मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
प्रतिक्रिया
26 May 2020 - 4:07 pm | गणेशा
हे ढग खुप द्वाड असतात, आकाशाच्या शाळेत जाऊनही नेहमी टारगट पोरांसारखे बाहेरच भटकत राहतात...
कधी उंच शिखरावर उगाच ध्यानस्त होतात, तर कधी झाडाशी हितगुज करतात..,कधी हलकेच फिरून येतात त्या शेताच्या बांधावरून, त्या निरव शांत तळ्यावरून...
कधी ते सूर्याची किरणे लेऊन सोनेरी होतात, तिच्या केसातील बटांसारखे..कधी चंदेरी तिच्या कानातल्या गोल रिंगांसारखे...
कधी संध्याकाळी त्यांवर चढते केशरी लाली, तिच्या गालासारखी..
तर कधी ते चंद्रखळे बनतात.. तिच्या कातिल खळ्यांसारखे....
म्हणूनच कदाचीत अजूनही जपून ठेवलंय काही ढगांना मी, माझ्या श्वासात... माझ्या मनात... फक्त तिच्या साठी...
--- शब्दमेघ.
27 May 2020 - 1:58 am | मन्या ऽ
रंग त्या इंद्रधनुचे
आता फिकट होऊन
जणु नाहीसेच झाले
एक वर्तुळ पुर्ण झाले..
अतुट धागे मनामनांचे
जे एकेकाळी वाटले होते
ते काही क्षणात तुटले
एक वर्तुळ पुर्ण झाले
अथांग समुद्र अन् निळ्याशार आभाळाचे नाते
समांतर प्रवास करत राहीले..
एक वर्तुळ पुर्ण झाले..
दिप्ती भगत
(२७मे, २०२०)
31 May 2020 - 2:30 pm | सस्नेह
सुरेख
27 May 2020 - 2:14 am | वीणा३
धागा मस्त आहे, वाचत्ये !!!
27 May 2020 - 10:26 am | गणेशा
@ मन्या..
मला की नाही, मी नेहमी जगाच्या परिघावर असणारा एक बिंदू वाटतो..
या परिघावर.. या वर्तुळामध्ये.. अनेक माणसे येतात, जातात.. पण मला कायम वाटत राहतं, किती हि लांब गेलं ना कोणी तरी ते माणुस पुन्हा भेटत राहतं.
कोणाच्या वाटा पुन्हा त्रिज्यां सारख्या मला छेदून जातात.. कोणाचे आठवणींचे ठिपके हळूच दुरावून खुणवत राहतात.. कोणाच्या मोठ्या मोठ्या सावल्या त्या व्यासा वर लोंबकळत राहतात.. अस्पष्ट अश्या...
कधी माझ्याच भावनांचा एखादा लंबक, हळूच छेदून जातो तुटलेल्या त्या दूरच्या त्रिज्येला.. आणि विचारपूस करून आपसूक बसतो गप गुमान, आपले स्वतःचे कोण मोजत..
कधी कधी तर मी कोणाला पाहत नाही.. एकटाच असतो या परिघावर.. तरी तीचा आवाज येतो कुठून तरी... "तुझ आभाळ माझ्या समुद्रावर का घोंगावत आहे? "
मी बापडा गप्प राहतो फिरत, माझ्याच विचारांच्या कक्षेत.. कधी कधी म्हणूनच माझ्या येथे ग्रहण लागते तीचे.. तिच्या विचारांच्या सहित.. पण थोड्यावेळच...
27 May 2020 - 10:53 am | ज्ञानोबाचे पैजार
रंग त्या टेबलक्लॉथचे
आता फिकट होऊन
जणु नाहीसेच झाले
दोन पेग पोटात गेले..
अतुट पुडके ते चखण्याचे
जे एकेकाळी वाटले होते
ते हातात फुटून खोलीभर फरसाण उधळले
तीन पेग पोटात गेले
पियक्कड मित्र अन पतियाळा पेगचे नाते नाते
एकत्र प्रवास करत राहीले..
किती पेग पोटात गेले???..
पैजारबुवा,
(इ.पू. ३१ फेब्रुवारी २०३६०)
27 May 2020 - 11:12 pm | मन्या ऽ
विडंबन आवडलं!! :-))
27 May 2020 - 11:54 am | गणेशा
वर्तुळ आणि वर्तुळाची फिरकी (विडंबन) दोन्ही आवडले...
:-)) :-)):-))
27 May 2020 - 12:12 pm | मोगरा
पृथ्वी सकाळी फिरून पुन्हा त्याच जागेवर आली की सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते.
राधेच्या., माझ्या मुलीच्या गळ्यात टाकलेल्या हातापासून, नक्षत्रांचे हातच ते.
मग नंतर, पृथ्वी च्या गतीपेक्षा मी जोरात फिरायला लागते. राधेचा नाष्टा, शिऱ्या चा चहा, त्याची तयारी, कपडे, भांडी भाज्या घेणे हे चक्र असेच चालु राहते.
मग राधेला शाळेतून आणताना, मैत्रिणी भेटतात, थोड्याश्या गप्पा, थोडेसे मुलांकडे लक्ष.
घसरगुंडी वरून रोज राधेला ओढून आणावे लागते.
मग पुन्हा तीचे जेवण, तिला झोपवणे., नंतर उठल्यावर थोडा अभ्यास, थोडे काढलेल्या चित्राला रंग सुचवणे.
शिऱ्या आल्यावर पुन्हा त्याचा चहा. मग टीव्ही., मग जेवण.
आणि रात्रीला शिऱ्याचे गळ्यातील अवखळ हात, चांदण्यांचा हारच जणू.
27 May 2020 - 12:25 pm | मोगरा
सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते.
राधेने., माझ्या मुलीने माझ्या गळ्यात टाकलेल्या मिठीपासुन, नक्षत्रांचे हातच ते.
28 May 2020 - 7:51 pm | गणेशा
नुकताच अमोल_oo3 यांच्या मातृदशक कवितेला रिप्लाय देताना त्या कविते वरून ह्या ओळी सुचल्या.. आई म्हणजे हळवा कप्पा.. म्हणून येथे पुन्हा देतो..
__
नवमांस गर्भ वाढविला | चिरंजीवी श्वास दिला |
तोच स्वर्ग बनविला | माझ्यासाठी||
पुनर्जन्म तेथीची व्हावा | पुन्हा मायेचा ठेवा |
तुझ्या काळजाचा तुकडा | माझ्यासाठी ||
29 May 2020 - 12:43 am | गणेशा
रातराणी म्हणजे चांदण्या अंगावर घेऊन केलेली सुगंधाची नखशिखांत बरसात....
पण आपलं मळकट रुटीन संभाळून, कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने आमच्या लाल डब्याला अगदी नटवून त्याला 'रातराणी' नाव दिले असेल त्याला आपला सलाम.
अशी रंगीत, कवी मनाची माणसं परिवहन खात्यात पण असु शकतात हे पाहून चांगले वाटले..
खरी रातराणी म्हणजे सुगंधाची दरवळ... पण ह्या रातराण्यांच्या सुगंधाचे न बोलले बरे.. मागच्या बाकड्यावर डुलणारे प्राणी, आणि त्याच्या पुढच्या बाकावर घोरणारे.. ही रातराणीची खासियत...
कधी कधी उगाच कोणी चसमिस्टर, झोप येत नाही म्हणून नोकिया फोन च्या बॅटरीत एखादं कसलसं पुस्तक वाचत असतो.. पण असले नग विरळच..
लांबचा पल्ला, थोडा आरामदायी आणि जलद गाठता यावा म्हणून लाल डब्याला थोडं आतून बुडाला बसायला सुखकारक केलं आहे,
इतकच काय ते नविन...
रातराणीचे ड्रॉयव्हर म्हणजे एक जात हरामखोर जमात.. सकाळी कोणाला कसलसं सामान गावाला द्यायचं असल तर इकडून पण आणि तिकडून पण पैसे उखळतात...
बर, बस स्टॉप वरून निघाल्यावर जरा कसा तरी डोळा लागेस्तोवर हे ह्यांच्या ठरलेल्या हॉटेलात गाड्या घालतात..
खायचं ह्यांना असतं.. जेवणाच्या पैस्यात आम्ही उगाच काळा चहा पितो.. या वेळेस, येव्हड्या अंतरातच तुंबलेले उगाचच धावा धाव करतात.. येताना सिगारिटी ओढत आल्यावर त्यांचा आव जणू चंद्रावर धूर सोडल्या सारखा असतो..
बस कंडक्टर ला तर गाडीचा स्टार्टर मारल्यावरच सगळी लोकं परत आत आल्यात का नाही हे मोजायचा कंड येतो.. कुठचं तरी म्हतारं नेमकं आलेलं नसतं.. मग त्याची म्हतारी त्या संधीचा फायदा घेऊन त्याला दोन शिव्या हासडते, त्याची पोरगी उगाच खिडकीच्या काचंतुन ओss अण्णाss ओss अण्णाss अशी बोन्ब मारते.. म्हातारं मग धोतर सावरत पळत येतं..
दहावीच्या पोराला गणितात पास झाल्यावर काय वाटलं नसल तसलं तोंड करून कंडक्टर, माणुस मोजायचं गणित संपवतो, आणि ड्रायव्हरला जाऊद्याss म्हणून जोरात हाक देतो..
रगेल ड्रायवर त्याच्या बापाचं काय जातंय, असल्या अविर्भावात जी गाडी दामटवतो, तेंव्हा रातराणी की रातवैरणी असं वाटून उगाच छातीत धस्स होतं. गाडी वळवताना तर तो हरामखोर असला टर्न घेतो की बाजूच्यानी खसकन अंगावर आलच पाहिज्ये, नायतर वरण एखादं गठुडं डोक्यात पडलंच पाहिज्ये.
-- गणेशा
29 May 2020 - 9:38 am | चांदणे संदीप
रातराणीची फुलं मला आवडतात. फुलांना खुडण्यापेक्षा वेचण्यात जो आनंद मिळतो तो वेगळा असतो आणि त्यातही रातराणीच्या फुलांना वेचण्यात किंचीत जास्तच मिळतो. त्यासंदर्भात कॉलेजच्या दिवसांत लिहिलेल्या माझ्याच ओळी मला पुन्हापुन्हा आठवतात.
फुले वेचूनि परड्या भरल्या
नाजूक तिच्या बोटांनी
अगणित ती सुवासिक स्मरणे
भरू कुठल्या कुप्यांनी?
रातराणीची फुलं निव्वळ सुगंधच देत नाहीत. तर, परिसराला शोभा आणि शब्दांना अलवारपणाही देतात.
सं - दी - प
29 May 2020 - 10:13 am | गणेशा
@ संदीप
फुले वेचूनि परड्या भरल्या नाजूक तिच्या बोटांनी
अगणित ती सुवासिक स्मरणे भरू कुठल्या कुप्यांनी?
वाह
---------
मला लहान पणा पासून पांढरी, पांढरट रंग असणारी फुले खूप आवडतात.. माहीत नाही का पण आवडतात..
उरुळी ला माझ्या घराच्या अंगणात जाई चा वेल होता.. काळ्या चिमणीने त्यात घरटे पण केले होते.. जुई बाजूला छोट्याश्या बागेत होती.. अंघोळी चे पाणी जायचे तिथे मोगरा उभा असायचा.. एक पाकळीचा मोगरा.. दोन पाकळीचा मोगरा..
किती आठवणी.. मोगरा तेंव्हाचे माझे आवडते फुल.. तायडी गजरा करायची या फुलांचा..
या पांढऱ्या फुलांच्या आवडी पायी, दूर दातार बंगल्यामध्ये उगाच आलेलं धोतऱ्याचे फुल पण मला आवडलं होतं.
मी मोठा होत गेलो तसं मला बकुळी आणि पारिजातका च्या फुलांनी मोहिनी घातली.. त्या फुलांत मला माझ्या आत दडलेल्या प्रेमाच्या अनामिक हुरहुरी ची आठवण येते.. तिच्या आठवणींची हलकीशी बरसात होते... सुगंधाचच लेणंच ते..
माझ्या रहाटनीतल्या घराचे नाव 'पारिजात'..
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच हे मोहत्सव मधलं माझं आवडतं वाक्य..
आता हळू हळू या प्रेमात रातराणी ने प्रवेश केलाय.. रातराणी म्हणजे आकाशातल्या चांदण्याच जणू. .. निरपेक्ष भावनेचे अलवार प्रेम म्हणजे रातराणी....
29 May 2020 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार
रातराणी म्हटले की एक वेगळाच किस्सा डोळ्यासमोर येतो.
त्या काळी आम्ही एका चाळीत रहायचो. दोनचार घरे पलिकडे राणीताई रहायची. अभ्यासात प्रचंड हुशार होती ती. रात्री दहा साडेदहा झाले की ती अंगणात लाईट लाउन अभ्यासाला बसायची. सकाळी साडेतीन चार पर्यंत तिचा अभ्यास चालायचा. तिच्या या सवयी मुळे चाळीत सगळे तिला रातराणी म्हणायचे.
एकदा काय झाले रात्री अडीच तीन च्या सुमारास राणीताई जोरजोरात किंचाळून ओरडायला लागली. सगळी चाळ साखरझोप सोडून तिकडे धावली. २५-३० लोक तरी जमले असतील. शिवाय घरात नुसते उठून बसलेले लोक वेगळेच. कोणाला वाटले चोर आला, कोणाला वाटले आग लागली तर कोणाला अजून काही वाटले.
सगळे राणी ताई कडे बघत होते आणि ती चेहरा ओंझळीत लपवून थरथर कापत उभी होती आणि सारखी भिंतीच्या दिशेला बोट दाखवत होती. शेवटी तिच्या आईने जरा जोरातच विचारले की काय झाले ते निट सांगशील का? तेव्हा राणीताई म्हणाली "भिंतीवर एवढी मोठी एक पाल होती"
सगळे शेजारी बिचारी रात्री ३ वाजता पाल शोधायला लागले. पण ती थोडीच मिळणार होती. पण या गडबडीत बर्याच जणांच्या झोपेचे खोबरे झालेच होते.
त्या नंतर बरेच दिवस सगळे जण राणीताईच्या आईला पाली साठी उपाय सुचवत होते आणि ती ही त्यातले जमेल तेवढे उपाय करत होती. पण राणीताईने मात्र तिची अभ्यासाची वेळ आणि जागा बदलली नाही.
पैजारबुवा,
30 May 2020 - 11:28 am | गणेशा
आज मन माझे उडत जाते आहे 2005-2006 ला.. ते अनुभवलेले क्षण पुन्हा पुन्हा यावेसे वाटतात...
July महिना होता आणि मी 'मॉड्युलर इन्फोटेक' या पर्वती इस्टेट मधल्या कंपनीत कॉलेज मधून सिलेक्ट झालो होतो... तिथला पहिला दिवस 18 जुलै...
तसा हा 2005 चा काळ अवघड होता..
पण जगण्याच्या या उतार चढावात येणारे दिवस असे भारी येतील हे कधी वाटले नव्हते... ते मित्र मैत्रिणी.. गप्पा... झाडाखाली सगळ्यांनी घालवलेले रोजचेच ते क्षण.. किती अल्हाददायक... त्या पंचमी हॉटेल मधल्या पार्ट्या.. कधी, आदर्श निगडी ला राहतो म्हणून तिकडे पूना गेट ला जाऊन खाल्लेली सुरमई... सगळे अगदी लक्ख आठवते आहे... सुरवातीला दीपाली आणि रोहिणी ने माझ्या विरुद्ध केलेली भांडणे.. किती किती गोड आठवणी..
ती मैत्री इतकी उत्कट आहे की.. हे लिहायला घेतले आणि मध्येच तोडून शारदया अन दीपाली (लग्न केले त्यांनी पुढे ) ला फोन केला..
किती दिवसांनी बोललो.. खळखळून हसलो...
वा..
हा तर लिहितो थोड्या वेळाने..
(क्रमश:)
30 May 2020 - 6:10 pm | गणेशा
२००५ साली, मोड्युलर कंपणीत जॉइन झालो आणि आमचा ८ नविन फ्रेशर लोकांचा गृप तयार झाला, तसे आताच्या कंपनी सारखे ट्रेनिंग वगैरे काही नव्हते, आणि सगळेच एका वेळेस जॉइन झालेले आहेत असे ही नव्हते.. पण आम्ही एकमेकांस कसे बांधले गेलो माहीत नाही.. आम्ही तसे वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम करत होतो ..
-------------
संध्याकाळी ५.३० - ६ वाजले की आम्ही एक एक जन कंपणीतुन बाहेर पडत असे. इलेक्ट्रॉनिक इस्टेट (पर्वती इस्टेट) च्या बाहेर, गेट वर, रस्त्याला लागुन एक झाड होते, जो पहिला निघेल तो तिथे त्या झाडाखाली जाऊन थांबत असे. ते झाड अश्या अनेक चेष्टा मस्करी, विनाकारण केलेला हाश्य कल्लोळ, गोंधळ , थट्टा यांचे साक्षिदार होते..
