वर्गाच्या दारातून एक त्यांच्याच वयाची असेल …. एक मुलगी आत आली. सावळीशी ,पण खारदाणा वाटावा इतकी भरपूर पावडर लावलेला चेहेरा. टाईट जीन्स वर तसलाच अर्धा टॉप. लालभडक लिपस्टीक. लांब मोकळेच असलेले केस. डोळ्यात भरपूर काजळ.
" मित्रानो ही आशा. माझी धाकटी बहीण…. आशा हे माझे मित्र" सारंगने सगळ्यांशी तीची ओळख करून दिली.
तीला पहाताच सगळ्यांचेच आ वासले गेले. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेबाहेरचेच.. मीनाचा चेहेरा तर एकदम पांढरा फटक्क पडला.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46262
नक्की काय चाललय कोणालाच कळत नव्हते. सारंग च्या सोबत आलेली मुलगी , तीला मुलगी तरी कसे म्हणायचे. अगदी तसली दिसणारी मुलगी आणि सारंग तीची ओळख स्वतःची बहीण म्हणून करून देत होता.
आशाने हात जोडून नमस्कार केला. तीच्या नमस्काराला काय उत्तर द्यावे ते समजत नव्हते. एरवी फक्त लांबवरून शुक शुक ऐकले तरी छातीत धडधड वाढायची आता तर ती तशी मुलगे थेट समोर उभी होती. अगदी फुटा दोन फुटावर. आणि ती नमस्कार करत होती.
सर्वांचेच हात नमस्कार करावा की नाही अशा अर्धवट अवस्थेत. सगळ्यांचीच अवघड अवस्था . शेवटी सारंगनेच कोंडी फोडली. नमस्कार आशा. हे माझे मित्र . माझ्यासारखेच आहेत. तुला अचानक समोर पाहून थोडे बिचकले आहेत इतकेच. काळजी करू नकोस. जरा ओळख होऊ दे सगळे एकदम मोकळे होतील.
पक्या , आणि जितु अजून शॉक मधेच होते.
" नमस्ते आपा . मी युसूफ "
नमस्ते.
" सारंग हे काय आहे. " मीना ऐवजी संध्याने प्रश्न केला.
"आणि इतका वेळ होतास कुठे ? मीनाला कंठ फुटला. ती अजूनही धक्क्यातच होती.
" तू ढोलकीवाल्याला आणायला गेला होतास ना . मग …... " मीनाच्या बोलण्यात मग ? चा पुढचा "ही कुठे भेटली?" हा प्रश्न लपला नाही.
ज्युनीयरची दोघे काय चाललय हे न कळून तोंडाचा आ वासलेल्या अवस्थेतच उभी होती.
" सांगतो सांगतो. " सारंगने एक दीर्घ श्वास घेतला. आणि सांगायला सुरवात केली.
" आपले ढोलकीवाले राजाभाऊ परळ ला रहातात. त्यांना घ्यायला एल्फिन्स्टन च्या पुलावरून पुढे गेलो. दामोदर च्या इथून त्यांना घेतले आणि ढोलकीसह त्याना बाईकवर बसवून आम्ही दोघे निघालो जेरबाई वाडिया रस्त्यावर वळणार इतक्यात ही पळताना माझ्या बाईकच्या समोर आली. गर्दीमुळे बाईक स्लो च चालवावी लागते म्हणू बरे. नाहीतर दोघेही पडलो असतो. मुंबईत एक आहे. बाईक समोर चालणारा , गाडी समोर बाईक वाला , मोठ्या गाडीसमोर छोटा गाडीवाला असे कोणीही आले की पब्लीक फुल्ल हात धुवून घेते.
जो कमी असेल त्याच्या बाजूने पब्लीक चा सपोर्ट. मग चूक कोणाचीही असो. धडक बसली म्हणून बाईकवरून पडलो असतो तर मीच मार खाल्ला असता. " सारंग बोलताना सगळेच ऐकत होते. एखादा कटाक्ष त्या सोबत आलेल्या मुलीकडे आशा कडे टाकत होते.
