फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Sep 2018 - 8:45 am

(खनिजांचा खजिना : लेखांक ५ )

सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होत असते. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत
१. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत: जगभरातील स्त्रोतांवर नजर टाकता यात खूप विविधता दिसते. पिण्याच्या पाण्यातील फ्लुओराइडचे योग्य प्रमाण ०.७ mg/Litre इतके असावे. काही भूभाग हे अशा पाण्याने संपन्न असतात. परंतु, बऱ्याच भागांत हे प्रमाण खूप कमी तर अन्य काहींत ते खूप जास्तही असते. प्रमाण कमी असणाऱ्या भागांत पिण्याच्या पाण्यात फ्लुओराइड योग्य प्रमाणात मिसळण्यात येते. तर तर खूप जास्त प्रमाण असणाऱ्या पाणीसाठ्यांतून ते कमी करावे लागते.

२. वनस्पती : फ्लुओराइड-संपन्न मातीत वाढलेल्या वनस्पतींतूनही ते आपल्याला मिळते. चहाच्या पानांमध्ये त्याचे प्रमाण चांगले असते.

३. जगातील काही देशांत पाण्याच्या फ्लुओरीडेशनला पर्याय म्हणून मीठ अथवा दुधात फ्लुओराइड मिसळले जाते.

४. फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट : लहान मुलांत अशा पेस्टने दात घासताना ती तोंडातून गिळण्याचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे त्यांच्यावर पालकांनी बारीक नजर ठेवली पाहिजे. ब्रशवर घ्यायची पेस्ट ही जेमेतेम वाटाण्याच्या आकाराची असावी.

शरीरातील कार्य व गरज
आहारातून शोषलेले फ्लुओराइड हाडे आणि वाढीच्या वयांतील दातांत पोचते. तिथे ते कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या थरात समाविष्ट होते. या त्रिकुटाचा थर अगदी मजबूत असतो. आपल्या दातावरचे जे चकचकीत कठीण आवरण असते त्याला enamel म्हणतात. ते या थरामुळे अगदी कठीण बनते. किंबहुना enamel हा शरीरातील सर्वात कठीण (hard) पदार्थ आहे. मुलांत हाडांप्रमाणेच हे देखील रोज थोडी ‘कात’ टाकत असते. मुलांत कायमचे दात यायच्या वयापर्यंत जर फ्लुओराइड योग्य मिळत राहिले तर त्याने दातांच्या किडीला प्रतिबंध होतो.
फ्लुओराइडची प्रौढांची रोजची गरज ३-४ mg आहे. मुलांत ती वयानुसार यापेक्षा कमी आहे.

अभावाचे परिणाम
हे दातांवर स्पष्टपणे दिसतात. Enamel कमकुवत झाल्याने दातांची झीज लवकर होते. त्यातूनच पुढे दात किडण्याचे प्रमाण वाढते. कमकुवत Enamel मुळेे आम्लयुक्त खाद्यपेयांचा दातावर विपरीत परिणाम होतो.

अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम (फ़्लुओरोसिस)
फ्लुओराइडच्या दीर्घकालीन अतिरिक्त सेवनाचे प्रमुख कारण म्हणजे पिण्याच्या नैसर्गिक साठ्यांत असलेले त्याचे भरपूर प्रमाण. हा प्रश्न भारत व चीनमधील अनेक भागांत दिसतो.

भारतातील सुमारे अडीच कोटी लोक याने बाधित आहेत. अलीकडे असे दिसले आहे की मोठ्या धरणांच्या मागील भागातील जलसाठे (backwater s) फ्लूओराइडने अतिसंपन्न असतात. तसेच जगभरात ग्रामीण भागांतील काही विहीरींच्या पाण्यातही हे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. अशा पाण्यांवर योग्य ती प्रक्रिया करून अतिरिक्त फ्लुओराइड काढून टाकायचे असते. अशी यंत्रणा सर्वत्र उपलब्ध नसल्याने तेथील लोक फ़्लुओरोसिसला बळी पडतात. त्याचे परिणाम असे असतात:

१. हाडे: जसे शरीरातील फ्लुओराइडचे प्रमाण वाढू लागते तसे ते हाडांत अधिक साठू लागते. त्याने हाडाची घनता काहीशी वाढते. एका मर्यादेपर्यंत अशी हाडे अधिक बळकट असतात. पण, जर हे प्रमाण अति वाढू लागले आणि योग्य पातळीच्या पाचपटीवर गेले तर मात्र उलटे परिणाम दिसतात. आता हाड-घनता कमी होते आणि ही हाडे ठिसूळ होऊ लागतात.

२. सांधे: फ्लुओराइडचे प्रमाण दीर्घकाळ वाढत राहिल्यास सांधे ताठ व कडक होतात आणि दुखतात. हे तीव्र झाल्यास पुढे पाठीचा कणा खूप ताठ होतो आणि त्यामुळे आतील spinal cord दाबला जातो. त्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतात. आजही आपल्या ग्रामीण भागातील काही गावांत फ्लुओराइडचे पाण्यातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे तिथले संपूर्ण गाव फ़्लुओरोसिसने बाधित असते. काही रुग्णांत कणा इतका ताठ होतो की ते उभेपणी वर आकाशाकडे बघूच शकत नाहीत. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात हा प्रश्न अत्यन्त गंभीर आहे.