पहिल्यांदा, दिपाली आणि रोहिणी ला मी गृप मध्ये आजिबात आवडत नव्हतो, कारण मी कसा पण डायरेक्ट बोलायचो.. पुढचे मागचे न बघता.. मला मुलींना वेगळे वागवण्याची कला नव्हती.. जसे आपले सगळे मित्र तसेच ह्या.. शहरातल्या गोड पणाची सवय नव्हती...
मग याच्या वर चर्चा व्हायच्या, दिपाली ला तर मी कसल्या परिस्थित नकोच होतो.. ३६ चा आकडा.. (आता रोहिणी आणी दिपाली सगळ्यात चांगल्या मैत्रीणी आहेत, नव्हे मी त्यांचा सगळ्यात चांगला मित्र आहे :-)) )
एकदा आम्ही सलाम नमस्ते ला गेलो होतो, आणि मला चहा प्यायचाच होता, चहा म्हणजे आपला जीव की प्राण, दिपाली ला तिच्या म्हणण्या प्रमाणेच करायचे असायचे, ती पुणेरी स्टाईल मध्ये म्हणाली.. " शी, चहा नाही आवडत मला, नको जायला.." आपल्याला हजरजबाबी पणा कुठे दाखवावा हे तेंव्हा कळत नव्हते, मी लगेच " बरं ठिक आहे, तु दुध पी" असे म्हणालो. त्यावर ती जी भडकली की बस.
. ( आज पहिला रिप्लाय लिहिताना , फोन वर हे बोलल्यावर आम्ही इतके हसलो की बस की बस )
सोमवारी भाग्यश्री, आदर्श आणी आमित माझ्या बाजुने आणी दिपाली आणि रोहिणी मी कसा गावठी ,, कसा बोलतो असल्या पटवण्यात.. आदर्श आपला तेंव्हा पासुन या सगळ्या मित्रात बेस्ट फ्रेंड.. त्याला असल्या परिस्थीती चांगल्या हातळता यायच्या ..
येण तेण प्रकारे , मी गृप मध्ये राहिलो... पण एकदा दिपाली माझी अपाचे गाडी बघुन म्हणाली होती, ये मला पण गाडी शिकायची आहे, पण रस्त्यावर नाही हा, मी " हा तु घरात शिक " असे बोलल्यावर पण ती माझ्या वर रुसुन निघुन गेली होती.. तीच्या वरोबर शार्दुल पण .. दिपाली गेल्यावर एका वर एक फ्री सारखे, शारद्या ला तिच्या मागे जावे लागयचे... डी गँग चा तो उजवा हात बनु पहात होता...
शार्दुल, आमचा लय भोळा माणुस, बराच शांत, तो दिपाली ला 'डी' म्हणायचा.. ती मात्र डी गँगची म्होरक्याच वाटायची मला.. पण शारदया ? तो आपला दोस्त होता..
आपण उरुळी ला तेंव्हा नावाला राहायचो.. झाडा खाली उशीर झाला की मी शारदया च्या रुम वर थांबायचो.. बर्याचदा..(नंतर रुममेट्स झालोच, ते वेगळे किस्से).. नाही पण शारदया तेंव्हा लगेच माझ्याबरोबर रुम वर येत नव्हता, तो व्हाया धनकवडी लांबुन अरणेश्वर ला यायचा...
दिपाली ला घरी जावून स्वयपांक करायचा असायचा, म्हणुन ती बर्याचदा लवकर निघायची.. आणी शारदया पण..
रोहिणी, आमच्या गृप मधली सगळ्यात मॉड मुलगी होती.. सिंबॉयसिस मध्ये शिकुन आलेली होती.. मॉड्युलर हे नाव तिच्यामुळेच सार्थकी लागले असे आपले मत होते..
आम्ही जेंव्हा कोकण ट्रीप ला गेलो, त्यामध्ये आम्ही खुप धमाल केली.. पुण्यातुन दिवेआगार, श्रिवर्धन, आरावी या पुर्ण ट्रीप मध्ये येई पर्यंत नॉनव्हेज जोक्स.. कसले ही पिजे.. गप्पा. खेळ काही सांगयला नको... माझी ही आयुष्यातील पहिलीच ट्रीप. तेंव्हा पासुन रोहिणी चा मी तीच्या दृष्टीने सर्वात चांगला मित्र झालो.. नंतर हे नाते इतके सुंदर होत गेले की बस . ती दुबईला होती तेंव्हा तिला वाटायचे मी विथ फॅमिली तिकडे यावे फिरायला.. पण दुबई आपल्याला कधी आकर्षित करु शकली नाही.. आता मुंबई ला असल्याने १-२ महिन्यात फोन झाल्यावर खुप बोलतो आम्ही.. आता आमच्या गृप मध्ये सगळ्यांशी बांधुन असलेला मी एकटाच असे तीचे मत.. तीचा तर मी एकटाच जीवा भावाचा मित्र.. मज्जा येते तिच्याशी बोलताना, मुलांच्यात इतकी गुरफटलेली असते, आणि तीची स्वप्ने काय तर आपण म्हतारे झालो ना, मग पुन्हा तसेच त्या झाडाखाली उभे राहुन मनमोकळे गप्पा मारायचो ना अगदी तसेच गप्पा मारु..
माझे अजुनही विरुद्धच मत, आलेला प्रत्येक क्षण जगुन घ्यायचा, नंतर असे करु न तसे करु हे सगळे राहुन जाते ग.. पण आम्ही आमच्या मुद्द्यांना सोडेल तर कसे ...
ती पुण्यात आली होती तेंव्हा कोंढव्याकडे जाताना, तीला ते झाड दिसले नाही.. तीला वाईट वाटले.. तीने मला हे सांगितले तेंव्हा ही मला वाईट वाटले..
अमित आमच्या गृप मधला हिरो ,बोलबच्चन पण होता तो.. जरी तो सिंहगड रोड वर रहायला असला तरी आधी पेठेत राहिलेला गुण त्याच्यात होता, आमच्या गृप मधला सगळ्यात गोडबोल्या तोच.. पोरींना जाळ्यात कसे ओढायचे हे त्याला जास्त कळते असे त्याला उगाच वाटायचे.. असते , गोड बोलणार्या मुलांना हा गैरसमज असतो..
अमित सुंदर गायचा... त्याला खुप मुली आवडायच्या.. कधी कधी शारदया आणि मला तो असे समजावयाचा की आमचे आजोबाच आमच्याशी बोलतात ..
पण तसा मनाने चांगला होता, एकदम. रहाणीमान उच्च होते आणि भाषा क्लिन.. गृपमध्ये कोणी क्लिनबोल्ड झाल्या नाही हे त्यांचे नशिब...(भाड्या ने वाचले हे की मला लय शिव्या घालेल, आताही) 'भाड्या' हा आमचा कॉमन शब्द होता.. भाग्यश्री ला नंतर आम्ही 'भा' हे नाव दिले आणि दिपाली चा 'डी' होताच..
इलेक्ट्रॉनिक इस्टेट मध्ये दुपारी चक्कर मारताना अमित मस्त बोलायचा.. सगळ्यांना खुप मस्त हाताळण्याची कला त्याच्या कडे होती असे मला वाटायचे.. आपल्यात अशी ओघवते बोलण्याची कला नव्हतीच कधी..
अमित ने आम्हाला तेंव्हा एक गोष्ट सांगितली, की आपण ऑफिस चॅट बॉक्स मध्ये जे लिहितो ना ते सर्वर वर रेकॉर्ड होते, आणि ते वाचु शकतात.. मग माझ्या मनात आले, भाड्याने हे आधी का नाही सांगितले, आता ह्या येव्हद्या शिव्या, येव्हडे बोलणे कोणी पाहिल्यावर.
मग आम्ही शोर्ट फॉर्म मध्ये बोलायला लागलो.. पण त्यात सगळ्यात फेमस झाले
( B.N.K.R.) अमित आहेराव.. बोर नको करु राव ..
आता कॅनडा ला गेल्या पासुन आमचे बोलणे खुप कमी झाले आहे.. ( आज करतो कॉल रात्री त्याला )
शितल गृप मध्ये कमी राहिली, ६ महिण्या नंतर तीचे लग्न झाले, आमच्या गृप मधुन कायमची हरवलेली ही एकमात्र मुलगी.. जास्त आठवणी ही नाहितच..
कधी भेटली तर भांडण होणार.. पण कधी भेटणारच नाही असे मला वाटते...
क्रमशा: (पुढे आमच्या गृप मधला आमच्या तीन जनांचा थोडा क्लोज्ड गृप
30 May 2020 - 8:42 pm | गणेशा
माझ्याच साठी - >
वरचे दोन्ही भाग वाचल्यावर , रोहिणी चा फोन आला..
२ मिनिटे तर रडत होती.. आपल्या पाशी रडणारे विरळच.. अश्या निखळा मैत्रीला सलाम... खुप बोललो आज...
वरचे लिखान तसे जास्त वेधक नाही झाले, पण हे ज्यांच्या साठी आहे, त्यांना त्या दिवसाचे अलवार पिस अंगावर पडले असे वाटणारच.
खुप जुने दिवस आठवले.. खाली आदर्श आणि भाग्यश्री चे भाग देणार होतो पण सुरुवात रोहिणी पासुनच करेल पुन्हा..
- गणेशा
30 May 2020 - 9:05 pm | चांदणे संदीप
असे मित्र आणि मैत्री मिळायला भाग्य लागतं. भाग्यवान आहेस.
हे सगळं वाचत असताना. कॉलेजपासून अगदी आता नवीन सोसायटीपर्यंतचे झालेले ग्रूप आठवले. जितक्या नोकर्या बदलल्या, राहती जागा बदलली तितके ग्रूप झाले.
वाचतो आहे. येऊदे अजून.
सं - दी - प
31 May 2020 - 1:06 am | गणेशा
काळ थोडा पुढे सरकला आणि आम्ही घट्ट मित्र झालो...
माझ्या घरी मटण खुप भारी बनते... सगळे उरुळी कांचन ला मटण खायला आले.. आम्ही पत्ते खेळलो होतो, गेम आठवत नाही, पण त्यात राजा राणी वजीर असे जिंकण्याच्या क्रमाणे ठरले जातात. आदर्श राजा झाला होता, रोहिणी राणी आणि मी वजीर....
तेंव्हा पासुन रोहिणी ला आज पर्यंत मी राणीच बोलतो, पण ती मात्र मला अजुनही हसत 'गणोबा' बोलते.. मला गणोबा म्हणणारी ती एकमेव व्यक्ती...
भाग्यश्री कंपणीत बसायला माझ्या मागेच होती.. बाकी सगळे आम्ही लांब लांब बसत ..
भाग्यश्री आमच्या गृप मधील सर्वात सालस, शांत आणि समजुतदार मुलगी.. अजुनही ती तशीच आहे... आमच्या सर्व गृप मध्ये भाग्यश्री सर्वांना खुप आवडायची.. तीला पॉलिटीक्स म्हणजे काय हे माहितच नव्हते ...
मी जरी कंपनीत काम करत असलो तरी माझे कॉलेज (मी दुसर्या वर्षापासुनच कंपणीत जात होतो, शेवटचे वर्ष कंपणीतच) चालु होते आणी ते होते निगडीला. त्यामुळे एम.सी.ए. च्या मित्रांच्या निगडीवरील रुम वर पण मी जायचो .. तेंव्हा भाग्यश्री, मी आणि आदर्श आम्ही तिघे शनिवार-रविवारी पण भेटत असु.. पुणे गेट हेच आमचे ठिकाण.. त्यामुळे हळु हळु आमच्या तिघांच्यातला बाँड पण घट्ट होत गेला.
झाडाखाली उभे राहिल्यावर कितीतरी ४२ नंबर बस आम्ही तीला सोडायला भाग पाडत असु.. तीला घरी जास्त उशीर झाल्यावर चालत नसे, पण तीला या बाबतीत तरी आम्ही बिघडवुन टाकले होते.. आमच्या मुळे तीला घरी बोलणे खावी लागत असे.. तीच्या आयुष्यातील सर्वात टुकार पण बिंधास्त असणारे आम्ही दोघेच होतो..तिला अनेक मॉडर्न म्हणी, वाक्यप्रचार आम्ही शिकवले होते. त्या शाळेचा आदर्श हेडमास्तर आणि मी शिक्षक होतो...
आदर्श माझा या गृप मध्ये बेस्ट फ्रेंड होता, इतका की मी निगडीला आलोय हे कळाले की, त्याचे वडील त्याला आता तुला रात्री १२-१ वाजतील यायला ना ? असेच विचारत होते.. आमच्या गप्पांना काय लिमिट नव्हते, आदर्श एकदम प्लँड मॅनर मधला, आणि मी एकदम उधळा.. त्याने कितिदा तरी मला समजवले पण त्याचे काही फायदे नाही झाले.. पोरिंच्या गप्पा हा आमचा कायमचा धंदा होता.. रात्रीचे १२-१ हे म्हणजे मिनिमम.. कधी त्याला दूसर्या कशामुळे ही घरी जायला उशीर झाला तरी आमच्या नावाचा उद्धार होत होताच.. आपला लौकिकच असा होता..
माझी मुंबईची मज्जानु लाईफ हा आमचा कायम चर्चेचा विषय बर्याचदा असायचाच... तो विषयच न्ह्यारा. नंतर अजुनही आम्ही तितक्याच उत्क्टतेने भेटतो, आताच जानेवारी मध्ये तो लंडन वरुन आल्यावर आम्ही भेटालो होतो,, कुठे ? पुणे गेटच...
पंचमी, हे पुणे सातारा रोड वरील हॉटेल, ऑफिस च्या अगदी जवळ होते, आमच्या सगळ्या कंपणी जवळच्या पार्ट्यांचा हा एक मोठा साक्षीदार आहे.. पंचमी आणि आमचे नातेच तसे.. किती प्लॅन आमचे त्या हॉटेलात ठरलेत.. उन्हाळ्यातला मँगो ज्युस तर क्या कहना.. अजुनही मी तिकडे गेलो की त्या हॉटेल मध्ये जातोच जातो...
जवळच सिटी प्राइड होते, आम्ही सर्वांनी एकत्र पाहिलेला 'रंग दे बसंती' हा पिक्चर आणि थेटरमध्ये आम्ही केलेला गोंधळ अजुन आठवतो.. आम्ही सगळ्यांनी त्यातील स्वता एक एक पात्र घेतले होते.. त्याच्या एंट्रीला बाकिचे गोंधळ करत होते.. तो पिक्चर अक्षरसा जगलो आम्ही तेथे....
मैत्री .. ही खरेच किती सुंदर गोष्ट आहे ना.. ?
लिहिण्याचे खुप आहे पण थांबतो...
क्रमशा: ( पुढे शेवटची मैत्रीण अश्विनी जगताप )
31 May 2020 - 9:27 am | चांदणे संदीप
उन्हीं पुराने दोस्तो के साथ
फुर्सत से गप्पे लडाने है
और उनके सुस्त पडे
ठहाके जगाने है
आसमां को सुनाने के लिए
चाय की सुर्कीया
उसी दूरके ठेलेपे जाके
लेनी है
फिर चाहे,
झुलसा देनेवाली
दोपहरकी धूप हो,
या हो,
शाम के रंगीन फव्वारे
क्रिकेट भी खेलना है
जहाँ जगह मिले वहाँ
बच्चोंको घुमाना है
बहन-भांजे सबसे
मिल आना है
जिंदगी फिर एक बार
और बेहतर तरीके से जिने की
कोशीश करनी है
बस ये,
साफ फर्श पर अचानक
हाथो से चाय की प्याली गिरी हो
और उसमे रख्खी हुई
सारी चाय फैल रही हो
तितर बितर होकर
जरासी भी ढलान मिले
उस ओर
उसी तरह से,
बढता हुआ ये
सुहाने जिंदगीपर
भद्दा दाग लग रहा लॉकडाऊन
पूरी तरह से
साफ हो जाने के बाद!
सं - दी - प
31 May 2020 - 9:56 am | गणेशा
मस्त..
खरे तर मला खुप कमी फ़्रेंडस, मोजून 15-20.
त्यामुळे माझ्या भावना अश्याच उत्कट... जीवनाच्या भावगर्दीत कित्येक लोक आले.. गेले.. पण आपल्याला मनापासून एव्हडेच भावले..
त्यांमुळे, तो चहा.. त्या बाईक राइड्स .. ते तासन तास बोलणं.. काहीही... अजूनही तसंच...
Mumbai मध्ये गाडिच्या मागे घट्ट बसणारी मैत्रिण..
माझ्या दुःखात साथ देणारे जिवाभावाचे मित्र..
सायकल घेतली तर सायकल घेऊन माझ्या सोबत फिरणारे माझे गावाकडचे 2 मित्र
संदीप सुप्रिया सारखे ऑर्कुट फ़्रेंड पण family फ्रेंड झालेले..
आपण ठरवलंय.. आपण पुन्हा 15 वर्षे मागे जाऊन जगणार...
31 May 2020 - 11:49 am | कंजूस
बरंच मजेदार आहे गणेशा.
