सोडियम : मीठ तारी, मीठ मारी !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
15 Aug 2018 - 11:55 am

सर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही सोडियम काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते.
सोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत व प्रमाण:
स्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आपण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही ! त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो.
रोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात.

शरीरातील अस्तित्व आणि कार्य:

शरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत:
१. पेशी अंतर्गत द्रव आणि
२. पेशी बाह्य द्रव
सोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत:
१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक
२. रक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे
३. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे
४. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.

शरीरातील चयापचय:
आहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य नॉर्मल असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो.

आहारातील मीठ आणि रक्तदाब:

pict

समाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो.
आहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की :
१. अधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि
२. कमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे.

असे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते).

काही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय.
आजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते.

आहारातील मीठ आणि इतर आजार:

अधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.


सोडियमची रक्तपातळी :

निरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इथे एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात.
आता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो.

रक्तातील सोडियम कमतरता :
रुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते:
१. हृदयकार्याचा अशक्तपणा (failure)
२. मूत्रपिंड विकार
३. तीव्र जुलाब व उलट्या होणे
वरीलपैकी आजारानुसार रुग्णात लक्षणे दिसतात.
सोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते.

रक्तातील सोडियम अधिक्य:
ही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो.

…. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको.
***********************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Aug 2018 - 12:41 pm | कुमार१

मा सा. सं,
माझा आजचा सोडियमचा लेख यापूर्वीच्या ' खनिजांचा खजिना' या लेखास जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती.

आभार !

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2018 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोजच्या खाण्यात अनिवार्य असलेल्या, पण सामान्य जनांत बरेच समज-गैरसमजाचे धनी असलेल्या, मीठाला जागणारा माहितीपूर्ण लेख !

शुभेच्छा आणि मीठ प्रमाणात खाण्याचे आवाहन !

मिठापेक्षा मीठ अधिक तेल हे रक्त बिघडवत असावे. तसले पदार्थ - चमचमित पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले हे नक्की.
फक्त मीठ जेवणात कमी अधिक वापरल्याने काही होत नसावे.

कुमार१'s picture

15 Aug 2018 - 5:08 pm | कुमार१

वर लेखात म्हटल्याप्रमाणे अतिरिक्त मिठाचे दुष्परिणाम सिद्ध झालेले आहेत.

सोमनाथ खांदवे's picture

15 Aug 2018 - 10:08 pm | सोमनाथ खांदवे

बऱ्याच हायपर बीपी वाल्यांनीं मीठा बद्दल ची माहिती आधाशा सारखी वाचली असेल , पण काही म्हणा किती ही चांगला स्वयंपाक होऊ द्या मिठाचे प्रमाण व्यवस्थित नसेल तर सुगरण नापास . वेफर्स , कुरकुरे , आलू भुजिया या तळलेल्या व खारट पदार्थांची काय चव असते !!!! पण ते साल बी पी च घोडं मार खात .
पुन्हा एकदा माहितीपूर्ण लेख लिहल्या बद्दल धन्यवाद .

ट्रेड मार्क's picture

15 Aug 2018 - 10:54 pm | ट्रेड मार्क

अतिशय उपयुक्त माहिती!

काही प्रश्न आहेत -

१. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का?

२. असे चाचणीशिवाय ओळखता येत असेल तर कसे किंवा कुठली लक्षणे असतात?

३. पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे?

४. साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती. हे मीठ आयोडाईज्ड तर नक्कीच नव्हते, पण काहीसे जाडेभरडे असायचे. सध्याच्या मिठात आणि या मिठात काय फरक असतो? तसेच सध्याचे फ्री फ्लोईंग आणि न सादळणारे मीठ करायला त्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जात असतील, त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

५. आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते?

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 7:58 am | कुमार१

सोमनाथ, अगदी सहमत. त्या चोचल्यामुळेच आपण बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खाऊन कटकटी ओढवतो.

ट्रे मा, तुमचे प्रश्न छान आहेत. एकेक दमाने घेतो
आभार !

सुमो's picture

16 Aug 2018 - 9:59 am | सुमो

"साधारणपणे २-३ दशकांपूर्वीपर्यंत घरोघरी येऊन मीठ विकणारी लोक होती."

