मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
प्रतिक्रिया
9 May 2020 - 5:53 pm | गणेशा
खरे तर लिखान बंदच आहे, आता कवितेच्या स्पर्धेला सुरुवात झाली.. आणि आमचा मित्र वल्ली याने लिहिणार का विचारले.. कविता आता लिहिताच येत नाहीत असेच वाटते.. पण लिहु म्हंटले..
पहिली कविता चांगली झाली.. पण कुठे तरी ती माझ्या अगोदरच्याच कविते प्रमाणे झाली.. नाविन्य नव्हते... मग दूसरी लिहिली.. आणि मला मी पुन्हा कविता लिहु शकतो ,अगदी वेगळी .. पहिल्या पेक्शा वेगळी असे वाटले.. आनंद वाटाला..
तेव्हड्यात चला लय लागली आहे तर, काही तरी मुली बद्दल लिहु म्हंटले, एक तर ती गावाला आहे, लॉकडाऊन मुळे मुद्दाम तिकडे पाठवलेली..
पण झाले तसेच पुन्हा लिहायला घेतले आणी शब्द सुचेनात.. बोबडे बोबडे बोल.. पासुन इवली इवली बोटे झाली पण मला काही त्यात अर्थ वाटेना..
बाबा, मुळातच हळवा असतो, आणि लेक झाल्यापासुन , तीच्या लग्ना नंतर आपले कसे होईल, असे त्याला वाटत असते..
आणि सहज लिहिताना ही कविता सुचली ..
जशी सुचली तशी लिहिली.. शब्दबदल बघु नंतर
सनईचे.. सूर वाजले.. दारी
-------------------------------------------------------
मुलगी :
गालावर.. लाजची गं.. लाली
हळदीची.. काया माझी.. ओली
सुखाची गं..सर ही.. आली
हुरहुर.. मनी माझ्या न्हाली ||१||
वीज झडे.. आतुन गं..कोवळी
कळी कळी.. श्वासांची ग बोली
गालावर.. लाजची गं.. लाली
हळदीची.. काया माझी.. ओली ||२||
आई:
सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या.. सरी ||
माहेराची.. माया ही.. सारी || सासराला.. मिळेल गं.. भारी ||१||
कुंकवाची..चंद्रभागा.. दारी|| सासर तुझे..आहे गं.. पंढरी ||
नटली ग.. माझी लेक.. नवरी|| आस ही.. प्रेमाची गं.. सारी ||२||
सनईचे.. सूर वाजले.. दारी || मंडपात.. आनंदाच्या.. सरी ||
बाबा :
राजा-राणी दिसता छान..
त्याला सुखाची झालर..
दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..
--- शब्दमेघ
12 May 2020 - 12:17 am | मोगरा
दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..
इतके खरे कसे लिहू शकता आपण?
10 May 2020 - 12:03 am | मन्या ऽ
प्रिय बाबांस,
बाबा आज परत एकदा लहान व्हावस वाटतंय मला.. तुम्ही गर्दीत पकडलेला घट्ट हात. आपण खारुताईच्या बागेत गेल्यावर तुम्ही दिलेला झोका देताना तुम्ही "मने, ती बघ घार" अस बोलायचात. मी अजुन जोरात म्हणत खळखळुन हसायचे.. ते सारं काही अगदी कालच घडल्यासारख स्पष्ट आठवतंय मला.
पण बाबा मी 'मोठी' झाल्यापासून आपल आधीसारख बोलणं च होत नाही. मला खुप गप्पा मारायच्या आहेत तुमच्यासोबत. एकदातरी जमेल का हो आपल्याला. आपल्यातली दरी मिटवायला? परत लहान होऊन मजामस्ती करायला.. एकदातरी?
तुमची मांजर..
10 May 2020 - 12:51 am | गणेशा
बाबांचा विषय आलाय म्हणून बोलतो थोडे मनातले आधी..
1.
उरुळी कांचन ला खेडेगावात वाढलो मी.. तेंव्हा आम्ही वडलांच्या पाया पडत पण त्यांना मिठी मारणे हे म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हते कधी कि असे वडलांना मिठी मारतात ते.
हळू हळू मी मोठा झालो, वडील म्हातारे... पण काय माहीत का ते रिटायर झाल्या पासून मला त्यांना एकदा तरी मिठी मारावी वाटती..
पण संस्कृतीच्या या नियमांनी.. कि माझ्या वर बिंबवलेल्या संस्कारांनी मला ते अजून हि करता येत नाही..
पाहताना हि खुप सोप्पी गोष्ट वाटते.. पण नाही जमत..
हे शल्य घेऊन मी अजूनही जगतोय.. बारामती ला गेलो त्यांना भेटायला तरी नाही जमत... फोनवर तर मी आई बरोबरच जास्त बोलतो... त्यांच्या बरोबर मी जास्त बोलत हि नाही..
आदर होताच आणि आहे.. पण असे मनातले भाव हि दाखवता येत नाही त्याचे वाईट वाटते..
असो.. आराध्या ला, माझ्या मुलीला मात्र मी, मैत्रीण म्हणूनच वाढवणार हे नक्की...
----
2.
बाकी एक बाप म्हणून मी नक्कीच सांगतो.. बापाला त्याच्या मुली एव्हडे जगात कोणीच प्रिय नसते..लहान पणी तायडीचे खुप लाड व्हायचे.. सगळे लाड तिचेच... मग माझे भांडण व्हायचे..
आई म्हणायची तू बाप झाल्यावर कळेल तुला.. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून लाड असतात..
मी म्हणायचो लग्नाला किती वेळ आहे, आता पासून कशाला असे लाड.. मग माझे म्हणने कधी ऐकणार?
पण एक बाप झाल्यावर कळाले मला..ते काय सांगत होते ते..
10 May 2020 - 11:13 am | जव्हेरगंज
वाह! हे आवडले!! स्फुट लिखाणात तुम्ही माहीर आहात!!
10 May 2020 - 9:30 am | मन्या ऽ
गेल्यावर्षी १३ ऑक्टोबर ला ताईला मुलगी झाली. त्यावेळी हॉस्पिटलमधे समोरच्या बेडवर एक दादा काळजीत होता. विचारलं तर समजल तो एकटाच या सगळ्या प्रोसेस कंप्लिट करतोय मदतीला-सोबत जवळच अस कोणीच नाही.. बाळ हातात येईपर्यतचा त्याचा प्रवास! माझ्या नजरेतुन...
बापजन्म!
काल पाहिला मी एक
बाप जन्मताना
O.T. बाहेर
अस्वस्थ घुटमळताना
होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी
तिळ तिळ तुटताना
कोण म्हणतं
कि मातृत्वाच्या वेदना
फक्त आईलाच होतात
बापालाही होतच
असतात.. पण त्या
त्यालाच व्यक्त
करायच्या नसतात
लागताच पिलाच्या
येण्याची ती चाहुल
बापाचे डोळेसुद्धा
अश्रुमय होतात
पण जगाला खंबीर
आहे दाखविण्यासाठी
पापणीतच दडतात
आई-पिलु सुखरुप
आहेत; आता
एवढंच ऐकायला
त्याचे कान तरसतात
आणि डोळ्यांना वेध मात्र
त्या जिवाचे लागतात
पिलाला कुशीत घेताना
त्यालाही त्यांचा
नऊ मासांचा
तो प्रवास आठवतो
कोण रे होत लबाड
अस खोट खोट दटावुन
भाळावर अलगद
ओठ टेकवतौ
नंतर मी खंबीर आहे.
असं जणु
स्वतःलाच बजावत
"फोन आलाय"
बहाण्यान रुमबाहेर
जातो ; अन्
पापणीतला तो एक
उनाड अश्रु
त्याच्या नकळत
रुमालाने टिपतो!
10 May 2020 - 9:49 am | गणेशा
( नावे बदलली आहेत )
-------------------------------------------------------
मेसेंजरवर मी सहसा नसतो... पण काल सहज गेलो त्यावर ...
आणी काय आश्चर्य, सोनाली ..माझी कॉलेजची मैत्रीण ऑनलाईन होती. ( एफ.बी. फ्रेंड डायरेक्ट दिसतात तेथे)
२००२ ला बिसीएस संपले, २००६ ला मी कंपणीत होतो तेंव्हा सोनालीशी एकदा भेट झाली होती.. बस्स.
त्या नंतर आजच बोलत होतो, ९ मे २०२० ला.
म्हणत होती ती आपला तिघांचा छान गृप होता.. काही आठवणी...
आणि बोलता बोलता, मी सांगितले , फेब्रुवारी मध्ये मी जयाच्या कॉलेजला गेस्ट लेक्चर द्यायला गेलो होतो.
भेटलो आम्ही.. जयाने च invite केले होते.
त्या नंतर तीचे हे वाक्य म्हणजे ...काय बोलु ?
" मला तर आता वाटते, तुम्ही दोघांनी तेंव्हा लग्न केले असते तर कीती छान झाले असते "
या अश्या अचानक वाक्यावर मी हा हा हा केले उगाच..
नंतर लिहिले , चालायचेच, अजुन ही I respect her... तुझा सुद्धा करतोच.. खरेच आपला गृप छान होता.
पण रात्री झोपताना मात्र डोळे ओलावले...
--------------------------------------------------------------------------------------------
२००२ ला कॉलेज संपले , आणि नंतर तीचे लग्न झाले त्या नंतर मी २०१५-१६ पर्यंत तीचे नाव कधीच कोठे शोधले नाही.. की तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही.. कदाचीत यालाच प्रेम म्हणातात..
२०१५-१६ ला मित्राने मला facebook account काढुन दिले, ऑर्कुट ला माझे खुप मित्र होते, शब्दमेघ या नावाने लिहित असल्याने माझ्या खर्या नावाने बरेच जन ओळखत ही नव्हते.. कायम भेटणार्या लोकांना माहित होते.. पण ऑर्कुट संपले आणि मी सोशल साईट वरुन लांब गेलो होतो..
पण मित्राने facebook account काढले आणि मी जया ला शोधले... २०१६ ला आम्ही फोन वर बोललो.
त्या नंतर या चार वर्षात दोन तीन महिन्या ने आम्ही एखादवेळेस बोलत असु..
आणि फेब. मध्ये कॉलेज ला गेस्ट लेक्चर ला गेलो मी त्यांच्या कॉलेजला..
त्या नंतर पण बोललो आम्ही.. दोघांचे ही म्हणणे होते, आपण आहे तसेच आहोत.. १८ वर्ष झाले तरी आपण इतके वर्ष भेटलो नाही.. १४ वर्षे बोललो नाही असे वाटतच नाही. ती बाहेर सोडवायला आली. उन्हात आम्ही थोड्या वेळ बोललो ...
पुन्हा भेटु म्हणुन निघालो तेथुन.. छान वाटाले बस.
जया अजुनही तशीच आहे, शालिन.. तीचे मन अजुनही तसेच आहे.. एखादी गोष्ट मिळाली नाही तरी तिच्याकडे मनमुराद हसण्याची कला होती, ती अजुनही जानवली..
मी मात्र उतावळा, हळवा.. आणि तीच्या भाषेत टुकार पण होतो..
पण आता ती म्हणाली तु तेंव्हा ही टुकार नव्हता.. आता ही टुकार नाही..
यातच मला आनंद आहे...
खरेच हे फुलपाखराचे रंग उडुन गेले आहेत आता.. पण आठवणींचे काय .. त्या कायम राहणारच....
10 May 2020 - 11:16 am | जव्हेरगंज
काय कातिल लिहाताय राव!! कलेजा तुट गया!!
12 May 2020 - 12:19 am | मोगरा
जव्हेरगंज म्हणतात तसेच, कातिल.
10 May 2020 - 10:11 am | चांदणे संदीप
आज रविवार... उशीरा उठायचं असं ठरवूनच रात्री झोपलेलो. पण नेहमीप्रमाणे सकाळीच आई आणि बायको असा दोन्हीकडून गोळीबार सुरू झाल्यावर पर्याय नव्हता. अजून सूर्यही उगवलेला नव्हता. बाल्कनीतून बाहेरचा परिसर शांत आणि आल्हाददायक वाटत होता. (आजकाल बाल्कनीतच झोपतोय मी) त्या क्षणी मनात विचार आला की मी तर राजा आहे, माझे घर हे माझे साम्राज्य आहे. आणि ही आजूबाजूची राज्ये. माझ्या साम्राज्यातून मी कुठेही बघू शकतो. कितीही वेळ. आणि माझ्या साम्राज्यात हवा तसा फिरू शकतो. आणि त्या वेळेला चक्क मायमराठीने पाठ फिरवून इंग्रजी भगिनीला माझ्याकडे धाडले आणि मग इंग्रजीतून ह्या ओळी स्फुरल्या:
I am the king, though, not wearing a crown
ready to take another quiet day of lockdown
birds are chirping and sun is rising as usual
me enjoying, sitting in balcony, being casual
forgotten all the pretty leisures of my life
forgotten drinks, drinking tea, brought by wife
time is passing, though, clocks are shutty
fading the glow and charm from the beauty
this phase shall pass, the mind always says
for the unknown future, present always pays
सं - दी - प
10 May 2020 - 11:59 am | मोदक
सुंदर...
