माझे बाबा पाटबंधारे खात्यात कामाला असल्याने त्यांची साधारण दर चार वर्षांनी बदली होत असे. पाटबंधारे खात्याची कामे सुरू असतील अशा ठिकाणी म्हणजेच बर्यापैकी लहान आणि अगदीच क्वचित शहरात बदली होत असे. आई बाबांचे लग्न झाल्यापासून आणि माझ्या जन्माच्या आधी भाळवणी, सातारा, करमाळा अशा ठिकाणी बदल्या झाल्या होत्या. बदली झाली की चंबूगबाळे आवरायचे अन् निघायचे. सामानाची बांधाबांध व्यवस्थित करता यावी म्हणून आईने त्या काळात मिळत असतील ती खोकी तसेच पॅकिंगसाठी म्हणून आमचे लहानपणीचे कपडे सांभाळून ठेवले होते. एवढी गावे फिरलो तरी कपाचा एक टवकासुध्दा निघाला नाही असं पॅकिंग असायचं. आमची अशी फिरस्ती सुरू होती तोपर्यंत मी बरीच लहान होते त्यामुळे आवराआवरीत मदत केलेली मला तरी आठवत नाही. खरंतर आज पर्यंत मला वाटत होते की मला पूर्वीचे काहीच आठवत नाहीये. जणू आठवणींचे गाठोडे कुठेतरी सोडून आले आहे. पण आज आवर्जून बसले तर ते गाठोडे आणि त्यातल्या कित्येक आठवणी सापडल्या आहेत. ह्या आठवणींचे तुकडे वेचता वेचता केवढा कोलाज तयार होतो ते बघायचं.
अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची तर सोलापूरपासून सुरु करावे लागेल. माझ्या जन्माच्या वेळेस आई-बाबा सोलापुरात होते. मी एक वर्षाची झाले आणि बाबांची बदली बारामतीला झाली. त्यामुळे फिरस्तेपणातील माझ्यासाठी अगदी पहिला टप्पा म्हणजे सोलापूर असला तरी खरा प्रवास बारामतीमधून सुरु झाला.
पाटबंधारे खात्यात काम करणाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर असतात. आणि बऱ्याचदा अशा क्वार्टर्सची कॉलनीदेखील असते. बारामतीतसुध्दा अशीच एक कॉलनी होती आणि आम्हाला राहायला तिथे एक बंगला मिळत होता. पण ऑफिसमधले वातावरण आणि राजकारण तिथे झिरपत असल्याने बाबांनी बाहेर दुसरीकडे घर भाड्याने घेऊन राहायचे ठरवले. त्यानुसार रणसिंग बिल्डिंग मध्ये एक घर भाड्याने घेतले. नाव रणसिंग बिल्डिंग असले तरी ती एक बैठी चाळच होती. पण बांधकाम नवीन होते त्यामुळे माझ्या मनात तिची आठवण चाळ म्हणून न राहता बिल्डिंग म्हणूनच राहिली.
रणसिंग बिल्डिंगमध्ये यायचे झाले तर मुख्य रस्त्यावरून थोडे खाली उतरावे लागायचे मग समोर मोकळे पटांगण. मग झुडपांनी केलेले बिल्डिंगचे कुंपण दिसणार. बिल्डिंगच्या दर्शनी भागात घरमालक राहत होते. बिल्डिंगच्या समोरच्या आणि कुंपणाच्या आतल्या भागात शहाबादी फरशी घातल्या होत्या. घरमालकांचे कुटुंब म्हणजे घरमालक, त्यांची बायको, एक मुलगी आणि एक मुलगा, वडील, एक भाऊ (आणि त्याचे लग्न झाले असावे), आजी आणि एक आत्या. खरं तर ती जागा घरमालकाच्या वडिलांनी घेऊन बांधली होती. पण माझ्या आठवणीत तेच घरमालक असं राहिलं. त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत धान्यांची पोती असायची, त्यांचा धान्यविक्रीचा व्यवसाय होता. त्यांचे घर झाले की भाडेकरूंच्या दोन-दोन खोल्या साधारण सहा भाडेकरू राहू शकतील अशी ही बिल्डिंग. अशी तीन घरे झाल्यावर गच्चीवर जाण्यासाठी एक जिना होता आणि नंतर अजून तीन घरे. आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला अगदी साधी वस्ती होती. मातीची घरं, शेणाने सारवलेली जमीन आणि घरामध्ये चूल. तर मागच्या बाजूला पण बैठ्या चाळी होत्या. पण त्या घरांचे छत पत्र्यांचे होते. त्याच वस्तीत काही मुली राहायच्या आणि मी त्यांच्याबरोबर खेळायचे. त्या कित्येकदा शेणाचा पो दिसला की गोळा करून घेऊन जायच्या. माती, शेण आणि पाणी असे मिश्रण करून जमीन सारवायाच्या. अजून एक आठवण म्हणजे रणसिंग बिल्डिंगच्या शेजारी जीर्ण झालेला बंगला होता आणि थोडी मोकळी जागा होती. तिथे बिट्ट्यांची झाडे होती. आम्ही खेळण्यासाठी तिथून बिट्ट्या आणायचो. पण मी अर्थातच मोठ्या बहिणींबरोबरच तिकडे जात असे.
