श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या शिंपल्यातले खेड

मनस्विता's picture
मनस्विता in लेखमाला
23 Aug 2020 - 7:00 am

1

बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे बारा नाही, तरी चार गावचे पाणी प्यायला मिळाले आणि आठवणींची अनेक गाठोडी माझ्याकडे सांभाळून ठेवली गेली. खरे तर सगळ्याच आठवणींचा पसारा मांडावासा वाटला. पण एवढा पसारा निस्तरायचा कसा, म्हणून मग एकच गाठोडे उघडायचे ठरवले.

माझा आई-बाबांबरोबरच्या फिरतीचा प्रवास सोलापूरपासून सुरू झाला आणि पुण्यात येऊन थांबला. त्यातलेच एक गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातले राजगुरूनगर. पुण्यापासून जेमतेम एक तासाच्या अंतरावर असलेले राजगुरूनगर तसे खेडेगावच. म्हणून त्याचे नाव खेडच होते. पण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंपैकी राजगुरू ह्या गावाचे, म्हणून त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ राजगुरूनगर हे नाव ठेवण्यात आले. पण शाळेत कसे खरे नाव असते आणि घरी एखादे लाडाचे आणि तेच आपल्या आवडीचे. तसेच राजगुरूनगरमध्ये राहणाऱ्यांसाठी ते कायमच खेड होते. खेड म्हणजे पुणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाताना भीमा नदीवरचा पूल ओलांडल्यावर डाव्या बाजूला उतरले की वसलेले गाव. थोडे अंतर चालले की वेस ओलांडायची आणि मग गावामध्ये प्रवेश.

खेडमध्ये आम्ही ऑगस्ट १९८३मध्ये राहायला गेलो. मी तेव्हा नुकतीच पहिलीत गेले होते. तर तिथे गेल्यावर बाबांनी आधी एका नव्याने बांधलेल्या चाळीत दोन शेजार-शेजारची घरे भाड्याने घेतली. पण अतिशय निकृष्ट प्रतीचे बांधकाम होते. त्यामुळे पावसाळा असल्याने घर गळत होते. मग आईने जवळपास चौकशी केल्यावर कळले की जवळच कटारे वकिलांकडे जागा रिकामी होत आहे. मग आम्ही साधारण २ महिन्यांत तिकडे राहायला गेलो आणि आमचा राजगुरूनगरच्या रहिवासाचा पत्ता ४ वर्षांकरता तोच राहिला. कटारे वकील म्हणजे भाऊसा वकिली करत होते. त्यामुळे गावातले तसे ते मोठे प्रस्थ होते. गावातील त्या काळातील जी मोठी शाळा होती, त्या शाळेच्या ट्रस्टींपैकी एक होते. त्यामुळे आम्ही गावात नवीन जरी राहायला गेलेलो असलो, तरी शाळेत वट निर्माण झाला होता.

कटारे वकिलांची बिल्डिंग म्हणजे एक तीन मजली घर. तळमजला भाड्याने आणि वरील घरात घरमालक राहत होते. घरमालकांच्या म्हणजे भाऊसांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली होती आणि आम्ही तिथे राहायला गेल्यावर मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्यामुळे त्यांच्या घरात भाऊसा, भाभी, त्यांची दोन मुले आणि एक सून अशी माणसे होती. आमचे हे घर अगदी रस्त्यावर होते. तीन पायऱ्या चढून यायचे की एक व्हरांडा लागणार. कित्येकदा भाऊसांचे पत्रकार तिथे येऊन बसत असत. मग व्हरांड्यातून आमच्या घरात यायला दोन दारे - एका दाराने हॉलमध्ये प्रवेश आणि दुसऱ्या दाराने बेडरूममध्ये प्रवेश. आणि तिसरे एक दार होते, त्या दारातून जिन्याने घरमालकांच्या घरी जायचा रस्ता. आमचे हे घर आम्ही आधीच्या ठिकाणी राहत होतो तिथल्या घरांच्या मानाने खूपच प्रशस्त होते. बराच मोठा हॉल आणि बेडरूमही तशीच मोठी. त्या बेडरूमला लागून एक छोटी स्टोअर रूमदेखील होती. स्वयंपाकघरही बऱ्यापैकी मोठे. स्वयंपाकघरात ओटादेखील होता. एक पॅसेज संडास-बाथरूमकडे जाणारा. बाथरूम तर खूपच मोठे. जवळपास आठ बाय सहाचे असेल. मग घराच्या मागे एक हौद आणि धुणे-भांडी करायला जागा. धुण्यासाठी एक मोठा दगडदेखील होता आणि मागे इंग्रजी L आकाराची जागा.