---------
इतर मिपाकरांनो तुम्ही पण काही लिहा रे. श्रीखंड घोटल्यागत लिहायचं ( म्हणजे या शैलीला मी म्हणतो ) आपल्याला जमत नाही. ही टीका नाही तर एक
प्रतिसाद आहे. शब्द आणि मोती वगैरे लेखाचं नाव वाचून लेख उघडलाच नव्हता पण प्रमोदने लिहिल्यावर लगेच वाचायला आलो. पहिला भागही वाचला.
बाकी याच्या छोट्या कथा केल्यास जीए होणार.
31 May 2020 - 12:32 pm | गणेशा
गोठलेला श्रीखंड शब्दच मला खुप आवडला.. :-))
शब्द -मोती नाव नसेल आवडले.. काहींना अलंकार आवडत नाहीतच..
आवड एकच..साधे सरळ.. दागिना विरहित... जशी केट होती टायटॅनिक मध्ये.. एकदम तसेच...
जीए.. कधीच वाचले नाही.. काजळमाया घेतले होते, वाचण्या अगोदरच न्हेले फ़्रेंड ने..
पण आपण साधाच, कुठं जीए.. .:-))
31 May 2020 - 1:57 pm | कंजूस
शब्द -मोती नावातून वाटले की कवी कल्पना, काव्यमय वर्णन असणार.
31 May 2020 - 2:01 pm | कंजूस
गोठलेलं नाही.
श्रीखंडासाठी चक्का आणि साखर ( आणि केशर, वेलचीसुद्धा) बराच वेळ घोटतात..
31 May 2020 - 2:45 pm | सस्नेह
गे माझ्या बकुळी !
कालच तर तू प्रथम बहरलीस..
चांदण्यांच्या नक्षीने पुरती धुंद झालीस..
वार्याच्या झुळुकीने सांत्र आर्त झालीस..
... आजकाल वारा नाही फिरकला,
म्हणून का तुझा बहर आटला ?
उणावली चांदणफुले आणि सुगंध खंतावला ?
वारा तर आपल्या मस्तीत, वनोवनी हुंदडतो..
म्हणून का देह तुझा स्पर्शाविना सुकतो ?
नको माझ्या सखी गं आटवू झरा प्रीतीचा
बहर पुन्हा अशी की झंझावात वर्षेचा
येईल तो सखा तुझा मग माघारी परतोनी
कुशीत त्याच्या जाशील होऊन नभचांदणी..!
31 May 2020 - 6:25 pm | मोगरा
स्नेहांकिता.
सुंदर भावना...
~~~~~~~~~~~
गावाला बकुळी चे मोठे झाड होते, हिरवेगार.
गावाला गेले की संध्याकाळी बकुळीची फुले वेचण्याची मज्जा काही औरच.
आई झाडावर चढू नको बोलायची. तरीही मी काही वेळेस झाडावर चढत असे. बकुळीच्या देठाकडे थोडे हलकेच दाबले कि ते खुडले न जाता वेगळे व्हायचे. त्याचा पुष्परस पिण्यात पण मज्जा होती.
फुले गजऱ्यात माळली की दोन दिवस केसांत सुगंध दरवळे..
फुले अगदी विटकरी झाली तरी त्यांचा सुगंध जात नसे.
आठवणी हि अश्याच सुगंधी., जुन्या झाल्या तरी सुगंधीच, बकुळीसम.
-
मोगरा
31 May 2020 - 6:38 pm | सस्नेह
धन्यवाद, मोगरा.
ही माझी बकुळी...
1 Jun 2020 - 12:51 am | गणेशा
बकुळी चे झाड पाहून छान वाटले.. रिप्लाय खाली देणार होतो पण येथेच देतो.
---------------------
सख्या, मी तुझी बकुळी !
शब्दफुले गुंफली मी
तुझी वाट पाहता..
अत्तरे उडतील नभी
घे टिपून मज आता...
चांदणस्पर्श भिनला
मखमली या देहावर
ओठांवर साचले गाणे
खुले हास्य गालावर
तू लवकर ये सजना
बोजड आता हे जगणे..
तुझ्याविन रिते मन माझे
श्वासांचे नुसते येणे जाणे...
- शब्दमेघ (गणेशा)
1 Jun 2020 - 7:12 am | सस्नेह
अचूक शब्द !
31 May 2020 - 3:16 pm | गणेशा
अश्विनी जगताप...
थांबा, आडनाव एक असले तरी आम्ही पुर्ण दोन दिशेची दोन टोके होतो.. कंपणीतील माझी ही शेवटची मैत्रीण..
अश्विनी, मोड्युलर ला नंतर जॉइन झाली.. मी तेंव्हा खालच्या बेसमेंट ला शिफ्ट झालो होतो.. कंपणी आमची छोटीच होती.. आमचा ८ जनांचा गृप वेगळा आणि अश्विनी वेगळी.. ती फक्त माझी मैत्रीण होती, असे म्हणाल्यास वावगे होणार नाही की मी पुर्ण कंपणीतला तीचा एकटाच मित्र होतो.. कायमसाठी...
आमची जागा खाली माझ्या टीम लिडर , विक्रम शेजारी करण्यात आली..आदर्श पण तेथेच बसत होता. अश्विनी कंपणीत जॉईन झाल्यावर माझ्या जवळ बसण्यास आली..
अश्विनी, C.O.E.P. मधुन Electronic B.Tech मध्ये college टॉपर होती.. त्या काळात ती अल्गोरीदम, मशिन प्रोग्रॅमिंग असले काय काय करत होती. तीची लेवल आय.आय.टी चीच. , त्याची कुठलीशी परीक्षा ती पास झाली होती.. तिकडे गेली नाही तो भाग वेगळा..
--------------------
हा तर अश्विनी ही एकदम टीपिकल हुशार मुलींसारखी होती.. काम एके काम.. दुसरे काहीच नाही.. ती खाली बघुन यायची, खाली बघुन जायची.. सासवड वरुन पुण्यापर्यंत आणि पुण्यापासुन सासवड पर्यंत ती पुस्तकेच वाचत यायची.. कोणाशी एक ना दोन..
त्या उलट मी.. आपल्याला बडबड लागायची.. चेष्टा करणे तर आपल्याला आवडायचेच..काम कमी आणि दंगा जास्त असले आपले... अश्विनीची मी बरीच फिरकी घ्यायचो.. तीला निट कळत पण नव्हते.. तीचा एकच शब्द असायचा.. स्टुप्पिडच आहेस.
कॉलेजमधल्या काही गोष्टी निघाल्या आणि आम्ही बाईंवर कसे लाईन मारायचो, कसे कँटीन ला बसायचो.. की तीला ते खुप वेगळे वाटायचे.. एकदम ती सदाशीव पेठेतल्या सारखे बोलायची, " अरे तुम्ही या साठी कॉलेजला जायचा का ? कॉलेजला अभ्यासाला जायचे असते ."
मी आणि आदर्श हं करुन हसायचो.. तीला खुप नवल वाटायचे . अशी पण मुले असतात होय असाच तीचा प्रश्न असायचा...
आणि आम्हाला काय ही काकुबाई असे वाटायचे...
पुस्तके ही एकच आमची कॉमन आवड.. आमची मैत्री घट्ट होण्याची सुरुवात असणारी गोष्ट.. ती खुप भारी भारी पुस्तके वाचायची.. आम्ही तिथपर्यंत पोहचलो पण नव्हतो.. मग मी तीला दुनियादारी, पार्टनर, ५.समवन असली पुस्तके वाचायला दिली.. तसली पुस्तके वाचुन ती तर उडालीच होती आधी.. हे असले जग तीने कधीच जगले नव्हते.. ना तीच्या मनात त्याचे कुठलेसे चित्र होते.. आणी आम्हाला, या जगात अश्या पण पोरी असतात काय ह्याचे कुतहल..
नंतर आम्ही पुस्तकांची खुप देवानघेवान केली.. १० जून ला ती मला एक पुस्तक गिफ्ट द्यायची आणि २२ जून ला मी तीला एक पुस्तक द्यायचो ... अजुन पर्यंत हे चालु आहे..
तीने मला लिटील वुमन्स गिफ्ट दिले पहिल्यांदा.. मला खुप आवडले ते.. ज्यो आपल्याला खुप आवडली.. नंतर आम्ही पुस्तकांवर खुप बोलायचो.. दुसर्या इतर बाबतीत तीच्या नजरेने आम्ही स्टुप्पिड ठरले जायचो...आपल्यात वात्रट पणा होता, खोडकर पणा होता, पण आपण पण कुठल्या तरी कॉलेजचा टॉप्पर होतो, त्यामुळे तीने कितीही स्ट्प्पिड गिरी करायचा म्हणाली तरी मी पण टॉप्पर होतो गं, तु असले निरस जगणे नको सांगु आपल्याला असे बोलायचो.. तीच्या द्रुष्टीने तर बाईंवर लाईन मारणे म्हणजे अपराधच.. मुलींचे फोटो पुस्तकात ठेवणे म्हणजे वाईट धंदेच..
शारदया च्या रुम वर रहायचो तेंव्हा एक टाईम जेवणाच्या पैश्यात मी वडापाव खायचो.. आणि त्याचे पैसे साठवून महिन्याला एक पुस्तक विकत घ्यायचो..
तीच्या मुळे मला मेहता पब्लिकेशन, त्या पुढील अत्रे सभागृह असली पुस्तकांची ठिकाणे माहीती झाली.. माडीवाले कॉलनीतील मेहता पब्लिकेशन च्या दुकानात तर आम्ही मग पडीक असत.. तीथल्या काम करणार्या बाईंना पण आम्ही चांगले माहीत होतो, आम्ही गेले की त्या आम्हाला खुप छान छान पुस्तके सजेस्ट करायच्या.. मग आम्ही अशी दर महिन्याला पुस्तके घ्यायचो....मी तिथे गेलो की प्लेजर बॉक्स वाचायचो कायम, मग एका १० जून ला तिने मला दोन प्लेजर बॉक्स गिफ्ट दिले.. आपल्याला ती जाडजुड पुस्तके गिफ्ट देती , कधी २ -२ पुस्तके गिफ्ट देती याचेच अप्रुप जास्त होते...
नंतर आम्ही निलायम जवळच्या पाथफाईंडर ला जायचो, तिथे कॉफी मिळायची.. मज्जा.. तेथुन पण आम्ही काही पुस्तके घेतली . 'सेतु' हे आशा बगेंचे पुस्तक मस्तच. पॅपिलॉन पण आपल्याला आवडले खुप..
प्रत्येक माणासाच्यात दोन मने असतात, आपल्यात दोन्ही मने उत्तुंग टोकाची होती...
मी आमच्या सर्व गृप बरोबर जेवायला जायचो, आणि नंतर अश्विनी बरोबर पण जेवायला जायचो.. माझे काम ? तीला मी नेहमी म्हणायचो, २ तासाचे काम मी ५ मिनिटात करतो अश्विनी , तुझ्या सारखे नाही एका कामाला दिवस घालवतो... हुशार तो नाही, जो एक काम खुप वेळ एकसारखे करतो, हुशार तोच की जो कमी वेळेत काम करतो :-)) ( ही घाण सवय मला अजुन आहे, ४ दिवसाचे काम असेल तर मी शेवटच्या २ दिवसात जागे होतो आणि मग करतो, ती तेंव्हा ही पहिल्या दिवसा पासुन कामाला लागायची...
नंतर, मग मी तीला आमच्या गृपमध्ये यायला सांगितले, जेवनानंतर आमच्या सर्व मित्र आदर्श, भाग्यश्री आणी इतर यांच्या बरोबर फिरायला येत चल सांगितले.. एक दिवस ती आली.. नंतर दुसर्या दिवसा पासुन ती काम आहे म्हणाली.. मी तिला विचारले का ग तु येत नाहीस.. तर ती म्हणाली.. अरे तुम्ही किती स्टुप्पिड आहात, काय पण बोलता.. कसे पण.. मी नाही येणार ..
एकदा मला जोशी मॅडम ( डायरेक्टर) यांनी बोलावुन घेतले.. मी श्री लिपी चा इन्स्टॉलर बनवत होतो.. त्याचे बोलल्या त्या, आणि हसत म्हणाल्या, गणेश फ्लोअर वर आवाज खुप येतो तुझा .. कमी कर आवाज..
मी परत आल्यावर, अश्विनीने विचारले का रे डायरेक्टर मॅडम ने का बोलावले होते ? तीला खुपच कुतुहल होते..
मी म्हणालो, अग मीना आपल्याला आवडते, तीला पण कळाले ते, त्यामुळे बोलवले होते बोलायला..
तीला नेहमी प्रमाणे डोक्यावरुन गेले, ती म्हणाली मीना कोण?
मी म्हणालो अग मीना म्हणजे आपल्या मिसेस जोशी :-))
ती: स्टूप्पिड च्ये..
आमच्या फ्लोअर वर तेंव्हा एका मशिन वर साऊंड होते , आणि आमच्या आवडीची गाणी आम्ही तेथे लावु शकत होतो, तशी परवानगी होती. पण सर्व जन त्यांची फर्माईश सांगायचे त्यामुळे खुप घोळ व्हायचा.. मी खुप मध्ये मध्ये किशोर कुमार चे सॅड गाणी लावयचो..
अश्विनी ने एकदा विचारले का रे असले गाणे लावले ? मी म्हणालो आज मीना आली नाही ना.. आठवण येते..
ती : स्टुप्पिड च्ये..
नंतर एकदा आम्ही पंचमी ला गेलो होतो, लंच झाल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे बिला बरोबर बडीशेप दिली , अश्विनी ला ते इतके अप्रुप वाटले होते, की बडीसोप कशी काय दिली त्यांनी ? असा तीचा प्रश्न. अशी ती एकदम म्हणजे एकदमच 'ही' होती.
एकदा २२ जून ला तीला बर्थडे होता म्हणुन लाल गुलाबांचा बुके, आमच्या कंपणीच्या पत्त्यावर आला, .. येताना ती इतकी लाजली होती.. ते गुलाबाचे लाल रंग तीच्या गालावर दिसत होते..
आम्हाला तशी अपेक्षा नव्हती, पण तरी मी विचारले काय गं कोणी दिलाय हा असला बुके ? कोण आहे सांग लवकर ?
ती म्हणाली, अरे पल्ली ने दिलाय.. पल्लवी तीची सासवड ची मैत्रीण.. आम्ही चिडवले पण ती ठाम राहिली..
नंतरची गोष्ट.. तीच्या आयुश्यात खुप स्तिथ्यंतरे आली.. लग्न या गोष्टी मुळे..तेंव्हा मी तीचा माहेर बनलो होतो...घरचे कसलेच राजी नव्हते, आणि तीचे वय पण वाढत चालले होते..आम्ही पुन्हा 'पंचमी'त बसलो होतो, तीचे जेवणावर अजिबात लक्ष नव्हते, मी बळेच खाल्ले.. ती रडत होती.. आणि मी तीच्या बाजुने भक्कम उभा राहिलो..
तीच्या पळुन जावून लग्न करण्याला तीच्या बाजुचा मी एकमेव माणुस.. एकमेव साक्षीदार...
सोमेश पण मला आवडला, खुप हुशार मुलगा.. मस्त चालु आहे त्यांचे.. आमच्या बायकोची माझ्या सर्व मैत्रीणींमध्ये अश्विनी आवडती मैत्रीण.. साधी आहे ना म्हणुन :-)) (अश्विनी नंतर भाग्यश्री आणि निलम आवडतात तीला.)
मी अजुन ही तिचा माहेरचा माणुस म्हणुनच जातो.. सिया, खुशी चा मी 'गणु' मामा आहे :-)).
अश्विनी आणि मी अजुनही, पुस्तकांंवर तासन तास बोलतो.. मुलांच्या गडबडीत तीला वेळ कमी असतो. मागे बोलताना ती म्हणत होती.. आपण पुन्हा भेटु ना पुस्तकांच्या येथे.. मी मुलांना सोमेश कडे ठेवून येते, एक दिवस फ्री पुन्हा.. मस्त वाटेल.. मी हो म्हणालो ...
या वर्षी बोलताना गुलाबांचा विषय निघाला तेंव्हा ती म्हणाली, तेंव्हा मी तुम्हाला खोटे सांगितले होते की ती फुले पल्ली ने दिलेत म्हणुन...
मी फक्त हसलो आणि मनात म्हणालो, अजुनही तु आम्हाला काय स्टुप्पिडच समज्ते आहे काय गं ?
मी तीला आठवण करुन दिली, तेंव्हा तु सारखे 'केळकर म्युझीअम ला जावु बोलायचीस.. तुझी ओळख आहे, मी तेंव्हा म्हणायचो असले निर्जीव वस्तुंचे प्रदर्शन मला नाही आवडत.. पुण्यात असुन मी ते पाहिलेले नाही, पण आता माझे मत बदलेले आहे, आपण तिथे जावू, तु मला तुझ्या आवडीच्या गोष्टी दाखव.. मग आपण पुन्हा मेहता पब्लिकेशन हाउस ला जावु.. किंवा अत्रे ला.. बरीच पुस्तके घेवू...
समाप्त
नंतर किती ही कंपणी आल्या गेल्या.. कित्येक मित्र मैत्रीणी झाल्या पण ह्या मैत्रीला तोड नाहीच.. ही मैत्री अशीच आहे उत्कट.. भारी.. पुन्हा पुन्हा जगावीशी वाटणारी..
