......... माया एक ग्रामीण भागातील एक चुणचुणीत अन् चाणाक्षं मुलगी! काळेभोर डोळे, बुटके नाक, लांब केश, सडपातळ बांधा, मध्यम उंची आणि गव्हाळ वर्णाची! तशी तर ती सुखवस्तू कुटुंबातली! घर छान वाड्या सारखे, वडील 'रामराव' गावचे सरपंच! तीस एकर बागायती शेती, नोकर-चाकर, घरी गोदामात धान्याच्या रासा भरलेल्या, मोटार पंप विहीर सर्वकाही सुव्यवस्थित होते.
आठ भावंडांमधली 'माया' दुसर्या क्रमांकाची! लहानपणापासूनच ती सर्व भावंडांना सांभाळून घेत असे. मोठी बहीण 'छाया' ही नेहमी तिच्या अभ्यासात समरस असे. त्यामुळे घरातील सर्व कामे मायालाच करावी लागत. नोकर होते पण ते शेतातल्या कामासाठी! 'आई' होती पण ती सतत आजारी असायची. झाडलोट, अंगणात सडा घालने, नक्षीदार रांगोळी काढणे, धुणी-भांडी आणि दहा-बारा लोकांचा स्वयंपाक त्यामुळे मायाची पुरती दमछाक व्हायची.
......आता 'माया' दहावी झाली होती पण ती दहावीत 'हिंदी' या विषयात 33 गुण मिळाल्यामुळे नापास झाली नंतर ती काही पुढे शिकली नाही पण व्यवहारात चोख होती. सर्व व्यवहाराचा हिशोब कटाक्षाने सांभाळायची. मोठी बहीण 'छाया' महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरी गेली आता 'माया' हीच घरची गृहिणी होती.तशातच मोठ्या वडिलांनी मायासाठी एक स्थळ आणले. वडील 'रामराव' मायाचे लग्न करू इच्छित नव्हते कारण अजून ती लहान होती. फक्त सोळा वर्षांची! पण मोठे वडील हट्टच करून बसले. मुलगा चांगला आहे. सरकारी नोकरीत आहे. घरदार सर्व काही छान आहे. त्यामुळे रामरावांनी नाखुशीनेच या लग्नासाठी होकार दिला.
....पहिलेच लग्न असल्यामुळे रामरावांनी जय्यत तयारी केली होती. मोठमोठ्या पुढाऱ्यांना लग्नाची आमंत्रणे पाठवली. जवळच्या तीन्ही गावांना जेवणासाठी निमंत्रित केले. घराची संपूर्ण लाइटिंग केली. मोठ्या गाज्या-वाज्यात लग्नाचा समारंभ सुरू झाला. लग्नासाठी सर्व वऱ्हाडी मंडळी आली वर 'चंद्रभान' हा दिसायला पैलवान गडी होता.पिळदार शरीरयष्टी, मोठे ललाट, तेजस्वी चेहरा, गव्हाळ वर्ण, मध्यम उंचीचा! पण तो लग्नामध्ये डोलत होता याला कारण म्हणजे त्याने मद्यप्राशन केले होते. याची कल्पना वधू पक्षाला आली होती पण लाजेपोटी त्यांनी सर्व काही सहन केले. जेव्हा हार घालायची घटका आली तेव्हा वर पक्षाकडील मंडळींनी त्याचा हात धरून हार माया च्या गळ्यात घालून घेतला.मायाला ही परिस्थिती आणि अनुभव फार लाजीरवाण वाटत होता. तिला आपल्या समोरच्या आयुष्याची पूर्वकल्पना आली होती. सर्व सोपस्कार पार पडले आणि माया ची बिदाई झाली. पण घरच्यांना चुणचुण लागली की माया चे कसे होणार?