तर ह्या बिल्डिंगमध्ये सर्वात आतल्या बाजूचे घर म्हणजे आमचे होते. आमचं घर म्हणजे दहा बाय दहाच्या दोन खोल्या आणि घरातच बाथरूम. पुढे एक आणि मागे एक अशी दोन दारं. पुढच्या दराने घरात येताना दोन छोट्या पायऱ्या चढायच्या आणि मग घरात प्रवेश. कित्येकदा संध्याकाळी माझ्या बहिणी ह्या पायऱ्यांवर बसून शेजारच्या मैत्रिणींशी गप्पा मारत असायच्या. आमच्या तीन बिऱ्हाडांमध्ये एक कॉमन संडास होता आणि त्याला कुलूप असायचे (स्वच्छता राखली जावी म्हणून). किल्ली प्रत्येक बिऱ्हाडाकडे असायची. आमच्या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घराच्या बरोबर समोर म्हणजे जास्तीत जास्त ७-८ फुटांवर एक आड होता. त्या आडावरूनच घरात लागणारे पाणी भरले जायचे. आईने सांगून ठेवले असल्याने एवढी लहान असून देखील मी त्या आडाकडे कधी जायचे नाही. आणि घरमालकांचा मुलगा - जो माझ्याच वयाचा होता, तो मात्र आडाकडे यायचा. घरमालकीणबाई म्हणायच्या देखील, 'साहेबांची मुलगी समोर आड असून तिकडे फिरकत नाही आणि आमचं गाभडं मात्र तिकडे जास्त असतं.' तो माझा एकदम जवळचा मित्र होता. आम्ही सारखे एकत्र खेळत असू.
ह्या दोन खोल्यांच्या घरामध्ये आम्ही चार भावंडे आणि आई बाबा अशी सहा माणसे राहायचो. त्यात कधी कधी मावशी तिच्या दोन मुलांना घेऊन यायची. मग आम्ही गच्चीवर झोपायला जायचो. कित्येकदा आजी (आईची आई) पण यायची राहायला. पुढची खोली म्हणजे बदलता रंगमंच असायची. दिवसा घडीच्या मांडून ठेवलेल्या लोखंडी खुर्च्या, एका कोपऱ्यात टीपॉय, एक लोखंडी कपाट (त्यात सगळ्यांचे कपडे), एका भिंतीला लागून गुंडाळून ठेवलेल्या गाद्या, त्याच्यावर घडी करून ठेवलेली पांघरुणे आणि हे सगळे एखाद्या चादरीने आच्छादलेले असे. ह्याच खोलीत बाबांच्या ऑफिसमधली माणसे त्यांना भेटायला येत, त्यांच्या चर्चा होत. आणि रात्र झाली की खोलीचा कायापालट. खोली झाडून घ्यायची आणि अंथरूणे टाकायची. आई, बाबा, भाऊ आणि मी एका ओळीत झोपायचो तर बहिणी काटकोनात अंथरूण टाकून झोपायच्या. कित्येकदा सकाळी सकाळी बाबांचे सहकारी आणि मित्र - व्होरा साहेब घरी यायचे. मग अंथरूणे गोळा करायची आणि त्या खोलीला पुन्हा बैठकीच्या खोलीत रूप द्यायचे.