10 May 2020 - 2:03 pm | गणेशा
@ संदीप
तुमची कविता आवडली. इंग्रजी ची पण प्रतिभा तुमच्याकडे आहे हे पाहुन छान वाटले..
-------------------------------------
मी माझा राजा, घर माझे साम्राज्य ही कल्पनाच मस्त झाली...
आणि मग काय माहीत माझ्या विचारांत असे असंख्य राजे, राण्या पटकण येवून गेले..
अगदीच हेच काय.. 'चौकट राजा' हा सिनेमा आणि त्यातील एक झोका.. चुके काळजाचा ठोका.. हे गाणे सुद्धा आठवले..
ही ओळ लिहिताना मोबाईल वर गाना.कॉम वर लगेच हे गाणे लावले ही...
त्याच वेळेस मला जंगलाचा राजा आठवला, मन आपले कसे ही ..कुठे ही.. कसे धावत असते नाही ?
बर, जंगलाचा राज्याला आता काय वाटत असेल हे मी माझ्या मनातच अधोरेखित केले..
तो म्हणत असेल " माझ्या साम्राज्याला तु खालसा केले माणसा.. गगन भेदी इमारती बांधुन तु तुझे साम्राज्य वाढवले.. पण तु त्यात तरी आनंदी रहा.. येथे शिल्लक राहिलेल्या जंगलात मी समाधानी आहे.. तु आनंदी आहेस का ? की त्या उंच इमारतीप्रमाणे तुझा आनंद ही खोटा आहे ? "
10 May 2020 - 2:42 pm | गणेशा
@ मन्या
(माझा फुलपाखराचे रंग प्रतिसाद लिही पर्यंत तुमचा हा प्रतिसाद आला आणि मी तो खुप नंतर पाहिला)
बापजन्म कविता वाचली, अन मन माझे गेले २० जानेवारी २०१४ ला.
------------
१९ जानेवारी ला चतुर्थी होती , माझा जन्म ही चतुर्थीचाच म्हणुन माझे नाव आई ने 'गणेश' ठेवले.
नंतर कधी तरी वडिलांनी सांगितले की, ते माझे नाव दत्तात्रय ठेवणार होते, नव्हे तेच ठेवले होते .. पण आई ने बदलले. दत्तात्रय चे कारण काय तर आईने मी पोटात असताना, ग्रहण काळात नवनाथ ग्रंथ वाचला होता..
हे असे झाले असते तर मिपा वर 'माझा गणेशा झाला' ह्या वाक्या ऐवजी 'माझा दत्तु झाला' ही म्हण प्रचलित झाली असती...
बर, म्हणजे काही केल्या तरी कोणात्या तरी देवाचा आमच्यात नाही पण निदान आमच्या नावात प्रवेश हा ठरलेलाच होता, ( काय सांगायला जातोय आणि मी काय सांगतोय .. सांगायचे आहे बापजन्म बद्दल आणि मी माझ्याच जन्माला सांगायला लागलो, हे असेच होते मनात येइल ते लिहिताना )
-----------------------------
हा तर , १९ जानेवारी ला चतुर्थी होती, रविवार असल्याने मी मुंबई वरुन माझ्या गाडीने नाव्हरा(आलेगाव), तालुका शिरुर्,पुणे. गाठले..
सासुबाईंनी माझ्या सर्वात आवडीच्या असलेल्या पुरणपोळ्या केल्या होत्या.. पुरणपोळी आपला विक पॉईंट , आपण खुप खाल्ल्या.. रात्री उशिरा बायकोला दवाखाण्यात अॅडमिट केले...
मला मुलगी हवी होती.. तीला मुलगा..
१-२ महिण्यांपुर्वी, तीच्या गावातल्या कोणात्या तरी आज्जीबाई ने पोटावर हात फिरवून सांगितले होते , मुलगा आहे. तीचा अनुभव आहे बोलली.
आमची ही, नंतर लाडेलाडे मला तेच गिरवत असे कायम, पण आपले ठाम होते.. आपल्याला मुलगीच होणार..
आमच्यात ठरले मुलगी झाली की तिचे नाव, तिचे असंख्य निर्णय मी घेणार.. मुलगा झालाच तर बघु, तु ठेव तुला आवडेल ते नाव, वगैरे.
आणि २० जानेवारी २०१४ ला कन्या रत्न झाले.. माझ्या आनंदाला सिमा नव्हती.. पुर्ण हॉस्पिटलला पेढे दिले..
( मला काजू कतली खुप आवडती, पण तिथे नव्हती. नंतर अक्सेंचर च्या पुर्ण बे ला काजु कतली दिली मुंबईला )
बाळाला बाजुच्या पलंगावर ठेवले होते.. मी पहिलाच आत जाणारा, तीचे इवले इवले हात, इवले इवले बोटे हातात घेतली.. तिने ही माझे बोट धरण्याचा प्रयत्न केला जणु.. हळुच तीचा हात वर करुन आमच्या हिला दाखवले मी बाळ)
मोबाईलच्या या जगात पण, मी बाळाचा फोटो काढण्याचे विसरलो होतो..बाप हा बाप असतो.. माझ्याकडे नाहिये तिच्या पहिल्या दिवसांचे फोटो , सातव्या दिवसाचे येथे देवू शकतो...
नाव आता मी ठेवणार होतो, असंख्य नावे मी तयार ठेवली होतीच.. पण नेमके मला कुठले नाव ठेवावे आणि कुठले नाही हे कळेना.. बायकोची पण तीच अवस्था...
मला तीचे नाव माझ्या नावाशी साधर्म्य असणारेच हवे होते.. नव्हे ते माझ्या नावानेच पुर्ण झाले पाहिजे असेच माझे म्हणणे होते.. त्यामुळे असंख्य नावे मागे पडली...
आणी 'आराध्या' हे नाव पक्के झाले... आराध्या-गणेश
आणि येथुन माझ्या जगण्याचा सुवर्णकाळ सुरु झाला..
10 May 2020 - 3:17 pm | प्रचेतस
सुरेख लिहिलंस रे गणेशा
10 May 2020 - 4:43 pm | मोदक
झकास लिहितो आहेस गणेशा..
आजिबात ब्रेक न घेता लिखाण सुरू ठेव.
10 May 2020 - 5:22 pm | भीमराव
अंधारात चालण्याची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे. कधीतरी बघा जमलं तर ट्राय करून, निवांत रस्त्यावर अगदी कुणी असो अथवा नसो. तसंही असल्या नसल्याशी आपल्याला काय म्हणा? आता हेच बघा ना दररोजच्या प्रवासात दिवसाढवळ्या कितीतरी माणसं आपल्या आजुबाजूला फिरत असतातच की. त्यातल्या तरी किती लोकांचे चेहरे आपण बघत असतो? बघितलेल्या किती जणांशी आपण स्वत: बोलतो? बोलणं राहुद्या बघणं पण सोडूनच द्या हो एकवेळ. आपल्याला किती तरी वेळा जाणिव तरी असते का की शेजारी कोण आहे? असुदे की असलं तर आणि नसूदेत सुद्धा. आपल्याला काय?
हा आपण आधी कुठे होते?
काय म्हणता?
अंधारात?
अंधारात कशाला मरायला?
बर अंधाराचाच विषय निघाला आहे तर तुम्हाला सांगतो अंधारात चालायची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे.
निवांत बघा कधीतरी एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर चालून समोर उभा किर्र अंधार त्याला कापत जाणारा निपचीत रस्ता, डोळ्यात बोट घालेपर्यंत कळणार नाही. सावध, संथ पावलं नकळत अगदी नकळत पटापट पडायला लागतात. मधेच कुठेतरी चुकार टुकार दगड असतोच पडलेला. आणि मुबलक खड्डे.
खड्डयांच सुद्धा अगदी राष्ट्रीयकरण झालय बहुतेक. बघावं तिकडे खड्डे च खड्डे. कधीतरी वाटतं कंत्राटदारांना सरकार खड्डेच बांधायचं कंत्राट देतं बहुतेक. चालताना तर दिवसा ढवळ्या डोळे फुटल्यासारखंच वाटतं. दिवसा चालताना जर असे हाल तर रात्री? मग तर बोलायलाच नको.
रात्रीवरून आठवलं, तुम्हाला सांगतो अंधारात चालायची सुद्धा स्वत:ची एक वेगळी मजा आहे
10 May 2020 - 5:37 pm | प्रमोद देर्देकर
आता थांबु नका तुम्ही. इतक्या वर्षांनी लिहताय तर लिहा पटापट.
पुर्वीचे मिपा परत येतंय असं वाटतंय.
10 May 2020 - 6:52 pm | चांदणे संदीप
कितीतरी वेळा असं होतं. सायंकाळचा वारा मोठमोठ्याने गाणं म्हणायला सांगतो. जसाजसा सूर्य डोंगराआड जाऊन प्रकाश कमी होतो आणि हवेतला गारवा गुलाबी होत जातो तेव्हा तोच वारा सावकाश पण आर्त असे काही गायला लावतो. अंधाराची मात्रा वाढते तसा किती नाही म्हटलं तरी उदासपणा दाटतोच. मग कुठलीशी सल अजून हळुवार गुणगुणायला लावते. अशा वेळी जर जवळ मित्र असेल तर मैफल रंगते. दु:खाचीही गाणी होतात. कुणी जवळ नसल्यावर मात्र तो अंधार आणि ती रात्र खायला उठते.
सं - दी - प
12 May 2020 - 12:28 am | मोगरा
तू जवळ नसताना, मी गाणी लावते.
तू माझ्यासाठी म्हंटलेला 'तू मेरी जिंदगी है' मला आठवते लख्ख मी पण तुझ्यासाठी म्हंटले होते गाणे.
आठवते आहे कोणते? सांग पाहू?
नाही आठवत ना?
ही रात्र हि अशीच असतें रिती, तुझ्या सारखीच.
10 May 2020 - 7:27 pm | गणेशा
@ ईश्वर
अंधार म्हंटले की मला आठवतात सातपुडा पर्वता मधील रांगा.. तोच शापित प्रदेश..
रात्रच नाही, तर पुर्ण जींदगीच अंधारात काढलेली माणसे..
अं हं, तुम्हाला वाटेल मला कसे ठावूक हे .. पण मला ठाऊक आहे.. हे आठवताना माझे मन जाते उडत २०११ मध्ये
-----------------------------------------------
तेंव्हा मी एक झाड होतो... रात्रीच्या वेळेस ही पूनमेला १ चिमणी यायची माझ्याकडे..
नाजुकश्या पंखांची गगनभेदी भरारी घेवुन झाल्यावर कधी एकदा चिमणी पुन्हा इथे येते आहे असे व्हायचे मला..
ती आली की ती मला तिथली सगळी कहानी सांगायची..
झाडांच्या पानातुन ... दूर क्षितिजापल्याडचा सूर्य मावळताना अताशा झाडास चिमणीचाच भास होतो...
ती नाही आली तर काय करत असेन आता ती ... शांतीच्या संदेशाला देता देता.. माझ्या सारखी असंख्य झाडे तिचे सोबती झाले असतील ना ?
मला आठवते आहे, ती हळुच दूरवर असलेल्या झोपडीमध्ये डोकावुन यायची, तेंव्हा तिथले अनुभव मला सांगायची .. तेंव्हा खर सांगतो मन भरुन यायचं...
म्हणुन त्या झोपडीतल्या माणसाने माझ्यावर कुर्हाड जरी चालवली ना तरी मी खुशाल माझे हात पुढे करायचो...
चिमणी अताशा हे झाड विसरली आहे... कदाचीत या झाडाचीच ती चुक आहे, त्यालाच त्या चिमणीची आधी विचारपूस करता आली नाही कधी ...
पण झाड पुन्हा आस लावून बसले आहे.. त्याची चिमणी येईल... नक्की येइल... यावेळेस झाडाला मात्र त्या चिमणी बरोबर जायचे आहे..
ही पानांची सळसळ.. हवेतली शुद्धता...सगळे काही त्याने चिमणी ला द्यायचे ठरवले आहे..
झाडाला अजुनही वाटते..अंधाराकडुन प्रकाशाकडे जाणार्या त्या वाटेवरचा तो एक सोबती व्हावा.. पंखभरल्या चिमणीचा एक दाणा व्हावा...
