पंच तुंड रुंड माळधर पार्वतीश आधी नमीतो
विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपतो मग तो....
मागील दुवा https://www.misalpav.com/node/17685
( मित्रानो क्षमा असावी. खूप मोठ्या काळानंतर पोस्ट करतोय. समजून घ्यावे .....)
त्या जाणीवेसरशी आबा पुन्हा थोडेसे मोठे झाले
आबाना त्यांच्या समोर नांदीसठी नटवृंद उभा असल्याची जाणीव झाली.
धूपाचा तो परिचीत वास पुन्हा जाणवला ऑर्गनचे सूर ऐकु यायला लागले आणि नटवृंदाने एकसाथ एका सूरात म्हणायला सुरुवात केली
पंच तुंड रुंड माळधर पार्वतीश आधी नमीतो
विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपतो मग तो....
ऑरगनच्या त्या स्वरांनी आबा मुग्ध झाले. सर सर सर आवाज करत पडदा वर गेला. समोर पूर्ण भरलेले प्रेक्षागृह. एक अन एक खुर्ची भरलेली. कण्व मुनींचा जंगलातील आश्रम . खडकांवरुन वाहाणारी नदी , पानाफुलाम्नी बहरलेली झाडे, त्यात विहरणारे पक्षी , कोपर्यात दिसणारे हरीण , एखादा ससा , मोर, चिमण्या . दूरवर दिसणारे निळे डोंगर, मधुनच दिसणारी पाठशाळा, गोशाळा, ऋषीमुनींच्या गवताच्या पर्णकुटी , सगळे इतके जिवंत वाटत होते की खळाळत वहाणार्या नदीच्या पाण्याचा आवाजही चित्रातून ऐकू येत होता. आश्रम शाळेतून पाठांतराचे आवाज येत होते. पक्ष्यांचा किलबिलाट, एइकायला येवू लागला. ते नाट्यगृह कण्व ऋषींच्या आश्रमाचाच एक भाग होऊन गेले.
प्रत्येक प्रवेशाला प्रेक्षकाना त्या त्या वातावरणाची अनूभूती केवळ पाठीमागच्या पडद्यावरूनच यायची. हरीहर पेंटरांच्या कुंचल्याची, रम्गांची ही नजरबंदी प्रत्येक प्रयोगाला व्हायची चित्रातून आंब्याच्या मोहोराचा घमघमाट जाणवायचा, कोकीळेचे कूजन ऐकु यायचे, नदीच्या पाण्याचा उत्साहीत करणारा गारवा चेहेर्यावर जाण्वायचा,शेतातून डुलणार्या ज्वारीच्या पीकातून फिरणारा तो वारा अंगाला स्पर्षून जायचा. हे स्वप्न संपूच नये असे वातत असतानाचेक हास्याची लकेर ऐकु येते,पाठोपाठ प्रियंवदे शी थट्टा मस्करी करत शकुंतला आली, नाजूक चणीचा रेखीव डोळ्यांचा मास्टर दत्ताराम शकुंतला म्हणून आला की प्रेक्षकांना वेड लावायचा. त्या देखण्या रुपड्यावर पुरुषच काय पण स्त्री प्रेक्षकही बेहद्द खुष असायचे. केसांच्या अंबाड्याची जहिरातही " शकुंतला आंबाडा " म्हणून व्हायची. रंगमंचावरून शकुंतला चालत येताना तीच्या पैंचणांच्या आवाजाने विरघळून जायला व्हायचे. तीच्या त्या खळखळून हसण्याने मोत्यांनी भरलेले पात्र जमिनीवर सांडावे तसे वाटायचे. अनिमीष नेत्रांनी पहात लोकानी शकुंतलेला डोळ्यात भरभरून साठवून ठेवले. शकुंतला रंगमंचावर कुठून आली तेच प्रेक्षकाना उमजायचं नाही. थेट पाठीमागच्या पडद्यावरच्या चित्रातून जिवंत अवतरली असेच वाटायचे. मग ऑरगनचे सूर बदलायचे. सारंगी अणि ऑरगनच्या सूरातून भुंग्याची गुणगुण सुरू झाली., प्रेक्षकानाही त्या आवाजातून तो भुंगा दिसू लागला. भुंग्याला चुकवताना शकुंतला अस्वस्थ झाली, इकडे तिकडे फिरू लागली आणि तीची दुष्यंताअशी धडक झाली. शकुंतलेची आणि राजा दुष्यंताची नजर भेट झाली .ऑरगनचे सूर वाजू लागले लाजे ने शकुंतलेचे गाल आरक्त झाले. लाजून तीने मान खाले घातले. चेहेरा ओंजळीत लपवला. तीच्या अंगावरचे रोमांच प्रेक्षकांना जाणवले.