" कसाबसा सावरलो. तोंडात एक कचकचीत शिवी आली. पण समोर आलेली मुलगी हे समजल्यावर तशीच गिळली. "
" ओ बाई काय करताय. नीट चाला की फुटपाथवरून. " सारंग सांगतच होता. " बाईक सावरली. पण या मुलीला तीचा तोल सावरता येत नव्हता. बाईक तशीच रस्त्याच्या मधोमध साईड स्टँडला लावली उतरलो आणि या मुलीला अगोदर सावरले. ती तोल जाऊन पडणे आम्हाला परवडले नसते. पब्लीकने आम्हाला वाजवले असते ढोलकी सारखे. हीला हाताला धरून बाजूला नेले. एका दुकानाच्या पायरीशी बसवले राजाभाऊनी तोवर बाईक रस्त्याच्या कडेला आणली . दुकानदाराकडे पाणी मागितले. पाणी पाजायला ग्लास पुढे केला आणि तीच्या चेहेर्याकडे लक्ष्य गेले. चेहेर्यावर पावडरचा थर होता. राजाभाऊ पण चमकले ते म्हणाले धंदेवाली दिसतेय. कशाला या भानगडीत पडतोस. पाणी बीणी पाज आणि लवकर सटक. "
अहो असे एकदम कसे निघायचे. निदान या बाईला नीट इथे बसवून तरी जाऊया.
अरे गंजाडी असेल नाहीतर पेदाड. या असल्या बायकांचा काही नेम नसतो. मी अनुभवावरून सांगतो. आपण मदत करायला जातो आणि नंतर ते आपल्याच अंगाशी येते.
आशाला पाणी पाजले. तीचे डोळे अगदी मलूल झाले होते. अंगात तापही असावा. चेहेर्यावरच्या पावडरच्या थरातूनही ती काहीतरी वेदना जाणवत होत्या अंगाला दारूबीरू चा वास तर येत नव्हता. राजाभाउ ना म्हंटले ही तसे. त्यांचे आपले एकच उगाच नसत्या भानगडीत पडायला नको. आपण निघूया. पण या अशा अर्धवट ग्लानीत असलेल्या बाईला इथे फुटपाथवर बसवून निघणे पण मनाला पटत नव्हते.पाणी पाणी असे काहीतरी बोलत होती. ओठाजवळ कान नेल्यावर जाणवले. दोन ग्लास पाणी घटा घटा प्यायल्यावर तीने कसेबसे डोळे उघडले. दादा. मला काही खायला देता का? भूक लागली आहे खूप.
राजाभाऊनी मागच्या दुकानातून एक पारले जी चा एक पुडा आणला आणि बाजूच्याच चहावाल्याला दोन फुल्ल चहा ची ऑर्डर दिली.
गरम चहाचे दोन घोट पोटात जातात ती ची ग्लानी थोडी कमी झाली. समोरचा पार्लेजी चा पुडा अधाशासारखा संपवला. बिस्कीटे खात असतानाच आणखी चहा हवा म्हणाली. राजाभाऊनी आणखी दोन फुल्ल चहाची ऑर्डर दिली.
तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात.
ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.
क्रमश :
प्रतिक्रिया
28 Mar 2020 - 9:59 am | प्रचेतस
मोगँबो - २ कुठेय भो?
28 Mar 2020 - 4:02 pm | विजुभाऊ
http://misalpav.com/node/46262 मोगँबो - २
लेखात सुरवातीला लिंक दिलेली आहे दादा
28 Mar 2020 - 10:31 pm | विजुभाऊ
आणि हे मोगँबो- ४ http://misalpav.com/node/46304
29 Mar 2020 - 7:45 am | प्रचेतस
धन्यवाद.
29 Mar 2020 - 7:46 am | प्रचेतस
हा भागही मस्त पण तोकडा झालाय.