अंदमान - निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला व आजही तितकाच स्वच्छ व सुंदर असलेला द्वीपसमूह.
अरसिकालाही सौंदर्याची प्रेरणा देणारा हा आपला भूभाग; पण काळया पाण्याच्या शिक्षेवर दंडाबेडी घातली असताना अंदमानात पाऊल टाकणाऱ्या बॅरिस्टर सावरकरांना मात्र या ठिकाणी आढळले ते संरक्षणदृष्टया महत्वाचे असलेले हिंदुस्तानचे पूर्वेकडील प्रवेशद्वार.
२०१० सालच्या मार्च महिन्यात पोर्ट ब्लेअर येथे झालेल्या स्वा.सावरकर मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंदमानला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यानंतर भेट देण्याच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर होते हिंदुस्तानच्या क्रांतिवीरांच्या यातनांनी निर्माण झालेले तीर्थक्षेत्र -- 'सेल्युलर जेल'. तिथे पोहोचलो त्या दिवशी व त्यानंतर अनेकदा या मंदिरात जाऊन 'काळया पाण्याच्या शिक्षेवरील क्रांतिकारकांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची आम्ही संधी घेतली.
१९११ ते १९२१ ही दहा वर्षे सावरकर अंदमानमध्ये बंदी होते. या काळात त्यांनी व इतर कैद्यांनी भोगलेल्या यमयातना हा एक वेगळा अध्याय आहे. परंतु असा छळ सोसत असतानाही अशिक्षित कैद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सावरकरांनी तुरुंगात केलेल्या प्रयत्नांतील 'सोनेरी पान' ठरेल - 'नालंदा विहार'.
अंदमानातल्या बंद्यांपैकी सुमारे ९० टक्के कैदी अशिक्षित होते. त्या ठिकाणी वेळही भरपूर होता. अशावेळी या बंद्यांच्या देशभक्तीला शिक्षणाची जोड दिली तर आपल्याच स्वतंत्र होणा-या राष्ट्राला त्याचा फायदा होईल या भूमिकेतून सावरकरांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने एक क्रांतिकारी अभियान राबविले. त्याचा हेतू होता 'सर्वांसाठी शिक्षण!'. अशिक्षित कैद्यांना सावरकरांनी लिहायला वाचायला शिकविले. मुळात सुशिक्षित असलेल्या बंद्यांनाही प्रशिक्षित करण्यासाठी तुरुंगामध्येच एका मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. तेच हे ''नालंदा विहार मुक्त विद्यापीठ''.
आता मुक्त विद्यापीठ ही संकल्पना सर्वदूर रूढ आहे व त्यास शासनाचीही मान्यता आहे. परंतु पारतंत्र्यात व त्यात पुन्हा तुरुंगात असताना अशा विद्यापीठाची स्थापना करणे हीच मुळी अभूतपूर्व घटना होती. नालंदा विहार हे खरे तर भगवान बुध्दांच्या अभ्यास व निवासगृह असलेल्या मंदिराचे नांव. हेच नाव सावरकरांनी आपल्या अपारंपारिक मुक्त विद्यापीठासाठी निवडले.
या विद्यापीठाचे बोधवाक्य होते पार्श्वभूमीला 'तमसो मा ज्योतिर्गमय' (मला अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जा) व बोधचिन्ह होते उगवता सूर्य. त्या विद्यापीठाचे कुलपती झाले तुरुंगातील एक विद्वान क्रांतिकारक बंदी प्रा.भाई परमानंद व त्या विद्यापीठाचे उपकुलपती (Vice Chancellor) व आचार्य (Professor) झाले स्वातंत्र्यवीर सावरकर.
दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी व विश्रांतीचे वेळी बंदी विद्यार्थ्यांना पाठ आणि व्याख्यानाचे माध्यमातून शिक्षण दिले जात असे. या अभ्यासातून अभ्यासकाने आपली प्रगती समाधानकारक दाखवली तर त्या विद्यार्थ्याला 'योग्यता' अथवा 'विशेष योग्यता' श्रेणीप्रमाणे स्नातक म्हणून पदवी दिली जात असे. या विद्यापीठाचे तुरूंगामध्ये पदवीदान समारंभही झाले. त्यासाठी समारंभाचा दिवस निश्चित करण्यात येत असे.