आणि मी खरेच भाग्यवान आहे.......
LOVE YOU ALL
---- गणेशा. (३१/५/२०२०)
1 Jun 2020 - 2:02 am | चांदणे संदीप
वाचता वाचता तुझ्या ग्रूपचाचा भाग असल्यासारखे वाटले. खूप वर्षांनी प्रत्येक लहानसहान गोष्टींची उजळणी करताना ज्याम मजा येते.
पाऊस सुरू झालाय त्या पार्श्वभूमीवर हे सगळं वाचताना मन नुसतं हेलकावे खात होतं भूतकाळातील आठवणींवर.
तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली
जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची
सं - दी - प
1 Jun 2020 - 8:35 am | गणेशा
तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली
जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची
___^___
धन्यवाद..
ओळी एकदम खऱ्या.. माझ्या मनातले भाव..
काल माझे सारे वाचून अश्विनी चा फोन आला..
तिने आपण पुन्हा पुस्तकांच्या दुकानात.जावू.. हॉटेल्स ला जावू.. मी काढील वेळ..
मी नेहमी प्रमाणे : तू काय ते लवकर ठरव.. आपण भेटू.. पण तू आणखिन काही वर्ष लावले तर मी तुझ्या सारख्या म्हाताऱ्या मुलीला घेऊन मुळीच फिरणार नाही..
ती :-)) :-)):-))
अवांतर -
आज 10 वाजल्यापासून नविन प्रोजेक्ट वर काम सुरु... आता इकडे येणे कमी.. प्रयत्न करेल.. त्यामुळे लास्ट ला झोपताना 'बकुळी' हा प्रतिसाद दिला .. झोप आला तरी दिला.. कारण आज पासून अवघड होईल आता इकडे येणे.. आता शनिवार - रविवार जिंदाबाद !
पण आज पासून मिपा कमी होणार हे नक्की..
तुम्ही लिहित रहा.. मी वाचेल नंतर
31 May 2020 - 6:29 pm | मोगरा
गणेशा,
तुमच्या आता पर्यंतच्या सर्व प्रतिसादामध्ये
फुलपाखराचे रंग आणि हा अश्विनी चा भाग उत्कट झालाय.
वाचतच बसावे असे लिखाण
2 Jun 2020 - 7:44 pm | कुमार१
सर्व मौक्तिकांचा छान आस्वाद घेत आहे.
धन्यवाद !
3 Jun 2020 - 12:53 am | मोगरा
वीजफुल घेऊन बाहेर मेघ कोसळतोय अक्षरशः,
गंधाळलेल्या श्वासात मन बेधुंद झालंय माझं
पाऊस माळला आहे मी माझ्या ओल्या केसात
तू मात्र कोरडाच असशील., नेहमी सारखा
पावसात असुनही अळवाच्या पानांसारखा
- मोगरा
3 Jun 2020 - 9:17 am | सस्नेह
शेवटच्या दोन ओळी खासच !
3 Jun 2020 - 1:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
कोरडाच मी ग सखे, आहे फक्त तुझ्या साठी
अंगाची ओल तुझ्या, हळू टिपून घेण्या साठी
तुला भिजायची हौस, पण बाधतो पाउस,
होता तुला जरा त्रास, मी होतो ग उदास,
मन मुरडले सये, माझ्या साठी किती वेळा
संधी क्वचित सापडे, अवचित अशी मला
तू होता ओली चिंब, माझे भिजे अंग अंग
तुझ्या हास्यात दिसती, इंद्रधनु सप्तरंग
जशी ओढ सरितेला, अथांगशा सागराची
माझ्या कोरड्या मनाला, ओढ तुझ्या ओलाव्याची
पैजारबुवा,
3 Jun 2020 - 8:42 pm | सस्नेह
मुंहतोड जवाब !
4 Jun 2020 - 12:56 am | मोगरा
सुंदर :)
3 Jun 2020 - 3:22 pm | अनन्त्_यात्री
शब्द भोई अरूपाचे
शब्द दूत अमूर्ताचे
शब्द धूसर सावली
शब्द झळाळ बिजली
शब्द हलाहल निळे
शब्द सृजनाचे मळे
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द आभासी रिंगण
शब्दापार मुक्तांगण
4 Jun 2020 - 1:22 am | गणेशा
वा मस्त..
शब्द सखा..
3 Jun 2020 - 6:47 pm | गणेशा
@ मोगरा
वीजफुलांचे घुंगरू घातलेला हा मेघ मी..
इंद्रधनु च्या सप्तरंगा आडची काळी रेघ मी..
तु माळले ज्या सरीला, तीचा शब्दमेघ मी..
.
का बोलतोय मी माझे.. माझ्याशीच पुन्हा?
.
बोलायचे आहे तुझ्याशी मलाही खुप काही l
पण आठवणींच्या वाफेवर पाऊस बनुन
मी उगाच आता बरसत नाही...
तुझं आभाळ पाऊस.. माझा डोळा ही पाऊस..
दाटलेला पाऊस मात्र.. तुला दिसत नाही..
सांग तू, गाशील का कधी, माझे शब्द.. माझी गाणी..
बघ मग येईल त्या आभाळाच्या डोळ्याला ही पाणी...
पाणीच पाणी...
.
.
------- शब्दमेघ ( 3 जून 2020, 6:45 pm )
4 Jun 2020 - 12:50 am | मोगरा
( खाली लिहिलेले कल्पना विलास आहे :) )
@ शब्दमेघ !
?
तुझे ना असेच असते.,
माझे आभाळ पाऊस? , अन तुझे डोळे पाऊस?
अन दाटलेला पाऊस मला दिसत नाही म्हणे....
तुला माहिती आहे., मला कविता कळत नाही.
मी साधी सरळ, म्हणुन तर तुला आवडलेली ना?
मग आता असले शब्द? वार करतात रे ते आरपार
कसे कळेल मला तुझ्यात पाऊस दाटलाय?
भावना म्हणजे पाऊस एव्हढंच कळतंय तुझे,
अरे पण बरस ना एकदाचा.,
त्याला काय आमंत्रण देऊ का मी?
तुला माहित आहे, मी तुझीच,
मग यात पण काय गप्प राहायचे रे ?
नाही बोलता आले तर मला जवळ घे., ओलीच
हास जरासा., अन ओठांवर पेर माझ्या, रेशमी मखमल.
- मोगरा
4 Jun 2020 - 3:50 pm | गणेशा
@ मोगरा
(कल्पना विलास आज ढगात आहे ... :-)) )
-------------------------------------------------------------------------
आज आलोय मी ..पुन्हा नव्याने.. फक्त तुझ्यासाठी..
सारं मळभ दूर सोडलय बघ...क्षितिजापार...
अन बरसतोय मनमुक्त मी , तुझाच..तुझ्यापाशी...
आज पतंग होऊन आलोय मी.. मुक्तछंद, तुझ्याशी.. तुझ्यासारखा...
.
आज शब्द स्पर्श झालेत.. आणि फुटलेत धुमारे त्यांना.. अगणित...
श्वासांच्या वेगाची लय मात्र अचानक बदलतेय.. कधी लय गवसत ही नाही..
या लयींची आवर्तणे कधी उंच जातायेत.. अगदी आकंठ...
त्यावेळी तु आपली अंतरे मिटवून टाक..मंतरल्या सारखी...
तुझ्या श्वासांचे येणे जाणे असेच राहुदे माझ्याआत.. मोगर्याच्या गंधासारखे
.
मग ओठांकडं वळल्यावर, तुझे नाजूक बोट का ठेवते माझ्या ओठांवर ?
बोलतोय गं मी.. पण सांग, फक्त बोलुन थोडेच भागणार आहे ?
----- शब्दमेघ ( ४ जून २०२०, १५:४८ )
4 Jun 2020 - 4:54 pm | चांदणे संदीप
कल्पना आणि विलास पैकी एकाला ते निसर्ग वादळाचे बटण बंद करायला सांगा. ;)
आमच्याकडे चोविस तासाच्या वर लाईट घालवलीये त्याच्यापायी.
कल्पना आणि विलासचा
ढगात रंगलाय झिम्मा
कल्पना गाते, आजा सनम
विलास म्हणतो हम्मा हम्मा
सं - दी - प
4 Jun 2020 - 5:03 pm | गणेशा
कल्पना आणि विलास :-)) :-)):-))
वा काय जोडी आहे..
4 Jun 2020 - 5:08 pm | प्रचेतस
अगगगगागा, कहर आहे =))
6 Jun 2020 - 12:02 am | गणेशा
शेवटची गोष्ट..
---
खरे तर जेंव्हा काम असते तेंव्हाच नेमके खुप सारे विषय आठवतात..
काम नको म्हणत असते, पण मन पार कॉलेज कॅंटीन च्या चहा पासून, लहानपणीच्या पावसातल्या कागदी होडी पर्यंत हिंडून येते.
मग मध्येच वाटते.. आपण तर कॉलेजला असे पर्यंत लिहित नव्हतो.. लिहित असतो तर तेंव्हा तिच्यावर..माझ्या प्रियेवर किती काव्य केली असती.. अमृता प्रीतम सारखी..
अमृता प्रीतम आठवली की मग इमरोज आठवतो.. आणि तीचा साहिर लुधियानवी आठवतच राहतो.. अमृता ची कहाणी काळजाचा ठाव घेत राहते तोच साहिर लुधियानवी ची गाणी विरहात हि दडलेल्या प्रेमाच्या अनेक कहाण्या बोलू लागतात..
'मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है...'
'मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, बज़्म- ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या माने..''
'कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहनेवाले...'
'तुम अगर साथ देने का वादा करो ...'
'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मै बता दूं...'
'आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू ...'
'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ...'
'मन रे तू काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे...'
'ये दिल तुम बिन कही लगता नही अब क्या करे ...'
'तोरा मन दर्पण कह्लाये ...'
'नीले गगन के तले धरती का प्यार ....'
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया , फिक्र को धुयेंमें उडाता चला गया ...'
हळू हळू मन त्यातून बाहेर येते... spark चा कोड पुन्हा आपोआप लिहिला जात असतो.. गपचूप.. लक्ष नसतेच तिकडे...
मग पुन्हा वाटते.. आपण पण ना कुठे पण रमतो.. किती गोष्टी.. किती कहाण्या...?
मग मी मलाच विचारतो.. पहिली गोष्ट कुठली लिहिली होती आपण?
तेंव्हा असे असंख्य गोष्टी लिहू वाटले होते का?
असे लिहिता लिहिता आपण किती लिहित जावु माहीत नाही.
पण शेवटची गोष्ट नक्की कुठली असेल..? कदाचीत शेवटची गोष्ट कुठली हे मला शेवट पर्यंत कळणार नाही... शेवट कुठे असतो हे मनाला तरी कुठे माहीत असते.. ते पण म्हणूनच आधीच्या गोष्टीत जास्त रमते..
पण आधीच शेवटची गोष्ट कळणार नव्हती हे आपण कधी का लिहिले नाही.. कसले हे आयुष्य ना? शेवटची गोष्ट काय हे माहीत न होताच शेवट.होणारे..
--गणेशा ( 5 जून 2020, 11:59 pm)
6 Jun 2020 - 10:52 am | मोगरा
कधी कधी शेवटचं पान म्हणुन जे लिहितो आपण, ती सुरवात असते नविन गोष्टीची.
~~~~₹~~~~
नविन
अमृता प्रीतम बद्दल -(इमरोज बद्दल माहिती होते )
त्याचे शब्द स्पर्श बनत होते, आणि तुझे रंग त्या स्पर्शाला नविन रूप देत होते.
अश्या वेळी या नात्यांना नावाची गरजच उरत नाही., पवित्रच ते.
7 Jun 2020 - 3:58 pm | गणेशा
भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज..
आज माझे मन उडत जाते आहे पुन्हा कॉलेज ला २०००-०२ सालामध्ये.. माणसाचे असेच असते, त्याच्या आयुष्यातील सर्वात आवडता काळ जो असेल तो त्याला सतत आठवत राहतो.. ,माझे त्या पेक्षा वेगळे काय ?..
------------------------------------------------
शिरुर ला बीसीएस ला दूसर्या वर्षाला गेलो आणी आमच्या कँटीन वार्या जास्तच वाढल्या.. जास्त चहाची सवय तेंव्हाचीच ..
श्रीदेवीलाल भट ह्याचे ( ह्यांचे तेंव्हा ही बोलत नव्हतोच) तेंव्हा कुकडी कॉलणीत चहा आणि वडापाव चे कँटीन होते.. सी.टी.बोरा ला जवळच लागुन असल्याने बरेच जण तेथेच पडिक असत.. कुकडी प्रकल्पाच्या पाटबंधारे खात्यासाठी ते कँटीन होते खरे.
त्याच्या दोन चार मळकट अश्या निळ्या टेबल वर आमचे कित्येक तास गेले त्याची गणती नाहीच..माझा आणि सरिताचा सगळा अभ्यास तिथेच झालेला..
एकदा इंग्लिश च्या तासाला मित्राची बहिण डायरेक्ट आमच्या वर्गाकडे गेली.. इंग्लिश चा तास चालु होता.. आता कसे तरी ह्या इंग्लिश ला आम्ही बारावीत मागे सोडले होते, तरी कोणत्या जास्त अक्कल असणार्या माणसाला हा विषय पुन्हा बिसीएस ला आमच्या मागे लावण्याची बुद्धी झाली होती माहीत नाही..
हा तर मित्राची बहिण पुण्यावरुन थेट वर्गात गेली.. मॅडम ला तीने विचारले, तीच्या भावाबद्दल.. तर मॅडम चे उत्तर - " ते सगळे तुम्हाला वर्गात नाही, तर भटाच्या कँटीनला सापडतील, ते तिकडेच पडिक असतात दिवसभर..
कँटीन म्हंटले की चहा आठवतो आणि त्याच बरोबर सर्वात जास्त आठवत राहतात सरिता आणि शशी...
सरिता.. माझ्या आयुष्यातील माझी पहिली मैत्रीण.. आता ही पुण्यात घर घेताना आम्ही जवळ जवळ घर घेतले आहे..
शशी आपला आता पर्यंतचा सर्वात चांगला रुम मेट, मस्त आठवणी.. तो ही पिंपळे सौदागर ला राहतो.. (अजुनही आमचे सर्वांचे घरी जाणे येणे आहे, तसेच.. आमची स्वप्ने आहेत की म्हतारे झाल्यावर ही आपण पुन्हा पुन्हा भेटायचे तसेच.. कधी कॉलेजला चक्कर मारायची ... )
हा तर चहाची सवय कशी लागली ते सांगतो ...
एक तर भटाचा चहा भारी.. त्यात वडापाव तर क्या कहना...
आपण गणिताचे टॉपर .. सरिता थेअरी विषयात अग्रेसर आणि इंग्रजी येत असल्याने इंग्रजीत हुशार.. दोघे आम्ही शेवटच्या बेंच वर बसायचो.. आमची मैत्री भांडणांपासुन सुरु झालेली .. मला चांगले आठवते, भांडणे असले तरी नंतर आम्ही बोललो होतो.. माझ्या एलेक्टॉनिक्स च्या नोट्स तीला हव्या होत्या.. आपल्याला तेंव्हापासुन आपल्या अभ्यासाचा कधी गर्व नव्हता.. मग आमची भांडणे हळु हळु मिटुन गेली.. आपल्या नोट्स मुळे ती थँक्स म्हणाली होती.. कोणती तरी मुलगी आपल्या धन्यवाद बोलते आहे, हेच तेंव्हा आपल्या साठी अप्रुप होते.
तीच्या राणी हॉस्टेल च्या सगळ्या मुली तीला म्हणत , अग तो कसा भांडतो.. कसा कँटीन ला टुकार पोरांच्यात पडीक असतो.. तु का बोलते त्याच्याशी...
पण त्या इतर मुलींना माहीत नव्हते.. दोन टुकार माणसे कायम एकत्र येतातच :-)) आणि नंतर आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो..
सरिता मग मला इंग्लिश स्पष्ट बोलायला शिकवणार होती.. आमच्यात जो मराठी बोलेन त्याच्या वर एक चहा, मग त्याने दुसर्याला चहा पाजायचा, असे ठरले आणि आमचा चहा जो वाढला तो वाढलाच .. इंग्लिश च्या पार काळ्या ठिकर्या पडल्या..
घरा पासुन लांब कॉलेजला असल्यावर, मेस मध्ये पोट भरत नसतेच ( मेस वर मला एक लेख लिहावा लागेल, येव्ह्ड्या मेस मला बदलाव्या लागल्या, नंतर लिहितो )
मग कँटीन च आमचा जोडीदार असे.. शनिवार पुर्ण आणि रविवारी सकाळी कँटीन उघडे असायचे, त्यामुळे तर मोकळे कँटीन हेच आमच्या अभ्यासाचे ठिकाण झालेले..