चिमणी ला आठवताना, झाडाला आठवते तीने त्या अंधारातल्या माणसांची सांगितलेली कहाणी..
ती कहानी नुकतीच या झाडाने त्याच्या फांदीवर लिहुन ठेवली आहे, कधीच विसरु नये म्हणुन....
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे
मरण लिहिलेला त्यांचा हा भाळ रे
अंधार म्हंटले की मला आठवते हे सगळे.. अंधारतली माणसे.. अन.. पुनवेची चिमणी...
11 May 2020 - 9:09 am | गणेशा
काल ठरवले होते, उद्या पासुन पुन्हा कामात व्यस्त व्हायचे.. सकाळी १० पासुन कामामध्येच स्वताला कोंडून घ्यायचे.. शेअर मार्केट, कविता, मिपा इतर असे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले...
पण रात्री झोपताना मोदक चा 'आम्हां घरी धन -३' हा धागा वाचायला काढला आणि सुबोध खरे यांचा एक रिप्लाय नसलेला प्रतिसादा पाशी येवून मी थांबलो .. त्यांनी विचारले होते
'गेले द्यायचे ते राहुन' या आरती प्रभु यांच्या गाण्याचा अर्थ सांगेल का कोणी .. अन मन माझे उडत २००७ ला गेले... आशा भोसलेंनी गायलेले हे गाणे अगदी लख्ख आठवले.. रात्री मनातुन काही केल्या शब्द जात नव्हते..भावनांची अनेक स्तित्यंतरे जानवत होती.. आणि काय माहीत आज मी या साठी १ तास आधी उठलो आणि लिहायला बसलो...
----------------------
मोदक चे हे धागे मी मिपावर नसताना आले होते, काल परवाच ते धागे पाहिले आणि खुप भारी वाटले.... निवांत वाचु म्हणाताना, रात्री भाग ३ पहिल्यांदा वाचायला घेतला.
मोदक (मनोज) तसा आपला जूना मित्र. वल्ली इतकी आमची भेट किंवा बोलणे होते नाही.. पण त्याच्या सायकल च्या धाग्यांनी माझे जगच पालटून टाकले.. २०१८ ला त्याच्यामुळेच मी सायकल घेतली.. असंख्य ट्रीपा केल्या.. पुणे ते कर्दे सायकल ट्रीप, पुणे ते पन्हाळा, पुणे ते लिंगाणा ह्या ट्रीप तर खासच..
ह्या सार्या आनंदाच्या गोष्टी त्याच्यामुळेच माझ्या जीवणाअत आल्या.. त्याला मी कधीच विचरु शकणार नाही...
सुबोध खरे,
- खरं तर आमची जास्त ओळख नव्हती, परंतु मागे मिपा वर आल्यावर आमच्यात राजकीय धाग्यात अनेक साद-प्रतिसादांच्या फैरी झडल्या... वाद हा शब्द मी मुद्दाम टाळतो आहे. कारण ते आणि मी, दोघे ही आपले विचार समोरच्याची भिडभाड न बाळगता मांडायचो, पण तितकाच पुढच्याचा आदर करणार्या भाषेत आम्ही लिहायचो...
त्यांची आणि माझी समाजिक, राजकीय मते तंतोतंत वेगळी होती आणी कदाचीत अजुनही आहेतच.. विचार वेगळे असणे नाही, तर स्वता:चे विचार असणे हे जास्त महत्वाचे असे मला नेहमी वाटते. त्यामुळे मी त्यांना तितक्याच आदराने उत्तर द्यायचो.. कुठे तरी त्यांना जानवले की मी त्यांचा राग करत होतो .. एका रिप्लाय ला त्यांनी लिहिले पण तसे की, स्पष्ट बोलले की राग येतोच.. पण तसे नव्हते... मला त्यांचे विचार बाजुला ठेवले तर त्यामागे असणारे त्यांचे मत स्पष्ट दिसत होते, ते काही कुठल्या राजकीय भांडणाप्रमाणे आयटी सेल च्या भाडोत्री मतांचे शब्द देत नव्हते.. त्यात ही कुठे खोल अर्थ किंवा काही तरी खरे होते...
असे कितीही लिहिले तरी मात्र माझी मते त्यांच्या सारखी होणार नाही हे खरे, कारण माझा भौगलिक, राजकीय आणि सामजिक वावर हा त्यांच्या पेक्षा वेगळ्या वातावरणात झाला आहे हे नक्की,, त्यामुळे मी पाहिलेली परिस्तीथी मी बोलतो आणि ते ती.. असो..
मनातले जसेच्या तसे लिहिताना असे बर्याचदा मन इकडे तिकडे जाते , मी लिहायला आलो होतो आरती प्रभुंच्या कवितेचा अर्थ आणि लिहितोय व्यक्तीचित्रे ..
असो.. कवितेचा अर्थ खालच्या प्रतिसादा मध्ये लिहितो ... त्या सुंदर कवितेला वेगळा प्रतिसाद बनतोच यार... या प्रतिसादाला व्यक्तीचित्रे म्हणुयात
आणि हे लिहिताना माझे टाईम मॅनेजमेंट गडबडले.. कामाला उशीर होणार आज..
हा प्रतिसाद क्रमशा: --
11 May 2020 - 10:15 am | गणेशा
क्रमशा:
हा तर मी काय म्हणत होतो... 'गेले द्यायचे राहून' हे आरती प्रभुंच्या गाण्याबद्दल.. २००६-०७ या काळात मी पहिल्यांदा कविता लिहिण्यास सुरिवात केलेला काळ.. त्या काळात मी असंख्य पुस्तके वाचत असे... कवी ग्रेस आपले आवडते कवी..माझ्या 'आई' कवितेला त्यांनी दिलेली सही मी अजुनही जपुन ठेवली आहे..
त्या वेळेस अशी असंख्य कविता/गाणी/कथा मी वाचली ऐकली... त्यातले हे गाणे मला खुप आवडायचे त्याबद्दल, सुबोध जींनी याचा अर्थ मागितला होता २०१३ मध्ये , मी आता लिहायला बसलो आहे.. माझ्या मनातील अर्थ..(तो तुम्हाला चुक ही वाटु शकतो...)
-------------------------------------------
मुळ कविता :
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने..
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त.
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..
गाणे
https://youtu.be/yCrF5yQKlqM
माझा अर्थ
मला माहीत आहे, मी उंच नभ होतो तुझ्या पुढे... प्रिये , माझ्यापुढे तू अतिशय खुजी होऊन गेली होती.. माहीत आहे मला.
तरीही मला माहीत आहे तुझ्या जगाचे सारे आभाळ मी व्यापले होते.. नव्हे मीच तुझे आभाळ होतो..
पण माफ कर प्रिये.. या आभाळाला तुझ्यात कधी समरसून जाता आलेच नाही.. माझे नक्षत्रांचे देणे तुला कधी देता आलेच नाही...
_____ माझ्याकडे, बोलायचे राहिलेले आता खुप सारे आहे, अताशा त्या शब्दांच्या कळ्याच राहिल्या आहेत माझ्या मनात...अजुनही...
त्या शब्दांची..त्या कळ्यांची फुले कधी झालीच नव्हती..तुझ्या साठी... त्या मुळे तुझ्या आठवणींची पाने आणि माझे डोळे दोन्ही ओले आहेत.. ||१||
तू आता या जगातून जायच्या तयारीत आहेस.. तरीही तुझे हे आभाळ तुझ्याकडे अजुनही आले नव्हते..तुला पाहिजे तसे...
पण या तुझ्या अखेरच्या प्रवासात.. तुझ्या अखेरच्या श्वासांसाठी मी उगाच तुझ्याकडे खोटे हसू घेवून आलोय..
दुसरे आहे तरी काय माझ्याकडे तुला देण्यासारखे..? मी ना तुला कधी काही दिले ना काही देवू शकलो..
आता तुझ्या कडे आलोय तरी, तुझ्या मनासारखे मी जगु शकत नाही.. कारण तुझ्या श्वासांची ही शेवटची तडफड पाहतोय मी..
मग आता तुझ्या शेवटापर्यंत प्रत्येक दिवस मला ओझेच वाटतोय.. तुझ्या माझ्याप्रती असलेल्या अपेक्षांचे...
आणि रात्र झाली की तुझ्या बद्दलच्या राहिलेल्या गोष्टी माझे मन पोखरून टाकतात.. जनू त्या माझे रक्त शोषीत आहेत असेच वाटते.. ||२||
आता ह्या असल्या रात्री विचार करताना, मला कळते आहे, माझे मन आधी तुझ्यापाशी कधी नव्हतेच.. नव्हे त्या मनाला तुझे कधी काही सोयरसुतक वाटलेच नव्हते..
आता या क्षणी माझी चुक माझ्या लक्षात आली आहे, पण आता काय करायचे ? नक्षत्रांचे हे देणे तुला कधी या आभाळाला देता आलेच नाही.
पण आता या क्षणी मी त्या मनाचा दगड ,अन तुला दिलेले दु:खाचे घाव, डोळे मिटुन उगाच आठवतोय...
आणि माझ्या शब्दांची तुझ्यापाशी कधी फुले झालीच नव्हती, त्या अश्या मी न बोललेल्या शब्दकळ्यांचे निर्माल्यच झाले येथे.. तुझ्या आयुष्यापाशी...
आणि तुझ्या आठवणींचा पाचोळा उडतोय सैरभैर .....
----------- शब्दमेघ
12 May 2020 - 12:31 am | मन्या ऽ
आठवणी : आत्ता लॉकडाऊनच्या काळात सगळ कुटुंब एकत्र.. कितीतरी आठवणी जमा झाल्यात. ज्या आता शेवटपर्यत सोबत असतील..
आजचा दिवस तसाच.
आयुष्यात बाळ म्हटल कि टेन्शन, चिडचिड हे माझ्या नजरेतलं समीकरण आता बदलु लागलंय.. कधीच बाळाशी न खेळणारी मी. आता त्या बाळाच पसरलेलं हसरं बोळक बघताना माझ मन उगाचच भरुन येत. पहिल्यांदा असा निरपेक्ष आनंद अनुभवायला मिळतोय.. आणि सोन्यासारख्या आठवणीं जमा होताएत..
थँक्स पिलु!
तुझीच माऊ..
12 May 2020 - 12:41 am | मोगरा
@ माऊ..
राधा, माझी मुलगी.
तिच्यासाठी, किती धावपळ व्हायची माझी. काम, स्वयंपाक, घर, नोकरी.
पण घरी आली आणि माझ्याकडे धाव घेणारी राधा पहिली कि माझा सर्व थकवा निघून जायचा.
निरपेक्ष आनंद दुसरा कुठला असूच शकत नाही.
गर्भ माझा होता, पण स्वर्ग तिने निर्माण केला.
12 May 2020 - 9:05 am | चांदणे संदीप
लहान मुलांना पाहणं, खेळताना पाहणं हे खूप मजेशीर आणि आनंददायक असतं. त्यांनी खेळताना आपल्या कल्पनाशक्तीने त्यांना हव तसं जग निर्माण केलेलं असतं आणि त्यात ते सारं विसरून समरसून जगत असतात. कधीकधी त्यांच्याही नकळत, निरागसपणे ती असं काही बोलत रहातात की आपल्याला आश्चर्य वाटावं की अरेच्चा हे कुठे ऐकलं किंवा पाहिलं असेल यांनी. त्यांच्यासोबतचे सगळे क्षण म्हणजे आयुष्यातल्या रणरणत्या उन्हात मिळालेली गारेगार सावलीच जणू.
शेजारच्यांची लहान मुलं. जवळच्या नात्यातली लहान मुलं यांनी मला भरभरून आनंद दिलेला आहे. अजूनही देत आहेत. लहान मुलांसोबत खेळायला मी कधीही तयार असतो. आता माझ्या मुलींनी माझ्या आयुष्याचा ताबा घेतलाय.
सं - दी - प
12 May 2020 - 12:48 pm | चांदणे संदीप
पसारा आवरायचा एक दिवस येतोच. कपाट, त्याचं ड्रॉवर, पुस्तके, फाईली किंवा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलेले फोटो. पसारा आवरून तो पुन्हा नीट लावताना तासन् तास कसे निघून जातात ते कळत नाही. हे नेहमीच होतं.
आज हार्डडिस्कमध्ये नवे फोटो टाकून ठेवायचे होते म्हणून हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. फोटोंच्या फोल्डर मध्ये गेलो. तिथं मी एक अनसॉर्टेड नावाचं फोल्डर करून ठेवलेलं आहे. ज्यात मी भराभर आधी सारं टाकून घेतो आणि नंतर सावकाश त्या त्या प्रसंगानुसार, कार्यक्रमानुसार, तारखांनुसार पुन्हा त्यांना योग्य जागी लावून ठेवीत असतो. परंतु, बर्याच वर्षांत अनसॉर्टेड मध्ये फक्त भरणाच झाला आहे. सॉर्टिंग असं करताच नाही आलं. त्याच कारण म्हणजे मोबाईलने काढलेले भरमसाठ फोटोज आणि व्हिडिओज.