आतली खोली म्हणजे अर्थातच स्वयंपाकघर आणि तिथेच आत बाथरूम. पूर्वीच्या काळी ओटा नसायचा त्यामुळे आई कित्येक दिवस खाली बसूनच स्वयंपाक करायची. नंतर किचन टेबल नावाचा एक प्रकार घेतला. ओट्यासारखाच पण बहुतेक ॲल्युमिनियमचे टेबल होते. आई कित्येक वर्षे स्टोव्हवरच स्वयंपाक करायची. बाबांनी गॅस घेतला होता पण आत्याला पाहिजे म्हणून तिला देऊन टाकला होता. त्यामुळे आमच्याकडे बरीच वर्षे वातीचा स्टोव्ह - जो कमी आवाज करायचा तो होता. नंतरच्या काळात आमच्याकडे फ्रिजदेखील आला होता. पांढऱ्या रंगाचा गोदरेजचा होता. ह्याच घरात शिलाई मशिनदेखील होते. आई आमच्यासाठी फ्रॉक शिवायची. मला अजून आठवते आदल्या रात्री कापड फक्त बेतून ठेवले होते आणि सकाळी उठून पहिले तर फ्रॉक शिवून तयार होता.
घराचे मागचे दार होते तिथून बाहेर गेले की एक मोकळा भाग होता. तिथे एक आडवा टाकलेला सिमेंटचा पाईप होता. सकाळी उठले की हातात मंजन घ्यायचे आणि त्या पाईपवर बसून निवांत दात घासत बसायचे. आम्ही बहुतेक कॉफी प्यायचो. अलीकडेच मधल्या बहिणीने सांगितले त्याप्रमाणे आई मोठ्या बहिणींना दोन दोन बिस्किटे द्यायची आणि भाऊ आणि मी लहान म्हणून आम्हाला तीन-तीन बिस्किटे मिळायची. वेगळा नाश्ता असा काही नसायचा. आंघोळीसाठी पाणी गरम करायला तांब्याचा बंब होता. बंबात गोवर्या आणि लाकडे घालून पाणी तापवले जायचे. बंबाला नंतर कधीतरी इलेक्ट्रिक कॉईल बसवून घेतली होती. घराच्या त्या मागच्या दाराची एक आठवण आहे. कधीतरी दिवाळीत बाहेर अजून अंधार असताना मी तिथे उभं राहून फुलबाज्या उडवत होते आणि दिवस उगवला. मला कित्येक वर्षे वाटत होतं की मी रात्रभर फुलबाज्या उडवत होते.
भावंडांमध्ये मी सर्वात धाकटी. मोठ्या बहिणीत आणि माझ्यात सात वर्षांचे अंतर. तर मधल्या बहिणीत आणि माझ्यात पाच वर्षांचे. भावात आणि माझ्यात ३ वर्षांचे अंतर. त्या दोघींचे विश्व थोडे वेगळे होते. त्यांची अधून मधून भांडणं व्हायची. अशी भांडणं झाली की त्यांच्या संपत्तीचे म्हणजेच काही काचांचे तुकडे, रंगीबेरंगी मणी, खडे तत्सम गोष्टींची दोघींमध्ये वाटणी व्हायची. त्याच बरोबरीने एकीच्या बाजूला भाऊ आणि दुसरीकडे मी अशी आमची देखील वाटणी व्हायची. आम्हा दोघांना विशेष काही कळायचे नाही पण घरात दोन तट पडलेले असायचे. तेवढंच आम्हा दोघांना काहीतरी महत्त्व यायचे. पण पुन्हा दोन दिवसात त्यांची भांडणे मिटायची आणि त्या परत एक व्हायचा आणि आम्ही पुन्हा लिंबूटिंबू गटात.
आमच्या आईची शिस्त खूप कडक होती. दुपारी ती थोडा वेळ झोपायची. तेव्हा आम्हाला घराबाहेर जायची परवानगी नसायची. आम्हाला काही दुपारी झोप येत नसे. मग माझा भाऊ दाराची जी जमिनीलगतची फट असते त्यातून बाहेर बघत बसायचा. नक्की त्याला त्यातून काय दिसायचं देव जाणे. तेव्हाची अजून एक गंमतशीर आठवण आहे. त्याकाळी डालडाचा वापर खूप असायचा. तर त्याचे लहान लहान गोळे घ्यायचे आणि छताकडे फेकायचे. काही गोळे छताला चिकटून राहत. वर गच्चीच असल्याने, उष्णतेने छत तापलेले असायचे आणि त्यामुळे डालडाचा गोळा वितळून एक तेलकट वर्तुळ तयार झालेले दिसायचे. असे करण्यात काय मजा येत होती कोण जाणे!