भटाचा मी सर्वात आवडता गिर्हायीक होतो, कारण माझ्या बरोबर कायम खुप लोक बरोबर येत असत.. ७.३० ला, माझे डी.फार्म चे फ्रेंड यायचे थिटे कॉलेजला कँटीन नव्हतेच. ८:३० ला आमचे बिसीएस चे सर आणी मी.. तेंव्हा इतर फिजिक्स आणि इतर कॉलेज मधील स्टुडंट ला मी कॉम्प्युटर चा शिक्षक वाटायचो.. उंची जास्त असल्याने वाटत असेल :-)).
९:३० ला मी आणि सरिता त्या नंतर पार प्रक्टीकल ची वेळ होई पर्यंत मी तेथेच पडीक असे.. नंतर शशी आणि मी.. नंतर संध्याकाळी परत मी आणि सरिता आणि कधी कधी शशी..
निकम सर प्रिन्सिपल होते.. खुप कडक , त्यांनी नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कँटीन ला जाऊ नये असे फर्मान काढले होते.. अशी आपली ख्याती होती...
मेस ला कंटाळुन एक वर्ष मी रुम वर स्वयपाक केलाय. सरिता यायची मदतीला..ती आमच्या बरोबरच जेवायची. ती आमच्या मुलांच्या रुम मध्ये पण एकटी मुलगी कशी येऊ असली नाटके करत नव्हती.. पण स्वयपाक मीच भारी करत होतो, तीच्या पेक्शा ही.. आपल्या गोलगरीत भाकरी आणि कालवण क्या कहना.. शशी मसाले भात भारी करायचा.. रोज आम्ही मसाले भात आणी बाजरीच्या भाकरी करत असू...
पण इतके असुन ही चहा मात्र आम्ही घरी बनवत नव्हतो...
चहा म्हणजे भटाचाच.. भट पण मला, मी आल्यावर नविन चहा ठेवायचा,, जुना चहा आपल्याला आवडत नव्हता.. माझे नखरे चालवले जायचे तेथे.. नंतर मी वडापाव आणि चहा ची मेस लावली होती भटाकडे... अशी वडापाव ची मेस लावणारा आता पर्यंत तिथला मी एकटाच असेल... तेंव्हा पासुन वडापाव आणि चहा मला एकत्रच लागतो..ती सवय अजुनही तशीच आहे..
सरिता आणी माझ्या भांडणाचे अनेक किस्से इथलेच..
बेन सरिताची रुम मेट होती.. ती म्हणायची, अरे तुम्ही रोज भांडणे करता तर मग परत बोलता का ? तीला नेहमी हा प्रश्न पडायचा... ती खुपच भोळी होती.. आम्हाला मात्र तीच्यावर खुप हसु यायचे.. सरिता आणी मी दोघे ही खुप भांडणप्रीय.. पुर्ण बिसीएस ला आमच्या नादाला कोणी लागत नसे.. बेन भात खाताना खुप घाण पद्धतीने पुर्ण बोटे भरवून खायची.. कधी ती आमच्याबरोबर जेवत असली तर मी तीला म्हणायचो.. एक तर मी आधी जेवतो नाही तर बाई तु जेव आधी.. मला कसतरी होते..
बेन च्या घरी चहा कोणी पित नव्हते.. ती गोवन होती.. कॉलेज संपल्यावर भवानी पेठेत तिच्या घरी गेलो तर ती माझ्या साठी चहा देत असे.. आणि इतरांना कोकम सरबत.. आपल्याला चहाच लागतो म्हणुन चहा.. पण तीच्या घरातला चहा अतिशय घाण होता.. तीने मी येणार म्हणुन सकाळी चहा करुन थर्मास मध्ये ठेवलेला असायचा.. कसे कळणार बेन तुला मला नुकताच केलेला चहा आवडतो :-)), तीच्या आईमुळे, छान आहे छान आहे म्हणुन तसला काळा चहा प्यायचो.. कसे सांगणार काय ते ..
बॉटनीतील कोरडे, फिझिक्स चे गायकवाड आणि केमिस्ट्री चे (नाव विसरलो) असे सगळे लॅब असिस्टन्स आणि माझी ही चांगली मैत्री झालेली होती.. बॉटनीचे काळे सर पण आमच्या बरोबर कॅंटीन ला यायचे...
तेंव्हा या कँटीन बरोबरच तुषार चे मोठे कॅंटीन सुरु झाले, आणि काही मित्रांबरोबर आम्ही तिकडे ही पडीक राहु लागलो.. कॉलेज हळु हळु जाणेच बंद झाले.. तुषार च्या कँटीनला पांडु नावाचा माणुस काम करायला होता.. तो काय करायचा. कोणाला चहा पाहिजे असला तरी कीटली घेवून जायचा आणि माझ्या कपात चहा द्यायचा जाता येता.. तुषार मित्रच झाला होता आपला.. पांडु ने कितीही चहा असेच दिले तरी मी सर्व चहाचे पैसे द्यायचो.. मिठाची जशी बेइमानी नसते , तशी आपली चहाशी बेइमानी नाही म्हणजे नाही..
माझे लग्न २०११ एंड ला झाले, त्या नंतर बायकोने तेथुन बाहेरुन परिक्षा देता येइल असा बीए चा फॉर्म भरला होता.. तेंव्हा तीच्या बरोबर तिकडे गेलो होतो.. येव्हडे सगळे शिपाई, लॅब असिस्टंट.. शिक्षक.. सगळे भेटायला आले होते मला, सगळे पुन्हा कँटीन ला गेलो , बायको ला आश्चर्य या गोष्टीचे होते की २००२ नंतर कॉलेज सोडले तरी १० वर्षा नंतरही, ही सगळी लोक कसे ओळखतात मला..सगळे कसे प्रचंड बोलतात असे तीला वाटले होते.. मग मी उगाच शायनिंग मारली.. पण तरी आपल्या कॉलेजच्या कारनाम्यांबद्दल तीला कोणी काही सांगितले नसेलच ही खात्री होतीच. :-)).
अश्या पद्धतीने दिवसाला कमीत कमी मी १५-१८ कप चहा पित असे.. अजुनही ५-७ कप चहा होतोच होतो..
लास्ट इअर ला मी धाडवे क्लास लावला होता पुण्यात.. तेंव्हाच पुण्यात जास्त फिरलोय मी ... तेंव्हा स्वारगेट पासुन टिळक रोड पासुन जंगली महाराज शिवाजी नगर पर्यंत सर्व चहाच्या दुकानात मी चहा प्यायचो.. आपले मित्र असायचे बरोबर.. कोंण कोण वैतागायचे.. शक्ती स्पोर्ट च्या समोर क्लास होता म्हणुन अंबिका आणि तिळक ला खुप पडीक असायचो ..
चहा बद्दल च्या अश्या कित्येक गोष्टी आहेत , ते सांगायला खुप पाने जातील.. त्यामुळे थांबतो..
अजुनही अक्सेंचर फुरसुंगीला आपण गेल्यावर, कँटीन ला आपल्याला नविन चहा करुन मिळतो, आपले मित्र माझ्या बरोबर आल्यावर तोच चहा पितात..
चहा आपले प्रेमच...
- गणेशा
7 Jun 2020 - 5:04 pm | गणेशा
माझ्याच साठी :
शशी ने हे वाचले आता... आणि अजून मेस बद्दल त्याच्या बद्दल लिही सांगितले..
आणि मसाला चहा तो भारी करतो म्हणुन गेट वर बोलावले 6 ला...
वा चाललोय आता मी.. मसाला चहा प्यायला... तो बनवून आणणार आहे...
मित्र असेच असतात, मनापासून.. मनापर्यंत जपलेले...
9 Jun 2020 - 10:57 pm | गणेशा
ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच
Youtube -
दिवस तुझे हे फुलायचे
Gaana.com -
दिवस तुझे हे फुलायचे
--------
शनिवारी आराध्या आली घरी, आणि आम्ही दोघांनी ठरवले आमच्या 'हि'ला चिडवायला पाहिजे जरा.. म्हणुन हे विडंबन
----------------------------
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
गाडीत चरत जाणे
वाटेत जिलेबी खाणे
गाडीत चरत जाणे
वाटेत जिलेबी खाणे
वड्यात मन हे गुंतायचे
वड्यात मन हे गुंतायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
मोजावी देहाची जाडी
वाटावी मनाची थोडी
मोजावी देहाची जाडी
वाटावी मनाची थोडी
श्वासात दम हे लागायचे
श्वासात दम हे लागायचे
श्वासात दम हे लागायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
थरारे लोखंडी दार
सोसेना अंगाचा भार
थरारे लोखंडी दार
सोसेना अंगाचा भार
डोळ्यांनी जखमी करायचे
डोळ्यांनी जखमी करायचे
डोळ्यांनी जखमी करायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
तुझ्या त्या फोटोच्यापाशी
थांब तू यडे जराशी
तुझ्या त्या फोटोच्यापाशी
थांब तू यडे जराशी
पापण्या मिटून बसायचे
पापण्या मिटून बसायचे
चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
-- शब्दमेघ ( 9 June 2020, 10:56 pm)
11 Jun 2020 - 8:06 pm | भीमराव
जाड्या भरड्याची आत्मकथा,
आत्मकथा कशाची डोंबलाची? मला सांगा, रडगाण्याला कोणी आत्मकथा म्हणेल का? असंही म्हणा, कुणाला वाटेल आपण जाड, स्थुल, थोराड, ढोल्या, गणपती, अगडबंब असावं? पण आहे याला काय करणार तरी काय? आता अर्थातच लागतंय पोटाला तेवढंच खातो ना. आता तुम्हाला म्हणुन सांगतो ही वाऱ्याने हलणारी हडकुळी जमातच बदमाश असते, पायलीचं खातील पण मांस म्हणाल तर गुंजभर चढणार नाही. आम्ही मात्र वारा पिऊन राहुदेत, काटा एक ग्राम मागे सरकेल तर काय बिशाद बेट्याची. साला तुम्हाला सांगतो सगळे एकजात भेदभावी रे. तो वजनकाट्याचा विनोद पण पुराणात जमा झाला आता, हापिसात कोणी त्याच्या खुर्चीवर बसुन देत नाही. रिक्षा वाले पण खुपच बदमाश, बदमाश कसले निर्दयी म्हणायला हवं. दोन सीट चे पैसे मागतात. आता आहे थोडंसंच जास्त म्हणुन काय दर रोज टपल्या मारून दुर पळावं का या हडकुळ्यांनी?
सापडु तर देत एकदा साला चिरडून टाकतो की नाही बघाच.
काय तर म्हणे जगात दुष्काळ आमच्या मुळेच पडतोय. वा रे वा. चला भुक लागली आता. काही तरी खाऊन घेतो.
12 Jun 2020 - 6:02 pm | गणेशा
हा हा हा भारी लिहिले आहे..
एकदम भारी..
12 Jun 2020 - 8:23 am | ज्ञानोबाचे पैजार
अरे वा गणेशा, भलताच हिट झाला की धागा... चक्क शिफारसीत घेतला गेला?
क्या बात है.. अभिनंदन..
पैजारबुवा,
12 Jun 2020 - 5:45 pm | गणेशा
आपला आशिर्वाद..धन्यवाद..
म्हणजे काय? मला माहीत नाही हे काय ते
13 Jun 2020 - 5:36 pm | गणेशा
चित्रकला मला आवडायची खुप.. लहानपणी 7-7 तास बसून मी मोठ्ठे मोठ्ठे चित्र काढत असे... गावाला होतो, सो कधी क्लास लावता आला नव्हता..
कलरींग कोणी शिकवले नाही.. आणि कसले कसले कलर्स असतात हे हि मला माहीत नव्हते...
त्यामुळे फक्त पेन्सिल चित्रे मी काढत असे.. कुठल्याच exam दिल्या नसल्याने, पुढे अभिनव ला आपल्याला पायरीवर पण उभे केले नव्हते..
चित्रकला दहावी नंतर जी सुटली ती आराध्या बरोबर चित्र काढे पर्यंत..
आराध्या बरोबर चित्र काढताना मज्जा येते..
आज पेंटिंग काढायचे ठरवले.. तीच्या शाळेसाठी..
कलर्स आपल्याला येत नाही.. पण म्हटले चला चूक तर चूक आज पासून नविन दुनियेत जावू..
असे हि.. There is no beauty without color...
दोघांची पेंटिंग्स..
14 Jun 2020 - 12:26 am | गणेशा
आज पुन्हा माझे मन जाते आहे , बिसीएस च्या पहिल्या वर्षाला ... कॉलेजला गेल्यावर कंप्युटर पहिल्यांदा हातळलेला.. मग आठवल्या सगळ्या गोष्टी ..अॅडमिशनच्या वेळेस झालेले हाल, रुम शोधताना पावसात झालेले हाल.. ( हे नंतर लिहिल). आता खास आठवल्या सगळ्या गोष्टी , फजिती ज्या कंप्युटर मुळे झाल्याला..
-----------
दोन महिना उशिरा अॅडमिशन झाल्याने जवळ जवळ सगळ्या विषयांचे अभ्यास पुढे गेले होते.. मला तर काही कळत नव्हते.. वेगळे गाव. वेगळे लोक.. पहिल्यांदा रुम वर राहिलेलो.. इंग्रजी फाडफाड बोलणारे बाकीचे विद्धार्थी.. पोरं पोरी पण एका बेंच वर बिंधास्त बसायची .. आपल्याला गावाकडुन आल्याने हे सारे नविन.. बरं इंग्रजी आपल्याला कायम आडवी जात आलेलीच.. तशी आपली मराठी पण कुठं दिवे लावती म्हणा..
असो , सगळ्यात आपला वांदा झाला तो कंप्युटर आणि इलेक्टॉनिक प्रॅक्टीकल यांचा, हे विषय मला आधी कधीच नव्हते, कंप्युटरला तर आपण हात पण कधी लावलेला नव्हता..
कंप्युटर च्या प्रॅक्टीकल ला मला मंडलिक सरांनी पहिल्यांदा अप्लिकेशन्/बायोडाटा असले काही तरी टाइप करायला सांगितले होते.. पहिलाच दिवस आपला कंप्युटर वर.. मशिन स्टार्ट करायचे गोल बटण सिपीयु मध्ये नक्की कुठे आहे तेच सापडायला चाचपडलेलो मी. नंतर श्याम ने मला वर्ड ओपन करुन दिले, आणि सांगितले यात लिही..
मी एका हाताने टाइप करायला लागलो .. N नंतर A नंतर M नंतर E , त्या पुढे ..G A N E S H
मंडलिक सर आले, अरे हे काय करतोय .. दोन हाताने टाईप करायचे असते राजा.. आणि मग आम्ही आमचा डावा हात किबोर्ड वर ठेवला.. तेंव्हा जी बोटे फिरतायेत ती आज पर्यंत त्यांच्या नशिबी ही काळी पांढरी बटणे बडवण्याशिवाय काही उद्योग राहिला नाही....
श्याम माझा रुममेट होता.. पहिल्या दिवशी मागच्या बेंच वर ओळ्ख झाली होती, आणि बारामतीचा त्यात, म्हणुन मी त्याने पाहिलेल्या रुम मध्ये रहायला गेलो.. श्याम बीई २ वर्ष फेल होउन आला होता.. गावाला त्याच्या भावाचे कंप्युटर इन्स्टीट्युट होते, तो पण तेथे शिकवायचा, म्हणुन त्याला कंप्युटर चांगला यायचा.. आपल्याला वाटले हा शिकवेल आपल्याला.. पण कसले काय
सगळ्या प्रॅक्टीकल ला बॅचेस पडल्या होत्या, कंप्युटर येणारे, अनुभव असणारे 'अ' बॅच ला, ब मध्ये थोडे थोडे माहित असणारे, राहिलेले 'क' मध्ये.. आणि ज्यांना काहीच कशाचा गंध नाही ते 'ड' मध्ये. त्यात आम्ही उशिरा आलेलो आणि काही माहित ही नाही म्हणुन 'ड' मध्ये गेलेलो ..
आपल्याला लहानपणापासुन असल्या मुलांच्यात राहायला आवडते.. त्यात मागचा बेंच फिक्स असल्याने आपले मित्र ही असलेच.. उलट मी आनंदाने 'ड' मध्ये गेलो.. हुषारकी दाखवणारे आपल्याला आवडत नव्हते आणि नाहीच..
श्याम पण बाकी तसा 'ढ' होता, पण कंप्युटर येत असल्याने 'अ' मध्ये होता, मग त्याने तिकडे लय पांचट वरण भात टाईप पोरं पोरी आहेत म्हणुन 'ड' बॅच घेतली. कारण दिले की आमची रुम लांब आहे, एकत्र जाता येइल हे. आम्ही खरेच लांब राहत होतो, डोंगरा पलिकडे, 'षटकार' कॉलनी मध्ये..
श्याम आपल्याला शिकवायचा की घाबरावयचा हेच कळत नव्हते..
मला त्याने कंप्युटर कसे येते , ह्याव न त्याव सांगितले होते. प्रॅक्टीकल ला तो आपल्याला सांगायचा, ह्या सरापेक्षा आपल्याला लय येते, ह्याने कुठली पण फाईल. फोटो कुठे पण ठेवुद्या मी ती शोधुन काढतो..
आम्ही मग आ वासुन बसायचो.. किती येते ह्याला.. मी विचारले होते, कसे रे तुला कसे कळते.. तो म्हणला होता, तुला लगेच नाही कळणार रे..