आमच्या घरातील आम्ही चार भावंडे आणि आई-बाबा अशा सहा माणसांपैकी मोठ्या दोघी बहिणी बेडरूममध्ये झोपायच्या आणि आई-बाबा,भाऊ व मी हॉलमध्ये. आम्ही हॉलमध्ये गाद्या टाकून झोपायचो. झोपण्यासाठी गाद्या टाकल्या की मी बाबांना घोडा घोडा करायला लावायची. ते पण चौथीमध्ये असेपर्यंत. बाबा गादीवर २-३ चकरा मारायचे आणि मग म्हणायचे, "घोडं आता खुतलं" आणि मग मी खाली उतरायचे. बाबा माझे इतके लाड करायचे की मी बिनधास्तपणे त्यांच्याशी काहीही बोलायचे. एकदा त्यांना गुढीपाडवा म्हणायला लावलं आणि मग त्यांना म्हटलं, "नीट बोल गाढवा." माझ्या दृष्टीने ती एक गंमत होती. पण गमतीतसुद्धा बाबांना गाढव म्हणायचे नसते हे माहीतच नव्हते. पण बाबांनी ते खेळकरपणे घेतले. एकदा तर त्यांना तुमची जात काय हे विचारायचादेखील उपद्व्याप केला होता. बाबांनी आम्हाला मारणे तर लांबची गोष्ट, साधे रागवयाचेसुद्धा नाहीत. एकदा मी घरात कोणाला तरी उलट बोलले किंवा काहीतरी चुकीचे वागले होते. मग माझी तक्रार बाबांकडे गेली. मग बाबांनी दिवसभर असे केले की मला जवळ घ्यायचे आणि गालावर हात फिरवून म्हणायचे की मी तुझे लाड करतो म्हणजे तू लाडाने वेडे व्हावे असे नाही. दिवसभर हे असे सांगून सांगून, मला जे कळायचे होते ते कळले. मी वागले ते चुकीचे आहे हे दाखवून द्यायची त्यांची ही पद्धत होती.

To err is human ह्यावर माझा गाढा विश्वास असल्याने माझ्याकडून अजून एक प्रकार घडला होता. चौथीत असताना गणिताचा घरचा अभ्यास करायचा विसरले. तर शाळेतल्या बाईंनी सांगितले की जा, बाबांना घेऊन ये शाळेत. मग काय, मधल्या सुट्टीत रडत रडत घरी आले. बाबांना सांगितले, तर बाबा म्हणाले की "मी सांगितले होते का की अभ्यास करू नकोस म्हणून? मी येणार नाही. तुला काय निस्तरायचे आहे ते निस्तर." तेव्हा काही परस्पर निस्तरणे शक्य नसल्याने माझी मोठी बहीण माझ्याबरोबर शाळेत आली. तिला पाहून शाळेतल्या बाई हसायलाच लागल्या. पण ह्या प्रकरणानंतर एक धडा मिळाला की आपल्या चुका शक्यतो आपणच निस्तरायच्या.

आमची शाळा घरापासून इतकी जवळ होती की सकाळी सात वाजताच्या शाळेसाठी आम्ही घरातून सातला पाच कमी असताना निघायचो आणि मधल्या सुट्टीत खाण्यासाठी घरी यायचो. शाळेच्या रस्त्यावरच पोस्ट ऑफिस होते. मग मधल्या सुट्टीत घरी येताना विचारून यायचे की आमचे काही पत्र आहे का. असेल तर घेऊन घरी यायचे. शाळेच्या रस्त्यावरच दोन दुकाने होती. एका दुकानात वह्या, पुस्तके, स्टेशनरीचे साहित्य मिळायचे. त्या दुकानाचे नाव विसरले. तिथे बॉलपेनच्या रिफिलमध्ये शाई भरून मिळायची. आणि त्रिमूर्ती नावाचे दुसरे एक दुकान होते, तिथे ह्या सगळ्या गोष्टी तर मिळायच्याच त्याबरोबरीने खेळणी, कानातली, गळ्यातलीसुद्धा मिळायची. मला त्या दुकानात जायला खूप आवडायचे. दुसरी की तिसरीच्या रिझल्टनंतर आईने मला त्रिमूर्तीमधून एक टी सेट आणि भांडीकुंड्यांचा सेट बक्षीस म्हणून घेतला होता.