ऑरगनसोबत कादरबक्षानी सारंगीचे सूर उमटवले. आणि प्रत्येकाच्या मना मनातल्या त्या शब्दांनी प्रेक्षागृह भरून गेले.
काय मला भूल पडली , भान हरपले.
ते मुख वर केले , परि नाही चुंबिले......
आबा डोलु लागले. त्या क्षणे ते राजा दुष्यंत होते. मास्टर दत्ताराम शकुंतला. तीचा हात त्याम्च्या हातात होता, अंगावर रोमांच होता
सारंगी ऑरगनच्या साथीने आबा गात होते तबल्याच्या तालाशी खेळत ताना मारत होते, समेवर येताना वाह आहा क्या बात है ची दाद घेत होते, . आबा ते क्षण पुन्हा जिवंत झालेला अनुभवत होते. त्यांच्या अंगावर दुष्यंताचे भरजरी कपडे होते, डोक्यावर राजमुकुट होता. माने पर्यंत रुळणारे केस , कानात लखलखणारे कुंडल , होते आणि आबा राजा दुष्यंत होऊन गात होते. गाताना मधेच एखादा कटाक्ष लाजून चेहेरा लपवलेल्या त्या मास्टर दत्ताराम कडे , शकुंतले कडे टाकत होते. मधेच गालातल्या गालात हासत होते. हात वर करत त्यानी एक सनसणीत तान घेतली.
आबाना खोकल्याची अनावर उबळ आली. जवळ ठेवलेला ताम्ब्या ते जीवाच्या आकांताने शोधू लागले. पलंगाशेजारचा तांब्या त्याने कसाबसा घेतला दोन घोट पाणी प्याले. पाण्याच्या ओलसरपणामुळे की कसे पण जरा बरे वाटले. खोकल्याची उबळ कमी झाली. खोकला आला की तो मरणयातना घेऊन यायचा छाती भरून आतडी ओढली जायची . छातीची बरगडी न बरगडी निखळतेय की काय असे वाटायचे. खांद्याचे बावते दुखायचे नारळाच्या आत सुकलेली खोबर्याची वाटी खडखड वाजावी तसा कवटीच्या आत मेंदू हलतोय असे वाटायचे.पृथ्वीलाही ज्वालामुखी पृष्टभाग फाडून वर उसळताना असेच होत असेल . एक जोरदार ठसका लागत असेल आणि तो जठराग्नी धूळ दग्ड गोट्यांसहीत बाहेर येत असेल.
आबाम्ना त्या कल्पनेची मजा वाटली. इतक्या आजारपणातही अशी कल्पना.... आत्ता गोदावरी असती तर म्हणाली असती " सुंभ जळाला तरी पीळ नाही जळायचा. स्वतःला किती म्हणून मोठं समजायचं?साधा खोकला आला, जर्रा ठसका लागला तर त्याला उपमा थेट ज्वालामुखीच्या उद्रेकाची! आहा हा उद्या एखादा काजवा दिसला तर म्हणाल सूर्यबींबाचे अमृतकण दिसले म्हणून... "
गोदावरी बाई आत्ता आपल्या समोर उभ्या आहेत आणि हातवारे करत बोलताहेत असे आबाना दिसायला लागले. नऊवार नेसलेली, कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेला गोल चेहेरा , पिंगटसर झाक असलेले बोलके डोळे ,अपरं नाक , किंचीत खळगा असलेली हनुवटी, सगळं कसं डोळ्यासमोर उभे रहीलं.
त्यांचं लग्न कसे जमले ते आठवले. घरच्यांनी आपले संबंध संपवलेलेच होते त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यासाठी स्थळ , सोयरीक म्हणून कोणी कधी गेलेले नसणारच.
आणि जरी गेले असतील तरी त्यांना पायरीवरून परत पाठवलं असणार . त्यांना दृष्टीने त्यांचा थोरला मुलगा नव्हताच किंवा कधीकाळी प्लेगच्या साथीत त्याचा ग्रंथ आटोपला होता.
