सध्या टीव्हीवर नव्या मालिका प्रक्षेपित होत नाहीत, त्यामुळे सगळेच जण बातम्याच बघतात. बातम्या सगळ्या कोरोनाच्याच असतात.
"एक मोठी बातमी येतेय" किंवा लालभडक पार्श्वभूमीवर "ब्रेकिंग न्यूज" असं म्हणत प्रत्येक गावात, जिल्ह्यात,मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात (कंटाळा आला ना लिस्ट वाचून) रोज किती रुग्ण वाढताहेत, बळी पडताहेत, किती बरे होताहेत, याची आकडेवारी सांगितली जाते.
ते महत्वाचं असेल, पण रिपीट रिपीट तेच बघायचा खरंच कंटाळा येतोय हेही खरं.
या माध्यमांनीच आपल्याला सतत कुठल्या कुठल्या ब्रेकिंग न्यूज देऊन शेफारून ठेवलंय. आपल्याला आता बातम्यांतही नावीन्य पाहिजे. आसपास सतत काहीतरी नवीन घडलं पाहिजे. नव्याचा हव्यास जडवलाय ह्या माध्यमांनीच. त्यामुळे रिपीट बातम्या नको वाटतात. चहा पिता पिता आणि सँडविच खाता खाता आपण आरामात ह्या कोरोनाच्या बातम्या बघतो. बातम्या म्हणजे मनोरंजन. करमणूक. मन निब्बर झालंय. शरम वाटते पण हेही मनोरंजन आता होईनासं झालंय.
टीव्हीवर निवेदिका एक बातमी सांगते, मग म्हणते,"याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. तो कोणत्याश्या गावी असतो. मग त्याच्याशी जोडल्यावर तो "प्रतिनिधी 'अधिक' वेगळं काहीही न सांगता तेच डिटेल्स सांगतो जे निवेदिकेनं एकदा सांगितलेले असतात. माहितीत कुठलीच भर पडत नाही. आणि कमाल म्हणजे प्रतिनिधीनं सांगितलेली बातमी त्याचा संपर्क संपल्यावर तीच निवेदिका पुन्हा एकदा जाता जाता सांगते. (हेच वर्तमानपत्रांच्या बाबतीत.
पान क्रमांक अमुक वर पुढील बातमी असं छापतात आणि पुढील पानावर तेच डिटेल्स पुन्हा छापतात. सध्या पेपरही येत नाहीये.)
म्हणजे तीच ती बातमी आपण तीन वेळा ऐकतो.
सगळ्याच प्रतिनिधींचे आवाज चांगले नसतात. काहीजण पडेल आवाजात बोलतात. काहीजण खालच्या पट्टीत ,खर्जात बोलतात. काहीजण अति उंच पट्टीत बोलतात. काहीजण खूप जास्त बोलतात किंवा काहीजण खूपच थोडक्यात आटोपतात.
बातमी देणारा मुख्य निवेदक/निवेदिका मात्र सतत अतिशय उत्तेजित होऊन बोलतात. होम शॉपिंग चॅनेल्स, नापतोल वगैरेवर सेल्सपर्सन्स जसे उत्तेजित आवाजात बोलतात तसेच हेही. जणु त्यांना बातम्या लवकरात लवकर "सेल" करायच्या असतात. सगळेच जण खूप फास्ट बोलतात. बोललेले शब्द ऐकून, मेंदूपर्यंत त्याचा संदेश जावून बातमीचं आकलन तर झालं पाहिजे?!
फार नाही तीन सेकंद द्या, श्वास घ्यायला तरी थांबा. वाघ मागं लागल्यासारखे बोलतात. पाच मिनिटांत पन्नास बातम्या, दहा मिनिटांत शंभर बातम्या. फटाफट न्यूज. जुन्या काळात डबल स्पीडने ग्रामोफोन रेकॉर्ड लावावी तसं.