उपलब्ध माहितीनुसार या विद्यापीठाचे पहिले स्नातक म्हणून परमानंद (कुलपती परमानंद नव्हेत) नावाच्या मूळच्या झाशी येथील असलेल्या बंद्याला या पदवीदान समारंभात पंडित म्हणून सन्मानित करुन ज्योतिषशास्त्र विषयावरील अभ्यासासाठी पदवी देण्यात आली. या पंडित परमानंदांची एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पंजाबमधील लाहोरच्या गदर चळवळीच्या खटल्यात शिक्षा झाल्यामुळे इतर कैद्यांबरोबर ते या तुरुंगात आले.आल्यानंतर काही दिवसात तुरुंगातच तुरुंगाधिकारी बारीची व परमानंदांची भेट झाली. बारीने नेहमीप्रमाणे पंडित परमानंद कैदी असल्याने जोरदार शिव्या हासडल्या. त्याबरोबर या परमानंदांनी उसळी घेऊन बारीच्या अंगावर उडी घेतली व बारीच्या जोरदार श्रीमुखात भडकावली. अर्थातच त्यानंतर मोठा गोंधळ झाला, आणि परमानंदाना समोरच्या तिकाटण्याला बांधून वेताचे फटके मारण्यात आले.
सावरकरांच्या 'माझी जन्मठेप' या आत्मकथनाच्या चौथ्या प्रकरणात 'परमानंदांनी बारीस मारले' या शीर्षकाचे आगेमागे या घटनेचे वर्णन केलेले आहे. पण याच वेत खाल्लेल्या तिकाटण्यासमोर वर्षभरानंतर परमानंदांना पदवीदान समारंभात या विद्यापीठाचे पहिले स्नातक म्हणून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासंबंधात नंतर पंडित परमानंद ९२ वर्षांचे असताना त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळचे आपले अनुभव सांगताना पंडित परमानंद म्हणाले ''दीक्षान्त विधीनंतर सावरकरांनी मला त्याप्रसंगी बोलायला सांगितले. मी सावरकरांकडे ज्योतिषशास्त्र या विषयाचे शिक्षण घेतले असल्यामुळे मी त्या विषयावर कविता लिहून तिचे वाचन केले. या कवितेत मी तारामंडळाचे वर्णन केले होते -
'ये अनंत, सूर्य, नक्षत्रमालाए जो चक्कर खा रही ।
गति सर्व अणु परमाणुओंकी सब जगह बदल रही ।
एक ओर पूर्ण अनंतता गंभीरता दर्शा रही ।।
अव्यक्त व्यक्तिगत उन्मयी शोभा गगन उद्यानकी ।
यह दिव्य दृष्टी काव्य-महिमा रOEा रहा इस धामकी ।।
अद्भुत, अचिन्त, अनन्त, पूर्ण स्वतंत्र और मनोहारी ।
सर्वांग सुंदर, सर्व गुण संपन्न यह माया मेरी ।।
या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी मी सावरकरांना अर्पित केल्या होत्या.
हे सगळं वाचत असताना आपल्याला प्रश्न पडेल की या विद्यापीठाची वास्तू, कार्यालय व सभागृह तुरूंगात होते तरी कुठे? सावरकरानी या सर्वासाठी एकच ठिकाण निवडले होते आणि ते म्हणजे तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेला पिंपळ पार.
एका बाजुला उंच भिंतीपलीकडे बंद्यांच्या काळकोठडया व समोर फटक्यांची शिक्षा देताना कैद्यांना टांगण्यासाठी उभारलेले तिकाटणे आणि कोलू फिरविण्याचे यातनाघर ----- उजव्या बाजूला फाशीगेट ----- आणि मागील बाजूस कारागृहाची मुख्य इमारत. असे नेपथ्य असलेला पिंपळपार हेच नालंदा विहार विश्वविद्यालयाचे सभागृह होते,कार्यालय होते, आणि याच जागेवर संपन्न झाले या विश्वविद्यालयाचे दीक्षान्त समारोह.
याच कारागृहात ठिकठिकाणी एका बाजूला कैद्याना मारपीट होत होती तर दुसऱ्या बाजूला होत असे विद्यादेवी सरस्वतीचा जयघोष ! याच कारागृहात प्रथम रचला गेला भावी स्वतंत्र भारतातील सर्व शिक्षा अभियानाचा पाया.
अंदमानच्या कारागृहातील या स्फूर्तीप्रद इतिहासाची बहुतेकांना कल्पना नसल्यामुळे प्रा .हरिंद्र श्रीवास्तव यानी संशोधन करुन मिळविलेला हा दुर्मिळ ठेवा सर्वाना ज्ञात व्हावा म्हणून या लेखाचा प्रपंच!