हे फोटो पाहिले तर एखाद्याला वाटेल की च्यामारी, ह्याला तर आयुष्यात काहीच कष्ट पडले नसतील. आयुष्याचं सोपंसच गणित याच्या वाटेला आलंय. लहानपणासून ते आतापर्यंत चांगलं सुखासीन आयुष्य जगत आलेला आहे हा. अर्थातच ते खूपसं चूक आणि काही अंशी खरंही आहे. पण फोटो तर वेगळीच कहाणी सांगत आहेत. मग विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या लक्षात वेगळं राहतं आणि कॅमेर्याच्या वेगळं. पण एक गोष्ट नक्की, खूप काही बघून, फिरून, मजा करूनही झालेली आहे. जितके फोटो, व्हिडिओ आहेत तेवढे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येऊन गेलेलेच आहेत. या वेळी तुकारामबुवांची सुख पाहता जवापाडे, दु़:ख पर्वताएवढे या उक्तीचा नव्याने साक्षात्कार झाला! मनोमन तुकारामबुवांना नमस्कार केला आणि पुन्हा कधीतरी आवरूया म्हणून लॅपटॉप बंद केला.
सं - दी - प
12 May 2020 - 6:48 pm | गणेशा
@ संदीप ,
पसारा/फोटो...
----------------------------------------------------
खरंच, ह्या लॉकडाउनच्या काळात मी पण आपोआप ह्या कपाटातील/स्टोअर रुम मधील गोष्टीं आवरल्या. गेल्या वर्षीच घराला रंग दिला होता, त्यामुळे सगळ्या जुन्या डायरी, पुस्तके एका बॉक्स मध्ये भरुन ठेवले होते, त्याला आता मुहुर्त लागला..
पुस्तके बॉक्स मधुन पुन्हा कपाटात ठेवली.. अजुन व्यवस्थीत नाही ठेवली.. आजच त्यातल्या माझ्या जुन्या डायर्या शोधल्या...
एक खुप जूनी डायरी सापडली.. त्यावेळेस मी कविता लिहित नव्हतो.. काहीच लिहित नव्हतो...त्यावेळेस तीच्या डायरीतील काही छान छान वाक्य त्यात लिहिलेली होती ती बघितली.. वाचली.
त्यावेळी मी चित्र काढयाचो, त्या डायरी मध्ये काही चित्रे रेखाटलेली होती, ते पाहुन छान वाटले.. अश्या असंख्य गोष्टी विस्मरणात गेलेल्या होत्या.. त्या पुढे आल्या..
त्या डायरीतल्या या ओळी आवडायच्या मला, या ओळींचा कवी कोण माहित नाही..
तू हसलीस की फुले उमलु लागतात
अन त्याचे रंग, तुझ्या ओठांवर खुलू लागतात..
तू अशीच हसत रहा.. सर्वांचे मन मोहत रहा..
माझी नसताना पुन्हा माझीच होत रहा..
त्या डायरीच्या शेवटी एक गाणे लिहिले होते, ते नंतर देतो..
अश्या किती आठवणी आपल्या प्रत्येक गोष्टीला चिकटुन बसलेल्या असतात नाही ? आयुष्याच्या या परिघात आपण मात्र अश्या असंख्य गोष्टी, असंख्य आठवणी बर्याचदा विसरुन गेलेलो असतो.. पण पुन्हा जेंव्हा हे समोर येते तेंव्हा त्या आठवणी सरकन डोळ्यासमोरुन जातात.. जनु तो काळच पुन्हा अवतरतो डोळ्या पुढे...
फोटोंचे पण अगदी तसेच, माझ्या कडे २-३ पेन ड्राईव्ह भरुन फोटो आहेत.. लॅपटॉप मध्ये ही आहेत..
लग्ना नंतर मात्र मी प्रत्येक ट्रीपचे फोटो.. मग सिलेक्टेड फोटोज असे फोल्डर केले आहेत. त्यात फॅमिली ट्रीप, वयक्तीक ट्रीप , ट्रेकिंग, आराध्या, आराध्या फेवरेट.. असे असंख्य फोल्डर आहेत.
पण मला डिजीटल फोटो पहायला आवडत नाही.. मी ट्रीप प्रमाणे असंख्य अलबम प्रींट करुन आणले आहेत. ते अलबम पहायला जी मज्जा येते ती दुसरी कशातच नाही.
बर्याचदा आराध्याचे फोटो पाहतो, काल तीच्या जन्माच्या ओळी लिहितानाच तीचे फोटो पाहिले होते..
आमचे फोटो पाह्यचे झाले तर केरळ चे किंवा हिमाचल चे फोटो पाहतो मस्त वाटते.. येथे ह्या दोन्हीचे धागे लिहलेले आहेत ते आठवले.. २०१३ नंतर प्रवासवर्णन बंदच केली मी लिहायला...
सुख-दु:खाचा खेळ तर चालुच असतो.. पण तो काळ पुन्हा अनुभवने हे सुखच असते... काळाच्या विरुद्ध जाऊन जुने क्षण आनंदाने जगण्यासारखे दूसरे सुख नाहीच.
---------------------------------
वरती माझेच लिहिलेले पुन्हा वाचले..अताशा एक सारखेच प्रतिसाद झालेत का काय माझे असे उगाच वाटुन गेले.. पुढच्यावेळेस असले आठवणींचे आठवण्या पेक्षा साधे सरळ काही मनात यावे असे वाटते.. म्हण्जे थोडे मजेचे.. रोजचे क्षण ... आठवणींच्या बाहेरचे आयुष्य पण सुंदर आहेच .. सुंदरता ही रोजच्या गोष्टीत असते.. म्हणुन तर त्याच्या सुंडर आठवणी असतात नाही.. ?
13 May 2020 - 12:06 am | मोगरा
@ संदीप, @गणेशा
राधा ने केलेला पसारा बरा, तेव्हडा श्री चा टेबल, कपाट आवरायला वेळ लागतो,
रोजचेच हे, रुटीन.
अश्या रुटीनचे आयुष्य तसे मला आवडते. एका परिघावर फिरत राहायचं बस.
स्वप्ने जास्त नव्हतीच.घर हेच माझे स्वप्न.म्हणून पसारा आवडतो, आणि पसारा करणारे पण. आठवण नाही येत कोणाची. रोजच हे, त्यात नविन काही नाही.
माझ्या स्कुटर वर राधाला पुढे उभे करून जाताना, ती दोन्ही हात विमानाच्या पंखां सारखे करते, तिचे स्वप्न किती नितळ आहे असे मला नेहमी वाटते, कधी कधी स्वप्नांचे पंख तिला मिळाल्यात असं वाटतं.
13 May 2020 - 12:47 am | मन्या ऽ
स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु आईला तुझिया विसरु नको
श्वासात घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरि तु
एक नजर असुदेत या भुवरी
नंदादीप जळत राहो
तुझ्या आकांक्षाचा
निसर्गाचे ते अमोल देणे
तु परतवत रहा त्याला
(तुमच्या राधासाठी या काही पंक्ती सहजच सुचल्या.)
13 May 2020 - 1:33 am | मोदक
वाचतोय... मस्त सुरू आहे डायरी.
तुम्ही सगळे इतकं तरल.. हळूवार कसे काय लिहिता याचे आश्चर्य वाटत राहते.
14 May 2020 - 12:07 am | मोगरा
धन्यवाद माऊ.
13 May 2020 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
मास्कआडचा माणूस मास्कआडच्या माणसाला म्हणाला,
"काय कसे काय?"
"बरे चालले आहे, थोडे सामान घ्यायचे होते म्हणून बाहेर पडलो, आज एका दुकानाच्या लायनित उभे रहायचे आणि उद्या दुसर्या, दोन तासात जमेल तेवढे सामान घ्यायचे"
"मी पण तसेच करतो, मुलगा म्हणतो ऑनलाईन मागवा, पण घरी बसुन बसुन कंटाळा येतो हो.. जरा पाय मोकळे झाले की बरे वाटते"
"हो मी पण रोज थोडे थोडे सामान घेतो, जेवढे उचलता येईल तेवढे"
"तुम्हाला काय वाटते या वेळी ट्रंप परत निवडून येईल का?"
"येईल न यायला काय झाले? त्याला विरोध करणारे कोण उरले आहे आता?"
"तिकडच्या दुकनात रोज हिंदुस्तानचे पॅटीस येतात माहित आहे का?"
"हो माहित आहे परवा घ्यायला गेलो होतो पण लाईन बघुन परत गेलो"
"चला झाली माझी खरेदी, बरं वाटलं तुमच्याशी बोलून, एकदा घरी गेलो की उद्या पर्यंत कोणी दिसत सुध्दा नाही. दिवसभर टिव्हिवरचे तेच तेच जुने कार्यक्रम पाहून कंटाळा येतो"
"हो चला अच्छा काळजी घ्या"
मास्कआडचा माणूस मास्कआडच्या माणसाला म्हणाला,
पैजारबुवा,
13 May 2020 - 3:41 pm | चांदणे संदीप
चेहर्यावरचा मास्क बरा
जो चेहरा झाकून घेतो
आपल्या आत जे असेल
ते आपल्यापाशी ठेवतो
उघडउघड जी मुखकमले
दिसती आणिक हसती
कसे कळावे ओठी त्यांच्या
हसू की, स्मिते जळकी?
चेहरा लपवलात तरी
डोळ्यांचं काय करणार?
किती नाही म्हटलं तरी
ते सारं उघडं पाडणार!
- सं - दी - प
13 May 2020 - 3:50 pm | गणेशा
@ पैजारबुवा , नमस्कार तुम्हाला प्रथम.
------ लॉकडाउनमधील मन हेलवणारी ही कालचीच गोष्ट, अजुन ही काय वाटते निट शब्दात बोलता येणार नाही.
काल कॉलनीत एक म्हतारी आली होती.. शहरात असुनही सोसायटीतल्या पिंजर्यात राहत नसल्याने येतात माणसे येथे.
घरी आता कोणी नाही.. मुलगा , त्याच्या सासरी.. गाव तिचे होते पाले, मावळ. इथ चालत चालत कशी आली माहीत नाही. निटसे तीला ऐकु येत नव्हते असे बायको म्हणाली.. मी वरती होतो.
तीला भुक लागली होती.. शेजारच्यांनी तीला हाका मारुन बोलावुन घेतले, फळे दिली, पाणी दिले.. समोरच्या बंगल्याच्या नारळाच्या इवल्याश्या जागेत तीला बसवले.
समोरच्या घरात स्वयंपाक करत होत्या, त्यानी जेवायचे का विचारले तर हा म्हणाल्या आज्जीबाई..
गरम जपाती, मेथीची भाजी पाहिली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.. किती दिवस झाले असे जेवण त्यांनी बघितले नाही असेच भाव होते..
बायकोच्या डोळ्यात ही पाणी आले, तीने ही चिवडा आणि इतर पदार्थ दिले त्या माउली ला..
पाटील बाई म्हणाल्या, नको जास्त काही विचारायला, वेगळी काय कथा असणार, जेवुद्या पोटभर..
बायकोने हे मला सांगितले तेंव्हा तीच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते, त्या म्हतारीचा चेहरा समोरुन जात नव्हता.. तीचे पाणीभरले डोळे तीच्या या अवस्थेला काय बोलत असतील, घरदार सोडुन असे वनवन भटकताना तीच्या मनाला काय यातना होत असतील ?
हे लिहिताना ही डोळ्यात पाणी तरळले... थांबतो..
13 May 2020 - 4:10 pm | गणेशा
@ संदीप
-----
मुखवट्यांच्या या जगात, माणुस स्वताला विसरत चालला आहे. आरश्याला पण प्रश्न पडत असेल, हा कालचाच माणुस आहे ना ?
प्रत्येक ठिकाणी मुखवटे..
राजकीय बोलताना .. मुखवटा धर्माचा
आर्थिक बोलताना.. मुखवटा धंद्याचा
सामजिक बोलताना .. मुखवटा सुधारकाचा
विज्ञानाचे बोलताना .. मुखवटा ज्ञानाचा
मैत्रीत बोलताना.. मुखवटा खोटेपणाचा..
तुम्ही कितीही डोळ्यात पहा.. तेथे ही गर्वाचा मुखवटा लपलेला असतोच म्हणजे असतो..