काही हिंदी न्यूज चँनल्सवर खूप ओरडून बोलतात. त्यामुळे 'शोर ज्यादा न्यूज कम' असा प्रकार होतो. त्यापेक्षा सह्याद्रीवरच्या शांत स्वरात दिलेल्या बातम्या कानाला चांगल्या वाटतात. पण त्यांत चालू सरकारची भलामण असते तीही सारखी कंटाळवाणी वाटते. सह्याद्रीचा तांत्रिक दर्जा,आवाजाची गुणवत्ता तेवढी चांगली नसते. खाजगी चँनल्सची तांत्रिक गुणवत्ता मात्र फार चांगली असते.
एका चॅनलवरच्या दोन वार्ताहर मुलींचे आवाज इतके खरखरीत आहेत की फरशीवर कुणीतरी पत्रा घासतंय असं वाटतं.
निवेदक प्रतिनिधीला "अधिक माहिती" विचारतो पण त्यानं जराही विस्ताराने सांगत वेळ लावल्यास किंवा दुसरी अधिक महत्वाची बातमी , व्यक्ती आल्यास त्याला सरळ कट् करतो. यात त्या बिचाऱ्या प्रतिनिधीचा अपमान होतो.
बातम्यांत सारखे ब्रेक्स येतात. काही हिंदी चँनल्सवर तर बातमी एक मिनिट आणि जाहिराती पाच मिनिटे दाखवतात. जाहिरातींनी हाही मिडीया अक्षरशः पोखरुन काढलाय. शिवाय राजकीय प्रभाव न्यूज चॅनेलगणिक जाणवतोच. असो.
दर अर्ध्या तासाने बातम्या लावायच्या म्हणजे म्हणजे प्रेक्षकांना बातम्यांचा सतत खुराक काय पुरवणार? मग त्याच त्याच बातम्यांचं पीठ पुन्हा पुन्हा जात्यात घालून दळणं आलंच.
पडद्यावर अर्ध्या भागात निवेदक, उरलेल्या अर्ध्या भागात ब्रेकिंग न्यूजचा मजकूर. खाली एक पट्टी सरकत असते. सर्वांत वर एक पट्टी सरकत असते. डाव्या भागात जिथं निवेदक असतो तिथं जाहीराती झळकत असतात. प्रेक्षकांनी नक्की काय बघायचं. मला तर लहान मुलाच्या तोंडात दाई जबरदस्तीनं घासावर घास कोंबतेय असं वाटतं.
प्रेक्षकांच्या मनाला उत्तेजित करण्याचे, त्यांचं हपापलेपण वाढविण्याचे हे सगळे उद्योग आहेत असे वाटते. यापेक्षा रेडिओवरच्या बातम्या चांगल्या. निवेदकाचा आवाज स्थिर. सावकाश, स्पष्ट उच्चार. योग्य गति. आणि बातम्यांचा मर्यादित अवधि. त्याचा परिणाम अधिक प्रभावीपणे पडतो. त्या फक्त 'ऐकण्याच्या' असल्याने डोळ्यांवर आणि मेंदूवर अतिरिक्त ताण पडत नाही.
मगाशी लिहिल्याप्रमाणे सध्या कोरोनाच्या बातम्याच फक्त दिल्या जाताहेत. राजकीयदृष्ट्या महत्तवाच्या कितीतरी बातम्या जाता जाता थोडक्यात दिल्या जातात. ट्रंप चीन संबंध, पी ओ केचं हवामानवृत्त भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या देणं, भारत चीनमधला डोकलाम संघर्ष, भारत नेपाळ बिघडलेले संबंध, भारत पाक सीमेवरच्या चकमकी, या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या मला इंग्रजी,हिंदी वृत्तवाहिन्यांवर कळल्या. स्थानिक वाहिन्यांवर अनेक ठिकाणी त्याचा उल्लेखही नाही. काही बातम्या तर लपवल्या गेल्या त्या यू ट्यूबवरुन कळल्या. यांत बातम्यांचा समतोल कुठे आहे?