ज्याडा s रे s क

आठवून गेलं ... (आवाज ..आवाज )

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 10:16 am | कुमार१

. जर रक्तातील मिठाची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का? >>>>

होय, त्याचा अंदाज येतो. लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. आता दोन्ही परिस्थिती बघू:

• कमी पातळी : जलद नाडी, कमी रक्तदाब, कोरडी जीभ आणि पायांवर सूज (edema)

• जास्त पातळी: त्वचेची लवचिकता कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी व ती concentrated असणे.

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 10:18 am | कुमार१

पांढऱ्या आयोडाईज्ड मिठाव्यतिरिक्त सैंधव, हिमालयन गुलाबी मीठ ईई प्रकार मिळतात. यातले काही प्रकार साध्या मिठापेक्षा तब्येतीला चांगले असतात असं काही ठिकाणी सांगितलं जातं, ते कितपत खरं आहे? >>>>

या मिठांचे नक्की रासायनिक घटक मला माहित नाहीत. पण नेहमीच्या NaCl या मिठाऐवजी अन्य एक मीठ असे असते की त्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते.

या मिठाचे सखोल विवेचन लेखमालेतील पुढच्या पोटॅशियमच्या लेखात येईल. तिथे त्याची अधिक चर्चा करू.

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 10:20 am | कुमार१

सध्याच्या फ्री फ्लोईंग मिठात आणि जाडेभरडे मिठात काय फरक असतो? >>>>

त्यांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक नसावा. जाडेभरडेत Na व Cl खेरीज अन्य काही अशुद्धता असेल. आधुनिक मीठ हे ‘शुद्ध’ व आयोडिनयुक्त आहे हाच काय तो फरक.

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 10:41 am | कुमार१

आयोडीन सर्वसामान्य तापमानात उडून जाते असं म्हणतात, मग मिठात आयोडीन खरंच राहते का? राहत असेल तर अंदाजे किती दिवस राहते? >>>>>>
चांगला प्रश्न.

काही प्रमाणात I उडून जाणारच. ते कमी करण्यासाठी खालील उपाय करतात:

१. या मिठात Dextrose हे Stabilizer म्हणून घालतात.
२. पॅकिंग करताना ते ‘बाष्प-मुक्त’ सलग फिल्ममध्ये करणे

३. त्या मिठात K iodate चा वापर करणे (हे K iodide पेक्षा चांगले).
४. I चे भरतानाचे प्रमाण जास्त ठेवणे, आणि

५. ग्राहकाने वापराची मुदत १२ महिन्यांपर्यंतच ठेवणे

दुर्गविहारी's picture

16 Aug 2018 - 12:04 pm | दुर्गविहारी

खुपच उत्तम माहिती. पहिल्याच धाग्याने लेखमालेची रुची वाढवली. बाकी. खडे मीठ आणि बारीक मीठ याविषयी अधिक माहिती दिली असती तर बरे झाले असते. हल्ली खडे मीठ मिळत नाही, त्याचे काही दुष्परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत आहेत का ? पुर्णपणे खडेमीठच वापरले तर चालेल काय? हे समजुन घ्यायला आवडले असते.

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 12:28 pm | कुमार१

दुवि, अनेक आभार व चर्चेत स्वागत.

मिठाचे ३ प्रकार मिळतात : खडे, साधे जाडेभरडे व आयोडिनयुक्त.
त्या तिघांच्यातील सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक (आरोग्यदृष्ट्या) नसावा. मुद्दा आहे तो आपण शहरवासीयांनी पूर्णपणे आयोडिनयुक्त मीठ वापरावे की नाही? यावर मतभेद आहेत.