शाळेजवळच मंडई होती. फक्त सकाळच्या वेळेस तिथे भाज्या मिळायच्या. तिथेच जवळ पोलीस ठाणे होते. पोलीस ठाण्याच्या आवारात एक कुठले तरी देऊळ होते. त्या देवळात कधी कधी संध्याकाळच्या वेळेस भाऊसा आणि भाभींबरोबर मी गेलेले आठवते. घरापासून शाळेच्या विरुद्ध दिशेला गावातली बाजारपेठ होती. बाजारपेठेच्या इथून आत गेले की एक गढई होती. म्हणजे मला आठवतेय त्याप्रमाणे ते खूप मोठे, मोकळे पटांगण होते. तिथे आठवडी बाजार भरायचा. बाजारपेठेतून सरळ रस्ता नदीपात्राकडे जायचा. उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे ठणठणीत पडलेले असायचे. बाजारपेठेच्या रस्त्यावरून नदीपात्राकडे अशी बैलांची शर्यत असायची. एकदा ती शर्यत बघायला गेले होते, हे आठवते.

खेड म्हणजे अगदी टिपिकल लहान गावासारखे. तिथे मोमीन आळी होती. मोमीन आळीत स्टँडवर बोंबील टाकलेले असायचे. तो वास आवडत नसल्याने नाक दाबूनच तिथून यावे लागे. ब्राह्मण आळी होती. ब्राह्मण आळीत बरेच वाडे होते. माझ्या फारशा कोणी मैत्रिणी तिकडे राहत नसल्याने माझे काही एवढे जाणे व्हायचे नाही. बाजारपेठेच्या आसपास बरेच जैन मारवाडी लोक राहत होते. आमचे घरमालकदेखील जैन मारवाडी. घराजवळच जैन लोकांचे स्थानक होते. गावात ब्राह्मण लोकांचे विठ्ठलाचे मंदिर होते, तसेच शिंपी समाजाचे पण विठ्ठल मंदिर होते. मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर दुसऱ्या विठ्ठल मंदिरात खेळायला जायची. एकदा तर आम्ही त्या विठ्ठल मंदिरात बाहुला-बाहुलीचे लग्न लावले होते. मी, माझी मधली बहीण, माझी मैत्रीण असे आम्ही तयार होऊन वगैरे भरदुपारी लग्न लावायला गेलो होतो. आमचा बाहुला होता म्हणून मैत्रिणीने - जिची बाहुली होती, तिने खेळण्यातली काही भांडी हुंडा म्हणून दिली होती.

गावाबाहेर म्हणजे नदीच्या जवळ सिद्धेश्वर मंदिर आहे. नागपंचमीला आम्ही तिकडे जात असू. बायका-मुली तिथे फुगड्या खेळणे, वडाच्या पारंब्यांना धरून झोके घेणे असे खेळ खेळत असत. सिद्धेश्वर मंदिराजवळच हुतात्मा राजगुरू महाविद्यालय हे कॉलेज आहे. माझ्या मोठ्या बहिणीची अकरावी ह्याच कॉलेजमध्ये झाली. तिच्या वयाच्या मुलींनी मॅक्सी घालायची फॅशन होती.

आमच्या घराच्या आसपास माझ्या वयाचे कोणीच नसल्याने मला दुसरीकडे कुठेतरी जाऊन खेळावे लागे. घराजवळच लिखिते मंदिर म्हणून होते, कधी आम्ही त्याच्या मंडपात जाऊन खेळत असू. मग आमच्या घराच्या मागे एक वस्ती होती, तिथे वर्गातली एक मुलगी राहायची. कधीकधी मी तिच्याबरोबर खेळायला जायचे. तिथे तर सगळ्यांच्या घराची दारे सताड उघडी असल्याने, कोणाच्याही घरात घुसून लपाछपीसाठी लपलेले आठवते. मग माझी एक मैत्रीण - तेव्हाची बेस्ट फ्रेंड बाजारपेठेत राहत होती, तिच्याकडे खेळायला जात असे. माझी ती मैत्रीण बरीच श्रीमंत होती. त्या काळी त्यांच्याकडे गॅसची एजन्सी होती. त्यांच्याकडे अँबॅसॅडर होती. पण तिने कधी पैशांचा तोरा दाखवलेला आठवत नाही. तिच्या आजीने संथारा घेतला होता, ही उगाचच एक आठवण.