एक मात्र खरं टीव्हीच्या पँनेलवर बसून लाईव्ह कँमेरा फेस करणं, बातम्यांच्या क्लिप्स,वार्ताहरांशी संपर्क, तज्ज्ञांशी संपर्क, त्याचवेळी समोरच्या न्यूज इतक्या वेगानं न अडखळता वाचणं, कौशल्याचं काम आहे. खायचं काम नाही. फार मोठं प्रसंगावधान त्यासाठी लागतं. मी रेडिओवरच्या लाईव्ह डायल इन कार्यक्रमाच्या वेळी अनेकदा त्याचा अनुभव घेतला आहे.
फक्त थोडं "शोर कम, न्यूज ज्यादा" हे ब्रीद ठेवावं इतकंच.
प्रतिक्रिया
26 May 2020 - 11:46 am | Nitin Palkar
नेहमीप्रमाणेच छान लेख. "जुन्या काळात डबल स्पीडने ग्रामोफोन रेकॉर्ड लावावी तसं" .... उपम खूपच आवडली. यातली मजा ज्याने अनुभवलीये त्यालाच कळेल.
26 May 2020 - 8:05 pm | शेखरमोघे
"जुन्या काळात डबल स्पीडने ग्रामोफोन रेकॉर्ड लावावी तसं" ही मजा तर आहेच पण त्याही आधीच्या काळात जुने ग्रामोफोन विजेवर किन्वा "ब्याटरी"वर चालत नसत. त्यामुळे सुरू करण्याआधी, जशी अलार्म किन्वा भिन्तीवरच्या घड्याळाला किल्ली फिरवून "चालते करावे/ठेवावे" लागत असे, तसे या ग्रामोफोनना आधी "ह्यान्डल मारून" त्याना चालण्यास तयार करून, मग हळुवार तबकडी जागेवर ठेवून, सुई व्यवस्थित पुसून इ.इ. अशी सगळी तयारी करून मगच ते सुरू करावे लागत. जर पुरेसे "ह्यान्डल मारलेले नसले तर" मधेच ऐकू येणारा आवाज बरळल्यासारखा येत नन्तर बन्द पडत असे. त्यानन्तर पुरेसे "ह्यान्डल मारलेले नसल्याची" जबाबदारी कुणाची यावर वादविवाद होऊन मगच गाणे ऐकणे पुढे चलू होई.
26 May 2020 - 11:59 am | कुमार१
सहमत.
अजून एक.
बहुतेक दृश्य आणि काही छापील माध्यमांनी "कोरोना" हा चुकीचा उच्चार रूढ केला आहे .
शब्दकोशानुसार योग्य उच्चार kuh-roh-nuh असा आहे.
तसा अचूक मराठीत लिहिणे अवघड आहे. पण "को" नक्कीच नाही.
26 May 2020 - 12:05 pm | गवि
अहो डॉक्टर, काही न्यूज रीडर "करुणा" असाही उच्चार करतात. :-)
27 May 2020 - 1:29 am | वीणा३
हे भगवान !!!
26 May 2020 - 7:21 pm | चौकटराजा
तुम्हाला बातमी मोडून तोडून सत्याचा अपलाप करून लिहिता येत असेल तर तुम्ही खरे बातमीदार . यू आर सिलेक्टेड !
तुम्हाला आरडाओरडा करून वरच्या पट्टीत कोकलता येत असे तर तुम्ही खरे न्यूज रीडर ! यू आर सिलेक्टेड !
तूम्हाला आपण चर्चा संचालक असून भागीदार नाही याचे भान राहात नसेल तर तुम्ही खरे चर्चा संचालक यू आर सिलेक्टेड !
तुम्हाला एकूणच कहर,दबंगगिरी ,थैमान , विषय ऐरणीवर ,धुमशान,,धमाल, विळखा ,चाकरमानी,अडचणीत वाढ ,थरारनाट्य ,गांधीगिरी,,धुरळा असे शब्द जन्मजात आले पाहिजॆत यू आर सिलेक्टेड !