......मायाच्या सासरचे घर हे छोटेसेच होते आणि त्यातल्या त्यात चंद्रभान च्या बहिणीची दोन मुलगे त्यांच्या कडेच असायची. चंद्रभान ला वडील नव्हते फक्त आई होती. पण आता आपल्या नशिबी जे आला आहे त्यातच आनंद मानून जीवन जगायचे या उद्दिष्टाने मायाने संसाराला सुरुवात केली. मायाने चंद्रभानला लग्नात दारू पिण्याचे कारण विचारले असता चंद्रभान म्हणाला "माझा भाऊ 'सुर्यभान' त्याने जबरदस्तीने मला पाजली होती. लग्नात लय भीती वाटत होती. एवढा मोठा जनसमुदाय बघून मी घाबरलो होतो म्हणून मी प्यायलो पण ती दारू मला झिंगली!" असं म्हणत मोठ्यामोठ्याने हसायला लागला. मायाने त्याचे म्हणणे खरे मानले. आधीचे सहा महिने शांततेत गेले आणि मग चंद्रभान अधून-मधून दारू पिऊन यायला लागला तेव्हा माया संतापायची कारण तिला दारूचा वास अजिबात सहन होत नसे. त्यामुळे घरात भांडणं व्हायला लागली. सासूला ती म्हणायची, "आपल्या मुलाला तुम्ही समजावत का नाही!" तेव्हा सासू तिला उलटून बोलायची, "ये भवाने माझं पोर इतकं राबराब कष्ट करतो दिवसभर! थोडा रात्री प्यायला म्हणून काय झालं! दोन वेळचं मिळतं ना गिळायला मग गप्प बसायचं नाही तर चंद्रभान ला चांगलं बदडायला लावीन! जास्त शहाणपणा करू नकोस ही हुशारी आपल्या बापाच्या घरी चालवायची! इथं नगं!"
सासू ही पूर्ण खाष्ट होती. ती कशाला त्याला दारू नको पिऊ म्हणून म्हणेल कारण ती स्वतः आपल्या मुलाने दिलेली दारू प्यायची. 'चंद्रभान' नशेत असला की तिला म्हणायचा, "मा थोडी घेत का!" तर ही थेरडी लगेच ग्लास तोंडाला लावायची मायाला फार किळसवाणा वाटायचं हा सर्व प्रकार! घर छोटे असल्यामुळे मायाला ज्या वस्तू आंधन म्हणजेच प्रेझेंट आल्या होत्या त्या वस्तू तिने माळ्यावर टाकल्या. तेवढ्या वस्तू ठेवायला घरात जागा नव्हती. हे सगळं मायाच्या सासूला माहित होते आणि एक दिवस तर तिने हद्दच केली 'माया' बाजारला गेली असताना तिने आपल्या नातवाच्या हाताने अर्धेअधिक सामान आपल्या मुलीच्या गावी पाठवून दिले. मायाला याबाबतीत काही कल्पना नव्हती पण एक दिवस मायाला 'कढई' पाहिजे होती तेव्हा तिने 'कढई' काढण्यासाठी माळ्यावर जाऊन बघितले तर खूप सारे सामान गायब होते कढई सकट! जेव्हा मायाने सासूला याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, "काय झालं ये भवाने! माझ्या मुलाचच होतं ते! त्याला विचारलं मी! तो देऊन टाक म्हणाला, जास्त आरडा-ओरडा करू नकोस नाहीतर चटणी करील तुझी!"मायाच्या मनात आग धगधगत होती. तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि रात्री चंद्रभान ला ह्या प्रकाराबद्दल सांगितलं. म्हातारीने आधीच आगीत तेल टाकून त्याला भडकवले होते. तो दारू पिऊन आला आणि मायाच्या अंगावर त्याने हात उगारला. शिवीगाळ करू लागला. "माय जसं म्हणेल तसं वागायचं! तिला उलटून बोलू नगस नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणी नाही!
......मायाला आता सर्वांची सवय झाली होती पण राग अनावर झाला की ती उसळून उठे. मग काय लाथा बुक्क्यांचा मार! 'चंद्रभान' हा रांगडा गडी होता त्यामुळे त्याच्यासमोर 'माया' कमजोर पडायची. हातात सापडेल ती वस्तू तो तिला फेकून मारी.
मायाला आता दिवस गेले तरी पण नवव्या महिन्यापर्यंत तिने सर्व कामे केली. सासू पडली काडी पण उचलायची नाही. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नाव ठेवले 'अस्मिता' पण सासू मोठी नाराज झाली "काय अवदसा आली आमच्या घरा मुलगी जन्माला घातली! मला नातवाचं तोंड बघायचं होतं आणि या दळभद्री ने लेक जन्मा घातली." असे नेहमी मायाला टोमणे मारायची. त्यामुळे ती अस्मिताला कधी जवळ घेत नसे. पण 'चंद्रभान' लाड करायचा मुलीचे खूप!