खेडमध्ये असताना तसे बरेच प्रकार केले. एके वर्षी आम्ही गणपती बसवायचा ठरवला. जी मैत्रीण बाजारपेठेत राहायची, तिच्याच घरी बसवायचा ठरवला. मग आख्ख्या बाजारपेठेत वर्गणी मागत हिंडलो होतो. कसाबसा गणपती बसवून ते वर्ष पार पाडले आणि पुढच्या वर्षी सगळे विसरून गेलो. एके दिवशी ठरवले की मैत्रिणी-मैत्रिणींनी मिळून, संध्याकाळचे आपापले डबे घेऊन शाळेच्या ग्राउंडवर जायचे. मला अजून आठवते की तेव्हा आईने मला सुसला करून दिला होता. एकदा असेच घराजवळून एक बैलगाडी चालली होती, तर त्यात बसून वेशीपर्यंत गेलो होतो. मधले काही दिवस तर मी बिनचप्पलची फिरत होते असे आठवतेय. असे का, हे मात्र आठवत नाहीये.

खेडच्या शाळेतल्या रिझल्टसंदर्भातल्या काही आठवणी आहेत. खेडमध्ये इयत्ता पहिली हे माझे पहिले शैक्षणिक वर्ष होते. वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी बाबांना म्हटले की माझा पहिला नंबर येणार आहे. असे म्हणत त्यांच्याबरोबर रिझल्ट आणायला गेले आणि गंमत म्हणजे माझा दहावा नंबर आला होता. त्यानंतर बाबांना कधीच रिझल्टसाठी बरोबर नेले नाही. मी अभ्यासाचे काही का दिवे लावेना, पण त्यांच्यामुळे माझा रिझल्ट वाईट लागला असे व्हायला नको, म्हणून नंतर त्यांच्याबरोबर रिझल्ट आणायला कधी गेलेच नाही. मग पुन्हा चौथीत कमाल केली. दुसरीत तिसरा नंबर आला होता आणि तिसरीत दुसरा नंबर आला होता, म्हणून मी जाहीर केले की आता चौथीत माझा पहिला नंबर येणार. नाचत नाचत शाळेत गेले, तर चौथा नंबर आला होता. एकटीच गेले होते, त्यामुळे रडत रडत घरी यायला लागले, तर वाटेत आशू टेलरचे दुकान होते आणि नेमका त्याने शिवलेला फ्रॉक घातला होता म्हणून तो कौतुकाने माझ्याकडे पाहत होता. पण मला रडण्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. काय विचार करून मी स्वतःकडून अशा काही अपेक्षा ठेवल्या होत्या, कोणास ठाऊक!

शाळेच्या अनेक मिश्र आठवणींपैकी एक म्हणजे मारवाडी समाजातील अनेकांकडची लग्ने शाळेत होत असत. गावात लग्नासाठी कार्यालय वगैरे नव्हते ना. एकदा तर आमची शाळा चालू असताना एका लग्नसमारंभाची तयारी सुरू होती. तसेच एकदा सिनेअभिनेता सचिनचा ऑर्केस्ट्रा होता. तोही कार्यक्रम शाळेतच झाला होता.

खेडची आणखीएक आठवण म्हणजे १५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला आमच्या शाळेतर्फे प्रभात फेरी निघायची. शाळेचे आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र घोषणा देत, पूर्ण गावात एक फेरी मारायचो. २६ जानेवारीला विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे. ह्या कार्यक्रमासाठी म्हणून एके वर्षी बाबांनी शाळेच्या ग्राउंडवर रोडरोलर फिरवून दिला होता.