आमच्या जवळच्या दुकानात साधे जाडेभरडे मिळते, अगदी स्वस्तात. मी असे करतो की हे पावसाळ्याचे ४ महिने नवे चकाचक मीठ आणि उन्हाळ्यात वगैरे साधे जाडेभरडे. त्यांच्या खारटपणात थोडा फरक जाणवतो. पण रासायनिक प्रमाणाबद्दल माहित नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2018 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे

मी मागे कुमार१ यांच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथे तोच विषय असल्याने चिकटवत आहे.
गेल्या बारा पंधरा वर्षांपासून आहारातील मीठाविषयी मला एक घरातील निरिक्षण नोंदवायचे आहे. साधारण पणे पंधरा वर्षांपुर्वी बायकोच्या सैपाकात मीठाचे प्रमाण जास्त व्हायला लागले. मला व माझ्या मुलीलाही ते जाणवू लागले. बायकोला मात्र ते खारट वाटत नसे. मी सुरवातीला कुरकुर करत असे. पण हे असच चालू राहिले. मी तिच्या हातून मीठ जास्त का पडते हा विचार करु लागलो. अगोदर तर असे होत नव्हते. मग आता असे का व्हायला लागले. मला पुरेसे वाटणारा खारटपणा हा तिच्या दृष्टीने न के बराबर मीठ आहे असे वाटू लागले. कमी मीठ टाकायच असे ठरवले तरी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते मीठ जास्तच पडू लागले.हळू हळू मी तक्रार करायचे सोडून दिले. माझा मेंदु तो खारटपणा स्वीकारु लागला. फारच असह्य झाले तरच तो पदार्थ मी खात नसे. एकदा मित्र कॅनडावरुन आला होता. तेव्हा घरी काहीतरी पदार्थ केला होता. तो खाल्यावर तो म्हणाला अरे बापरे एवढे मीठ खाल्ले तर ब्लडप्रेशर मागे लागेल. मला या खारटपणाचे रहस्य उलगडत नव्हते. अचानक एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे एक डॊक्टरचा वैद्यकीय लेख वजा नोंद आढळली.लो ब्लडप्रेशर वाल्यांना तसेच हार्मोन्स मधील बद्लामुळे मीठाची गरज जास्त वाटू लागते व स्त्रिया आपल्या मेंद्च्या आदेशानुसार नकळत स्वयपाकात मीठ जास्त घालू लागतात असे वैद्यकीय संशोधनात आढळुन आले आहे. मग मला त्याची तर्क संगती लागली. त्या लेखाचे कात्रण करायचे मात्र राहून गेले. पुर्वी बायकोचे ९०/६० ब्लडप्रेशर नोंदले होते. तेव्हा फॆमिली डॊक्टरांनी सांगिलले कि काही लोकांमधे लो ब्लडप्रेशर आढळते पण त्याचा त्रास होत नसेल तर तो प्रकृतीचा भाग असतो. एकदा डॊक्टरांनी माझे ब्लडप्रेशर तपासले. ते थोडे जास्त आढळले. मला तरुणपणातच मायोकार्डियल इन्फार्क्षन झाले होते. त्यामुळे हार्टपेशंट म्हणून माझे कार्डियालॊजिस्ट कडे रेग्युलर चेक अप असायचे. ते फॆमिली डॊक्टरला माहित होते. त्यांनी मला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला व महिन्याने परत चेक अप ला बोलावले तेव्हा ब्लडप्रेशर नॊर्मल आढळले. तेव्हा ठीक आहे आत्ताच ब्लडप्रेशर च्या गोळ्यांची गरज नाही. नंतर काही काळाने मीठाचे प्रमाण परत येरे माझ्या मागल्या सारखे झाले. नंतर आमच्या कार्डिऒलॊजिस्टने ब्लडप्रेशर ची गोळी पण चालू केली.फॆमिली डॊक्टर म्ह्णाले की ठीक आहे आता स्पेशालिस्टनेच चालू केली आहे म्हटल्यावर घ्या. इथे एक नोंद करावीशी वाटते. आमच्या फॆमिली डॊक्टर बाई घरातल्या स्वयंपाक तुमचे आहार विहाराचे व कामाचे रुटीन याविषयी विचारतात तसे स्पेशालिस्ट विचारत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो. खर तर पेशंट ने दिलेल्या अशा माहितीतून काही वैद्यकीय निरिक्षणांना व संशोधनला हातभार लागत असतो. मटा मधील त्या डॊक्टरच्या लेखात मला कसे उत्तर मिळाले तसे काहीसे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि गेली पधरा वर्षे मी माझ्या गरजेपेक्षा दुप्प्पट मीठ घेत होतो. किंवा घेतो आहे आपले आंतरजालावरील मिपाकर व मायबोलीकर लेखक .कुमार१ यांनी ही गाउट प्रतिबंधक आहारात मीठ कमीच खाण्याची शिफारस केली आहे. बहुतेक डॊक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात पण मग अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्न माझ्यासमोर पडतो.
ता.क.- सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 1:15 pm | कुमार१