मग तो आम्हाला एखादा फोटो कुठल्याश्या फोल्डर मध्ये ठेव म्हणायचा.. आणि नंतर तो शोधुन द्यायचा.. आम्हाला तो एकदम आमचा मसिहा वाटायचा...
वर्गात मंडलिक सरांनी, लॉन्ग फॉर्म सांगा म्हणुन काही प्रश्न विचारले.. CPU चा ? कोणी तरी बरोबर उत्तर दिले..
नंतर विचारले GUI. अरे हा शब्द मी माझ्या जिंदगीत कधी ऐकला नव्हता. निशांत आमच्या वर्गात इंग्रजी ही फाडफाड बोलणारा आणि 'अ' बॅच चा मुलगा होता.. त्याने लगेच उत्तर दिले Graphic User Interface ... इतके अवघड त्याला येतेच कसे असा उलट प्रश्न माझा मलाच पडलेला...
पॅक्टीकल ला श्याम ने आम्हाला आणखिन एक जादु दाखवणार म्हणुन सांगितले होते, मी आणि अच्युत (आमचा दूसरा रुम मेट) त्याच्या बाजुला बसलो. मग त्याने काही तरी केले आणि एका फोल्डर मधुन पाणे दुसर्या फोल्डर मध्ये जायला लागली.. मग मी त्याला म्हणालो हे कसे काय केले रे ?.. मग तो म्हणाला तुम्हाला नाही कळायचे .. सांगेन मी नंतर.. मग त्याने इकडची फाईल तिकडे कशी गेली त्याने कशी तिकडे टाकली हे दाखवले.. आणि आमचे प्रॅक्टीकल तेथेच संपले..
इलेक्टॉनिक चे पण तसेच हाल होते, पण हळु हळु ते जरा सोप्पे जायला लागले होते, पण कंप्युटर म्हणजे महा अवघड काम. पास्कल ला तर आपल्याला काय ते **** वाले प्रोग्रॅम फॉर लुप मध्ये कसे प्रिंट करायचे तेच कळत नसायचे.. , वेरिएबल म्हणजे काय हे कळत नव्हते. श्याम ने सांगितले होते. त्यात आपण काही तरी साठवु शकतो म्हणुन ते घ्यायचे असते.. मग त्याने स्वॅप चा प्रोग्रॅम सांगितला होता.. आणि कसा त्याने वेरिएबल वापरुन तो केला हे आम्ही पाहत होतो..
ईंटीजर लिमिट कीती पर्यंत असतात, एक जीबी म्हणजे किती केबी ह्यात आमच्या थेअरी चे तास चालले होते..
मग आम्हाला डॉस चे प्रॅक्टीकल होते, मला डॉस म्हणजे ऑपरेटींग सिस्टीम येव्हडेच माहीत होते.. मग सीडी कमांड वगैरे सरानी शिकवल्या होत्या.. पण बाकी काहीच येत नव्हते. श्याम शिकवणार होता.. त्याने बेसिक ५ सांगितल्या आणि ह्या पुढचे तुम्हाला झेपणार नाही रे पेंद्यांनो येव्हडेच बास, असे म्हणुन आम्हाला गप केले होते.
त्याच्याकडे खुप फ्लॉपीज होत्या, येव्हड्या फ्लॉपी त्याच्या कडे म्हणजे तो खुप काही तरी मोठा माणुस आहे असे वाटायचे.. त्यात त्याने कसलासा प्रोग्रॅम केला होता असे सांगत असे तो.. आपल्याला लय अप्रुप त्याचे..
अशी आमची सेमिस्टर झाली होती, नशिब आम्हाला वार्षिक पॅटर्ण होता... आपल्याला वर्गात पण तसे तेंव्हा कोणी ओळखत नव्हते. वार्षिक परिक्षेला मी गणिता सह टॉपर आलो होतो आणि श्याम ८ विषयात फेल झाला होता, तिन्ही गणित आणि दोन्ही स्टॅट त्याचे उडाले होते ..
14 Jun 2020 - 8:55 pm | गणेशा
आज राघव यांच्या जुन्या कवितेला रिप्लाय लिहिताना खालच्या ओळी लिहिल्या..
तुझ्याच आठवांचे गीत माझ्या मनात आई..
तीच चंद्रभागा सुरांची..अन तू माझी विठाई...
आणि मग आठवले मीच आधी लिहिलेले हे लिखान.. खरे तर मागचे लिखान मी येथे देत नाही.. पण सेम भावना आज हि आहेत माझ्या.. अगदी तश्याच.. म्हणुन येथे पुन्हा देतोय..
----------------------------------
सहज संध्याकाळी तळ्याच्या काठावर बसलो होतो.. पुढे हिरवी झाडे मिरवीत टेकडी उभी होती. सूर्य, प्रकाशाचे दोर समेटुन घेत होता, वारा लाडीक स्वताशीच गात होता.. अंधाराची चाहुल लागुन पाखरे घरट्यात परतत होती.. आणि मला तुझी आठवण आली आई.. आता कीती बदललेत संदर्भ.. अर्थांसहित.. तु तिकडे दूर.. अन मी ?
मी गुरफटलोय ह्या जगात, पुर्णता:. अजुनही श्वासांच्या फडफडीमध्ये जगतो आहे संकोचुन. तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये अजुनही मी माझाच विचार करतोय का ? काय माहीत.
पण आई तु तुझ्याशिवाय माझा विचार करत असेच आयुष्य घालवले .. मला का कळाले नाही..? आज तू दूर, तुझी आठवण येते , माझ्याशिवाय तुला कधी सनाला पोळीचा एक घास गोड लागत नव्हता.. माझ्या फोनवरील २ शब्दांसाठी तुझे कान आतुरलेले असायचे.. आणी मी ? मी काय विचार करायचो...
शेजारील झाडाच्या उंच फांदीवर .. घरट्यात.. चिमनी तिच्या पाखरांना बिलगत असल्याचे दिसले.. आतुर पिल्ले बेंबीच्या देठापासुन जणू किलकिल करत होती .. माझे ही तसेच झाले आहे .. विचारांच्या गर्तेत मी ओढला जातोय ..
सूर्य आता क्षितिजापाशी शेवटच्या घटका मोजत आहे, रंगांची उधळण करुन जाता जाता काळोखाशी आज होळी खेळण्याचा तर त्याचा माणस नसेल ना ? पण काय उपयोग काळोखाच्या खोल गर्भात हे रंग स्वताचे अस्तित्वच विसरुन जातील. अन क्षितिज साम्राज्यावर रातीच्या काळोखाचा झेंडा फडकेल.
पण असा विचार माझ्या मनात आज आता का येतो आहे.. ? निसर्गाच्या कुशीत रमणारा मी.. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर जीव ओवाळुन टाकणारा मी .. पण.. मी तुझी कुस ही नाही विसरलो आई.. हा, वाटा अस्पष्टश्या झाल्यात पण त्या वाटेवरुन मी पुन्हा तुझ्याकडे येतो आहे.. तुझ्याकडे..
आनंदाचे कारंजे मनात थुई थुई नाचत आहे.. बगळ्यांची अर्धगोलाकार रांग क्षितिजालाही छेद देवून दूर चालली आहे..
समोरील टेकडी शांत आहे. झाडावरील चिमणीच्या पिल्लांची पण किलबील थांबली आहे. आणि त्या निरव शांततेत माझ्या पावलांचाच तो काय फक्त आवाज आहे...
--- गणेशा
25 Jun 2020 - 8:20 pm | गणेशा
प्रिय वसुंधरे,
तू म्हणशील," हे 'प्रिय' काये रे बेफिकीर, टुकार ढगा.,एकतर तुझा स्वभाव हा मुळात कोठे ही भरकटणारा.. तुला पाहिजेल तसा... स्वैर."
पण असुदे, मी असाच.. आज मला तुझी आठवण आली.. का नाही येणार ? आषाढ चालु होउन दोन तीन दिवस होऊन गेले.. आषाढ माझा आवडता महिना.. तू नाही का म्हणत असते मला.. काळा काळा कापुस पिंजला रे ...
मी असाच अवखळ..भारदस्त.. तु हळवी.. शांत.. मी कोसळलो की तु माझ्याकडे स्तब्ध होउन पाहत राहते.. मनापासुन.. आणि मग तुझा तो अबोल मृदगंध पसरतो सगळीकडे हवा हवासा..
तु ही नटते हिरवा शालु परिधान करुन .. आणि पुन्हा मग असा वेंधळा मी दिसलो, की माझ्यावरती तू डोळे वटारुन पाहतेस.. मग मीच ओशाळतो.. माझा काळा रंग तुझ्या हिरव्या शालु ला शोभत नाही असे समजून, मग मी पांढर्या शुभ्र रंगाची दुलई घेवून येतो तुझ्याकडे.. तेंव्हा मात्र माझी इच्छा असते, मी सोडून तुला कोणीच पाहायचे नाही.. तु फक्त माझीच...आपलं हे असच असतं..
मग उनाड वारा मध्येच घोंगावतो, विजेच्या तारा तुटतात.. तू तुझी चिंब ओली .. मी धुसर, अस्पष्टसा... मी मग दूर जाताना तुझ्या पानाफुलात माझे श्वास अडकतात अध्ये - मध्ये. मला भास होतो तू आवाज देती आहेस असा.. मागे वळून पाहतो तर मला दिसते फक्त क्षितिज रेघ ..तुझ्या माझ्या मधली.. कदाचीत तुझ्या हातात ही क्षितिज रेघच सापडते, माझ्या ऐवजी...
तुझाच मेघ..
--- शब्दमेघ , आषाढ शु. ४, २५ जून २०२०, २०:२०
27 Jun 2020 - 12:15 am | मन्या ऽ
मेघ,
हो फक्त मेघ! प्रिय ,लाडका ही विशेषण लावुन मी तुला परका करणार नाही.. तु परका नाहीच म्हणा.. तुझ्यामुळेच तर मला माझा साज-शृंगार अन् दरवळ मिळतो.. तुझ्यामुळेच तर मी माझ्या लेकी-बाळींना पोसु शकते.. पण तिथेही तु तुझ्यातल्या लहान मुलासारखाच वागतो.. कधी आगाऊ कारट्यासारखा येतोस अन् मला थेंबभर भिजवुन तहानलेली ठेवतोस तर कधी इतका बरसतोस कि "आता आणखी नको रे बरसु" अस तुला रागे भरावं. वाटत.. पण तुझा लहरी स्वभाव! म्हणुन मग तुला ओरडत ही नाही. कुणास ठाऊक रुसुन दडी मारुन बसलास तर?
आषाढ तर सुरु झालाय पण तु अजुन का दडून बसलाय??
तुझ्या वाटेकडे नजर लावुन बसलेली..
- तुझीच वसुधा
27 Jun 2020 - 11:03 am | गणेशा
प्रिय वसुंधरे,
आज वाटतंय, तुझ्यापाशी यावं.. मनमोकळं.
तुझा हात घट्ट पकडवा.. तुझ्या मिठीत शिरावे.. शेवटच्या श्वासापर्यंत..
अस्तित्व संपवून घ्यावे तुझ्या मिठीत...
तुला जाणवतील.. माझ्या हृदयाची अनियमित स्पंदने.. मध्येच तुला तेथे चिमण्यांची किलबिल ऐकू येईल.. रंगीत रंगांच्या काही छटा मध्येच दिसतील हि..
मी मात्र डोळे बंद करून घेतलेले असतील.. बंद डोळ्यात पाणी लगेचच साठत जाते, आणि डबडबल्या डोळ्यात किती आठवणी तरंगत असतात.. काय सांगू..?
शाप आहे माझ्या डोळ्यांना.. ते उघडले की पाणी उडून जाते..
म्हणूनच कदाचीत तू हवेचे कुंपण घातले आहे माझ्या भोवती.. माझ्याचसाठी..
आवडीच्या गोष्टींना अशीच कुंपणे का घालावी लागतात गं..? माहीत नाही.. पण तुझ्या वाऱ्याचे हात तू माझ्याभोवती गुंफ़ुलेले असतात..
मी मात्र तरी पाझरतो.. निघून जातो.. तुझ्या हिरव्याकंच गवताच्या भाळी माझ्या पाऊलखुणा सापडतात कधी कधी.. दवबिंदू ल्यालेल्या..
तुझाच मेघ...
- शब्दमेघ
27 Jun 2020 - 11:57 am | मन्या ऽ
मेघ,
तुझ्या अस्तित्वावर च तर माझे अस्तित्व टिकुन आहे.. तु तुझ्या भावना मुक्त करतोस अन् तुझ्या नेत्रजळानेच तर मला उशाप मिळतो.. उशाप माझ्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या बाळांना सुख देण्याचा., उशाप नानाविध सुगंधी रंगबेरंगी फुलांची मुक्तहातांनी उधळण करण्याचा.. हे दान मी तु दिलेल्या ओलाव्याने करते..
तु मुक्तविहार करु शकतो.. तरी स्फुंदत स्फुंदत रडतो.. मला दोन्ही करता येत नाही.. अंतराळात कोणीतरी आखुन दिलेल्या कक्षेत स्वतःभोवती फेर धरत जगायचं.. आणि रडायच म्हटल तर पाण्याऐवजी तप्त लाव्हारस! असा शाप युगेयुगे सोसणारी मी.. तुझ्या मायेने शृंगारते.. बहरते.. आणि तुझ्या आकांताची वाट पाहात राहते..
28 Jun 2020 - 2:21 pm | गणेशा
प्रिय वसुंधरे..
मी एक ढग.. साधा ढग. तूझा ढगोबा.. कधी कधी तुझ्या वाऱ्याचा हात माझ्या गालावरून फिरू लागला की मला मध्येच आईची आठवण येते.. ती पण मला ढगोबाच बोलायची. तू मात्र माझी सखी.. मैत्रीण.. प्रिय.
एकदा आठवते आपल्यात खुप भांडणे झाली होती.. त्या समुद्रावरून.
तो अजूनही तुझ्या पायाशी लोळण घेतो बघ.. आपल्याला तसले जमत नाही.. आपला स्वभाव असाच हट्टी.
तू म्हणतेस, मी खुप कठोर बोलतो, कधी कधी.
"तुझ्या माझ्यात नातं असलं तरी त्यात एक व्यवहार आहे, साधा वाटलो तरी माझ्याकडे तलवार आहे.. माझ्या तरल शब्दांनाहि धार आहे.. " असलेच काहीपण मी बोलत गेलो होतो आणि गेलो दूर उडून डोंगरापलीकडे.
मग मात्र तू रडत बसलीस.. मी पाहिले होते तुला हलकेच.. पण मी रागावलो कि माझा पण राहत नाही.. पण नंतर हलकेच हृदयात कोवळी वीज चमकते तुझ्या ओढीची..
भांडणे विसरून मी पुन्हा तुला पाहायला येतो. तू मात्र अजूनही तशीच असते रागावलेली. मग हलकेच मी झाडावर चढून बसतो. तू बोलत नाहीच..
मग मी पालखी बनून येतो तुझ्या दारी.. तुला मनवायला. तू माझ्याकडे पाहत पण नाही. पाना फुलांच्यात जाऊन मग मी तुझ्यासाठी गाणे गातो तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष करतेस.
मग मी वेगवेगळे आकार घेतो, तुला हसवायला.. तू चिडलेलीच असते.
तुला रंगाचं खुप अप्रूप आहे पहिल्या पासून. मग मी सूर्याकडे जातो, त्याची मदत घेतो. तो माझ्यावर रंगाचा वर्षाव करू लागतो संध्याकाळी.. मला लाल रंग आवडतो.. तुला हिरवा.
मी लाल रंगाचीच उधळण करतो..तुला काय वाटते काय माहीत, तू तुझ्या हिरव्या साडीत गाल फुगवून उभी असते.. तुला माहीत आहे मला हिरवी साडी खुप आवडते पहिल्या पासून.
मग अलगद मी तुझ्या भोवती पिंगा घालतो.. आणि तुझ्या हातांना हातात घेत ताऱ्यांचे रूपडे बघत तिथेच बसतो.. तुझ्याचसाठी.
तुझाच मेघ..
- शब्दमेघ..
10 Jul 2020 - 5:23 pm | Bhakti
किती सुंदर लिहिले आहेस...एकदम मस्त...
1 Jul 2020 - 8:21 pm | गणेशा
घर shift करतानाच्या आठवणी आठवल्या.. लिहिलेल्या पुन्हा देतो..
नुकतेच घर शिफ्ट केले. जुन्या घराच्या काही आठवणी लिहावे म्हणत होतो .. पण काही केल्या लिहिताच येइनात.. कीती आहेत त्या आठवणी? .. कधी एक गोष्ट आठवते तर लगेच दुसर्या गोष्टीमुळे मन भावुक होते.. त्यामुळे काही निटसे लिहिताच येत नव्हते. तरीही काही तरी लिहित आहे .. व्यवस्थीत नाहीये जास्त पण मनाच्या हळवेपणामुळे नाही लिहु शकत आहे चांगले .. जसे आठवत आहे तसेच शेअर करावेशे वाटत आहे म्हणून आपणा समोर देतो आहे
---
मी पहिलीत जावु लागलो तेच आमच्या छोट्याश्या पण मस्त घरातुन . शाळा जवळच होती पण रेल्वे लाईन मुळे आई सोडवायला यायचीच आणि माघारी नेहण्यासाठी यायची ...