एके वर्षी खेडमध्ये खूप दुष्काळ पडला होता. माझ्या मोठ्या बहिणीची दहावीची परीक्षा होती. आणि नेमके पाणी कुठून तरी लांबून भरावे लागत होते. कमी दाबामुळे पाणी घरात येत नव्हते. अभ्यास-परीक्षा असताना मोठी बहीण आईला मदत करत होती. पाणी वाचवण्यासाठी म्हणून आईने पत्रावळ्या आणल्या होत्या. म्हणजे तेवढेच ताटे धुवायला लागणारे पाणी वाचणार. आमची आई फार हिकमती. अवघड प्रसंगांमधून हातपाय न गाळता, कायम काहीतरी मार्ग शोधून काढणार.

खेडमध्ये असतानाच बाबांनी व्हीसीआर घेतला होता. पुण्यात हाँगकाँग लेनमध्ये चंदन कॅसेट लायब्ररी होती, तिथून बाबा हिंदी पिक्चरच्या कॅसेट्स भाड्याने घेऊन यायचे. असे आम्ही व्हीसीआरवर कित्येक पिक्चर पाहिले. बाबांनी ब्लँक कॅसेटसुद्धा आणल्या होत्या. त्यात टीव्हीवर लागणारे कित्येक पिक्चर रेकॉर्ड करून त्यांची पारायणे केली होती. त्याच सुमारास माझ्या भावाची मुंज झाली होती आणि मुंजीत व्हिडिओ शूटिंग केले होते. तेव्हा व्हिडिओ शूटिंग हा प्रकार खूप नवीन होता. आमच्या गावात तर व्हिडिओ शूटिंग करणारे आम्ही दुसरेच होतो. त्यामुळे व्हिडिओ शूटिंगमध्ये आपण यावे म्हणून बाबांच्या ऑफिसमधले कोणीतरी एक जण इतके पुढे पुढे करत होते की बस.

खेडमधले दिवस असेच मजेचे चालले होते. आईने बाबांच्या मागे लागून पुण्यात घर विकत घेण्याचा मोठा निर्णय घ्यायला लावला होता. पण तेवढ्यात बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. पुण्यातल्या घराचा ताबा मिळायला आणखी एक वर्ष होते. भाऊसा म्हणत होते की बाबांनी तिकडे जावे आणि आईने आम्हा मुलांना घेऊन इथेच राहावे. पण नेमके त्या सुमारास आमच्या घरासमोर मिनी थिएटर म्हणून प्रकार सुरू झाला होता आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हा मुलांना घेऊन तिथे राहणे आईला योग्य वाटले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आमचे चंबूगबाळे आवरायची वेळ आली. नवीन गाव, नवीन अनुभवांना सामोरे जाताना खेडमधल्या आठवणींचे बरेच मोठे गाठोडे बांधून घेतले.

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

अन्या बुद्धे's picture

23 Aug 2020 - 8:06 am | अन्या बुद्धे

छान! बालपणीच्या आठवणीपैकी नेमक्या कशा वेचणार? पण तुम्ही ते छान केलं आहे..

गवि's picture

23 Aug 2020 - 9:21 am | गवि

छान. अनुभव आवडले.

कंजूस's picture

23 Aug 2020 - 10:19 am | कंजूस

आवडल्या आठवणी.

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 11:10 am | तुषार काळभोर

खेड तालुक्याचे गाव नावालाच आहे. केवळ प्रशासकीय नोंद म्हणून सर्व सरकारी संस्था खेड मध्ये आहेत. चाकण आता कितीतरी मोठं, एक स्वतंत्र शहर झालंय.
खेड अजूनही गावपण टिकवून आहे. बाजूने नवी वाढलेली वस्ती शहरी तोंडावळा असलेली आहे. पण गावात महात्मा गांधी शाळा, पोस्ट, कोर्ट, जैन स्थानक सगळं अजून तिथंच आहे. सगळं इतकं सेम आहे की तुम्ही आता पस्तीस वर्षांनी गेल्यावर सुद्धा काही बदलल्याच जाणवणार नाही.

टर्मीनेटर's picture

23 Aug 2020 - 11:29 am | टर्मीनेटर

छान आठवणींची नीटनेटकी मांडणी.