कंपनीतल्या जनार्दनपंतांचा आपल्याशी स्नेह होता. गोदावरीबाई त्यांची कन्या. खरेतर आश्चर्य वाटले होते त्यावेळी , आपली बेघर परिस्थिती माहीत असूनही जनर्दनपंतानी मुलीचा हात आपल्या हाती दिला याचं. पण मी काहीतरी करेन याच त्याना विश्वास होता. शाकुम्तल धो धो चालले. कंपनीला बरकत आली. जनार्दनपंतांच्याच ओळखीने एक जुने घर विकत घेतले. थोडयाशा डागडुजीनंतर त्यात रहायला गेलो. लक्ष्मी हे तीचं माहेरचं नाव आपण हौसेने बदलून गोदावरी ठेवलं. आईचं पाळण्यातले नाव गोदावरी होतं म्हणून. गोदावरी लक्ष्मीच्या पावलानी आली. आयुष्याला घरपण आले. आईने आपल्य अनाठाळ मुलाच्या विस्कटलेल्या केसांचा भांग पाडल्यानंतर बदलावं तसे आयुष्याचं रुपडं बदललं . आबाना गोदावरीबाईंच्या हातातल्या किणकीणणार्या हिरव्याकच्च बांगड्या आठवल्या, त्यांच्या हातावरची बुट्टेदार मेंदीची नक्षी आठवली
वार्याची गार झुळूक याची तसं त्यांचं गोड हसणं , काही सांगत असतानाचं त्यांचं टपोर्या डोळ्यानी पहाणं आठवलं.
त्या आठवणीनं आबांना रखरखीत वाळवंटात उन्हात तहानेनं शोष पडला असताना अचानक थंडगार वाळा टाकलेलं पाणी प्यायला मिळावं तसं वाटलं. लग्नानंतर सत्यनरायणाची पूजा घातली होती. नाकात मोत्याची नथ , कपाळावर ठसठशीत कुंकु, मानेवर मोगर्याची वेणी माळलेला आंबोडा,... गोदावरीबाईंचं ते रूप पाहून आबाम्ना आईची आचीण झाली होती. दिसायला अशीच असेल ना आई तीचं लग्न झाले असेल त्यावेळी ?
आई वडील असण्याचं सूख , घर नाटकासाठी सोडलं त्या वेळीच संपलं होतं. त्यानंतर आपणच आपले आई वडील. लोकांच्या डोक्यावर आई वडीलांचं छप्पर असते. इथं आपणंच आपलं छप्पर.
एखाद्या कातर हळव्या क्षणी ममतेची , मायेच्या दोन शब्दांची गरज वाटायची त्या वेळेस आपल्यातला बाप जागा होऊन आपले भेक्कड बुळ्या साधं परिस्थितीला तोंड देता येत नाही का म्हणत निर्भत्सना करायचा . ऊट रडत काय बसतोस बायकांसारखे म्हणत कामाला लावायचा .
इथेही मनातली आई त्या बापापुढे दबूनच राहीली.
तु आम्हाला मेलास आम्ही तुझे श्राध घालतो म्हणत संबम्ध तोडणार्या बाबांच्या कडवट आठवणीने तोंडही कडवट झाले.
हात पुढे करत आबांनी लोट्यावरचे भांडे उचलले . ओठाला लावले. पाणी पिउनही कडवटपणा कमी झाला नाही. भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.
क्रमशः
प्रतिक्रिया
14 May 2019 - 8:43 am | अर्धवटराव
_/\_
आता पुभाप्र किती लांबणार ?? :)
14 May 2019 - 10:00 am | विजुभाऊ
नाही या आठवड्यात पूर्ण करतो सगळे.
लिहून झालंय. टाईप करायचं बाकी आहे.
14 May 2019 - 11:28 am | श्वेता२४
छोटे छोटे वाटत आहेत. वाचताना लिंक लागते तेवढ्यातच कथा संपतेही. कृपया मोठे भाग टाका.
26 Jun 2019 - 2:58 pm | king_of_net
छान आहे!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
26 Jun 2019 - 6:02 pm | जेनी...
:)
26 Jun 2019 - 11:06 pm | विजुभाऊ
पुढचे भाग
धूपगंध ४ http://misalpav.com/node/44648
धूपगंध ५ http://misalpav.com/node/44651
अनुक्रमणिकेसह सर्व भाग
धूपगंध http://misalpav.com/node/17550