26 May 2020 - 9:03 pm | अनिंद्य
:-))
27 May 2020 - 8:51 pm | प्रमोद देर्देकर
अहं एक नेहमीच वापरला जाणारा शब्द कसा काय विसरलात चौरा काका...
"टिम्ब टिम्ब च्या पार्श्वभूमीवर "
26 May 2020 - 7:28 pm | गणेशा
भारी लिहिले आहे
26 May 2020 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>एका चॅनलवरच्या दोन वार्ताहर मुलींचे आवाज इतके खरखरीत आहेत की फरशीवर कुणीतरी पत्रा घासतंय असं वाटतं.
फोटो प्लीज. पाहिलं असेल त्यांना. चायनल कोणतं. :)
>>>>प्रेक्षकांनी नक्की काय बघायचं. मला तर लहान मुलाच्या तोंडात दाई जबरदस्तीनं घासावर घास कोंबतेय असं वाटतं.
हा हा हा अगदी खरं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आता बातम्या कमी केल्या आहेत. एक महत्वाची बातमी, एक अत्यंत महत्वाची बातमी येतेय. काहीच महत्वाचं नसतं. कंटाळा आलाय टीव्हीवरील बातम्यांचा. आता वृत्तपत्र बरे वाटू लागले आहेत.
-दिलीप बिरुटे
26 May 2020 - 7:56 pm | सुबोध खरे
यावर एक विनोद आठवला
एकदा एक माणूस पत्रकार पदासाठी मुलाखत द्यायला गेला होता.
त्याची मुलाखत घेणाऱ्या संपादकाने त्याला विचारले कि ---तुम्ही स्वतःला शहाणे समजणारे, अहंमन्य, ढोंगी आहात का ?
उमेदवार -- नाही
संपादक-- तुम्ही गेंड्याच्या कातडीचे, डोमकावळ्याच्या नजरेचे, ज्याच्या त्याच्या कडे संशयाने पाहणारे असे आहात का?
उमेदवार -- नाही, नाही
संपादक -- तुम्ही एक नंबरचे खोटारडे, या बोटीची थुंकी त्या बोटावर करणारे, आपली चूक कधीही मान्य न करणारे, सतत समोरच्याला घालून पाडून बोलणारे आहात का?
उमेदवार -- नाही, नाही, कोण म्हणतो मी असा आहे?
संपादक -- मग तुम्ही पत्रकार म्हणून नोकरी करण्यास लायक नाही.
उमेदवार ( दोन मिनिटं विचार करून) -- साहेब दहाच मिनिटे थांबता का ? मी आमच्या हिला पाठवून देतो. ती पत्रकार व्हायला एकदम लायक आहे.
26 May 2020 - 8:08 pm | शेखरमोघे
छान लेख. आवडला. कितीतरी वेळा बातमी बोटभर आणि त्यावरच्या (त्याच त्याच) प्रतिक्रिया हातभर हा प्रकार होत असल्यामुळे काही वेळा चित्रवाणी सन्च "अबोल" ठेवणे हाच एक उपाय वाटू लागतो.
26 May 2020 - 9:46 pm | वामन देशमुख
नेहमीप्रमाणे लेख आवडला आजीबाई! लेखातील भावना पोचल्या, बऱ्याचदा असाच अनुभव आला आहे.
खरंतर मला टीवी आणि एकूणच चलतचित्र या माध्यमाची फारशी आवड नाहीच; व्यावसायिक वृत्तवाहिन्यांची तर मुळीच आवड नाही.
बाकी, दैनंदिन जीवनातील प्रसंगांचे वर्णन करण्याची तुमची picturesque शैली मनापासून आवडली आहे हं!
26 May 2020 - 9:56 pm | अनिंद्य
लेखाशी सहमत. कर्कश्यतेशी फारच वाकडे असल्याकारणाने बातम्या ‘पहाणे’ बंद केले आहे.
चँनली भाषा, वाघ मागे लागल्यासारखी / सतत चाकूचे घाव झेलत असल्यासारखी तारसप्तकातील बडबड यांचा वीट आला आहे.