आमची शाळा घरापासून इतकी जवळ होती की सकाळी सात वाजताच्या शाळेसाठी आम्ही घरातून सातला पाच कमी असताना निघायचो आणि मधल्या सुट्टीत खाण्यासाठी घरी यायचो.
माझ्याही बाबतीत हे तंतोतंत लागू पडतय :)

मनस्विता's picture

23 Aug 2020 - 12:09 pm | मनस्विता

सर्वप्रथम मिसळपावचे संचालक आणि साहित्य संपादकांचे खूप आभार.

मिसळपावची मी नियमित वाचक आहे. परंतु इथे आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लिहिती देखील झाले. गणेश लेखमालेच्या निमित्ताने कित्येक आठवणी जाग्या झाल्या. आणि मी एवढे लेखन करू शकते ह्याची जाणीव झाली.

पुनश्च धन्यवाद!

लहानपणच्या गंमती! आवडले :-)

अन्या बुद्धे, गवि, कंजूस, पैलवान, टर्मीनेटर,

लेख वाचून आवर्जून प्रतिसाद देण्याकरता खूप आभारी आहे.

पैलवान,
मी ५-६ वर्षांपूर्वी गेले होते तेव्हा आमच्या घराच्या आसपासचा परीसर अगदी तसाच होता.

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2020 - 1:07 pm | चौथा कोनाडा

बालपणीचा काळ सुखाचा !
खेड, तुमची शाळा, घर, गणपती बसवायच्या आठवणी खुप सुंदर लिहिलेय !
लेखनशैली सरळसोपी ओघवती आहे. लेखन आवडले.
लिहित रहा !

खेड चांगले गाव आहे, पण नाशिक हायवे ला असल्याने आता शहरीकरणा मुळे ते त्याचे गावपण विसरत चालले आहे,

तुमच्या आठवणी आणि लेखन आवडले..
विशेष करून घोडा घोडा खेळणाऱ्या लहान मुलीचा अनुभव वाचताना अतिशय छान आणि तितकेच निरागस वाटले..
लिहीत रहा.. वाचत आहे...

चौकटराजा's picture

23 Aug 2020 - 3:34 pm | चौकटराजा

आठवणी दाटतात
धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे
सांग कसे विसरावे ...
असे एक जुने गीत आहे .. तशाच या तुमच्या आठवणी एक स्केच " खेडचे काढून जातात. लिहित रहा !

मनस्विता's picture

25 Aug 2020 - 10:28 pm | मनस्विता

हे गीत ओळखीचे नाही. पण छान आहे, ऐकायला पाहिजे.

संजय क्षीरसागर's picture

23 Aug 2020 - 6:03 pm | संजय क्षीरसागर

लिहित रहा.

दुर्गविहारी's picture

23 Aug 2020 - 11:41 pm | दुर्गविहारी

वास्तविक कोणतीही थरारक आठवण नाह,, साधा सरळ लेख. पण मनापासून आवडला. लिहीत रहा.

सोत्रि's picture

24 Aug 2020 - 5:59 am | सोत्रि

अगदी तंतोतंत हेच म्हणतो!

- (नाॅस्टॅल्जिक) सोकाजी

प्रचेतस's picture

24 Aug 2020 - 7:07 am | प्रचेतस

एकदम छान लिहिलंय.
साधं, सरळ

स्मिताके's picture

27 Aug 2020 - 11:00 pm | स्मिताके

असेच म्हणते.

सुधीर कांदळकर's picture

24 Aug 2020 - 8:25 am | सुधीर कांदळकर

तिथला परिसर मस्त उभा केलात. बालपणींची निरागसता लेखनात छान उतरली आहे. तसे सारेच लेखन आवडले, शाळेतल्या नंबराची गंमत विशेष आवडली. धन्यवाद.

बिपीन सुरेश सांगळे's picture

24 Aug 2020 - 11:41 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर .

मनस्विता's picture

25 Aug 2020 - 10:26 pm | मनस्विता

राघव, चौथा कोनाडा, गणेशा, चौकट राजा, संजय क्षीरसागर, दुर्गविहारी, सोस्त्री/सोकाजी, प्रचेतस, सुधीर कांदळकर, बिपीन सुरेश सांगळे,

आपणा सर्वांचे मनापासून आभार!

सुमो's picture

26 Aug 2020 - 9:00 am | सुमो

सोपं लेखन.
छान वाटलं वाचायला.

पुलेशु !