बारामतीच्या संदर्भतली आईबद्दल अजून एक आठवण आहे. घरमालकीणबाई आईपेक्षा थोड्याच लहान होत्या. त्यामुळे त्यांचे मैत्रीचे संबंध होते. एकदा आई त्यांना म्हणाली की आपण बालवाडीचा कोर्स करू. त्यासाठी त्यांनी फॉर्म मागवले आणि फक्त घरमालकीणबाईंच्या नावेच फॉर्म आला. त्यांनी तो कोर्स पूर्ण केला, नोकरीला लागल्या. खाजगी नोकरी कमी पगाराची होती म्हणून करू की नको असा त्या विचार करत होत्या. पण माझी आई आणि मावशी ह्यांनी त्यांना नोकरी सोडू नये असा सल्ला दिला. त्यामुळे आधी खाजगी नोकरी आणि नंतर सरकारी नोकरी त्यांना मिळाली. नोकरी करता करता DEd, BEd वगैरे पूर्ण करून त्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या. माझ्या आईने असे कित्येकांच्या आयुष्यात catalyst चे काम केले.
बारामतीच्या आठवणी जागवताना टीव्हीचा उल्लेख आवर्जून करायलाच पाहिजे. माझ्या बाबांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रचंड वेड. ते चुकून सिविल इंजिनियर झाले असे कायम वाटते. पुण्यात टीव्हीचे प्रक्षेपण सुरू झाल्यावर बारामती मध्ये देखील ते सिग्नल यायचे. त्यामुळे साधारण 1980 मध्ये आमच्याकडे पहिला ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही आला. तेव्हा अर्थातच टीव्ही अतिशय नवलाईची गोष्ट होती. मग जे काही कार्यक्रम दिसतील ते पाहायला आमच्या शेजारपाजारचे तसेच समोरच्या वस्तीतले सगळे जण येऊन बसत. त्या लहानश्या खोलीत एका कोपर्यात टीव्ही आणि समोर सगळी जनता बसलेली असायची. आणि आई मात्र मला घेऊन घराबाहेर फिरत असायची. बहुतेक गर्दीमुळे मी भोकाड पसरलेले असायचे. एकदा ह्या टीव्हीच्या आत एका उंदराने पिल्लेच जन्माला घातली. अर्थातच टीव्ही बंद पडला आणि दुरुस्त करावा लागला. त्यानंतर साधारण १९८२ साली आमच्याकडे रंगीत टीव्हीदेखील आला. माझ्या बाबांचा स्वभाव इतका हौशी की टेपरेकॉर्डरपण खरेदी केला होता. आणि माझा आवाज रेकॉर्ड केला होता. आधी ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर रंगीत कॅमेरा घेऊन आमचे कित्येक फोटो देखील काढले होते. बारामतीनंतर कुठल्या तरी सामानाच्या हलवाहलवीत आमचे कित्येक फोटो गहाळ झाले. परंतु त्यांच्या ह्या हौशी स्वभावामुळे माझ्या मुलींच्या बालपणीच्या कित्येक आठवणी व्हिडिओच्या रूपात जतन झाल्या आहेत. असो.
बारामतीला गेलो तेव्हा माझ्या मोठ्या तिन्ही भावंडांची शाळा सुरु झाली होती. त्यामुळे मलापण शाळेला जायची भारी हौस. म्हणून मग माझ्यासाठी एक दप्तर आणले होते. मग दप्तर पाठीला अडकवून 'मी शाळेला जाऊ' असं घोकत बसायचे. मला गणवेशदेखील हवा होता. बाबा आईला म्हणाले की घेऊन टाक की. पण आईने काही असला हट्ट पुरवू दिला नाही. मग एके दिवशी खरोखरच शाळेला प्रवेश घ्यायची वेळ आली. बाबांच्या ऑफिसमधले एक जण घरी सांगत आले की महात्मा गांधी बालक मंदिर या शाळेच्या प्रवेशासाठी आज रात्रीपासूनच रांग लागणार आहे. मग बाबांच्या ऑफिसमधलेच दोघेजण रात्रीपासून रांगेत जाऊन थांबले. आणि माझा प्रवेश निश्चित झाला. पण मग खरंच शाळेत जायची वेळ आली तेव्हा मजा सुरू झाली. शाळेला जायच्या वेळेला मी बरोबर शेजारच्या घरात जाऊन बसायची. शेजारच्या काकू देवाची पूजा करत असायच्या त्यांच्या शेजारी जाऊन बसायची. मग घरी आई रुद्रावतार धारण करायची. तुझ्या शाळा प्रवेशासाठी लोकं रात्रीची रांगेत जाऊन थांबली होती आणि आता जायला त्रास देतेस काय! हा त्रास फक्त शाळेला जाईपर्यंतच. एकदा शाळेत पोचलं की मग तिथे रमणार. छोटा गट आणि मोठा गट अशी दोन वर्षे शाळेची तिथे झाली. तिथल्या शाळेच्या आठवणी जवळपास पुसल्याच गेल्या. पहिलीत प्रवेश घेतला आणि बाबांची बदली झाली. त्यामुळे पुढचा मुक्कामपोस्ट होता - खेड-राजगुरूनगर.
