की 'नीज' हे जणुकाही एक 'पात्र' असून ते रिकामे आहे , असे म्हणायचे आहे, हे पहिल्या ओळीत 'नीज' तर लगेच दुसर्या ओळीत 'निज' असे लिहील्याने समजले नाही. तसेच 'पाचू' म्हणजे (पन्ना वा एमरल्ड) रत्न ना? मग 'पाचूचे बन' (वन - अरण्य ?) म्हणजे नेमके काय ? ''शुभ्र सोनसकाळ' म्हणजे काय ?
'हळुवार' 'गोड स्वप्न' 'धुंद गान' 'अबोल मौन' 'सारंगीचे सूर' 'पाचूचे बन' 'सोनसकाळ' 'झळाळता दव'..... वगैरे बुळबुळीत शब्दांवरून घसरत जाताना कविता संपली, तरी नेमके झाले काय हे समजले नाही.
एकादे 'अमूर्त' चित्र (मी याला 'केवल चित्र' म्हणतो) त्यात कोणताही'अर्थ' शोधण्याच्या भानगडीत न पडता, उगाचच तर्कवितर्क न करता 'नुस्ते बघायचे' असते, तसे शब्दांच्या घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत अनुभवायची, असे आहे का? मिपावर 'दवणीय' असा एक शब्दप्रयोग रूढ आहे. तशी ही एक दवणीय कविता आहे का ? मज निरोपावे.
शेवटी, "रागावू नका गडे" असा गोड हट्ट.
26 Dec 2022 - 4:21 pm | चांदणे संदीप
मला वाटले मी खूपच सरळ लिहितो. लिहिण्यामागे तसा हेतूतरी असतो. मला स्वतःला दुर्बोध कविता, गूढकविता, शब्दबंबाळ कविता, मुक्तछंदातल्या कविता किंवा ज्या तालमय, लयदार नाहीत अशा कविता फारशा आवडत नाहीत.
असो, तर या कवितेत नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन पाखरांपैकी कोणाही एकाच्या एकट्याने रात्र व्यतीत करताना, विरह असा नाही पण, पुन्हा भेटण्याच्या आधीची ओढ, त्यायोगे रात्री स्वप्नरंजन करीत सकाळपर्यंतचा प्रवास, असं काहीसं चित्रण आहे.
सं - दी - प
27 Dec 2022 - 12:59 am | चित्रगुप्त
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय... तू तो ना आये तेरी, याद सताय ... असा मामला आहे म्हणायचा.
27 Dec 2022 - 3:24 pm | चांदणे संदीप
एक्झ्याटली पर्फेक्ट! :)
सं - दी - प
13 Jun 2022 - 3:49 pm | खेडूत
मस्त. आवडली कविता!