३. दात: मुलांत दुधाचे दात पडून कायमचे दात येण्याअगोदर जर फ़्लुओरोसिस झाले तर दातांवर विपरीत परिणाम होतात. सुरवातीस त्यांवर ठिपके पडतात. मग खराब डाग पडतात आणि त्याहीपुढे खड्डे पडू लागतात. त्यातून मुखसौंदर्यास बाधा येते. फक्त हे दात किडत नाहीत हाच काय तो फायदा !

फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट आणि दंत-आरोग्य :
बाजारात नजर टाकता आपल्याला फ्लुओराइडयुक्त टूथपेस्ट, जेल, गुळण्या करण्याचे द्रव आणि औषधी मुलामा अशी अनेक उत्पादने नजरेस पडतात. त्यांच्या जाहिरातींचा भडीमार तर काय वर्णावा? एकूण सामान्यजनांना बुचकळ्यात टाकणारी ही स्थिती असते. दातांच्या आरोग्यासाठी फ्लुओराइडचा प्रतिबंधात्मक वापर कितपत उपयुक्त असतो हा त्यातून उद्भवणारा प्रश्न.

या विषयावर मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांवर बरेच संशोधन झाले आहे. दातांना नियमित फ्लुओराइड लावण्याने त्यांच्या किडीचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र अशा उत्पादनांतील फ्लुओराइडचे प्रमाण विशिष्ट पातळीचे वर असावे लागते. तेव्हा दंतवैद्याचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य त्या पेस्टचा वापर करावा. मुलांत अशी पेस्ट वापरताना ती गिळली जाणार नाही याची खबरदारी आवश्यक.

वयानुरूप दातांची झीज (erosion) होत असते. त्याच्या जोडीला आहारातील विविध आम्लयुक्त पदार्थांमुळे enamel चा हळूहळू नाश होत असतो. याबाबत फ्लुओराइडयुक्त पेस्टचा वापर कितपत प्रतिबंधात्मक आहे, याबाबत मात्र मतांतरे आहेत. संशोधनांचे निष्कर्ष उलटसुलट आहेत. अधिकाधिक संशोधनातून त्यावर भविष्यात प्रकाश पडेल. *************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 Sep 2018 - 9:23 am | कुमार१

मा स सं
यांना विनंती

दुर्गविहारी's picture

3 Sep 2018 - 6:33 pm | दुर्गविहारी

या माहितीबध्दल धन्यवाद. फ्लोरीन बारावी सायन्सला आभ्यासामघे होते, त्यानंतर थोडेफार संदर्भ वाचायाला मिळाले. पण एकत्रित सविस्तर माहिती मिळाली. मुख्य म्हणजे बर्‍याच गावाच्या पाणवठ्यात फ्लोराइडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे वाचनात येत होते, त्या सगळ्या शंकांचे चांगले निरसन झाले.

अनिंद्य's picture

4 Sep 2018 - 11:12 am | अनिंद्य

@ कुमार१,

(कविश्रेष्ठ सुरेश भटांची क्षमा मागून) 'कळल्या मला जेंव्हा माझ्याच दंतपंक्ती' असे मनात आले :-)

लेखमाला उत्तम पद्धतीने पुढे जात आहे,

BTW, ही लेखमाला तुम्ही फक्त मिपावरच लिहिता आहात का?

पु भा प्र

अनिंद्य

कुमार१'s picture

4 Sep 2018 - 11:31 am | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभार . दंत पंक्ती आवडल्या.
होय, ही फक्त मिपावरच आहे.

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2018 - 11:01 am | मराठी कथालेखक

प्रोढात दातांचा पिवळेपणा , दातांवरील डाग यांचा फ्लुराईडशी संबंध आहे का ?

फ्लूओरोसिस मध्ये दातांवर पांढरे ठिबके (patches) पडतात.
पिवळेपणाचा संबंध नाही.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. _/\_

नाखु's picture

6 Sep 2018 - 10:20 pm | नाखु

काळे केल्यावर आणि डोके पांढरे झाल्यावरच कळतं पण उशीर झालेला असतो.

माहितीपूर्ण लेख

अभिप्राया बद्दल !

कुमार१'s picture

10 Sep 2018 - 8:14 am | कुमार१

लोह, तांबे व जस्त यावर असून तो इथे :

https://www.misalpav.com/node/43285

वन's picture

9 Nov 2018 - 12:13 pm | वन

आजही आपल्या ग्रामीण भागातील काही गावांत फ्लुओराइडचे पाण्यातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे तिथले संपूर्ण गाव फ़्लुओरोसिसने बाधित असते. काही रुग्णांत कणा इतका ताठ होतो की >>>>

काही वर्षांपूर्वी मी गुजरतेतील अमरेली येथे एका प्रकल्पाच्या कामासाठी गेलो होतो. तेव्हा अशी कमरेत कायमस्वरूपी वाकलेली माणसे पाहिली.
खरे आहे, सर्वांना चांगले पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आपण अजून बरेच मागे आहोत.

कुमार१'s picture

10 Nov 2018 - 10:51 am | कुमार१

सहमत.
सर्वांना चांगले पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आपण अजून बरेच मागे आहोत. >>> + १०००