नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची.
खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत. त्यांचे आपल्या आहारातील गरजेनुसार दोन गटांत वर्गीकरण केले जाते:
१. जास्त प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा अधिक असते. यांमध्ये मुख्यत्वे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांचा समावेश होतो.
२. सूक्ष्म प्रमाणात लागणारी : यांची रोजची गरज ही १०० mg पेक्षा कमी असते. यांमध्ये मुख्यत्वे लोह, आयोडीन, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅन्गेनीज, क्रोमियम, सेलेनियम व फ्लुओराइड यांचा समावेश होतो.
आहारातून घेतलेल्या या खनिजांचा आपण शरीरात साठा करतो. एक प्रकारे तो आपला ‘आरोग्य खजिना’च असतो. खनिजे शरीरात अनेकविध कामे करतात. थोडक्यात ती खालील स्वरूपाची असतात:
१. पेशींचे मूलभूत कामकाज
२. हाडे व दातांची बळकटी
३. महत्वाच्या प्रथिनांचे घटक (उदा. हिमोग्लोबिन)
४. अनेक एन्झाइम्सच्या कामाचे गतिवर्धक
५. हॉर्मोन वा जीवनसत्वाचे घटक.
६. Antioxidant कार्य.
या यादीवरून त्यांचे महत्व लक्षात येईल. लेखमालेत तुलनेने अधिक महत्वाच्या खनिजांवर स्वतंत्र लेख असतील तर उर्वरित खनिजे ही शेवटच्या एका लेखात समाविष्ट होतील.
प्रत्येक खनिजाबद्दलच्या लेखात त्याचे आहारातील स्त्रोत, गरज, शरीरकार्य, त्याच्या अभावाचा आजार आणि अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम असे विवेचन असेल. अन्य पूरक माहिती प्रतिसादानुरूप दिली जाईल. वाचकांनीही त्यात जरूर भर घालावी.
आणि हो, एक सांगितलेच पाहिजे ....
लेखमालेचे ‘खनिजांचा खजिना’ हे सुरेख शीर्षक मिपाकर ‘अनिंद्य’ यांनी सुचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ! अर्थात वाचकांच्या सोयीसाठी प्रत्येक लेखाला मात्र ज्या त्या खनिजाचेच नाव त्याच्या वैशिष्ट्यासह देत आहे.
.. तर लवकरच भेटूया ‘सोडियम’ च्या पहिल्या लेखातून.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
13 Aug 2018 - 9:04 am | उगा काहितरीच
शुभेच्छा ...
13 Aug 2018 - 11:52 am | तनमयी
शुभेच्छा
13 Aug 2018 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीसारखाच उत्तम उपक्रम ! मिपाकरांना आरोग्यासाठी उपयुक्त असलेली बरीच माहिती मिळेल !
13 Aug 2018 - 1:08 pm | अनिंद्य
@ कुमार१
तुमच्या लहिण्याच्या उत्साहाला सलाम आहे.
ही मालिकाही माहितीपूर्ण होणार, शंका नाही.
पु भा प्र,
अनिंद्य
13 Aug 2018 - 1:37 pm | अनिंद्य
* लिहिण्याच्या
13 Aug 2018 - 1:30 pm | टर्मीनेटर
माहितीचा हा खजिना लुटण्यासाठी आम्ही वाचक तयारच आहोत. लेख मालीकेस शुभेच्छा.
13 Aug 2018 - 2:26 pm | वकील साहेब
ही मालिकाही उत्तम होईल यात शंका नाही. मालिकेच्या प्रतीक्षेत....
13 Aug 2018 - 2:58 pm | वरुण मोहिते
वाचत आहेच आपल्या मालिका
13 Aug 2018 - 3:28 pm | खिलजि
नवीन लेखमालेस शुभेच्छा डॉक्टरसाहेब ...
13 Aug 2018 - 4:19 pm | चाणक्य
लेखनमालेसाठी शुभेच्छा.