सध्या बायको माझ्या गरजे इतकेच मीठ घालते. ती वरुन घेते.>>>
ही तडजोड आवडली ! अगदी योग्य.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2018 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मागे एकदा मिपावर मीठ, त्याच्यात मिसळलेले आयोडीन आणि त्याच्या फ्री फ्लोबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यानिमित्ताने लिहिलेला मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन हा लेख आठवला.

अनिंद्य's picture

16 Aug 2018 - 10:18 pm | अनिंद्य

Best !

कुमार१'s picture

16 Aug 2018 - 2:00 pm | कुमार१

उत्तम आहे. वाचला व आवडला.

अनिंद्य's picture

16 Aug 2018 - 10:17 pm | अनिंद्य

@ कुमार१,

उत्तम लेख आणि चर्चा वाचली. मीठ-चर्चेच्या निमित्ताने एक अनुभव शेयर करावासा वाटतो :-

काही वर्षांपूर्वी निसर्गोपचार केंद्रात १० दिवस राहिलो होतो. पहिले दोन दिवस लंघन - रसाहार वगैरे झाल्यानंतर मला (वजन आटोक्यात असल्यामुळे) दोन्हीठाव जेवायची परवानगी होती. सूप, सलाड, भाकरी, भाजी - अगदी काही वर्ज्य नव्हते. पण अन्नात एक कणही मीठ नाही !!!! सुरवातीला ते अळणी जेवण काही जाईना. कधी या बंदिवासातून सुटतोय आणि शेव पुरी-पाणीपुरी-रगडा पॅटिस खातोय असे झाले होते. दोन दिवस गेल्यानंतर मात्र लक्षात आले की सर्व बिनमिठाच्या पदार्थांना स्वतःची खारट चव असते, फक्त आपल्या रोजच्या अन्नात मिठाचा अनिर्बंध मारा असल्यामुळे आपल्याला ती चव जाणवतच नाही.

तीच गत साखरेची. मला देण्यात आलेल्या दूध, ताक, वेगवेगळे फळांचे आणि भाज्यांचे रस - सर्वात स्वतःची गोडी होती फक्त रोजच्या खाण्यामध्ये साखरेचा (हवाहवासा) मारा सहन करणाऱ्या माझ्या जिभेला ती कमी गोड चव जाणवत नाही असे लक्षात आले. तेंव्हापासून मीठ - साखर कमी झाले ते नेहेमीसाठी :-)

आता पापड, लोणची, इन्स्टंट सूप, चिप्स, सॉस, सर्व तऱ्हेचे फास्टफूड ह्यामध्ये मीठ खूप जास्त आहे असे वाटते, कमी खाल्ल्या जाते. कोण्या गब्बरसिंगनी पिस्तूल रोखून विचारलेच तर 'सरदार तुम्हारा नमक खाया है पर बहुत कम खाया है" असे आता बिनधास्त सांगीन.

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार आणि पु भा प्र,

अनिंद्य

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2018 - 9:01 am | प्रकाश घाटपांडे

मी एक पीजे होस्टेलला मारीत असे त्याची आठवण आली.
गर्वर्मेंट, आय हॅव ईटन युअर सोडियम क्लोराईड
नाऊ ईट टॅब्लेट

सरदार तुम्हारा नमक खाया है पर बहुत कम खाया है" >>>>
सही !

वकील साहेब's picture

17 Aug 2018 - 12:08 pm | वकील साहेब

नेहमीप्रमाणेच छान व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद, काही प्रश्न आहेत ......
१. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ?
२. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते?
३. होमिओपॅथी मध्ये अल्कोहोल चा गंध असलेले दोन लिक्विड औषधे रोज काही थेंब घेण्याचा सल्ला देतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यात किती वाटा असतो ?
४. मी सध्या ते होमिओपॅथी चे औषध घेत आहे. पण औषधाचा वापर थांबवला कि रक्तदाब वाढतो आणि दर २-५ मिनिटांनी दीर्घ श्वास घ्यावा लागतो त्याशीवाय अस्वस्थ वाटत राहते. औषध सुरु केल्यास सर्व पूर्ववत होते. श्वास आणि रक्तदाब यांचा काय आणि किती संबंध आहे ?