सर्वात हास्यास्पद काही असेल तर टीव्ही वार्ताकाराने ‘जसे की आपण बघू शकता’ हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणणे ! Come on, it’s tele’vision’ !
27 May 2020 - 1:40 am | वीणा३
लेख छान. तुमचे लेख नेहमीच वाचते, आवडतात. लिहित राहा अशाच.
इतर जगातही ब्रेकिंग न्युज दाखवतात, पण आपल्याकडेच एवढा आरडा ओरडा असतो असं वाटतं. इतकंच नाही तर लहान मुलांची बाहेरच्या देशातली खेळणी सुद्धा कमी आवाजाची आणि भारतातली खेळणी प्रचंड आवाज करणारी असतात. एकूणच आवाज प्रदूषण जास्त असल्यामुळे ऐकू नाही गेलं तर, म्हणून आधीच आवाज जोरात करत असावेत :P.
मागे एकदा youtube वर एका पाकिस्तानी चॅनेल चा विडिओ दिसला. कुठल्यातरी विषयावर चर्चा चालू होती. प्रत्येकजण आपापलं मत मांडत होता. प्रत्येकाची मतं अगदी वेग-वेगळी होती, पण कोणीही स्वतःची वेळ आल्याशिवाय बोलत नव्हता. आणि अँकर (सूत्रधार? मुख्य निवेदक ?) चक्क लोकांना बोलायची संधी देत होता. अगदीच दुर्मिळ दृश्य होतं ते.
मराठी मालिका चित्रपटाले कलाकार सुद्धा खूप जोरात ओरडून बोलतात. कधी कधी सांगावंसं वाटतं कि तू टीव्ही वर काम करत्येस / करतोयस, नाटकात नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या प्रेक्षकाला ऐकू जाईल इतकं ओरडून बोलायची गरज नाहीये.
27 May 2020 - 8:06 pm | चौकटराजा
मराठी चानल वर माझी प्रतिक्रिया अशी होती.
" तुम्हाला माहीत नाही लोक तुमच्यावर किती संतापले आहेत .एके दिवशी मार खाल लेको !
27 May 2020 - 11:12 am | रातराणी
छान लिहिलंय. बातम्या हल्ली अजिबात पहावत नाहीत. निव्वळ पाट्या टाकायचे काम करत असतात असं वाटतं. कुणीही बातमी काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचे होणारे परिणाम यावर खरोखर अभ्यास करून बोलत नाही. आकडेवारी सांगायची तर इतकी महान पद्धत आजवर पाहिली नव्हती. स्त्री किती, पुरुष किती, नवीन किती, जुने किती, बरे किती, किती मृत, किती हॉस्पिटलमधून घरी सोडले, किती घरात quarantine त्याला काही लिमिटच नाही. हे सगळं कधी एका जिल्ह्यासाठी असतं तर कधी एका शहरासाठी. कशाचा कशाला मेळ नाही. चिडचिड करून घेण्यापेक्षा बातम्या बघणं बंद केलं आहे आता.
27 May 2020 - 8:22 pm | Prajakta२१
खूप छान लिहिलेय आज्जी
पु ले शु
27 May 2020 - 9:53 pm | जव्हेरगंज
27 May 2020 - 10:14 pm | जव्हेरगंज
एक टी.वी. पत्रकार एक
शेतकर्याच इंटरव्यू
घेत होता...
पत्रकार : तुम्ही बैल ला काय खाऊ घालता...??
शेतकरी : काळ्याला की
पांढर्या ला ...??
पत्रकार : पांढर्याला..
शेतकरी : गवत..
पत्रकार : आणि काळ्या ला.??
शेतकरी : त्याला पन गवत ..
पत्रकार : तुम्ही या बैलांना
कुठे बांधता .??
शेतकरी : काळ्या ला की
पांढर्याला...??
पत्रकार : पांढर्याला..
शेतकरी : बाहेर गोठ्यात..