प्रतिक्रिया
29 Sep 2020 - 8:30 am | गणेशा
छान आठवणी लिहिल्या आहेत..
29 Sep 2020 - 9:16 am | प्रसाद_१९८२
आठवणी.
१९८०-९० चा काळच काहीतरी वेगळा होता असे सतत वाटत राहते.
30 Sep 2020 - 3:50 pm | नीलस्वप्निल
अगदी...अगदी :)
29 Sep 2020 - 10:22 am | king_of_net
छान लिहीले आहे.
29 Sep 2020 - 10:36 am | शा वि कु
छान वाटलं वाचून.
30 Sep 2020 - 11:23 am | विश्वनिर्माता
.
30 Sep 2020 - 3:50 pm | नीलस्वप्निल
छान वाटलं वाचून
30 Sep 2020 - 10:47 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी . हा लेख वाचुन बारामतीमधील कचेरी रोड , महात्मा गांधी शाळा , श्री. संत सर हे तत्कालीन मुख्याध्यापक , टीसी कॉलेज , प्रभुणे डॉक्टर , नरवणे डॉक्टर , पानसरे डॉक्टर यांचे दवाखाने , दाते वाडा , शाकंबरी मंदीर , महादेव मंदीर , दुर्गा आणी शाम टॉकीज , दुर्गा टॉकीजला पाहिलेले शान , उंबरठा , सरगम हे चित्रपट , काटेवाडी अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या .
4 Oct 2020 - 12:18 pm | मनस्विता
लेखात लिहिले आहे त्यानुसार बारामतीमध्ये मी खूप लहान होते. त्यामुळे आता तुम्ही लिहिलेली नावे मला अस्पष्ट आठवत आहेत.
त्यातल्या पानसरे वाडयाच्या जवळ बहुतेक आमच्या ओळखीचे एकजण राहायचे - पाटसकर म्हणून. आता त्यांचा मुलगा बारामतीमध्ये मोठा वकील झाला आहे.
5 Oct 2020 - 7:53 pm | सिरुसेरि
बारामतीमधे पानसे वाडा , काकडे वाडा असे वाडे असल्याचे माहित आहेत . कॅनॉल रोडला तत्कालीन निवडणुकीच्या वेळी "नांगरधारी शेतकरी , गरीबांचा उद्धार करी" असे प्रचार फलक लावले असत . गोडे बाबाही त्याचवेळी गाजले होते . मुंबई दुरदर्शनचे सर्व कार्यक्रम तेव्हा बघायला मिळत - चिमणराव गुंड्याभाउ , श्री. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती . टी.व्ही. संच हे बहुतेक क्राउन किंवा डायनोरा कंपनीचे असत .
सध्या "आनंद गंधर्व" या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री. आनंद भाटे यांच्या शालेय वयातील गायनाचा कार्यक्रम तेव्हा मुंबई दुरदर्शनवरुन सादर झाला होता .
2 Oct 2020 - 3:03 pm | साबु
खेड-राजगुरूनगर.. मी एक वर्ष होतो. माझ आवडत गाव आहे.
4 Oct 2020 - 12:21 pm | मनस्विता
साबु,
खेडच्या आठवणी मिपावर आधीच प्रकाशित झाल्या आहेत. खालील लिंकवर वाचू शकाल.
https://misalpav.com/node/47361
4 Oct 2020 - 12:13 pm | मनस्विता
गणेशा, प्रसाद_१९८२, नीलस्वप्निल, king_of_net, शा वि कु, विश्वनिर्माता, सिरुसेरी साबु,
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.