14 May 2020 - 12:35 am | मन्या ऽ
एखाद्याला बाबारे तु जसा आहेस तसाच रहा! अस म्हणुन आपण स्विकारतो(?) त्या माणसाला आपल्या आयुष्यात..
मग तो मनुष्य कोणीही का असेना. आई-वडिल,भाऊ/बहीण, नवरा-बायको अगदी कोणीही!
पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस?
विचार केल्यानंतर देखील मला मिळालेली उत्तरे. मला स्वतःलाच पटत नाहीत.
पहिलं उत्तर सवय!
जुनी लोक म्हणतात " जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही." पण हे खरं मानलं तर
शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा! तो कसा खोटा ठरवावा?
जाऊदे. मरुदेत.. तो सवयीचा विचार करता करता "माझी अतिविचार करायची." सवय मला परत लागायची..
14 May 2020 - 12:46 am | गणेशा
निरुत्तर केले मन्या..
14 May 2020 - 12:31 am | मोगरा
मी आरश्या समोर उभी राहिल्यावर प्रश्न आरश्या ला नाही मला पडतो, मीच का हि?
आज आरश्यात पाहतानाच बाजूला गाणी चालू होती.
आणि स्मिता पाटील च गाणं लागल.
स्मिता मला आवडायची. राज बब्बर नव्हता आवडत.
जैत रे जैत, मस्तच.
14 May 2020 - 12:51 am | टर्मीनेटर
राज बब्बरला अभिनेता म्हणावं
हा त्याचा वकुब नाही..
स्मिता पाटीलनी त्याच्याशी लग्न करावं
ह्यापेक्षा दुसरे दुर्भाग्य नाही..
तेरी तो... ये तो शेर हो गया! 😜
14 May 2020 - 8:11 am | गणेशा
@ टर्मीनेटर...
वा वा, बागा. फुलवणारा माणूस आज शब्द फुलवायला लागला..
काय. मोगरा, काय गुलाब, सुगंधाचाच हा खेळ जमायला लागला.
-------------
स्मिता पाटील, माझ्या आईची आवडती अभिनेत्री... म्हणून माझ्या मनात पण घर करून गेली.. तिचे डोळे आवडतात मला..
जैत रे जैत, गाण्यांमुळे गाजला.. पण आपल्याला स्मिता साठी तो सिनेमा लय आवडतो..
नभ उतरू आले, मी कात टाकली, आम्ही ठाकर..
अशी किती गाणी सुंदर आहेत.. आणि त्यात स्मिताचे डोळे..
ना. धो. महानोरांच्या सुंदर निसर्ग शब्दाना असा नितळ चेहरा लाभला होता कि बस..
स्मिता म्हणजे आपल्या सारखा चेहरा.. पण उत्तुंग अभिनय..
15 May 2020 - 12:30 am | मोगरा
मिपा वर आल्यापासून, काव्यस्पर्धेतील नविन कविता वाचते. रात्री झोपताना या धाग्यावर येऊन एखादा विचार लिहिते. दिवसभर काम असते.
बाकी जास्त जण का लिहीत नाही माहित नाही.
पण मला आवडते काहीही लिहायला.
~~~~~~~~
आज राधा चा मराठी चा अभ्यास घेतला.
अ, आ, ई, इ शिकवायला छान वाटले, ते येते तिला पण काना, मात्रा शिकवले.
ऑनलाईन आणि ते झूम काय खरे त्याचे?
अशी शाळेची मजा सगळी जाणार..
तुम्ही बघा, कॉलेज ला, ऑफिसला न जाता घरा मध्ये राहून काम करताना, अभ्यास करताना कंटाळा नाही येणार?
मुलीला आवडते घरून, शिर्या ला ती काम काही करू देत नाही. जळालं मेलं ते वर्क फ्रॉम होम.
दिवस भर चहा चा रतीब नाही तर काय तरी हे अन ते.
कधी हा करोना जातोय काय माहीत.
15 May 2020 - 12:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मला लिहून आता बरेच वर्ष झाली. आणि इतक्यात काही उतरेल अशी आशाही नाही.
पण माझी लेकही फार छान कविता करते. ८वीत आहे. फक्त तिची विचार करण्याची भाषा आहे इंग्रजी. त्यामुळे तिच्या कविता इंग्रजीमधून येतात. खाली एक उदाहरण देतो, बघा आवडते का:
Blooming Flowers
================
This bare, leafless tree once
had blooming flowers
not a little but tons
beautiful flowers
..
Now the last brown leaf
falls off, leaving memories behind
memories of the leaf
when it was a little green child
..
It grew up to become a charming life..leaf
new and confused about the world
but full of life
how elated would the tree have felt
..
Until it grew old, fragile and brown
lifeless like a rotten petal
the tree would have felt despondent
like the old, frail lady on the start
..
Her children left her alone
the bossom died away
the leaves fell off
but the tree stands bare, leafless
..
In the hope that they will return...
The blooming flowers
Saee Mande
(Somewhere in May 2018)
15 May 2020 - 12:50 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आणि हि अजुन एकः
FIRE
==========
I am energy
I am power
I am light
I am might
I am magic
Two sides of the same coin
I am the mother of inventions
I am the fiery destruction
Saee Mande
(Somewhere in Sept 2019)
15 May 2020 - 1:08 am | मन्या ऽ
सुंदर व्यक्त झालीये तुमची परी!.. तिला शाबासकी द्या माझ्याकडुन.. आणि कविता आवडल्या हे सुद्धा सांगा..
15 May 2020 - 8:23 am | गणेशा
प्रथमतः नमस्कार मिका भाऊ..
सई ला अनेक आशीर्वाद.. तुझी प्रतिभा, नव्हे त्या पेक्षा ही जास्त सई मध्ये दिसते आहे. कविता मस्तच. ट्री च्या कवितेत काय सुंदर कल्पना आहे.. जणू आयुष्य आपले...
In the hope that they will return...
The blooming flowers
Wow, येव्हढ्याश्या चिमुकलीचे हे इतके सुंदर विचार.. मस्तच..
----------------
तुझ्याबद्दल,
अरे, तू मला सांगायचा लिही राव, अन आता इतक्यात काही उतरेल अशी आशा नाही..
कविता जाऊदे.. विचार तर लिहू शकशील कि..
वेळ मिळाला कि लिही..
तू अन किसना मुंबईत भेटलेले हे दोन मित्र कायम मला त्या तिथल्या समुद्राची आठवण करून देतात.. असे काहीसे अथांग, अनंत आपल्या बरोबर आहे असेच भासायचे... पण तो समुद्र कधीच हाती लागायचा नाही..
तुझी समुद्राची कविता मला कायम आठवते ती आता सापडत नाहीये.. देतो का?
16 May 2020 - 12:39 am | गणेशा
आज माझे मन जाते आहे शाळेत..
-------
जीवन शिक्षण विद्या मंदिर, असं गोंडस नाव असलेल्या झेड पी च्या शाळेत मला पहिलीला घातले गेले.. उरुळी कांचन तेंव्हा छोटेसे खेडेगाव होते..
तेंव्हा पण मी आता सारखाच बडबड करायचो बहुतेक, आई ला बोलावून माझ्या अनेक तक्रारी घरी पोहचलेल्या होत्या.
दुसरीत का तिसरीत असताना 'इंजिन दादा इंजिन दादा काय करतो ' हि कविता होती, तेंव्हा बाई हि ओळ म्हणाल्या कि सर्वांनी ती ओळ म्हणायची. असे असताना त्या, हि ओळ संपवत नाही तोपर्यंतच मी 'कोळसा मी खातो ' असे पुढचे म्हणत असे, आणि मार खात असे.
तुम्हाला वाट्टेल कवितेचा आणि माझा संबंध तेंव्हाचा का?
पण नाही, आपलं आणि कवितेचं जमलंच नव्हतं कधी..कवितेतच काय, मराठी च पण कधी जमल नव्हतं.
अपवाद दोनच, नववी आणि अकरावी.
महात्मा गांधी विद्यालयामध्ये, नववीत मराठी ला चव्हाण बाई होत्या.. आपल्याला त्या आवडायच्या.. या पहिल्या बाई नव्हत्या ज्या मला आवडत होत्या, सहावीत असताना थोडे दिवस होत्या त्या घुणागे आणि नंतर मोरे बाई यांचा नंबर पहिला येतो लिस्ट मध्ये, दोघी आपल्याला लय आवडायच्या. शास्त्र आपल्याला तेंव्हा पासूनच आवडायला लागले.
हा तर नववीत असलेली 'कणा' हि आपल्याला पहिली आवडलेली कविता.
हि कविता आपल्याला पाठांतरा ला होती. आपल्याला लय आवडायची. अजूनही पाठ आहे.
आठवा तास असल्या वर बाई वाचन घ्यायच्या मी 'धुणं' हा धडा घेऊन वाचायचो, आपल्याला आवडायचा तो धडा.
अकरावी मराठी भारी होते.. 'प्रेमाचा गुलकंद' आपल्याला आवडायची कविता.
मराठी आणि कविता याबाबत आपले एव्हडेच नाते होते
कवीला काय अर्थ अभिप्रेत आहे असले भंकस प्रश्न मला कधी जमलेच नाही.. असा मराठी ह्या विषयात अजिबात गोडी नसणारा मी नंतर कविता लिहिल हे मला कधीच वाटले नव्हते....मराठीत नववी आणि अकरावी सोडले तर मी काठावर पास होत असे. शुद्धलेखन हा शब्द ज्याला शुद्ध लिहिता येत नव्हता त्याची इतर काही सांगायची गरज नसावी..
---
गणितात आपण मात्र बीसीएस होई पर्यंत topper होतो. त्याची कथा खालच्या प्रतिसाद देतो.. तीच लिहायला आलो होतो आणि हे वेगळेच शब्द येतात.. चालायचेच..
Cont...
16 May 2020 - 1:31 am | मोदक
महात्मा गांधी विद्यालय - माझ्या हायस्कूलचे हेच नांव होते.
रयतची शाळा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम असायचे. या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा गांधी टोपी डोक्यावर आली.
कार्यानुभव म्हणजे शाळेच्या शेकडो एकर जमिनीत संपूर्ण शाळेने जाऊन सोयाबीन पेरायचे आणि नंतर काढणीला आले की तीन चार दिवस तिकडेच शाळा भरायची व सोयाबीन काढणी सुरू असायची. फुल्ल मजा..!
**********
धुणं म्हणजे साटंलोटं नात्यातली कथा आहे का रे..? एका बाईच्या सांगण्यावरून सासू सुनेला त्रास द्यायचा विचार करते आणि भर उन्हात धुणं धुवायला पाठवते.. आणि सून धुण्याला जायच्या वेळी सासूमधली आई जागी होते आणि तिला उन्हात जाऊ देत नाही अशी कांहीशी कथा..?
**********
मराठी १० वी पर्यंतच होते. नंतर ११ वी व १२ वीला मराठी ऐवजी स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत घेतले. बालभारतीच्या वेबसाईटवर अगदी अलिकडे कांही मराठी पुस्तके वाचावयास मिळाली. आपण ज्या लोकांना आज इतके ग्रेट मानतो त्यांचे साहित्य शाळकरी वयापासून आपल्यासोबत आहे पण त्यावेळी त्या साहित्याची गोडी न लागता "कुठला प्रश्न किती मार्काला आहे?" असल्या नीरस आणि उदास भावनेने त्या सगळ्याकडे पाहिल्याचे आज कधीकधी वाईट वाटते. आज इतक्या वर्षांनंतर या सगळ्याकडे मागे वळून पाहताना प्रश्न पडतो की १० / १२ मध्ये मिळालेले मार्क आणि त्यासाठी केलेली धडपड खरंच तितकी "वर्थ" होती का.? आणि अॅट द कॉस्ट ऑफ व्हॉट...??
**********
कणा.. आपली पण एकदम आवडीची कविता.
गेली अनेक वर्षे बीजी लिमये यांच्या कॅलिग्राफीच्या प्रेमात आहे... त्यांच्या लेखणीतून साकारलेला.. "कणा आणि त्याचा अनुवाद.."
16 May 2020 - 1:42 pm | गणेशा
@ मोदक
---
हो धुणं तोच धडा, बरोबर.
वा कॅलियोग्राफी भारीच.. मनात घर करणारी..खुप आवडली...
----
कणा बद्दल काय बोलु, अजुनही ते दिवस अगदी मनात घर करतात.. मला आवडलेली पहिली कविता.
एक छोटासा किसा आठवतोय,
बगाडे आमच्या वर्गातला 'ढ' मुलगा होता, आणि त्याला ही पाठांतरा ला 'कणा' होती.
आणि बिचार्याने म्हणताना अश्या दोन ओळी म्हणाल्या.. लय जोरात सहलो होतो मी, चव्हान बाईंनी मग मला उभे केले होते..