घरी आल्यावर छोट्याश्या ताईडी बरोबर खेळण्यात कसा वेळ जायचा कळायचा नाही.
आता घर सोडताना सर्व जागा .. त्यांच्या आठवणी मनात घर करुन राहिल्या आहेत.
तीच ताइडी आता तिला ही गोड असे पिल्लु आहे .. तीच कीती गोड दिसायची.. दात किडकी म्हतारी असे म्हणत आमची होणारी भांडणे .. भातुकली मध्ये तीने आणि दिप्ती ने माझ्यासाठी घराच्या बागेत केलेली बाभळीच्या पाल्याची भाजी आणि कधी कधी घरातील शेंगदाण्याचा कुट आणि आवर्जुन पाहुणा म्हणुन बोलवल्यावर .. पाटावर बसलेला मी अजुन स्पष्ट आठवत आहे.
घर सोडताना, एक जुना पडलेला बॉल पाहुन, पाच रुपये चोरुन रबरी बॉल आणल्याने ५ तास अंगठे धरलेलो मी पण आठवले .. घराच्या रुम्स कमी पडत होत्या म्हणुन शेजारील आर्ध्या बागेत पुन्हा नविन घरासाठी पाया घालतना .. तेथील मोगरा , जास्वंद, जाई आणि आमची भातुकलीची जागा मन भरुन पाहुन घेतले होते ..आणि राहिलेल्या अर्ध्या बागेत आता झाडांचीच गर्दी होउ लागली होती ..
घराचा पाया भरताना वडलांनी उचललेले दगड आणि आई ने केलेली मदत अजुन आठवते आहे. घर कसे का असेना पण आई जेंव्हा म्हंटली ना .. ओटा बांधताना आम्ही लांबुन माती आणली होती घम्याल्या मध्ये .. स्वताच्या हाताने बांधलेले घर सोडताना कसे तरी होते .. मला ही तसेच वाटत होते
घराच्या एका एका इंचा मध्ये ही बर्याच गोष्टी दडल्या आहेत. दारात तासा पेक्षा ही जास्त वेळ रांगोळी काढणारी तायडी आठवली.. लहानपणी आई ने टिपक्यांचे कासव काढल्यावर आम्ही वाकडे तिकडे काढलेले मोर आणि कसलेसे प्राणी आठवले .
बागेतील कडेला उभे असलेले नाराळाचे झाड .. आणि जास्वंदाची वेगळी वेगळी फुले असणारी झाडे आमच्याकडे पहात होती. लहान लहान झाडे आम्हाला आता कोण बघणार म्हणुन नाराज दिसत होती.
मला सिताफळ खुप आवडते म्हणुन पुरंदर च्या सिताफळाचे आलेले झाड हळुच माझ्याकडे डोकावत होते..
घरात आवरताना.. सापडलेल्या जुन्या गोष्टी मन त्या त्या काळात न्हेत होत्या.
एक ग्रिटींग सापडले तरी ते वाचताना .. त्याच्यावर फ्रॉम म्हणुन असणारे नाव वाचले की तो काळ त्या आठवणी पुन्हा मनात घर करत होत्या.
इवल्याश्या घरातील २५ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर पटकण तरळुन जात होता.
एकदाचा तो दिवस उजाडलाच जेंव्हा आमचे सगळे सामन घेवुन गाडी निघाली ... आई आणि शेजार्यांच्या डोळ्यात पाणी होते. समोरच्यांचा मुलगा आई साठी रडत होता. आमचे घर - माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी अस्याच मागे ठेवुन आम्ही नविन घरी चाललो होतो .
ज्या उरुळी कांचन ला जाताना UK ला जातो आहे म्हणुन मित्रांच्यात हस्या निर्माण करत होतो .. त्या UK ला सोडुन जाताना माझ्या मित्र , शाळा , कॉलेज च्या आठवणींना बिलगुन मन अगदीच भारावलेले होते .. घर आम्ही विकले नाही त्यामुळे पुन्हा येथे येता येइल त्या काळाला हळुच अनुभवता येइल हाच तो काय आनंद होता .. बाकी या आठवणी अश्याच वेड्या एकदम मन हेलावुन टाकतायेत ..
2 Jul 2020 - 11:01 am | चांदणे संदीप
अबके कुछ दोस्तोंसे रूपये कर्ज लेने है
वसूलने की वजह मिलने का सबब तो बने
सं - दी - प
10 Jul 2020 - 11:01 pm | मोगरा
खुप दिवसानी मिसळपाव वरती आले, नविन आठ रिप्लाय आलेले होते, भराभर वाचले.
मेघ-वसुंधरा पत्र - संवाद खुप्पच सुंदर. वार्याचे हात ही कल्पनाच आवडली. परंतु वसुधा-ढगोबा नाते किती सुंदर.
मी काही तरी सुचते का पाहते. समुद्र ?
10 Jul 2020 - 11:39 pm | मोगरा
@ मेघ आणि @ वसुधा,
+++++++++++++++++
माझ्यावरुन भांडण ?
म्हणुनच मला वाटते, कुणी जवळ नसावे. जगावं असं एकटे, शांत. कोणीच नसावे भोवती. सगळीकडं असावे धुकं धुकं, मनाशी मनाचेच चालावेत खेळ.
हा हट्टी ढग, माझ्याकडे येतो आहे असा मला मग भास होतो. तो कायम हुल देत राहतो. त्याची सर पण आली आली म्हणता म्हणता येत नाहीच. जस आपल्या इवल्याश्या चिमटीत आकाश येत नाही., रात्री दिसणारे तारे तर मनाच्या खिडकीतुन आत झिरपत नाहीत, अगदी तसाच हा भास होतो, या वेंधळ्या ढगाचा.
मग मी माझ्या किणार्यावरती येतो, वाळुत रुतलेली होडी तिथे असते, उंचच उंच झाडे दिसतात मला. माझ्या संगीताच्या तालावर मंत्रमुग्ध झालेली वसुधा दिसते मला.
मला आवडते वसुधा. मी तासन तास किणार्यावर तीच्याशी बोलत बसतो. तीच्या उडणार्या बटा कीती सुंदर दिसतात, मला चंदेरी साडीत ती आवडते. त्या ढगाला मात्र ती हिरव्या साडीत आवडते. चंदेरी साडीत ती एकदम मला जलपरीच वाटते. ती मला संगीत वाजवण्यास सांगते, मग मी एका लयीत माझ्या लाटांनी सप्तसुर छेडतो.
वसुधा मेघमल्हार गाते मग. मेघ येतो मग हळुच तेथे. कदाचीत तो वाट पाहत असतो कधी ती बोलावते ते.
तो येताना चंद्राचा संदेश घेवून येतो माझ्यासाठी. मी ही हसतो मग त्याला मिठी मारुन.
आताशा तरीही का मला वाटते, कुणी जवळ नसावे. जगावं असं एकटे, शांत. कोणीच नसावे भोवती. सगळीकडं असावे धुकं धुकं, मनाशी मनाचेच चालावेत खेळ.
- समुद्र .
11 Jul 2020 - 3:15 pm | गणेशा
@ मोगरा,
मस्त लिहिले आहे. लिहीत रहा..
12 Jul 2020 - 2:38 pm | गणेशा
कॉलेज -३ (पुर्वार्ध)
------------------------
( नाव बदलले आहे)
अलिकडे लिखान पुन्हा कमी झाले. हरकत नाही. काम , मुलगी, फॅमिली महत्वाची.. माणुस एकदा वेगवेगळ्या भुमिका साकारायला लागला की त्यातील प्रायोरिटीज त्याला आपोआप कळतात आणि त्या प्रमाणे तो वागत राहतो. माझे तरी वेगळे असे काय ?
त्यात बाप ही माझी सर्वात आवडती भुमिका... इवल्या इवल्या चिमणीबरोबर खेळाण्यात वेळ अगदी मस्त जातो.
त्यात लिखान ही माझी तशी कधी प्रायोरीटी झालीच नाही.. कविता लिहायचो तेंव्हा ही नाही. कित्येक मित्रांनी पुस्तके काढली.. नंतर प्रोग्रॅम्स केले. असले आपल्याला कधी जास्त रुचले नाही.. १२-१३ वर्षांपुर्वी थोडेफार कसल्याशा प्रोग्रँम चा मी पार्ट होतो.. पण तसले कधी नंतर वाटले नाही.. असेच असते.
प्रायोरीटीच म्हणाल तर, माझी पहिली प्रायोरीटी बाप म्हणुन.. दूसरी निसर्गात मनसोक्त फिरणे.. या पलिकडे जास्त विचार केला नाही... पण मैत्री ही प्रायोरीटी नाही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच आहे.
हा तर काय सांगत होतो...
काल सहज जया बरोबर बोलत होतो, कॉलेजचे चहा चे आणि मित्रांचे असे माझेच लिहिलेले भाग, बोलताना तीला दिले चाट वर. ती म्हणाली तीच्या बद्दल काहीच का लिहिले नाही.. मग मला वाटले आपण लिहायला हवे होते तीच्याबद्दल.. कॉलेजच्या दिवसांचे सोनेरी दिवस तीच्या शिवाय पुर्ण झालेच नसते.. पण मी एक स्वैर मुक्त .. माझ्यातच गुरफटणारा..हळवा पण बेडर. लिहिताना मनाच्या असंख्य धाग्यांना सांधताना कुठे एखादा धागा उसवला तर ? तो एकही धागा उसवलेला मला नकोय आता. आयुष्याच्या या अश्या वळणावर माणसाला निस्सिम मैत्री हवी असते. भुतकाळात गोड वाईट काळ ज्यांच्या बरोबर घालावला त्यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत हवी असते. म्हणुन लिहिताना जुन्या जवळच्या मैत्रीणी बद्दल लिहिणे अवघड वाटले होते..
माझ्या आयुष्यात, माझ्या सर्व मैत्रीणींमध्ये मी अजुनही सर्वात जास्त रिस्पेक्ट करत असेल तर तो जयाचा... त्यामुळे तीच्या बद्दल लिहिताना पुन्हा एक अनामिक हुरहुर मनात दाटते आहे.. असो, आता १८-२० वर्ष झाली गोष्टीला.. आणि आता तरी येव्हडे मनावरची बंधणे झुगारुन लिहिता आले पाहिजे.. माणुस हा असाच असतो.. तो प्रमाणापेक्शा जास्त विचार करतो, खरे तर माणसाने नैसर्गिक राहिले पाहिजे.. मी तसा नैसर्गिकच आहे, पण कधी कधी असे होते.. त्यात वावगे ते काय ?
तर लिहितो आता..
क्रमशा:
12 Jul 2020 - 4:23 pm | Bhakti
.लिहिताना मनाच्या असंख्य धाग्यांना सांधताना कुठे एखादा धागा उसवला तर ? तो एकही धागा उसवलेला मला नकोय आता. ......खरय रे मलापण भुतकाळ आठवायच म्हणलं की असेच वाटत......म्हणून कविता जवळची वाटते...अनेक अर्थ घेऊन असते ती...
.गणेशा तु खुप हळवा आहेस...पण मनाने चांगला आहेस... नाही तुटणार माणसं .. लिहून छान रहा.
14 Jul 2020 - 8:25 pm | गणेशा
कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
काय लिहु.. कॉलेज संपले की अश्या Blank spaces उरतात आपल्याकडे.. कोणाला त्या Blank spaces मध्ये निखळ मैत्री आठवते.. कोणाला अभ्यास आठवतो.. अभ्यास आठवणारे नक्कीच Hopeless असतील.. काही जन तेंव्हा कॉलेजला निरस तोंडाने जात असतील आणि तसलेच तोंड घेवून माघारी येत असतील त्यांना आता या Blank spaces मध्ये काय वाटत असेल हा PHD करण्याचा विषय ठरु शकेल.
काय ? मला काय आठवते त्या Blank spaces मध्ये?
मला मैत्रीणी आठवतात... हसायला काय झाले त्यात ? होत्या आपल्याला छान छान मैत्रीणी..
कँटीन- कट्ट्यावर बसणारे मित्र होते.. त्या पेक्षा पण जास्त बेडर मैत्रीणी होत्या..
मैत्रीणीं बद्दल लिहु ? मी लिहिले की, ते त्यांना आवडणार नाही.. आणि नाही लिहिले तरी त्यांनाच आवडणार नाही..
असेच असते हो.. मुली म्हणजे कंन्फुजन.. तुम्ही १ म्हणाला की त्यांनी २ म्हणालेच पाहिजे.. असते असेच. त्या २ म्हणाल्या की तुम्ही २ च म्हणायचे.. ३ म्हणाला की संपले ..
आता तुम्ही म्हणाल Maroon Red color का नाव ठेवले ह्या लेखाचे.
तो कलर सर्व मुलांना घायाळ करण्यालाच जन्माला आलाय. त्यात आमचा काय दोष. च्यायला, एक गुलाबाचे फुल देताना, त्या गुलाबाला लाल होता आले नाही साधे..'समस्त लाल गुलाबांनी काटे टोचणारच' या संघटनेने याचा निषेध करायलाच हवा.
Maroon Red color म्हंटला की मला आठवतो, तो मावळणारा सूर्य... घोडनदी मध्ये तो मावळत असताना असाच Maroon Red होत असे. आपल्याला आवडतो हा रंग. कधी कधी तो गालावर पण कीती शोभुन दिसायचा .. नाही नाही मला तो तीच्या गालावर शोभुन दिसायचा असे म्हणायचे आहे. कोणाच्या गालावर तो रंग कोणी उमटवला असेल तर त्यांच्या इतके दुर्भाग्य कोणाचे नाही.
गणिताच्या उभ्या आडव्या फॉर्मुल्याने, कोणाचे काय कधी भले झाले माहीत नाही.. बर्याच जणांचे त्याने वाटोळे केले हे मात्र खरे. मला तर कधी कधी वाटायचे हा कंप्युटर कोणत्या मुर्खाला शोधायची हुक्की आली काय माहीत. चांगले चालु होते ना राव त्याच्या शिवाय. पण नाही. हे असले शोध हे समस्त कॉलेज जनांना बांधुन ठेवण्याचे वेगवेगळे प्रयोग असावेत असे मला वाटायचे.. कंप्युटरचा प्रयोग यशस्वी झाला इतकंच.
c & data structures मात्र आपल्याला लय आवडायचं.. आमच्या प्रॅक्टीकल ला एका कंप्युटर वर दोन जन प्रोग्रॅम करायचे.. माझ्या बरोबर माझी ढापणी मैत्रीण जया बसायची. तीला मग मी वहित लिहिलेले लॉजिक, टाईप करायला लावायचो. तीला टाईपिंग च्या क्लासला तीच्या वडिलांनी या साठीच लावले असेल .. असते दूरदृष्टी कोणाकडे .. आपण काय बोलणार ? थोडं मास्टर डिग्रीला पण पाठवले असते तर काय बिघडले असते त्यांनी, मला विचारायचे होते ना, मी सांगितले असते. म्हणजे अजुन तीन वर्ष पिडलं असतं जरा. नंतर मास्टर्स ला मला टायपिस्ट मिळाली नसल्याने जावा लँग्वेज मला नीट आली नाही.. आता हे कोण भरुन देणार मग ?
आपला आवाज ऐकला असता तर एस.पी बालासुब्रमण्यम ने जीव दिला असता, तरी आपण सार्या वर्गात गाणे म्हणालो होतो.. आपल्याला आवडायचे असले कायपण.. कसेपण..एस.पी माझा आवडीचा गायक... आपला आवाज मात्र धडकन च्या सुनिल शेट्टीला सुट व्हायचा पार... :-)
भांडण , आणि मी ? कभी नही... उलट सगळेच माझ्याशी भांडायचे, म्हणुन नाइलाजाने मला बचाव करायला थोडे बोलावे लागायचे. :-))
एक मैत्रीण - सोनाली, मात्र माझ्याशी कधी भांडली नाही, तीला तन्वीर स्टॅच्यु म्हणायचा. मग कशी भांडेल ती ? ती होतीच स्टॅच्यु सारखी.. एक्स्प्रेशन लेस :-)).
सरिता आणि मी रोज भांडायचो ... आणि रोज भांडता यावे म्हणुन रोज पुन्हा बोलायचो.. एकदा बेन ने विचारले, तुम्ही येव्हडे भांडता तर मग बोलता कशासाठी.. बेन ला काही म्हणजे काही कळत नव्हते बाबा.
बेन ला जेवताना मी, आधी तू जेव बाई म्हणत असे.. तीने भात खाताना, त्यात अखंड बुडालेली बोटे पाहुन मला कसे तरी व्हायचे. कोणाकोणाचे हदय कोणात तरी अखंड बुडायचे, आणि तीची बोटे भातात अखंड बुडायची.. हे भगवान.
मुलींच्या प्रॉपर्टी कडे मी बघत असे कायम. बरेच जन बघतात, त्यात नवल ते काय ?