प्रतिकूल तेच घडत असतानाही कर्तृत्वाने व राष्ट्रप्रेमाच्या स्फुल्लिंगाने सेल्युलर कारागृहाच्या नरकपुरीलाही स्वतंत्र व समर्थ हिंदुस्थानचे प्रेरणास्थान बनवणाऱ्या स्वा.सावरकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
========================================================================
प्रतिक्रिया
17 May 2020 - 7:51 am | गवि
चांगला लेख.
सेल्युलर जेलमध्ये असं विद्यापीठ त्या प्रतिकूल काळातही चालवल्याची माहिती नव्याने कळली. रोचक आहे.
तात्याराव सावरकर यांचे विचार समाजात मोठ्या प्रमाणात पसरले नाहीत म्हणा, किंवा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले नाहीत म्हणा, हे जाणवतं.
17 May 2020 - 8:46 am | प्रचेतस
उत्तम लेख.
पूरक छायाचित्रांची जोडही चालली असती.
17 May 2020 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान ! लिहिते राहा. लेखात फोटो असले असते तर अजुन 'टच' वाढला असता.
-दिलीप बिरुटे
17 May 2020 - 9:46 am | अर्धवटराव
थक्क व्हायला होतं राव
_/\_
अवांतरः
सावरकरांचा ज्योतीषशास्त्राचा अभ्यास होता ? आश्चर्य आहे.
कि तो अभ्यासक्रम खगोलशास्त्राचा होता?
17 May 2020 - 9:59 am | गवि
अगदी हाच प्रश्न पडला होता. कदाचित त्या परिस्थितीत जे विषय शक्य ते घेतले असावेत.
17 May 2020 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्यास फार गंभीरपणे केलेला असेल असे वाटत नाही. एक पारंपरिक अभ्यास म्हणून विषयाची चाळवा चाळव केली असेल, कारण योग्य मुहूर्तावर मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली असती तर ते पकडल्या गेले नसते असे वाटते. (चुभुदेघे)
-दिलीप बिरुटे
17 May 2020 - 5:34 pm | अभिबाबा
लेखासोबत फोटो हवे होते असआता मलाही पटलय. लेख प्रसिद्ध करायचा पहिलाच प्रयत्न होता ना, त्यामुळे राहून गेले फोटो टाकायचे. पुढील वेळी दुरुस्ती करेन .
अंदमान येथील तुरुंगात, ते ही शंभर वर्षांपूर्वी, दिवसभर कष्टप्रद काम केल्यानंतर, संध्याकाळी मिळणाऱ्या वेळांमध्ये सहकैद्यांना शिक्षण देण्याच्या भावनेने जितक्या गंभीरपणे अभ्यास करता येणे शक्य असेल त्यापेक्षा निश्चितच अधिक गंभीरपणे हा उपक्रम चालला असणार अशी माझी खात्री आहे . प्रत्येकाने आपण त्या काळात त्यावेळी त्या ठिकाणी असतो तर काय केल असतं याचा स्वतःशी विचार केला तर याचं उत्तर आपल्यालाच मिळेल अस मला प्रामाणिक पणे वाटते.
17 May 2020 - 5:54 pm | गवि
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख ही विज्ञानाधारित, तर्कनिष्ठ, विचारांबाबत असल्याने ज्योतिष हा विषय त्यांनी endorse करावा याबद्दल आश्चर्य वाटलं असा एक मुद्दा.
साहित्य, इतिहास, तर्कशास्त्र, विज्ञान असे काही विषय त्यांनी प्रामुख्याने घेतले असतील असं वाटलं.
18 May 2020 - 2:28 am | गामा पैलवान
सावरकरांच्या शिरपेचातला आजूनेक मानाचा तुरा! अधिक काय लिहिणार म्हणा! आपली तर मतीच गुंग होते.
असो.
वर काही जणांनी सावरकर विज्ञाननिष्ठ असतांना ज्योतिषाचे विद्यार्थी कसे बनले यावर आश्चर्य व्यक्त केलंय. माझ्या मते एक स्पष्टीकरण असं असू शकेल की ज्योतिष म्हणजे फलज्योतिष नव्हे. दुसरं असं की ज्योतिष असो वा फलज्योतिष, दोन्ही विज्ञानाच्या विरोधात नाहीत.
-गा.पै.
24 May 2020 - 8:51 pm | सतिश गावडे
विज्ञानाच्या विरोधात नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? अर्थ कुंडली पाहून भविष्याविषयी भाकीत करणे किंवा त्याही पुढे जाऊन तोडगे उतारे सुचवणे हे विज्ञान आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
24 May 2020 - 8:21 pm | चौथा कोनाडा
खुप सुंदर माहिती ! सुरेख !
लेखात फोटो टाकले असते तर लेखाला चार चांद लागले असते !