तुमच्या लेखाच्या निमित्ताने खेड फिरुन आले परत. मी सुद्धा खेडचीच, बाजारपेठ मधे राहणारी. शाळाही सेमच त्यामुळे सगळी ठिकाणे ओळखीची आहेत. छान लिहीला आहे लेख. तुमच्या मैत्रिणीचे आडनावही ऑळखले मी :) पण तुमची बॅच माझ्या खुप आधीची वाटते कारण माझ्या जन्माच्या वर्षी गावार दुश्काळ पडला होता असे आई सांगते.

मनस्विता's picture

7 Sep 2020 - 8:49 pm | मनस्विता

पेरु,
तुम्ही माझ्यापेक्षा लहान असल्या तरी तुमचे नातेवाईक कदाचित माझ्या किंवा माझ्या बहिणींच्या ओळखीचे असतील.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2021 - 1:25 pm | कर्नलतपस्वी

मी पण खेडकरच, सन साठ पासून ते आजतागायत.

अगदी बालपणीच्या आठवणी म्हणजे पुढल्या संपूर्ण जीवनासाठी एक खजिनाच असतो. तुमचा हा खजिना इथे वाचकांसाठी खुला केलात, साध्या ओघवत्या भाषेत त्यातले अलंकर उलगडून दाखवलेत, यासाठी अनेक आभार.
गावातली विविध मंदिरे आणि अन्य जागा यांचे वर्णन वाचून त्यांचे फोटो गूगलमधे सर्चायचा यत्न केला, पण फारसे हाती लागले नाही. तुमच्याकडे असले किंवा हुडकता आले, तर अवश्य प्रकाशित करा.

मनस्विता's picture

7 Sep 2020 - 8:52 pm | मनस्विता

चित्रगुप्त,
बाकीच्यांनी सांगितले तसे सुसला चुरमुर्यांचा पोह्यासारखा प्रकार. कर्नाटकातील पदार्थ आहे. आई माहेरची कानडी असल्याने त्याही खाद्य संस्कृतीचा आमच्याकडे प्रभाव होता/आहे.

माझ्याकडे किंवा आई-बाबांकडे गावातील देवळांचे फोटो नाहीत. सिध्देश्वर मंदिराचे फोटो गूगल वर सापडले होते. बहिणींच्या मैत्रिणी अजून तिथे आहेत त्यांच्या कडून मिळाले तर पाहते.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2020 - 12:27 am | चित्रगुप्त

मला अजून आठवते की तेव्हा आईने मला सुसला करून दिला होता.

यातील 'सुसला' म्हणजे काय ? कसे बनवतात ?

तुषार काळभोर's picture

27 Aug 2020 - 3:20 am | तुषार काळभोर

भेळीचे मुरमुरे पाण्यात भिजवून त्याला उपिट किंवा पोह्यांप्रमाणे फोडणी द्यायची, असं त्याचं बेसिक वर्णन करता येईल. सोलापुरात (आणि कदाचित उत्तर कर्नाटकात) हा अत्यंत लोकप्रिय स्नॅक्स पैकी आहे.
1

सुमो's picture

27 Aug 2020 - 4:22 am | सुमो

पदार्थ आहे.
बेसिक वर्णन बरोब्बर. सुस्ला आणि मिरची भज्जे असं कॉम्बिनेशन असतं. बेल्लारीमधे असताना हा पेटंट ब्रेकफास्ट होता.

Susla

केदार पाटणकर's picture

27 Aug 2020 - 2:35 pm | केदार पाटणकर

मनस्विताजी,

तुमच्या आठवणी फार मनोहर आहेत. ऐंशीच्या दशकात राज्यातील बहुतेक निमशहरी विभाग असे होते.

सिरुसेरि's picture

27 Aug 2020 - 4:00 pm | सिरुसेरि

खेड / राजगुरु नगरच्या छान आठवणी . आजचे आघाडीचे मराठी संगीतकार अजय - अतुल हे मुळचे राजगुरुनगरचे असे कुठेतरी ऐकल्यामुळे त्या ठिकाणाबद्दलचा आदर अजुन वाढला आहे .

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 6:05 pm | चौकटराजा

अजय अतूल घोडनदी उर्फ शिरूर येथील .