एक शत्रु पक्षातील सारिका , रस्त्याने जाताना नेहमी मुलांकडे बघायची, आणि मग बोलायची.. ये तो बघ माझ्याकडे कसा बघतोय.. तीला याचे उत्तर सैराट मधल्या परश्या ला द्यायला लागले पार - तु कशाला बघते म्हणुन. नागराज जर तेंव्हा आमच्या कॉलेज जवळ फिरत असता तर आर्ची म्हणुन हिलाच घेतली असती त्याने. बघती म्हणुन..
हीनी तर एकदा कहर केला होता, मी कसा दिसतो, तु कशी , तु त्याच्या बरोबर कश्याला असते असे आमच्या टाएपिस्ट कम फ्रेंड ला सांगितले होते. असतात असल्या पोरी कॉलेजला..
नाटकी मुली पण असतात काही, आपल्या सदैवकाळ मैत्रीणी त्या होउ शकत नाहीत, पण झाली होती एक जयामुळे -अनु. एकदा वर्गात ती नाटकी बोलत असताना, मी तीला म्हणालो होतो तु एव्हडे नाटकी का बोलते गं, तुला साधे सरळ बोलायला काय होते ? नंतर चे किस्से नंतर.
नाही नाही गैरसमज करु नका आपल्याला मित्र पण खुप होते आणि आहेत. पण मित्रांना या वरच्या Blank spaces मध्ये नाही टाकता येत. त्यांनी आपली सारी space व्यापलेली असते... अजुनही... कायमची(लिहिल नंतर).
कॉलेज मैत्रीणींचा जन्म हा नेहमी दुसर्याच्या गळ्यात माळ टाकून त्याच्या घरची धुणी भांडी करण्यासाठीच झालेला असतो. अरे एकीने तरी थांबायचे ना, मी लग्नानंतर वॉशिंग मशीन घेतली असती.. पण ह्यांना काय घाई झालेली असते धुणं धुण्याची काय माहीत.
***
त्या क्षणांच्या असंख्य रांगोळींचे ठिपके मनात उमटतात बर्याचदा.. कधी डोळ्यात पण...
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मात्र तो Maroon Red color चा सूर्य कायमचा मावळत होता, पुन्हा न येण्यासाठी.. कॉलेजच्या त्या असंख्य क्षणांच्या रांगोळी मनात सरकन तरळून गेल्या.. डोळे पाण्याने डबडबले, आणि तो Maroon Red color हळु हळु डोळ्यात विरघळत गेला..कायमचा.
तो मावळतीला जाताना, तीच्या डायरीत असलेल्या कुसुमाग्रज यांची कविता जणू बोलत होता असा भास झाला...
"उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे, मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे,
तक्रार नाही, खंत नाही पुर्तीसाठी प्रवास असतो, केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो "
तो Maroon Red color चा सूर्य मिटताना, टुकार ढग मध्येच त्याचा रंग स्वता घेवू पाहत होता.. हलकासा. त्याला वाटले असेल, क्षितिजाच्या पलिकडे असणार्या सूर्याला दिसतील हे रंग , त्याच्या पापण्यांच्या कडा ही मग सोनेरी झाल्या होत्या..
पण
पण थोडावेळच.. मग रात्र झाली. कॉलेजच्या असंख्य क्षणांचे टिमटिमणारे असंख्य तारे अजुनही ती रात्र उचलुन धरते..
रात्र हीच खरी सोबती.. आपल्या सावल्याही जेंव्हा साथ सोडतात तेंव्हा ही रात्रच असते आपल्या सोबत.
***
आता अलिकडे इतक्या वर्षांनी मात्र, मला पुन्हा वाटते, सार्या मैत्रीणींचे धुणं धुवुन कडक झालेले हात पुन्हा हातात घ्यावेत आणि फिरावे मनसोक्त.
मैत्रीच्या त्या निखळ नात्याला पुन्हा फुंकर घालावी.. त्या सोनेरी कडा ल्यालेल्या ढगाची पालखी बनवुन पुन्हा फिरावे स्वैर..मुक्त..स्वछंद..
वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red color ने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे ? अनेक संध्याकाळ विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे Maroon red मैत्रीचे color पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे ?
- गणेशा.
18 Jul 2020 - 6:26 pm | चांदणे संदीप
जबरदस्त लिहिले भाऊ. नजर ना लग जाये.
सं - दी - प
18 Jul 2020 - 3:47 pm | palambar
"मरून रेड कलर" एक सिनेमा काढा यावर . मस्त लिहिले आहे.
18 Jul 2020 - 6:46 pm | श्वेता२४
काय लिहिलंय एकेक! कसं सुचतं सगळ्यांनाच कुणास ठाऊक ? पण अप्रतिम लिहिले आहे. मिपावरच्या लेखनाला या मोत्याच्या माळेने सुशोभित केले एवढं नक्की!
19 Jul 2020 - 10:08 am | गणेशा
श्वेता ताई, संदिप आणि palambar धन्यवाद मनापासून..
सिनेमा :-)) :-))
तसे म्हणाला म्हणुन एक मनातले..
Maroon color हा कॉलेजचा भाग मी मनापासुन लिहिला.. पण खुप हळवा झाला तो.. maroon red ड्रेस घालणारी साठी होता तो.. :-)), नाही देऊ शकलो येथे..
आणि तो येथे दिला नाही, तो आतापर्यंतचा सर्वात भारी भाग होता..
हा उत्तरार्ध त्या नंतर लिहिला येथे दिलेला :-))
---
24 Jul 2020 - 6:40 pm | गणेशा
@ मन्या.. तुझी नजर कविता वाचली आणि हे सुचले..
___________________
'नजर' कैद
पाऊस पडला की चिखल व्हायचा..
लोखंडी सळई घेऊन त्यात ती रुतवत चालायचो आम्ही..
कागदी होड्यांचे तर मनाच्या कप्प्यात पार टायटॅनिक झालंय..
पाऊस असाच.. नंतर तो तिच्या सहित यायचा..
तिच्या ओठांवरील पाऊस पिऊन टाकायचो मी,
गुलाब पाकळ्यांचे अर्कच जणू..
घट्ट कपड्यात मग तो हि ओशाळल्या सारखा व्हायचा..
आता मनाच्या कप्प्याचा शोध कोणीच घेत नाही..
त्याकडे फिरकायला कोणालाच सवड नाही..
'नजर' लागली सगळ्याला.. वेळेला ही..
पाऊस मात्र बरसत असतो अजूनही.. सताड..
तिला दिलेल्या असंख्य गुलाब पाकळी चुंबनांचे
तो हिशोब मागत येतो.. वेड्या सारखा..
मी ते देऊच शकत नाही.. कसे देऊ?
पाऊसासारखे आणि तिच्या सारखे पण
असे हिशोबाने जगणे मला कधीच जमले नाही..
म्हणून आताशा आभाळ दाटून आले कि
माझी 'नजर'कैद पुन्हा सुरु होते...
-- शब्दमेघ
26 Jul 2020 - 3:45 pm | Bhakti
काही सुचलाय पहा
..
सरींना कोसळण्याची
फारच घाई..
अडकवून मेघांत राहणं
तिला जमलंच नाही..
हिरवाई लेवून
पाहत राहिली मेघांकडे
त्याचे हात झेपावलेले
असतील का ?
तिला कवेत घेण्यासाठी...
हजार प्रश्न
सरीच्या नजरेच्या कैदी भोवती..
-सरीवर सरी
26 Jul 2020 - 8:45 pm | गणेशा
सरीवर सर येत राहते कायम..
अन येताना मात्र नेहमी हजार प्रश्न घेऊन येते..
पण मी उत्तर देत नाही.. उत्तर देण्यात अर्थच नसतो..
पण आज सांगतो एक ऐक..
.
.
.
जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात
तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही..
तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर
आता बाभळी शिवाय काहीच येत नाही..
26 Jul 2020 - 9:48 pm | Bhakti
वाह वाह..छान आहे उत्तर..
26 Jul 2020 - 10:09 pm | Bhakti
सर अशीच कोसळत राहिली
तिच्या नैसर्गिक स्वभावानं
रूजून फुलांच बहार सांडले
गंध दरवळ दूरवर पसरले
.
.
.
तिला उत्तर माहीत होते मेघांच
तरी जाणिवपूर्वक कोसळली
....हं..पण शेवटची..
26 Jul 2020 - 10:10 pm | Bhakti
सर अशीच कोसळत राहिली
तिच्या नैसर्गिक स्वभावानं
रूजून फुलांच बहार सांडले
गंध दरवळ दूरवर पसरले
.
.
.
तिला उत्तर माहीत होते मेघांच
तरी जाणिवपूर्वक कोसळली
....हं..पण शेवटची..
24 Jul 2020 - 7:55 pm | श्वेता२४
तुमच्या लिखाणाचे कौतुक करावे इतके शब्दच नाहीत माझ्याकडे गणेशजी!
26 Jul 2020 - 7:04 pm | गणेशा
आराध्या- १
आराध्या झाली आणि माझे जग पुर्ण बदलुन गेले.. तीचे इवलेसे हात हातात घेतल्यावर किती मस्त वाटायचे, ती माझे बोट अलगद पकडायची.. ते फिलिंग खरेच ग्रेट.. या सारखा आनंद जगात दूसरा नाही. नंतर घोडा घोडा खेळताना पण मग किती मज्जा यायची
शब्दांचे असंख्य डबे जरी मी जोडत असलो , तरी वळणदार अक्षरांच्या.. काना, मात्रा, वेलांटी, हुकार यांच्या वर नजर टाकताच सुखवणार्या भावनांच्या अश्या असंख्य ओळी म्हणजेच मुलगी.. तीच्या शिवाय शब्दांना स्वर नाही..सितारीचा झंकार नाही.. तबल्याचा ताल नाही.. तिच्याशिवाय जगण्यात निर्मळता नाही..आरसपाणी स्वप्ने नाहीत.. मायेने जवळ येऊन गळ्याभोवती फुलांचे हात नाहीत..
***
आराध्या ११ महिन्यांची असताना तीला आम्ही बेबी कॅरीअर कांगारु बॅग मध्ये घेवून देवगिरी किल्ल्यावर गेलो होतो, वेरुळ-अजिंठा तीची पहिली ट्रीप. देवगिरी माझ्या लिस्ट मध्ये खुप आधी पासुन होता, पण पुण्या पासुन लांब असल्याने बर्याचदा तिकडे जाण्याचा प्लॅन रखडला जायचा, आराध्याचा मात्र तीने पाहिलेला पहिला किल्ला देवगिरी :-)).. नंतर तीला घेऊन आम्ही लोहगड,सिंहगड आणि माझा आवडीचा रायगड केला.
३ वर्षांची असताना तीने माझ्या हाताला धरुन चालत पावसात तिकोणा ट्रेक केला.. तसा तीच्या मानाने अवघड किल्ला. पण अर्जुन आणि मल्हार हे मित्र असल्यावर तीला त्याचे काही वाटले नाही... (योगेश आणि चेतन या माझ्या बालपणीच्या मित्रांची ही मुले, याचे फोटो जोडतो आहे खाली ...) नंतर ५ व्या वर्षाच्या बर्थडे पासुन आम्ही त्या दिवशी ट्रेकिंग ला किंवा फिरायला जायचे ठरवले, पाचव्या वर्षी आम्ही जंगलात अंधारबनात गेलो होतो.
आराध्या आपली नेक्स्ट ट्रेक पार्टनर..
***
मला पाण्याची प्रचंड आवड.. पण मला स्विमिंग येत नव्हते, पावसात गडांवर फिरताना तर पाऊस अंगावर झेलताना काय मस्त वाटते.. आराध्याला पण पाऊस आवडतो.. लवासा ला गेल्यावर आम्ही कितीवेळ पावसात भिजतो... मागे वल्ली मित्रा बरोबर कोरीगड ला गेल्यावर त्या पायर्यांवर तर मी अक्षरसा लोळलेलो त्याला अजुन आठवते. पाण्या बद्दल आपल्याला खुप प्रेम..खुप आवड..खुप ओढ..
मला नेहमी वाटायचे आराध्याला चांगली स्विंमिंग आली पाहिजे, मी शिकवेन तीला स्विंमिंग असे वाटायचे आणि मग अरे आपल्याला स्विमिंग येत नाही ही खंत वाटायची.
मग आता माझ्या या तीशी मध्ये मी स्विंमिंग चा प्रोफेशनल क्लास लावला. सरांनी छान शिकवले, मी ऑफिस च्या आधी आणि ऑफिस च्या नंतर अश्या दोन्ही वेळेस स्विंमिंगला जावू लागलो, आणि आश्चर्य मी फक्त तीन दिवसात स्विमिंग शिकलो..
आणी मग मी तासन तास स्विंमिंग करायला लागलो, सर म्हणायचे आता काय डायरेक्ट ऑलंपिक ला जायचे आहे काय इतके स्विंमिंग करताय ते..
आराध्या तेंव्हा २ वर्षाची होती.. मी एकदिवस आवडीने तिला स्विंमिंग ला न्हेले माझ्याबरोबर, तिच्या पोटाला हात लावून तीला मी पाण्यावर फिरवलेले तीला खुप आवडले..
नंतर ती ३ वर्षाची झाल्यावर तीला क्लास लावला, तेंव्हा मात्र ती नंतर पाण्यात उतरायला घाबरत होती... मग मात्र मी स्वता पाण्यात उतरुन तीला श्वास कसा घ्यायचा.. कसे पाय मारायचे हे शिकवु लागलो, तीच्या मॅडम पण तीला शिकवत असत. सिमिंगला जाताना तो आठवडा ती रडायची, आली नाहीतर हॉस्टेल ला टाकणार तुला असे म्हणुन मग मी तीला न्हेत असत. तीला खरेच वाटायचे की स्विमिंग नाही आले की हॉस्टेल ला जावे लागेल. आराध्याला १० दिवसात स्विंमिंग यायला लागले..
मला खुप खुप आनंद झाला.. आणि तीला .. ती पाण्यातुन बाहेरच येत नव्हती.. तीच्या मॅडमने तीला मग डोल्फीन, बटरफ्लाय असले स्ट्रोक पण शिकवले.. मी ब्रेथ स्ट्रोक शिकवला होता...
मी माझ्या आवडी, माझे स्वप्न तीच्यावर लादत होतो की पुढे आनंद देणार्या गोष्टी तीला शिकवत होतो हे येणारा काळ ठरवेन..
पांढर्या शुभ्र कागदावरती.. माझे शब्द फक्त तुझ्या साठी..
या शब्दांचेच मग होईल गाणे.. तुझे माझे ..आपलेच...
मग कागदाचेच त्या होईल एक विमान.. उडणारे.. मुक्त..स्वछंद...
भिरभिरत्या वार्यावरती, शब्द माझे उडतील सैरावैरा..
स्पंदने ही माझी घेतील सूर मग, तुझ्या घुंगुर - पैंजणांचे
त्या सूरांबरोबर तु गाशील का मग माझे शब्द .. माझे गाणे..
जे असेल फक्त, तुझे माझे.. आपलेच..
तेंव्हा आभाळभरुन सुद्धा उरेल का गं मागे, माझ्या आठवणींचे हे जग..
पावसाच्या पाण्यात दिसेल का गं मग, माझ्या अस्तित्वाचे ढग..
----------- गणेशा
आराध्या - अर्जुन
.
मल्हार- आराध्या - अर्जुन
.
अंधारबन
.
मला स्विमिंग आल्यावर
.
आराध्याला स्विंमिंग आल्यावर...
---------------------------
26 Jul 2020 - 7:11 pm | गणेशा
वरच्या ह्या भागाचे शिर्षक 'आराध्या -२ 'आहे .
उपडेट करता येत नाहिये..
26 Jul 2020 - 9:47 pm | Bhakti
वाह ..बाप-लेकीची जोडी भन्नाट आहे.लेकीला पुढे खरच चौकस नवनवीन असंच छान छान शिकवित रहा ..आणि पालकाची भूमिका साकारताना आपणही नवीन शिकत राहतो... आराध्याला शुभेच्छा..
26 Jul 2020 - 11:16 pm | गणेशा
जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात
तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही..
तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर
आता बाभळी शिवाय काहीच येत नाही..
- शब्दमेघ
सरीला मेघ कधीच सापडत नाही
नजरकैद त्याची मात्र कधीच सुटत नाही..
बांधावरच्या बाभळीला ही मग बहर येतो..
आठवणींना मात्र तिच्या गावचा पत्ताच नसतो..
-- शब्दमेघ
(एक विनंती.. रिप्लाय देताना छान.. सुदंर अशी एकोळी रिप्लाय नका देऊ.. त्याने लिंक तुटते.. उलट असेच रिप्लाय मस्त वाटतात..
आणि रिप्लाय ला रिप्लाय लिहिताना खुप छोटे छोटे आकार होतात रिप्लाय चे.. म्हणुन सरळ main प्रतिसाद मध्ये असा रिप्लाय द्या सर्वात शेवटी.. जसा हा रिप्लाय दिलाय तसा
मध्ये दुसरा रिप्लाय आल्याने मागचे थोडे प्रतिसाद येथेच डकवलेत
)