कुमार१'s picture

17 Aug 2018 - 12:32 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभार !

१. रक्तातील सोडियम ची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब होतो तर मीठ खाणे कमी केल्याने उच्चरक्तदाबा पासून मुक्ती मिळवता येऊ शकते का ? >>>>
नाही, मुक्ती नक्कीच नाही ! उच्चरक्तदाबाच्या कारणांत जनुकीय बिघाड, अनुवांशिकता, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी मीठ कमी केल्यास नियंत्रणास मदत होते. पण, आजार “बरा” नाही होणार.

२. उच्च रक्त दाबा साठी डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यांचे कार्य नेमके कसे चालते? >>>>>

त्याचे खूप mechanisms आहेत. हा एमडी च्या परीक्षेचा १०० गुणांचा निबंध होईल ! थोडक्यात काही सांगतो:

१. हृदयकार्यावर परिणाम करणे
२. रक्तवाहिन्यावर परिणाम
३. मूत्रप्रवाह आणि सोडियमचे उत्सर्जन वाढवणे.
४. पेशींतील मूलभूत ionic क्रियांवर परिणाम

सुधीर कांदळकर's picture

18 Aug 2018 - 7:01 am | सुधीर कांदळकर

वाचल्या मिठाला जागून: मीठ बरोब्बर पडले आहे. वैद्यकीय दृष्टीकोनातून लवणमहात्म्य आवडले.
दादरला आमच्या गल्लीत एक मीठवाला हातगाडीवर मीठ घेऊन ओरडत फिरायचा. तो बोबडा होता. बारीक मीऽऽठ जाडा मीऽऽठ हे बाई मीऽऽठ, दादा मीऽऽठ असे ऐकू यायचे त्यामुळे मजा वाटायची.

पुढील भागांची आतुरतेने वाट पाहातो आहे.

कुमार१'s picture

18 Aug 2018 - 9:18 am | कुमार१

सुधीर, धन्यवाद
तुमच्या प्रतिसादानेही चर्चेची लज्जत वाढली आहे !

उपयुक्त माहिती. घरात मी एकटाच जास्त मीठ खातो, मात्र भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आता त्याचं प्रमाण थोडं कमी करावं लागेल.

कुमार१'s picture

18 Aug 2018 - 12:01 pm | कुमार१

त्यासाठी निर्धार लागेल.
कित्येक घरांत गरजेपेक्षा ५ पट मीठ खाल्ले जाते.

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2018 - 7:19 pm | मराठी कथालेखक

जेवणातले मीठ कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे चपाती वा भाकरी बिनामिठाची करणे. याने चव बिघडत नाहीच उलट अशी चपाती/भाकरी अधिकच चविष्ट वाटते.

कुमार१'s picture

18 Aug 2018 - 7:50 pm | कुमार१

आम्ही तर त्यात मीठ कधीच घालत नाही.
गरज च वाटत नाही .

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2018 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. भात, चपाती आणि भाकरी करताना मीठ वापरायची गरज नसते. हे पदार्थ आपण स्वतंत्रपणे न खाता, भाजी/आमटी/वरणाबरोबर खातो... ज्यांच्यात पुरेसे मीठ असतेच.

२. पाकक्रियेत मीठ सर्वात शेवटी व खाण्याच्या वेळेच्या शक्य तेवढे जवळ टाकावे, म्हणजे त्याचा बहुतेक भाग पदार्थाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर राहतो. मीठाचा हाच भाग जीभेवरील रुचीसंवेदकांच्या सहवासात आल्यावर त्याची चव कळते. स्वयंपाकाच्या प्रक्रियेत खूप अगोदर मीठ टाकल्यास त्याचा बराचसा भाग पदार्थामध्ये मुरतो, जो जीभेच्या रुचीसंवेदकांच्या सहवासात येतच नाही... म्हणजे त्याचा चवीसाठी ०% उपयोग, पण शरिरात मीठाचे प्रमाण वाढविण्यासाठी १००% सहभाग ! (याची अनुभूती घेण्यासाठी एक प्रयोग करून पहा. केवळ चिमूटभर मीठ तोंडत घोळवा. नंतर लगेच अजिबात मीठ न घातलेला पदार्थ खा. तसे केल्यास, कमीत कमी ३-४ मिनिटांपर्यंत पदार्थ अळणी असल्याचे कळून येत नाही... त्यात योग्य किंवा जास्त मीठ टाकले आहे, अशीच संवेदना रुचीसंवेदक आपल्या मेंदूला देतात !)