पत्रकार : आणी काळ्याला...??
शेतकरी : त्याला पन बाहेर गोठ्यात...
पत्रकार : आणि यांना अंघोळ कस घालता...??
शेतकरी : कुणाला काळ्याला की पांढर्याला...??
पत्रकार : काळ्याला ..
शेतकरी : पानी न..
पत्रकार : आणि पांढर्याला.??
शेतकरी : जी त्याला पन पानी न..
पत्रकार चा राग नाकाच्या शेंड्यावर ,
म्हणाला : अबे ! जर दोघाला पन सगळ एकसारख करतोस तर मला सारखं सारख का विचारतोस काळ्याला की पांढर्याला ...????
शेतकरी : कारण काळा
बैल माझा आहे...
पत्रकार : आणि पांढरा बैल??
शेतकरी : तो पन माझाच आहे...
पत्रकार बेशुद्ध...
शुद्धिवर आल्यावर ...
शेतकरी :आता कळले का भाड्या जेव्हा तुम्ही एक च News ला दिवसभर Breaking News करून फिरवुन फिरवुन दाखवता तेव्ह आम्ही पन असच
दु:खी होतो।
शेतकर्याचा नाद नाय करायचा
28 May 2020 - 12:47 pm | अभिबाबा
लेख एकदम झकास, तुमच्या लेखातील मतांशी सहमत आहे, पण अाजीबाई, आत्ताचे करोना येईतोवरचे जग टी ट्वेंटीचे होते. या खेळामध्ये टीमला वीस मिनिटे तरी मिळतात , .परंतु निवेदकाला मात्र दहा सेकंद ते दोन मिनिटांत फटकेबाजी करायची असते.त्यामुळे तो नुसते शब्द ओततअसतो.आणि जर मजकूरमसाला कमी पडला तर पुन्हा एकदा "तेच ते नि तेच ते" उगाळत राहाव लागतं त्याला . बिचारा!
आता कोविड कृपेने पूर्वीचे कार्यक्रम बघता येतात त्यामुळे तो सगळा माहोल, शांतपणा अनुभवता येतोय व त्याचा आनंद घेता येतोय नव्या पिढीला. मला वाटत की हेच यापुढे परत सुरू रहाव, म्हणजे कान किटाळून टीव्ही बंद करायची नौबत नाही येणारा आमच्यावर !
28 May 2020 - 1:01 pm | सतिश गावडे
न्युज चॅनेल हे बातम्यांच्या नावाखाली जाहीराती विकत असतात. जास्तीत जास्त लोकांनी जाहीराती पाहण्यासाठी बातम्यांमध्ये रोज नाविण्य आणण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.
तो "हे आहे, जे आहे, ते आहे, या ठिकाणी, त्या ठिकाणी" प्रकारही फालतूपणा आहे.
29 May 2020 - 8:29 am | रात्रीचे चांदणे
फारच मस्त लिहिलंय अज्जे तू.
फक्त तुला एकाच विनंती. तू तुज्या आज्जी विषयी असलेल्या आठवणी विषयी एक लेख लिहून टाक.
29 May 2020 - 11:04 am | सोज्वळ
पत्रा घासण्याचा आवाज ही उपमा आवडली. वार्ताहर डोळ्यासमोर (हातात माईक घेऊन जड डोळ्यांनी) उभी राहिली :)
खरं म्हणजे आधीच खंडीभर चॅनेल्स आणि त्यात आपण पत्रकार आहोत की वार्ताहर याचे झालेले स्वाभाविक विस्मरण यातून गोंधळ झाला आहे.. कान उपटले ते बरं केलंत !!
30 May 2020 - 12:38 am | मदनबाण
आजी सध्या अल्टरनेट मिडियाचा बोलबाला आहे, काही मेनस्ट्रीम मिडियाला आता कुठे त्यांचे महत्व समजायला लागले आहे ! काही वर्तमानपत्र तर तैमुर डायरियाने अजुनही ग्रस्त आहेत !