गणेशा's picture

27 Aug 2020 - 6:10 pm | गणेशा

Yes, शिरूर चेच.
आणि मी घोडनदी ला असताना, आणि ते जास्त फेमस नसताना, मला त्यांच्या हातून ट्रॉफी मिळाली होती :-))

अशीच माझी आठवण

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2020 - 6:32 pm | चौथा कोनाडा

अरे व्वा, अभिनंदन, गणेशा !
एखादा धागा काढा आणि फोटो पण टाका नक्की !

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2021 - 1:30 pm | कर्नलतपस्वी

वडिल गोगावले सरकारी नोकरीत आसल्याने त्यांची बदली होत असे, लहान्याचा जन्म खेडला. अर्थात ते आता एवढे मोठे झालेत की सगळ्या महाराष्ट्राचे झालेत.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2021 - 1:06 pm | कर्नलतपस्वी

हे बधुंद्वय संगीतकार लहानपणी म्हणजे दोन तीन वर्षाचे असताना आमच्घया समोरच रहायचे. आठ्याहत्तर एकुण ऐशी मधे यानां कट्टयावर खेळताना बघितले आहे. मी सैन्यात होतो पण घरातल्यांची चागंली ओळख होती.

तशाच शांताबाई शेळकयांच आजोळ पण खेडच. त्याचा भाऊ आमच्या मावशीच्या वर्गात होता. गाव आता मात्र अवाढव्य पसरले आहे.

हिरवगाऱ टुमदार गाव
नाव त्याच होत खेड
सय येता गावाची
मन अजुनही होत वेड......
१६-२-२०२१

मनस्विता's picture

7 Sep 2020 - 8:48 pm | मनस्विता

सुमो, पेरु, चित्रगुप्त, केदार पाटणकर, सिरुसेरी स्मिताके,
लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे.

विनिता००२'s picture

9 Sep 2020 - 10:04 am | विनिता००२

खूप छान लिहीलंय :)

NAKSHATRA's picture

27 Jan 2021 - 1:41 pm | NAKSHATRA

राजगुरुनगर हे शहराचे नाव आहे, आणि तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुका म्हणून खेड नावाने ओळख आहे.
अजूनही कुणी तिकडे जाणार असेल तर खेड ला जाणार असेच म्हणतात.
मी हि खेड तालुक्यात कुरुळी गावात राहणारा असल्याने खेड नेहमीच संबध येतो, तुलनेने चाकण गावाचा जास्त विकास झाल्याने जवळजवळ सर्वच कामे चाकण ला होतात.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2021 - 1:12 pm | कर्नलतपस्वी

मी खेडचाच. जरी गावाच नाव राजगुरूनगर झाले आहे तरी खेड हेच नाव आवडते.
मनस्विता, कटारे वकील व त्यांचा मुलानां चागंलाच ओळखतो. त्यांची तीन मजली इमारत बनताना आम्ही बघीतली आहे.
लेखामुळे आठवणी जाग्या झाल्या. आजुनही खेडला घर मीत्र सर्व काही आहे, अधुन मधून जात आसतो.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2021 - 1:19 pm | कर्नलतपस्वी

आमचा गाव भीमा नदीकाठचा, काठावर मोठा वड आणी जवळच सात चिंचाची झाडे. लहानपणी पोहणे, सुरपारंब्या, चिंचा आणी चिंचेचा चिगूर, म्हणजे कोवळा पाला हे सुट्टीतले खेळ आणि खाणे. आलीकडेच गेलो होतो आताची स्थिती पाहून मन थोडे उदास झाले. कालाय तस्मै नमः.

गेलो होतो गावाकडं
शोधत होतो पाऊलखुणा
नदीकाठी होता उभा
म्हातारा वड केविलवाणा

आली तोडांत चव
गाभुळलेल्या बुटकांची
नाही दिसली साती झाडं
कवळ्या कवळ्या चिगुराची

उभा महादेव नदी किनारी
धुते पाय भीमामाई
खुणावतो ढुम्या ओढुन
नव्याची नवलाई
जणू कैलासची अपूर्वाई

हिरवगाऱ टुमदार गाव
नाव त्याच होत खेड
सय येता गावाची
मन अजुनही होत वेड......
१६-२-२०२१

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2021 - 2:04 pm | चौथा कोनाडा

सुरेख !