३. कोणत्याही पदार्थात नको असताना किंवा जास्त प्रमाणात मीठ (व पदार्थांना चटकदार बनवणारे इतर काही पदार्थ) वापरल्याने जीभेवरील चवीच्या संवेदकांना त्याची सवय होते व वेळ जाईल तसे मीठाचे (व त्या इतर पदार्थांचे) प्रमाण वाढवायची गरज पडते... किंबहुना, त्या पदार्थाची जास्त जास्त चटक लागते. ही प्रक्रिया काहीशी व्यसनासारखीच आहे.

आपल्या उत्पादनांचा खप सतत वाढवून जास्त जास्त फायदा कमावण्यासाठी, फास्ट फूड व बाईट्स (चिप्स, चीज बॉल्स, इत्यादी) बनवणार्‍या कंपन्या, या प्रक्रियेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे उपाय शोधणार्‍या प्रयोगशाळांवर दरवर्षी अनेक दशलक्ष डॉलर्स खर्चत असतात. सद्या या विषयावर पाश्च्यात देशांत बर्‍यापैकी खडाजंगी चालू आहे आणि अर्थातच, माघार घेता घेता, ती टीका टाळून व्यवसाय कसा वाढवावा येईल याबद्दल कंपन्यांचे संशोधन चालू आहेच ! :)

कुमार१'s picture

18 Aug 2018 - 9:00 pm | कुमार१

पाकक्रियेत मीठ सर्वात शेवटी व खाण्याच्या वेळेच्या शक्य तेवढे जवळ टाकावे, >>>>
हा अत्यंत मोलाचा सल्ला आहे. धन्यवाद.

कुमार१'s picture

19 Aug 2018 - 6:10 pm | कुमार१

ही चर्चा चालू असतानाच या विषयावरील ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासात जगातील १८ देशांतील विविध वंशाच्या सुमारे १ लाख लोकांचा अभ्यास झाला. त्यातील काही निष्कर्ष असे:

१. रोज सरासरी ५ ग्रामहून अधिक मीठ खाणाऱ्यात उच्च रक्तदाब आणि Strokeचे प्रमाण लक्षणीय.

२. आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते.

३. अधिक सोडियम आणि करोनरी हृदयविकार यांचा संबंध मात्र दखलपात्र नाही.

४. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये. अर्थात हृदय वगळता अतिरिक्त सोडियमचे शरीरातील अन्य पेशींवर (त्वचा, पचनसंस्था) दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा अन्य काही संशोधकांनी दिला आहे.

डॉ श्रीहास's picture

20 Aug 2018 - 1:45 pm | डॉ श्रीहास

१.काळं मिठ, पादेलोण / पादे मिठ .... हे सगळे सारखेच का ?

२.लांब पल्ल्याच्या (१००+)सायकलींग मध्ये काळ्यामिठाचा जास्त फायदा होतो आहे , बहूदा mineral content जास्त असतं .

कुमार१'s picture

20 Aug 2018 - 2:08 pm | कुमार१

काळं मीठ, >>> हे बहुतेक rock salt. त्यात खनिज जास्त असावे . बरोबर

वकील साहेब's picture

21 Aug 2018 - 11:22 am | वकील साहेब

शंकानिरसना बद्दल धन्यवाद कुमारजी _/\_

कुमार१'s picture

21 Aug 2018 - 9:10 pm | कुमार१

पोटॅशियम इथे सापडेलः
https://www.misalpav.com/node/43199

सर्वांचे आभार !