बादवे... तु बातम्यांच विश्लेषण भारी केलयस ! लैच अपडेटेड राहतीस म्हणायच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum
30 May 2020 - 3:13 pm | आजी
नितीन पालकर-ग्रामोफोन रेकॉर्डची उपमा आवडली?थँक्स.
शेखर मोघे-तुम्ही जुन्या काळच्या ग्रामोफोनचं वर्णन अगदी सविस्तर केलंय.एकदम सही.
कुमार१-तुम्ही सांगितलेला कोरोना चा उच्चार 'ऐकूनच'समजेल.'लिहून'नाही.
गवि-कोरोना ऐवजी करुणा उच्चार?हाहाहा.करुणा भाकायचीच वेळ आणलीय कोरोनाने.
वीणा३-हे भगवान!
चौकटराजा-तुम्ही दिलेली न्यूज रीडर,चर्चा संचालक यांची मुलाखत परफेक्ट.जाम हसू आलं.
अनिंद्य-धन्यवाद.
गणेशा-भारी लिहिलंय!धन्यवाद.
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे-तुम्ही त्या वार्ताहरांना नक्कीच ओळखू शकाल!आता तुम्हांला वर्तमानपत्र बरं वाटतंय?मलाही.
सुबोध खरे-सॉलीड हाणलायत तुम्ही टोला पत्रकारांना!पण बायकोवर कशाला हो विनोद? एनी वे.
शेखर मोघे-चित्रवाणी संच 'अबोल'ठेवणे हाच उपाय हे तुमचे म्हणणे पठले.
वामन देशमुख-माझी शैली तुम्हांला आवडते हे वाचलं. मी दैनंदिन जीवनातल्या प्रसंगांचे चित्रमय वर्णन करते', हा तुमचा अभिप्राय वाचून बरे वाटले.थँक्यू.
अनिंद्य-तुम्ही बातम्या बघणं बंद केलंय?सही.मीही आता दिवसातून एकदाच बघते.
वीणा३-आपल्याकडे चँनेल्सवर एकूणच'आवाज'फारच असतो .हे विधान पटलं.माझे लेख नेहमीच आवडतात?बरं वाटलं वाचून.थँक्स.
चौकटराजा-एके दिवशी मार खाल लेको हे तुमचं 'चानल'वाल्यांना उद्देशून टाकलेलं वाक्य जाम आवडलं.
30 May 2020 - 3:14 pm | आजी
रातराणी-"कशाचा कशाला मेळ नाही,चिडचिड करण्यापेक्षा बातम्या बघणं बंद केलंय आता"हा तुमचा मार्ग अनुसरणीय आहे.
प्राजक्ता-"छान लिहिलयंस आजी"हा तुमचा अभिप्राय सुखावून गेला.
जव्हेरगंज-तुम्ही पाठवलेला व्हिडिओ विचार करायला लावणारा.बोचरा उपहास व्यक्त करणारा.
शिवाय शेतकऱ्यानं पत्रकाराला दिलेलं उत्तर सडेतोड आणि लाजवाब.
अभिबाबा-हे टी ट्वेन्टीचे युग आहे .निवेदकाला दहा सेकंदांत फटकेबाजी करायची असते,हे तुमचं मत खरं आहे. पटलं.
सतिश गावडे-तुमच्या मताशी सहमत.
रात्रीचे चांदणे-मी माझ्या आजीसंबंधीच्या आठवणी लिहू?नक्की लिहेन.
सोज्वळ-"कान उपटलेत ते बरं केलंत "हा तुमचा अभिप्राय पोहोचला. मी कोण हो कान उपटणारी?मी एक सामान्य प्रेक्षक आहे.
मदनबाण-"लैच अपडेटेड राहतीस म्हणायचं" हे वाक्य आवडलं. माझ्या कामाचं स्वरुपच असं होतं की अपडेटेड राहावंच लागायचं.आता ती सवय झाली.
11 Jun 2020 - 9:21 pm | बिपीन सुरेश सांगळे
लेख आवडला