13 Aug 2018 - 4:32 pm | सुमो
सोडियम या पहिल्या खनिज रत्नाच्या प्रतीक्षेत ....
लेखमालेसाठी शुभेच्छा.
13 Aug 2018 - 5:26 pm | कुमार१
आरोग्य लेखनावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या वरील सर्व मित्रांचे आभार !
13 Aug 2018 - 7:45 pm | दुर्गविहारी
अतिशय उत्तम धागे असतात तुमचे. रसायनशास्त्राची आवड असूनही तुमचे आधीचे धागा वाचून त्यावर प्रतिसाद देता आले नाहीत याचा खेद वाटतो. मागची लेखमाला सवडीने पुर्ण वाचून मग प्रतिसाद देईन. या लेखमालेच्या प्रत्येक धाग्याच्या प्रतिक्षेत असेन. सध्या दै. लोकसत्तामधे कुतुहल या सदरामधे विज्ञान परिषदेतर्फे मुलद्रव्यांची छान माहिती येत आहे आणि इथे मि.पा.वर खनिजाविषयी माहिती येणार आहे. माहितीची उत्तम मेजवानी आहे. आपल्या लेखनमालेला शुभेच्छा.
13 Aug 2018 - 8:48 pm | कुमार१
व लोकसत्तातील माहिती बद्दल आभार. चर्चेत स्वागत.
13 Aug 2018 - 9:21 pm | सोमनाथ खांदवे
तुमचा ' खनिजांचा खजिना ' रॉबिनहूड प्रमाणे आम्हा गरिबांना लवकरात लवकर वाटायला सुरवात करा .
13 Aug 2018 - 11:04 pm | नाखु
आणि शुभेच्छा
वाचक नाखु
14 Aug 2018 - 9:55 am | कुमार१
उत्साहवर्धनाबद्दल आभार.
भावी चर्चेत तुमचे स्वागत असेल.
14 Aug 2018 - 9:57 am | कुमार१
उत्साहवर्धनाबद्दल आभार.
भावी चर्चेत तुमचे स्वागत असेल.
15 Aug 2018 - 11:49 am | सुधीर कांदळकर
अनेक, अनेक शुभेच्छा.
15 Aug 2018 - 11:57 am | कुमार१
सोडियम बाहेर काढले असून ते इथे सापडेल :
https://www.misalpav.com/node/43167
15 Aug 2018 - 7:14 pm | चित्रगुप्त
भाजीपाला, फळे इ. तून मिळणार्या खनिजांविषयी एक प्रश्न आहे, तो असा की ही खनिजद्रव्ये जमिनीतून वनस्पतींमधे येतात ना? मग शेकडो वर्षांपासून लागवडीत असलेल्या जमिनीत ती टिकून राहिलेली असतात की संपलेली असतात ? मातीतील खनिजद्रव्यांचे नकाशे उपलब्ध असतात, त्याप्रमाणे एकाद्या प्रदेशात अमूक एक खनिज मुळात जमीनीत नसलेच, तर ते भाजीपाल्यात कुठून येणार ? उदा. सेलेनियम हे खनिज ब्राझील नट मधे असते, ते ब्राझील खेरीज अन्य देशात कशातून मिळते ?
15 Aug 2018 - 7:34 pm | कुमार१
@ चित्रगुप्त,
तुमची शंका रास्त आहे. काही खनिजांचे स्त्रोत प्राणीजन्य सुद्धा आहेत. तर काही खनिजे ही ‘संपन्न’ खाद्यान्नातून पुरवली जातात.
आयोडीनचे उदा. देतो. हे समुद्राकाठच्या जमिनीत व माशांत भरपूर. जसे आपण समुद्राकडून वरच्या उंचीकडे सरकू लागतो, तसे त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पर्वतीय क्षेत्रात ते नगण्य असते. त्यामुळे तेथील जनतेसाठी आयोडीनयुक्त मीठ काढावे लागले.
... याबाबत भूगोल वा वनस्पतीतज्ञाचे मत वाचायला आवडेल.