शेखरमोघे's picture

21 Aug 2018 - 10:39 pm | शेखरमोघे

Sodium वर नेहेमीसारखीच उपयुक्त आणि महत्वाची माहिती. आभार.

जाडे इ.इ. प्रकारच्या मिठाबद्दलः आपण नेहेमी वापरतो ते मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यातील फक्त क्षार उरेपर्यन्त सूर्याच्या उन्हाने बाष्पीभवन केल्याने (पाण्याची वाफ झाल्याने पाणी "उडून" गेल्याने किन्वा घालवले गेल्याने) शिल्लक रहाणारा गाळ. हे बाष्पीभवन करताना समुद्राच्या पाण्यातील इतर नको असलेले (चिखलासारखे) पदार्थ जितके निगुतीने वेगळे केले जातील (उदा. sedimentation वापरून) तितके मीठ जास्त शुभ्र होईल. बाष्पीभवनाची सुरवात करताना वेगवेगळ्या प्रकारच्याऔद्योगिक तर्‍हेच्या गाळण्या (filters) वापरूनही समुद्राच्या पाण्यातील नको असलेले/उपद्रवी पदार्थ वेगळे केले जातात. जर हे बाष्पीभवन अनेक टप्प्यात केले तर तयार होणारे मीठ जास्त बारीक आणि एक सारखे होईल. जर हेच काम मोजक्याच टप्प्यात आणि प्रत्येक वेळी समुद्राचे बरेच पाणी घेऊन केले तर जाडे भरडे मीठ बनेल. शेवटी % of NaCl वरून मिठाची Chemical Quality ठरेल.

कुमार१'s picture

22 Aug 2018 - 9:08 am | कुमार१

पूरक माहिती बद्दल आभार !

अनिंद्य's picture

22 Aug 2018 - 2:47 pm | अनिंद्य

@ कुमार१,

शरीरातील मिठाबद्दल तुम्ही उत्तम लिहिले. साहित्यातही 'मीठ' ह्या विषयाला वाहिलेल्या अनेक कथा, कविता, लेख आहेत. मीठधाग्याचा समारोपाला मला आवडलेल्या एका हिंदी कवितेचे काही अंश :-

नमक दुख है धरती का और उसका स्वाद भी !
पृथ्वी का तीन भाग नमकीन पानी है
और आदमी का दिल नमक का पहाड़
कमज़ोर है दिल नमक का
कितनी जल्दी पसीज जाता है !
गड़ जाता है शर्म से
जब फेंकी जाती हैं थालियाँ
दाल में नमक कम या ज़रा तेज़ होने पर !

वो जो खड़े हैं न-
सरकारी दफ्तर-
शाही नमकदान हैं

बड़ी नफासत से छिड़क देते हैं हरदम
हमारे जले पर नमक !

दुनिया में कुछ और रहे-न-रहे
रहेगा नमक-
ईश्वर के आंसू और आदमी का पसीना -
ये ही वो नमक है जिससे
स्थिर रहेगी ये दुनिया.

(कवयित्री - अनामिका)

पुढील भागांसाठी शुभेच्छा,

अनिंद्य

कुमार१'s picture

22 Aug 2018 - 3:51 pm | कुमार१

छान कविता. आवडली.
वैज्ञानिक चर्चेत अशी सुरेख साहित्य पेरणी केल्यामुळे चर्चेची खुमारी वाढली.
आभार

कुमार१'s picture

22 Aug 2018 - 4:13 pm | कुमार१

छान कविता. आवडली.
वैज्ञानिक चर्चेत अशी सुरेख साहित्य पेरणी केल्यामुळे चर्चेची खुमारी वाढली.
आभार

प्रीत-मोहर's picture

23 Aug 2018 - 9:56 am | प्रीत-मोहर

सुरेख लेख. वरच्या सोडियमच्या कमतरतेने काय होते त्याचा अनुभव परवाच आला. एका मित्राची आई देवाघरी गेली. डॉ. नी खुप प्रयत्न केले सोडिय्म लेवल वाढवण्याचे पण ११५ वरच काटा अडकून होता.
असो.

कुमार१'s picture

23 Aug 2018 - 10:03 am | कुमार१

आभार आणि सहमती
सोडियम पेक्षा पोटॅशियम पातळीतील गडबड तर अधीक कटकटीची असते.