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीन पोरिसारखी, चार भिंतीत वाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र नाचली
अजुन पण हसतो आहे...
----------------
जाता जाता कुसुमाग्रज यांच्या दोन कविता आठवल्या ,
विशाखा मधील त्यातील ह्या दोन ओळी मला लय आवडतात
"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
दूर देशी उभे, दिवसाचे दूत"
आणी त्यांनी लिहिलेली शेवटच्या कवितेतील ह्या ओळी
उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे.
मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे..
16 May 2020 - 3:09 pm | मन्या ऽ
कुसुमाग्रज यांच्या कविता मी जास्त वाचलेल्या नाहीत.. पण ज्या ज्या वाचल्या त्या ठळकपणे मनावर कोरल्या गेल्या..
गणेशदा, तु दिलेल्या ओळी स्वप्नांची समाप्ती या कवितेतल्या.. एकीकडे पहाटेच इतकं सुंदर वर्णन तर दुसरीकडे प्रेम कराव भिल्लासारख! कवितेत कशालाच कसल्याच उपमा न देता थेट. प्रेम कस कराव. बजावत/सांगणारी प्रेमकविता. दोन्ही कवितांमधे केवढं ते वेगळेपण..
16 May 2020 - 3:17 pm | मन्या ऽ
शब्दांच्या या धुक्यामध्ये
अडकु नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा
फडकु नकोस
उधळु दे तुफान सगळ
काळजामध्ये साचलेल
प्रेम करावं
भिल्लासारख
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यत पोचलेल
16 May 2020 - 1:26 am | गणेशा
हा तर पुन्हा सुरु करतो,
जीवन शिक्षण विद्या मंदिर, असं गोंडस नाव असलेल्या झेड पी च्या शाळेत मला 1987 साली पहिलीला घातले गेले.. उरुळी कांचन तेंव्हा छोटेसे खेडेगाव होते..
वडपल्ले बाई मला शिकवायला होत्या, आता सारखी नाटके तेंव्हा नव्हती, चौथी पर्यंत त्याच आम्हाला शिकवायला होत्या.
गणित, मराठी, शास्त्र या तीन विषयात आपले डोके चालायचेच नाही.
वडपल्ले बाई, आपल्याला लय बडवायच्या.
मी आणि शफया आम्ही दोघे ठरलेले होतो मार खायला.
मला चांगले आठवते, काही सापडले नाही तर बाई मला पाटी च्या टोकाने डोक्यात मारायच्या.
एकदा मला आणि शफया ला बाईनी उभे करून लय मारले.
मी शफया ला विचारले, तुला का मारले, तो म्हणाला मला गणितात 2 मार्क मिळाले आणि शास्त्रात 4 म्हणून.
त्या पेक्षा आपल्याला निम्म्या हुन कमी मार्क मिळाले होते.
म्हणजे 0 आणि 1.
बाई ओरडल्या 'तुम्ही दोघे आयुष्यात कधी पुढे जाणार नाही, आणि गेला तर माझे नाव बदलून ठेवा.. '
या वाक्य नंतर पण मी हसलो म्हणून मी आणखीन जास्त, शफया पेक्षा जास्त मार खाल्ला..
शास्त्रा चे मला चांगले आठवते, बाईंनीच सांगितले होते ' सजीव म्हणजे असा कि जो दुसऱ्याला जन्म देउ शकतो, टेबल दुसरा टेबल जन्माला घालतो का? मग तो निर्जीव.. '
हीच व्याख्या मी पाचवीत गायकवाड बाईंनी प्रश्न विचारल्यावर सांगितली होती, त्या बस खाली, शहाणा. म्हणाल्या होत्या..
गणित म्हणजे महाकठीण काम, शिक्षकांच्या पोरांना लय यायचे तेंव्हा पण. गायकवाडा चा मह्या, आणि सच्या बागडे पहिले दुसरे यायचे.
गणित आपल्या पुढचा लय मोठा प्रश्न होता. तिसरीत आपण चार विषयात नापास झालो होतो, बाईंनी शाळेत आई ला बोलावून एका विषयात पास केले होते, आणि तीन विषय नापास असुन हि आम्ही चौथी ला आलो होतो..
ते तीन विषय होते मराठी, गणित, शास्त्र..
(यातल्या गणिताचे आपण नंतर कॉलेज ला गेस्ट lecture घेतले, बीसीएस ला असताना 12 वी गणिताचे क्लास घेतले त्यात 22 पैकी 18 मुलांना 80 च्या वर मार्क मिळाले हे खरे वाटत नाही. )
चौथी झाल्यावर पाचवीत गेलो तेंव्हा आपल्याला फक्त सोप्पी बेरीज, आणि दोना चा पाढा पाठ होता. बाकी पोरे 17 चा पण पाढा कसे म्हणतात हेच आपल्याला आश्चर्य.
तेंव्हा पासून मला 13, 17, 19, 23 हे अंक पण आवडत नाही त्याचे कारण हेच कि त्याचे पाढे अवघड होते.
पहिल्या चाचणीच्या परीक्षेत मला मराठी ला 11/30 आणि गणितात 14/40 असे मार्क पडून काठावर पास होता आले.
इतिहास आणि इंग्रजीत मात्र पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते.
मला गणितात काहीच येत नाही हे पाहून भोर बाईंनी मला उठवले, आणि प्रश्न विचारले, मी मोठ्या आवाजात सांगितले मला बेरीज सोडून काहीच येत नाही, वजाबाकी गुणाकार हि येत नाही.
हे ऐकून बाईना वाईट वाटले, त्या मारकट नव्हत्या.
त्यांनी मला घरी ये रविवारी असे सांगितले. आणि दोन तीन महिने त्या फुकट मला रविवारी शिकवत असत.
आणि आश्चर्याचा धक्का... सहामाही नंतर, तिसऱ्या चौथ्या चाचणी परीक्षेत मला 40/40 मार्क गणितात मिळाले होते. मी गणितात पहिला आलो होतो.
सहावीत माझे गणिताचे पेपर सर्व वर्गाला दाखवले जायचे. खरात बाईंचा मी आवडता विध्यार्थी होतो.
हो मोरे आणि घुनागे बाई याच सहावीतल्या शास्त्रा च्या. त्या मुळे शास्त्र हि माझे सुधारले.
गणितात तेंव्हा पासून जे मी topper राहिलो ते बीसीएस, एमसीए होई पर्यंत मी गणितात अव्वल होतो.
बीसीएस ला मी कॉलेज ला पहिला आलो होतो. आणि यात भोर बाईंचे उपकार होते. आज पर्यंत गणितच आपला आवडता विषय आहे.
( नोट : मागे आजीबाई यांचा शुद्धलेखनाचा धागा होता, त्यात त्यांच्या शिक्षकांचा उल्लेख होता, मी पण भोर बाई जर मराठीच्या शिक्षिका असत्या तर आजीबाई सारखे ह्या लेखा पेक्षा उगा शुद्धलेखन आणि मराठी च्या गोष्टी केल्या असत्या असे उगाच वाटले )
-- गणेश जगताप
16 May 2020 - 1:45 am | मोदक
उरळी कांचन म्हटल्यावर अनेक गोष्टी आठवतात..
पुलंच्या चित्रमय स्वगत मधले बापू कांचन डोळ्यासमोर येतात..
भुलेश्वर आणि सोलापूर बाजूला सायकल राईड व्हायच्या तेंव्हा हमखास हॉटेल कांचनला जेवणाचा थांबा असायचा. कवडेपाटला पक्षी बघायला गेल्यावर खास पुढे जाऊन किंवा भिगवणहून फ्लेमिंगो बघून परत येताना हॉटेल कांचन हा ठरलेला थांबा असायचा.
एकदा काय झालं..
मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कुणालातरी भेटायला गेलो होतो. लिफ्टमध्ये थोडीच लोकं होती आणि अचानक एक अॅप्रनवाली इंटर्न दिसावी अशी डॉक्टर मुलगी लिफ्टमध्ये शिरली. आत येताच लिफ्टमध्ये मागच्या बाजूला उभ्या असलेल्या एका समवयस्क डॉक्टरला तिने हाय केले. तो फॉर्मल कपड्यात होता पण अॅप्रन, स्टेथोस्कोप वगैरे कांही नव्हते. तिने त्याला विचारले.. "कुठे असतोस आता..?"
तो म्हणाला "UK" (इथे आम्हाला त्या डॉक्टर मुलाबद्दल कौतुक वाटू लागले)
मग तिने लगेच शांतपणे विचारले - "उरळी कांचन..?"
तो "हो" म्हणाला.
..आणि हे नवीन ज्ञान अचानकपणे सामोरे आल्याने लिफ्टमधील सर्वजण हसू लागले.
17 May 2020 - 12:37 am | गणेशा
आज आराध्याचा पावसात भिजतानाचा विडीओ तिच्या मामीने पाठवला.. या लॉकडाऊन मध्ये आराध्या गावाकडे गेलेली आता २ महिने होत आले.. अज्जीबात करमत नाही..
लाडक्या लेकीसाठी...
---------------------------
पैजंणांचा आवाज ऐकुन
चांदोबास ही गाणे सुचले
छम छम छम ताल धरता
फुलांनी त्यात सुर गुंफले ||
गायला मेघ म्हलार ढगांनी
चिवचिव गायीले चिमण्यांनी
पावसाची आली अल्लड सर
त्यात सर्वांनी भिजुन घेतले ||
17 May 2020 - 11:32 am | गणेशा
मेघ मल्हार असे वाचावे
17 May 2020 - 12:49 pm | चांदणे संदीप
तू त्यावेळी बोलत नसली तरी तुझं बोलणं शरीराच्या रोमारोमातून व्यक्त व्हायचं.
तुझे भिरभिर डोळे आणि त्यातली बेचैनी. बाहेर डोकावणार्या थेंबाना पापण्यांच्या कडांवर कितीतरी वेळ अडवून धरणं, त्यांना बाहेर पडू न देणं, हे कसं जमायचं ते तुझं तुलाच ठाऊक पण ते दिसायचं मला. केसांच्या बटा कितीतरी वेळा कानाच्या मागे खोचायचीस पण त्याही सारख्या निसटून वार्यावर उडत, कधी डोळ्यांवर तर कधी गालावरून हनुवटीच्या खालीपर्यंत वेढा टाकून बसायच्या. पायाचा अंगठाही मातीशी अविश्रांत बोलत रहायचा.
मावळतीकडे, डोंगरांच्या आड सूर्य गेल्यावर सभोवताली मंद संधिप्रकाश पसरून वार्याला जेव्हा शब्द फुटायचे तेव्हा ते गुंग होऊन ऐकत असतानाच अचानक तुझी निघायची सूचक हालचाल जाणवली की काळजात धस्स व्हायचे. झंकारणार्या वीणेची तार अचानक तुटल्यावर होते तसेच. तो कंप नकोसा वाटतो.
आजही तुझ्या नि माझ्या त्या अबोल भेटीचे गाणे एखाद्या सायंकाळी आठवते आणि मी ते गुणगुणत बसतो.
सं - दी - प
17 May 2020 - 12:58 pm | गणेशा
किती अलवार.. किती सुंदर..
वाचतच रहावे असे शब्द.. अश्या सुंदर भावना
17 May 2020 - 4:37 pm | मन्या ऽ
पुन्हा पुन्हा वाचत रहावी. इतकी सुंदर, ओघवती कविता.. आवडली
18 May 2020 - 4:48 pm | मन्या ऽ
मनाचे वारु सैरावैरा धावु लागले परत त्यांच्यावर ताबा मिळवण कठीण. किती गुरफटत जाते मी विचारांत. ठावच लागत नाही मनाचा.
तुला काय हवंय? असा प्रश्न केला तर सगळ्या इच्छा रेल्वे इंजिनाच्या डब्यासारख्या धडधडत एका मागोमाग रांग लावतात. म्हणुन आताशा हा प्रश्नच चुकीचा ठरवुन तो स्वतःला विचारण बंद केलंय मी.
मग उरत काय? तर आता काय मिळवायचंय? हा एकच प्रश्न विचारते मी स्वतःला. आणि त्याची उत्तर. ती च शोधतीये.
18 May 2020 - 11:51 pm | गणेशा
मन असतेच असे बिलोरी.. फसवं.
कधी वाटते हे मन म्हणजे नक्की कोण आहे? मीच तर नसेल ना?
मग पुन्हा असे वाटते माझे मन आहे म्हणजे मीच, माझीच भावना बाकी काय? .. ..
छे, काहीच नक्की होत नाही.. मी असेल तर ते असे मुक्त.. स्वैर.. स्वछन्दी कसे काय?