...'रामराव' अधून-मधून यायचे लेकीच्या घरी. आले की संत्री, आंबे, नारळ, कणीस, धान्य असं भरपूर जिन्नस आणायचे. आपल्या मुलीची हकिगत जाणून फार हताश व्हायचे. मायाला म्हणायचे, "मुली मला माफ कर! मी घाई केली तुझ्या लग्णाची! माझ्या भावाने हट्ट नाही धरला असता तर तुझा संसार लई सुखाचा झाला असता पण आता काही उपयोग नाही!"म्हातारी रामरावांना भेटली की लई गोड-गोड बोलायची," नाही साहेब तुमची लेक लय गुणाची आहे. सर्व सांभाळून घेते." पण रामरावांना सर्व काही माहिती होते यावर काही उपाय नव्हता तिच्या सासरच्यांना तिच्या त्रासाबद्दल जाब विचारला तर उलट आपल्या लेकीलाच मार बसेल. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणेच त्यांच्या हातात होते.
...'माया' आता दुसऱ्यांदा बाळातीण झाली. ह्यावेळेस ती बाळतपण करायला गावी आली होती. कारण पहिल्या बाळंतपणाला तिला खूप त्रास सोसावा लागला. आपल्या मुलीला रामरावांनी सर्व सुविधा पुरवल्या. तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याची फार दक्षता घेतली. रामनवमीचा दिवस होता गावात! रामाच्या मंदिरातून जत्रा निघाली होती. सर्व ग्राम दिव्यांनी उजळून निघाला होता. राम-लक्ष्मणाचे, हनुमानाचे, सीतेचे, रावणाचे सोंग घेऊन गावकरी 'रामलीला' करीत होते. सर्व वातावरण टाळ्या आणि मृदुंगाणी धुंद झाले होते. घरातील सर्व मंडळी जत्रा बघायला गेली होती.घरात फक्त मायाची आजी आणि मायाच होती. अशातच मायाला कळा सुरू झाल्या आणि तिने आजीला हाक मारली. आजी लगबगीने तिच्याजवळ आली. मायेने तिला कुरवाळले आणि मायाने सहजच बाळाला जन्म दिला. तिला कसलाही त्रास झाला नाही. बाळ जन्माला आले तेव्हा 'रामलीला' संपली होती. रामरावांना ही खबर कळाली तेव्हा ते लई खुश झाले. मुलगा झाला होता. त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात बाळाच्या नामकरणाचा सोहळा साजरा केला. मुलाचे नाव ठेवले 'स्वानंद' कारण हा आनंद घेऊन आला होता मायाच्या आयुष्यात!
क्रमश:
प्रतिक्रिया
31 May 2021 - 6:34 pm | गुल्लू दादा
पु.ले.शु....मायाला 33 मार्क वर ग्रेस का बरे लागला नसेल ;)
31 May 2021 - 7:05 pm | गॉडजिला
विषण्ण करी मन माझे....
31 May 2021 - 8:02 pm | सुहास चंद्रमणी ...
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद गुल्लू दादा!
हाहाहा! छान प्रश्न विचारला तुम्ही,ग्रेस गुण याकरीता नाही मिळाले कारण गणितात तिला ग्रेस मिळाला होता.
काळजीपूर्वक वाचन केल्याबद्दल आभारी आहे आपला कारण प्रत्येक कथेवर समिक्षण व्हायला हवं!ह्यातूनच कथेच्या सुधारणेला वाव मिळतो.
31 May 2021 - 8:07 pm | सुहास चंद्रमणी ...
गाॅडजिला आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे!
खरतर स्रीचे शोषण वेदीक खालखंडापासून सुरू आहे!ती आता जरी पुढारलेली असली तरी समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलेला नाही!
31 May 2021 - 8:33 pm | गॉडजिला
ना स्त्रि पुरुषाचे शोषण करु शकते ना पुरुष स्त्रिचे....
शोषण हे फक्त सबलता अबलतेचे करते मग सबल स्त्रि असो, कि पुरुष... आणी अबलता पुरुशाची असो की बैलाची.
1 Jun 2021 - 10:28 pm | सुहास चंद्रमणी ...
शोषण करणे किंवा होऊ देणे हे व्यक्तीपरत्वे अवलंबून आहे.तस बघता आजची स्त्री सक्षम तर झाली आहे पण तिच्यावर होणारा अन्याय हा अजून तरी तूर्तास थांबला नाही.एकीचे बळ तर आहे तिच्यात! ती अबला की सबला हे आपणच ठरवायला हवं!