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 9:09 am | कुमार१

मोठ्या प्रमाणावर जुलाब झाल्यानंतर रुग्णाला डीहायड्रेशन होते. यावरील घरगुती प्रथमोपचार म्हणजे मीठ, साखर व पाणी यांचे मिश्रण तोंडाने देत राहणे. या औषधोपचाराला ओरल रीहायड्रेशन सोल्युशन (ORS) असे म्हणतात.

हा सोपा परंतु प्रभावी उपचार विकसित करण्यामध्ये काही वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. त्यापैकी कोलकाता येतील डॉक्टर दिलीप महालनबीस हे एक होत. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान त्यांनी हे उपचार असंख्य कॉलराबाधित निर्वासितांवर करून त्यांचे प्राण वाचवले होते.

दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी या संशोधक डॉक्टरांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
आदरांजली !

Bhakti's picture

19 Oct 2022 - 6:50 pm | Bhakti

श्रद्धांजली!
सध्या मी फिझिओलाजी मन लावून वाचतेय,आजच इलेक्ट्रोलाइट्स शिकवला.त्यामुळे हा लेख मला सर्व उमगला ,खुपचं छान , मराठी भाषेत वाचून छान वाटला.आता तुमचे सगळे मेडिकल क्षेत्रातले लेख माझ्यासाठी पर्वणीच असणारं :) :)

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 7:25 pm | कुमार१

फिझिओलाजी मन लावून वाचतेय,

अरे वा ! मग जरूर चर्चा करू.
धन्यवाद

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 11:30 am | कुमार१

‘सकाळ’ मधल्या बातमीत डॉ. दिलीप महालनबीस यांना ORS या उपचाराचे ‘जनक’ असे म्हटले आहे ते तितकेसे बरोबर नाही.

या उपचारांच्या शोधाचे मूळ पार 1949 इतके मागे जाते.
1961 मध्ये कॅप्टन फिलिप यांनी ORSचा प्रयोग प्रथम केला होता.
पुढे त्यात अनेकांचे योगदान होते, ज्यामध्ये कलकत्ता व ढाका येथील वैज्ञानिकांचाही चांगल्यापैकी वाटा होता.
1971 मध्ये डॉ. दिलीप महालनबीस यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
…..
जुलाबाच्या रुग्णाला मीठ, साखर व पाणी तोंडाने देणे यात फार मोठे संशोधन ते काय, असा प्रश्न सामान्य माणसाला आज पडू शकेल (आजची बातमी वाचल्यावर एकाने मला हे बोलून दाखवले देखील !) परंतु, प्रत्यक्षात ही संशोधनप्रक्रिया पन्नास-साठ वर्षे चालू होती. किंबहुना ग्लुकोज व मीठ हे एकदम द्यायचे हा मुद्दा शोधण्यासाठी अनेक मूलभूत प्रयोग करावे लागले होते.

हा सर्व संशोधन इतिहास खूप रंजक आहे.

कुमार१'s picture

27 Jan 2023 - 9:32 am | कुमार१

डॉ. दिलीप महालनबीस
यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.

चामुंडराय's picture

20 Oct 2022 - 12:23 am | चामुंडराय

"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" ही जुनी भित्ती-घोषणा आठवली.

चामुंडराय's picture

20 Oct 2022 - 12:23 am | चामुंडराय

"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" ही जुनी भित्ती-घोषणा आठवली.

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 7:31 am | कुमार१

आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 7:31 am | कुमार१

आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 7:31 am | कुमार१

आमचे पूर्ण वैद्यकीय शिक्षण त्या घोषणेच्या सहवासातच झाले.

कुमार१'s picture

26 Mar 2023 - 8:50 am | कुमार१

एक चांगला लेख:

नवा 'मिठाचा सत्याग्रह'</strong>

आपल्या देशातील नागरिकांच्या आहारातील मिठाचे-सोडियमचे प्रमाण मर्यादेत राहावे, यासाठी नव्याने अन्न व आहार धोरण तयार करणाऱ्या अवघ्या नऊ देशांची नावे पाहा. ब्राझील, चिली, चेक रिपब्लिक, लिथुआनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वे हे ते नऊ देश आहेत.