मी तर बांधून ठेवलय मला.. लोक काय म्हणतील.. कसे दिसेल.. ह्याला काय वाटेल.. त्याला काय वाटेल असल्या असंख्य बेड्यामध्ये गुरफटलेलोय मी..
हे मन म्हणजे मी नाहीच..
पण पुन्हा वाटते... माझीच तर इच्छा असेल की मन माझे..
माझ्या सारखच फुलपाखरासम इथं तिथं उडणारं.
विचारांच्या गर्तेत खोल खोल जाऊन ही, त्या भुलभुलैयातून पुन्हा रस्ता शोधणारं... आपसूकच शांत होणारं.. स्वताचीच स्वतः समजूत काढणारं.
19 May 2020 - 12:42 pm | चांदणे संदीप
मरणंच अटळ असेल तर,
आपल्या गावाकडं जाऊन मरूया...
असं म्हणत
जरूरीपुरती आणि झेपतील एवढी बोचकी घेतली
डोक्यावर, कंबरेवर, पाठीवर
त्याचं ओझं शरीराला लागत नव्हतं
मनाला भार जाणवत होता
तरीही लागले चालायला
इथल्या मरणापासून लांब
तिकडच्या जीवनाच्या शोधात..
त्याच्याच शोधात तर आधी
शहरात आले होते ते सारे
उधार्या, उसनंपासनं करून,
काहीबाही गहाण ठेऊन
हातातले हात सोडवून
पुढचं पुढं बघू असं म्हणत...
ओळखीच्याचा हात धरून आलेले
सुरूवातीला काहीच कळत नव्हतं, काय चाललंय
एकेक दिवस एकेक गोष्ट शिकवत होता
शहरात रूजवत होता
शिकले, रूजले,
आताशा कुठे जगायला लागले होते
काडी काडी करून एक
ओबडधोबड घरटे विणलेले
आता पुन्हा त्याच्या काड्या झालेल्या
पण या क्षणी परत गावाला जाताना प्रश्न होताच...
इथून मुळासकट उपटलेल्या आपल्या आयुष्याची रोपटी
पुन्हा गावाकडे जगतील? का जातील जळून?
शहराने शिकवलंच की!
गावही घेईल सांभाळून
आपल्या वाडवडिलांचं आहे ते
आई, मामा, मावशी, आत्या, काकांच
सारे तर तिथेच आहेत
काही जमिनिच्या वर
काही जमिनिच्या खाली
असा विचार करत...
एकेक पाऊल उचललं जात होतं
मरणंच अटळ असेल तर,
आपल्या गावाकडं जाऊन मरूया...
असं म्हणत!
सं - दी - प
19 May 2020 - 11:30 pm | मोगरा
मागच्या आठवड्यात, एक माऊली चालली होती आपल्या 2-3 लेकरांना घेऊन. महाराष्ट्र ते राजस्थान.
तिची इवलीशी एक पोर तिच्या मागून रडत खडत चालली होती.
इवले इवले पाय तापलेल्या रोडवर चालून काळेकुट्ट पडले होते.
तिच्या डोळ्यात मात्र तरीही ओढ होती कशाची तरी.
कदाचीत घरी पोहचल्यावर, तिला बाहुली चे आमिष दाखवले असेल किंवा गाडीचे, ह्या असल्या उन्हात तीचे चालणे मनाला लागले.
डोळ्यातून पाणी आले, पण आपण करतो का किंमत आपल्या विचारांची? बहुतेक नाही.
आपण आता टीव्ही पुढे बसून कोण बरोबर कोण चूक, कोणास काळजी हेच करतो आहोत..
त्या चालणाऱ्या इवल्याश्या मुलीचे मन तर कधीच करपून निघाले असेल, असल्या रखरखीत उन्हात आणि भावनाशून्य माणसांच्या कळपात.
20 May 2020 - 12:32 am | मन्या ऽ
न्युज चॅनेल लावला कि घरात ह्याच विषयावर चर्चा सुरु होतात. कोण चुक कोण बरोबर यावर वाद-विवाद! नको वाटत ऐकायला अन् यावर बोलायलासुद्धा. अशावेळी मी तिथुन लांब जाते. पण आत्ता मी बेडवर लोळत हा प्रतिसाद टाईप करतीये. यातच मी सुद्धा तशीच भरल्यापोटी चर्चा करणाऱ्या लोकांपैकी एक कोरड्या मनाची होत चाललीये का??.. अस वाटायला लागलंय..
21 May 2020 - 1:39 am | मन्या ऽ
आज लवकर झोपायचं ठरवलं अन् बेडवर आडवी झाले पण काही केल्या झोपच येईना..
शांततेत गाणी ऐकताना मन अगदीच अलवार कडु गोड आठवणींच्या नव्या-जुन्या पुस्तकाची पान एकेक करुन उलगडु लागलं.. असं मनन करतेवेळी वेळ किती छान जातो ना.. हे विचारायलाच नको.. आता फक्त एकच करायचं बाकी आहे. त्या आठवांची उब घेऊन शांत झोपी जायचंय. परत एकदा आठवणींच्या हव्याहव्याशा प्रवासात.. हातात हात घालुन शीळ फुंकत.. स्वप्नांच्या देशात.
21 May 2020 - 8:58 pm | गणेशा
12-13 तास काम असते आता, त्यामुळे नीट येता हि येत नाही..
पण आलोच आहे तर जाता जाता लिहतो काही सुचते तसे..
-----------
पहाटे पहाटे पैंजणांनी
मला जाग यावी
ओठांवर अलगद हलकीशी
तुझी कळी उमलावी
पाकळी पाकळी खुडताना
तू सुगंधी मोगरा व्हावी
मिठीत गच्च ओढता
तू मात्र वीज बनावी
-- शब्दमेघ
21st May 2020, 8:57 pm
23 May 2020 - 12:57 am | मोगरा
मी आता ढब्बू मोगरा झाली आहे
तू असेच बोलतो मला.
कशी असेना मी माझी
पण तुझी नजर लागू नये म्हणून अजूनही
तीळ माझ्या ओठांवर पहारा देत असते.
तू ढब्बू मोगरा बोलला की हे तीळ
तुला तिळ तिळ तरसवते.
23 May 2020 - 1:28 am | मन्या ऽ
खिडकीतला मोगऱ्याचा पहिला बहर ओसरल्यानंतर ह्यावर्षी परत मोगरा बहरलाच नाही. गेले 4-5वर्ष जसा उन्हाळा सरेपर्यत रात्र रात्र दरवळायचा. तसा ह्यावर्षी दरवळलाच नाही परत.. :( काय कारण असावे? त्याच्याच मोसमात त्याचे असे रुसायचे.. काही कळायला मार्ग नाही..
का जगभरातल्या "काळाच सावट" त्यालाही खोलवर कुठेतरी जाणवलं असेल? त्यांच्या दुःखात हरवुन तोही त्याच पुन्हा 'बहरण-दरवळण' विसरला असेल??
23 May 2020 - 8:22 am | गणेशा
प्रिती-राधा आणि मन्या भारी लिहिले आहे..
ढब्बू मोगरा -:)) -:))
मन्या.. तू खूपच मनाचे ठाव घेणारे लिहिते आहे.. खुप आवडले.
ज्या वेळी कविता लिहिली तेंव्हा गॅलरीत मोगऱ्याला फुल आले होते.
त्याचा पहिला फोटो काढला होता.. ते पहिले फुल या मोसमाचे.. आता असंख्य कळ्या आल्यात. पांढरी फुले मला कायम आवडतात.
आता हा मोगरा आहे की ढब्बू मोगरा -:)) -:))
अवांतर : पूर्वपरीक्षण मध्ये हा फोटो दिसत नाहीये.
गुगल फोटोज वरून फोटो दिसत नाहीत का येथे?
Src हि आहे. - https://photos.app.goo.gl/pGCqHysUHWrgT5Qf8
23 May 2020 - 8:22 am | गणेशा
प्रिती-राधा आणि मन्या भारी लिहिले आहे..
ढब्बू मोगरा -:)) -:))
मन्या.. तू खूपच मनाचे ठाव घेणारे लिहिते आहे.. खुप आवडले.
ज्या वेळी कविता लिहिली तेंव्हा गॅलरीत मोगऱ्याला फुल आले होते.
त्याचा पहिला फोटो काढला होता.. ते पहिले फुल या मोसमाचे.. आता असंख्य कळ्या आल्यात. पांढरी फुले मला कायम आवडतात.
आता हा मोगरा आहे की ढब्बू मोगरा -:)) -:))
अवांतर : पूर्वपरीक्षण मध्ये हा फोटो दिसत नाहीये.
गुगल फोटोज वरून फोटो दिसत नाहीत का येथे?
Src हि आहे. - https://photos.app.goo.gl/pGCqHysUHWrgT5Qf8
23 May 2020 - 8:58 am | मन्या ऽ
प्रतिसादात नाही. पण फोटो लिंकवर दिसतोय.
माझ्याकडे घरी बट-मोगरा आहे. पण रुसलाय ह्यावर्षी. :(
23 May 2020 - 12:44 am | मोगरा
उद्या सुट्टी असेल मग?
ह्या घरातून काम करणाऱ्या लोकांनी पार नको नको केले आहे.
शिऱ्या पण असे 8-9 तास काम करतो.
काय बोअर होते त्यांच्या मिटींग्स ने, कॉल ने.
ते लॉकडाऊन तोडून बाहेर गेलेलं परवडले असेच वाटत आहे मला तरी.
घराचे ऑफिस केले आहे सारे, अन किचन म्हणजे चहाच्या टपऱ्या.
23 May 2020 - 9:22 am | चांदणे संदीप
असं म्हणतात रात्रीच्या अंधारात चोर, लुटारू घराबाहेर पडतात.
पण इथे, दिवसाढवळ्या, जर कोणी अतीव सुंदर डोळ्यांच्या भुलीत पाडून लुटत असेल तर...
...तर आम्ही सर्वस्व लुटायला तयार आहोत!
सं - दी - प
23 May 2020 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार
इथे आहे भाजी ताजी, लवकर इकडे ये ,
चला घुसा घाई करा, थोड्या हिरव्या मिरच्या दे
तिकडे काय आहे बघू, चला वेळ उरला थोडा
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
गावालाही जायचे आहे, चला बस पकडू,
धावत धावत जाउ आपण, रांगबिंग मोडू
रांगेतबिंगेत उभा राहायला, समजला का मला येडा?
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
रस्त्यात थुंकू नको तर काय तुझ्या खिशात थुंकू?
शहाणपणा शिकवू नको, जा रे उगाच नको भुंकू,
तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हीच रस्ता झाडा
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
पोलिसाला काही समजत नाही, उगाच मारतो दांडू,
मी काय करायचे ते सांगणारा, कोण आहे हा पांडू?
घरीच बसा, बाहेर फिरु नका, यांचा रोजचाच पाढा
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे, फुकट सगळे दिले पाहिजे,
टॅक्सही माफ केले पाहिजे, अन अनुदानही दिले पाहिजे,
पैसे कमी पडले तर, सामान्य जनतेच्या तिजोर्याही फोडा
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
आम्ही करोना सोबत राहू पण, पण त्याला ते नको आहे
करोना प्राण घातक आहे, हे देखिल सपशेल खोटे आहे,
अख्या जगाच्या अनुभवावरुन आम्ही शिकणार नाही धडा
सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा
पैजारबुवा,
31 May 2020 - 2:28 pm | सस्नेह
=)) =))
23 May 2020 - 10:49 am | गणेशा
@ संदीप
तुझ्या शब्दात जादू आहे कसली तरी.. वाचतच बसावे वाटते बऱ्याचदा...
@ पैजार बुवा
तुम्ही प्रेरणा स्थानी.. एकसुरी लिखाणाला तुम्ही ज्या कलेने वेगवेगळे कंगोरे लिहून तसा आमचा विचार बदलावता ते खूपच भारी वाटते..
तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय...
इतर प्रतिसाद देणारे मनात इतके काहुर उठवतात की बस.. काय विचार.. काय शब्द वाचतच बसावे वाटते...
आज काहीतरी लिहीन आवरून आल्यावर... बघू...
तुम्ही सगळे लिहीत रहा.. वाचत आहे...
23 May 2020 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय...
मी पण हा धागा आणि एकंदरीत मिपाच मिस करतोय. सध्या कामाचा बोजा प्रचंड वाढला आहे की मान वर करायला देखिल सवड मिळत नाही.
पण तुम्ही सगळे मस्त लिहित आहात तुझा आणि संदिपचा प्रश्र्णच नाही पण या निमित्ताने या धाग्यावर काही नवी नावे दिसली त्यांनी सुध्दा १०० नंबरी अस्सल प्रतिसाद दिले आहेत.
मस्त मजा आली आज हा धागा वाचताना.
पैजारबुवा,
23 May 2020 - 2:44 pm | गणेशा
मला पहिल्यांदा आपली विशी खुप आवडायची.. बेधडक .. बेदरकार.. वाट्टेल तसे जगण्याची मज्जा काही औरच होती..
मग आपण तिशीत प्रवेश केला आणि मग जाणवले.. तिशी खुपच हँडसम असते.. खरा भारी पुरुष हा तिशीतलाच असतो असे आपले मत.
जीवनाचा काय बॅलंस साधलेला असतो.. प्रेम, माया, बाप, नवरा, अनुभव, घर, माणुस ,हळवा पण तितकाच कणखर.
ह्या तिशी वर पण आपण लय प्रेम केले... बाप असल्यामुळे हि ह्या तिशीत ही आपण पुन्हा बरेच बालपण जगुन घेतले...
आता ह्या तिशीचा हि उत्तरार्ध चालू झाला आहे... वाईट वाटते..
हे वयच असे आहे..
आता आपल्यालाच असे वाटते, की बाबा रे आता तुझ्या आयुष्यात खुप थोडे दिवस राहिलेत.. जगून घे.. आता नाही तर कधीच नाही.. संपतोयस तू..
उद्याचा दशकातला सूर्य तुझा नसेल.. बऱ्याच गोष्टी राहिल्यात.. राहू दे, दे सोडून.. पुन्हा नव्याने उठ.. नविन गोष्टी कर.. सर्वावर प्रेम कर.. मनसोक्त जग त्या ढगा सारखं.. मुक्त.. स्वैर.. स्वछंद...
24 May 2020 - 8:37 am | गणेशा
मृग बरसला की तो भेदभाव करत नाही...
कसल्याही आठवणींना तो सरळ सरळ झोडपून काढतो..
पापण्यांच्या प्रदेशात मग.. ढगही हुमसू हुमसू रडतो...
चंद्रखळ्यांचे तुडुंब भरलेले बंधारे मग फुटून जातात...
आठवणींच्या घरट्यात निजलेली स्वप्ने,
मग काहुर बनून सैरा वैरा पळू लागतात...
24 May 2020 - 10:10 am | चांदणे संदीप
पुन्हा आला हा पाऊस
पुन्हा हा स्पर्धा करणार
यंदाच्या पावसाळ्यात
कोण जास्त रडणार
सं - दी - प
24 May 2020 - 11:11 am | गणेशा
ती आता पावसात भिझायला येत नाही...
त्याला मग नायलाजानं माझ्या कडं यावं लागतं..
एक एक थेंबागणिक, तिला आठवावं लागतं..
तिच्या पापण्या पल्याड च्या गावा,
हि ओल पोहचत असेल काय?
24 May 2020 - 12:10 pm | चांदणे संदीप
तुझ्या आठवणींत भिजायला मला पाऊस लागत नाही...
आभाळात ढगांची नुसती दाटी झाली तरी मनात आठवणींच्या सरी पडायला लागतात
आणि मी भिजू लागतो... आतल्या आत!
सं - दी - प
24 May 2020 - 1:03 pm | गणेशा
इकडे लिहितो प्रतिसाद.. एका खाली एक खुप बारीक होतो प्रतिसाद.. वाचायला निट जमत नाही..
-------------
त्या ढगाला पण आता काही सुचत नसेल
तुझ्या स्वप्नझुल्यावर उगाच रेंगाळताना
पावसाला शब्दात पकडणे जमत नसेल...
आणि आता तळहातावर पाऊस पकडतोय,
तर तोही हात सोडतोय... तुझ्या सारखाच...
24 May 2020 - 8:58 pm | गणेशा
माझं अन पावसाचं नातं तसं फार जुनं आहे ..
तू नसताना माझ्या पाशी उगाच
त्याचे मागे मागे चुकार घुटमळणे आहे..
आणि आता, गालावरून ओघळताना एक एक थेंब मला
तू तिथे दिलेल्या हजारो मुक्यांचे हिशोब मागत बसला आहे...
24 May 2020 - 9:40 pm | मोगरा
तुला समुद्र आवडायचा.,
मला पाऊस!
मग पावसात मरीनड्राइव्ह वर
आपण असंख्य लाटा अंगावर झेलायचो.
नंतर एक लाट अशी आली की
मी पुण्यात फेकली गेली, कायमचीच.
24 May 2020 - 11:53 pm | चांदणे संदीप
शांतपणे किनाऱ्यावर बसून लाटा बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. काही लाटा सरावल्याप्रमाणे येत राहतात एकामागून एक आणि मध्येच एखादी असते जिला इतरांपेक्षा स्वतःला वेगळं दाखवायचं असतं. आपल्या क्षणभंगुर आयुष्याला उंच उठून वाकुल्या दाखवत किनाऱ्याच्या आणखी जरा जवळ येऊन ती आपलं वेगळेपण सिद्ध करते आणि पुन्हा विरून जाते. आपल्या आयुष्यात येणारी काही माणसंही अशीच लाटांसारखी असतात. काही सरधोपट तर काही उंच उठून वेगळं आयुष्य जगणारी.
सं - दी - प
25 May 2020 - 12:11 am | मोगरा
समुद्र म्हंटला की मला लख्ख चांदण्यात त्याच्या किनाऱ्यावर बसण्यास आवडते.
चंदेरी दिसणाऱ्या लाटा सुरेख. पण त्यांचा एका लयीत येणारा आवाज मनात घट्ट बसतो. कोकणात जाते तेंव्हा मी समुद्रावर अशी, रात्री जाते. रात्र मनात साठवणे म्हणजे काय हे तिथे कळते.
बाकी तारकांनी भरलेल्या अश्या असंख्य राती, कधी सख्या बनून सोबत राहतात.. कधी विस्मरणात जातात., मला भेटलेल्या माणसांसारख्या.
25 May 2020 - 4:18 pm | गणेशा
आज सकाळीच, फेसबुक वरील मित्राने koama lanbada ह्या गाण्या बद्दल लिहिले होते..
koama lanbada हे ते गाणे.
ते वाचले आणि त्या गाण्याला असंख्य वेळा पाहिले.. अशी डान्स असलेली गाणी , तसेच उत्कृष्ट संगीत असलेली गाणी मला खुप आवडतात.
मला संगीता मधले काही कळत नाही, डान्स चे ही तसेच, पण मनाला भिडले की ते आपले आवडीचे होते.
-----
कॉलेजला असताना वेगवेगळ्या भाषांतील गाणी पण यायची मला Ranu Ranantune Sinnado Sinnado हे तेलगु गाणे तर माझे पुर्ण पाट होते.. इलाई राजा हा आपला अजुनही आवडता संगितकार त्यामुळे त्याची असंख्य गाणी मी शब्द न कळताही ऐकलेली आहेत.. वा इलाई राजा म्हणजे संगिताचा बादशहाच.
===============
तर झाले असे
२०१६, ला कंपणीत पल्लवी माझ्या टीम मध्ये होती, चांगली मैत्रीण झाली नंतर ती, ती मला म्हणाली न येणार्या भाषेतील गाणी ऐकण्या पेक्षा तु इंग्लिश, पाश्चिमात्य गाणी का ऐकत नाही ? निदान २० % तरी कळतीलच की, आणी मग तीने काही गाण्यांची ओळख करुन दिली.. तिला ती गाणी यायची.. तीला वेस्टर्न लाईफचे आकर्षण होतेच .. मग माझा प्रवास सुरु झाला इंग्रजी गाण्याकडे.. तीला कोल्डप्ले आवडायचा.. मग त्याची असंख्य गाणी ऐकली, पाहिली..
त्यावेळेस मला ४-५ च गाणी यायची, तसे तेव्हडीच येतात अजुनही :-). इंग्रजी गाणी येणारे आणि कळणारे पाहिले की मला त्यांचा हेवा वाटतो.
ती ४-५ गाणीच अजुन ऐकतो मी मोबाईल ला, ती गाणी म्हणजे
- ब्लँक स्पेस. टेलर स्विफ्ट तर आपल्याला लय आवडली, मग तीची इतर ही गाणी बघितली, पण ब्लँक स्पेस म्हणजे क्या कहना..
- cheap thrills च्या गाण्या आणि डान्स मुळे तर मी वेडाच झाले.. आराध्या ला पण हे गाणे माझ्या रिंग टोन मुळे पाठ झाले.. भारीच
- Counting Stars हे OneRepublic चे गाणे पण मला आवडलेले.. पाठ पण होते.
- The Chainsmokers - Closer हे गाणे तर मला त्याच्या बिट्स आणि लोकेशन मुळे खुप आवडले.. जोडी काय दिसली आहे गाण्यात..
- perfect strangers पण खुप आवडले.
तर आपला हा येव्हडाच इंग्लिश गाण्यांचा संबंध.. मध्यतंरी डेस्पेसिटो आलेले, ते पण खुप आवडले. स्पॅनिश संगितात नक्कीच काही तरी जादू आहे असे मला नेहमी वाटते..
त्यामुळे आजचे कोअमा लाम्बाडा हे गाणे आणि तो डान्स प्रकार मनात घर करुन केला...
नुकताच एका मैत्रीणीने , डर्टी डान्सिंग पिक्चर बघायला सांगितला त्यामुळे पाहिला , वा काय मस्त डान्स स्टाइल्ची माम्बो पद्धत.. वा..
आजचा दिवस असा डान्स आणि संगिताने परिपुर्ण भरलेला आहे हे नक्की..
मध्येच मग मी आपली आवडीची शकीरा पण ऐकली...
कधी कधी अशी गाण्यांची, संगिताची वातावरणात एक वेगळीच नशा चढते.. मजा येते.
गेल्या आठवड्यात - केंव्हा तरी पहाटे उलटुन रात गेली, गेले द्यायचे राहुनी आणि ती गेली तेंव्हा पाऊस या गाण्यांनी अशीच माझ्याबोवती रुंझी लावली होती..
अवांतर : डान्स आपल्याला येत नाही, पण गेल्या वर्षी kuala lumpur मध्ये रात्री १-२ ला मी रस्त्यावर भटकायचो तेंव्हा लोकल डान्स बँड मध्ये जावून त्यांच्या तालावर थिरकलो होतो .. वा. भारतात ही डेअरींग कधी करता आली नाही. २०१६ -१७ ला जेव्हडे पब बार मध्ये डान्स केले तेव्हडेच नी आतापर्यंत केलेले डान्स, सहज आठवले हे. आता वाटते आपण डान्स शिकायला हवा होता.. असो.
25 May 2020 - 8:36 pm | अनन्त्_यात्री
.....एका अमावास्येच्या मध्यरात्री कळसूबाई शिखराच्या तळटेकड्यांमधल्या गावात मुक्कामाला असताना आकाशात चा॑दण्या॓चा खच पडलेला दिसला अन त्याचवेळी जवळच्या टेकडीच्या माथ्याशी पिठुर चांदण्यात न्हालेले ढग भिडताना दिसत होते, त्या म॑त्रमुग्ध वातावरणात एक कविता सुचली होती. (जी नंतर मिपावर दिली होती)
मला वाटतं प्रत्येक कवितेला अशी एक जन्मकथा असते!
25 May 2020 - 10:04 pm | गणेशा
@ अनन्त्_यात्री
माणुस म्हणलं की त्याचे विचार आले.. त्याचे भावविश्व आलं..
त्याने पाहिलेले, अनुभवलेले, मी तर म्हणेल त्याने जगलेले क्षण आले.
ह्या सगळ्या गोष्टींना शब्द मिळाले की कविता तयार होते..
कधी कधी ती असते त्या विचारांप्रमाणे भरकटलेली.. तिच्या केसांच्या सारखी..
कधी असते ती, तिच्या नटलेल्या रूपा सारखी, लय बद्ध.
कधी कधी अवतरते ती , चांदण्यांनी भरलेल्या आकाशासारखी..
मग कवी ओंजळीत भरून घेतो ते शब्दचांदणे.. चंद्रभूल म्हणा हवे तर...
25 May 2020 - 10:36 pm | मोगरा
चंद्रभूल, शब्दातच अशी भूल आहे की त्या चांदण्यारातीला सगळे विसरून मन त्याच्याकडे धाव घेते., भूल नाही नशाच ती.
मेले ढग तेथे हि मध्ये येतातच. काय करावे या द्वाड ढगांचे?
25 May 2020 - 10:51 pm | प्रचेतस
मग हळूच ढगांच्या पडद्याआडून झाकला चंद्र बाहेर येतो, काळ्या मेघांची किनारही रुपेरी होऊन जाते. रोहिणी चमकू लागते, चंद्रालाही तिची भूल पडू लागते.